पालकत्वाचा काटेरी मुकुट -किस्सा 8 *घर तिघांचे *

Submitted by नादिशा on 19 October, 2020 - 11:33

* घर तिघांचं *

आजकाल आपली कुटुंबे पहिल्यासारखी मोठी राहिलेली नाहीत. आपल्या कुटुंबात मोजकेच लोक असतात. मुलेही एक किंवा दोनच असतात बहुतेक ठिकाणी . त्यामुळे साहजिकच आपले खूप प्रेम असते आपल्या मुलांवर. आपल्याला शक्य ते सर्व त्यांना पुरवण्याचा आपण प्रयत्न करतो .
आपण म्हणताना म्हणतो , आमचे कुटुंब इतक्या इतक्या जणांचे आहे . पण एखादी गोष्ट करताना , घेताना मुलांना विचारात घेतलेच जात नाही दुर्दैवाने , घरातला महत्वाचा घटक असे मानले जात नाही त्यांना बरेचदा .

घर आपल्या तिघांचे आहे , असे कायम आम्ही म्हणत आलो स्वयमसमोर . ही भावना त्याच्या मनात आम्ही जागृत ठेवली . नुसती शब्दांतून नाही , तर कृतीतूनही दाखवून दिली . त्यासाठी तो जेव्हा थोडा कळता झाला , पहिलीत गेला , तेव्हा आम्ही घराला नाव द्यायचे ठरवले . कोणते नाव देऊया , यावर आम्ही तिघांनीही डोकी चालवली . शेवटी तिघांच्याही नावांतील काही अक्षरांचा वापर करून "प्रमिती "असे नाव तयार केले मी . अमित आणि स्वयमलाही आवडले . मग तेच नाव दिले . त्याच वेळी घराच्या दरवाज्यावर नेमप्लेट लावली . तर तिच्यावर अमितचे , त्याखाली माझे आणि त्याखाली स्वयमचे , अशी तिघांचीही नावे लिहिलेली आहेत .

घरात एखादी गोष्ट करताना , एखाद्या बाबीचा निर्णय घेताना त्यामध्ये आम्ही स्वयमलाही सहभागी करून घेतो .
उदा . घराला कलर दिला , तेव्हा आम्ही त्यालाही विचारले होते ,"तुला काय वाटते स्वयम , कोणता कलर देऊया आपण घराला ?"
त्याचा सल्ला ऐकायचा की नाही , हे आम्ही ठरवतो . योग्य असेल तर ऐकतो , तेव्हा योग्य सल्ला दिल्याबद्दल त्याचे कौतुक करतो . पण नसेल योग्य, तर नाही ऐकत . मात्र का नाही ऐकू शकत त्याचा सल्ला , हे मात्र तेव्हा त्याला नीट समजून सांगतो. यामुळे आपणही घरातला एक जबाबदार घटक आहोत , आपल्याही मताला किंमत आहे , निर्णयप्रक्रियेमध्ये आपलाही सहभाग आहे , ही भावना त्याच्या मनात नक्कीच जागृत होते आणि त्याचा आत्मविश्वास वाढतो . घराबद्दल आपलेपणा , प्रेम वाढते .

घरामध्ये एखादी वस्तू घ्यायची असेल , त्याच्या वाढदिवसाचा मेनू ठरवायचा असेल , त्याच्या क्लासमेट्स ना काय गिफ्ट द्यायचे , हे ठरवायचे असेल , गणपती डेकोरेशन करायचे असेल , घरात कोणते पेट्स आणायचे याचा निर्णय घ्यायचा असेल , यावर्षी कोणती झाडे लावायची , हे ठरवायचे असेल , तर आम्ही तिघे मिळून विचार करतो . जर तिघांचीही वेगवेगळी मते असतील आणि ती योग्य पण असतील , तर प्रत्येकाने इतर दोघांना पटवून देण्याचा प्रयत्न करायचा . त्यात जो यशस्वी होईल , त्याचेच ऐकतो मग . तर कधीकधी बहुमताचा विजय , या न्यायाने निर्णय घेतो .

उदा. अमितचा गणपतीवर खूप जीव आहे . त्याला वडील नाहीत . तर अगदी स्वतःच्या वडिलांच्या जागी मानतो तो गणपतीला . त्यामुळे गणपती मूर्ती आणणे , डेकोरेशन , पूजा , आरती , विसर्जन कशात काहीही कमी पडू देत नाही . आणि विसर्जनानंतर रडणे , दिवसभर मूड ऑफ असणे , हेही दरवर्षीचेच . मला मनातून शाडूमुर्ती हवी असते . पण अमितला देखणी मूर्ती आवडते . त्यामुळे त्याचा ओढा प्लास्टर ऑफ पॅरिस कडे असतो . त्याची गणपतीशी असलेली ही भावनिक अटॅचमेन्ट माहिती असल्याने मी त्याला हवी ती मूर्ती आणू देते . यावर्षीही नेहमीप्रमाणे सगळे स्टॉल्स फिरून अमितने एक मूर्ती बूक केली . कोरोनामुळे स्वयम घरीच होता . त्याने घरी आल्यावर विचारल्यावर अमितने त्याला बूक केलेल्या मूर्तीचा फोटो दाखवला . पण त्याला बिलकुल पटले नाही प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्ती घेतलेले . 2 दिवस हरतऱ्हेने तो शाडूमुर्ती कशी पर्यावरणपूरक असते , हे पटवून देत होता अमितला . शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि अमितने ती मूर्ती कॅन्सल करून शाडूमुर्ती बूक केली .

