
यंदा lockdown मुळे, सकाळच्या नाश्त्याचा वीडा उचललेले नवरोबा व त्यांच्या हातचे तर्री पोहे, ह्या बद्दल तर मी अगदी कढईभर लिहू शकते..
अहो तुम्हाला सांगते जेव्हा सकाळी डोळे चोळत बेडरूम मधून बाहेर आले तेव्हा नवरोबा Alexa च्या तालावर चांगलेच थिरकत होते.. त्यांच्या मूडचे तीनतेरा वाजवत मी हसत विचारलं “आज नाश्त्याला काय?”.. त्यावर “पोहे” ह्या विषयात phd केलेल्या नवरोबाने प्लेटमधे गरमागरम पोहे व तर्री आणुन देत “शेव आणि लिंबू आता स्वतः उठून घ्या” असं खोचकपणे सांगितलं. चहाबरोबर नाश्त्यासाठी पोहेच असणार हे मला अपेक्षित होतंच कारण इतर विषयांमधे तशी त्यांची बोंबच.. असो.. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघवला नसेल कदाचित असं मानून मीही त्यांच्याकडे दुर्लक्ष फेकून मारलं आणि पोहे खात कपात दिलेल्या राजसिक पेयावर लक्ष केंद्रीत केलं ..
भरपूर दाणे व मिरची घातलेले तिखट पोहे, त्यावर जहाल तर्री व रतलामी शेवेचं टाॅपिंग आणि सोबत एक कडक आल्याचा चहा..अहाहा स्वर्ग!
नवरोबा तसे फारच perfectionist..उडत्या पाखराचे पंख मोजण्या इतपत गुणवत्ता त्यामुळे पोहे हातात घेताच त्याचा प्रकार ओळखून त्यांना भिजवण्याच्या पद्धतीत केला जाणारा योग्य तो बदल, कांदा व पोह्यांचे अचूक प्रमाण (१ वाट्या पोह्यांना पाऊण वाटी बारीक चिरलेला कांदा) याच बरोबर शेंगदाणे स्वतंत्र पॅनमधेच, कमी तेलात आणि मध्यम आचेवर खरपूस तळून दाताखाली चावताच ‘करमकुरम’ असा आवाज होईल इतके तळले जाणे इत्यादी गोष्टी कटाक्षाने पाळणारे आमचे ‘पोहेबहाद्दर’.. आता जरा ह्यांनी बनवलेल्या तर्रीकडे वळूयात.. ‘कमीतकमी मचमचीत जास्तीतजास्त चमचमीत’ ही त्यांची टॅग लाईन .. सर्वप्रथम मसाला बनवण्यासाठी कढईत तेल तापत ठेवायचं.. तो पर्यंत सपासप कांदा चिरून घ्यायचा, खसाखस सुकं खोबर किसून घ्यायचं, तेलाचा तडातड आवाज झाल्यावर मोठी वेलची, छोटी वेलची, लवंग, लसुण, आले आणि वरील दोन्ही गोष्टी त्यात घालून भराभर कलथ्याने परतून मिक्सरला फिरवून घ्यायचं. पुन्हा कढईत भसाभस तेल ओतायचं..हो भसाभसचं कारण तर्रीसाठी जरा जास्तच तेल लागतं.. मग त्यात २ तमालपत्री टाकून पटापट मिक्सरमधे वाटलेला मसाला घालायचा.. हळद,लाल तिखट,धने पावडर, काळा मसाला घालून भराभर हलवून घ्यायचं..आता महत्वाची टीप..नवरोबाची तर्री इतकी जहाल की अगदी ३ वेळा आतिषबाजी झालीच पाहिजे..चावताना, गिळताना आणि __.. त्यामुळे सांभाळूनच खावी लागते.. म्हणून तुम्हाला झेपेल तेवढच तिखट घाला...आता मसाल्याला तेल सुटू लागले की पाणी ओतून फटाफट उकळी काढून घ्या..आता ही तर्री पोह्यांवर जराजरा ओतायची की अशीच गटागटा प्यायची ते तुमचं तुम्हीच ठरवा..
