पालकत्वाचा काटेरी मुकुट -किस्सा 8 *घर तिघांचे *

Submitted by नादिशा on 19 October, 2020 - 11:33

* घर तिघांचं *

आजकाल आपली कुटुंबे पहिल्यासारखी मोठी राहिलेली नाहीत. आपल्या कुटुंबात मोजकेच लोक असतात. मुलेही एक किंवा दोनच असतात बहुतेक ठिकाणी . त्यामुळे साहजिकच आपले खूप प्रेम असते आपल्या मुलांवर. आपल्याला शक्य ते सर्व त्यांना पुरवण्याचा आपण प्रयत्न करतो .
आपण म्हणताना म्हणतो , आमचे कुटुंब इतक्या इतक्या जणांचे आहे . पण एखादी गोष्ट करताना , घेताना मुलांना विचारात घेतलेच जात नाही दुर्दैवाने , घरातला महत्वाचा घटक असे मानले जात नाही त्यांना बरेचदा .

घर आपल्या तिघांचे आहे , असे कायम आम्ही म्हणत आलो स्वयमसमोर . ही भावना त्याच्या मनात आम्ही जागृत ठेवली . नुसती शब्दांतून नाही , तर कृतीतूनही दाखवून दिली . त्यासाठी तो जेव्हा थोडा कळता झाला , पहिलीत गेला , तेव्हा आम्ही घराला नाव द्यायचे ठरवले . कोणते नाव देऊया , यावर आम्ही तिघांनीही डोकी चालवली . शेवटी तिघांच्याही नावांतील काही अक्षरांचा वापर करून "प्रमिती "असे नाव तयार केले मी . अमित आणि स्वयमलाही आवडले . मग तेच नाव दिले . त्याच वेळी घराच्या दरवाज्यावर नेमप्लेट लावली . तर तिच्यावर अमितचे , त्याखाली माझे आणि त्याखाली स्वयमचे , अशी तिघांचीही नावे लिहिलेली आहेत .

घरात एखादी गोष्ट करताना , एखाद्या बाबीचा निर्णय घेताना त्यामध्ये आम्ही स्वयमलाही सहभागी करून घेतो .
उदा . घराला कलर दिला , तेव्हा आम्ही त्यालाही विचारले होते ,"तुला काय वाटते स्वयम , कोणता कलर देऊया आपण घराला ?"
त्याचा सल्ला ऐकायचा की नाही , हे आम्ही ठरवतो . योग्य असेल तर ऐकतो , तेव्हा योग्य सल्ला दिल्याबद्दल त्याचे कौतुक करतो . पण नसेल योग्य, तर नाही ऐकत . मात्र का नाही ऐकू शकत त्याचा सल्ला , हे मात्र तेव्हा त्याला नीट समजून सांगतो. यामुळे आपणही घरातला एक जबाबदार घटक आहोत , आपल्याही मताला किंमत आहे , निर्णयप्रक्रियेमध्ये आपलाही सहभाग आहे , ही भावना त्याच्या मनात नक्कीच जागृत होते आणि त्याचा आत्मविश्वास वाढतो . घराबद्दल आपलेपणा , प्रेम वाढते .

घरामध्ये एखादी वस्तू घ्यायची असेल , त्याच्या वाढदिवसाचा मेनू ठरवायचा असेल , त्याच्या क्लासमेट्स ना काय गिफ्ट द्यायचे , हे ठरवायचे असेल , गणपती डेकोरेशन करायचे असेल , घरात कोणते पेट्स आणायचे याचा निर्णय घ्यायचा असेल , यावर्षी कोणती झाडे लावायची , हे ठरवायचे असेल , तर आम्ही तिघे मिळून विचार करतो . जर तिघांचीही वेगवेगळी मते असतील आणि ती योग्य पण असतील , तर प्रत्येकाने इतर दोघांना पटवून देण्याचा प्रयत्न करायचा . त्यात जो यशस्वी होईल , त्याचेच ऐकतो मग . तर कधीकधी बहुमताचा विजय , या न्यायाने निर्णय घेतो .

उदा. अमितचा गणपतीवर खूप जीव आहे . त्याला वडील नाहीत . तर अगदी स्वतःच्या वडिलांच्या जागी मानतो तो गणपतीला . त्यामुळे गणपती मूर्ती आणणे , डेकोरेशन , पूजा , आरती , विसर्जन कशात काहीही कमी पडू देत नाही . आणि विसर्जनानंतर रडणे , दिवसभर मूड ऑफ असणे , हेही दरवर्षीचेच . मला मनातून शाडूमुर्ती हवी असते . पण अमितला देखणी मूर्ती आवडते . त्यामुळे त्याचा ओढा प्लास्टर ऑफ पॅरिस कडे असतो . त्याची गणपतीशी असलेली ही भावनिक अटॅचमेन्ट माहिती असल्याने मी त्याला हवी ती मूर्ती आणू देते . यावर्षीही नेहमीप्रमाणे सगळे स्टॉल्स फिरून अमितने एक मूर्ती बूक केली . कोरोनामुळे स्वयम घरीच होता . त्याने घरी आल्यावर विचारल्यावर अमितने त्याला बूक केलेल्या मूर्तीचा फोटो दाखवला . पण त्याला बिलकुल पटले नाही प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्ती घेतलेले . 2 दिवस हरतऱ्हेने तो शाडूमुर्ती कशी पर्यावरणपूरक असते , हे पटवून देत होता अमितला . शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि अमितने ती मूर्ती कॅन्सल करून शाडूमुर्ती बूक केली .