कोणत्याही लहान मुलाला लहान समजलेले आवडत नाही (जरी ते खरेच लहान असले तरी ). आपल्याला लिंबूतिंबु समजतात , या गोष्टीचे त्यांना खूप वाईट वाटते . आम्ही जाणीवपूर्वक ही गोष्ट टाळली . थोडे कळायला लागल्यापासूनच त्याच्या विचारांना किंमत दिली . घरामध्ये आम्ही एखादी गोष्ट नवीन केली , मग ती खरेदी असो , किंवा गृहरचनेत बदल.. ती का करणार आहोत आपण , हे त्याला कायम नीट समजावून सांगितले . त्यामुळे त्याचा 'स्व ' सुखावला , जबाबदारीची जाणीव निर्माण झाली . आपली तिघांची एक टीम आहे , ही भावना त्याच्या मनात रुजवण्यात आम्ही यशस्वी झालो .

याचा उपयोग आम्हाला त्याला घरातील कामांत सहभागी करून घेताना , घराची एक शिस्त असते , कसे बोलायचे , कसे वागायचे , कोणत्या वस्तू कुठे ठेवायच्या , त्या तिथे असल्याचे फायदे काय होतात , हे त्याला पटवून देण्यासाठी आणि त्यानुसार वागण्याचा यशस्वी आग्रह धरण्यामध्ये झाला . हक्क म्हटले , की कर्तव्ये आलीच , हे त्याला समजून सांगितले . त्यामुळे घर आपल्या तिघांचे आहे , तर ह्या गोष्टी आपण तिघांनीही केल्या पाहिजेत , हे त्याला पटवणे आणि कायम त्यानुसार वागण्याचा आग्रह धरणे सोपे झाले .

उदा. घरात आम्हा दोघांप्रमाणे सेम कपाटे स्वयमच्याही कपड्यांसाठी , पुस्तकांसाठी आहेत . ही गोष्ट त्याच्यात बरोबरीची , सुखावणारी भावना निर्माण करते . पण त्याच वेळी आता ही कपाटे आवरण्याची , नीटनेटकी ठेवण्याचीही जबाबदारी आपली स्वतःची आहे , याची जाणीव त्याला राहते आणि ती पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो .

आमच्याकडे नियम सर्वांसाठी सारखाच असतो . मग तो हॉटेलिंग फक्त प्रत्येकाच्या वाढदिवसाला आणि बाहेरगावी गेलो तर प्रवासामध्ये करायचे , हा असो , किंवा प्रत्येकाने सगळ्या भाज्या खाण्याचा असो , टी. व्ही. समोर बसून न जेवण्याचा असो , वस्तू जपून काळजीपूर्वक हाताळण्याचा असो किंवा एकमेकांशी खोटे न बोलण्याचा असो .
कुणीही आपल्या कामात मदत केली , तर आम्ही दोघे एकमेकांना म्हणतो तसे स्वयमलाही "थँक्स" म्हणतो . एखादी चूक झाली , तर आम्ही एकमेकांना आणि स्वयमलाही स्वतः चा अहंकार आड न आणता मनापासून 'सॉरी' म्हणतो . पुन्हा ही चूक रिपीट नाही करणार , याचे प्रॉमिस सुद्धा करतो . त्यामुळे स्वयमकडूनही आम्हाला अशा वागण्याची अपेक्षा आहे , हा न बोलता संदेश मिळतो त्याला आणि तो तसे वागतोही मग .

स्वयमचे सगळ्यात आवडते काम असते , ते म्हणजे आम्हाला रागावणे . त्यामुळे संधी मिळेल , तेव्हा एकमेकांना डोळे मिचकावून आम्ही तो आनंद त्याला मनमुराद उपभोगू देतो .

उदा. अमित त्याला सांगेल, "ही मम्मा बघ रे स्वयम , ऐकतच नाही . आज तब्येत ठीक नव्हती , तरी विणकाम करत बसली . आराम नाही केला बघ ."मग स्वयमराजे मनसोक्त मला रागावतात.

कधी मी सांगते, "बघ रे स्वयम , एवढ्या वेळा सांगून सुद्धा पपांनी हे काम केलेच नाही आजपण . तरी मी दुपारी पण आठवण केलेली हं त्यांना ऑफिस मध्ये फोन करून ."
मग स्वयमराजे लगेच पोक्त होतात . "अहो पप्पा... "असे म्हणून जी गाडी चालू होते त्याची , ती अमितने" हो बाबा , चुकले माझे , उद्याच्या उद्या करतो , "असे कबूल करेपर्यंत थांबत नाही .
मग दुसऱ्या दिवशी आमच्या चुका सुधारल्यावर आम्ही त्याला सांगतोही , "बघ स्वयम , आज केले बरंका हे हे . "

याचा फायदा असा होतो , की जेव्हा स्वयमकडून चूक होते आणि आम्ही त्याला रागावतो , तेव्हा त्याला तो त्याच्यावर अन्याय , अपमान वाटत नाही . तोही उलट उत्तर न देता शांतपणे आमचे ऐकून घेतो आणि चूक मान्य करून ती सुधारतो.

जर एखादी मोठी चूक झाली , किंवा एकदा समजावूनही परत तीच चूक रिपीट झाली , तर छोटी मोठी शिक्षा स्वयमला मिळते , तशी ती आम्हाला दोघांनाही असते . माझ्या साठी शिक्षा अमित आणि स्वयम मिळून ठरवतात . अमितसाठी मी आणि स्वयम मिळून ठरवतो तर स्वयमसाठी आम्ही दोघे ठरवतो . मिळालेली शिक्षा आम्ही प्रामाणिकपणे भोगतो . त्यामुळे आपोआपच मग ती चूक कुणीही पुन्हा रिपीट करत नाही .

