ग्रिल्ड तंदूर पाँफ्रेट..

Submitted by अ'निरु'द्ध on 23 October, 2020 - 14:08
Grilled Tandoor Pomphret
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

मुखपृष्ठ :

२ पाँफ्रेट साठी :

प्रत्यक्ष पाँफ्रेट साठी
रसाळ लिंबू : १ (अर्ध लिंबू/१ टी स्पून इथे)
मीठ : चवी प्रमाणे (मी दोन भागात घेतले..)
(एक भाग प्रत्यक्ष माशाला लावायला आणि दुसरा भाग मॅरिनेशन साठी..)
लसणीच्या पाकळ्या : १२ (वैकल्पिक)

मॅरिनेशन साठी :
दही : २ टेबलस्पून
आलं लसूण पेस्ट : २ टी स्पून
बेसन पीठ : ३ टी स्पून
मोहरीचे तेल : २ टेबलस्पून
(अर्ध लिंबू/१ टी स्पून लिंबू रस इथे)
लाल मिरची पावडर : दोन टी स्पून
काश्मिरी मिरची पावडर : १ टी स्पून (रंगासाठी)
हळद : अर्धा टी स्पून
जिरं : पाव टी स्पून
ओवा : अर्धा टी स्पून (खास तंदूर फ्लेवर साठी)
धणा पावडर : १ टी स्पून
चाट मसाला : अर्धा टी स्पून
मीठ : चवी प्रमाणे..

क्रमवार पाककृती: 

ग्रिल्ड तंदूर पाँफ्रेट..

दि : २१ ऑक्टोबर, २०२०..

सकाळी सकाळी आमच्या टारझनसाठी बोंबिल आणि मांदेली आणायला कोळीणी कडे गेलो होतो.
पैसे पुढे केले तर म्हणाली, दादा मांजराचा तं झाला, तुमच्यासाठी काय..?

म्हटलं, आज नको गं बाय.. आज घेतलं तरी शुक्रवारीच बनवणार… येईन तेव्हा परत..

तर म्हणाली, खापरी हायत बग चांगली पांढऱ्या पान्याची.
जा एक जोडी घेऊन.. खाताना नांव काडशील माजा..

मग विचार केला, कधीतरी ग्रिल्ड पाँफ्रेट करायचंच होतं तर या शुक्रवारी करु.. मग तिला सांगितलं, हे बघ.. आख्खा फ्राय करायचाय… चटणी भरुन… तर तसा कापून दे..

वरती पण चिरा पाड दोन्ही बाजूंनी आणि आडव्या पण मोठ्या चिरा पाडून दे, चटणी भरायला..

तिने सांगितल्याप्रमाणे चिरा पाडल्या आणि जोडी पिशवीत भरली..
घरी गेल्यावर बायकोला सांगितलं, शुक्रवार साठी आणलेयत.. डीप फ्रिझरला टाकून दे…

नंतर दुपारपासूनच आभाळ दाटून आलं. एकदम पावसाळी अंधार पडला.
संध्याकाळी वर्क फ्राॅम होम संपवून लॅपटाॅप मधून नजर वर काढली.. लॅपटाॅप बंद केला आणि आळस देत चहा मागायला बाहेरच्या खोलीत आलो..
बाहेर मस्त पाऊस पडत होता ज्याची कामात गुंतल्यामुळे मला कल्पनाच नव्हती..
चहा पिता पिता बायकोला विचारलं, रात्री जेवायला काय आहे..? तर म्हणाली, सुरणाची भाजी.. Sad
तिला विचारलं, पाँफ्रेट डीप फ्रिजरलाच टाकले की चुकून रेगुलर फ्रिजरला….
तिने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली.. दुपारी चार पर्यंत डीप फ्रिजरलाच होते पण पाऊस पडायला लागला आणि सुरणाची भाजी असणार होती तर रेग्युलरला काढून ठेवलेयत..

थोडक्यात संध्याकाळचं ते पावसाळी वातावरण बघून मला शुक्रवार ऐवजी तेंव्हाच, लगेच ग्रिल्ड तंदुरी बनवायचा मूड आला.

