लेखनस्पर्धा -- माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन -- पाचू

Submitted by पाचू on 5 September, 2020 - 10:19

१८ मार्च ला माझा मुलगा शाळा अनिश्चित काळासाठी बंद झाल्याच्या आनंदातच घरी आला. तसे आधीपासूनच कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केलीच होती, पण युके सरकार लवकर लॉकडाऊन जाहीर करत नसल्यामुळे सगळीकडे काळजी वाढत चालली होती. रोज वाढत चाललेला मृत्युदर भीती वाढवत चालला होता. मग एकदाचे लॉकडाऊन जाहीर झाले आणि जीव भांड्यात पडला. कारण इकडे NHS ने स्पष्ट सूचना दिल्या होत्या की तुम्हाला कोवीडची लक्षणे वाटत असतील तर GP कडे किंवा हॉस्पिटल मध्ये येऊ नका, उलट घरीच आयसोलेट करा. त्यामुळे असे काही वाटलेच तरी डॉक्टरकडे जायचा मार्ग बंदच होता. जे काही असेल ते फोनवरच बोलायचे होते. त्यामुळे घरी असलेलेच बरे असे वाटत होते. नंतर ऑफिसने ही वर्क फ्रॉम होम दिले आणि मग सगळेच घरी. आम्ही दोघेही IT मध्ये असल्यामुळे कामामध्ये फार काही फरक पडणार नव्हता. आणि मुलाची ऑनलाईन शाळा चालू राहणार होती. मुलीच्या शाळेने मात्र प्रायमरी असल्याने ऑनलाईन फार काही ठेवले नव्हते.

सुरुवातीला बरेच काही प्लॅन्स केले होते, ‘quality time’ ची बरीच स्वप्ने बघून झाली होती. पण हे वाटते तितके सोपे नाही हे हळूहळू लक्षात यायला लागले होते. पहिली गोष्ट म्हणजे सगळेच घरात असल्यामुळे घरकाम उलट वाढलेच होते. त्यातून आठवड्यातून काही दिवस तरी साफसफाईला जी बाई यायची तीही बंद झाली होती. ‘वर्क फ्रॉम होम’ कधीकधी करणे आणि नेहेमीच करणे यातला फरक लक्षात येत होता, कारण घरून काम करताना उलट लॉगऑफ करायच्या वेळेचा काही ताळमेळच राहात नव्हता. शिवाय मुलीचा काही विशेष अभ्यास नसल्याने ‘मी आता काय करू’ चे तिचे गाणे चालूच होते. आमचे इथल्या भारतीय लोकांबरोबरचे वेगवेगळे ग्रुप्स असल्यामुळे आधी आमचे बरेच socialisation असायचे. पण आता अचानकच सर्व बंद झाल्यामुळे कुणाशी काही संबंधच राहिला नाही. मुलांचे वाढदिवस, कितीतरी सण, जवळपासच्या ट्रीप्स, वाचनकट्टा, मराठी मंडळाचे गेट टुगेदार, किंवा सहज घरी येणेजाणे असे सगळे आयुष्यातून अचानक निघूनच गेले त्यामुळे हा एकटेपणा अगदीच जाणवायला लागला होता. दुकाने बंद झाली होती, त्यामुळे तेही बाहेर जाणे नव्हते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भारतात घरच्यांची खूप काळजी वाटायला लागली होती. कारण आईवडिलांचे वय झालेले आणि त्यांच्याही कामाच्या बायका बंद झालेल्या. ते कुणीच बाहेर जात नव्हते म्हणून तेवढे तरी बरे होते. तसा तर एरवीही खुशाली विचारायला रोज घरी फोन असतोच, पण आता जरा जास्तच फोन वाढले. त्यांनाही आमची काळजी लागून राहिली होती इकडच्या बातम्या ऐकून. लॉकडाऊन चालू झाल्यावर लगेच गुढीपाडवा होता, पण रोजचा मृतांचा वाढत चाललेला आकडा पाहून आणि मेडिकल सिस्टिम मधल्या सर्वांचे हाल पाहून सण साजरा करायची इच्छाही झाली नाही. त्यातच काही दिवसांनी माझ्या आत्येसासूबाई आणि त्यांचे यजमान कोवीडमुळे एका आठवड्याच्या अंतराने गेले. त्या आमच्या अगदी जवळच्या होत्या. मग माझ्या सासूबाईंना काही कारणाने एकदम ICU मधेच ऍडमिट करावे लागले पण flights बंद असल्याने आम्ही जाऊ शकत नव्हतो. इथे बसून काळजी करत होतो फक्त. सुदैवाने त्या बऱ्या होऊन घरी आल्यामुळे वाईट प्रसंग टळला. मात्र स्वतःची हतबलता चांगलीच जाणवत होती. एकंदरीत सुरुवातीचा काही काळ सगळ्या परिस्थितीशी जुळवून घेणे आव्हानात्मकच वाटत होते. त्यातच इकडे हजारो लोक समर टाइम म्हणून लॉकडाऊनचे सगळे नियम धुडकावून सर्रास बीचवर, पार्कमध्ये मुलांना आणि वृद्धांनाही घेऊन जात होते, आंणि ते पाहून आमची भीती मात्र वाढत चालली होती.