या एकोप्याचा सर्वात मोठा फायदा आम्हाला स्वयमला आपले , लांबचे , जवळचे हे शिकवण्यासाठी झाला .

एकदा काय झाले , घरातील एक गोष्ट त्याने रविवारी तो माझ्या आईकडे जातो , तेव्हा तिला सांगितली . आम्हाला आईने त्यावर प्रश्न विचारल्यावर आम्ही सावरून घेतले , पण आम्हाला चांगलेच कानकोंडे व्हावे लागले होते तिच्यासमोर .

सोमवारी इकडे परत आल्यावर जेव्हा आम्ही " तू का सांगितलेस आईला? ", असे स्वयमशी बोलण्याचा प्रयत्न केला , तेव्हा त्याचे निरागस उत्तर होते , "पण का नाही सांगायचे? आई पण आपलीच आहे ना !"

2 मिनिटे आम्ही गोंधळून गेलो या उत्तरावर . पण मग न रागावता त्याला समजून सांगितले , "बरोबर आहे , आई आपलीच आहे . पण सगळ्या गोष्टी सगळ्यांना नसतात सांगायच्या . आता बघ , आपल्या फॅमिली मध्ये आपण 3 लोक आहोत . तुम्हाला स्कूल मध्ये सर्कल शिकवलंय ना , तसं असते हे . म्हणजे बघ , आधी आपल्या तिघांचे सर्कल . मग त्याच्या बाहेर आईबाबांचे , नाशिकच्या आजीचे सर्कल , मग त्याच्या बाहेर माझ्या बहिणींचे (म्हणजे तुझ्या दोन्ही माऊचे )आणि पपांच्या भावांचे (म्हणजे तुझ्या काकांचे )सर्कल . तशाच क्रमाने तुझा त्यांच्यावर हक्क आहे . त्यामुळे तुझ्यासाठी सर्वात जवळचे आणि हक्काचे आहोत आम्ही . आमच्यापासून कधीच काही नाही लपवायचे . काहीही हट्ट करायचा असला , तरी आमच्याजवळच करायचा . आमच्यानंतर क्रमाने बाकीचे लोक आहेत . काही काही गोष्टी ना , आपल्या फॅमिली च्या सिक्रेट असतात , त्या कुणालाच नसतात सांगायच्या . फक्त आपल्या वर्तुळापुरत्याच ठेवायच्या . तुम्हाला शाळेमध्ये म्हण शिकवलीय ना, "झाकली मूठ सव्वा लाखाची ", तसे !
म्हणजे आपले प्रॉब्लेम्स , आपली भांडणे , महत्वाच्या गोष्टी कुण्णाला नसतात सांगायच्या ."
बराच वेळ लागला आम्हाला त्याच्या भाषेत समजवायला.

तो लक्षपूर्वक ऐकत होता . मग शेवटी म्हणाला , "अच्छा , असे असते का? म्हणजे हे आपले "प्रमिती "सिक्रेट तर !"
आम्ही दोघे एकदमच उत्तरलो, "बरोब्बर , आपले प्रमिती सिक्रेट !"

तेव्हापासून कोणतीही महत्त्वाची किंवा इतरांना कळू न देण्यासारखी गोष्ट असेल , तर आम्ही तिघे फक्त खुणावतो एकमेकांना , "प्रमिती सिक्रेट आहे हं "...
मग बिलकुल सांगत नाही स्वयम कुणाला . अगदी माझ्या बहिणींनी खोदून विचारायचा प्रयत्न केला , तरी फसत नाही .

आपल्या वेळी जसे होते, पालकांनी जे सांगितले, ते मुलांनी गुपचुप ऐकायचे... तसे आपण आपल्या या मुलांसोबत नाही वागू शकत . का, कशासाठी यांची समाधानकारक उत्तरे या पिढीला हवी असतात . आणि मला मनापासून असे वाटे , की रागावून, जबरदस्तीने स्वयमला काही ऐकायला लावण्यापेक्षा त्यामागची कारणमीमांसा त्याला पटवून दिली , तर तो मनापासून ऐकेल . त्यामुळे मम्मीपप्पा म्हणून मिळालेल्या निसर्गदत्त अधिकाराचा वापर करून डायरेक्ट ऑर्डर सोडण्यापेक्षा "असे करूया आपण , तसे केले तर काय होईल रे? "या मोड मध्ये कायम वागलो. आणि त्याचे सकारात्मक फायदे आम्हाला जाणवले आहेत . निर्णयप्रक्रियेत सहभाग असल्याने घरातील वस्तू तो जपून वापरतोच, शिवाय काळजी पण घेतो त्यांची . शिवाय हळूहळू त्यांची निर्णयक्षमता वृद्धिंगत होते आहे . त्याचा आत्मसन्मान आम्ही जपतो , हे जाणवल्याने तो सुद्धा आमच्याशी , इतर मोठ्यांशी आदरपूर्वक वागतो . आमच्यातील मैत्रीचे नाते छान फुलले , हळूहळू बहरते आहे . आगामी काळात या मैत्रीचा आणि विश्वासाचा डेरेदार वृक्ष होईल आणि त्याच्याच सावलीत स्वयमच्या तारुण्याच्या वाटेवरचे अपरिहार्य प्रश्न सुलभपणे सुटतील, अशी आशा आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिज्ञासा, exactly.
परेटिंगचा धागा असूनही त्या किती भारी हे त्यांनी स्वतः बद्दल म्हणाले नाही. तरीही त्या फुशारक्या मारत आहेत असं काहींना वाटतंय.