पूर्वतयारीचा वेळ : (१०+१०)= २० मिनिटे
मॅरिनेशन : ३० मिनिटे
शिजवण्यास लागणारा वेळ : १ तास १० मिनिटे

क्रमवार पाककृती :

पाँफ्रेट विकत घेतानाच कोळीणीकडून त्याला दोन्ही अंगाला पाच सहा चिरा (Slits) पाडून घेतल्या होत्या.

भरलं पापलेट करायचं आहे सांगून पोटामधेही दोन्ही बाजूंनी खोल चिर (Cut) पाडून घेतली होती.

प्रचि ०१ : दोन्ही माशांमधे Slits आणि डावीकडच्या माशामधे Cut दिसेल पहा..


मासे स्वच्छ धुऊन घ्यावेत..
लिंबाचा रस त्यांना आतून बाहेरुन चोळून घ्यावा.
थोडं थोडं मिठ त्यांच्या अंगाला आतून बाहेरुन लावून नीट पसरवावं. (बाकीचं मीठ मॅरिनेशन मधे येणार आहे.)

प्रचि ०२ : लसणीच्या पाकळ्यां आणि मॅरिनेशनचे पदार्थ.. (प्रचित तेल नाहीये )


त्यानंतर लसणीच्या १२ पाकळ्या छोट्या दगडी खलबत्त्यामधे ठेचून घ्या आणि दोन्ही माशांना बाहेरुन कमी आणि आतून जास्त प्रमाणात लावा.
(जास्त लसूण आमच्या घरी आवडतो. ज्याना आलं लसणाच्या वाटणातला लसूण पुरेसा आहे त्यांनी ही पायरी गाळली तरी चालेल.)

प्रचि ०३ : वेगळ्या बोल मधे दही..


त्यानंतर दह्याचा बोल घेउन त्यातलं पाणी काढून टाकावं.
त्यात बेसन पीठ टाकावं. (बेसनामुळे मॅरिनेशन माशाच्या अंगाला चांगलं चिकटून रहातं.)
यानंतर त्यात मोहरीचं तेल टाकावं.
हे मिश्रण एकदा ढवळून घ्यावं.

त्यानंतर या मिश्रणात मॅरिनेशन साठी घेतलेली आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, काश्मिरी मिरची पावडर, हळद, जिरं, ओवा, धणा पावडर, चाट मसाला आणि चवी प्रमाणे मीठ हे सर्व टाकावं आणि चांगलं ढवळून घ्यावं.

त्यानंतर उरलेला लिंबाचा रस टाकून हे सर्व मिश्रण एकजीव करावं.

प्रचि ०४ : आता आपलं मॅरिनेशनची पेस्ट तयार झाली आहे.


बोलमधली मॅरिनेशन पेस्ट माशांना आतून बाहेरुन चोळून घ्यावी. चिरांमधेही (Slits n Cuts) चांगली पसरुन घ्यावी.
संपूर्ण मासा मॅरिनेशन पेस्टने चांगला कोट/कव्हर झाला की अर्ध्या तासाकरता छान मॅरिनेट होण्यासाठी मुरवत ठेवावा.

प्रचि ०५ : मॅरिनेशन पेस्ट लावलेले मासे..


मधल्या काळात ओटीजी अव्हन २०० सें. तापमानावर २० मिनिटे Pre Heat करत ठेवावा.
प्रि-हिटींग साठी वरची आणि खालची (Top n Bottom) ह्या दोन्ही काॅईल्स ऑन कराव्यात.

प्रचि ०६ : साधारणपणे ३० मिनिटं मॅरिनेट केल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे स्काॅच मार्किंग.
यासाठी गॅसची शेगडी पेटवावी आणि मासा चिमट्याने धरुन त्या ज्वाळांवर भाजावा.
चिमटा न वापरता डायरेक्ट पेटलेल्या शेगडीवर पाँफ्रेट ठेवला तरी चालतो.


