भूमिका - १

Submitted by भानुप्रिया on 7 September, 2020 - 11:04

टीपः

पहिल्यांदा लिहायला सुरुवात केली, ती वयाच्या ९ व्या वर्षी, कवितेने. अतिशय टुकार होती, पण लिहीत गेले. घरातून प्रोत्साहन सुद्धा मिळत गेलं, गेली अनेक वर्षं माबोवर सुद्धा मुख्यत्वे कविताच टंकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पहिली कथा पोस्ट केली आणि तुम्हा सगळ्यांचे प्रतिसाद बघून असं वाटलं की गूगल डॉक्स मध्ये अर्धवट राहिलेल्या कथा पूर्ण कराव्यात. आज पोस्ट करतेय ती मी लिहिलेली पहिली कथा, खरं तर! पण काही कारणांनी अर्धवट राहिली होती. पहिला भाग आवडला तर नक्की कळवा, म्हणजे पुढचं लिहायला उत्साह येईल कदाचित!
वेळ काढून वाचणाऱ्यांचे खूप खूप आभार!

--

जानेवारीतल्या बोचऱ्या थंडीत, मावळतीचा सूर्य बघत, ‘तिच्या’ घरातल्या तिच्या आवडत्या आणि एकुलत्या एक बिनबॅगवर शांतपणे बसली होती रेवती. समोर डिव्होर्स पेपर्स, थंडगार झालेल्या कॉफीचा एक मग आणि घरभर पसरलेली शांतता.
‘एक अख्खं वर्षं झालं आज, पहिलं आवर्तन संपून. आज ह्या पेपर्स वर सह्या झाल्या कि वेडेपणाचा पहिला अध्याय कायदेशीररित्या संपणार. मोकळं वाटतंय कि त्रास होतोय ह्याचा हे मात्र आज वर्षभरानंतर हि कळत नाहीये. कळेल हळूहळू असा म्हणता म्हणता एक वर्ष संपलं.
सुरुवातीला परक्या वाटणाऱ्या ह्या फ्लॅटचं घर होत गेलंच की.’
पश्चिमेला क्षणाक्षणाला नाहीसा होत जाणारा सूर्य; वेळ आणि जागा जमून आलीच तर त्याबरोबर कॉफीचा एक मग समोर घेऊन स्वतः भोवती विचारांचं जाळं विणत बसणं हि रेवतीची चैनीची व्याख्या. त्या अस्ताला जाणाऱ्या सूर्यबिंबात नकळत विरघळत जाणं हे हि तसं नेहमीचंच. कित्येकदा तर भर सिग्नलला सुद्धा सहज तंद्री लागायची तिची. मागच्या गाड्यांचे हॉर्न कानावर आपटायला लागले कि हिने भानावर येऊन गाडी काढावी, तिरसट पुणेरी शेऱ्यांकडे सराईतपणे काणाडोळा करून!

“संध्याकाळची वेळ म्हणजे घरी परतायची वेळ, मग सूर्याला नको का घरी जायला त्याच्या?” तिच्या आजीनं कधीतरी लहानपणी तिला सांगितलेलं, अन तिला अगदी १००% पटलेलं. कुठूनसं तिला आठवलं.

‘कसलं घर अन कसलं काय! शब्द आहेत हे नुसते! घर वगैरे खरंतर अंधश्रद्धा आहेत. जितकं कृत्रिम/अनैर्सगिक लग्नाचं बंधन ना, तितकंच कृत्रिम हे ‘घर’! आपण आपल्याला सेफ वाटावं, एक legit फील यावा, काहीतरी स्थावर मालमत्तेवर हक्क सांगता यावा म्हणून तयार केलेली हि एक संकल्पना. कित्ती फोफावलीय हि. होतं का हे सगळं आधी? जंगलातच राहायचो ना आपणही? मिळेल तिथे खायचं, मिळेल तिथे राहायचं, शक्य गटागटाने, नाहीतर मस्तपैकी एकटंच. मोठ्या गटात राहताना त्यातल्या त्यात भीती कमी होत असेल बहुतेक, तेव्हाच्या माणसांची. कुठल्यातरी कारणाने मरणार तर आहोतच, पण गटात असू, तर आपल्या आधी इतरांचा नंबर लागायची शक्यता त्यातल्या त्यात जास्त! असल्याच काहीतरी भन्नाट विचारांतून हा समाज जन्माला आला असणार. आणि त्याची पुढची पायरी म्हणजे आपापलं inner circle तयार करत जाण्याची. हा माणूस माझा, हा नाही, हा थोडा वेळ बरा वाटतोय, नेहमी नेहमी एकत्र नको, ह्या एकाशी खूपच पटतंय आपलं, सेम सेमच कंद-मुळ आवडतात आपल्याला types विचारांमधून लाईफ पार्टनर तयार होत असावेत. आणि मग आपण ह्या एका झाडाखाली एकत्र राहतो, झोपतो, खातो-पितो, म्हणून हे आपलं ‘घर’, असंच काहीसं असणार हे. आणि आपलं हे असं मत असूनही आज एक वर्षानंतर ह्या ‘घरात’ आपल्याला कसलं तरी कमालीचं फीलिंग आलंय. अगदी surreal म्हणावं असं. सेल्फ कॉन्ट्रॅडिक्शन मधून बाहेर कसं यावं ह्याचा शोध घ्यायला हवा एकदा. म्हणजे simultaneously आपण parallel tracks वर कसं काय…’

अचानक व्हायब्रेट झालेल्या फोनमुळे रेवतीची विचारांची ती तंद्री तुटली अन ती स्वतःशीच हसली.

‘बापरे, मावळतीचा सूर्य उगाचच आपल्याला philosophical बनवतो. कुठून कुठे पोचले मी! इतकीही काही वाईट नाहीये म्हणा, घराची concept! पण गेल्या वर्षभरात प्रकर्षाने जाणवायला लागलंय कि उगाच खूप attach झाले होते मी ह्या सगळ्याशी!’

फोन उचलून बघितलं तर त्यावर माधवचा मेसेज.

‘कुठे?’ नेहमीसारखा, एका शब्दाचा मेसेज.

‘घरातच आहे, निघतेय. कॉफी पीत होते.’ Send करायच्या आधी मात्र तिनी त्या मेसेजमधलं शेवटचं वाक्य delete केलं.

‘कशाला उगाच लांबण लावत बसायची? विचारलंय का त्याने?’ एक मानसिक नोट.

भरकन ‘नेहमीच्या जागी भेटू, १५ मिनिटात.’ असा अजून एक मेसेज पाठवून रेवती झटकन उठली अन घराला कुलूप घालून बाहेर पडली. मात्र आज रोजचा उत्साह नव्हता हे तिला क्षणार्धात जाणवलं. ना बाहेर पडण्याचा उत्साह, ना मित्रांना भेटून चकाट्या पिटण्याचा, ना कोणाशी बोलण्याचा. थोड्या वेळापूर्वी लागलेली विचारांची तंद्री तिला खुणावत होती. स्वत:शीच एक हार्ट टू हार्ट व्हायला हवंय, आत्ताच, ह्याच क्षणी अशी अत्यंत तीव्र इच्छा तिच्या मनभर पसरत गेली.

क्रमशः

भाग २: https://www.maayboli.com/node/76598

Group content visibility: 
Use group defaults

छान सुरवात, सूर्य उगवताना आणि मावळताना पाहताना आपण आपल्यालाच नव्याने सापडतो. नि:शब्द क्षण , खूप छान संवाद होतो.. स्वतः शीच