छोटीसी आशा

Submitted by किल्ली on 25 September, 2020 - 12:10

माझी ना, खूप दिवसांपासूनची तमन्ना(हो, तमन्नाच!) आहे. मस्त निवांत दिवस असावा. कसलीही घाई, गडबड, गोंधळ नसावा. सकाळी ११-१२ वाजेपर्यन्त जाग आली तरी लोळत पडून राहावे. मग धांगडधिंगा वाली आधी, नंतर रोमँटिक गाणी लावून माहोल बनवावा. ही गाणी ऐकतच आन्हिकं उरकावी. एक तासभर अंघोळ करावी. महत्वाचं म्हणजे मी घरात एकटी असावी. कांदेपोहे करण्याचा सुद्धा कंटाळा आलेला असावा. मग loose loose comfy कपडे (जे लोकांच्या लेखी जुना -पुराना कळकट, बळकट असतात. एरवी मी घातले तर काय मेलं दरिद्री लक्षण असे तु. क. येतात) अंगावर असूनसुद्धा कसलीही तमा न बाळगता खाली टपरीवर जाऊन इडली सांबार, पोहे वगैरे ऐवज चापावा. मग तिथल्या भैयाला सांगून अद्रक वेलची वाली कडक पेशल चाय (चहा नाही!) घोट घोट हातात काचेचा पेला धरून प्यावी.

तिथल्याच किराणा दुकानात जाऊन चिप्स, मुरमुरे, भेळ,कुरकुरे , सोया स्टिकस वगैरे गोष्टी पिशवीभरून घ्याव्यात. त्यात ते मसालावाले तिखट चीझ बॉल , आचारी त्रिकोण आणि असंच काहीबाही असलंच पाहिजे. इच्छा झालीच तर readymade इमली चटणीचे पाकीट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे maazaa ची मोठी बाटली. हे सगळं घेऊन घरात बेडरूमध्ये यावे. खाऊची पिशवी बेडवरच ठेवावी. मोबाइल, चार्जेर , खाऊ ओतायला काचेचाच बाउल वगैरे सगळं घेऊन बसावे. इअरफोन्स भिरकावून द्यावे. थोडा वेळ नुसतेच लोळावे.

मग मोबाईलवर एखादा कितीतरी वेळा पाहिलेला टुकार कॉमेडी किंवा भन्नाट कॉमेडी कौटुंबिक असा कुठलाही स्टोरी माहिती असलेला सिनेमा लावावा. संबंध दुपार लोळत चिप्स, गोड गोड माझा किंवा फ्रुटीचे घोट(ते orange pulp असलेलं एक ड्रिंक असतं, आठवलं मिनिट मेड ते मिळालं तर उत्तम ) घेत आणि इतर खाऊ खात, सिनेमा , वेब सिरीस , influencers चे विडिओ पाहत घालवावी. इतके रममाण होऊन जावे की अंधार पडलेला सुद्धा लक्षात येऊ नये. मग कंटाळून उठून दिवा लावावा.

जरा उड्या माराव्या , कोचावर, गादीवर वगैरे, वेडेवाकडे नाचावे आणि फिरायला मोबाइलला घरी चार्जिंगला लावून बाहेर पडावे. काही चकरा मारून झाल्या की उगीच बसून राहावे दिवास्वप्न पाहत! मग घरी जावे. जरा रात्र झाली की पिझ्झा, बर्गर वगैरे मंडळींना आवताण द्यावे, त्यांचा समाचार घेऊन नागीण सिरीयल बघत बघत निद्रादेवीच्या अधीन व्हावे!!

बस इतनासा ख्वाब है!

हे स्वप्न मी तुकड्या तुकड्यात सुद्धा जगायला तयार आहे.

आणखी अशी बरीच स्टुपिड 'आशाए' आहेत. पुन्हा कधीतरी लिहीन.

तुम्हीही लिहा तुमचे कुठली अशी स्टुपिड तरी हवीहवीशी इच्छा आहे?
येऊ द्या! कदाचित लिहूनही बरंच बरं वाटेल. जसं मला आता वाटत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळी उठावे. ऑफिसला जावे. दिवसभर काम करावे. काहीतरी अचीव करून संध्याकाळी आनंदाने घरी यावे. बस्स!
हो. स्टुपिड आहे पण सध्याच्या काळात हीच छोटीसी आशा आहे.

तुम्ही छान लिहिलेय.
पुलं देशपांडे एका मुलाखतीत म्हणाले होते "माझं आयुष्य म्हणजे एक दीर्घ सुट्टीचा काळ आहे असे मला कधीकधी वाटते"
ते आठवले.