मात्र जसेजसे सगळे परिस्थितीला सरावले आणि जरा स्थिर झाले तेव्हा जाणीव झाली की मला आत्ता आयुष्यातली सर्वात किमती गोष्ट मिळालेली आहे, जी रोजच्या आयुष्यात कितीही प्रयत्न केले तरी मिळवणे खूप अवघड होत असते - ती म्हणजे वेळ! जगाशी संपर्क तुटल्यासारखाच असल्यामुळे स्वतःबद्दल विचार करण्याची मिळालेली ही सुवर्णसंधी होती. आयुष्यात महत्वाच्या नसलेल्या गोष्टींची या काळात आठवणही झाली नाही अजिबात. काय आणि कोण महत्वाचं आहे हे मात्र नीट समजलं. आपल्या मुलांसाठी आपण सगळेच खूप कष्ट घेत असतो. पण त्यांच्याबरोबर घालवलेला भरपूर वेळ यासारखं मौल्यवान आपण त्यांना दुसरं काहीच देऊ शकत नाही हे या काळात खूप चांगलं लक्षात आलं आहे, त्यांना एवढं आनंदी बघितल्यावर. कधीकधी अजाणतेपणी आपण ज्यांना आपलं काही पडलेलं नसतं त्यांचं मन राखण्यासाठी विनाकारण धडपड करत राहतो आणि आपल्याच लोकांकडे आपलं दुर्लक्ष होतं, आपण त्यांना गृहीत धरत राहतो. आता मात्र यातला फरक चांगला स्पष्ट झालाय, आणि माझ्या माणसांचं महत्वही चांगलंच लक्षात आलंय. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आता रोज नकळत प्रार्थना केली जाणार आहे.