गरम तर्री व नरम पोह्यांबरोबर कडक चहा बनवण्यातही नवरोबा तितकेच माहीर.. तसं चहा तर कोणी सोम्यागोम्या पण बनवू शकतो ओ पण नवरोबाची बातच काही और। त्यांच्या चहात दूधाचा पगडा हा नेहमीच भारी. चहा पावडर ही ‘society’ किंवा ‘girnar-number 3’ चीच असली पाहिजे हा अट्टाहास.. त्याच बरोबर चहात आल्याचा मारा आणि “आज थोडंसं काही तरी नवीन पिऊयात” म्हणत टाकले जाणारे २ बडीशेपचे दाणे किंवा कुटलेली काळी मिरी अथवा गवती चहा..दूध घालून चहाची रबडी होईपर्यंत उकळण्याच्या कलेत पारंगत असलेले आमचे हे ‘चहाधुरंधर’..
(तसं अजूनही गूळाचा चहा बनवण्यात तितकंसं यश आलेले नाही पण प्रयत्न चालूच आहेत)
पूर्वी, मी काॅलेजमधे असताना माझ्या चाळीशी ओलांडलेल्या आईने प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर ‘naturopathy’ मधे पदविका प्राप्त केली आणि त्याचा परिणाम असा झाला की आमच्या स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या तामसिक खाद्यसंस्कृतीवर गदा आली आणि सात्विक खाद्यपद्धती उदयास येऊ लागली.. फोडणीच्या पोह्यांमध्ये अमूलाग्र बदल करण्यात आले..कांद्याबरोबर गाजर-काकडी-कैरी चा कीस, मोड आणलेले मूग व डाळिंबाच्या दाण्यांचे अवशेष सापडू लागले..फोडणीत पोहे न घालता, पोह्यात मीठघातल्याप्रमाणे फोडणी घालून बनवलेले पोहे आमच्या वाट्याला येऊ लागले ..सात्विक पोहे हा काय प्रकार असतो ते तेव्हा आमच्या ध्यानात आलं .. पोह्यांप्रमाणेच सकाळी मिळणाऱ्या चहाचा देखिल कायापालट करण्यात आला.. पाण्यात चक्क धणे, जीरे, दालचिनी यांसारखे अख्खे मसाले आणि तुळशीची पानं, मेथी दाणे वगैरे घालून उकळलेला ‘उकाळा’ मिळू लागला ..मीही तिला म्हटलं “असा चहा पिण्यापेक्षा वैद्यांचा पाटणकर काढा प्यायलेलं काय वाईट”.. त्यानंतर, मी माझ्या थोरल्या बंधूराजांना व पितामहांना हाताशी घेऊन टाकलेल्या बहिष्कारामुळे आमच्या घरी सुरू झालेली सात्विक चळवळ लवकरच संपुष्टात आली व पूर्वीची चहा-पोहे पद्धती पुन्हा आनंदाने नांदू लागली..
पण माझ्या लग्नानंतर, जेव्हा हा असा..किमान अर्धा तास तरी उकळून बनवलेला बासुंदीवजा चहा, आईच्या भाषेत जरी ‘विष’ असलं तरी केवळ तो आपल्या लाडक्या जावयाने बनवलेला आहे म्हणून तिच्यासाठी अमृततुल्य ठरू लागला..किती हा विरोधाभास!
असो.. तर कढईभर म्हणता म्हणता परातभर लिहून टाकलंय.. म्हणून तुर्तास आवरते घेते.
छान लिहलय, फोटो कातिल,
छान लिहलय, फोटो कातिल, रेसिपीवरुन तरी चिकनकरी,अन्डाकरी,शेवाभाजी टाइप कुठलाही रस्सा चालावा यात.
वैदर्भिय खरच किती तिखटाचा सोस करतात, सकाळच्या सात्विक पोह्याना सुद्धा जहाल केल.
छान लिहिलंय,,,
छान लिहिलंय,,,
माझी एक रुममेट औरंगाबादची होती. तिलाही भरपूर तिखट खाण्याची सवय होती. हॉस्टेलमधल्या सपक भाजीत मिरचीपूड घालून खायची ती. मागे एकदा तिच्या घरी गेलेले,तर कांदापोहे बनवले होते. माझ्या तोंडात मिरच्यांंमुळे जाळ झाला होता. आणि तिचा दीर म्हणत होता, "आज एवढे फिक्के का बनवलेत पोहे?"
