पालकत्वाचा काटेरी मुकुट -किस्सा 8 *घर तिघांचे *

Submitted by नादिशा on 19 October, 2020 - 11:33

* घर तिघांचं *

आजकाल आपली कुटुंबे पहिल्यासारखी मोठी राहिलेली नाहीत. आपल्या कुटुंबात मोजकेच लोक असतात. मुलेही एक किंवा दोनच असतात बहुतेक ठिकाणी . त्यामुळे साहजिकच आपले खूप प्रेम असते आपल्या मुलांवर. आपल्याला शक्य ते सर्व त्यांना पुरवण्याचा आपण प्रयत्न करतो .
आपण म्हणताना म्हणतो , आमचे कुटुंब इतक्या इतक्या जणांचे आहे . पण एखादी गोष्ट करताना , घेताना मुलांना विचारात घेतलेच जात नाही दुर्दैवाने , घरातला महत्वाचा घटक असे मानले जात नाही त्यांना बरेचदा .

घर आपल्या तिघांचे आहे , असे कायम आम्ही म्हणत आलो स्वयमसमोर . ही भावना त्याच्या मनात आम्ही जागृत ठेवली . नुसती शब्दांतून नाही , तर कृतीतूनही दाखवून दिली . त्यासाठी तो जेव्हा थोडा कळता झाला , पहिलीत गेला , तेव्हा आम्ही घराला नाव द्यायचे ठरवले . कोणते नाव देऊया , यावर आम्ही तिघांनीही डोकी चालवली . शेवटी तिघांच्याही नावांतील काही अक्षरांचा वापर करून "प्रमिती "असे नाव तयार केले मी . अमित आणि स्वयमलाही आवडले . मग तेच नाव दिले . त्याच वेळी घराच्या दरवाज्यावर नेमप्लेट लावली . तर तिच्यावर अमितचे , त्याखाली माझे आणि त्याखाली स्वयमचे , अशी तिघांचीही नावे लिहिलेली आहेत .

घरात एखादी गोष्ट करताना , एखाद्या बाबीचा निर्णय घेताना त्यामध्ये आम्ही स्वयमलाही सहभागी करून घेतो .
उदा . घराला कलर दिला , तेव्हा आम्ही त्यालाही विचारले होते ,"तुला काय वाटते स्वयम , कोणता कलर देऊया आपण घराला ?"
त्याचा सल्ला ऐकायचा की नाही , हे आम्ही ठरवतो . योग्य असेल तर ऐकतो , तेव्हा योग्य सल्ला दिल्याबद्दल त्याचे कौतुक करतो . पण नसेल योग्य, तर नाही ऐकत . मात्र का नाही ऐकू शकत त्याचा सल्ला , हे मात्र तेव्हा त्याला नीट समजून सांगतो. यामुळे आपणही घरातला एक जबाबदार घटक आहोत , आपल्याही मताला किंमत आहे , निर्णयप्रक्रियेमध्ये आपलाही सहभाग आहे , ही भावना त्याच्या मनात नक्कीच जागृत होते आणि त्याचा आत्मविश्वास वाढतो . घराबद्दल आपलेपणा , प्रेम वाढते .

घरामध्ये एखादी वस्तू घ्यायची असेल , त्याच्या वाढदिवसाचा मेनू ठरवायचा असेल , त्याच्या क्लासमेट्स ना काय गिफ्ट द्यायचे , हे ठरवायचे असेल , गणपती डेकोरेशन करायचे असेल , घरात कोणते पेट्स आणायचे याचा निर्णय घ्यायचा असेल , यावर्षी कोणती झाडे लावायची , हे ठरवायचे असेल , तर आम्ही तिघे मिळून विचार करतो . जर तिघांचीही वेगवेगळी मते असतील आणि ती योग्य पण असतील , तर प्रत्येकाने इतर दोघांना पटवून देण्याचा प्रयत्न करायचा . त्यात जो यशस्वी होईल , त्याचेच ऐकतो मग . तर कधीकधी बहुमताचा विजय , या न्यायाने निर्णय घेतो .

उदा. अमितचा गणपतीवर खूप जीव आहे . त्याला वडील नाहीत . तर अगदी स्वतःच्या वडिलांच्या जागी मानतो तो गणपतीला . त्यामुळे गणपती मूर्ती आणणे , डेकोरेशन , पूजा , आरती , विसर्जन कशात काहीही कमी पडू देत नाही . आणि विसर्जनानंतर रडणे , दिवसभर मूड ऑफ असणे , हेही दरवर्षीचेच . मला मनातून शाडूमुर्ती हवी असते . पण अमितला देखणी मूर्ती आवडते . त्यामुळे त्याचा ओढा प्लास्टर ऑफ पॅरिस कडे असतो . त्याची गणपतीशी असलेली ही भावनिक अटॅचमेन्ट माहिती असल्याने मी त्याला हवी ती मूर्ती आणू देते . यावर्षीही नेहमीप्रमाणे सगळे स्टॉल्स फिरून अमितने एक मूर्ती बूक केली . कोरोनामुळे स्वयम घरीच होता . त्याने घरी आल्यावर विचारल्यावर अमितने त्याला बूक केलेल्या मूर्तीचा फोटो दाखवला . पण त्याला बिलकुल पटले नाही प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्ती घेतलेले . 2 दिवस हरतऱ्हेने तो शाडूमुर्ती कशी पर्यावरणपूरक असते , हे पटवून देत होता अमितला . शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि अमितने ती मूर्ती कॅन्सल करून शाडूमुर्ती बूक केली .

कोणत्याही लहान मुलाला लहान समजलेले आवडत नाही (जरी ते खरेच लहान असले तरी ). आपल्याला लिंबूतिंबु समजतात , या गोष्टीचे त्यांना खूप वाईट वाटते . आम्ही जाणीवपूर्वक ही गोष्ट टाळली . थोडे कळायला लागल्यापासूनच त्याच्या विचारांना किंमत दिली . घरामध्ये आम्ही एखादी गोष्ट नवीन केली , मग ती खरेदी असो , किंवा गृहरचनेत बदल.. ती का करणार आहोत आपण , हे त्याला कायम नीट समजावून सांगितले . त्यामुळे त्याचा 'स्व ' सुखावला , जबाबदारीची जाणीव निर्माण झाली . आपली तिघांची एक टीम आहे , ही भावना त्याच्या मनात रुजवण्यात आम्ही यशस्वी झालो .

याचा उपयोग आम्हाला त्याला घरातील कामांत सहभागी करून घेताना , घराची एक शिस्त असते , कसे बोलायचे , कसे वागायचे , कोणत्या वस्तू कुठे ठेवायच्या , त्या तिथे असल्याचे फायदे काय होतात , हे त्याला पटवून देण्यासाठी आणि त्यानुसार वागण्याचा यशस्वी आग्रह धरण्यामध्ये झाला . हक्क म्हटले , की कर्तव्ये आलीच , हे त्याला समजून सांगितले . त्यामुळे घर आपल्या तिघांचे आहे , तर ह्या गोष्टी आपण तिघांनीही केल्या पाहिजेत , हे त्याला पटवणे आणि कायम त्यानुसार वागण्याचा आग्रह धरणे सोपे झाले .

