ओए ओए, तर्रीवाले पोहे

Submitted by म्हाळसा on 8 August, 2020 - 22:10
tarriwale pohe

यंदा lockdown मुळे, सकाळच्या नाश्त्याचा वीडा उचललेले नवरोबा व त्यांच्या हातचे तर्री पोहे, ह्या बद्दल तर मी अगदी कढईभर लिहू शकते..
अहो तुम्हाला सांगते जेव्हा सकाळी डोळे चोळत बेडरूम मधून बाहेर आले तेव्हा नवरोबा Alexa च्या तालावर चांगलेच थिरकत होते.. त्यांच्या मूडचे तीनतेरा वाजवत मी हसत विचारलं “आज नाश्त्याला काय?”.. त्यावर “पोहे” ह्या विषयात phd केलेल्या नवरोबाने प्लेटमधे गरमागरम पोहे व तर्री आणुन देत “शेव आणि लिंबू आता स्वतः उठून घ्या” असं खोचकपणे सांगितलं. चहाबरोबर नाश्त्यासाठी पोहेच असणार हे मला अपेक्षित होतंच कारण इतर विषयांमधे तशी त्यांची बोंबच.. असो.. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघवला नसेल कदाचित असं मानून मीही त्यांच्याकडे दुर्लक्ष फेकून मारलं आणि पोहे खात कपात दिलेल्या राजसिक पेयावर लक्ष केंद्रीत केलं ..
भरपूर दाणे व मिरची घातलेले तिखट पोहे, त्यावर जहाल तर्री व रतलामी शेवेचं टाॅपिंग आणि सोबत एक कडक आल्याचा चहा..अहाहा स्वर्ग!

नवरोबा तसे फारच perfectionist..उडत्या पाखराचे पंख मोजण्या इतपत गुणवत्ता त्यामुळे पोहे हातात घेताच त्याचा प्रकार ओळखून त्यांना भिजवण्याच्या पद्धतीत केला जाणारा योग्य तो बदल, कांदा व पोह्यांचे अचूक प्रमाण (१ वाट्या पोह्यांना पाऊण वाटी बारीक चिरलेला कांदा) याच बरोबर शेंगदाणे स्वतंत्र पॅनमधेच, कमी तेलात आणि मध्यम आचेवर खरपूस तळून दाताखाली चावताच ‘करमकुरम’ असा आवाज होईल इतके तळले जाणे इत्यादी गोष्टी कटाक्षाने पाळणारे आमचे ‘पोहेबहाद्दर’.. आता जरा ह्यांनी बनवलेल्या तर्रीकडे वळूयात.. ‘कमीतकमी मचमचीत जास्तीतजास्त चमचमीत’ ही त्यांची टॅग लाईन .. सर्वप्रथम मसाला बनवण्यासाठी कढईत तेल तापत ठेवायचं.. तो पर्यंत सपासप कांदा चिरून घ्यायचा, खसाखस सुकं खोबर किसून घ्यायचं, तेलाचा तडातड आवाज झाल्यावर मोठी वेलची, छोटी वेलची, लवंग, लसुण, आले आणि वरील दोन्ही गोष्टी त्यात घालून भराभर कलथ्याने परतून मिक्सरला फिरवून घ्यायचं. पुन्हा कढईत भसाभस तेल ओतायचं..हो भसाभसचं कारण तर्रीसाठी जरा जास्तच तेल लागतं.. मग त्यात २ तमालपत्री टाकून पटापट मिक्सरमधे वाटलेला मसाला घालायचा.. हळद,लाल तिखट,धने पावडर, काळा मसाला घालून भराभर हलवून घ्यायचं..आता महत्वाची टीप..नवरोबाची तर्री इतकी जहाल की अगदी ३ वेळा आतिषबाजी झालीच पाहिजे..चावताना, गिळताना आणि __.. त्यामुळे सांभाळूनच खावी लागते.. म्हणून तुम्हाला झेपेल तेवढच तिखट घाला...आता मसाल्याला तेल सुटू लागले की पाणी ओतून फटाफट उकळी काढून घ्या..आता ही तर्री पोह्यांवर जराजरा ओतायची की अशीच गटागटा प्यायची ते तुमचं तुम्हीच ठरवा..