वैदर्भिय खरच किती तिखटाचा सोस
वैदर्भिय खरच किती तिखटाचा सोस करतात, सकाळच्या सात्विक पोह्याना सुद्धा जहाल केल. >> तसं मी एवढं तिखट खात नाही पण नवरोबाने त्याच्या स्वभावालाच अनुसरून तिखट तर्रीपोहे बनवले आणि मी माझ्या स्वभावाला अनुसरून ते गोड समजून खाल्ले
एक नंबर लेख!
एक नंबर लेख!
पाफा + 393
पाफा + 393
मी जेवण उत्तम बनवतो... बायकोपेक्षाही जास्त चांगले... पण बायकोसमोर चांगला पदार्थ मुद्दाम गडबड करतो म्हणजे तिला वाटावे की तीच उत्तम कूक आहे... ती पण खुश आणि आपण पण...
बाकी मित्र मंडळी जमली की जबरदस्त बनवतोच...
विदर्भचि खसियत आहेत तर्री
विदर्भचि खसियत आहेत तर्री पोहे
पाफा, च्रप्स - म्हणूनच मी
पाफा, च्रप्स - म्हणूनच मी नेहमी म्हणते, “घरी राहिलेला नवरा हा सासूसारखा असतो”
जास्त सविस्तर नाही लिहीत नाहीतर खरच धागा धगधगता होईल 
मी नेहमी म्हणते, “घरी
मी नेहमी म्हणते, “घरी राहिलेला नवरा हा सासूसारखा असतो”>>
ऑ!! खंडोबाराव घरीच असतात की काय!!! मज्जा आहे तुमची. रोजरोज तर्री पोहे.
“घरी राहिलेला नवरा हा
“घरी राहिलेला नवरा हा सासूसारखा असतो” +1111
आणि ज्या नवऱ्याला kitchen and home management मधलं (जरा जास्तच) कळतं तो???
खंडोबाराव घरीच असतात की काय!!
खंडोबाराव घरीच असतात की काय!!>>> वर्क फ्राॅम होम चाल्लयना सध्या
“घरी राहिलेला नवरा हा
“घरी राहिलेला नवरा हा सासूसारखा असतो” +1111
आणि ज्या नवऱ्याला kitchen and home management मधलं (जरा जास्तच) कळतं तो???
नवीन Submitted by किल्ली on 11 August, 2020 - 01:32
>>>>
@किल्ली, पेट्रोल चे भाव वाढलेत. कृपया आग वाढवू नये.
तर्री पोहे हा प्रकारच मला
तर्री पोहे हा प्रकारच मला आवडत नाही, भातात आमटी कालवून खाल्ल्यासारखा फील येतो. पोव्हं म्हंजे कसं खोबरं व कोथिंबीर पेरून भरपूर दाणे घातलेले, किंचित साखर, लिंबू पिळलेले डीशभरुन खायला हवेत.
“घरी राहिलेला नवरा हा
“घरी राहिलेला नवरा हा सासूसारखा असतो” +1111

आणि ज्या नवऱ्याला kitchen and home management मधलं (जरा जास्तच) कळतं तो???
म्हाळसा, किल्ली अगदी सहमत.
मी सुद्धा बर्याचदा नवर्याला असच म्हणते, "सास पास नही तो तुम अच्छे से उनका रोल निभा लेते हो"।
मला तरी नागपूरच्या नावावर
मला तरी नागपूरच्या नावावर तर्री पोहे प्रचंड गाजावाजा केलेले वाटतात. ते एखादे वेळी दुकानांत खाण्यात गम्मत असते, खरतर तर्री मध्ये भिजल्यामुळे पोह्यांची मूळ चव येतच नाही.