प्रचि ०७ : या प्रकारात अर्थातच शेगडी थोडी (थोडीशी ?? Angry हे वटारलेल्या डोळ्यांनी ऐकायला मिळायचीही शक्यता आहे..) खराबही होते. पण ते बर्न्ट मार्क्स आणि डायरेक्ट भाजल्याचा स्वाद यापुढे स्वहस्ते शेगडी साफ करावी लागणं किंवा परहस्ते असल्यास रागीट डोळे पहावे लागणं हे वर्थ आहे. (लेकीने सगळा मेस बघितल्यावर पापड भाजायची जाळी किंवा मिनी तंदूर जाळी वापरायचा सल्ला दिला.)


प्रचि ०८ : भाजल्यामुळे आलेले स्काॅच मार्क्स अथवा बर्न्ट. स्पाॅटस्..


यानंतर हे भाजलेले पाँफ्रेट्स एक एक करुन अव्हनच्या बाहेर काढलेल्या ग्रिलवर आणि ॲल्युमिनीयम फाॅईलने आच्छादित केलेल्या ट्रे वर ठेवावेत.
ठेवण्यापूर्वी मासा जाळीला/ट्रे ला चिकटू नये म्हणून मासा ठेवणार त्या जाळीच्या आणि फाॅईलच्या पृष्ठभागावर हलकसं तेल लावावं.

जाळी अव्हनच्या तीनपैकी सर्वात वरच्या स्लाॅट मधे आणि ट्रे सर्वात खालच्या स्लाॅट मधे इन्सर्ट करावा.
आणि अव्हनचं दार बंद करुन तपमान २५० सेंटी. आणि टायमर ३० मिनिटांवर सेट करावा.
दोन्ही काॅईल्स ऑन असाव्यात.

२० मिनिटांनी दिवा लावून/अव्हनचं दार उघडून अंदाज घ्यावा.

प्रचि ०९ : २० मिनिटांनंतरची स्थिती.. (पहिली बाजू)


अजून १० मिनिटांनी (एकूण ३० मिनिटं) दोन्ही पाँफ्रेट दुसरी बाजू ग्रिल करण्यासाठी पलटून घ्यावेत.
ह्या ही वेळी तपमान २५० सेंटी. आणि टायमर ३० मिनिटांवर सेट करावा.
दोन्ही काॅईल्स ऑन असाव्यात.

(ह्या दुसऱ्या बाजूच्या वेळा/Timings Timer लावण्यासाठी स्वतंत्रपणे म्हणजेच पुन्हा शून्यापासून दिल्या आहेत..)

पुन्हा एकदा २० मिनिटांनी (म्हणजे आधीची ३० + २० मिनिटांनी) दिवा लावून/अव्हनचं दार उघडून अंदाज घ्यावा.

प्रचि १० : पहिली बाजू पलटून घेतल्यानंतर २० मिनिटांनंतरची स्थिती..


प्रचि ११ : Final Checking.. @ 27 Minutes..


प्रचि १२ : Final Product.. @ 30 Minutes..


अव्हनचं दार उघडल्या उघडल्या मस्त खमंग वास आला.
रेसिपी टाकावी हे तेव्हा डोक्यातही नव्हतं. (बाकीचे अधलेमधले फोटोग्राफ्स खरं तर फक्त हौस म्हणून काढले होते.) (अगदी खरं तर मित्रांना जळवायला) त्यामुळे ग्रिल्ड तंदूर ताटात काढल्यावर काकडी, टोमॅटो, कापलेला कांदा किंवा सेलरी वगैरे अशी कुठलीही सजावट न करता वासाने चाळवला जाऊन आधी त्या पाँफ्रेटवर ताव मारला..

त्यामुळे वेल डेकोरेटेड फोटो सम अदर टाईम..

वाढणी/प्रमाण: 
दोघांसाठी (खवैय्ये असल्यास)
अधिक टिपा: 

# तंदुरी पदार्थांच्या खास लाल रंगासाठी आवश्यकता वाटल्यास प्रमाणित खाद्य रंग वापरावा.
केवळ पाककृती आकर्षक करण्यासाठी असे रंग वापरायला मला आवडत नाही त्यामुळे या पाककृतीत मी कोणतेही खाद्यरंग वापरलेले नाहीत.