गरम तर्री व नरम पोह्यांबरोबर कडक चहा बनवण्यातही नवरोबा तितकेच माहीर.. तसं चहा तर कोणी सोम्यागोम्या पण बनवू शकतो ओ पण नवरोबाची बातच काही और। त्यांच्या चहात दूधाचा पगडा हा नेहमीच भारी. चहा पावडर ही ‘society’ किंवा ‘girnar-number 3’ चीच असली पाहिजे हा अट्टाहास.. त्याच बरोबर चहात आल्याचा मारा आणि “आज थोडंसं काही तरी नवीन पिऊयात” म्हणत टाकले जाणारे २ बडीशेपचे दाणे किंवा कुटलेली काळी मिरी अथवा गवती चहा..दूध घालून चहाची रबडी होईपर्यंत उकळण्याच्या कलेत पारंगत असलेले आमचे हे ‘चहाधुरंधर’..
(तसं अजूनही गूळाचा चहा बनवण्यात तितकंसं यश आलेले नाही पण प्रयत्न चालूच आहेत)

पूर्वी, मी काॅलेजमधे असताना माझ्या चाळीशी ओलांडलेल्या आईने प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर ‘naturopathy’ मधे पदविका प्राप्त केली आणि त्याचा परिणाम असा झाला की आमच्या स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या तामसिक खाद्यसंस्कृतीवर गदा आली आणि सात्विक खाद्यपद्धती उदयास येऊ लागली.. फोडणीच्या पोह्यांमध्ये अमूलाग्र बदल करण्यात आले..कांद्याबरोबर गाजर-काकडी-कैरी चा कीस, मोड आणलेले मूग व डाळिंबाच्या दाण्यांचे अवशेष सापडू लागले..फोडणीत पोहे न घालता, पोह्यात मीठघातल्याप्रमाणे फोडणी घालून बनवलेले पोहे आमच्या वाट्याला येऊ लागले ..सात्विक पोहे हा काय प्रकार असतो ते तेव्हा आमच्या ध्यानात आलं .. पोह्यांप्रमाणेच सकाळी मिळणाऱ्या चहाचा देखिल कायापालट करण्यात आला.. पाण्यात चक्क धणे, जीरे, दालचिनी यांसारखे अख्खे मसाले आणि तुळशीची पानं, मेथी दाणे वगैरे घालून उकळलेला ‘उकाळा’ मिळू लागला ..मीही तिला म्हटलं “असा चहा पिण्यापेक्षा वैद्यांचा पाटणकर काढा प्यायलेलं काय वाईट”.. त्यानंतर, मी माझ्या थोरल्या बंधूराजांना व पितामहांना हाताशी घेऊन टाकलेल्या बहिष्कारामुळे आमच्या घरी सुरू झालेली सात्विक चळवळ लवकरच संपुष्टात आली व पूर्वीची चहा-पोहे पद्धती पुन्हा आनंदाने नांदू लागली..

पण माझ्या लग्नानंतर, जेव्हा हा असा..किमान अर्धा तास तरी उकळून बनवलेला बासुंदीवजा चहा, आईच्या भाषेत जरी ‘विष’ असलं तरी केवळ तो आपल्या लाडक्या जावयाने बनवलेला आहे म्हणून तिच्यासाठी अमृततुल्य ठरू लागला..किती हा विरोधाभास!

असो.. तर कढईभर म्हणता म्हणता परातभर लिहून टाकलंय.. म्हणून तुर्तास आवरते घेते.

BC3C0633-7120-4E4F-8A5D-4B762D8C3E90.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Mast लिहिलंय.करून बघणे अजिबातच नाही.पोहे करते तेव्हढे बस!

त्यावर “पोहे” ह्या विषयात phd केलेल्या नवरोबाने प्लेटमधे गरमागरम पोहे व तर्री आणुन देत
>>>माझ्या एका शाळेतल्या मित्राने भाताचे प्रकार या विषयावर phd केली आहे... पोह्यावर phd पहिल्यांदाच ऐकली...मस्त मस्त मस्त...

वा!

मस्त दिसतायत पोहे
इतक्या तर्री वाले बनवायला जीव धजावणार नाही.पण कधीमधी छानच असतील खायला.

नमनाचं घडाभर तेल आवडलं. तर्री ही झकास दिसतेय.

पण आमच्या नवरोबाला कांदेपोह्यामधे शेंगदाण्याचा सुद्धा भ्रष्टाकार खपत नसल्याने (मलातरी कुठे फारशी उठाठेव करायला आवडतंय) माझा पास.

बाकी तुमचं (न झालेल्या सासूने शिकवलेलं) भाकरीचं पुडींगही आवडलं आहे.