पूर्व विदर्भातील (नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर, त्यातही नागपूर सोडला तर ईतर जिल्हे तांदूळ उत्पादक व अनुषंगाने पोह्यांच्या मिल असणारे) जाड पोहे हे ईतर ठिकाणच्या (जाड) पोह्याहून जरा जाडसर व कोरडे असतात, त्यांना मंद सुवास असतो. त्यामुळे पोहे निदान दोनदा तरी स्वच्छ धुवून भिजवतात. तरीही खाताना जरासे कोरडे वाटत असल्याने ओलावा येण्यासाठी वरून रस्सा टाकत असावेत आणि मग नागपुरातील सावजी मटन/चिकन/पाटवडी रस्सा प्रसिद्ध असल्याने तसाच चना/हरभरा रस्सा बनवून पोह्यांवर ओतायची पद्धत दुकानांत रूढ झाली असावी. नागपुरातील तर्री लालबुंद दिसत असली तरी जहाल वा तिखटजाळ नसते तथापि पहिला घास खाताना ठसका बसतोच.
घरी तर्री पोहे क्वचितच बनवले जातात, कारण प्रत्येक वेळी पोह्यांपेक्षा चना/हरभरा तर्री बनवायचाच एवढा खटाटोप कोण करणार? बहुधा घरी पोहे (होय, इकडे पोहेच म्हणतात, कांदेपोहे किंवा बटाटेपोहे नाही, मात्र हिंदी भाषिक प्रभाव असलेल्या भागात आलुपोहा म्हणतात) बनवायचे तर ते साधेच असतात, नेहमीप्रमाणे त्यात कांदा, बटाटा, हिरवी मिरची आणि शेंगदाणे घालतात. वरून सुक्या खोबर्याचा कीस व कोथिंबीर (विदर्भात सांबार म्हणतात) पेरतात.
छानपैकी पोहे भिजवायचे, कांदा, हि. मिरची व कोथिंबीर/सांबार चिरायचे आणि बटाट्याचा काचर्या कापायच्या. एरवी आपण दोन चमचे तेल घालत असू तर थोडे जास्त म्हणजे तीन/साडे तीन चमचे तेलात (ईकडचे पोहे जरा जाडसर व कोरडे असल्याने नेहमीपेक्षा जरा जास्त तेल घालावे लागते, त्यामुळे पोह्यांमधला ओलावा टिकून राहतो नाहीतर पोहे खाताना जरा सडसडीत व कोरडे वाटतात) सर्वप्रथम शेंगदाणे तळून भिजवलेल्या पोह्यांवर ठेवायचे म्हणजे पोहे घालताना तेही त्यात मिसळतील किंवा तेलातच ते जरा परतले की मोहरी, जिरे, हळदीची फोडणी करावी, चुरडलेली कढीपत्त्याची पाने (५-६) व बारीक चिरलेली हि. मिरची किंचित तडतडली (खमंग फोडणी बसेपर्यंत शेंगदाणेही आपसूकच तळले जातात आणि बाहेर काढून ठेवायची गरज पडत नाही) की कांदा घालून गुलाबीसर होऊ द्यायचा. त्यानंतर बटाट्याच्या काचर्या घालून खमंग परतून भिजवलेले पोहे घालायचे, चवीनुसार मीठ व जराशी साखर घालायची (आवडत असल्यास किंचित हिंग, ह्याने वेगळीच चव येते) आणि छान हलवून घ्यायचे. त्यानंतर मध्यम आचेवर जरावेळ (४-५ मिनिट) परतावे आणि वरून कोथिंबीर/सांबार पेरायचा (पोहे बनवताना झाकून नये, झाकणावर जमा झालेले वाफेचे पाणी पोह्यांत पडतं आणि ते चिकट होतात). अहाहा! खमंग पोहे तयार. डीशमध्ये वरून थोडी कोथिंबीर/सांबार व सुक्या खोब्र्यांचा कीस घालायचे (श्रावण महीना सोडला तर नागपूरात सहसा ओला नारळ भेटत नाही).
पहिल्यांदा मुंबईत नागपूरच्या पोह्यांप्रमाणे पोहे बनवले पण त्याचा गिच्च गोळा झाला आणि तेलही जास्त झाले. मग दोन्ही ठिकाणच्या पोह्यांमधला फरक लक्ष्यात आला आणि त्यांनंतर मुंबईत पोहे कधीच बिघडले नाही. कधी कधी नागपुरातून किलोभर जाड पोहे सोबत न्यायला लागलो.
