पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा

Submitted by संयोजक on 12 August, 2020 - 16:21

नमस्कार मायबोलीकर,

बाप्पाच्या स्वागताची तयारी सगळीकडे जोरात चालू असेल. यावर्षी बाप्पाला आणि माहेरवाशीण येणाऱ्या गौरीला नैवेद्य काय बनवायचा याचे ही प्लॅनिंग सुरू झाले असेलच! यावर्षी आम्ही तुमच्यासाठी नैवेद्य थाळी ही स्पर्धा घेऊन येतोय. स्पर्धा अतिशय सोपी आहे. भाग घेण्यासाठी गणपती बाप्पा, गौराई यांच्यासाठी बनवलेल्या नैवेद्याच्या पानाचा/ थाळीचा छानसा फोटो काढून आम्हाला पाठवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा.

नियम-
१) पाककृती स्वत: तयार केलेली असावी.
२) नैवेद्याचे पदार्थ शाकाहारी असावेत.
३) नैवेद्याच्या पानात किमान 2 भाज्या, चटणी, मेतकूट, 2 कोशिंबीरी, भात, पोळी/ पुरी, तळणीचा पदार्थ, एखादे गोड पक्वान्न असावे. पानातील कमाल पदार्थ तुमच्या आवडीप्रमाणे कितीही असू शकतात. उकडीचे वा कोणत्याही प्रकारचे स्वत: केलेले मोदक असावेत.
४) नैवेद्याच्या पानात बाहेरून विकत आणलेला गोड ,तिखट,चटपटीत इत्यादींपैकी कोणताच पदार्थ नैवेद्यम च्या पानात नसावा.
५) शक्यतो नैवेद्याचे पान हे केळीचे किंवा इतर पान असावे. स्टील , सोने, चांदी, पितळ इत्यादी पाने वापरल्यास फ्लॅशच्या प्रकाशाने फोटो वेगळा दिसू शकतो ह्याची जाणीव असू दे..
६) तुम्ही तुमच्या प्रवेशिका 22 ऑगस्ट पासून पाठवू शकता. (IST)
७) एक id फक्त 2 प्रवेशिका पाठवू शकेल.
८) स्पर्धा महिला आणि पुरुष दोन्ही गटांसाठी खुली आहे.
९) प्रवेशिका देताना पानातील सर्व पदार्थांची नावे आणि त्यांची थोडक्यात पाककृती द्यावी. पाककृतींचे किमान २-३ प्रकाशचित्रे देणे बंधनकारक आहे. ( प्रत्येक पदार्थाचे २- फोटो देणे अपेक्षित नसून एकूण उद्योगाचे किमान २-३ फोटो देणे अपेक्षित आहे )
प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे बघता येईल. - https://www.maayboli.com/node/1556
१०) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"पाककृती स्पर्धा 2 - {नैवेद्यम स्पर्धा} - - {तुमचा आयडी}"
११) स्पर्धेचे विजेते मतदानाद्वारे निवडण्यात येतील आणि 2 क्रिटिक अवॉर्ड असतील.

तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.

!!! गणपती बाप्पा मोरया!!!

------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांच्या पूर्वतयारीला पुरेसा वाव मिळावा म्हणून स्पर्धा व नियम जाहीर करत आहोत. प्रवेशिका पाठवण्यासाठी गणपती प्रतिष्ठापनेनंतर धागे उघडले जातील.

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकणात मटणाचा नैवेद्य असतो गणपतीला>>माझ्या माहितीत तरी नाही,फक्त गौरीला असतो मटणाचा नैवेद्य, गणपती ला पहिल्या दिवशी मोदकांचाच आणि बाकी 4 दिवस इतर गोडाचा नैवेद्य असतो,अगदी गौरी ला मटणाचा दाखवला तरी गणपती साठी वेगळा गोडाचा पदार्थ दाखवतातच

आमच्याकडे पहिल्या दिवशी पुरणपोळी चा नैवेद्य असतो अन दुसऱ्या दिवशी मटण असते, पण गणपतीला नाही म्हणून शहरात शक्यतो नाही करत, गावी शेतात जाऊन मातीच्या भांड्यात मटण बनवून सगळ्या शेतात थोडे थोडे टाकायचे, उरलेले आपण खाऊन संपवायचे असे करतात. गौराईला मात्र पाच भाज्यांचा बिना कांदा लसणाचा नैवेद्य असतो, त्यातही भोपळ्याच्या भाजीचा मान मोठा.