या काळात झालेली सर्वात महत्वाची जाणीव म्हणजे आपलं आयुष्य किती किमती आहे ही! इतरवेळी आपण कधीतरी उद्वेगाने ‘आयुष्य नकोसं झालंय’ वगैरे सहज म्हणून टाकतो. पण तेच आयुष्य हातातून निसटायची शक्यता समोर उभी ठाकली तेव्हा प्रखरपणे माझ्याच आयुष्याची मला असलेली किंमत लक्षात आली. आणि निसर्गासमोर माणूस किती क्षुद्र आहे हे ठळकपणे जाणवलं. निसर्गासाठी माणूस ही केवळ एक प्रजाती आहे, आणि आपण निसर्गावर विजय मिळवायचा प्रयत्न करणं थांबवलं पाहिजे, नाहीतर आपलं काही खरं नाही हेच खरं. आपलं आयुष्य आज आहे पण उद्याचं काही सांगता येत नाही, त्यामुळे जेवढं आयुष्य हातात आहे ते चांगलं जगावं या भावनेतून आपल्यापैकी प्रत्येकजण गेला असणार. माझ्या बाबतीत आता स्वतःच्या कुठल्याही समस्येचं ‘भयंकरीकरण’ केलं जाणं बरंच कमी झालं आहे. कारण आयुष्यच संपणं यापेक्षा कुठलीही समस्या लहानच असेल. अर्थातच सर्वांचं असं आहे असं म्हणता येणार नाही, कारण जे लोक या काळात बेघर झाले होते, हातावर पोट असलेले लोक, मुंबईहून घरी जायलाच ज्यांना प्रचंड अडचणी होत्या ते, जे वाटेतच मृत्युमुखी पडले होते त्यांचं कुटुंब यांच्यासाठी तर जगणंही खूप कष्टांचं झालं होतं. मात्र त्यांचे हाल पाहून स्वतःच्या परिस्थितीबद्दलच्या तक्रारी आपोआपच खूपच कमी झाल्या आहेत. उलट अशावेळी मी त्यांच्यासाठीच काय, कुणासाठीच प्रत्यक्ष फार काही करू शकत नसल्याने झालेली खुजेपणाची जाणीव मात्र आता कायम राहणार आहे. आणि ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून या लोकांना मदत केली, त्यांच्याबद्दल कायम खूप आदर राहणार आहे. असल्या भयानक परिस्थितीमध्ये सगळ्याच देशांमधले डॉक्टर्स, एकूण मेडिकल स्टाफ, पोलीस, सरकारी कर्मचारी, साफसफाई करणारे लोक, आपण घरी बसून ऑनलाईन ऑर्डर केलेले सामान घरी पोचवणारे लोक, सुरक्षायंत्रणा, या समस्येवर उपाय शोधणारे शास्त्रज्ञ, यापैकी कुणीही आपल्या जबाबदारीतून हात वर केले असते तर जगाची आज काय अवस्था असती कल्पना करवत नाही. मी जरी या प्रकारचे काम करू शकत नसले तरी यापुढेही स्वतःपुरते तरी नियम पाळत राहणे आणि कमीतकमी आजूबाजूला अडचणीत असलेल्याना शक्य तेवढी मदत करत राहणे या दोन गोष्टी ठरवलेल्या आहेत.

आता इकडे शाळाही चालू झाल्या आहेत, आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टीही. याचे पुढचे परिणाम काय होणार आहेत माहित नाही, पण जे असेल त्याला तोंड देण्याशिवाय हातातही काही नाही. मात्र शास्त्रज्ञ, डॉक्टर्स यावर काहीतरी मार्ग नक्की शोधून काढतील यावर माझा विश्वास आहे आणि हे संकट अजून काही नुकसान न करता लवकर टळो ही सदिच्छा ही आहे.

Group content visibility: 
Use group defaults

अवघड काळ, परिस्थिती धीराने पार पाडलीत. अभिनंदन. "भयंकरीकरण" उर्फ Catastrophization कमी होणे ही मोठी acheivement आहे. "फेसबुक/इन्स्टा पोस्ट लाईक नाही केले" किंवा "आहेरात इतकीच रक्कम दिली" म्हणजे काही तरी भयंकर घडल म्हणून एकमेकांवर रूसणारे लोक आता बरेच सुरळीत वागतात. (तुम्ही त्या रूसणार्‍या मंडळीत कोव्हीड आधीही नसाल पण तुमचा अनुभव/ भावना वाचून अगदी मनात भिडल्या).

सीमंतिनी, mi_anu, मुग्धामोहिनी, कविन, मंजूताई, Aaaradhya प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिसादांमुळे confidence आला Happy

Catastrophization कमी होणे ही मोठी acheivement आहे  >> सीमंतिनी, हो खरंच, त्यामुळे आयुष्य बरंच सोपं झाल्यासारखं वाटत आहे. नाहीतर आधी स्वतःलाही  कितीतरी गोष्टींसाठी माफ करता येत नव्हतं. 

सुरेख लिहिलंय.
सीमंतिनी,तुमच प्रतिसाद मस्त आहे.

बोकलत, मनस्विता, Sadha manus, वावे, देवकी, मानव पृथ्वीकर - प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद Happy