तथास्तु

Submitted by दत्तात्रय साळुंके on 22 August, 2020 - 07:05

तथास्तु

हात जोडून डोळे मिटून
गणपती समोर उभा होतो
बंद डोळ्यात रुप त्याचेच
साठवत होतो

तेवढ्यात त्यानेच साद घातली
म्हणाला डोळे उघडे असेपर्यंत
दर्शन माझे होत नाही
कारण माझ्या व्यतिरिक्त
दिसते तुला बरेच काही

तुझे कार्य मी तडीस न्यावे
म्हणून कार्यार्ंभी पुजतो मला
नंतर मात्र माझ्यावाचून काही अडत नाही तुला
तुझ्या कामात कुठे असतो मी ?
माझ्या नियमांनाही त्यात स्थान नसते
तुला मात्र पैसा, प्रसिद्धी, सत्ता हवी असते
करत जातोस उलट सुलट काही बाही
माझ्या सुक्ष्म डोळ्यातून सुटेना काही
अगदी तुमच्या अंतराळातल्या उपग्रहासारखे
न्याहळतो मी तुझ्या पोटातले

मी आता ठरवून टाकलंय
तुझे अपराध पचवून पोट माझं थकलंय
तेव्हा यापुढे तुझे अपराध तुझ्यापाशी
माझ्याकडे चालणार नाही मखलाशी
हातातला परशू, चक्र, त्रिशूल सारे काही
सज्जनांना राखायला आणि पाप्यांना
मातीत माखायला
माझ्या लांब कानांना ऐकू येते
तुझी स्वार्थी मायक्रो डेसिबलमधली कुजबुज
तेव्हा यापुढे नाही चालणार लांडीलबाडी चहाडीबाज
मी म्हणालो
देवा मी चुकलो
चकव्यात द्वैताच्या फसलो
जर मी तुझेच रुप
का व्हावे एवढे कुरुप ?
ज्ञानमयी मिही होईल
प्रेम, भूतदया, बंधुभाव जागविल
गणपतीने हसत तथास्तु म्हटलं

© दत्तात्रय साळुंके
22-8-2020

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@
द्वैत जी
आसा जी
रुपाली जी
अनन्त जी

खूप धन्यवाद प्रतिसादाबद्दल