दुकानांत पोहे बनवताना आले लसून पेस्ट व किंचित गरम/काळा मसालासुद्धा घालतात, तसेच शेंगदाणे तळून बाजूला काढले की बटाटाच्या काचर्यापण तळून मग फोडणी करतात. पण त्यापेक्षा घरचेच साधे पोहे छान वाटतात.
आयती प्लेट काहीही द्या,
आयती प्लेट काहीही द्या, नुसतेच पोहे, तर्री पोहे, काहीही चालेल.

राहुल, बरोबर. विदर्भात घरी
राहुल, बरोबर. विदर्भात घरी कुणी तर्री पोहे करत नाहीत, जे कोणी थोडेफार करणारे ते गेल्या १०-१२ वर्षातले असावेत.
हा प्रकार तीसेक वर्षांपूर्वी कुठल्यातरी धाब्यावर / गाडीवर कोरडे वाटणारे पोहे किंवा शिल्लक असलेली तर्री खपवायला सुरू झाला असावा, आणि पसरला असावा.
लॉकडाऊन मध्ये वर्क फ्रॉम होम
लॉकडाऊन मध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्या पुरुषांना बायको कशी वाटत असेल बरं? ती पुरुषाची फर्स्ट बॉस असतेच.
राहुल, बरोबर. विदर्भात घरी
राहुल, बरोबर. विदर्भात घरी कुणी तर्री पोहे करत नाहीत, जे कोणी थोडेफार करणारे ते गेल्या १०-१२ वर्षातले असावेत.
हा प्रकार तीसेक वर्षांपूर्वी कुठल्यातरी धाब्यावर / गाडीवर कोरडे वाटणारे पोहे किंवा शिल्लक असलेली तर्री खपवायला सुरू झाला असावा, आणि पसरला असावा. ...................... पूर्णपणे सहमत
अर्थातच प्रत्येक ठिकाणच्या पोह्यांची वेगळीच चव असते, पुण्यातील गोडूस पोहे (मला प्रचंड आवडतात), केळवे बीच ला एका होमस्टे ला खाल्लेले खमंग पोहे, गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा ह्या तालुक्याच्या गावी नोकरी करत असताना ऑफिसच्या मेसमधल्या मावशीनी बनवलेले मंद सुवास असलेले पोहे आणि मुंबईत आधी इन्स्टिट्यूट हॉस्टेलमध्ये राहताना मेसमधील बिहारी खानसाम्यांनी केलेले जाडसर कांदा व टमाटर आणि लाल मिरची पूड टाकलेले पोहे (हे कसेतरी गळ्याखाली उतरवायचो, कित्येकदा त्यांना पोहे बनवायचे धडे द्यावेत असे मनात यायचे, काही मुले/मुली चक्क टोमॅटो केचप टाकून खायचे, मी तसा अघोचरपणा कधी केला नाही) सगळे आठवणीत आहेत.
माझी मुले पण केचप टाकून खातात
माझी मुले पण केचप टाकून खातात.

<<<हा प्रकार तीसेक
<<<हा प्रकार तीसेक वर्षांपूर्वी कुठल्यातरी धाब्यावर / गाडीवर कोरडे वाटणारे पोहे किंवा शिल्लक असलेली तर्री खपवायला सुरू झाला असावा, आणि पसरला असावा.
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 11 August, 2020 ->>> हो अगदी पटले, मला तर हेच कारण वाटते मुंबईला पोह्यांवर मिसळ तर्री, सांभार किंवा नारळाची चटणी घ्यायचा. नुसत्या कोरड्या पोह्यांवर कांदा, फरसाण, कोथिंबीर घालून दिली तरी मजा नाही येत. घरच्या पोह्यांसारखे तेल जास्त घालून पोहे बनवणे त्यांना परवडत नसावे, खूपच सडसडीत असतात ते पोहे.
आम्ही घरी कधीच वेगळी तर्री बनवत नाही, नुसत्या पोह्यांसाठी एवढा खटाटोप कोण करणार, पण शिल्लक कट, उसळ किंवा कढण असेल तर ते ओतून खातो मी अन भाऊ.
