ओए ओए, तर्रीवाले पोहे

Submitted by म्हाळसा on 8 August, 2020 - 22:10
tarriwale pohe

यंदा lockdown मुळे, सकाळच्या नाश्त्याचा वीडा उचललेले नवरोबा व त्यांच्या हातचे तर्री पोहे, ह्या बद्दल तर मी अगदी कढईभर लिहू शकते..
अहो तुम्हाला सांगते जेव्हा सकाळी डोळे चोळत बेडरूम मधून बाहेर आले तेव्हा नवरोबा Alexa च्या तालावर चांगलेच थिरकत होते.. त्यांच्या मूडचे तीनतेरा वाजवत मी हसत विचारलं “आज नाश्त्याला काय?”.. त्यावर “पोहे” ह्या विषयात phd केलेल्या नवरोबाने प्लेटमधे गरमागरम पोहे व तर्री आणुन देत “शेव आणि लिंबू आता स्वतः उठून घ्या” असं खोचकपणे सांगितलं. चहाबरोबर नाश्त्यासाठी पोहेच असणार हे मला अपेक्षित होतंच कारण इतर विषयांमधे तशी त्यांची बोंबच.. असो.. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघवला नसेल कदाचित असं मानून मीही त्यांच्याकडे दुर्लक्ष फेकून मारलं आणि पोहे खात कपात दिलेल्या राजसिक पेयावर लक्ष केंद्रीत केलं ..
भरपूर दाणे व मिरची घातलेले तिखट पोहे, त्यावर जहाल तर्री व रतलामी शेवेचं टाॅपिंग आणि सोबत एक कडक आल्याचा चहा..अहाहा स्वर्ग!

नवरोबा तसे फारच perfectionist..उडत्या पाखराचे पंख मोजण्या इतपत गुणवत्ता त्यामुळे पोहे हातात घेताच त्याचा प्रकार ओळखून त्यांना भिजवण्याच्या पद्धतीत केला जाणारा योग्य तो बदल, कांदा व पोह्यांचे अचूक प्रमाण (१ वाट्या पोह्यांना पाऊण वाटी बारीक चिरलेला कांदा) याच बरोबर शेंगदाणे स्वतंत्र पॅनमधेच, कमी तेलात आणि मध्यम आचेवर खरपूस तळून दाताखाली चावताच ‘करमकुरम’ असा आवाज होईल इतके तळले जाणे इत्यादी गोष्टी कटाक्षाने पाळणारे आमचे ‘पोहेबहाद्दर’.. आता जरा ह्यांनी बनवलेल्या तर्रीकडे वळूयात.. ‘कमीतकमी मचमचीत जास्तीतजास्त चमचमीत’ ही त्यांची टॅग लाईन .. सर्वप्रथम मसाला बनवण्यासाठी कढईत तेल तापत ठेवायचं.. तो पर्यंत सपासप कांदा चिरून घ्यायचा, खसाखस सुकं खोबर किसून घ्यायचं, तेलाचा तडातड आवाज झाल्यावर मोठी वेलची, छोटी वेलची, लवंग, लसुण, आले आणि वरील दोन्ही गोष्टी त्यात घालून भराभर कलथ्याने परतून मिक्सरला फिरवून घ्यायचं. पुन्हा कढईत भसाभस तेल ओतायचं..हो भसाभसचं कारण तर्रीसाठी जरा जास्तच तेल लागतं.. मग त्यात २ तमालपत्री टाकून पटापट मिक्सरमधे वाटलेला मसाला घालायचा.. हळद,लाल तिखट,धने पावडर, काळा मसाला घालून भराभर हलवून घ्यायचं..आता महत्वाची टीप..नवरोबाची तर्री इतकी जहाल की अगदी ३ वेळा आतिषबाजी झालीच पाहिजे..चावताना, गिळताना आणि __.. त्यामुळे सांभाळूनच खावी लागते.. म्हणून तुम्हाला झेपेल तेवढच तिखट घाला...आता मसाल्याला तेल सुटू लागले की पाणी ओतून फटाफट उकळी काढून घ्या..आता ही तर्री पोह्यांवर जराजरा ओतायची की अशीच गटागटा प्यायची ते तुमचं तुम्हीच ठरवा..