त्यांनी तुलना केली नाही. सर्व प्रश्नांची नीट उत्तर दिली आहेत. तरीही त्यांना विनाकारण नावं ठेवली जात आहे की नीट उत्तरे दिली नाहीत किंवा खोचक दिली.
असो.

नादिशा मायबोली सोडण्याचा निर्णय का ??? लोकांचा तुमचा लेखावरून वेगळा समज झाला म्हणून ? तुम्ही जे लिहिले त्यातलं जे आवडले त्याचा मी तरी उल्लेख केला आहे. दुसरी गोष्ट , मिश्र प्रतिक्रिया येणार ना? मला जो गिल्ट आला तो मी उघड पणे मंडला आणि मला सीमंतिनी यांचे म्हणणे पटले पण.
ज्यांना लेख आवडला ते आवडला म्हणाले. ज्यांना नाही आवडला ते नाही म्हणाले यात चुकले कुठे? चर्चा व्हावी असे म्हणता आणि चर्चेची दारे पण बंद करता.
१० पैकी ५ लोकांनी जरी तुमच्या लेखावरून वेगळे वाटते आणि तुम्हला जे वाटते तसेच पोहोचत नाही असे सांगितले तर त्यात वाईट वाटण्यासारखे काय?
मला असे वाटले कि तुम्हाला जरा लिखाणाकडे तठस्थ पद्धतीने बघण्याची गरज आहे. लोक असे का म्हटले याचा विचार करा. याच करता आमच्या सारखाने वाचनमात्रास राहावे हेच उत्तम.

नादिशा, सोडून जायचा निर्णय जमल्यास फेरविचार करा. ही लेखमाला चांगली आहे पण ह्याचे 'टायमिंग' निश्चितच चुकलेले आहे. मूळात मुलगा मोठा झालेला नाही अजून त्यामुळे ह्या गोष्टींचा सर्वंकष परिपाक समोर आलेला नाही उदा: जसं प्रमिती सिक्रेट आहे तसं तो आजीबरोबर त्रिमिती का काही सिक्रेट ठरवूच शकतो. तो तसं करत नाही, आजी करत नाही इ ही तुमची धारणा झाली. एकदा 'सिक्रेटस आर ओके' हे झालं की तो कुठल्या सर्कल मध्ये काय सिक्रेट ठेवेल ह्यावरचा तुमचा कंट्रोल गेलेला आहे. भलंच होवू दे त्याचं आणि तुमचं ही इच्छा असल्याने अधिक नाही लिहीणार. पण इथे लिहीण्यापूर्वी तो मोठा होण्याची वाट बघायला हवी होती. सध्या हे सगळं प्रीमॅच्युअर आहे.
दुसरे असे की तुम्ही जे केलेत ते आदर्श परिस्थिती असताना घडले. आता करोनामुळे घराघरात बदल घडले आहेत. नोकरी जाणे, नोकरीत बदल इ इ अनेक कारणांनी पालक वैतागलेले आहेत. हे वैतागणे पालकत्व कींवा तुमच्यावर नाही. एकूणच परिस्थिती अवघड आहे. मायबोलीवर येतो ते जरा टाईमपास व्हावा म्हणून. मग सातत्याने असे पालकत्वाचे धागे दिसले की माणूस डोकावणारच. अवेळी आलेल्या पावसाचे अप्रूप नसते उलट पापड ओले झाले म्हणून राग असतो तसं काहीसं झालं आहे. ह्यात तुमची वा वाचकांची चूक नाही. लिहीत रहा. पण जरा काळाने (सुमारे ५-१० वर्ष) हे सगळं प्रकाशित करा. सब बढीया है!! सोडून द्या राग नि या परत.

सॉरी पण आता मला असे वाटतेय की आधी जे वाटले तेच बरोबर असावे , एक डॉक, एक इतक्या चांगल्या आई असणाऱ्या व्यक्तीने तडकाफडक असा निर्णय घेणे माझ्या आधीच्या मताला दुजोरा देतोय. मुलांना घडवणे हे तर कितीतरी पेशन्सचे काम आहे.

असो

बाय, टेक केअर☺️

सीमंतिनी, +१
प्रतिसाद देताना आपण कुणाला जज तर करत नाही आहोत ना एवढे लक्षात ठेवून प्रतिसाद (मग तो टीका करणारा असला तरी) दिल्यास गैरसमज होणार नाहीत. आजकाल मायबोलीवर लोकांना जज करण्याचे प्रमाण वाढले आहे असं वाटतंय Wink .

आजकाल मायबोलीवर लोकांना जज करण्याचे प्रमाण वाढले आहे असं वाटतंय >> +१११११

मी म्हणतेय तेच बरोबर हा हेका पण वाढलाय. समोरच्याची बाजू समजून घेणे होतच नाहीये. असो.

नादिशा, लिहीत रहा Happy

मला वाटते सहनशिलता कमी झालीये. हल्ली लेखकांना फक्त छान छान प्रतिसाद अपेक्षित असतात. हे मी फक्त नदिशा यांना म्हणत नाहीये. पण माझे निरीक्षण सांगतीये. त्यात एक दोन करत नकारात्मक प्रतिसाद वाढले की मी चाललो किंवा मी चालले माबो सोडुन हे प्रकार सुद्धा वाढलेत.