उदा. घरात आम्हा दोघांप्रमाणे सेम कपाटे स्वयमच्याही कपड्यांसाठी , पुस्तकांसाठी आहेत . ही गोष्ट त्याच्यात बरोबरीची , सुखावणारी भावना निर्माण करते . पण त्याच वेळी आता ही कपाटे आवरण्याची , नीटनेटकी ठेवण्याचीही जबाबदारी आपली स्वतःची आहे , याची जाणीव त्याला राहते आणि ती पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो .

आमच्याकडे नियम सर्वांसाठी सारखाच असतो . मग तो हॉटेलिंग फक्त प्रत्येकाच्या वाढदिवसाला आणि बाहेरगावी गेलो तर प्रवासामध्ये करायचे , हा असो , किंवा प्रत्येकाने सगळ्या भाज्या खाण्याचा असो , टी. व्ही. समोर बसून न जेवण्याचा असो , वस्तू जपून काळजीपूर्वक हाताळण्याचा असो किंवा एकमेकांशी खोटे न बोलण्याचा असो .
कुणीही आपल्या कामात मदत केली , तर आम्ही दोघे एकमेकांना म्हणतो तसे स्वयमलाही "थँक्स" म्हणतो . एखादी चूक झाली , तर आम्ही एकमेकांना आणि स्वयमलाही स्वतः चा अहंकार आड न आणता मनापासून 'सॉरी' म्हणतो . पुन्हा ही चूक रिपीट नाही करणार , याचे प्रॉमिस सुद्धा करतो . त्यामुळे स्वयमकडूनही आम्हाला अशा वागण्याची अपेक्षा आहे , हा न बोलता संदेश मिळतो त्याला आणि तो तसे वागतोही मग .

स्वयमचे सगळ्यात आवडते काम असते , ते म्हणजे आम्हाला रागावणे . त्यामुळे संधी मिळेल , तेव्हा एकमेकांना डोळे मिचकावून आम्ही तो आनंद त्याला मनमुराद उपभोगू देतो .

उदा. अमित त्याला सांगेल, "ही मम्मा बघ रे स्वयम , ऐकतच नाही . आज तब्येत ठीक नव्हती , तरी विणकाम करत बसली . आराम नाही केला बघ ."मग स्वयमराजे मनसोक्त मला रागावतात.

कधी मी सांगते, "बघ रे स्वयम , एवढ्या वेळा सांगून सुद्धा पपांनी हे काम केलेच नाही आजपण . तरी मी दुपारी पण आठवण केलेली हं त्यांना ऑफिस मध्ये फोन करून ."
मग स्वयमराजे लगेच पोक्त होतात . "अहो पप्पा... "असे म्हणून जी गाडी चालू होते त्याची , ती अमितने" हो बाबा , चुकले माझे , उद्याच्या उद्या करतो , "असे कबूल करेपर्यंत थांबत नाही .
मग दुसऱ्या दिवशी आमच्या चुका सुधारल्यावर आम्ही त्याला सांगतोही , "बघ स्वयम , आज केले बरंका हे हे . "

याचा फायदा असा होतो , की जेव्हा स्वयमकडून चूक होते आणि आम्ही त्याला रागावतो , तेव्हा त्याला तो त्याच्यावर अन्याय , अपमान वाटत नाही . तोही उलट उत्तर न देता शांतपणे आमचे ऐकून घेतो आणि चूक मान्य करून ती सुधारतो.

जर एखादी मोठी चूक झाली , किंवा एकदा समजावूनही परत तीच चूक रिपीट झाली , तर छोटी मोठी शिक्षा स्वयमला मिळते , तशी ती आम्हाला दोघांनाही असते . माझ्या साठी शिक्षा अमित आणि स्वयम मिळून ठरवतात . अमितसाठी मी आणि स्वयम मिळून ठरवतो तर स्वयमसाठी आम्ही दोघे ठरवतो . मिळालेली शिक्षा आम्ही प्रामाणिकपणे भोगतो . त्यामुळे आपोआपच मग ती चूक कुणीही पुन्हा रिपीट करत नाही .

या एकोप्याचा सर्वात मोठा फायदा आम्हाला स्वयमला आपले , लांबचे , जवळचे हे शिकवण्यासाठी झाला .

एकदा काय झाले , घरातील एक गोष्ट त्याने रविवारी तो माझ्या आईकडे जातो , तेव्हा तिला सांगितली . आम्हाला आईने त्यावर प्रश्न विचारल्यावर आम्ही सावरून घेतले , पण आम्हाला चांगलेच कानकोंडे व्हावे लागले होते तिच्यासमोर .

सोमवारी इकडे परत आल्यावर जेव्हा आम्ही " तू का सांगितलेस आईला? ", असे स्वयमशी बोलण्याचा प्रयत्न केला , तेव्हा त्याचे निरागस उत्तर होते , "पण का नाही सांगायचे? आई पण आपलीच आहे ना !"

2 मिनिटे आम्ही गोंधळून गेलो या उत्तरावर . पण मग न रागावता त्याला समजून सांगितले , "बरोबर आहे , आई आपलीच आहे . पण सगळ्या गोष्टी सगळ्यांना नसतात सांगायच्या . आता बघ , आपल्या फॅमिली मध्ये आपण 3 लोक आहोत . तुम्हाला स्कूल मध्ये सर्कल शिकवलंय ना , तसं असते हे . म्हणजे बघ , आधी आपल्या तिघांचे सर्कल . मग त्याच्या बाहेर आईबाबांचे , नाशिकच्या आजीचे सर्कल , मग त्याच्या बाहेर माझ्या बहिणींचे (म्हणजे तुझ्या दोन्ही माऊचे )आणि पपांच्या भावांचे (म्हणजे तुझ्या काकांचे )सर्कल . तशाच क्रमाने तुझा त्यांच्यावर हक्क आहे . त्यामुळे तुझ्यासाठी सर्वात जवळचे आणि हक्काचे आहोत आम्ही . आमच्यापासून कधीच काही नाही लपवायचे . काहीही हट्ट करायचा असला , तरी आमच्याजवळच करायचा . आमच्यानंतर क्रमाने बाकीचे लोक आहेत . काही काही गोष्टी ना , आपल्या फॅमिली च्या सिक्रेट असतात , त्या कुणालाच नसतात सांगायच्या . फक्त आपल्या वर्तुळापुरत्याच ठेवायच्या . तुम्हाला शाळेमध्ये म्हण शिकवलीय ना, "झाकली मूठ सव्वा लाखाची ", तसे !
म्हणजे आपले प्रॉब्लेम्स , आपली भांडणे , महत्वाच्या गोष्टी कुण्णाला नसतात सांगायच्या ."
बराच वेळ लागला आम्हाला त्याच्या भाषेत समजवायला.

तो लक्षपूर्वक ऐकत होता . मग शेवटी म्हणाला , "अच्छा , असे असते का? म्हणजे हे आपले "प्रमिती "सिक्रेट तर !"
आम्ही दोघे एकदमच उत्तरलो, "बरोब्बर , आपले प्रमिती सिक्रेट !"

तेव्हापासून कोणतीही महत्त्वाची किंवा इतरांना कळू न देण्यासारखी गोष्ट असेल , तर आम्ही तिघे फक्त खुणावतो एकमेकांना , "प्रमिती सिक्रेट आहे हं "...
मग बिलकुल सांगत नाही स्वयम कुणाला . अगदी माझ्या बहिणींनी खोदून विचारायचा प्रयत्न केला , तरी फसत नाही .