गरम तर्री व नरम पोह्यांबरोबर कडक चहा बनवण्यातही नवरोबा तितकेच माहीर.. तसं चहा तर कोणी सोम्यागोम्या पण बनवू शकतो ओ पण नवरोबाची बातच काही और। त्यांच्या चहात दूधाचा पगडा हा नेहमीच भारी. चहा पावडर ही ‘society’ किंवा ‘girnar-number 3’ चीच असली पाहिजे हा अट्टाहास.. त्याच बरोबर चहात आल्याचा मारा आणि “आज थोडंसं काही तरी नवीन पिऊयात” म्हणत टाकले जाणारे २ बडीशेपचे दाणे किंवा कुटलेली काळी मिरी अथवा गवती चहा..दूध घालून चहाची रबडी होईपर्यंत उकळण्याच्या कलेत पारंगत असलेले आमचे हे ‘चहाधुरंधर’..
(तसं अजूनही गूळाचा चहा बनवण्यात तितकंसं यश आलेले नाही पण प्रयत्न चालूच आहेत)

पूर्वी, मी काॅलेजमधे असताना माझ्या चाळीशी ओलांडलेल्या आईने प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर ‘naturopathy’ मधे पदविका प्राप्त केली आणि त्याचा परिणाम असा झाला की आमच्या स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या तामसिक खाद्यसंस्कृतीवर गदा आली आणि सात्विक खाद्यपद्धती उदयास येऊ लागली.. फोडणीच्या पोह्यांमध्ये अमूलाग्र बदल करण्यात आले..कांद्याबरोबर गाजर-काकडी-कैरी चा कीस, मोड आणलेले मूग व डाळिंबाच्या दाण्यांचे अवशेष सापडू लागले..फोडणीत पोहे न घालता, पोह्यात मीठघातल्याप्रमाणे फोडणी घालून बनवलेले पोहे आमच्या वाट्याला येऊ लागले ..सात्विक पोहे हा काय प्रकार असतो ते तेव्हा आमच्या ध्यानात आलं .. पोह्यांप्रमाणेच सकाळी मिळणाऱ्या चहाचा देखिल कायापालट करण्यात आला.. पाण्यात चक्क धणे, जीरे, दालचिनी यांसारखे अख्खे मसाले आणि तुळशीची पानं, मेथी दाणे वगैरे घालून उकळलेला ‘उकाळा’ मिळू लागला ..मीही तिला म्हटलं “असा चहा पिण्यापेक्षा वैद्यांचा पाटणकर काढा प्यायलेलं काय वाईट”.. त्यानंतर, मी माझ्या थोरल्या बंधूराजांना व पितामहांना हाताशी घेऊन टाकलेल्या बहिष्कारामुळे आमच्या घरी सुरू झालेली सात्विक चळवळ लवकरच संपुष्टात आली व पूर्वीची चहा-पोहे पद्धती पुन्हा आनंदाने नांदू लागली..

पण माझ्या लग्नानंतर, जेव्हा हा असा..किमान अर्धा तास तरी उकळून बनवलेला बासुंदीवजा चहा, आईच्या भाषेत जरी ‘विष’ असलं तरी केवळ तो आपल्या लाडक्या जावयाने बनवलेला आहे म्हणून तिच्यासाठी अमृततुल्य ठरू लागला..किती हा विरोधाभास!

असो.. तर कढईभर म्हणता म्हणता परातभर लिहून टाकलंय.. म्हणून तुर्तास आवरते घेते.

BC3C0633-7120-4E4F-8A5D-4B762D8C3E90.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@सनव - पुण्यात शास्त्रीरोडला सुशील पोहे म्हणून एक आऊटलेट आहे तिथले पोहे अप्रतिम असतात.>>>> पुण्यात इतके अप्रतिम पोहे मी तरी दुसरीकडे कुठेच खाल्ले नाहीत. "आम्ही पोहेकर" वगैरे फ्रँचायझी मध्ये तेवढा दम नाही. सुशील मध्ये परफेक्ट ओलसर पोहे असतात.

शास्त्री रोडलाच आत्ता जिथे Saffron आहे तिथे पूर्वी एक रेस्टॉरंट होतं (नाव विसरले) तिथे सकाळी अप्रतिम पोहे मिळायचे. ओलसर.

छान! खुसखुशीत आणि चटक्दार लिहिले आहे.

अवांतर,
पोहे ओलसर राहण्यासाठी काही खास पद्धती किंवा ट्रिक आहे का?

<<< पोहे ओलसर राहण्यासाठी काही खास पद्धती किंवा ट्रिक आहे का?>>> आम्ही हल्ली कमी तेलात पोहे करतोय, अगदी नाममात्र तेलात कांदा मिरचीची फोडणी झाली की त्यात पोहे नीट परतायचे, सर्व कसे एकजीव व्हायला हवे, मग वाटीभर पाणी शिंपडून मस्त वाफ येऊ द्यायची. अगदी कमी तेलात रुचकर अन मऊ, ओलसर पोहे तयार☺️

काल पोहे केले, आणि जरा खारट झाले Sad तेव्हा मला तर्री ची खुप आठवण झाली. असं काही तरी घालून कांदा बिंदा घालून खारट पणा कमी करता आला असता. पण काल ऑफिस ला जाउन आल्यावर कंटाळा आला. मग नुसते ओये ओये करून हे पोहे खाल्ले

Pages