कीरई / पालक मसियल कूटं

Submitted by पार्वती on 23 September, 2020 - 04:49
पालक मसियल कूटं
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ मोठी जुडी पालक बारीक चिरलेला
१ लहान वाटी तूर डाळ + १/२ टीस्पून हळद + १ टीस्पून तूप घालून कुकर मध्ये शिजवून घेतलेली
३ मोठे चमचे तेल
१ टीस्पून जिरं
१ टीस्पून मेथी दाणे
१ हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली
१ टीस्पून किसलेलं आलं किंवा आलं पेस्ट
१ टीस्पून साखर किंवा गूळ
१/२ टीस्पून हळद
१ टेस्पून चिंचेचा कोळ
३ टेस्पून खवलेला नारळ
२ टीस्पून चटणी/मोलगा/परुप्पु पोडी (घरी नसेल तर नाही घातली तरी चालेल)
१/२ टीस्पून काळी मिरी पूड
१/२ टीस्पून तिखट
मीठ

फोडणीसाठी :
३ टेस्पून तूप
१ टेस्पून उडीद डाळ
२ टीस्पून मोहरी
२ सुक्या लाल मिरच्या
१ टीस्पून जिरं
१/२ टीस्पून हिंग
कढिपत्ता

क्रमवार पाककृती: 

१. तेल गरम करून त्यात जिरं, मेथी दाणे घाला. ते तडतडले की हिरव्या मिरच्या आणि आलं घाला आणि परता.
२. आता त्यात चिरलेला पालक, साखर/गूळ, हळद घालून पालक शिजवून घ्या.
३. त्यात शिजलेली डाळ, चिंचेचा कोळ, मीठ, नारळ, तिखट, काळी मिरीपूड आणि (असल्यास) चटणी पोडी घाला. उकळी आणून कमी आचेवर ५ मिनिटं ठेवा.
४. फोडणीसाठीच्या लहान कढईत तूप गरम करा. त्यात मोहरी, जिरं घाला. तडतडलं की उडीद डाळ घाला. लालसर गुलाबी होऊ द्या. जळू देऊ नका. सुक्या लाल मिरच्या, हिंग आणि कढीपत्ता घाला. लगेच गॅस बंद करा.
५. ही फोडणी आता उकळणा-या कूटं मध्ये घाला.
६. गरम गरम भाता बरोबर तूप घालून पोटभर खा.

वाढणी/प्रमाण: 
४-५लोकांसाठी पुरेसे
अधिक टिपा: 

हिरव्या भाज्यांची पातळभाजी, डाळभाजी असले प्रकार किंवा पीठ लावून केलेले प्रकार, नुसतीच परतून केलेली भाजी असे आपण भरपूर निरनिराळे पदार्थ करतो. मुलगी लहान असताना पालक, मेथी वरणात टाकली की ती जास्त नखरे न करता भाताबरोबर आपोआप खायची. माझ्या नणंदेच्या मुलीची मात्र ही तक्रार नेहेमीचीच – ‘ पता नहीं, मामी की दाल में पालक क्यूं होता है....’

जसजशा ओळखी वाढत गेल्या तसतशा नवनव्या पाककृतीसुद्धा माझ्या संग्रही जमा होत गेल्या. माझी तमिळ अयंगार मैत्रीण सरस्वती हे कीरई / पालक मसियल कूटं अप्रतिम बनवते आणि तिच्यामुळे तिच्या अम्माचा हा पदार्थ आता आमच्याकडे दर आठवड्यात होतोच. मसियल म्हणजे मॅश. पांढरा शुभ्र वाफाळता भात, त्यावर हे कूटं आणि तूप म्हणजे अगदी कंफर्ट फूड. त्याबरोबर तिखटगोड अननस पचडी वगैरे असली तर माझ्यासाठी थेट स्वर्गच!

ही पाककृती केवळ पालक बरोबरच करता येईल असंही नाही. मेथी, चाकवत, राजगिरा अशा इतरही हिरव्या भाज्यांचं मसियल कूटं छान लागतं. पण त्याचबरोबर मी हे दुधी भोपळा, लाल भोपळा टाकूनही करून पाहिलंय आणि तेही अप्रतिम लागतं.

साहित्याची यादी जरा जास्त मोठी दिसतेय पण हे सर्व सामान आपल्या घरी असतं. चटणी/मोलगा/परुप्पु पोडी माझ्याकडे नेहेमीच नसते आणि मी त्याशिवायच बनवलेलं आहे. तरीही छान लागतं.

करून पाहा आणि सांगा आवडलं का.

माहितीचा स्रोत: 
तमिळ मैत्रीणीची अम्मा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त आहे
तुमच्या पाकृ हटके असतात हे

छान आहे रेसिपी. मला नुसती डाळ खाण्यापेक्षा असे काहीतरी करून खायला, विशेषतः त्यात पालेभाज्या घालून खायला आवडते. नक्की करून बघेन.

चटणी पोडी तुम्ही रेसिपी दिली का? नसेल तर कृपया द्या.

छान वाटलं तुमच्या प्रतिक्रिया वाचून. मला प्लीज तू म्हणा, एखाद्या मैत्रिणीसारखंच.
साधना - मला काही खूप खास आवडत नाही चटणी पोडी. म्हणून करतही नाही. MTR वगैरेची चांगली असते. चेन्नैच्या ग्रँड स्वीट्सचे सर्वच पदार्थ छान असतात. पण कुठलीही तयार मिळणारी तामिळ/कानडी चटणी पोडी वापरा.

फोटो कसला भन्नाट आहे, बघून तोंडाला पाणी सुटले.

मस्त रेसिपी. पोडी चटणी टाईप वेसवार असते आमच्याकडे, घटक वेगळे असतील थोडे पण ते घालून करून बघायला हवी.