आपल्या वेळी जसे होते, पालकांनी जे सांगितले, ते मुलांनी गुपचुप ऐकायचे... तसे आपण आपल्या या मुलांसोबत नाही वागू शकत . का, कशासाठी यांची समाधानकारक उत्तरे या पिढीला हवी असतात . आणि मला मनापासून असे वाटे , की रागावून, जबरदस्तीने स्वयमला काही ऐकायला लावण्यापेक्षा त्यामागची कारणमीमांसा त्याला पटवून दिली , तर तो मनापासून ऐकेल . त्यामुळे मम्मीपप्पा म्हणून मिळालेल्या निसर्गदत्त अधिकाराचा वापर करून डायरेक्ट ऑर्डर सोडण्यापेक्षा "असे करूया आपण , तसे केले तर काय होईल रे? "या मोड मध्ये कायम वागलो. आणि त्याचे सकारात्मक फायदे आम्हाला जाणवले आहेत . निर्णयप्रक्रियेत सहभाग असल्याने घरातील वस्तू तो जपून वापरतोच, शिवाय काळजी पण घेतो त्यांची . शिवाय हळूहळू त्यांची निर्णयक्षमता वृद्धिंगत होते आहे . त्याचा आत्मसन्मान आम्ही जपतो , हे जाणवल्याने तो सुद्धा आमच्याशी , इतर मोठ्यांशी आदरपूर्वक वागतो . आमच्यातील मैत्रीचे नाते छान फुलले , हळूहळू बहरते आहे . आगामी काळात या मैत्रीचा आणि विश्वासाचा डेरेदार वृक्ष होईल आणि त्याच्याच सावलीत स्वयमच्या तारुण्याच्या वाटेवरचे अपरिहार्य प्रश्न सुलभपणे सुटतील, अशी आशा आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे माहिती.
एक प्रश्ण विचारते,
"आमच्याकडे नियम सर्वांसाठी सारखाच असतो . " पण नियम कोण ठरवितात?

आमच्याकडे पण नियम सर्वांना सारखा असतो पण किती वेळ टीव्ही पहायचा पासुन भाज्या खाण्याबाबत काय नियम असावा आणि काय शिक्षा असावी यातच एकमत होत नाही.

तुमचे पेरन्ट्स गोल्स फारच तगडे आहेत. मला मुलगा स्वतःचे स्वतः संडासात जाऊन शी करायला लागला यातच समाधान वाटले Happy

त्याची गणपतीशी असलेली ही भावनिक अटॅचमेन्ट माहिती असल्याने मी त्याला हवी ती मूर्ती आणू देते . यावर्षीही नेहमीप्रमाणे सगळे स्टॉल्स फिरून अमितने एक मूर्ती बूक केली . कोरोनामुळे स्वयम घरीच होता . त्याने घरी आल्यावर विचारल्यावर अमितने त्याला बूक केलेल्या मूर्तीचा फोटो दाखवला . पण त्याला बिलकुल पटले नाही प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्ती घेतलेले . 2 दिवस हरतऱ्हेने तो शाडूमुर्ती कशी पर्यावरणपूरक असते , हे पटवून देत होता अमितला . शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि अमितने ती मूर्ती कॅन्सल करून शाडूमुर्ती बूक केली .>> मला ह्या सर्व मालिकेत अमित ह्या व्यक्तिरेखे ची बाजू वाचायला खूप आव डेल. खूप वेळा मी हे करू देते मी स्वातंत्र्य देते मी त्याची करीअर सेट केली हे वाचले. पण ह्यात त्या चे स्वतःचे मत व प्रेफरन्सेस कोणत्यातरी कारणाने त्याने बाजूला ठेवुन हे निर्णय अ‍ॅक्सेप्ट केले आहेत.

तुम्ही इट टेक्स अ व्हिलेज पुस्तक वाचले आहे का? एक मूल निकोप पद्धतीने वाढवायला सर्व कम्युनिटी सहभागी असावी लागते. आपली अंतर्गत सिक्रेट को णाला सांगावयाची नाहीत हे इमोशनल मॅनिप्युलेशन आहे चाइल्ड लेव्हल ला तो अ‍ॅडल्ट झाल्यावर त्याला असे कळणे वेगळे. आई व मावश्या ह्या आपल्या आहेत कि परक्या अशी शंका येते ना मुलाच्या मनात.

टायगर मॉम पुस्तक पण वाचून घ्या. आणि हेलिकॉप्टर पेरेंटिंग पण.

मुलांना मित्र मैत्रीणी( नियमात बसल्या तर ) बाहेर मिळतील पण आई वडील ( मम्मी पप्पा का म्हणता? ) घरातच. त्यामुळे आई वडिलांचा रोल वेगळा आहे . कदा चित नव्या नियमांत ते बसत नसेल.

तुम्हाला शुभेच्छा.

टवणे सर तुम्हाला पण सुपर बेस्ट शुभेच्छा.

माझी मुलगी करोना तून रिकव्हर होते आहे तिला काल चिकन करी राइस दिला तर मस्त नारळाचा वास येतो आहे असे तिने म्हटल्यावर मला
हर्ष वायु झाला होता. सेन्स ऑफ स्मेल इज गेटिन्ग रिस्टोअर्ड.

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद !
@निलिमा, नियम आम्ही तिघे मिळूनच ठरवतो. चर्चा होते आमची, तिघेही आपापली मते मांडतो. चुकीचे असले तरी चालेल, पण स्वतःचे मत मांडता आले पाहिजे, हा आमचा आग्रह असतो. मग एकमताने ठरवतो नियम आणि त्यावरच्या शिक्षा पण.
दुसरे म्हणजे, माझा दवाखाना घरातच आहे. मी पेशंट्स ना भाज्या खाण्याबद्दल, जीवनसत्वांबद्दल जे काही सांगत असते, ते स्वयम ऐकत असतो. त्यामुळे मी हे फक्त त्याला उपदेश म्हणून सांगत नाहीये, ही खरी गोष्ट आहे, हे त्याला पटते.
ज्या गोष्टीची अपेक्षा स्वयमकडून असते, ती आम्ही दोघेही करतो /करत नाही.
उदा. आम्ही दोघेही fb, इन्स्टा, ट्विटर कशावरही नाही.एक तासाच्या वर आम्ही टीव्ही पाहत नाही. रविवारी दोघांचेही मोबाईल्स स्विच्ड ऑफ असतात..आम्हीही सगळ्या भाज्या खातो, व्यायाम करतो.. इ .
त्यामुळे स्वयमला त्याच्यावर अन्याय वाटत नाही.
शिवाय सुरुवातीपासूनच आमच्या दिनचर्येत रोज एक तास अभिवाचना साठी आहे. आरोग्याविषयी एखादा लेख मिळाला अमितला , माझ्या dr. Group वर काही माहिती आली, तर ती मी स्वयमला वाचायला लावते. जोवर त्याला वाचता येत नव्हते, तोवर अमित वाचायचा. त्यामुळे गोष्टीचे महत्त्व समजते स्वयमला. मग आपल्याला तिघांना सूट होईल, असा नियम बनवायचा आणि तिघांच्याही मते शिक्षाही ठरते.