कोणत्याही लहान मुलाला लहान समजलेले आवडत नाही (जरी ते खरेच लहान असले तरी ). आपल्याला लिंबूतिंबु समजतात , या गोष्टीचे त्यांना खूप वाईट वाटते . आम्ही जाणीवपूर्वक ही गोष्ट टाळली . थोडे कळायला लागल्यापासूनच त्याच्या विचारांना किंमत दिली . घरामध्ये आम्ही एखादी गोष्ट नवीन केली , मग ती खरेदी असो , किंवा गृहरचनेत बदल.. ती का करणार आहोत आपण , हे त्याला कायम नीट समजावून सांगितले . त्यामुळे त्याचा 'स्व ' सुखावला , जबाबदारीची जाणीव निर्माण झाली . आपली तिघांची एक टीम आहे , ही भावना त्याच्या मनात रुजवण्यात आम्ही यशस्वी झालो .

याचा उपयोग आम्हाला त्याला घरातील कामांत सहभागी करून घेताना , घराची एक शिस्त असते , कसे बोलायचे , कसे वागायचे , कोणत्या वस्तू कुठे ठेवायच्या , त्या तिथे असल्याचे फायदे काय होतात , हे त्याला पटवून देण्यासाठी आणि त्यानुसार वागण्याचा यशस्वी आग्रह धरण्यामध्ये झाला . हक्क म्हटले , की कर्तव्ये आलीच , हे त्याला समजून सांगितले . त्यामुळे घर आपल्या तिघांचे आहे , तर ह्या गोष्टी आपण तिघांनीही केल्या पाहिजेत , हे त्याला पटवणे आणि कायम त्यानुसार वागण्याचा आग्रह धरणे सोपे झाले .

उदा. घरात आम्हा दोघांप्रमाणे सेम कपाटे स्वयमच्याही कपड्यांसाठी , पुस्तकांसाठी आहेत . ही गोष्ट त्याच्यात बरोबरीची , सुखावणारी भावना निर्माण करते . पण त्याच वेळी आता ही कपाटे आवरण्याची , नीटनेटकी ठेवण्याचीही जबाबदारी आपली स्वतःची आहे , याची जाणीव त्याला राहते आणि ती पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो .

आमच्याकडे नियम सर्वांसाठी सारखाच असतो . मग तो हॉटेलिंग फक्त प्रत्येकाच्या वाढदिवसाला आणि बाहेरगावी गेलो तर प्रवासामध्ये करायचे , हा असो , किंवा प्रत्येकाने सगळ्या भाज्या खाण्याचा असो , टी. व्ही. समोर बसून न जेवण्याचा असो , वस्तू जपून काळजीपूर्वक हाताळण्याचा असो किंवा एकमेकांशी खोटे न बोलण्याचा असो .
कुणीही आपल्या कामात मदत केली , तर आम्ही दोघे एकमेकांना म्हणतो तसे स्वयमलाही "थँक्स" म्हणतो . एखादी चूक झाली , तर आम्ही एकमेकांना आणि स्वयमलाही स्वतः चा अहंकार आड न आणता मनापासून 'सॉरी' म्हणतो . पुन्हा ही चूक रिपीट नाही करणार , याचे प्रॉमिस सुद्धा करतो . त्यामुळे स्वयमकडूनही आम्हाला अशा वागण्याची अपेक्षा आहे , हा न बोलता संदेश मिळतो त्याला आणि तो तसे वागतोही मग .

स्वयमचे सगळ्यात आवडते काम असते , ते म्हणजे आम्हाला रागावणे . त्यामुळे संधी मिळेल , तेव्हा एकमेकांना डोळे मिचकावून आम्ही तो आनंद त्याला मनमुराद उपभोगू देतो .

उदा. अमित त्याला सांगेल, "ही मम्मा बघ रे स्वयम , ऐकतच नाही . आज तब्येत ठीक नव्हती , तरी विणकाम करत बसली . आराम नाही केला बघ ."मग स्वयमराजे मनसोक्त मला रागावतात.

कधी मी सांगते, "बघ रे स्वयम , एवढ्या वेळा सांगून सुद्धा पपांनी हे काम केलेच नाही आजपण . तरी मी दुपारी पण आठवण केलेली हं त्यांना ऑफिस मध्ये फोन करून ."
मग स्वयमराजे लगेच पोक्त होतात . "अहो पप्पा... "असे म्हणून जी गाडी चालू होते त्याची , ती अमितने" हो बाबा , चुकले माझे , उद्याच्या उद्या करतो , "असे कबूल करेपर्यंत थांबत नाही .
मग दुसऱ्या दिवशी आमच्या चुका सुधारल्यावर आम्ही त्याला सांगतोही , "बघ स्वयम , आज केले बरंका हे हे . "

याचा फायदा असा होतो , की जेव्हा स्वयमकडून चूक होते आणि आम्ही त्याला रागावतो , तेव्हा त्याला तो त्याच्यावर अन्याय , अपमान वाटत नाही . तोही उलट उत्तर न देता शांतपणे आमचे ऐकून घेतो आणि चूक मान्य करून ती सुधारतो.

जर एखादी मोठी चूक झाली , किंवा एकदा समजावूनही परत तीच चूक रिपीट झाली , तर छोटी मोठी शिक्षा स्वयमला मिळते , तशी ती आम्हाला दोघांनाही असते . माझ्या साठी शिक्षा अमित आणि स्वयम मिळून ठरवतात . अमितसाठी मी आणि स्वयम मिळून ठरवतो तर स्वयमसाठी आम्ही दोघे ठरवतो . मिळालेली शिक्षा आम्ही प्रामाणिकपणे भोगतो . त्यामुळे आपोआपच मग ती चूक कुणीही पुन्हा रिपीट करत नाही .

या एकोप्याचा सर्वात मोठा फायदा आम्हाला स्वयमला आपले , लांबचे , जवळचे हे शिकवण्यासाठी झाला .

