चौथी माळ-' सुटसुटीतपणा, सोडून देण्याची वृत्ती' (Let go)

Submitted by पूजा जोशी on 26 October, 2020 - 05:46

चौथी माळ-' सुटसुटीतपणा, सोडून देण्याची वृत्ती' (Let go)

काल आपण सांभाळ करण्याच्या शक्तीचा मागोवा घेतला. काय काय सांभाळायचं हे कळणं जसं आवश्यक आहे तसंच काय काय सोडून द्यायचं हे कळणं ही अती आवश्यक आहे'

काय काय सोडून द्यायचं ?
जे मनाला शरीराला हानिकारक आहे
जे कालबाह्य झालं आहे
जे निरुपयोगी झालं आहे
जे नकारात्मकता वाढवतं आहे
जे भेदभाव वाढवते आहे ते ते सगळं

काल आपण बघितलं की आपल्या शरीराचा सांभाळ आपल्यालाच करायचा आहे. मग शरीराला हानिकारक आहार, विचार, सवयी आपण सोडून द्यायला हव्यात. अरबट चरबट खाणे,अति गोड -तिखट तेलकट असा असंतुलित आहार जाणीवपूर्वक सोडून द्या. टीव्ही बघताना, ऑफिसचं काम करताना जेवण घेणं टाळा. शक्यतो जेवणासाठी वेगळा वेळ काढा.

अती चहा काॅफी, सिगरेट, तंबाखू, दारू अशी व्यसनं सोडून द्या.

तसेच आळशीपणा /निष्क्रियता या गोष्टी शरीराला हानिकारक आहेत.

आधी हानिकारक गोष्टींची जाणीव करून घ्यायची. मग त्या प्रयत्नपूर्वक कमी करत जायच्या आणि हळूहळू पूर्ण सोडून द्यायच्या.

अशाच प्रकारे ज्या विचारांमुळे आठवणींमुळे आपल्याला त्रास होतो. त्यासुद्धा जाणीपूर्वक सोडून द्यायच्या.

लॉक डाऊनच्या काळात बाहेर जाताना न विसरता मास्क लावतो की नाही? जेणेकरून कोरोनाचे विषाणू आपल्या नाका-तोंडात जाऊ नये. तसेच हानिकारक विचारापासून आपला बचाव करण्यासाठी तसाच मास्क मनालासुद्धा लावा.

खूप वर्षांपूर्वी झालेले भांडण, दुसऱ्याची किंवा स्वतःची चूक, गैरसमज किती काळ मनात साठवून ठेवायचं? आपण शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी रोज अंघोळ करतो. लॉकडाउनच्या काळात तर शंभर वेळा हात धुतो. तसं रोजच्या रोज मनाची सफाई करा. मनात साचलेली जुनी जाळी जळमटं काढून टाका.बघा किती प्रसन्न वाटेल. किती हलकं वाटायला लागेल.

आपण जळता निखारा हातात धरून ठेवतो का? हाताला चटका बसला की लगेच हातातून सोडून देतो. तसेच मनाला चटका देणारी कोणतीही गोष्ट ताबडतोब सोडून द्यायची. स्वतःच्या हितासाठी.

Let go Let go Let go

आपण घरात कितीतरी वस्तू जमवतो. पुस्तक, फर्निचर, कपडे, वस्तू, भांडी..... यातील काही सामान आपण वर्षानुवर्षे वापरत नाही. असे सामान योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या व्यक्तीला, संस्थेला देऊन टाका. त्यांनाही लाभ होईल आपल्या घरातील अडगळ कमी होईल.

आपण नियमितपणे कचरा बाहेर टाकतो. रद्दी विकतो. तसेच घरातली अडगळ जुने कपडे तुटलेले सामान नियमितपणे काढून टाकले पाहीजे.