अतुल, माझे अगदी उलट आहे, मला wfh किमान पुढची दोन वर्षे संपूच नयेत असे वाटते.
आधी सकाळी 7 ची ट्रेन पकडायला लागायची, हल्ली सकाळी 9 पर्यंत लोळत पडते

माझी फँटसी आहे भारतवारीची. केरळ-बँगलोर-कन्याकुमारी-बेल्लूर हळेबिड. आहाहा. बरोबर बाबा, भाऊ, वहीनी, भाचा आणि अर्थात नवरा व मुलगी. मस्त विमानाने फाईव्ह स्टार हॉटेलात येणे जाणे. तोशिस नको. मस्त भटकायचं, खायचं प्यायचं. पर्यटन करायचं. देवळं, शिल्पं, निसर्गसौंदर्य.

VB हो खरे आहे. तुमच्यासाठी वरदान ठरलेय एका अर्थाने हे चांगलेच आहे.
एकेकाळी wfh ला मी सुद्धा आसुसलेला असे. पण हे जरा अतीच झालेय या वर्षी.

किल्ली तै, भारिये
कोरोना यायच्या आधी माझं आयुष्य असंच चाललेलं..
लास्ट इयर असल्यामुळं जास्त विषय पण नव्हते दोन्ही सेमिस्टरला. त्यात शुक्रवारी एकच तास असायचं कॉलेज अन् शनिवार, रविवार सुट्टी.
दिवस सगळा बोंबलत फिरण्यात जायचा.. संध्याकाळी खाऊ गल्लीत जायचं, जे परवडेल ते खायचं, परत हिंडायचं.
संध्याकाळी मग सगळे मित्रमैत्रिणी दरबारात जमायचो. (आमच्या कॉलेजमध्ये राजवाडा आहे Wink ) सबमिशन, प्रोजेक्ट सगळं एकत्र बसून चाललेलं असायचं. एखाद्या दिवशी नदीवरच्या गणपती मंदिरात जायचो.

किल्ली, अगदी माझ्या मनातलं बोललात! हे सगळेच केले आहे नि पुन्हा करायला सुद्धा कचरणार नाही! खूप बरे नि छान वाटते असे मनाप्रमाणे जगायला! आता सोपे झाले आहे कारण घरात मुलं नाहीत आणि छोट्या नातीला मुलीच्या घरी जाऊन सांभाळायचे असते. त्यामुळे एखाद्या रविवारीच असा प्रोग्राम असतो. लिहित रहा! पुलेशु!

मला किमान २ दिवस तरी सुट्टी हवी आहे. कोणीच नको घरात. आरामात झोपायचंय. सगळ्यांंच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळायचं टेन्शन नाही. हवं तेव्हा हवं ते करून खायचं. पसारा अजिबात आवरायचा नाही. टीव्हीसमोर लोळत पडायचं नुसतं. फोनवरसुद्धा कोणाचा डिस्टर्बन्स नको.

हे स्वप्न लॉकडाऊनमुळे, जास्तच हवहवंसं वाटायला लागलंय.

किल्ले, तुला घाबरवत नाहीये पण आता रमा किमान 18 वर्षांची होईपर्यंत हे स्वप्न स्वप्न च राहणार आहे हे लक्षात ठेव Proud

VB,सामो, अतुल पाटील, जाई, संशोधक, peacelily2025, रिया
धन्यवाद Happy
रिया Proud Biggrin
ऑफिस ला जायची इच्छा होतेय मनापासून, हिंजवडी च्या डोंगरात कोसळणारा पाऊस miss करतेय. अजून बरंच आहे

किल्ली च्या सुकन्येचे नाव रमा आहे तर. छान छान !!!
तुझे स्वप्न बहूतेक स्वप्नच रहाणार. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी.
पोरगी थोडी मोठी झाली की घरात धुडगूस घालेल तिच्याबरोबर नक्की कर एन्जाॅय. ते सुख तुझ्या तमन्नेपेक्षा नक्की मोठ्ठे आहे.
नाहीतर काय होईल, DDLJ ची फरीदा जलाल, काजोल ला तीची स्वप्नं सांगत बसेल. Rofl
खुप खुप शुभेच्छा!!!!!!
( रच्याकने किल्ले तू सध्या थोपु वर ॲक्टिव्ह नाहीस का? मेसेज केला होता.)

कशाला ऑफिसमध्ये जायचं. मला तर खूप कंटाळा येईल पुन्हा ऑफिसमध्ये जायला. मस्त सकाळी उठायचं, रनिंग, सायकलिंग करायची, नन्तर ट्रेडिंग करायची, मग थोडा वेळ ऑफिस काम करायचं, दुपारी मस्त झोप काढायची, संध्याकाळी आयपीएल, आवडती सिरीयल बघायची. आवडतं वाद्य वाजवायचं. छंद जोपासायला आणि नवीन छंद सुरू करायला वेळच वेळ आहे. नको ते ऑफिस परत, सगळ्यांचे पडलेले चेहरे, पॉलिटिक्स, एकमेकांवर कुरघोडी, बॉसच्या चेल्यांचे नखरे सहन करणे. नकोच परत.