मेतकूट असते नैवेद्यात, नवीन तयार केलेले, न वापरलेले मेतकूट, दह्यात कालवून नैवेद्याच्या पानात वाढतात, आमच्या कडे

सुरेख फोटो. बघूनच समाधान वाटले. मात्र नैवेद्याच्या पानात मीठ नाही वाढत सहसा. त्यामुळे पंगतीत वाढलेल्या पानाचा फोटो असावा.

सुरेख दिसतंय पान. आमच्याकडे मीठ नाही वाढत नैवेद्य पानात आणि भाजी बटाट्याची उजव्या बाजुला असते आणि पुऱ्या डाव्या बाजुला, खीर पण डावीकडे.

खीर पण डावीकडे. >> Happy अगदी!! आणि का माहिती नाही पण आमच्याकडे अशी वाटीभर खीर वाढत नाहीत. ते शेफ लोक हल्ली प्लेटींग करतात तेव्हा चमच्याने सॉस्/चटणीचा फराटा मारतात तशी तेवढीशी वाढतात. परत मागितली तरी तशीच चमच्यानेच वाढतात. अशी वाटीभर खीर बघूनच बरं वाटलं.

भारताबाहेर राहणार्‍याना केळीच्या पानाची अट फुलफिल करणे अवघड आहे.
का माहिती नाही पण आमच्याकडे अशी वाटीभर खीर वाढत नाहीत. >> सीमन्तनी ! वरच्या पानात दुसरा कुठलाच गोड पदार्थ नाही,मेन गोड खिरच आहे.जनरली पुपो,जिलबी,केशरिभात्,श्रिखन्ड असा गोडाचा नैवेद्द्य असेल तु म्हणते तशी शेवयाची खिर शास्त्रापुरती अस्ते आणि तु म्हणते तशी चमचाभरच वाढतात.आमच्याकडे पण तु म्हणते तस खिरिचा फराटा असतो बारका.

आमच्याकडे मीठ नाही वाढत नैवेद्य आणि सर्व भाजा उजवा बाजूला आणि चटणी ही डावा बाजूला असते पानात

मेक्सिकन मार्केटात मिळते केळीचे पान. ते 'तमाले' ला लागतात तशे फूलस्केपच्या आकाराचे तुकडे विकतात पण सांगितलं तर त्या होजेकाकांकडे अख्खं पान मिळतं Happy आता कुठल्याही देशात केळीचं पान मिळणारी मंडई किती दूर त्यावर अवघड सोपे ठरणार Happy
खरंय, मुख्य गोड म्हणून खीर सहसा फक्त कुठले लक्ष्मीव्रत किंवा श्राद्ध किंवा डोहाळेजेवण अशीच व्हायची. ओक्के, माझे मत फराटा खिरीला. शास्त्र असतं ते!

नैवेद्याच्या पानात मेतकूट असतं? >>>> +१ पंचामृत, वाटली डाळ करतो . नेवैद्याच्या ताटाला बंधन नको. जात/स्थानाप्रमाणे ते वेगळं असतं. अश्या वेगवेगळ्या पध्दती/प्रकारचे ताटं पहायला आवडतील.
काही ठिकाणी मांसाहारा नेवैद्य असतो तर तोही चालायला हवा.

गौराई यांच्यासाठी बनवलेल्या नैवेद्याच्या पानाचा/ थाळीचा छानसा फोटो काढून आम्हाला पाठवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा. >> केळीच पान मस्ट नाहीये , शक्यतो ही लिहीलय नन्तर .

>>>>काही ठिकाणी मांसाहारा नेवैद्य असतो तर तोही चालायला हवा.>>>> +१
मांसाहार निषिद्ध का मानला जातो कोणास ठाउक.