एकदा काय झाले , घरातील एक गोष्ट त्याने रविवारी तो माझ्या आईकडे जातो , तेव्हा तिला सांगितली . आम्हाला आईने त्यावर प्रश्न विचारल्यावर आम्ही सावरून घेतले , पण आम्हाला चांगलेच कानकोंडे व्हावे लागले होते तिच्यासमोर .

सोमवारी इकडे परत आल्यावर जेव्हा आम्ही " तू का सांगितलेस आईला? ", असे स्वयमशी बोलण्याचा प्रयत्न केला , तेव्हा त्याचे निरागस उत्तर होते , "पण का नाही सांगायचे? आई पण आपलीच आहे ना !"

2 मिनिटे आम्ही गोंधळून गेलो या उत्तरावर . पण मग न रागावता त्याला समजून सांगितले , "बरोबर आहे , आई आपलीच आहे . पण सगळ्या गोष्टी सगळ्यांना नसतात सांगायच्या . आता बघ , आपल्या फॅमिली मध्ये आपण 3 लोक आहोत . तुम्हाला स्कूल मध्ये सर्कल शिकवलंय ना , तसं असते हे . म्हणजे बघ , आधी आपल्या तिघांचे सर्कल . मग त्याच्या बाहेर आईबाबांचे , नाशिकच्या आजीचे सर्कल , मग त्याच्या बाहेर माझ्या बहिणींचे (म्हणजे तुझ्या दोन्ही माऊचे )आणि पपांच्या भावांचे (म्हणजे तुझ्या काकांचे )सर्कल . तशाच क्रमाने तुझा त्यांच्यावर हक्क आहे . त्यामुळे तुझ्यासाठी सर्वात जवळचे आणि हक्काचे आहोत आम्ही . आमच्यापासून कधीच काही नाही लपवायचे . काहीही हट्ट करायचा असला , तरी आमच्याजवळच करायचा . आमच्यानंतर क्रमाने बाकीचे लोक आहेत . काही काही गोष्टी ना , आपल्या फॅमिली च्या सिक्रेट असतात , त्या कुणालाच नसतात सांगायच्या . फक्त आपल्या वर्तुळापुरत्याच ठेवायच्या . तुम्हाला शाळेमध्ये म्हण शिकवलीय ना, "झाकली मूठ सव्वा लाखाची ", तसे !
म्हणजे आपले प्रॉब्लेम्स , आपली भांडणे , महत्वाच्या गोष्टी कुण्णाला नसतात सांगायच्या ."
बराच वेळ लागला आम्हाला त्याच्या भाषेत समजवायला.

तो लक्षपूर्वक ऐकत होता . मग शेवटी म्हणाला , "अच्छा , असे असते का? म्हणजे हे आपले "प्रमिती "सिक्रेट तर !"
आम्ही दोघे एकदमच उत्तरलो, "बरोब्बर , आपले प्रमिती सिक्रेट !"

तेव्हापासून कोणतीही महत्त्वाची किंवा इतरांना कळू न देण्यासारखी गोष्ट असेल , तर आम्ही तिघे फक्त खुणावतो एकमेकांना , "प्रमिती सिक्रेट आहे हं "...
मग बिलकुल सांगत नाही स्वयम कुणाला . अगदी माझ्या बहिणींनी खोदून विचारायचा प्रयत्न केला , तरी फसत नाही .

आपल्या वेळी जसे होते, पालकांनी जे सांगितले, ते मुलांनी गुपचुप ऐकायचे... तसे आपण आपल्या या मुलांसोबत नाही वागू शकत . का, कशासाठी यांची समाधानकारक उत्तरे या पिढीला हवी असतात . आणि मला मनापासून असे वाटे , की रागावून, जबरदस्तीने स्वयमला काही ऐकायला लावण्यापेक्षा त्यामागची कारणमीमांसा त्याला पटवून दिली , तर तो मनापासून ऐकेल . त्यामुळे मम्मीपप्पा म्हणून मिळालेल्या निसर्गदत्त अधिकाराचा वापर करून डायरेक्ट ऑर्डर सोडण्यापेक्षा "असे करूया आपण , तसे केले तर काय होईल रे? "या मोड मध्ये कायम वागलो. आणि त्याचे सकारात्मक फायदे आम्हाला जाणवले आहेत . निर्णयप्रक्रियेत सहभाग असल्याने घरातील वस्तू तो जपून वापरतोच, शिवाय काळजी पण घेतो त्यांची . शिवाय हळूहळू त्यांची निर्णयक्षमता वृद्धिंगत होते आहे . त्याचा आत्मसन्मान आम्ही जपतो , हे जाणवल्याने तो सुद्धा आमच्याशी , इतर मोठ्यांशी आदरपूर्वक वागतो . आमच्यातील मैत्रीचे नाते छान फुलले , हळूहळू बहरते आहे . आगामी काळात या मैत्रीचा आणि विश्वासाचा डेरेदार वृक्ष होईल आणि त्याच्याच सावलीत स्वयमच्या तारुण्याच्या वाटेवरचे अपरिहार्य प्रश्न सुलभपणे सुटतील, अशी आशा आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे असे लेख वाचून मला फारच न्यूनगंड आला आहे की पालक म्हणून मी अगदीच नालायक ठरलो आहे. आता या नैराश्यावर काही उपाय आहे का, ते शोधतो.

आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार.
@अश्विनि दिक्षित, अहो, मत द्यायचे ना. सर्व प्रकारच्या प्रतिसादांचे स्वागत आहे.
तुमचा मुलगा गुणी आहे. तुम्ही म्हणताय तसे त्याला बोलण्याची -वागण्याची समज आहे. काही त्रास न देता शाळा बदलल्यावर त्याने जुळवून घेतले, त्याचे कौतुक आहे. आम्ही मागच्या वर्षी स्वयमची शाळा बदलली. पण त्यावेळी शाळा का बदलावी लागणार आहे, ती बदलल्यावर जागा, वेळ, मित्र, शिक्षक सारे बदलतील, याची नीट कल्पना देऊन त्याच्या मनाची तयारी झाल्यावर बदलली. तो तिथे छान रुळेपर्यंत त्याला बोलते करत, रमवत, धीर देत राहिलो.
तुम्ही जे 2 किस्से सांगितलेत, ते खरेच कौतुकास्पद आहेत. तुमचा मुलगा स्वतः निर्णय घेतो आहे. पण सर्व मुलांमध्ये ती उपजत कपॅसिटी नसते ना हो. त्यांची निर्णयशक्ती हळूहळू वाढवावी लागते. काही गोष्टी शिकवाव्या लागतात.
तुम्हाला वाटू शकते आमचे फोर्स पॅरेंटिंग. पण आम्ही त्याला कधीही, काहीही फोर्स करत नाही हो. अकाली प्रौढत्वाबद्दलच्या प्रश्नाला मी वरती उत्तर दिलेले आहे.
तुमच्या आपुलकीच्या सल्ल्याबद्दल खरेच धन्यवाद. पण आम्ही त्याला सर्वगुणसंपन्न बनवण्याचा अट्टाहास करत नाही. स्वयम ची चित्रे 1.5 वर्षाचा असल्यापासून पाहणारे एक ख्यातनाम चित्रकार आहेत. त्यांनी च अमितला दिलेला सल्ला आहे हा. अमितला मनापासून वाटते, त्याने चित्रकलेमध्ये पुढे जावे. त्यामुळे तो इतर गोष्टींसाठी फार उत्सुक नसतो. ते सर म्हणाले, "तुम्ही असे नका करू अहो. त्याच्यात नशिबाने एवढ्या कला आहेत. डान्स, चित्रकला, अभिनय, वक्तृत्व, अभ्यास. तुम्ही या सगळ्यांना एक्स्प्लोअर करण्याची संधी द्या. पुढे जाऊन त्याचे तो ठरवेल, नेमके काय करायचे आहे!"तेव्हापासून आम्ही सगळे करू देतो आहोत त्याला.

@लंपन, आदर्शवत आणि आखीवरेखीव असे काही नाही हो. आमच्या मुलाचा स्वभाव असा आहे, त्यानुसार आम्ही हे हे केले, त्याचा असा असा आऊटपुट मिळाला, असे मी आमच्या पालकत्वाचे अनुभव मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे शेअर करते एवढेच !
मागच्या लेखात मी आमच्या झालेल्या चुकाही शेअर केल्या होत्या.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर -आमच्या मुलाला अजूनपर्यंत मैत्रिणी नाहीत. मित्र मात्र पुष्कळ आहेत. तो शाळेत यायची शाळेतील मित्र वाट पाहत असतात आणि अजून कसा घरी नाही आला, याची घराजवळचे मित्र 4-4 दा येऊन चौकशी करतो. मनसोक्त खेळतो, हुंदडतो, धडपडतो तो. त्याचे मन भरेपर्यंत आम्ही त्याला बोलावत नाही. मनमुराद खेळून झाले, की स्वतः घरी येतो.(अंगावर खुणा नाही उमटल्या, असे 4 दिवस काही जात नाहीत. साधे सरळ चालणे येत च नाही त्याला. पळतच असतो सतत. )हा, मात्र आल्यावर न सांगता हातपाय धुवून, कपडे बदलून अभ्यासाला बसतो . सगळा अभ्यास मनापासून पूर्ण करतो.
आमच्या सगळ्या नातेवाईक, मित्रमैत्रिणींशी त्याची ओळख आहे. कुणाचा फोन आला, तर छान संवाद साधतो तो. कुणाच्या घरी गेलो आम्ही, तर पाचव्या मिनिटाला मिक्स अप होतो, खेळायला लागतो, गप्पा मारतो, भूक लागली तर सांगतो, जे देईल,ते व्यवस्थित खातो. आमच्या एक नणंदबाई त्याला "राजामाणूस "म्हणतात.

@mi _anu, तुमचे बरोबर आहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि आपल्याला सूट होणारी पद्धत प्रत्येकजण शोधत असतो. आमच्या लहानपणी सगळी मुले आपोआप च वाढायची अहो, दुर्दैवाने आता तसे होत नाही, हा आमचा अनुभव आहे.

@मी अश्विनी, सॉरी. पण तुम्ही माझे लेख नीट वाचलेले दिसत नाहीत. मी प्रत्येक लेख एकेक विषय घेऊन लिहिलेला आहे. आणि त्या त्या विषयाशी संबंधित किस्से शेअर केलेले आहेत. तुमच्या पेडी मैत्रिणीला वाटले, तसे हे सिलेक्टीव नॅरेटिन्ग नाहीये. ज्या त्या विषयाच्या अनुषंगाने केलेले लेखन आहे. जेव्हा मी स्वयमने केलेले गोंधळ, दंगामस्ती, खोड्या, उपद्व्याप यांच्याशी संबंधित लेख लिहीन, तेव्हा त्याच्याशी संबंधित किस्से शेअर करणार च आहे. सुदैवाने हट्टीपणा, टँट्रम्स नाही करत तो. पण त्याच्या वयसुलभ मौजमजा, गमतीजमती करतो तो, ओघात येईल तेही पुढच्या लेखांमध्ये.
तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. स्वयमची चित्रे पाहिल्यावर बऱ्याच जणांचा विश्वास बसत नाही, की ही ह्या ह्या वयातील मुलाने काढलेली चित्रे आहेत. वरती मी
अश्विनि यांना दिलेल्या प्रतिसादात उल्लेख केलेल्या चित्रकारांनी च यावर एक उपाय सुचवला आहे. त्यानुसार आम्ही हल्ली स्वयम चित्र काढत असतानाचे व्हिडिओ शूट करतो. एखाद्या स्पर्धेला त्याचे चित्र पाठवले, तर चित्रासोबत व्हिडिओ सुद्धा पाठवून देतो. जेणेकरून परीक्षकांचा विश्वास बसेल, चित्र त्यानेच काढलंय यावर. तुमचा e mail सांगितलात, तर मी पाठवून देईन तुम्हाला त्यावर स्वयमची चित्रे आणि व्हिडिओस.