<<< मी म्हणतेय तेच बरोबर हा हेका पण वाढलाय. समोरच्याची बाजू समजून घेणे होतच नाहीये. >>> हे दोन्ही बाजुना लागु पडते. ईथेही चर्चा होत होती पण लेखिकेने सोपी पळवाट पकडली. त्यांच्या बाजुने तर बरेच जण होते मग काही मोजक्या प्रतिसादाने ईतके व्यथीत कशाला व्हावे. त्या स्वत: डॉक्टर आहेत, त्यांचे लेखही प्रगल्भ असतात त्यामुळे मला वाटले होते की नकारात्मक पण प्रामाणिक प्रतिसाद त्या पॉझिटिव्हली घेतील. पण झाले ऊलटेच

वर कुणीतरी लिहीलेय की असे वाढवलेले मुल त्यांनी पाहिलेय म्हणुन त्यांना ह्यांचे लेख पटतात. माझ्या बाबतीत एक ओळखीचे कुटुंब आहे ज्यांनी अगदी ऊलट केलेय. माझा मुलगा कसा सर्वगुण संपन्न आहे हे दाखवायच्या नादात मुलाला पार दडपुन टाकले. अकाली प्रौढत्व काय असते ते कळते त्याला पाहीले की. वय माहित नाही पण आता चौथीला आहे पण मुलांमध्ये निट खेळताही येत नाही त्याला कारण अर्ध्यातासात घरी गेलो नाही तर काय होईल ही भिती. मुलाने सगळेच शिकले पाहीजे हा पालकांचा हट्ट. अगदी बघा मी कशी माझ्या मुलाला स्वयपाक पण शिकवला आहे ही फुशारकी असते त्याच्या आईची.
असो,

टायगर मॉम पुस्तक पण वाचून घ्या. आणि हेलिकॉप्टर पेरेंटिंग पण.

@अमा, तुम्ही सांगितलेली सगळी पुस्तके वाचलेली आहेत मी.
>>

नादिशा, मी पण वाचनवेडा आहे. अमा यांनी सुचवलेली ही दोन पुस्तके मला अ‍ॅमॅझॉन वा इतर साइटवर सापडत नाहियेत. बहुतेक पुस्तकाचे नाव नेमके हे नसावे. तुम्ही वाचली आहेत म्हणून विचारतोय; या दोन पुस्तकांचे एक्झॅक्ट नाव व लेखक/लेखिका कोण आहे ते सांगाल का? म्हणजे मलाही वाचायला मिळेल.

नादिशा लिहीत राहा Happy
प्रतिसाद आणि चर्चा कशीही झाली तरी लिहिणे सोडू नका, माझ्यासारखे नियमित वाचक आहेत, सगळेच जण प्रतिसाद देत नाहीत.
आंतरजाल आहे हे, ह्याला seriously घ्यायचं नाही, chill

हिर्‍याला पैलु पाडून त्याचे दागिने बनवणार्‍यांपेक्षा, एखादा ओबडधोबड दगड घेऊन त्यातून सुंदर शिल्प/ कलाकृती किंवा काहीतरी गृहोपयोगी वस्तू जे लोक निर्माण करू शकतात त्यांचे मला जास्त कौतुक वाटत नेहमीच.

नवीन Submitted by टवणे सर on 23 October, 2020 - 11:13 >>>>>

Battle Hymn of the Tiger Mother ---- by Amy Chua ( टायगर मॉम )

Helicopter Mom: Stop Hovering Over Your Children and Lift! ---- by Bethany L. Douglas (हेलिकॉप्टर पेरेंटिंग)

तिथेच ही पण सुचवलीत --
Momaholic: Crazy Confessions of a Helicopter Parent ----- by Dena Higley (Author), Amy Rubinate (Narrator)

The Overparenting Epidemic: Why Helicopter Parenting Is Bad for Your Kids . . . and Dangerous for You, Too! ---- by George S. Glass M.D. (Author), David Tabatsky (Author)

मुलांना काय शिकवायचे यापेक्षा ....कसे शिकवले .... ते महत्त्वाचे माझ्या मते.
या गोष्टी पालक-पाल्य केसगणिक + प्रसंगागणिक वेगळ्या असतात.
पालक + पाल्य१, पाल्य२ गणिक सुद्धा.
कुणालाच कुणाचेच उदाहरण जसेच्या तसे लागू पडत / आदर्श ठरत नाही.
ज्याने त्याने आपल्या तारतम्याने, आपला नग पाहून, करायचे असते काय ते.

Love with discipline and discipline with love, हे वाचले होते ते मला माझ्यापुरते पटते.

आणि, पेरलेली प्रत्येक गोष्ट मुलात उगवतेच असे नाही. मूल स्वतः एक जिवंत निर्णयक्षम अस्तित्व असते.
आपण फीड केलेली माहिती ते पुढे प्रोसेस करतेच. बिनबोभाट करणे / बंडखोरी / काहीकाहीच गोष्टी करणे या पद्धतीने ते अमलात आणते.

आपल्या संस्कार बीजाइतकाच मुलाच्या मनाच्या मातीचा कसही मॅटर करतो. दारूड्या वडिलांची अभावग्रस्त मुले सद्गुणी निपजूच शकतात. आणि सगळ्या सुखसुविधा आहेत, आईबाप सद्गुणी आहेत अशी मुले अपेक्षेपेक्षा कमी प्रज्ञावंत निघू शकतात.

पण पुस्तक/लेख वाचनातून काय करायचे / करायचे नाही याची हिंट घेऊ शकतो आपण; फेरफार करून वापरू शकतो. बाकी सोडून द्यायचे.
झाले एखाद्याचे अपत्य अकाली प्रौढ / अष्टपैलू पालकांच्या ट्रीटमेंटमुळे आपल्याला काय नफानुकसान आहे?

