चिठ्ठी भाग 10

Submitted by चिन्नु on 21 February, 2020 - 09:34

शोभाताईंनी अनुला बळेच उठवून बसवलं तशी मघापासून खुसुखुसु हसणार्या मुग्धाला त्याने तोंडावर बोट ठेवून गप्प बसायला सांगितले. पण नीलू आणि मुग्धा अधिकच हसायला लागल्या. आता मात्र अनु चिडला. पण सर्वांसमोर त्याला काही बोलता येईना. तसा त्याने मोर्चा त्याच्या सुमाक्का कडे वळवला-
"जेवायला मिळणार आहे का आज?"
त्याच्या प्रश्नाने गडबडून उठली सुमा.
"अगं बाई, हो हो" म्हणाणार्या सुमाला नीलुने पुढे होऊन खाली बसवलं.
"रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाहीये तुमच्या. मी आणि मुग्धा बघतो काय ते. तुम्ही बसा", अशी ताकीद देत ती आणि मुग्धा कामाला लागल्या.
आपल्या वरचं लक्ष दुसरीकडे वळवायचा प्लॅन यशस्वी झाल्याबद्दल सुखावला अनु. विजयी मुद्रेने जयंताकडे बघत त्याने कागदांसाठी हात पुढे केला.
"द्या इकडे बाबा. मी सांगतो काय ते"
असं म्हणत म्हणत विचारपूस करायला आलेल्या हनी आणि बनीला टक्कर देता झाला तो. शोभाताईंनी पटकन सावरलं आणि मांडीवर बसवलं.
"अनु, थांब रे बाळा. पड बघू. बरं नाहीये तुला"
"पण मला माझ्या चिठ्ठया हव्यातच काकुआज्जी"
"हो रे. पण आता तर नाही नाही म्हणालास. आता काय लिहिलंय सांगतो कसं काय म्हणतोस लबाड? ", कागदं अनुला देत जयंताने विचारलं.
"बाबा, तुमची भीती वाटत होती तेव्हा", अनुने प्रांजळपणे कबुली देऊन टाकली.
"मग आता काय झालं? ", शोभाताईंनी अनुचे चेहर्यावर झाकलेले हात बाजूला करत विचारलं.
"काय नाय बाबा जेवायला बसतील ना? मग नाही वाटणार भीती. लांबून ते माझ्या एवढेच दिसतात"
अनुचं स्पष्टीकरण ऐकून एकच खसखस पिकली.
मुग्धा घरून वरणभाताचा कुकर घेऊन आली. नीलुने तोवर आईने दिलेली भाजी, आमटी भांड्यात काढून ताटं वाढायला घेतली होती. हनी बनी या जुळ्या चिमण्यांना हाताशी धरून तिनं कोशिंबीर केली. सुमा सर्वांना कौतुकभरल्या नजरेने बघत राहिली.
हसतखेळत जेवणं झाल्यावर सर्वांचे डोळे अनुकडे लागले.
"बोला आता शेठ"
जयंताने अनुला हवं तसं 'दूर' बसून अनुच्या 'चिठ्ठया' काढल्या.
"हम्म.. ती बाणवाली चिठ्ठी काढा बाबा. ती मी किनै देवबाप्पाला लिहिली होती. पहिली चिठ्ठी बाप्पाला. हो की नै मुग.. मुग्धातै?"
"बरं पण हे काय लिहिलंय तेही सांग. कछ कछ? म्हणजे काय रे? अक्षर कधी सुधारणार आहात आपण?"
जयंताच्या प्रश्नावर जीभ चावली अनुने.
"अहो आता ओरडू नका ना. बरं नाहीये त्याला ", सुमा कुजबुजली. तिच्यातला 'आई mode' कायम on असे.
"कछ कछ नाहीये कै- कुछ कुछ होता है आहे!", अनु लाजत लाजत म्हणाला!
(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users