लेखनस्पर्धा -- माझा अनुभव -- कोविड-१९ लॉकडाऊन -- राहुल बावणकुळे

Submitted by राहुल बावणकुळे on 3 September, 2020 - 10:08

२०२० हे माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचे वर्ष ठरणार होते. खूप साऱ्या अपेक्षा व स्वप्न उराशी बाळगून नवीन वर्षात प्रवेश केला. सुरुवात ही उत्तमच झाली होती. पण कॉविड-१९ नावाचा पाहुणा आला आणि संपूर्ण जगाला हादरवून हादरवून टाकलं. दरम्यान मीही अनेक बऱ्यावाईट अनुभवातून गेलोय, ते मी ह्याद्वारे मांडण्याचा प्रयत्न करतोय. मला माहिती आहे की लेख प्रचंड लांबला आहे. पण सर्वांना विनंती आहे की तो पूर्ण वाचावा. माझ्यासारख्या अबोल व्यक्तीला ह्या लेखाद्वारे व्यक्त होण्याची संधी भेटली त्यासाठी मायबोली गणेशोत्सव २०२० संयोजकांचे शतशः आभार!

डिसेंबर २०१९ ला अनपेक्षितपणे एका conference च्या निमित्ताने IIT Mandi (हिमाचल प्रदेश) ला जाणे झाले, आणि मग ओघाने कुल्लू-मनाली हाही स्वप्नवत प्रवास झाला. आयुष्यात पहिल्यांदाच हिमालयाची गळाभेट झाली. त्याला बिलगून आलिंगन दिले. त्याच्या बर्फाच्या शालींवर मनसोक्त बागडलो व खेळलो. अश्याप्रकारे २०१९ ला आनंदाने निरोप देऊन तेवढ्याच उत्साहात २०२० मध्ये प्रवेश केला. हे २०२० तर माझ्या आयुष्यातील अधिकच महत्त्वाचे वर्ष होते, खूप साऱ्या अपेक्षा बाळगल्या होत्या. उराशी बाळगलेली अनेक स्वप्न पूर्ण करायची आता वेळ आली होती. माझ्या आयुष्याला २०२० मध्ये नवीन कलाटणी भेटणार व अनेक स्थित्यंतरे येणार हे तर निश्चितच होते.

BAMS, PGDHM (Public Health Management), व MSc, MPhil, व PhD (Biostatistics व Epidemiology) ह्या पदव्या घेत सुरु असलेल्या २००४ पासूनच्या दीड दशकांच्या विद्यार्थीदशेला २०२० मध्ये अर्धविराम लागणार होता. तसेच अभ्यासात दुर्लक्ष होऊ नये म्हणून मी सातत्याने टाळलेला लग्नाचा विषय नुकतीच माझी वयाची पस्तीशी उलटल्याने नातेवाईकांनी अधिकच जोर धरू लागला होता. त्यामुळे ह्या वर्षी लग्नाच्या बोहोल्यावर चढावे लागणार असेही दिसत होते (गेल्या सात-आठ वर्षात आईबाबांपेक्षा नातेवाईकच प्रश्नांचा भडिमार करून भंडावून सोडत आहेत. आईबाबांनी माझ्यामागे लग्नासाठी कधीच तगादा लावला नाही). दरम्यान बहिणीला बाळ झाल्याने जानेवारीपासून आईबाबाही नागपूरहून खारघर ला आले होते. त्यामुळे दर वीकेंडला तिच्याकडे फेऱ्या सुरु झाल्या होत्या. त्यामुळे सगळे छान मजेत सुरु होते.

त्याचबरोबर PhD चा आता अंतिम टप्पा सुरु होता, उरलेसुरले संशोधन लेखन पूर्ण करत होतो. ऑगस्ट २०२० च्या मध्यात फेलोशिप संपणार म्हणून, सहा महिने आधीच म्हणजे जानेवारी मध्ये नोकरी शोधणे सुरु केले, पहिल्यांदा resume update केला. मधल्या काळात झालेले बदल त्यात सामावून घेतले. मला teaching मध्ये रुची असल्याने Public Health, Demography/Population Sciences, Biostatistics व Epidemiology ही अभ्यासक्रमे असलेल्या देशभरातील खाजगी विद्यापीठे व इन्स्टिट्यूटसची यादी केली आणि त्यांना resume पाठवण्यास सुरुवात केली. दरम्यान फेब्रुवारीअखेरीस दोन खाजगी विद्यापीठांकडून फोन सुद्धा आले, प्राथमिक स्तरावरची बोलणीही झाली. त्यांनी निवडीची संपूर्ण प्रक्रिया व्हायला जवळपास दोन-तीन महिने लागतील असे सांगितले. मग मीही जरा निश्चिंत झालो, फेलोशिप संपेपर्यंत मनासारखी नोकरी भेटणार होती.

