`गिल्ट!`

Submitted by पराग र. लोणकर on 11 September, 2020 - 01:39

`गिल्ट!`

``प्रिय सुषमा,
आपल्या शेवटच्या भेटीमध्ये आपल्या पुनर्भेटीसाठी आपण जो नियम किंवा अट ठेवली होती ती माझ्याकडे पूर्ण झाली आहे. तुझा याबाबतचा मेल नाही त्याअर्थी तुझ्याकडे ती पूर्ण झालेली नाही हे उघडच आहे. अर्थात यात मनापासून आनंदच आहे आणि परिस्थिती तशीच राहावी ही प्रार्थनाही! तरी माझ्याकडची बातमी तुला कळावी म्हणून ही मेल तुला पाठवत आहे.
तुझाच सुभाष!``

मी मेल पूर्ण केला आणि सेंड केला.

माझं मन भूतकाळात शिरलं. साधारण वीस-एक वर्षांपूर्वीची गोष्ट. सुषमा अन माझं एकमेकांवर खूप प्रेम होतं. मनानं आम्ही एकमेकांचेच झालो होतो. पण घरी कळवलं आणि दोन्ही घरून प्रचंड विरोध झाला. दोन्ही आई-वडिलांची विरोधाची कारणे वेगवेगळी होती पण विरोध ठाम होता. आम्ही दोघांनी आपल्या आई-वडिलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यात आम्हाला अपयश आलं. मात्र आम्ही दोघंही मातृपितृ भक्त होतो. त्यामुळे आई-वडिलांचा विरोध डावलून पळून जाऊन वगैरे लग्न करण्याचा पर्याय आम्हा दोघांनाही मान्य नव्हता.

आमची शेवटची भेट मला चांगलीच आठवतेय. मी सुषमाला म्हणालो,
``सुषमा ही आपली सध्याची शेवटची भेट असली तरी मी आपल्या मिलनाची आशा सोडणार नाही. आपलं एकमेकांवर अतिशय प्रेम आहे. आपण आजन्म ब्रह्मचारी राहून मिलनाची प्रतीक्षा करू. आपलं आपल्या आई-वडिलांवरही खूप प्रेम आहे. त्यामुळे त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना आहेच, त्यांच्या सेवेतही आपण कमी पडणार नाही. पण पुढे कधीही दुर्दैवाने ते दोघेही नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपल्यापैकी ज्या कुणाकडे अशी परिस्थिती निर्माण होईल त्यानं दुसऱ्याला मेल करून तसं कळवावं. पुढे जेव्हा दुसऱ्याकडे दुर्दैवाने तशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा आपलं कितीही वय असलं तरी आपण लग्न करूयात. खऱ्या प्रेमाचं एक नवं उदाहरण आपण जगासमोर ठेवू. पटतंय का तुला माझं बोलणं?``

``हो हो सुभाष, मला तुझा म्हणणं शंभर टक्के मान्य आहे. मी माझ्या आयुष्यात दुसऱ्या कुणा पुरुषाचा विचारही करू शकत नाही. मीही थांबेन कितीही काळ. अगदी आपण म्हातारे झाल्यावर जरी ती वेळ आली तरी आपण एकत्र होऊया.`` सुषमा मला म्हणाली.

आम्ही शेवटची एकदा एकमेकांना मिठी मारली आणि एकमेकांपासून दूर झालो. आम्ही ठरवल्याप्रमाणे त्या दिवसानंतर आज मी हा मेल पाठवेपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारे संपर्कात नव्हतो. एकमेकांचे मेल आयडी तेव्हापासूनच आम्हाला माहीत होते. त्यामुळे संपर्काचा हा मार्ग आम्ही तेव्हाच ठरवला होता.

हा सारा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहिलेला असताना ईमेल आल्याचा टोन वाचला आणि माझ्या हृदयाची धडधड वाढली. सुषमाचाच उत्तराचा मेल आलेला दिसत होता. मेल उघडायला लागलो आणि छातीच्या धडधडीबरोबरच कपाळावरही घाम दाटू लागला.