@मी _अस्मिता, आमचा अनुभव वेगळा आहे अहो. आम्हाला खूप फायदा झाला आहे पॅरेंटिंग वरच्या पुस्तकांचा. सर्वात जास्त मला आवडते, ती खलील जिब्रान याची "तुमची मुलं "ही कविता !आमच्यासाठी ती जणू पालकत्वाची गीता आहे. दिवस गेल्यापासून ती आम्हा दोघांच्या डोळ्यांसमोर आहे. त्यामुळे आम्ही कधीच स्वयम वर काहीच लादले नाही, त्याच्या
मध्ये स्वतः ला शोधण्याचा प्रयत्न नाही केला. त्याला स्वतः चा शोध घेण्यास सक्षम बनवणे, हा आमचा हेतू आहे. चुकत, धडपडत, शिकत चाललेला हा आमचा पालकत्वाचा प्रवास आहे, खूप सुंदर आहे, समृद्ध करणारा आहे आणि आम्ही तिघेही वाढतो आहोत, घडतो आहोत यामध्ये. बस्स एवढेच.

पीनी, अनुमोदन. तुम्ही प्रतिसादामध्ये शेवटी म्हटलंय, तशी दोन्ही प्रकारची उदाहरणे समाजात आहेत. पण आपल्याच मुलासाठी, शक्य तेवढा वेळ, मनापासून साथ,सहवास, एक्प्लोअर करण्याची संधी, सहज मनमोकळा संवाद, विश्वास आणि मैत्रीपूर्ण, मनमोकळे वातावरण उपलब्ध करून देणे.. एवढे करायला काय हरकत आहे?

प्रतिसाद आवडला नादिशा. धन्यवाद.
तुम्ही प्रत्येक प्रतिसादाला व्यवस्थित उत्तर देत आहात त्याबद्दल कौतुक Happy .

<<<मुलाला सर्व गुण संपन्न करण्याच्या अट्टहास करू नका.>>> +१११
मलाही तुमचे लेख अतिशयोक्ती प्रकारातील वाटतात. पटत नाहीत रादर काही काही गोष्टी खोट्या वाटतात. जसे वर कुणीतरी लिहिलंय. पण ते माझे मत आहे म्हणून तुम्ही खोटे किंवा उगीच ओढून ताणून आदर्शवादी लिहिता असे म्हणणार नाही, तसे फक्त मला वाटते.
मला पालकत्वचा अनुभव नाही, उलट मी कधीच कुठल्याही मुलाला जवळ देखील घेतले नाहीये. आता मला बाळ होणार आहे त्याचे दडपणच जास्त आहे. ज्याचा अनुभव नाही त्यावर मत कशाला द्या म्हणून काही लिहीत नव्हते. पण आज थोडेफार माझ्या मताशी जुळते प्रतिसाद दिसले म्हणून लिहिले इथे.

मी आधी तुमचे सगळे लिखाण वाचले नाही, यावर खूप प्रतिसाद दिसले म्हणून लेख अन प्रतिसाद वाचले

प्रतिसादाबद्दल धन्यवाद vb आणि तुमच्या पालकत्वासाठी शुभेच्छा.
तुमचे पालकत्वाचे स्वानुभव नक्की शेअर करा. आवडतील मला वाचायला.

"@mi _anu, तुमचे बरोबर आहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि आपल्याला सूट होणारी पद्धत प्रत्येकजण शोधत असतो. आमच्या लहानपणी सगळी मुले आपोआप च वाढायची अहो, दुर्दैवाने आता तसे होत नाही, हा आमचा अनुभव आहे."

अहो आम्ही आमच्या अपत्याला वार्‍यावर सोडले आणि ते आपोआप वाढले असं मी म्हणत नाहीये Happy १० वर्षात योग्य ती काळजी घेतली.काही गोष्टी समजवल्या.काही ऐकल्या गेल्या.काही गेल्या नाहीत. आव्हानेही आली.
फक्त त्यावर लेख लिहिण्या इतके लक्षात ठेवलेले नाहीये गेल्या काही वर्षात, काहीही आठवत नाहीये इतकाच मुद्दा होता.
(आता हे लेख वाचून असं जाणवतंय की लेख लिहीणार्‍याचा सूर नकळत 'आम्ही हे हे असं असं इतके प्लॅन, ब्लू प्रिंट आखून केलं, किती छान केलं बघा, नाहीतर बाकीचे ते तसं करतात' होत जातो आणि मग वाचणार्‍यांचा बॅकलॅश तितक्याच जोराने येत जातो असं काहीसं होत असावं.)

अनु तसे वाटत आहे खरे. पण त्यांचा मुलगा पण एकदम गुणी दिसत आहे त्यांच्या प्रतिसादावरून. अपवादात्मक म्हणावा इतपत त्यामुळे त्यांचे अनुभव वेगळे वाटत आहेत. माझ्या प्रतिसादाला उत्तर देताना त्या म्हणत आहेत की त्यांच्या मुलाचा स्वभावच तसा आहे . त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी करताना सोपं गेलं असेल. म्हणजे जी मॅच्युरिटी मुलांना थोडं मोठं झाल्यावर येते ती त्याला बऱ्यापैकी आधीच आली आहे आणि पुढचे सारे पालकांचे प्रयोग, जे आपण पण करत असतोच पण त्यात सांगण्यासारखे काही नाहीये Happy

हे सगळे फारच भारी आहे बुवा!