पण तो आला, त्याने पाहिलं आणि सर्वांना गुंडाळून ठेवलं

होय, त्याच्याबद्दल अधूनमधून इंटरनेट व वर्तमानपत्रांमध्ये छापून येत असलेली माहिती वाचणे सुरूच होते. Epidemiology मध्ये SARS चा अभ्यास केला असल्यामुळे हाही तसाच असावा असा अंदाज होता. काही काळ राहणार व निघून जाणार असे वाटत होते. केरळ व मुंबईमध्ये बोटावर मोजण्याएवढ्या केसेस आढळल्या असल्या तरी त्याच्या भयावह रुपाबद्दल एवढा विचारच केला नव्हता. मात्र पहिली शंकेची पाल चुकचुकली जेव्हा मार्चच्या पहिल्याच दिवशी आमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी नुसत्या स्पर्शानेही तो पसरत असल्याने बायोमेट्री बंद करण्याची इन्स्टिट्यूट डिरेक्टरला विनंती केली (PhD मध्ये फेलोशिप भेटत असल्याने आम्हाला रोज बायोमेट्री देणे ओघाने आलेच). सुरुवातीला एक-दोन दिवस त्यांनीही मनावर घेतले नाही, पण लगेच इन्स्टिट्यूटला MoHFW व UGC दिल्लीहून निर्देश प्राप्त झाल्यावर बायोमेट्री बंद होऊन आपल्याच पेनाने रजिस्टरमध्ये सही करायचा आदेश काढला (मी सध्या International Institute for Population Sciences (IIPS), देवनार-गोवंडी, मुंबई ह्या आरोग्य व परिवार कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली (MoHFW, GoI, New Delhi) अंतर्गत येणारे विद्यापीठ समतुल्य (Deemed University) इन्स्टिट्यूटमध्ये PhD करत आहे).

इकडे मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात आमच्या फ्लॅटचा ११ महिन्यांचा करार संपणार होता. घरमालक जरी उत्सुक असले तरी त्यांनी बारीकसारीक गोष्टींहून खूप त्रास दिल्याने आम्हाला करार वाढवायचा नव्हता. शिवाय आम्हा दोघांची फेलोशिप संपत असल्याने आम्ही ऑगस्टनंतर मुंबईतच राहू हे निश्चित नव्हते, तर तिसरा तेलगू जुनिअर PhD data collection साठी आंध्र प्रदेशला जाणार होता. त्यामुळे आम्ही तिघांनीही स्वतंत्रपणे चार-पाच महिन्यांसाठी आपापली तात्पुरती रहाण्याची सोय करायचे ठरले, त्या दोघांची झालीही पण माझी काही होईना, मला शेवटी १ RK भाड्याने घ्यावा लागला. तिकडे ह्याचवेळी त्याने आपले पंख अधिकच वेगात फडफडायला सुरुवात केली होती आणि केरळ, मुंबईमधील व इतर काही ठिकाणी अधिकाधिक लोकांना आपल्या कवेत गुंडाळून घेत होता. आणि एके दिवशी WHO ने कॉविड-१९ ह्याचे अनेक देशांमध्ये आगमन झाले असून जागतिक महामारीची घोषणा केली आणि मग त्याच्या भयावह रुपाची जाणीव झाली.

मग महाराष्ट्र सरकारने पाच महानगरांमधील सर्व गर्दीची ठिकाणे ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचा आदेश काढला, तरी आमचे इन्स्टिट्यूट अजूनही सुरूच होते. विद्यार्थांमध्ये गोंधळाचे वातावरण होते, अनेकजण होळीसाठी आपापल्या राज्यात गेली होती (आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये उत्तर प्रदेश, बिहार व प. बंगाल मधल्या विद्यार्थ्यांची खूप संख्या आहे, त्यामानानी मराठी टक्का अत्यंत कमी आहे). मात्र ह्यामुळे लायब्ररीमधील विद्यार्थांचे प्रमाण खूपच कमी झाले होते, माझे सगळे सोबती घरी गेल्याने मलाही अजिबात करमतही नव्हते. त्याचदिवशी मला प्राथमिक स्तरावरची बोलणी झालेल्या एका विद्यापीठांने येत्या दोन-तीन दिवसांत telephonic interview होणार आणि मग तुम्ही दिल्लीला बोलावू असे कळवले. दुसर्‍या दिवशी नवीन फ्लॅटमध्ये सामान बदलवत असतानाच इन्स्टिट्यूट ३१ मार्चपर्यंत बंद असणार असल्याचा मेल आला (महाराष्ट्र सरकारने जरी आधीच आदेश दिला असला तरी इन्स्टिट्यूटला MoHFW, दिल्ली कडून निर्देश यायला मध्ये दोन-तीन दिवस गेले होते).