त्यातही प्रत्येकाचा दृष्टीकोन असेलच. आपण अकाली प्रौढ म्हणू तर त्याचे पालक त्यालाच परिपक्व, संतुलित विचारांचा म्हणतील. आपण अष्टपैलू म्हणू तर दुसरे कोणी अतिमहत्त्वाकांक्षी, रॅटरेसमध्ये धपापणारा म्हणतील.
आपण आपले मूल, त्याचे विचार भावना कसे, किती सूज्ञपणे हाताळतो हेच आपल्यापुरते निर्णायक.

बाकी जो तो आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास, प्रतिक्रिया देण्यास स्वतंत्र आहे. हे माहीत असते, मान्यही असते. पण कुठे थांबायचे हे न कळल्याने / कधी त्यावर नियंत्रण न राहिल्याने मग कटुतेच्या छटेसह गोष्टी संपतात.

धन्यवाद सीमंतिनी आणि कारवी.

मला नादिशा यांच्याकडून ऐकायला आवडेल त्यांनी यातले कोणते वाचले आहे व त्याबद्दल त्यांना काय वाटते.

सॉरी पण आता मला असे वाटतेय की आधी जे वाटले तेच बरोबर असावे , एक डॉक, एक इतक्या चांगल्या आई असणाऱ्या व्यक्तीने तडकाफडक असा निर्णय घेणे माझ्या आधीच्या मताला दुजोरा देतोय. मुलांना घडवणे हे तर कितीतरी पेशन्सचे काम आहे.
>> पेशन्स कोणाबद्धल दाखवायचा हे महत्वाचे...
त्यांनी मुलाबद्धल पेशन्स दाखवला असेल, इथे लोकां बद्धल कशाला पेशन्स दाखवतील.. त्यापेक्षा बरीच इतर कामे असू शकतात...

नादिशा योग्य निर्णय...
पण यापेक्षा चांगला निर्णय म्हणजे तुम्ही नुसते लेख लिहा, प्रतिसाद प्रतिक्रिया देऊ नका...

नादिशा,
मायबोली हे कुटुंबासारखे आहे, इथे टिंगलटवाळी होते त्याचप्रमाणे गंमतजंमत पण होते. जास्त मनावर घेऊ नका. तुम्हाला एक आयडिया सांगतो, ज्याने तुमचे म्हणणे पण अबाधित राहील. एक डुप्लिकेट आयडी काढा. ( मदत लागली तर इथे त्याबाबतीतपण मदत मिळेल.)

मी वेळेअभावी सर्व लेख / प्रतिक्रिया संपूर्ण वाचत नाही, मलाही काही पटतं काही पटत नाही, काही काही बाबतीत तर असं जाणवतं की अरे आपण या बाबतीत कधी विचारच केला नाही . कधीकधी एखाद्या बाबतीत काहीच मत नसणेही चालून जाते ☺️

Parenting बद्दल बोलण्यास मी या विषयात (शिक्षण/अनुभव नी) तज्ञ नाही पण मी पाहिलेलं माझ्या आई वडिलांने माझ व माझ्या भावंडांचं केलेलं , माझ्या मामा/आत्या/ भावंडांनी/मावश्यानी (त्यांना तर parenting हे शब्द माहितही नसाताना)त्यांच्या मुलांचं व मी माझ्या मुलांचं जे करतेय ते , या सर्वांमध्ये खूपपप फरक आहे तरीही माझ्या पालक ंंनी केलेलं ते बरोबरच इतर चूक असं नक्कीच नाही, outcome काही वर्षांनी समजेल अशी आशा करू आणि बरोबर चूक किंवा त्या मधील कुठलीतरी स्थिति हे सुद्धा व्यक्ति , परिस्थिति व काल सापेक्ष असतं. प्रत्येकाचे स्वत:चे असे अनुभव असणार, लेखिका ही असेच अनुभव शेअर करतेय तर करू द्यावं

@लेखिका
चांगलं लिहित आहात की, सोडून कशाला जायचं
सर्वांना सर्व पटेलच किंवा पटणारच नाही असं नाही.
फोरम वर लिहिलं की अनुकूल , विरोधी, तटस्थ इ सर्व प्रकार व mild ते अगदी टौकाच्या रेंज मधीँल प्रतिक्रिया यायच्याच. अगदी शिक्षणही काढले जाते! असही दिसून येतं की relax mood मध्येphone वर लिहिलेला प्रतिसाद आणि प्रत्यक्ष प्रसंग आल्यावर केलेली क्रृती यात तफावत असू शकते. म्हणून कुणी काही लिहूच नाही असं नाही ना (अशास्त्रीय गोष्टी/अफवा / अपमान सोडून)
लेखक व वाचकाची विचारधारा ,मनस्थिति, परीस्थिती वेगळी असू शकते व तद्नुसार interpretation ही ! . प्रत्येकजण आपल्याला लागू होईल तसे करातो. त्यामुळे तुम्हाला लिहावंसं वाटलं तर लिहा , it will be a learning experience for u too

खूप मोठा वविस्कलित झालाय ््तिसाद!

मी आतापर्यंत प्रतिसाद द्यायचं टाळल. जातीचे कलावंत, लेखक, नाटककार वा इतर कलाकार स्वत:वर टीका झाली म्हणून काम करणे सोडून देत नाहीत. परवाच एका मराठी पण हिंदीतील प्रतीतयश अभिनेत्रीची मुलाखत ऐकली. तिने सांगितले कि ऐन उमेदीच्या काळात; प्रसिद्धीच्या शिखरावर असताना पराकोटीची टीका झाली. पण तिने आपल्या कामाने उत्तर दिले. कित्येक लेखकांवर त्यांची पुस्तके परत घ्यायची पाळी आली तरी त्यांनी लेखन सोडले नाही.