@टवणे सर, मुलगा स्वतः ची स्वतः संडासात जाऊन शी करायला लागला, ही खरेच आनंदाची गोष्ट आहे. हा जो निर्णय त्याने स्वतः घेतला ना, तो महत्वाचा आहे. अशाच छोट्या छोट्या गोष्टींचे निर्णय मुलाला स्वतः घेऊ देणे, त्याची विचारप्रक्रिया चालू ठेवणे आणि निर्णयशक्ती वाढवणे, हे आम्हाला महत्वाचे वाटते. आमचे पेरेंट्स गोल्स तगडे नाहीत. मुलाला स्वतः ला स्वतः चे गोल्स ठरवण्याइतपत सक्षम करणे, आणि त्याच्या ठामपणे पाठीशी राहणे, हा आमचा उद्देश आहे.

@अमा, तुम्ही सांगितलेली सगळी पुस्तके वाचलेली आहेत मी.
माझ्या आईवडिलांना त्यांची सर्व नातवंडे आईबाबा म्हणतात. वडिलांकडचे आजी -आजोबा, त्यामुळे अपरिहार्यपणे आम्हाला मम्मापप्पा म्हणतात.
आमच्याकडे एकतर्फी काही नसते, जे असेल, ते तिघे मिळून, तिघांचे, तिघांसाठी.
आपले, जवळचे, लांबचे हा फरक मुलाला बालपणापासूनच समजला पाहिजे. जवळचे असले, तरी त्यातही धूसर का होईना सीमारेषा असतेच. आणि आपला कुणी गैरफायदा घेऊ नये म्हणून सुद्धा हे गरजेचे आहे. शिवाय आईवडिलांनी पालक असतानाच मित्र पण बनले पाहिजे. तरच मुले मनापासून सगळे शेअर करतील आपल्याशी. आताच्या काळाची गरज आहे ही. पौगंडावस्थेत, युवावस्थेत अचानक त्यांचे मित्र बनण्याचा प्रयत्न करून त्यांच्या आयुष्यात, भावविश्वात काय चाललेय, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर ते कदापि शक्य होणार नाही. त्या विश्वासाची पायाभरणी सुरुवातीपासूनच करावी लागते. अर्थात ही अमितची आणि माझी मते आहेत. तुमची वेगळी मते असू शकतात. तशीच इतर वाचकांचीही.
तुम्हाला मुलीच्या रिकव्हरी बद्दल शुभेच्छा !काळजी घ्या.

आताच्या काळाची गरज आहे ही. पौगंडावस्थेत, युवावस्थेत अचानक त्यांचे मित्र बनण्याचा प्रयत्न करून त्यांच्या आयुष्यात, भावविश्वात काय चाललेय, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर ते कदापि शक्य होणार नाही. त्या विश्वासाची पायाभरणी सुरुवातीपासूनच करावी लागते>> बीन देअर डन दॅट.

धन्यवाद अमित चे मनोगत लिहायला सांगा मात्र. उत्सुक आहे.

टवणे सर, लोल! खूप हसले!!
अमा म्हणताएत ते पटले मला. Honestly तुमचे लेख वाचताना you are putting too much pressure on your son असेच काहीसे वाटत राहते मला! तुमचा मुलगा अकाली प्रौढ होईल असे नाही का वाटत तुम्हाला? Are you 3 really equal to have the same stakes in any decision-making?
इतकं लहान असताना मी फक्त शाळा, अभ्यास, मित्र मैत्रिणी, वाचन, हट्ट करणे, मनसोक्त खेळणे, हुंदडणे आणि पसारा घालणे एवढेच करत होते! आणि हो धाकट्या भावाबरोबर दंगामस्ती भांडणे! जे काही मूल्य शिक्षण होते ते आई बाबा स्वतःच्या कृतीतून दाखवून द्यायचे. वेगळे बसवून धडे दिले नाहीत. आपोआप काय योग्य आणि काय अयोग्य ते कळून येऊ लागले. जेव्हा शिंगे फुटली तेव्हा स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला मदत केली.
माझे आई बाबा माझे मित्र वगैरे नाहीत. माझ्यासाठी माझी मोठी आतेबहिण माझी confidante होती आणि आहे. I am glad my parents never forced any friendship on me. I never shared "everything" with my parents and vice-versa. पण नात्यात एवढा मोकळेपणा होता/आहे की मी काहीही शेअर करू शकते हे मला माहीती होतं. त्यामुळे खोटं वगैरे बोलायची गरज पडलीच नाही. शिवाय आईबाबांचा विश्वास होता आणि लक्षही होतं. हे सगळं आता मोठेपणी जाणवतं. त्यामुळे भरपूर प्रेम, आदर आणि कृतज्ञता आहे आई बाबांविषयी __/\__
काहीच नियम नव्हते असं नाही. काही बेसिक नियम होते - खोटं बोलू नये, चांगली भाषा वापरली पाहिजे, मोठ्यांना दुरूत्तरे करू नयेत, अभ्यासाकडे लक्ष असावे, पानात पहिल्यांदा वाढलेले सगळे खाल्ले पाहिजे, सगळे हट्ट पुरवले जात नाहीत, बेसिक स्वच्छता पाळली पाहिजे वगैरे.
If/when I become a parent I hope to be as cool as my parents.

छान लेख
अमा, मुलीला बऱ्या होण्यासाठी शुभेच्छा..

थँक्स किल्ली.

@जिज्ञासा, आमचा मुलगा काही अकाली प्रौढ वगैरे नाही. अभ्यास, खेळ, दंगामस्ती, पसारा घालणे सगळे मनसोक्त करतो तो. हा, फक्त पसारा घातल्यावर आवरला पण पाहिजे आमच्या मदतीने, एवढे समजण्याएवढा जबाबदार आहे तो. तसेच या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, हे कळते त्याला, त्यामुळे स्वतः चे स्वतः टाइम टेबल बनवून सगळे छान एन्जॉय करतो तो.
घरात भावंड नाही, पण शाळेत -आजूबाजूला पुष्कळ मित्र आहेत त्याला. एखादे दिवशी जर तो नसेल, तर करमत नाही मुलांना.

मुले आपल्या आईवडिलांच्या अनुकरणातून च सगळे शिकतात, संस्काराचे धडे शिकवता येत नाहीत, हे म्हणणे अगदी खरे आहे तुमचे. म्हणूनच आपली उक्ती आणि कृती नितळ, प्रामाणिक आणि पारदर्शी ठेवायची.

दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने आताची पिढी खूप हुशार, कुशाग्र आहे. आपल्यापेक्षा लवकर शिंगे फुटतात त्यांना . आईवडिलांनी सांगितले की गुपचूप प्रतिप्रश्न न करता आपण ऐकायचो . आमची तर कधीच प्राज्ञा नव्हती त्यांच्या कोणत्याही निर्णयावर काही बोलण्याची . आताची मुले k.g.मध्ये असल्यापासूनच प्रश्न विचारायला लागतात . त्यांना जर पटले, तर च ऐकतात . अशा पुष्कळ गोष्टी सांगता येतील . त्यामुळे माझ्या आईवडिलांच्या आणि माझ्या पालकत्वामध्ये अपरिहार्यपणे फरक राहणारच . आणि तसाच तो आहेही .