आधीच सोबती नसल्याने करमत नव्हते, त्यात इन्स्टिट्यूटही जवळपास १५ दिवसांसाठी बंद झाले होते. शिवाय सामान हलवतांना induction शेगडीचा वायर तुटल्याने स्वयंपाक करायचीही अडचण झाली होती. जरी मी शेगडी लगेच दुरुस्तीसाठी दिली असली तरी चार-पाच दिवस लागणार होते. ह्या सगळ्याला कंटाळून शेवटी बहिणीकडे खारघरला जायचे ठरवले, तसेही आईबाबांना नागपूरला सोडायला २९ मार्चला जाणारच होतो. त्यामुळे नवीन घरी एकच रात्र राहून सामानही न लावता दुसर्‍या दिवशी दुपारी आवश्यक सामानाची बॅग भरून बहिणीकडे निघालो. खारघरला घरी पोहोचताच भावोजींना बघून आश्चर्य वाटले. मग त्यांच्या NMIMS विले पार्ले कॉलेजही ३१ मार्चपर्यंत बंद आल्याचे कळले (ते Mech. Engg. चे असिस्टंट प्रोफेसर आहेत). मग अश्या प्रकारे आयुष्यात कधीही ज्याचा विचार केला नव्हता असे घरात बंदिस्त झालो.

तिकडे जे interview घेणार होते त्यांना काहीतरी अडचणी आल्याने त्यांनी सांगितलेल्या दिवशी telephonic interview झालाच नाही; मी वाट बघण्यावाचून आणखी काहीच करू शकत नव्हतो. लॉकडाऊन सुरु झाल्यावर मात्र त्यांनी निवड प्रक्रिया सध्या थांबवली आहे असा मेल केला. इकडे घरात दोन ज्येष्ठ नागरिक, एक पाच महिन्याचे बाळ व दुसरे सात वर्षाचे मूल असल्याने जमेल तेवढी काळजी घेत असू, आवश्यक सामानाची खरेदी करण्याखेरीज घराबाहेर पडत नसू. भाजीबाजारात बऱ्यापैकी शिस्त पाळली जात असे, दुकानांतही योग्य अंतर ठेवून मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जात होता. तसेही आम्ही बहिणीकडे असल्याने सामान आणायला मला क्वचितच जावे लागे, आठवड्यातून एकदाच भावोजी सगळी खरेदी करून आणत. त्यांच्या अपार्टमेंटमध्ये घरकामाला येणाऱ्या ताईंना मज्जाव होता, लिफ्टही बंद केली होती. आम्ही सगळे शक्य तेवढी घरकामांत मदत करत असलो तरी बहिणीवरच सगळा भार आला होता.

अश्या प्रकारे मार्च, व एप्रिल महिने निघून गेले. मे च्या मध्यात एके दिवशी अचानक आईला खूप ताप आला. आधी मी तिला माझ्या समजुतीने औषध दिली, जरा कमीही झाला. पण दुसर्‍या दिवशी परत ताप आला. बहिणीच्या अपार्टमेंटमागेच असलेल्या एक मल्टीस्पेशिअलीटी दवाखान्यात नेले. खूप विनंती केल्यावर तेथल्या RMO ने लक्षणांवरून काही औषध लिहून दिली आणि टेस्ट सुचवल्या. त्याच संध्याकाळी रिपोर्ट आणायला गेलो असता लॅब टेक्निशियनने RMO ला बोलावून आणले. तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली. रिपोर्टनुसार आईचे Blood-CBC मधील घटक दुपटीने वाढले होते. RMO च्या म्हणण्यांनुसार करोना नसला तरी शरीरात कुठेतरी मोठे बॅक्टेरिअल इन्फेक्शन होते आणि पुढील तपासणीसाठी व उपचारांसाठी दाखल करणे आवश्यक होते. पण त्या दरम्यान आईचा ताप कमी झाला होता. तसेच कॉविड-१९ च्या वाढत्या धोक्यामुळे आईवर घरीच उपचार करूया आणि तीन दिवसांनी परत सगळ्या तपासण्या करू असे भावोजींनी RMO ला विनंती केली. त्यांनीही जोखीम लक्षात घेता जे काही injectable antibiotics दवाखान्यात दाखल झाल्यावर दिली असती ती आता घरीच oral रुपात दिली. शिवाय अपार्टमेंटच्या अगदी पाठीमागेच दवाखाना असल्याने त्यांच्याशी रात्रीबेरात्री कधीही संपर्क करणे वा तिकडे जाणे सहज शक्य होते.