अवांतर: मला हातवळणे भावंडे व त्यांच्यावरची पुस्तके आठवली. त्यानंतरचा ‘ अमुचीही आई अशी असती तर”चा ओझरता उल्लेख आणि धपाटा.. Wink

तुम्ही प्रत्येक प्रतिसादाला व्यवस्थित उत्तर देत आहात त्याबद्दल कौतुक Happy +१२३४५६७ आणि पॉझिटिव्ह ही घेत आहात.
मला जिज्ञासा, अमा, अस्मिता, रिया, लंपन, मि-अनु यांचे प्रतिसाद पटले.
आणि तुमच्या प्रतिसाद वरून लंपन यांनी दिलेला शेवटचा म्हणणं सुद्धा पटले.. (Submitted by लंपन on 22 October, 2020 - 00:32)
< आम्ही तिघेही वाढतो आहोत, घडतो आहोत यामध्ये. >>
हे आवडले. शुभेच्छा..+ १२३४५

आता हे लेख वाचून असं जाणवतंय की लेख लिहीणार्‍याचा सूर नकळत 'आम्ही हे हे असं असं इतके प्लॅन, ब्लू प्रिंट आखून केलं, ........... अगदी सुरुवातीला मलाही तसेच वाटले होते.पण मग लक्षात आले की त्यांचे मूल खरंच गुणी आहे.
मग लंपन यांना मम.

मी अनु +११११११११११, अगदी मलाही असेच वाटते आणि हे मला त्यांच्या पहिल्या लेखात जाणवले. त्यावेळी माझा प्रतिसाद पण असाच काहीसा होता . त्यांनी अमा याना म्हटले आहे कि ती सर्व पुस्तके त्यांनी वाचली आहेत. म्हणजे अनु म्हणतात तसे आम्ही पहा असे आखीव रेखीव केले.
खरे सांगायचे तर त्यांचे शेअरींग न वाटता स्वतः परफेक्ट आहोत हे दाखवणे वाटते भलेही उद्देश तसा नसेल. दुसरी गोष्ट त्या प्रत्येक प्रतिक्रियेवर हिरहिरीने उत्तर देत आहेत ज्याचा सूर आमचे बरोबर आहे असाच वाटतो.
कुठल्यंही प्रतिक्रियेवर अरे असे पण आहे का? किंवा तुमचे अनुभव काय आहेत असा सूर नाही, उलट पक्षी उत्तर आहे त्यामुळे अनु म्हणतात तसे बकलश येत आहे.( यांचा आसेप्टन्स जाणवत नाही, उलट खोचक प्रश्न आहे ). जसे उपाशी बोका याना वाटले तसे मलाही यांचा पहिला लेख वाचल्यावर वाटले कि आपण फारच नालायक पालक आहॊत. पुढच्या लेख वरून एकदंर सूर काळाला मग सोडून दिले. जितके घायचे तितकेच घ्याचे. उदा. सुबोध दादाची गोष्ट या यु ट्यूब चॅनेल चे , मला आणि मुलाला दोघांनाही आवडले. पण पुढे लेखांचा सूर बदलेल असे वाटत नाही, सो I rest my case.

मलाही यांचा पहिला लेख वाचल्यावर वाटले कि आपण फारच नालायक पालक आहॊत. >> अरे काय हे... त्या त्यांच्या जागी, तुम्ही तुमच्या जागी. Parenting is like driving blindfolded. You know you made a mistake only when you hit gravel. तुम्हाला तुमचे ग्रॅव्हेल माहिती, त्यांना त्यांचे. Parenting is not a competitive sport. वाचा नि द्या सोडून... मी पण ते हेल्दी चॉकलेट वाचून सोडून दिलं.
इतर कुठे कुठे चांगलं लिहीतात ह्या आयडी. चांगलं लक्षात ठेवू, बाकी फिर कभी सोचेंगे...

सर्वांचे मनःपूर्वक आभार !
माझे दुर्दैव आहे, की माझ्या लिखाणाचा हेतूच बहुतांश जणांच्या लक्षात आलेला नाही. माझ्या एकाही लेखात मी "इतर जण कसे चुकतात "हे लिहिलेले नाही. आम्ही जे जे प्रयोग केले आणि त्याचे आम्हाला काय फळ मिळाले, एवढेच मी प्रामाणिकपणे आमच्या पालकत्वाचे अनुभव एकेका विषयाच्या अनुषंगाने मांडले आहेत . मात्र वाचणाऱ्यांना तसे का वाटले, हे तेच सांगू शकतात.

माझे च बाळ गुणी आहे, असेही मी कुठे म्हटलेले नाही. हा, पण जे काही गुण त्याच्यामध्ये दिसतात, ते आले कसे, त्यात आमचा काय हातभार होता, सहभाग होता, ही प्रोसेस शेअर करण्याचा मनापासून प्रयत्न केला. पण माझ्या शब्दांचा विपर्यास केला गेलेला आहे. "वादे वादे जायते तत्वबोधः "असे न होता वितंडवाद होतो आहे..

