भूमिका - २

Submitted by भानुप्रिया on 9 September, 2020 - 08:34

भाग पहिला: https://www.maayboli.com/node/76576

आता पुढे:

--

‘स्वतःशी संवाद व्हायला हवा गं. हे extrovert आणि introvert वगैरे नसतं काही. आपण आपली गरज ओळखून त्या त्या भूमिकेत शिरायचं असतं. भोवतीचे सगळेच, सजीव आणि निर्जीव, फक्त निमित्तमात्र असतात, आपल्या ह्या process साठी. आपण नेमकी हि process विसरतो आणि त्या निमित्तांमध्ये गुंतत जातो. आपला consciousness आपल्याला जाणीव करून देत असतो त्याची, फक्त ते सजगपणे बघायचं कि नाही हे आपण ठरवत जातो, प्रत्येक क्षणाला. कसंय ना, every moment is a fresh beginning. And we must learn to cease the moment.’

माधव कधीतरी म्हणाला होता तिला. माधव. अचानकपणे एखादा माणूस आयुष्यात यावा अन त्यानं अवघं आयुष्य व्यापून टाकावं असं काहीसं तिचं आणि माधवचं नातं. मैत्रीच ती, पण रूढार्थानं कुठल्याही definition मध्ये नं बसणारी.

"Format मध्ये बसवायला गेलीस ना, तर आहे ते हि निसटेल सगळं. हे नातं, हे equation हा सगळा ना एक natural course आहे, त्याला स्वतःचा असा एक विविक्षित flow आहे. त्याला आपण आपल्याला माहिती असणाऱ्या संकल्पनांचे आणि formats चे बांधारे घालायला गेलो कि तो फिसकटणार आहे. त्याला थांबणं माहिती नाही, फक्त वाहणं किंवा आटून जाणं इतकंच कळतं ह्या flow ला. आणि तू त्याच्या मध्ये येतेयस आत्ता. नाईलाजानं निभवायला लागावं असं बंधन असलेलं नातं हवं असेल तर इतर ऑप्शन्स आहेतच आयुष्यात. पण खऱ्या अर्थानं समृद्ध करणारं काही हवं असेल ना, तर आधी त्या समृद्धतेला, त्या प्रखरतेला झेलायची तयारी ठेवावी लागते. आणि त्यासाठी मनाच्या तळापर्यंत प्रामाणिक असावं लागतं. तिथेही जर का फसवा फसवीचा गाळ साठलेला असेल तर ओझं होतं सगळ्यांचंच, माणसांचं, नात्यांचं आणि पर्यायांनी स्वतःचंही." कधीतरी माधव म्हणाला होता ते तिला आठवलं.

नीट ठेवलेला एखादा कपडा कपाटातून काढायला म्हणून कपाट उघडावं अन भस्सकन अंगावर कपड्यांचा ढीग सांडावा असं काहीसं वाटायला लागल्यानंतर मात्र रेवतीनं चक्क मोबाईल काढून ‘सॉरी, आज नाही जमणार’चा एक छोटेखानी मेसेज त्यांच्या ग्रुपवर पाठवून दिला. थोडा वेळ तरी शांतता मिळावी ह्या उद्देशानं आणि तिच्या आवडत्या जागी जायला परत फिरली.

‘आवडती जागा’ ह्या विचारसरशी खूप आतून हसू आलं तिला.

‘आवडती जागा! म्हटलं तर लव ऍट फर्स्ट साईट आणि म्हटलं तर बिचकत झालेली ओळख, कालांतराने जुळून आलेली मैत्री आणि मग एका बेसावध क्षणी आलेली प्रेमाची अनुभूती! एक दिड वर्षापूर्वी पटलंच नसतं आपल्याला, हे असं काही असू शकेल म्हणून. म्हणजे स्वतंत्र असण्याचा विचार करणं वेगळं आणि तो प्रत्यक्षात जगणं वेगळं. अनपेक्षितपणे कुठून कुठे विषय गेला अन घर हि कल्पना नव्याने मांडायला लागली, आपलीच आपल्याला. एकाकी कधीच नव्हतो ह्या काळात, पण तरीही एकटेपण अनुभवलं, त्याने काहीसं समृद्ध केलं, काहीसं तिरसट केलं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठं केलं. घर आणि सुरक्षिततेची भावना ह्या दोन्ही गोष्टही एकमेकांत इतक्या बेमालूमपणे मिसळलेल्या आहेत ना, शतकानुशतकं, कि सहज गुंता होतो. अतिशय कठीण अशी दोन वर्ष जायला लागलीत, ह्या दोन्हीचं वेगवेगळं अस्तित्व कळायला, दोन्हींची गरज कळायला आणि मग वाटणंही किती फोल आहे हे लक्षात यायला. आज डोक्यावर एक छत आहे, त्याला घर म्हणतोय आपण. पण घर म्हणजे basically फक्त विसावा घेण्याची एक स्थिर जागा असते असं आता प्रकर्षानी जाणवतं. घराचं घरपण, त्यातली ती सेफ्टी ह्या गुंत्यातून काहीसं नाईलाजानं, काहीसं धाकधुकीनं आणि प्रचंड जिद्दीनं बाहेर पडलेय मी. वर्षभरापूर्वी जेव्हा त्याआधीच्या आठ वर्षात चार वेळा घरं बदलत होतो, तेव्हाचं घर आणि आत्ताचं घर ह्यात तरीही जमीन अस्मानाचा फरक आहे. तेव्हा घराचे aspects च वेगळे होते. तेव्हा घर म्हणजे सुहृद होता. घरातली प्रत्येक छोटी गोष्ट ‘दोघांची’ असावी असा अट्टाहास होता, माझाच. तो असेल तिथे आणि तेच घर आणि तो नसेल तर पार आपण मुळातून बेघर हा विचार डोक्यात नक्की कुठून आणि कसा आला, काय माहीत! पण ह्याचंही उत्तर बहुतेक प्रत्येक गोष्टीला नक्की कुठून हि अशी भावना इतकी बोकाळत गेली कि त्यातून तयार झालेली dependency म्हणजेच प्रेम असा बिनदिक्कतपणे समज करून घेतला आपण स्वत:चा.’

घराचं कुलूप उघडून रेवती आत आली, ठरलेल्या जागी वस्तूंची रवानगी करून कॉफीसाठी आधण ठेवून ओट्याला टेकून उभी राहिली अन समोरचा white board नजरेला पडला. ही सुहृदची सवय. गोष्टींचा विसर पडू नये म्हणून त्याने शोधलेला जालीम उपाय. आठ पैकी साधारण साडे सात वर्षं सगळ्या कामांची यादी त्यावरच व्हायची.

त्या बोर्डवर आजची तारीख आणि ‘signatures’ असं ठळक लिहिलेलं होतं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Mast