तुम्ही खरेच भाग्यवान आहात , तुम्हाला असे कूल आईवडील लाभले . आमच्या दोघांच्याही आईवडिलांनी आम्हाला चांगले वाढवले पण नात्यात अजिबात मोकळेपणा नव्हता . कधीच कोणत्याच गोष्टी नाही सांगू शकलो दोघेही आपापल्या आईवडिलांना . भीतीच वाटायची त्यांची . मात्र miss केलेय ते विश्वासाचे , सौहार्दाचे वातावरण . मग तो जिव्हाळा बाहेर मित्रमैत्रिणींत शोधण्याचा प्रयत्न करत राहिलो . माझ्या बरोबरीच्या मित्रमैत्रिणींच्या घरीही हीच परिस्थिती होती
. त्यामुळेच पालक झाल्यावर आम्ही ठरवले , आपण जसे एकमेकांचे चांगले मित्र आहोत , तसेच छान मित्र बनायचे मुलाचे .

तुम्हाला शुभेच्छा. जेव्हा पालक बनाल, तेव्हा तुमचे अनुभव ऐकायला नक्की आवडेल मला.

नादिशा छान लेख. सर्व प्रतिसाद उत्तम.

नवरा बायको मध्ये चर्चा होत असतील, तर तुम्ही लिहिता तशा गोष्टी नक्की होत असतील. जिथे चर्चेचा स्कोप नाही तिथे मात्र अमा म्हणत आहेत तसे डॉमीनेशन वाटू शकते.
तसंच, मला हे अकाली प्रौढ वगैरे अजिबात वाटत नाही. उलट काळाची गरज आहे. आमच्या एका नातेवाईकांकडे जवळपास 20 वर्षांपूर्वी आईने पाच वर्षांच्या मुलाला "आपली सिक्रेट" ही कल्पना सांगितली होती. कारण तेच, मुलं बाहेर जाऊन अर्धवट बोलली की आई वडिलांची पंचाईत होते. आणि यातून मुलं नातेवाईकांना परकं मानत नाहीत तर स्मार्टली बोलायला शिकतात. बावळटपणे कोणालाही काहीही उत्तरं देऊन आईवडिलांना अडचणीत आणत नाही हे मी स्वतः पाहिले आहे.

तसंच काळ बदलल्यामुळे फक्त वागण्यातून नाही तर अनेक गोष्टी बसवून समाजावयला लागतात हेही मान्यच.
गुड टच बॅड टच हे एक उदाहरण. आपल्या लहानपणी क्वचितच कोणी पालकांनी मुलांना बसवून आपल्या ओळखीच्या लोकांपासून सावध राहायला सांगितलेलं असावं.

माझ्या स्वतःच्या पाहण्यात इतकी ऐकणारी मुलं नाहीत. त्यामुळे वर काहींना मुलगा बालपण एन्जॉय करत नाही असं का वाटलं ते समजू शकते. पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच लेख आणि प्रतिसादात दिले आहे.
खरंच, तुमचं कौतुक की तुम्ही दोघांनी स्वतःवर कंट्रोल ठेवला आहे आणि कदाचित त्यामुळे मुलगा तुमचं ऐकत असेल.

तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा!

नादिशा बरोबर आहे..

मुलं बाहेर जाऊन अर्धवट बोलली की आई वडिलांची पंचाईत होते.........सहमत पीनी

मुलांना कुठे काय बोलायचे हे शिकवावे लागते..
मुलांनी काय करावे आणि काय करू नये हे आचरणातून दाखवावे लागते..जे आपण करतोय तेच मुले फौलो करतात.. अगदी बोलणे, खाणे,चिडणे,भांडणे सगळंच..त्यामुळे मुलांसमोर विचारपूर्वक वागावे लागते
आजकालच्या संयुक्त कुटुंब पध्दती, फ्लॅट संस्कृती म्हणा, वर्षातून एकदोनदाच, नातेवाईक भावंडांना भेटणे..यामुळे असेल पण पालकांनाच मित्र बनावे लागते मुलांचे आणि आदर्श घालून द्यावे लागतात..

माझ्या मुलाच्या बाबतीतला हा एक किस्सा.. मुलाचे वय आठ वर्षे..
लॉकडाऊन मधे आम्ही बरेच मुव्ही पाहिले त्यात आवडत असल्याने क्राईम, मर्डर मिस्ट्री जरा जास्तच...
एकदा मुलाचा ऑनलाइन तास चालू असताना इंटरनेट रेंज गेली...मी मधेच जाऊन पाहत असते कि काय सुरु आहे मुलाचे..
मुलगा गुगलवर what happened if we cut our neck with blade असं सर्च करून पाहत होता.. ते वाचताच मला तर गरगरायला लागलं..नशीब नवरा घरीच होता...
नवर्याने त्याला प्रेमाने विचारायला सुरुवात केली कि तुला हे का जाणून घ्यायचे होते..बराच वेळ त्याला न रागावता त्याच्या कलाने घेतल्यावर त्याने सांगितले कि तुम्ही जे मूव्हीज बघता त्यात हेच तर दाखवतात म्हणून त्याला उत्सूकता होती ते जाणून घ्यायची...
मग बराच वेळ आम्ही त्याला शुटिंग कसं करतात आणि ते कसं खोटे असते ते समजावून सांगितले आणि त्यानंतर आम्ही असे मूव्हीज एकत्र पाहणे बंद केले...पर्सनल लैपटॉप किंवा मोबाईल मधे पाहतो...
सांगायचे तात्पर्य हेच कि मुलांशी मैत्रीपूर्ण नाते बनवून त्यांचे कुतूहल ही आपणच शमवले पाहिजे..

नादिशा यांचे लेख व प्रतिसाद 100% सहमत

धन्यवाद नादिशा! तुमचे उत्तर आवडले आणि बरेचसे पटलेही.
मात्र आपले सिक्रेट वगैरे पटले नाही. जर एखादी गोष्ट घराबाहेर जाऊ द्यायची नसेल तर तिची वाच्यता मुलांपुढे करू नये. मुलांना सांगून मग त्यांच्यावर कोणाला सांगू नको असे प्रेशर टाकणे हे नाही पटले. तुम्ही सांगितलेल्या बाकी गोष्टी पटल्या.

सर्वांचे मनापासून धन्यवाद.
@जिज्ञासा , अहो ,सिक्रेट म्हणजे अगदी सिक्रेट as such नाही हो... संसारामध्ये अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात , ज्या फक्त आपल्या घरापुरत्याच असतात .
उदा. घरातले वाद , फायनान्शिअल प्लांनिंग्स , सासरचे मतभेद , काही मान -अपमान , जे इतर कुण्णाला , अगदी माहेरी , मित्रमैत्रिणींना पण कळू नयेत , असे आपल्याला वाटते . कधी कुणाला सरप्राईज द्यायचे असते , त्यासाठी काहीतरी प्लॅन किंवा खरेदी केलेली असते , ती आधीच इतरांना कळली तर ऐनवेळी पोपट होतो ना... त्या अशा सर्व गोष्टींना आम्ही "सिक्रेट "म्हणतो . मुलांच्या विश्वात "सिक्रेट "या शब्दाला खूप महत्त्व आहे . खूप काहीतरी भारी वाटते मुलांना आणि मग ऐकतात मुले . म्हणून त्यांना सांगताना "सिक्रेट आहे "असे सांगायचे .