मी सुषमाचे उत्तर वाचू लागलो.
``सुभाष, तुझा मेल वाचला. काय लिहू हेच मला कळत नाहीये. तुझी कोणत्या शब्दात माफी मागू तेच मला समजत नाहीये. आपण दूर झालो आणि लग्नच न करण्याचा माझा निश्चय मी पुढील दोन वर्ष ठाम ठेवला. पण नंतर मात्र आई-बाबांनी आणलेल्या स्थळास होकार दिला आणि माझं लग्न झालं. वर्षभरातच आम्ही ऑस्ट्रेलियाला आलो आणि लवकरच येथेच सेटल झालो. मी मनानंही केतनशी एकरूप झाले. माझ्या दोन्ही मुलांचा येथेच जन्म झाला आणि आता आम्ही भारतात येण्याची अजिबात शक्यता दिसत नाही. इतकी वर्षे तू माझी प्रतीक्षा केलीस? खऱ्या अर्थाने आपल्या प्रेमाला तू निभावलंस. खरंच सांगते, माझ्या हृदयातील एका कोपऱ्यात अजूनही तू आहेस, पण तरीही मी आपलं प्रेम निभावू शकले नाही, तुझी प्रतीक्षा करू शकले नाही. आज तुझा मेल वाचून माझ्या मनात जो गिल्ट निर्माण झाला आहे तो आता मला आयुष्यभर वाटत राहणार आहे. खरंच मला माफ कर. मी आपल्या प्रेमाशी प्रामाणिक राहू शकले नाही.
तुझी न राहिलेली
सुषमा.``

मी मेल वाचून संपवला. माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.

मी सुषमाला परत मेल लिहावयास सुरुवात केली.

``सुषमा,
प्लीज तू माझी माफी मागू नकोस. उलट तूच मला माफ कर. माझा आधीचा मेल तसा फसवाच मेल होता. तुझी आठवण आली, आणि तू कशी, कुठे आहेस हे जाणून घेण्यासाठीच मी तो केला होता. तू लग्न केलेलं ऐकून उलट मला बरंच वाटलं. इकडे माझंही लग्न झालंय. माझे वडील कसे जमदग्नी होते, तुला माहितीच आहे. त्यांनी माझा विरोध हाणून पाडून मला बोहल्यावर उभंच केलं. नंतर माझाही संसार उत्तम झाला, उत्तम चाललाय. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तेव्हा प्लीज, अजिबात गिल्टी वाटून घेऊ नकोस. तुझं पुढचं आयुष्यही असंच सुखाचं जावो हीच सदीच्छा!
- सुभाष``

मी मेल पूर्ण केला. माझे डोळे पुसले. या माझ्या दुसऱ्या मेलनं सुषमा संतापणार होती, माझी निर्भत्सना करणार होती याची मला कल्पना होती. ते मला चाललं असतं, पण तिनं आयुष्यभर गिल्ट ठेऊन जगणं मला मान्य नव्हतं. तिनं तिच्या संसारात सुखी राहणं माझ्यासाठी सर्वात महत्वाचं होतं.

मी laptop बंद केला. माझे लिखाणाचे कागद आणि पेन हातात घेतलं आणि माझ्या नेहमीच्या लेखनाच्या कामास लागलो.

हे कागद आणि पेन, या दोन गोष्टीच आता मला माझ्या एकाकी आयुष्यात अखेरपर्यंत सोबत करणार होत्या...

***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

राहुलजी आपला मुद्दा एकदम बरोबर आहे. सुरुवातीला हा विचार माझ्या मनात आला होता, परंतु नंतर याबाबतचा योग्य तो बदल कथेत करायचा राहून गेला हे मान्य करतो. आता आवश्यक बदल कथेत केला आहे.

राहुल बावणकुळे, abhijat, धनुडी - अभिप्रायांबद्दल मन:पूर्वक आभार!