Lol
मस्त स्वप्न आहे.
दोनतीन वर्षांपूर्वी एकदा अगदी असं नाही, पण बऱ्यापैकी स्वप्न पूर्ण झालं होतं माझं. (मुलं आणि नवरा गणपतीसाठी पुण्याला गेले होते आणि त्यामुळे मी एकटीच तीन दिवस घरात Wink ) तेव्हा एका परीक्षेचा अभ्यास करत होते म्हणून मी गेले नव्हते आणि तो अभ्यासही तेव्हा केलाच अर्थात, पण बाकी स्व-तंत्र. Happy

धन्यवाद पाफा, craps, बोकलत, वावे, अवल Happy
पाफा, थोपु चे संदेश दाखवणारं app नाही माझ्याकडे, त्यामुळे पाहिला नसेल. पाहते

छानच आहे!
स्टुपिड नाही पण अशक्य, अतर्क्य एक इच्छा आहे. द्रौपदीसारखी एक थाळी मिळावी पण इतर काय पदार्थ नाही फक्त रोज भेळ आणि पाणीपुरी देणारी असावी... (बाकी अशी थाळी असतानाही ही बाई वनवासात कशी म्हणायचे???? )

तथास्तु गं.
यातल्या बऱ्याच गोष्टी पि. सौ.मध्ये राहणारे(हे रिजनिस्ट विधान नव्हे, मी जास्त फक्त याच एरियातले लोक वर्षानुवर्षे बघतेय त्यामुळे त्या एरियाचा उल्लेख) एरवी पण करतातच.
एक दिवस किंमतीचा, कॅलरी चा विचार न करता पूर्ण दिवस सकाळ संध्याकाळ डबल चीज पिझ्झा खावे हे माझं स्वप्न आहे Happy
शिवाय ते पिक्चर मध्ये निळे किंवा पांढरे शुभ्र समुद्र किनारे दिसतात अश्या एखाद्या ठिकाणी झुला बांधून त्यात एकटंच चहा कॉफी सिप करत पडावं(आजूबाजूला सेल्फी घेणारी कुटुंबं नसावी) हेही स्वप्न आहे.एकदा न्यूज बरोबर जाहिराती येतात त्यात मालदीव चं एक रेझोर्ट पाहिलं होतं.काचेच्या भिंती वाला(पडदे असतील, चिंता नको) एक एक प्रायव्हेट व्हीला, त्यातून थेट समुद्रात जाणारी वॉटर स्लाईड असा थाट होता.रेट काहीतरी 2700 डॉलर पर डे. मग सुनामी येईल का, स्लाईड मधून पाण्यात घसरून लाटेने लांब वाहून गेलं तर काय वगैरे येडछाप विचार यायला लागून लिंक बंद केली.
आता भारताला 13 देशांना व्हिसा ऑन अरायव्हल आहे. कधीतरी आली लहर केला कहर करायला हवा.

हो तशी काचेचे तंबूवालीपण एक जाहिरात पाहिली होती. कुठल्याशा बेटावर. नो लाईट पोल्यूशन. रात्रभर तारे बघत आरामात पडून रहा. (मला आकाश पहायला आवडतं)

झक्कास गं किल्ले! मी सद्ध्या थोडं थोडं हे स्वप्न जगतेय wfh मुळे. उठायची कटकट नाही ट्रेन पकडायची गडबड नाही. कधी जावं लागलंच ऑफिसला तर उबर आहे. पण मी ऑफिस आणि ट्रेन आणि मैत्रिणी जाम मिस करते

खूप मस्त स्वप्न. खरेच असा एक दिवस तरी मिळावा.. तुमचा लेख वाचल्यावर हे लक्षात आले, की आपल्याही डोक्यात कित्येकदा असा विचार येऊन गेला आहे.. पण थोडा वेळ रेंगाळण्यापूर्वीच त्याला परतवून लावावे लागले आहे.

किल्ली... फारच सुंदर छोटीसी आशा... एकेक गोष्ट अगदी माझ्या मनातली. या छोट्याशा आशेमध्ये माझी अजून एक आशा आहे. कमीतकमी आठवड्यातून एक दिवस,दिवसभर निवांत "मायबोली" वरती तुम्ही सगळ्यांनी लिहलेलं लिखाण मनसोक्त एन्जॉय करून वाचायचं.

Pages