ही चर्चा नाहीये. चर्चा खरेतर यावर व्हायला हवी होती , की "अच्छा, तुम्ही हे हे प्रयोग केले का? आम्ही हे हे केले होते, आमच्या एका मित्राने /नातेवाईकाने हे हे केले होते, आमच्या मुलांच्या बाबतीत असा असा अनुभव आला.. "
पण असे झालेलेच नाही. "आम्ही कसे हुशार, आमचे बाळ कसे गुणी, "असे माझे लिखाण आहे, असे चुकीच्या आरोप केले गेलेले आहेत . ही गोष्ट खूप उद्विग्न करणारी आहे..जी गोष्ट मनातही नाही, ती शब्दांत मांडण्याचा प्रश्न च उद्भवत नाही खरेतर. तरीही त्यावर खोचक प्रश्न उपस्थित व्हावेत आणि त्यांना उत्तरे देण्यात वेळ आणि शक्ती खर्ची पडावी, ही गोष्ट मला तरी रास्त वाटत नाही. तरीही मी साऱ्यांना खरेखुरे प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला. तर त्यावरही पुन्हा आरोप केले गेले आहेत. खूप मनस्तापजनक आहे हे सारे आमच्यासाठी.

त्यामुळे मी आजपासून मायबोलीची कायमसाठी रजा घेते आहे. बाय बाय.

नक्की लिहा नादिशा. तुमचे इतर विषयांवरचे लेख आवडतात. (इथे काटेरी मुकुट पासूनच डोक्यात लोचा चालू झालाय.) आणि तुमचा दृष्टीकोन पटणारेही बरेच आहेत. काहींचा पटले नाहीत सांगण्याचा सूर वेगळा आहे. यात तुम्हाला छळण्याचा किंवा बुलिईंग चा उद्देश नसावा.

त्यामुळे मी आजपासून मायबोलीची कायमसाठी रजा घेते आहे. बाय बाय.>>>>>> असं बिलकूल करू नका.इथल्या नवमातांना तुमचे अनुभव उपयोगी पडतील.तुम्ही प्रामाणिकपणे जे घडत गेले किंवा घडत आहे त्याबद्दल आपले अनुभव मांडत आहात.
तुमचा मुलगा बेसिकली मॅच्युअर आहे एवढ्याच अर्थाने तो गुणी बाळ आहे असे म्हणतेय.कारण त्या वयातील इतर मुले इतकी समंजस असतील असेही नाही.माझ्या एकाच मैत्रिणीचा मुलगा असा गुणी बाळ पाहिला आहे.

अच्छा, तुम्ही हे हे प्रयोग केले का? आम्ही हे हे केले होते, आमच्या एका मित्राने /नातेवाईकाने हे हे केले होते,>>>>>> हे मला नाही पटले.म्हणजे दुसर्‍याची रिअ‍ॅक्शन कशी असावी हे ही तुम्हीच ठरवणार का? भले तुमचा तो उद्देश नसेलही तरीही मनात आले ते लिहिले.

मला वैयक्तिकरित्या न आवडलेली बाब म्हणजे स्वयमच्या बाबांनी, लेकाने सांगितल्याप्रमाणे गणपतीची शाडूची मूर्ति आणली.जरी ही गोष्ट पर्यावरणाला चांगली असली तरीही.मला माझ्या मुलाने प्रेशराइज केलेले आवडले नसते कदाचित.
असो. बाकी तुमचा निर्णय!

मी_अनु, -+१. वाचकांचे प्रतिसाद तुमच्या अपेक्षेप्रमाणे आले नाहीत पण कोणीही वितंडवाद घातला असं वाटत नाही. जे खोचक प्रतिसाद वाटले त्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकता. मायबोलीसारख्या मोठ्या व्यासपीठावर थोडे मतभेद असायचेच.

(अवांतर:
शाडू पीओ पी पेक्षा चांगली असं आपण मानतो. पण शाडू माती मिळवायला कठीण असते. त्यासाठी कोकणात नदी पात्रांचे खोदकाम होते.शिवाय लॉकडाऊन मध्ये ज्यांना शाडू माती मोठ्या प्रमाणात मिळाली नाही त्यांनी बिनधास्त ३०% इंडस्ट्रीयल अ‍ॅश आणि बाकी शाडू माती घेऊन मूर्ती पूर्ण शाडू म्हणून महागात विकल्यात.शाडू मूर्तीचे विसर्जन केल्यास सिमेंट च्या रंगाची रेती जास्त दिसते आहे, जी माझ्या अंदाजाप्रमाणे नक्कीच शाडू माती नाही.पुढच्या वर्षी आम्ही पी ओ पी ची छोटी मूर्ती किंवा शेण किंवा मृत्तिका मूर्ती घेणार, तसेही आमच्या इथल्या नद्यांमधून मूर्ती लगेच नेट लावून काढून नंतर रिसायकल करतात)

Parenting is not a competitive sport.
>> Perfect.
वर नादिशा यांनी सर्वांना तुमची पॅरेटिंगची काय पद्धत आहे, तुम्ही पण लिहा हे वारंवार लिहूनही त्या खोचकपणे असं म्हणत आहेत , असे मानत असाल तर चर्चा कशी होईल?

वर त्यांनी अजून कोणाला व्हिडिओ पण पाठवण्याची तयारी दाखवली आहे. कोणी त्यांना मेल केला का? तरीही त्यांचे मूल गुणी नसेलच आणि त्या मुलावर अन्याय करत वाढवत आहे अशी खात्री का? मागच्या
पिढ्यांसारखी आदर्श, आईवडिलांचं ऐकणारी , गुणी मुलं आजकाल कमी असावीत पण तशी मुलं अस्तित्वात नाहीतच हा काय अट्टाहास? खरंच त्यांचे मूल मुळातच गुणी आणि हुशार असू शकते ना?

हे म्हणजे ऐश्वर्या राय इतकं सौन्दर्य असूच शकत नाही, तिला लहानपणी गोरे होण्याची इंजेक्शन दिले असतील, डोळ्यांमध्ये रोज सकाळी उठून लेन्स घालायला लावले असतील, आणि इतकी सुंदर मुलगी अभ्यासात पण हुशार? शक्यच नाही. पैसे देऊन मार्क मिळवले असणार, तिला तिच्या आईवडिलांनी किती त्रास दिला असणार असे म्हणण्यासारखे नाही का वाटत?