कुटुंबातील नाती, कामाच्या जागी सहकाऱ्यांशी असलेली नाती,शेजाऱ्यां शी संबंध, मित्र-मैत्रिणींची नाती दीर्घकाळ टिकवायची असतील तर काय काय सोडाल?
- Possessiveness सोडा
- अपेक्षा ठेवणं सोडा
- नावं ठेवायची वृत्ती सोडून द्या
- तक्रार करणे सोडून द्या
- पूर्वग्रह सोडून द्या

कुठल्याही गोष्टीला सामोरे जाताना पूर्वग्रह ठेवू नका. आपली मतं दुसऱ्यावर लादू नका.मला एखादा नातेवाईक आवडत नाही म्हणून माझ्या नवऱ्याने किंवा मुलाने त्याच्याशी नाते संबंध ठेवू नये असा अट्टाहास करू नका. मुलांना त्यांची त्यांची नाती घडवायला स्वातंत्र्य द्या.

बॉस आहे म्हणून तो आपलं ऐकणार नाही. कामवाली बाई आहे म्हणून तिला साहित्यातलं काही कळणारच नाही. किंवा सून आहे म्हणून ती सासू-सासर्‍यांची काळजी घेणारचं नाही. अशी पूर्व गृहीत मनात धरून कुठल्याही नात्याला सामोरं जाऊ नका.

आपल्याला दुसऱ्या कडून अपेक्षा असतात आणि त्या पुर्ण नाही झाल्या की कुरबुरी-ताणतणाव वाढायला लागतात. अपेक्षा करणं सोडून द्या मग बघा अपेक्षाभंगाचे दुःख आणि ओझं कमी होतं की नाही.

असं सोडून देता आलं की काय होतं ? आपण मोकळे होतो. सुटसुटीतपणा वाढतो. आपली तब्येत सुधारते. आनंद व प्रसन्नता वाढते. आपल्यातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मकता वाढायला लागते.

भूतकाळाच्या आठवणींमध्ये किंवा भविष्याच्या चिंतेमध्ये गुंतू नका. वर्तमानात जगायला शिका. यासाठी एक सोपा मंत्र म्हणजे ‘Here and Now’

आपण आत्ता शरीराने कुठे आहोत आणि मनाने कुठे आहोत? हा प्रश्न सतत स्वत:ला विचारा.

हाताने पोळ्या लाटत असतो आपण आणि मन ऑफिसच्या विचारात गुंतलेले असते. असं नेहमी व्हायला लागलं की गुंता वाढतो. मनावर शरीरावर ताण यायला लागतो. म्हणूनच आपण जिथे आहोत जे काम करतो आहोत तिथेच आपलं मन असेल याची काळजी घ्या.

रबर जसं दोन टोकांनी धरून खेचलं की ताणलं जातं. तसंच आपलं शरीर एका ठिकाणी असेल आणि मन दुसऱ्या गोष्टीचा विचार करत असेल तर शरीरावर आणि मनावर दोघांवरही ताण येतो. आपण आहोत या कामाचा त्या क्षणाचा पूर्ण आस्वाद घेऊ शकत नाही.

अशा हानिकारक सवयींचा, नकारात्मक विचारांचा, कालबाह्य रुढींचा, अपेक्षांचा एक पिंजरा आपण आपल्या भोवती तयार करतो आणि मग त्याच्या मुळे आपली प्रगती आनंद स्वास्थ्य बिघडवून टाकतो. हा पिंजरा आपणाचं बनवतो आणि हा पिंजरा तोडून मुक्त होणं हे आपल्याच हातात आहे. सूफी संत कवी रुमी म्हणतात Why stay in the prison when the door is wide open?

भारती दंडे - पूजा जोशी

पहिली माळ - घटस्थापना
https://www.maayboli.com/node/77105

दुसरी माळ- सृजनशीलता,नवनिर्मिती, कल्पकता ( Creativity)
https://www.maayboli.com/node/77108

तिसरी माळ- जतन,संवर्धन,सांभाळ
https://www.maayboli.com/node/77109

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults