संवाद सूत्र

Submitted by पाचपाटील on 5 September, 2020 - 18:15

"काय रे? काय चाललंय?"

- - अरे वा वा.. अगदी वेळेवर आलास.. हे बघ.

"काय्ये हे??"

- - हे जग हलवून टाकणारं, अद्भूत आणि कालातीत असं
लिखाण केलेलं आहे मी.. तूच माझा पहिला वाचक.

"आई ग्ग.."

- - वाच वाच... आता कळेल त्यांना मी काय चीज आहे ते..! अर्थात हे गंभीर आणि अभिजात लिखाण
तुला झेपणार नाही... पण सावकाश वाच... मग समजेल.

"काय्ये हे..! नुसता शेणसडा चिवडलाय आणि जोडीला
हंबरडे न् हुंदके..!"

- - अरे वेड्याss... ह्या माझ्या तिच्याबद्दलच्या तरल भावना आहेत.. आणि हे सगळं शब्दांत पकडताना माझा आत्मा पार सोलवटून निघालाय रे ss..

"कशाला पकडलं मग शब्दात..?? आता सगळ्यांचेच आत्मे
सोलवटून निघणार बिनाकामाचे"

- - माझ्या संवेदनशील प्रतिभेचे धुमारे असे निर्दयपणे
छाटताना काय मिळतं तुला ??

"काय मिळणारे तुझ्याकडनं? ... त्यापेक्षा तुझ्या टणक चेहऱ्यावर प्राचीन काळी उगवलेल्या, दाढीच्या पारंब्या
छाटता येतात का बघ.. रईवारच्चे उद्या"

- - बरं बरं.. पण सांग ना.. मी जसा दिवसरात्र तिचाच विचार करत राहतो.. तशीच ती पण माझाच विचार करत असेल काय रे?

"अरारा sss... GDP पार मायनसमधी गेला राव... अजून अवघड दिसतंय इथनं पुढं"

- - छि:छि:.. पेपर काय वाचतोयस अरसिक माणसा.. इथं किती गहन विषय चाललाय.

"हम्म..बरळ."

- - काही नाही.. GDP ची काही चिंता करू नकोस रे.. माझे हे भावचरित्र एकदा जगापुढे आले की ह्या शतकातल्या
महानतम लेखकाचा मित्र म्हणवून घेशील तू.... आहेस कुठे!! पण त्यासाठी मला तातडीने पाचशे रुपयांची गरज आहे.. आणि तू ते मला देणार नाहीस काय??

"ह्या ह्या ह्या...तुझ्या डोक्याचा एक फ्यूज उडून किती दिवस झाले..?"

- - असं काय करतोस रे... थोडेफार तरी दे की... जरा नड आहे.

".. ते जग वगैरे हलवून टाकायला निघालेले लेखक
औकातीवर आले वाटतं.. ह्या ह्या."

- - दे की रेss

"खरंच काय नाय माझ्याकडं... मीच आलतो तुझ्याकडनं काय मिळतंय का बघायला.. पण तू तुझा सोलवटलेला आत्मा ढिला करून माझ्यापुढं टाकला."

- - दे कीss.. बघ जराss खिशात काही राह्यले असतील तर चुकून..

"खरंच काय नाय ... पण थांब.. करूया कायतरी जुगाड....
असं करू... आपण उद्यापासनं सिग्नलला उभं राहू आळीपाळीनं... मी गाड्यांना लिंबं-मिरच्या लावतो..
तू काचा पुस..
नायतर तुझ्याकडं हे कागद हैतच भरपूर..
सरळ चणे-शेंगदाण्याची लाईन पकड... काय म्हणतोस..??
ठरलं ना मग..?? चल मग.. येतो उद्या सकाळच्याला"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ...

ते जग वगैरे हलवून टाकायला निघालेले लेखक
औकातीवर आले वाटतं.. ह्या ह्या.<< भारी लिहिलयं..

छान विनोदी लेखन ...
ते जग वगैरे हलवून टाकायला निघालेले लेखक
औकातीवर आले वाटतं.. ह्या ह्या.">>> एकदम भारी..

दे की रेss
हे त्याच टोनींग मधे वाचले.
Lol मजेशीर।

<< ह्या ह्या ह्या...तुझ्या डोक्याचा एक फ्यूज उडून किती दिवस झाले..? << फारच मजेशीर आहे. Happy Happy Happy