आणि अहो , मुलांपुढे वाच्यता करायची , त्यांना आवर्जून सांगायची काही गरज नसते आजकाल . मुद्दाम होऊन तर आपण महत्वाच्या गोष्टी सांगणारच नाही हो त्यांना . तेवढी काळजी कोणतेही सुज्ञ पालक घेतीलच . पण त्यांचे कान खूप लांब असतात . इथले बरेच पालक सहमत होतील मी सांगतेय याच्याशी . मुले खेळत असतात , टी. व्ही. पाहत असतात , अगदी मग्न असतात , तरी त्यांचे कान आपल्याच कडे असतात . आपल्याकडे अचानक कुणी येऊ शकते , कुणाचा फोन येऊ शकतो , आम्ही दोघे बोलत असताना बोलण्याच्या ओघात एखादी गोष्ट चुकून बोलून जातो आपण आणि मनात नसताना मुलांच्या कानावर पडते . परिस्थिती कधी कधी आपल्या हातात नसते . अशा वेळेस आम्ही "आपल्या तिघांचे सिक्रेट "असे समजावतो त्याला .

@mrunali, तुमचे विशेष कौतुक. तुम्ही हा किस्सा शेअर केलात. मला तर वाचतानाच अंगावर काटा आला. बापरे !जर तुम्ही पाहिले नसते, त्याचे कुतूहल गूगल वर शमले नसते, तर काय झाले असते? त्याने प्रयोग करून पाहिला असता तर? स्वतःवर /दुसऱ्यावर? बापरे !!!
केवढा शॉक बसला असेल तुम्हाला !मी कल्पना करू शकते. तुम्ही दोघांनी खूप संयमाने परिस्थिती हाताळलीत. त्याबद्दल दोघांचेही कौतुक !

हो नादिशा...मी खरंच घाबरून गेले होते..मला तर कळेचना त्याला काय विचारावे..पण त्याच्या पप्पाने खुप पेशन्सली त्याला समजावून सांगितले...

तुमचा वरचा प्रतिसाद ही आवडला.. आपण मुलांना मुद्दाम हुन सिक्रेट सांगायला जात नाही.. पण अनावधानाने मुले खूप काही ऐकतात पाहतात..

नादिशा +1
अगदी हेच लिहायला आले होते. मी लहान असताना मला आई वडिलांनी असे काही सांगितले नव्हते पण मी बावळटपणे काही गोष्टी बाहेर सांगायचे. एक दोन वेळी आई बाबांची पंचाईत झाली होती, आणि माझे काय चुकले हे मला खूप उशीरा कळले.
एक गोष्ट आठवते - मी हॉल मध्ये अभ्यास करत होते आई किचन मध्ये काम करत होती , बाबा बहुतेक आईला मदत करत होते आणि आई अनावधानाने बाबांना "डिअर" म्हणून गेली. तिच्याही लक्षात आले नसेल. हा शब्द मी तिच्या तोंडून आयुष्यात एकदाच ऐकला आहे. नेहमी ती हा शब्द वापरत नसावी.
मी तिसरी चौथी मध्ये असेन. मराठी मिडीयम मध्ये असल्याने त्या शब्दाचा अर्थ कळला नाही. मी आई बाबांना न विचारता इंग्रजी मिडीयम मधल्या माझ्या मैत्रिणींना विचारले. त्यांनी अर्थ सांगितल्यावर मी निरागसपणे (बावळटपणे) त्यांना सांगितले की आई बाबांना डिअर म्हणाली. त्यानंतर आख्या सोसायटीमध्ये हे पसरले होते आणि आईबाबांना खूप कानकोंडे झाले होते. तरीही त्यांनी त्याचा फार बाऊ केला नाही. त्याबद्दल मला कधीच शिक्षा झाली नाही, आई बाबानी ती स्वतःची चूक मनाली असावी. पण सोसायटीमध्ये काही काळ ते गॉसिपचा मुद्दा ठरलेले मला चांगले आठवते.
आमच्याकडेही खूप मोकळे वातावरण होते, आई बाबांना काहीही विचारलेले चालणारे होते. पण मला "बाऊंड्री" / "आपलं सिक्रेट" ही कन्सेप्ट माहीत नसल्याने मी घोळ केला.

बरेचदा मुलांना नुसत्या वागण्यातून नाही तर बसवून गोष्टी समजावून सांगणे फार आवश्यक असते. मी लहानपणी निरागस बावळट असल्याने मला हे पक्कं माहिती आहे.

जिज्ञासा + करोडो!
मला हाच प्रतिसाद असाच लिहायचा होता. पण नंतर लिहू म्हणत थांबले.
अकाली प्रौढत्व इज द वर्ड!

नादिशा, मी तुमचे लेख आवर्जून वाचत होते पण ते कधीच पटले नाहीत, अपील ही झाले नाहीत. तुमची परेटिंग टेक्निक माझ्या पालकांच्या टेक्निक पेक्षा फार वेगळी आहे . आम्ही तर एकदम बंड टाईप अपत्य आहोत त्यामुळे तुमचा दुसरा प्रतिसाद तर अजिबात च नाही पटला.

तरीही दोन्ही हातांनी घेत राहावे असा विचार करून तुमचे लेख वाचतेय. न जाणो त्यातलं काही मला उपयोगी पडलंच माझ्या मुलाला वाढवताना तर काय सांगावं.

अजून एक किस्सा आठवला.
माझे बाबा त्याही काळात आईला मदत करायचे. किचन हॉल समोरासमोर असल्याने हॉल मध्ये अभ्यासावर लक्ष ठेवता ठेवता त्यांची कामं चालायची. एकदा ऍक्सिडेंटमध्ये आईचा हात दुखवला होता आणि बाबा स्वयंपाकाला लागणारी एखाद दुसरी भांडी आईला धुवून देत होते. मी का कोणास ठाऊक आमच्या खाली राहणाऱ्या खडूस आज्जींना बाबा भांडी घासत होते हे सांगितले. मग त्यांनी रीतसर आमच्या भांडीवाल्या बाईला बोलावून तिच्याकडे बरीच चौकशी केली. त्याहीवेळी 'आम्ही दोघं नोकरी करतो आणि हे मला मदत करत असतात.' असा स्टँड आईने घेतला होता.
त्याच आसपास किसान विकास पत्राची कालनिर्णयावर लिहिलेली तारीख लक्षात ठेवून खाली खेळत असताना सगळ्यांसमोर आई बाबांना किसन विकासपत्र आणले का असं विचारले होते.

मी असे प्रताप केल्यांनातर मग मला बसवून घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत. कोणी काही विचारले तर आम्हाला सांगायचे. आई बाबा, घर, पैसे याबद्दल बाहेर कोणाला काही सांगितले की त्याचा आपल्यालाच त्रास होऊ शकतो वगैरे सांगितले होते.
माझ्यावरून आमच्या नातेवाईकांनी धडा घेऊन आधीच मुलाला हे पाचव्या वर्षी शिकवले.