मस्त रेसिपी, लिखाण आणि फोटो!
आमच्याकडे आज पोहेच होते नाश्त्याला तरी तो फोटो , शेव बघून पुन्हा खावेसे वाटले. तर्री पोहे मात्र मी कधीच खाल्ले नाहीयेत.
अगदीच अवांतर पण पुण्यात शास्त्रीरोडला सुशील पोहे म्हणून एक आऊटलेट आहे तिथले पोहे अप्रतिम असतात. (आता कधी करोना जाणार, पुण्याला जाणं होणार व ते पोहे खाणार देवच जाणे!).

छान लिहिलेय हे सुद्धा Happy
पोहे केव्हाही आवडीचेच.. तर्री पोहे अगदी फार नाही पण पोहे तिखटच असावेत. तोंडात किंचित मिरचीचा जाळ झाला पाहिजे म्हणजे त्यासोबत घोट घोट गरम चहाचा चटका बसला की मजा येते..

सुंदर पोहे करता येणारा नवरा हे भाग्यच म्हणायला हवे या पुरुषप्रधान संस्कृतीत
तुमच्या लग्नाआधीच्या कांदेपोहे कार्यक्रमात पोहे कोणी केले होते? कि दोघांचे कॉम्पिटीशनच ठेवले होते Happy

मस्त. सकाळी सकाळी हा लेख वाचून पोहे केले. तर्री म्हणून मिसळीचा कट केला रेडिमेड मसाला वापरून. वरून कांदा, फरसाण आणि बरोबर आल्याचा चहा. फक्कड बेत झाला.
तुम्हाला धन्यवाद Happy

सर्वांना धन्यवाद
तुमच्या लग्नाआधीच्या कांदेपोहे कार्यक्रमात पोहे कोणी केले होते? कि दोघांचे कॉम्पिटीशनच ठेवले होते >> आमच्या कांदेपोह्यांच्या कार्यक्रमात बाहेरून समोसे मागवले होते Happy

सकाळी सकाळी हा लेख वाचून पोहे केले. तर्री म्हणून मिसळीचा कट केला रेडिमेड मसाला वापरून. >> अरे वा.. मी सुद्धा मागे असं फेसबुकवर बघूनच नवर्याच्या मागे तर्री पोहे बनव म्हणून लागले होते.. लाॅकडाउनमधे करून घातले मला एकदाचे Happy

चटकदार लेख आणि पोहे सुद्धा. बरेच प्रतिसाद आहेत की ज्यांना हे असे कट/ तर्री घालून पोहे आवडतात. मला आश्चर्य वाटलं. मला स्वतःला नाही आवडत. त्याने मूळ पोह्यांची चव जाते असं वाटतं.

“असा चहा पिण्यापेक्षा वैद्यांचा पाटणकर काढा प्यायलेलं काय वाईट”.
>> Rofl
कसलं भन्नाट लिहता हो तुम्ही.

त्याने मूळ पोह्यांची चव जाते असं वाटतं.>मलाही तसच वाटतं..पण तर्रीच्या निमित्ताने नवऱयाकडून दुपारच्या जेवणाची अर्धी तयारी करून घेता येते म्हणून हे काॅंबो आवडतं Happy

कसलं भन्नाट लिहता हो तुम्ही>> चहाच्या नावाखाली कोणी पाटणकरांचा काढा पाजला तर असच काहीतरी लिहीलं जाणार Happy

म्हाळसाकांत स्वयंपाकात पारंगत दिसताहेत Wink

हे पोहे करुन बघायचे आहेत! लवकरच योग जुळवुन आणणार!

म्हाळसाकांत स्वयंपाकात पारंगत दिसताहेत >> असा गैरसमज होऊ नये म्हणूनच मी वर लिहीलय “ पोहेच असणार हे मला अपेक्षित होतंच कारण इतर विषयांमधे तशी त्यांची बोंबच..“ .. गेल्या ९ वर्षांपासून गाडी चहा पोह्यांच्या पुढे गेली नाहीए Happy

@ म्हाळसा, नवरा ही जमात तशी पहिल्या पासूनच इब्लिस असते, अंगावर शेकू नाही देणार. अंगभूत कौशल्य कुठे दाखवायची ते बरोबर कळते आम्हाला. बायकोची लाडीगोडी का आणि कशी वाट लावेल याचा अंदाज घेऊनच वागतो.
( धागा मटेरीयल आहे, आणि धगधगता विषय ही Wink )

"प्यार की राह मे चलना सिखो.... "
Men will be men Rofl

Pages