त्यांनी कुठल्याही लेखात इतरांच्या मुलांबद्दल लिहिले नाही, इतर मुलांशी तुलना केली नाही. उलट प्रतिसादातच लोकांनी (माझ्यासकट) त्यांच्या मुलाशी स्वतःच्या मुलांची तुलना केली आहे, त्यांच्या परेटिंगशी स्वतःच्या किंवा स्वतःच्या आई वडिलांशी तुलना करून माझे आईवडील किती कुल होते आणि तुम्ही तुमच्या मुलाला कसे अकाली प्रौढ करत आहात , वगैरे सुनावले आहे. वर एक जण म्हणतात परेटिंग वरची पुस्तके वाचा, तुम्ही तुमच्या मुलाला त्रास देत आहात हे लक्षात येईल, तर दुसऱ्या म्हणतात, उगीच परेटिंग वरची पुस्तके वाचून मुलाला तसे सर्वगुणसंपन्न बनवण्याचा अट्टाहास करु नका. सर्वाना त्यांनी अत्यंत संयत उत्तरे दिली आहे. तरीही त्याच दोषी? कारण त्या मोजक्या पालकांपैकी आहेत ज्या
स्वतः आदर्श वागून मुलालाही गुणी बनवत आहेत?

माझं मूल अजून लहान आहे. पण हे वाचून एक धडा मात्र घेतला की आपलं मूल भारी असेल तर कोणालाही सांगू नये, कोणीही विश्वास ठेवणार नाही.
तसंच उद्या माझ्या बाळाच्या वयाची इतर अनेक मुलं भेटतील, त्यापैकी कोणी फार गुणी असेल तर ते मूळचे गुणी असू शकतात किंवा माझा माझ्यावर (इंटरनेट वापरणे, संतापी पणा किंवा इतर काही बाबतीत) कंट्रोल नसल्याने मी बाळाला योग्य ती शिकवण देऊ शकत नाही. पण त्या गुणी बाळाला त्रासच दिला जात असेल, त्याचे आईबाबा फुशारकी मारत आहेत वगैरे मानणार नाही.

आम्ही ज्यांच्याकडुन मुर्ती घेतो त्याने सांगीतले होतेच की शाडु मुर्तीतही भेसळ करावी लागते, अन्यथा मुर्तीची विटंबणा होण्याची शक्यता असते बरेचदा जर निट हाताळली गेली नाही कारण त्या मुर्त्या खुप नाजुक असतात.

आम्ही पिओपीच घेतो अन कृत्रिम तलावात विसर्जन करतो

नादिशा, तुम्हाला खोचक प्रतिक्रिया वाचून त्रास होत असेल. पण कदाचित ही मानवी प्रवृत्ती असावी. प्रत्येकाला आपलं मुलं प्रिय असतं आणि आदर्श व्हावं असं वाटतं असतं. त्यामुळे स्वप्नवत खरंच गुणी कोणी आहे असं दिसल्यावर अशा प्रतिक्रिया येत असाव्यात. तुमचे लेख मी वाचते आणि त्यावर विचारही करते. मला ह्या लेखांचा उपयोग होतो. काल लिहिले तसे मी आदर्श आणि सर्व गुणसंपन्न वडील- मुलगा पाहिले आहेत, त्यामुळे तसे अस्तिवात असू शकते, मुलाला त्रास न होता मूल छान घडू शकते हे मला माहिती आहे.
मी अजिबात आदर्श नाही. माझ्यातले मला माहिती असलेले दोष मला काढून टाकायला जमत नाही, त्यामुळे मला पाहून बाळ काही चुकीच्या गोष्टी शिकत असेल तर त्या नोट करायला आणि त्या कशा सुधाराव्या यासाठी मला या लेखाचा उपयोग होईल.
तुमचे मनस्वास्थ्य बिघडवून मात्र हे लिहिण्यात अर्थ नाही. या लेखांवर अशाच प्रतिक्रिया येत राहतील अशी तयारी ठेवून जमलं तर लिहा.

मलाही निदिशा यांचे लिखाण आवडते
त्या प्रामाणिकपणे लिहितात
त्यांना अशा प्रकारचे प्रतिसाद मिळावेत हे दुर्दैवी आहे
त्यांनी त्यांची मूल वाढवण्याची पद्धत शेअर केली आणि कुठंही असं म्हणलं नाही की हीच पद्धत सर्वोत्कृष्ट आहे
आम्हीही आमच्या मुलाला वाढतोय तसा वाढू देतोय
असले काहीही पद्धतशीरपणे प्लॅनिंग वगैरे केलं नाही
पहिलेच पालक असल्याने अनेक चुकाही झाल्या
पण आजी आजोबा घरी असल्याने त्यांनी चांगले सांभाळून घेतले
त्यांच्याच तालमीत जास्त तयार झाला तो आणि त्यामुळे गुणी बाळ पण झाला
असो, तर निदिशा तुम्ही लिहीत रहा
प्रतिसाद कसे येतील याची चिंता न करता

स्वतःच्या आई वडिलांशी तुलना करून माझे आईवडील किती कुल होते आणि तुम्ही तुमच्या मुलाला कसे अकाली प्रौढ करत आहात , वगैरे सुनावले आहे. >> पीनी, सिलेक्टिव्ह रिडींग करू नका. हा माझा प्रश्न अत्यंत ज्येन्यूईन होता आणि त्याला नादिशा यांनी सविस्तर उत्तरंही दिलं आहे. आणि पेरेंटींगच्या धाग्यावर आपले आईवडील कसे कूल होते हे लिहीलं तर काय गैर आहे?

Pages