@पीनी, धन्यवाद . तुमचे किस्से शेअर केलेत तुम्ही . हे असेच छोटेछोटे प्रॉब्लेम्स असतात, पण मुलांच्या निरागस चुकांमुळे कानकोंडे होऊन जातात आईवडील. त्यामुळे मुलांना समजून सांगाव्या लागतात काही गोष्टी.
@mrunali, काळजी घ्या. अशी हुशार मुले सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत असते.
@रीया , प्रामाणिक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मतमतांतरे तर असणारच . हे आमचे वैयक्तिक अनुभव आहेत पालकत्वाचे . तुमचे पालकत्वाचे जे अनुभव असतील , तेही वाचायला मला नक्की आवडतील.

>>किसान विकास पत्र म्हणजे?>> बँकेत एफ्डी करतात तसे हे पोस्टाचे ५-६ वर्षांचे सर्टिफिकेट असे. काही अटी होत्या आणि टॅक्स बेनिफिटही मिळत असे अंधुक आठवते.

किसान विकास पत्र म्हणजे?

>> पोस्टाची इन्व्हेस्टमेंट स्कीम. पुर्वी फार फेमस होती. कोणे एके काळी इन्व्हेस्टमेंट डबल पण होऊन मिळायची.
हळूहळू परताव्याचा रेट कमी कमी होत गेला. तेव्हा आजच्या इतके गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध नव्ह्ते.
तेव्हा सरकारी हमीसह हा पर्याय अगदी म्हणजे अगदी डोळे झाकुन पैसे घालावे अशीच होती.
शिवाय स्वाती२ म्हणतात तसे टॅक्स बेनिफिट पण मिळायचे.

रिया +१, नादीशा यांचे लेख वाचताना मला तर खरोखर दडपण येते , कारण अतिशय मोकळे पणे सांगते, कि माझ्या मुलगा पण त्यांचा मुलाच्या वयाचा आहे. पण यांचे लेख मला फोर्स पॅरेंटिंग वाटतात . यातील बरयच् गोष्टी मी माझ्या मुलावर फोर्स केलेल्या नाहीत, याचे लेख वाचून खरेच असे वाटते कि मूल अकाली प्रौढ तर होत नाही ना?
दुसरी गोष्ट माझ्या मुलाला मी कधीही अमुक कर किंवा करू नकोस हे ठसवले नाही . असे बोल किंवा बोलू नकोस असेही सांगोतले नाही. बर्यच वेळेस हि समज मुलांमध्ये असतेच. सुदैवाने रिशान कधीही आम्हाला ऑकवर्ड वाटेल असा वागत नाही . आम्ही मुंबईतून पुण्यात शिफ्ट झालो, शाळा मित्र सर्व बदलले पण कुठेही त्याने जुळवून घेताना त्रास दिला नाही . जी मुले त्रास दायक आहेत किंवा खेळताना अबुसीव्ह बोलतात त्यांच्या पासून स्वतः लांब राहतो . एकदा त्याचे मित्रबरोबर काही वाद झाले. मी समोर होते. जेंव्हा मी घरी आलयवर म्हटले कि मी तुझ्या मित्राच्या आईशी बोलू का कारण तो मुलगा बुल्ली करणारा होता यावर रिशान मला म्हणाला कि आई तो मुलगा त्रास देतो पण काही वेळाने नीट वागतो . मला जर खूप त्रास झाला तर मी सांगेन तुला पण तो पर्यंत तू बोलू नकोस.
वर्गात एक मुलगा होता, जो अभ्यासात खुप मागे होता, त्याला घरीही काही प्रॉब्लेम होता वर्गात टीचर ने विचारले कि या मुला सोबत कोण असेल आणि त्याला मदत करेल , यावर वर्गात फक्त रिशान असा होता कि त्यामुळं बरोबर बसला त्याला नोट्स पूर्ण करायला मदत केली. १-२ दिवस नाहीतर पूर्ण महिना भर . हे आम्हाला पण माहिती नव्हते टीचर ने आम्हाला खास ओपन हाऊस ला सांगतले. मी रिशां न ला विचारल्यावर म्हणाला कि वर्गात सगळ्यांना हुशार पार्टनर
पाहिजे असतो सगळयांनी असे केले तर ... तो मुलगा पण आमचा मित्र आहे. अश्या बरीच गोष्टी आहेत. पण नदिशा तुमच्या गोष्टी वाचताना दडपण येतेच पण शेवटी रियाने सांगितले तसे जितके घ्यायचे तितकेच घ्यायचे . मत पण द्यायचे नाही . आज माझ्या सारखे वाटणारे आहेत म्हणून मत दिले. थोडा आपुलकीचा सल्ला , मुलाला सर्व गुण संपन्न करण्याच्या अट्टहास करू नका.

तुमचे काही काही लेख वाचले आहेत. मला हे सर्व आदर्शवत आणि खूप आखीव रेखीव वाटते. आमच्या ढमीनी 10 मिनिट शांत बसून अभ्यास किंवा इतर तत्सम काही केलं तरी मला फारच भारी वाटतं. मी आणि बहीण आई वडिलांना फक्त ऑब्जर्व करून शिकलो, त्यांनी असे काही खास प्रयत्न केल्याचे आठवत नाही. त्यांच्या पासून काही लपवावे असे वाटले नाही कधी. हल्ली शाळांमध्ये मूल्य शिक्षण नसते बहुदा. त्यामुळे कदाचित ह्या गोष्टी पुढे जाऊन जाणीवपूर्वक कराव्या लागतील, अस सध्यातरी वाटत आहे. आमच्या दोघांव्यतिरिक्त मुलीला चांगले सवंगडी मिळावेत हे मात्र फार मनापासून वाटते. मला खूप चांगला मित्र परिवार प्रत्येक टप्प्यावर मिळाला आणि ते खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहे. मुलगी पण मित्रपरिवाराबाबत भाग्यवान असू देत हे मनोमन वाटते. ह्यावरूनच एक प्रश्न , त्याला मित्र मैत्रिणी आहेत का? आणि तो किती वेळ घालवतो त्यांच्या बरोबर?

ज्याची त्याची पद्धत मुलं वाढवायची.
प्रत्येक जण आपल्या साठी चांगले चालले ते उपाय शोधून काढत असतो.
(मूल झाल्यावर आयुष्यात, नातेवाईकांच्या आयुष्यात आणि एकंदर करीयर मध्ये इतक्या घटना घडल्या की ती कशी वाढली तेच लक्षात नाही Happy बहुधा चांगली वाढली असावी.)

मला अश्विनी दिक्षित ह्यांचा प्रतिसाद पुरेपुर पटला, त्याला अनुमोदन.
माझाही मुले वाढवण्याचा अनुभव असा आखीव रेखीव नाही. तुमचे लहान मुलांबद्दलचे लेख एवढे गंभीर रित्या लिहिले गेले आहेत की त्यात मुलाच्या खोड्या, ख्ट्याळपणा, हट्टीपणा, गोंधळ आणि मुख्यतः टँट्रम्स ह्या नॅचरल वागण्याचा थोदक्यात केऑसचा अभाव दिसला. अर्थात तुमचा मुलगा हे सगळे करत असेल पण तुम्ही लेखातून हे सगळे न सांगता केवळ 'आमचा आखीव रेखीव समंजसपणा आणि त्यावर त्याचा तितकच संमजस प्रतिसाद' ह्यावर भर दिल्याने ते कॉमन विसडमला तडा देत असल्याने समहाऊ पचनी पडत नाहीये.