आई दोन दिवसांत बरी झाली, पण तिसर्‍या दिवशी दुपारी जेवण झाल्यावर तिला परत सणकून ताप भरला. संपूर्ण शरीराला थरकाप सुटला, तीन ब्लँकेट अंगावर टाकली तरी थंडी कमी होईना. सोबतच उलट्याही सुरु झाल्या. सगळेच घाबरलो. थोड्याच वेळात बेशुद्धावस्थेत गेली. मग कसेही करून तिला दवाखान्यात नेणे गरजेचे होते, पण मदतीला कुणी शेजारी किंवा सेक्युरिटी गार्डसुद्धा यायला तयार नव्हते. शिवाय अँम्बुलंसला फोन केल्यावर दोन तरी तास यायला लागतील असे म्हणाले. (याआधी २०१८ मध्ये आईची नागपूरला अशीच प्रकृती बिघडून ती कोमात गेली होती, १० दिवस वेन्टीलेटरवर होती, शेवटी डॉक्टरांनीही वाचण्याची आशा सोडली होती. पण आयुष्याची दोरी बळकट असल्याने ती चमत्कारवत मृत्युच्या दारातून परत आली)

ह्यावेळीही अशीच काहीशी लक्षणे दिसत असल्याने आम्ही शेवटी आमच्या कारमध्ये टाकून MGM सीबीडी बेलापूर, DY Patil नेरूळ व खारघरमधील इतर दवाखान्यामध्ये फिरलो. पण तिला प्रचंड ताप असल्याने करोना चाचणीशिवाय दाखल करून घ्यायला तयारच नव्हते. त्यासाठी वाशी/पनवेलच्या कॉविड विशेष दवाखान्यात जाऊन किंवा खाजगी पॅथोलोजीमधून करोना चाचणी करायचा द्रविडी प्राणायाम करावा लागणार होता. ह्यादरम्यान आई स्वतःच शुद्धीवर आली असल्याने जरा हायसे वाटले. घरामागच्या ज्या दवाखान्यात तिचे उपचार सुरु होते तिकडे ICU असले तरी वेन्टीलेटर नसल्याने आम्ही टाळले होते आणि इतर दवाखाने फिरत होतो. शेवटी आम्हाला त्यांच्याकडेच न्यावे लागले, त्यांचेच उपचार सुरु असल्याने त्यांनी लगेच दाखल करून खबरदारी म्हणून पहिल्यांदा खाजगी पॅथोलोजीमार्फत करोना चाचणी केली (जी अपेक्षेप्रमाणे पुढे निगेटिव्ह आली) आणि आई व मला isoloation रूम मध्ये ठेवले.

दवाखान्यात दाखल केल्यावर आईची प्रकृती लगेच सुधरली असली तरी त्या पाच दिवसांत मध्ये एक दोनदा थंडी व ताप येऊन गेला. शेवटी तिला मुत्र खड्याचे निदान झाले. पुढे पाच दिवसांनी सुट्टी झाली आणि ठणठणीत बरी होऊन घरी आली. त्यातच जून महिना उजाडला आणि प्रवासावरील निर्बंध काहीशे शिथिल झाल्याने आम्ही नागपूरला येण्याचे निश्चित केले. मात्र तेव्हाच भावोजींना आठवड्यातून एकदा कॉलेजला जाणे बंधनकारक केल्याने ते व बहीण येवू शकत नव्हते त्यामुळे आईबाबा व मी नागपूरला निघून आलो. आम्ही प्रवासासाठी E-Pass काढला आणि नागपूरहूनच गाडी बोलावली होती. पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्र बघायला भेटला, एरवी ट्रेन किंवा विमानानेच प्रवास केला असल्याने असा प्रसंग कधीच आला नव्हता. सगळ-सगळ बंद होत. सकाळच्या वेळेसच दूध किंवा फिरायला जाणार्यांची थोडीफार संख्या दिसत होती. सकाळी १० नंतर ज्या ज्या ठिकाणाहून प्रवास केला तिकडे मात्र शुकशुकाट होता. वाटेत काही जिल्ह्यांच्या सीमेवर E-Pass ची तपासणी होत असे, ज्यांच्याकडे नव्हते त्यांना परत पाठवल्या जात होते.