# चाट मसाला नसेल किंवा वापरायचा नसेल तर तेवढ्याच प्रमाणाची आमचूर पावडर वापरु शकता.

माहितीचा स्रोत: 
यु-ट्युब चॅनेल.. आणि घरचे शेफ्स्..
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रेसिपी आहे.. पापलेटचे फोटो पण एक नंबर..सध्या मच्छी मार्केटमध्ये पापलेट भरपूर येत आहेत. नवरात्र संपली की नक्की करून बघेन हि रेसिपी..

फोटो छान आहे. पण आई कधीही माशाला दही लावू देत नाही. पाप लागतं Wink

एंजॉय तुमचे पापलेट (आणि आम्ही आमच्या स्टाइलचे) Light 1

नहीsssssssssssssssssssssssssssssssssssssssss !
हमकोभी कोई पाप्लेट देव रे !

मस्त!

प्रचि १२ : Final Product.. @ 30 Minutes.. >>>>
पापलेटही बेटं खुशीत येऊन हसतंय .... त्याला जे काही केलंय ते आवडून.

ता.क. -- असाच सुरणही करता येतो की पण.... साल काढून, धुवून, काप करून मिठाच्या पाण्यात १५-२० मिनीटे. मग निथळून / पुसून तिखट + मीठ + चिंचेचा कोळ लावून, रवा / तांदूळ पिठात घोळवून तव्यावर तळायचे. काप मध्यम जाड. फार पातळ केल्यास थंड झाल्यावर वातड होतात. गरम खायला काही फरक पडत नाही.

<<<भारी! इतका वेळ घेतो पापलेट ग्रील व्हायला?>>>
डोक्यात होतं ह्याबद्दल लिहायचं पण लिहिता लिहिता राहिलं.
आमचा OTG भयंकर जुना आहे त्यामुळे बहुतेक वेळ लागत असेल..

मलाही हाच प्रश्न पडला होता की मासा शिजायला 5 मिनिटे लागतात तर इथे 30 मिनिटे सांगितली आहेत.कदाचित tayapo error asel म्हणून

रुपाली विशे-पाटील, संपलं आता नवरात्र.. पापलेटनी बाजार ओसंडून वहातोय. बनवा लवकरच आणि द्या इथे फोटो.

VB, जाई, अमितव, वेका, अवल, विनिता.झक्कास, बोकलत : प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..

स्वाती२ : हा छळ कल्याने पुण्य लागतं... म्हणून असा छळ करावा. शास्त्र असतं ते... Happy

जेम्स बाँड : देगा.. कोई न कोई पापलेट जरुर देगा. और नही देगा तो हमसे मिलियेगा. हम जरुर देंगे..

मृणाली : एअर फ्रायर हा एक पर्याय आणि कदाचित मायक्रोवेव्ह दुसरा..

अंकु, फक्त ३० मिनिटं म्हणायचंय की अरे बाप रे म्हणायचंय. ओटीजी ला एवढा वेळ लागणारंच. पण टायमर लावून अर्ध्या तासात आपण इतर काम किंवा टाईमपास करु शकतो.

देवकी : हे मावे मधे नाही बनवलं. OTG मधे केलंय.. तो ही कमीतकमी १५ वर्ष जुना. म्हणून वेळ लागत असेल.

कारवी : त्या हसण्याऱ्या पापलेट बद्दल अगदी अगदी. माझ्याही लक्षात आलं नव्हतं आधी.. अगदी डिस्ने सिनेमातल्या हसऱ्या कार्टुनसारखं दिसतंय. तुमच्या काॅमेंटनंतर मी आणि घरचेही हसरा पापलेट बघून मनापासून हसतोय...

आणि अजून एक : पापलेट ऐवजी सुरण हा पर्याय म्हणजे (इथे नाक मुरडलेली बाहुली) Light 1
अर्थातच सुंदर आणि शोधक प्रतिसादाबद्दल आभार.. Happy