त्यामुळे मला हेच समजत नाही आहे की आपण टीकेला सामोरे न जाता न लिहिण्याचा पर्याय निवडणार्या लेखकांना का महत्व देत आहोत? मुळात ह्या लेखावर तर टीकाही झालेली नाही. केवळ काही लोकांनी त्यांची व्यक्तिगत मते व अनुभव मांडली तर लेखिका फारच व्यथित झाल्या. हल्ली आंतरजालावर मायबोलीसारखे (व इतरही) मोफत माध्यम लेखकांना उपलब्ध झाल्याने मनात आले तेव्हा लिहिता येत. त्यांमुळे त्यांना पूर्वीच्या लेखकांसारखा संघर्ष करावा लागत नाही, आणि म्हणून आंतरजालावरील मोफत माध्यमांची किंमत नाही. एखाद्या धुमकेतुसारखे अनेक लेखक मायबोलीवर प्रकट होतात आणि झंझावाताप्रमाणे निघून जातात. पण त्यामुळे मायबोली थांबली नाही, अव्याहतपणे २५ वर्षांपासून कार्यरत आहे.

@जिज्ञासा ताई , मुलांनी हसत -खेळत मजा मस्ती करत राहणं हा तर त्यांचा मूलभूत हक्कच आहे. पण जर त्याला लहानवयातच जबाबदारी म्हणजे काय हे कळत असेल तर तो मोठेपणी खरंच किती संयमीत मुलगा /मुलगी असेल. जर एका प्रौढ व्यक्तीमध्ये पोरकटपणा असू शकतो तर मग एका निरागस लहान मुलामध्ये जबाबदारीची जाणीव का नाही असू शकत ? नाहीतरी किती पालकांच्या मुलं मोठी झाल्यावर तक्रारी असतात - आमच्या हिला नं अजिबात व्यवस्थितपणा नाही. किंवा एवढा मोठा झाला तरी जबाबदारीची जाणीवच नाही इत्यादी इत्यादी ..... अर्थात हे माझं मत.
@नादिशा ताई , प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीचा उल्लेख झाला तेव्हा थोडं खटकलं . पण पुढचं वाचल्यावर खूप आनंद झाला. आमच्या गावामध्ये १ -२ जी माणसं आहेत तीच फक्त प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या वापरतात . गेले २-३ वर्ष त्यांना पटवण्याचा प्रयत्न करतो आहे. आता त्यावर छान उपाय सापडला -स्वयम ला आमच्याकडे पाठवा . Happy

तुम्हांला सर्व गोष्टी रूल्स ठरवून करणे आवडत असावे. तुमच्या घरी सर्वांना ते पटत असेल तर छानच. तुम्हांला शेअर करायला आवडत असेल तर तुमची पद्धत approve न करणाऱ्या प्रतिसादांमुळे लिखाण थांबवू नका.

सहजीवन विषयावरचा लेख ही असाच ते किती परफेक्ट पिक्चर सारख तुम्ही केलं आहे हे दाखवणारा वाटला होता हेमावम.

तुम्हांला सर्व गोष्टी रूल्स ठरवून करणे आवडत असावे. तुमच्या घरी सर्वांना ते पटत असेल तर छानच. तुम्हांला शेअर करायला आवडत असेल तर तुमची पद्धत approve न करणाऱ्या प्रतिसादांमुळे लिखाण थांबवू नका.

सहजीवन विषयावरचा लेख ही ते किती परफेक्ट पिक्चर सारख तुम्ही केलं आहे हे दाखवणारा वाटला होता हेमावैम.

जर एका प्रौढ व्यक्तीमध्ये पोरकटपणा असू शकतो तर मग एका निरागस लहान मुलामध्ये जबाबदारीची जाणीव का नाही असू शकत ? >> मृणालिनी, नक्कीच असू शकते. पण मग तो त्या मुलाचा किंवा मुलीचा गुणस्वभाव आहे आणि अशा मुलांच्या पालकत्वाला काटेरी म्हणणं हा त्या मुलावर अन्याय आहे असं मला वाटतं. रादर पालकत्वाला काटेरी म्हणणं हे मला खटकतं आणि हे मी या मालिकेच्या पहिल्याच लेखावरच्या प्रतिसादात सुचवलं होतं.

नादिशा, मी हळू हळू तुमचे लेख वाचतेय. तुमच्या मुलाने काढलेली चित्रं बघितली आणि लिंक मधल्या विडीओ क्लिप्सही बघितल्या. खूप गुणी आहे तुमचा मुलगा. दिसतोही खूप निरागस. इथे प्रतिसादातून विरोधी सूर उमटला म्हणून मायबोली सोडून नका जावू. मूल वाढवायचा काही साचेबद्ध फॉर्म्युला नाही. प्रत्येक मूल युनिक. आईबाबांची एका मुलासाठी योग्य ठरलेली पद्धत दुसर्‍या मुलासाठी कुचकामी होते. इथे तर एवढे वाचक. मतमतांतरे असणार. जी मंडळी प्रश्न उपस्थित करत आहेत, शंका व्यक्त करत आहेत ते तुमच्या मुलाचे भले व्हावे या भावनेने आहे . त्याकडे थोडं सकारात्मकतेने बघा. मायबोली एखाद्या कुटुंबासारखे नाही तर त्याहीपेक्षा खूप अधिक आहे. एका धाग्यावर विरोध करतील तर दुसरीकडे त्याच व्यक्तीला प्रत्यक्ष ओळख नसताना पटकन मदतीचा हातही देतील.

माझे म्हणाल तर मला 'काटेरी मुकुट ' हेच आवडले नाही. सामान्य परीस्थितीसाठी एकदम इतके टोकाचे शब्द. ती वेदना फार वेगळी. मान्य आहे तुम्ही खूप जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहात, पण तुमचा गुणी लेकही तितकीच छान साथ देतोय की! गोड आहे लेकरु. हे दिवस फार भरभर सरतात तेव्हा एंजॉय करा.