मुंबईत असल्यापासूनच आमचा शेजार्यांशी संपर्क होताच. त्यांचा किंवा नातेवाईकांचा नागपूरहून अधूनमधून चौकशीसाठी फोन येत असे. त्यामुळे नागपूरला परत येताना शेजार्यांना कळवले होते. गेल्या सहा महिन्यांपासून घर बंद असल्याने तिकडे जाताच आमची काही सोय होणार नव्हती. पण शेजार्यांनी अगदी पिण्याचे पाणी, व जेवण तयार ठेवले होते. आम्ही मुंबईहून पहाटे निघालेलो सुमारे १८ तासांचा प्रवास करून मध्यरात्री १२ वाजता घरी पोहोचलो. तर शेजार्यांनी गेटला घराची किल्ली अडकवून ठेवली होते, तेव्हा जरा आश्चर्य वाटले. सकाळी उठल्यावर मात्र कुणीही बोलावयास तयार नाही, सगळ्यांनी अघोषित बहिष्कार घातला होता. त्यांच्या मनात आमच्या बद्दल अदृश्य भीती दिसत होती, आम्ही फार लक्ष दिले नाही. तेवढ्यातच नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य पथक आले. त्यांना शेजार्‍यापैकीच कुणीतरी माहिती दिल्याचे दिसत होते. त्यांनी आमची सगळी तपासणी केली, E-Pass व फिटनेस सर्टिफिकेट बघितले आणि आम्हाला चौदा दिवसांसाठी home quarantine केले.

आता आम्ही फारच अडचणीत सापडलो होतो. सहा महिन्यांपासून बंद असलेले घर भयंकरच अस्वच्छ झाले होते, जागोजागी धुळीचे साम्राज्य व जाळी लागली होती. आईला आरामाची सक्त गरज असल्याने घरकामाला येणाऱ्या ताईला फोन करताच त्या लगेच यायला लागल्या. आम्ही त्यांना आमच्या quarantine बद्दल सांगितल्यावर त्या म्हणाल्या की मला काहीच अडचण नाही. मी बाहेरच्या रस्त्याने येवून भांडी व कपडे स्वच्छ करून जाणार. आपला काहीच संपर्क येणार नाही, पण मला कामावर येवू द्या. आधीच तीन महिन्यांपासून मी बिनपगारी घरीच आहे. आम्ही जाणीपूर्वक मात्र स्वयंपाकाच्या ताईंना बोलावले नाही, त्याऐवजी पंधरा दिवसांसाठी मेसमधून डब्बा लावला. डब्बेवाला म्हणाला की मी गेटवरच डब्ब्याची पिशवी अडकवून ठेवेल. त्यामुळे जेवणाचाही प्रश्न सुटला. पण संपूर्ण घर स्वच्छ होऊन नेहमीप्रमाणे व्हायला १० दिवस तरी गेले. ह्यादरम्यान शेजारी आता थोडे थोडे बोलायला लागले होते. मग आम्हालाही जरा हायसे वाटायला लागले. सुरुवातीला तर मुंबईमध्येच बरे होतो, का घरी नागपूरला आलो असे वाटत असे.

१४ दिवस होताच आईला Nephrologist कडे नेले, मूत्रखड्याचा आकार वाढत असल्याने त्यांनी मिनिमल सर्जरी करायचा सल्ला दिला आहे मात्र आई करोनाच्या भीतीने तो टाळत आहे. सुदैवाने दवाखान्यातून सुट्टी झाल्यावर आई आयतागाजत उत्तम आहे, तिची त्यानंतर परत प्रकृती बिघडली नाही. मात्र आमच्या स्वयंपाकाच्या ताईंनी कामावर यायला साफ नकार दिला. त्या आमच्या घराजवळच राहतात, जरा हलाखतीची परिस्थिती असल्याने दिवसा त्या शिवणकाम करून सकाळी व संध्याकाळी आमचा स्वयंपाक करून देत असत. एक प्रकारे त्यांनी आपल्या जोडव्यवसायाची सुरुवात आमच्या घरूनच केली होती, आमच्यामुळेच तिला इतर दोन कामे मिळाली होती. त्यामुळे १५ दिवसांसाठी लावलेला मेसचा डबा नवीन ताईचा शोध लागेपर्यंत ठेवावा लागला.