तुम्ही मागे स्वयमची दोन वर्षे वयातली चित्रे वगैरे टाकली होती त्या वयातले त्याचे एकंदर वागणे सांगितले होते त्यावरून मला पहिल्यांदा ते खरे वाटले नाही. आता वाटते तुम्ही सांगितलेले खरेच असेल आणि तुमचा मुलगा प्रॉडिजी आहे.

मी एका मैत्रिणीला तुमच्या लेखांची लिंक पाठ्वली... ती पेडी आहे ... तर ती म्हणाली की हे सिलेक्टिव नॅरेटिंग वाटते आहे.

काही जास्तीचं लिहिले असेल तर माफ करा, कृपया गैरसमज करून घेऊ नका. तुमचे सगळे लेख वाचून माझ्या मनात आलेल्या भावना व्यक्त केल्या. आपण पालक खासकरून आई लोक हळवेच असतो मुलांबाबत. तुमचे ह्या संदर्भातले अजूनही लेख वाचायला आवडतील.

तुम्हाला आणि स्वयमला खूप खूप शुभेच्छा!

अनुशी सहमत.
मी तर कुणाचेही काही ऐकत नाही , कित्येक पुस्तकं वाचली never really worked out for me, एके दिवशी पिशवी भरून प्रेग्नेंसी व पेरेंटिंग पुस्तकें सामान /मेंदू वाढवायचे (?) खेळाचे अवशेष सगळे मनाने व शरीराने दान दिले वाचनालयात :). त्यातल्या शेवटच्या पानावर शंंभरातली दोन मुलं असं करणार नाहीत लिहिलेले असायचं कायम, तिच दोन मला दिली आहेत देवाने हे समजले Proud , मगं लक्षात आले की गोंधळ तर मीच करत होते , मुलं तर शांतच होती आणि त्यांना योग्य वाटेल तेच करत होती. मगं मी मुलांची आई झाले , आधी ती आईची मुलं होती !!! त्यांच्यात स्वतःला शोधणे बंद केले. Box मोडला माझ्या काटेकोर नियमांचा/अपेक्षांचा , आता त्यांना हवं तितकं मोठं होता येईल. I was obsessed once... ते बघून माझ्या आईने ओरडले होते एकदा मूल आहे की प्रयोगशाळेतला उंदीर म्हणून.....It was an eye opener.....
माझे मूल माझ्यासाठी निसर्गाने कस्टमाईझ केले आहे म्हणून intuition based parenting केले/करत आहे , मन शांत झाले... अजून खूप बाकी आहे , मोठे टप्पे तर बरेच, भावाचे बहिणीला चालत नाहीत आमच्याकडे , दोन्ही माझीच तरीही.... पण "टेंशन नही लेने का रे बाबा " हे मला कुणी सांगितले नाही म्हणून मी एवढे एकच सांगते Happy .
Follow your heart and enjoy , you are working hard , juggling with work and family commitments and million other things , you are a fabulous parent already Happy ,
(we need to feel good about ourselves, give ourselves some slack )
धन्यवाद नादिशा Happy , तुमचा द्रुष्टीकोणही तुमच्यासाठी यशस्वी झालाय/होतोयं . मी माझा सांगितला इतकेच ...
कुणाला पटलं/आवडलं नाही तर दुर्लक्ष करा प्लीज.

मला स्वाती2 चे यावर मत वाचायला आवडेल.

माझ्या पाहण्यात आता खूप यशस्वी असलेला तरुण मुलगा लहानपणी थोड्या फार याच प्रकारे वाढवलेला माहिती आहे. म्हणजे पाहिलीतल्या चित्रकलेच्या परीक्षेला सुद्धा त्याच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली होती, तो तिसरीमध्ये असताना घरात लाईट कशी, कुठून येते ते त्याला माहिती होते, सहावीत असताना तुटलेली खेळणी फिजिक्सचे नियम वापरून दुरुस्त करता येत होती. भारताने कुठला तरी प्रयोग पाहायला परदेशात पाठवलेल्या काही मोजक्या पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये तो होता, एक तास कार्टून पाहायची परवानगी होती तर तास संपला हे सांगितल्यावर तो टीव्ही बंद करायचा ,आक्रस्ताळेपणा करायचा नाही.

अत्यंत हाय आचिविंग असूनही नम्र, मृदू बोलणे,चौफेर वाचन,ठाम मुद्दे assertively मांडता येणे, सर्व सणा समारंभात उपस्थिती, नातेवाईकांशी संबंध ठेवणे, थोडाफार स्वयंपाक करणे, छोटे छोटे छंद, कमावलेले शरीर, झोपेवर जाणीवपूर्वक मिळवलेला कंट्रोल ( गरजेनुसार तीन दिवस फक्त दोन तीन झोपून काम करणे, मग एक दोन दिवस झोप काढून सहाव्या दिवशी रुटीन सुरू) वगैरे म्हणाल ते सगळे गुण.

त्याच्या आईवडिलांनी फोकस ठेवून त्याला वाढवले, त्याच्याशी खूप गप्पा मारल्या, वेळ दिला. त्याला अभ्यास आवडत नव्हता तर जाऊ दे म्हणून सोडून न देता त्याला गोडी निर्माण केली. (कशी ते मला माहिती नाही, मलाही त्याना विचारायचे आहे). आज तो अकॅडेमिक्समध्ये खूप मोठया जागी आहे. आणि तो निर्णय त्याचा स्वतःचा होता.

या सगळ्यात त्याला कधीही त्रास झाला नाही. आई वडिलांचे दडपण नव्हते. उलट घरची श्रीमंती असूनही बारावी नंतर आई वडिलांना एकही पैसे भरावा लागणार नाही (अगदी पेन, वह्या, पुस्तके सुद्धा जिथे सरकार देते) अशा ठिकाणी ऍडमिशन मिळवून वर स्कॉलरशिप मिळवली. (अर्थात आई वडिलांनी बाजूला ठेवलेल्या पैशातून भारी लॅपटॉप, टॅब, फोन, हिमालयात ट्रेकिंग, इतर काही छंद वगैरे केले)

कदाचित तो खरंच खूप बुद्धिमान असेल आणि त्याच्या आईवडिलांना याचा अंदाज येऊन त्यांनी त्याला तसे वाढवले असेल. त्याचे वडीलही स्वतः फार बुद्धीमान , शून्यातून स्वतःचे स्थान निर्माण करून टॉप वर पोचले आहेत. तरीही मुलगा बापसे सवाई.
अर्थात यात त्याने मित्रांशी मारामारी केली का , इतर काही त्रास दिला का हे मला माहिती नाही.

सांगण्याचा मुद्दा की आई वडिलांनी फोकस ठेवून वाढवले की मुले खूप सर्व क्षेत्रात आदर्श होऊ शकतात, खूप प्रगती करू शकतात. आणि प्रत्येक वेळी तो मुलांवर अन्याय असतो असं नाही.

आई वडिलांनी प्रयत्न करून इतके हाय आचिविंग नसणारे किंवा आई वडिलांचं मदत नसताना यशस्वी होणारी उदाहरणे जास्त आहेत याची कल्पना आहे.

किसान विकास पत्र म्हणजे?
>> पोस्टाची इन्व्हेस्टमेंट स्कीम.

बरोबर. मलाही याहून जास्त काही माहीत नाही.

Pages