मम्मी पप्पा अन नवऱ्याला हा प्रकार आवडत नाही ते नुसते पोहेच खातात
पोव्हं म्हंजे कसं खोबरं व
पोव्हं म्हंजे कसं खोबरं व कोथिंबीर पेरून भरपूर दाणे घातलेले, किंचित साखर, लिंबू पिळलेले डीशभरुन खायला हवेत. +१२३
तर्री पोहे हा प्रकारच मला
तर्री पोहे हा प्रकारच मला आवडत नाही, भातात आमटी कालवून खाल्ल्यासारखा फील येतो
>>>>>
+७८६
म्हणून मी चिकन मटणचा रस्सा टाकून खातो पोहे. ते छान लागतात.
रविवारी सकाळी नाश्त्याला पोहे.
दुपारी चिकन्मटण असल्यास संध्याकाळी शिल्लक पोहे मस्त रश्यात ओले करून चापायचे
खरच ??????
खरच ??????
सक्काळचे उरलेले गारपचक पोहे
सक्काळचे उरलेले गारपचक पोहे मी दुपारी जेवताना भाजीत/ कालवणात मिक्स करून खातो. इटीज माय मिक्स भाजी, आय लाईक इट!!
लिहिलय छान. माझ्या सासुबाई
लिहिलय छान. माझ्या सासुबाई सफरचंद , काजु घालून शाही पोहे करतात. डाळींब सिझन मध्ये असेल तर त्यावर डाळींबाचे दाणे पण असतात.
काश्मिरी पोहे असेच असतील बहुदा.
मस्त लेख.
मस्त लेख.
मी ऑफिसातल्या फुडकोर्टात पोह्यांवर सांबार घालून घेऊन खायचे. छान लागायचे. तर्री पोहे चांगले लागतील असे वाटतेय. पण आता त्यासाठी ऑफिसात कोण जाईल? घरी नुसते पोहे बनले तरी खूप...
माझ्या सासुबाई सफरचंद , काजु
माझ्या सासुबाई सफरचंद , काजु घालून शाही पोहे करतात. डाळींब सिझन मध्ये असेल तर त्यावर डाळींबाचे दाणे पण असतात. >> शाही पोहे म्हटल्यावर वरती चांदीचा वर्ख लावायला हवा ना.
मी ऑफिसातल्या फुडकोर्टात
मी ऑफिसातल्या फुडकोर्टात पोह्यांवर सांबार घालून घेऊन खायचे. छान लागायचे. तर्री पोहे चांगले लागतील असे वाटतेय. पण आता त्यासाठी ऑफिसात कोण जाईल? घरी नुसते पोहे बनले तरी खूप... >>>>>>>>>>>>>>>>> खरंय
मला तर्री पोहे आवडत नसले तरी मुंबईत एकदा ते खायची तीव्र ईच्छा झाली. शनिवारी रात्री अगदी छोटी वाटी चणे भिजवले (अर्ध्या मुठीहूनही कमीच) आणि रविवारी सकाळी तर्री पोहे बनवायला घेतले. दोन्हीही सुरेख झाले असले पण तर्री जास्तच झाली, एकट्याला तरी किती लागणार? पोहे लगेच संपले. तर्री काही संपेना मग ऐनतेन प्रकारे संपवावी लागली. तेव्हापासून कानाला खडाच लावला की ह्यापुढे केवळ पोहेच करायचे, तर्री बिर्री करायच्या भानगडीत पडायचे नाही. अगदीच ईच्छा अनावर झाली तर मिसळ पाव ऑर्डर करायचा. सोबत पोहे बनवायचे आणि मिसळीच्या कटासह खायचे.
मस्त झणझणीत लिहिलंय.
मस्त झणझणीत लिहिलंय.
तरी पोहे नवीनच आहे.
मला साधेसुधे बनवलेले पोहे आवडतात. अगदी वरुन शेव वैगेरे पण नको. मस्त वाफाळते पोहे आणि चहा.
मस्त लिहिलं आहे! घरात कैलास
मस्त लिहिलं आहे! घरात कैलास जीवन असल्याची खात्री करून तर्री करण्यात येईल. पोहे-तर्री आदी खटाटोप करून शिवाय इतका मन लावून चहा म्हणजे कमाल आहे. येवले चहावाले सुद्धा त्यांच्या (सिक्रेट) मसाल्यात बडीशेप घालतात म्हणे
Pages