>>मला स्वाती2 चे यावर मत वाचायला आवडेल.>>
आम्ही दोघे 'गुणी बाळ' नव्हतो आणि आमचा लेकही नव्हता. मात्र 'चोराच्या वाटा....' असे असल्याने त्याने लिमिट पुश केले की आम्हीही तह-शह-काटशह करत सीमारेषा लढवायचो. मी मीन मॉम होते आणि आहे. त्याला वाढवताना आमच्या नात्यात आदर, विश्वास, मोकळेपणा, मैत्र असले तरी मी त्याची त्याच्या वर्गातल्या मैत्रीणीसारखी मैत्रीण नव्हते. आईच होते. त्याचा हक्काचा विसावा आणि सेफ्टी नेट होते. तो आणि त्याची मैत्रीण, त्यांचे लोचे झाले की हक्काने माझी मदत घ्यायचे . भले आई प्रिविलेजेस काढून घेइल पण माझी टीम सोडणार नाही ही खात्री त्याला होती.

माझा लेक स्वकियांपासून दूर मिड वेस्ट मधल्या एका लहान गावात वाढला. सुरवातीच्या काळात कौटुंबीक अस्थिरता होती. मुळात बाळच प्लॅन करुन नव्हते. आईबाबा कामाला आणि तो ट्रेलरपार्कमधल्या पाळणाघरात, बाबा परदेशात , तो आई सोबत भारतात- तिथे आई अर्धा दिवस शिकायला बाहेर आणि तो आजी आजोबांसोबत घरी , पुन्हा तिघं एकत्र आलो तरी आई दिवसभर घरी आणि बाबा १४ तास ऑफिसात यात बरेचदा विकेंडही आले, जोडीला बाबा कामासाठी देशात परदेशात फिरतोय असेही होते. आजूबाजूला जशी मध्यमवर्गी चौकोनी कुटुंबं होती तशाच ब्लेंडेड फॅमिलीज होत्या. एकल मातृत्व/पितृत्व, डिवोर्स, विजीटेशम, जुवेनाईल जस्टिस सिस्टीम हे सगळे आजूबाजूला होते. आमचे कुणाचेच जगणे आदर्श नव्हते. काहीसे मेस्डअपच होते. परदेशातच स्थाईक व्हायचे हा निर्णय झाला तेव्हा एक मात्र दोघांनी पक्के ठरवले होते. - मुलाला त्याचे जे काही फुल पोटेंशिअल आहे तिथे पोहोचायला मदत करायची . मुलगा शक्य तितका चांगला माणूस व्हावा आणि वेळ आलीच तर १८ व्या वर्षी इथल्या इतर मुलांसारखा स्वतःचे वेगळे घर करण्याइतका सक्षम व्हावा, इथे मिसळून जावा असे आमचे ध्येय होते. त्यासाठी घरापासून दूर रहाणार्‍या आम्हाला सर्वांनी खूप मदत केली. यात फॅमिली डॉक्टर पासून इंशुरन्स एजंटच्या ऑफिसातली सेक्रेटरी आणि प्रीस्कूल टिचर पासून , ताय क्वान डोच्या क्लासमधले कोच पर्यंत बरेच जण होते. मित्र मैत्रीणींचे पालक, पिटीओतले आईबाबा होते. सल्ला द्यायला नवर्‍याच्या प्लांटमधे तासावारी काम करणारे कामगार होते आणि कॉपिटिटर कंपनीचा सीईओ ही. त्याला मेंटरिंगसाठी मोठी माणसे होती तसेच सिनियर मित्रही होते. आमची इथली एक्सटेंडेड फॅमिली झालेले इतर देशी मंडळी- लेकाची आजी, काका, मावश्या, दादा-ताई यांनीही खूप साथ दिली.
आता माझा मुलगा स्वतंत्र रहातो. अजुनही बरेचदा आम्ही पालक आणि तो लेकरु असेच आहे. मात्र अधून मधून रोल्स बदलतातही. हळू हळू ट्रान्झिशन सुरु झालेय.

त्यामुळे मला हेच समजत नाही आहे की आपण टीकेला सामोरे न जाता न लिहिण्याचा पर्याय निवडणार्या लेखकांना का महत्व देत आहोत? >> Happy त्यांना पर्याय निवडायचं स्वातंत्र्य आहे, माझ्यासारख्या अनेकांना त्यांना महत्त्व द्यायचे स्वातंत्र्य आहे, नि तुमच्यासारख्या अनेकांना असे प्रश्न विचारायचे स्वातंत्र्य आहे म्हणून... आहे स्वातंत्र्य, करा हवं ते... Happy
तुमचा मुद्दा समजला, पण आपण कुठून जायचा निर्णय घेतल्यावर कुणी या परत म्हणणे तसे सुखावह असते. जायच्या निर्णयावर ठाम राहिल्याच तर मायबोलीवर त्यांची शेवटची आठवण सुखावह ठरावी म्हणून हलकासा प्रयत्न...
(आपण मी जाते म्हणावं आणि लोकांनी थँक्यू म्हणावं या भयापोटी मी इतके दिवस आहे मायबोलीवर Wink )

स्वाती२ प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मला एखाद दोन जेन्युईन प्रश्न आहेत. पण लेखिकेने दुसऱ्या एखाद्या प्लॅटफॉर्मवर लिहिण्याचे ठरवले असताना इथे अजून विषय चर्चा मला नको वाटते. नंतर कधीतरी.

Pages