तर मागच्या सहा महिन्यात काय मिळवले? जसे ठरवले होते तसे काहीच झालेच नाही. जी जी स्वप्ने बघितली होती ती सगळी धुळीला मिळाली. पण स्वत:चा नवीन शोध लागला. जिमतर लॉकडाऊन आधीच बंद झाले होते, त्यात लॉकडाऊननंतर सकाळी फिरायलाही जाता येत नव्हते. मग Youtube वर निरनिराळी योगासने शिकलो. सुरुवातीला एकही आसन नीट करता येत नव्हते, जिममुळे शरीर कडक झाले होते. पण हळूहळू सगळे जमायला लागले आणि शरीरही लवचिक बनले. महत्वाचे म्हणजे ह्या सगळ्यात ८ किलो वजन कमी झाले. बारावी नंतर सातत्याने वाढत असलेले वजन दीड दशकानंतर ७५ किलोखाली आले. अनेक वर्षानंतर आईबाबांसोबत मनसोक्त व निवांत वेळ घालवता आला, एरवी एकटेपणामुळे कंटाळलेले सध्या खूप टवटवीत व आनंदात आहेत.

कधी-कधी वाटते की मी लॉकडाऊन सुरु व्हायच्या आधी माझा बहिणीकडे जाण्याचा निर्णय योग्य ठरला. जर माझ्याच फ्लॅटमध्ये असतो तर किती एकटा पडलो असतो. माझे मित्र-मैत्रिणी एकटेपणामुळे कंटाळून गेले होते पण त्यांना प्रवासांवर बंधने असल्याने त्यांच्या मूळगावीही जाता येत नव्हते. कित्येक जण होळी साजरी करून मुंबईला परत येवून जरा स्थिरावले होते तर त्यापुढच्या एक-दोन दिवसांतच लॉकडाऊन सुरु झाला. त्यांची काय अवस्था झाली ह्याची कल्पनाही करवत नाही. अगदी जवळची एक मैत्रीण आजी वारल्यामुळे मार्चच्या सुरुवातीला कोलकात्याला गेली आणि लॉकडाऊनमुळे अडकून पडली, पुढे तिच्या एकत्र कुटुंबातील तिच्यासह १५-१६ व्यक्ति करोनाग्रस्त निघाले, तेही त्यांच्या घरगड्याच्या चुकीमुळे झाले (त्याला लक्षणे दिसत असली तरी त्याने साफ दुर्लक्ष केले होते). इकडे इन्स्टिट्यूटमध्ये जातायेता बोलणाऱ्या व येत्या काही दिवसांत निवृत्त होऊ पाहणाऱ्या एका कर्मचार्‍याने करोनाने प्राण गमावले.

तिकडे कॉविड-१९ मुळे MoHFW कडून इन्स्टिट्यूटला येणारी दरमहा ग्रँट रोडावली आहे आणि त्यांनी स्वत:च्या जमा असलेल्या पैश्यांतूनच खर्च करायला सांगितला आहे. तरीही जमेची बाजू म्हणजे घरूनच PhD चे काम सुरु असले दर महिन्याला न चुकता फेलोशिप भेटत होती. तसेच PhD च्या कामात कॉविड-१९ मुळे आलेल्या अडथळ्यामुळे ज्यांची ४ वर्षांची फेलोशिप जुलै-ऑगस्ट ला संपणार होती, त्यांना फेलोशिपसहित सहा महिन्याचे जादा extension दिले जाईल असा इन्स्टिट्यूटने आदेश काढला. मात्र त्यासाठी MoHFW च्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे.