बाप्पाला सगळीकडे शाकाहारीच नैवेद्य असतो असं ऐकून आहे. गौरीला काही ठीकाणी नॉनव्हेज असतो, पण तेव्हा बाप्पाला व्हेजच असतो. जवळची एक कझिन सासरची सीकेपी आहे म्हणून माहीती. काही ठीकाणी गौरीला मद्य पण दाखवतात त्याला गुंजवटी म्हणतात पण तिच्याकडे ते नसतं, ही गुंजवटी माहीती म टा मधे वाचलेली काही वर्षापुर्वी, कुठल्या भागात, समाजात आठवत नाही.

इथे जातीचा उल्लेख फक्त माहीती सांगण्यासाठी आहे, कृपया गैरसमज नसावा. सरसकट एकाच जातीत हे लागू पडत नसेलही.

छान आहे स्पर्धा!

नैवेद्याच्या पानावर मीठ वाढत नाहीत.

बाकी लिंबू, हिरवी चटणी, मोकळी डाळ, कोशिंबीर, पंचामृत, गिलक्यांची (घोसाळ्यांची) भजी, भरड्याचे वडे, पालक-आंबट्चुक्याची पातळ भाजी, लाल भोपळा/ कोबी/ फ्लॉवर ची सुकी भाजी, ताकाची कढी, घारगे, वर दिला आहे तसला गव्हल्यांच्या खिरीचा फर्राटा, पुरणपोळी, साधी पोळी, साधं वरण भात, साजुक तूप. हा मुख्य नैवेद्य.

महालक्ष्मी करता यात, सोळा भाज्यांची भाजी, ज्वारीची आंबील (पिठीसाखर + दूध घालून) + मलईचे पेढे आणि तांबूलही नैवेद्यावर असतो. अर हो पुरणाचे दिवे/ आरत्या असतात आणि देवीला जोगवाही मागतात आरतीनंतर>
आणि फुलोरा (हा आमच्याकडे देवी + गणपती कॉमन करतात) - यात वेण्या, मोदक, पापडी, करंजी, सांजोरी, साटोरी, लाडू
या व्यतिरीक्त गणपती बाप्पा करता २१ मोदक असतात (तळणीचे)

यातले पेढे अन गणपतीचे २१ मोदक हे आरती नंतर हातावर द्यायला प्रसाद म्हणून देतात.
आणि सगळ्यांची जेवणं झाली की तांबूल!

यावर्षी मिसणार आता काय न! Sad

असो अवांतर झालंय खरं पण आता टाईपलंय त उडवत नाही.

अबाबा
आपला पास.
लांबून फोटो बघणार आणि कौतुक करणार. मतदान असेल तर मतदान करणार.

विचार करत होते..पण एकवेळ ते पदार्थ करायला जमेल पण ते.. प्रमाणानुसार रेसिपी लिहायला जमणार नाही.. मी कोतुक करणार आणि मुंबईत कोणी चाखून बघायला बोलवले तर नक्कीच जाणार..

योकु तुम्ही तरी मला एकदम पेशवेकालीन युगात घेऊन गेलात.. स्वामी मध्ये असे सगळे वर्णन वाचले होते.. आजच्या काळात एवढे सगळे पदार्थ कोणी बनवत असेल तर.. ग्रेट असतील ते..

आमच्या इथल्या महालक्ष्मी ला हाच नैवेद्य असतो दर वर्षी. आताशा प्रमाण कमी आहे कारण लोक्स जास्त नसतात आणि आधीसारखे जेवणं पण (क्वांटीटी मध्ये) नसतात सो . प्रकार असतात सगळेच पण कमी मापात केलेले असतात.

आणि हो सगळेच प्रकार एका दिवशी नाही करत, फुलोरा इ. ऋषीपंचमी च्या आगेमागे, पुरण महालक्ष्म्यांच्या महापूजेच्या आदल्या दिवशी (आगमनादिवशी) इ.

योकु मी दक्षिण भारतीय असल्यामुळे .. यातले फारसे काही माहित नाही.. पण माबोवरच उभ्या गौरी बद्दल वाचले आहे.. मी कधीच ना बघितलेल चित्र त्यांनी डोळ्यासमोर उभे केले.. वाचूनच मन भरून आले होते..पुन्हा एकदा वाचेन..