लॉकडाऊनपूर्वी आलेल्या interview कॉलचे पुढे काहीच झाले नाही पण आई बाबा दोघेही सारखा धीर देतात की एवढा शिकलास तर चांगली नोकरी लागेलच. कदाचित आधीपेक्षाही उत्तम संधी येणार असेल म्हणून जरा संयम ठेव. ह्याच दरम्यान MBBS ला Community Medicine/Preventive and Social Medicine चा Biostatistics हा एक भाग असल्याने अनेक खाजगी वैद्यकीय महाविद्यालये व अभिमत विद्यापीठांना परत resume पाठवण्यास सुरुवात केली, चार-पाच ठिकाणाहून बोलावणेही आले. पण महाराष्ट्रात प्रवासावर अगदी कालपरवापर्यंत असलेल्या बंधनांमुळे जाता येत नव्हते. पण आता पुढच्या आठवड्यात मी त्यांना येत असल्याचे कळवले आहे, ह्यापैकी कुठेतरी नोकरी भेटेल हीच आशा आहे आणि त्यांनतरच लग्नाच्या बोहोल्यावरही चढता येईल.

(International Institute for Population Sciences (IIPS) हे आरोग्य व परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या अखत्यारीत देवनार-गोवंडी मुंबई स्थित अभिमत विद्यापीठ दर्जा प्राप्त इन्स्टिट्यूट आहे. संपूर्णपणे Population Sciences/Studies/Demography ह्याच विषयासाठी वाहून घेतलेले जगभरातील एकमेव विद्यापीठ आहे. बहुतेक विद्यापीठ/इन्स्टिट्यूट मध्ये हे विषय Humanities/Social Sciences अंतर्गत येत असल्याने JNU सारखे अपवाद सोडल्यास त्यांचे स्वतंत्र विभागही नसतात. ह्यामुळे Population Sciences/Studies/Demography ह्या विषयात IIPS ला खूप लौकीक आहे. इथल्या संशोधनांचा दर्जा उत्तम मानला जातो, त्यांना जगभरात अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. हे इन्स्टिट्यूट Population Sciences, Biostatistics व Epidemiology व Demography ह्या विषयांत MPS, MA/MSc, MPhil व PhD चालवत असलेल्या अभ्यासक्रमांशिवाय भारत सरकारच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याशी संबंधित देशभरात व राजयांत विविध सर्वेक्षण करते. हे इन्स्टिट्यूट १९५६ पासून कार्यरत असूनही दुदैवाने त्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. आश्चर्य म्हणजे मुंबईमध्ये असूनही इथल्या किंवा महाराष्ट्रातील लोकांनाही माहीत नाही. म्हणूनच ह्यावर एक वेगळा परिच्छेद लिहीण्याचा अट्टहास केला आहे)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहुल,भयंकर अनुभव आहे
आयुष्याच्या सर्व ठरण्याच्या टप्प्यावर इतकी अनिश्चितता बघायला मिळणं जास्त वाईट आहे
या लॉकडाऊन च्या अंताला तुमच्यासाठी काहीतरी चांगलं नियतीत नक्की लिहिलेलं आहे.
इन्स्टिट्यूट ची माहितीही आवडली.

लॉकडाऊन च्या अंताला तुमच्यासाठी काहीतरी चांगलं नियतीत नक्की लिहिलेलं आहे.......... +१.

आई बाबा दोघेही सारखा धीर देतात की एवढा शिकलास तर चांगली नोकरी लागेलच. कदाचित आधीपेक्षाही उत्तम संधी येणार असेल म्हणून जरा संयम ठेव<< संकटकाळात आपल्यावर दाखवलेला हाच विश्वास आणि आधार जास्त महत्त्वाचा असतो.
आयुष्यातील पुढील वाटचालीस शुभेच्छा तुम्हांला.

बापरे.. तुमचा लेख लवकर संपावा असेच वटत होते.
आई सिरीअस असताना आधी कोरोना टेस्ट करा मगच या ती वेळ खरेच काहीही सुचायचे बंद करणारी असेल..

आयुष्यातील वाईट काळ पाहिलात... आता चांगल्यासाठी सज्ज व्हा.. शुभेच्छा Happy

अरे हो. इन्स्टिट्यूटच्या माहितीबद्दल धन्यवाद.. खरेच माहीत नव्हते. तो एरीया फक्त कत्तलखाना, डंपिण्ग ग्राऊण्ड आणि झेरॉक्स गल्ली अश्यांसाठीच माहीत होता

खूपच वेगवेगळ्या अनुभवांतून गेलांत तुम्ही आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर. आता यापुढे तुमची सर्व कामं निर्विघ्नपणे पार पडोत आणि तुमच्या उच्च आणि अनोख्या क्षेत्रातल्या शिक्षणाचं चीज होवो ही सदिच्छा.
लेखही चांगला जमलाय.

बापरे! मधला काही भाग वाचताना धस्स झालं

पण सगळे सुखरूप आहात वाचून हायसे वाटले

इंस्टीट्यूट बद्दलच्या माहितीसाठी धन्यवाद

लॉकडाऊन च्या अंताला तुमच्यासाठी काहीतरी चांगलं नियतीत नक्की लिहिलेलं आहे.......... +१.

कठीण परिस्थिती पार करून बाहेर पडला आहात. त्याबद्दल अभिनंदन. नोकरी आणि बाकी सगळं होईल आता हळूहळू सुरळीत. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.

खरंच फार कठीण प्रसंगातून गेलात! आता सगळे छानच होईल. शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी!>>>>> +१.

इन्स्टिट्यूटच्या माहितीबद्दल धन्यवाद..>>>>> अनुमोदन.

छान लिहिले आहे. कठीण परिस्थितीतून गेलात.
पुढल्या वाटचालीस शुभेच्छा.

नोकरी आणि बाकी सगळं होईल आता हळूहळू सुरळीत. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
इन्स्टिट्यूटच्या माहितीबद्दल धन्यवाद.
लिखाण आवडले, यापुढेही लिहित रहा. तुमच्या पीएचडी आणि कार्यक्षेत्राबाबत वाचायला आवडेल

नोकरी आणि बाकी सगळं होईल आता हळूहळू सुरळीत. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
इन्स्टिट्यूटच्या माहितीबद्दल धन्यवाद.
लिखाण आवडले, यापुढेही लिहित रहा. तुमच्या पीएचडी आणि कार्यक्षेत्राबाबत वाचायला आवडेल>>>>+१

नोकरी आणि बाकी सगळं होईल आता हळूहळू सुरळीत. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
इन्स्टिट्यूटच्या माहितीबद्दल धन्यवाद.
लिखाण आवडले, यापुढेही लिहित रहा. तुमच्या पीएचडी आणि कार्यक्षेत्राबाबत वाचायला आवडेल>>>>>+११११

खूपच चांगले व तपशीलवार लिखाण. खरेच,
लॉकडाऊन काळात आजारी पडणाऱ्या व्यक्तींना दिव्यातून जावे लागलेय. माझ्या मित्राच्या नातेवाईकांचा पण असाच अनुभव. कितीही गंभीर रुग्ण असेल तरी आधी कोव्हिडची चाचणी करून मगच या म्हणतात. प्रोसेस नुसार ते योग्य असेल, पण रुग्णाचे हाल होतात. आईंच्या प्रकृतीला आराम पडला हे वाचून बरे वाटले. करियरची चिंता करू नका. सर्व काही ठीक होईल. कारण जे काही घडले त्यात तुमचा काहीच दोष नाही. कोविडने सर्वांचीच दाणादाण उडवली आहे. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

हा लेख लिहील्यापासून खरेच खूप हलके वाटत आहे. गेल्या काही महीन्यांत मनावर जमा झालेले मळभ काहीसे दूर झाले. ह्याद्वारे मला व्यक्त होता आले. मी व माझी बहीण दोघेही लेट चाईल्ड असल्याने आमच्यात व आई-बाबांत एका पिढीचे अंतर आहे तरी आम्ही चौघेही एकमेकांचे उत्तम मित्र आहोत. विशेषतः मी माझ्या आयुष्यात घडणार्या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टी आई-बाबांना सांगतो (मला फारसे मित्र नाहीत पण हयामुळे अनेकदा नातेवाईकांकडून ओरडाही खातो). मात्र सद्यपरीस्थितीत वयोमानानुसार आईबाबा वैतागले आहेत. त्यांनाही मोकळा श्वास घ्यावासा वाटतो, आप्तस्वकीयांना भेटावसे वाटत आहे, पण दोघेही नियमांचे पालन करत वेळ घालवत आहेत. आम्ही तिघेही एकमेकांना धीर देत असलो तरी मी मागील सहा-सात महीन्यांत अगदी आईबाबांच्या समोरच ज्या आशा-निराशेच्या हिंदोळ्याहून गेलो, त्यापैकी बर्याच गोष्टी मी ह्यावेळी त्यांना सांगू शकलो नाही. पण लॉकडाऊन लेखनस्पर्धेमुळे मनात साचलेल्या गोष्टी लिहीण्याची संधी भेटली त्यासाठी सर्वांचे (विशेषतः मायबोली गणेशोत्सव 2020 संयोजक) मनःपूर्वक आभार.

तसेच जरा मोकळा झालो की माझ्या संशोधनावरही लिहीण्याचा माझा मानस आहे.