La Flor del amor - Blossom of love (भाग ५)

Submitted by कविन on 23 July, 2020 - 00:59

भाग ४
__________________________________________________________________________________________________________________________
भाग ५:-

"Welcome home" म्हणत त्याने दाराकडे हात केला. आम्ही आत आलो. खालचा अर्धा भाग ऑफीससाठी कंव्हर्ट केला होता. मी तिथेच शिरत होते तर मला म्हणाला, "वरती घरी जाऊन आधी कॉफी घेऊ मग इथे येऊ."
आम्ही पहिल्या मजल्यावरच्या घरात आत आलो. मला संकोच वाटू नये म्हणून दार उघडंच ठेवून, मला बसायला सांगून तो आत गेला. मी सोफ्याच्या कॉर्नरवर जस्ट टेकल्यासारखं करुन हॉलमधे ठेवलेले indoor plants बघत होते तेव्हढ्यात तो ट्रेमधे दोघांसाठी कॉफी, केक आणि हॉट चिप्स घेऊन आला.

"मी ब्रेकफास्ट करुन आलेय" मी म्हंटलं

"अरे काय तू पण! मी थांबून राहीलो ना तू येणार म्हणून" अस म्हणत त्याने माझ्या हातात केकची प्लेट दिलीच. मला देजावू झाल्यासारखे वाटले.

"हे चिप्स फ्रेश आहेत एकदम, आवडतील तुला", त्याने स्वत:च्या तोंडात चिप्सचा तुकडा टाकत माझ्या पुढे डिश सरकवत म्हंटलं.

केकचा तुकडा माझ्या तोंडात असतानाच हे झालं आणि माझं लक्ष त्याच्या हातातल्या चिप्सकडून त्याच्या ओठांकडे गेलं. स्वप्न आठवलं आणि ठसकाच लागला.

"सावकाश खा" माझ्या हातातली डिश काढून टिपॉयवर ठेवून मला पाणी देत तो म्हणाला. बोटांचा स्पर्श झाला आणि गॅसवरच्या गरम कढईला स्पर्श झाल्यावर ज्या फटक्यात हात मागे येतो आपला, त्या वेगात माझा हात मागे झाला आणि या सगळ्याचा शेवट पाणी सांडण्यात झाला.

"सॉरी सॉरी सॉरी" मी म्हंटलं

"Don't be. Relax. तू या इथे बस आणि ही कॉफी घे. बाकी मी बघतो."

मला काही बोलायची संधीच न देता तो माझ्या हातात कप देऊन आत गेलाही.

स्वप्नातला माझा कॉंफिडंस कुठच्या कोपऱ्यात गेला होता देव जाणे. मी स्वत:चा इतका वेंधळा अवतार बघून स्वत:च हैराण झाले होते.

"लो बन गया अब फर्स्ट इंप्रेशन तेरा" मनातल्या मनात टपली मारत म्हणूनही झालं दहावेळा. तो मात्र काही न झाल्यासारखा पाणी पुसून घेऊन ते फडकंही आत वाळत टाकून हात धुवून माझ्या समोर येऊन बसलाही. एकीकडे ऑटो पायलट मोडवर काम सुरु असल्यासारखे त्याच्या वावराचा अंदाज घेणे सुरु होते आणि दुसरीकडे स्वत:ला टपली मारुन घेणही सुरु होते.

"I am really sorry" मी परत एकदा म्हंटल्यावर तो म्हणे "इतक्या गिल्टसाठी तर अजून दोनचार वेळा सांडायला हवं आता तू पाणी इथे."

मी आपली सायलेंट मोडवर गेलेले बघून तोच परत म्हणाला , "ऱिलॅक्स मॅडम रिलॅक्स, होता है. पण आता पुन्हा सॉरीवॉरी नको. त्यापेक्षा मला कॉफी जमलेय का सांग "

"हो परफेक्ट ..", मी उत्तर दिलं.

"स्लाईट बिटर आहे ना" त्याने विचारलं

"हो पण मला अशीच आवडते." माझ्या उत्तरावर त्याने गूड का म्हंटलं काय माहिती.

कॉफी पिऊन झाल्यावर त्याला म्हंटलं चल बघूया का इकेबाना?, तर म्हणे जाऊया पण त्याआधी तुला घर तर दाखवतो, खासकरुन बाल्कनी. तिथे एका भिंतीवर 'व्हर्टिकल वॉल गार्डन' केलय. ते बघायला आवडेल तुला. ते आधी बघुया?

मानेनेच हो म्हणत मी त्याच्या पाठोपाठ तो नेईल तिथे जायला तयार झाले. 'व्हर्टीकल वॉल गार्डन' खरच मस्त दिसत होती. बाबाला सांगायला पाहीजे असं काही करुन घ्यायला, मनातल्या मनात अशी नोंदही करुन झाली.

बाल्कनीतून मग स्टडी रूम, आईची खोली, देवघर, गच्ची, गच्चीवरचा त्याचा आवडता कोपरा असं सगळी कडे फिरुन अख्ख्या घराची ओळख करुन झाली, सोबतीला फॅमिली ट्री.. शाळा, कॉलेज, मित्र मैत्रिणी सगळ्याची रनिंग कॉमेन्ट्री होतीच अगदी तो दहावीपर्यंत अभ्यासात बरा होता मग कॉलेजमधे शिंग फुटली आणि बारावीत गाडी चांगलीच गडगडली. मग त्याला मेडीकलला जाता आलं नाही पासून ते त्याला फेल्युअरची भिती घालवायला समुपदेशकाची मदत घ्यावी लागली पर्यंत सगळंच सांगून झालं त्याचं.

त्याच्या मित्रमंडळींपैकी प्रिया आणि अमोघ त्याच्या सगळ्यात जास्त जवळचे आहेत आणि त्यांनी अगदी कानावर बंदूक ठेवून कसं हे नर्सरीच धाडस करायला भाग पाडलं हे पण मला सविस्तर समजलं. अगदी आत्ता त्याची आई त्याच्या बहिणीच्या डिलिव्हरीसाठी गेल्याचही सांगून झालं.

एकाच भेटीत इतकं सांगून झालं तर नंतर बोलायला काही विषय उरणार आहे का? असं एकदा मनात येऊन गेलं माझ्या पण तो इतकं समरसून सांगत होता की त्याला मधेच तोडणं जमलच नाही मला.

या नादात जे दाखवायला बोलावलं ते राहीलंच, हे त्याला इतक्या गप्पा मारुन झाल्यावर आठवलं आणि मग आमचा मोर्चा 'इकेबाना' बघायला खालच्या ऑफीसमधे गेला.

अफलातून होत्या सगळ्याच रचना. तो यांना बेसिक, साधे का म्हणत होता हे त्यालाच माहिती.

खूप सुरेख आहेत हे .. मी त्याला म्हंटलं. त्याचे डोळे आनंदाने लकाकले. आलोच म्हणत तो बाहेर कुठेतरी जाऊन आला. माझ्यापुढे दोन हातात दोन फुलं धरुन, "यातलं आवडेल ते तुला भेट" असं म्हणाला

एका हातात होती नाजूक निळी फरगेट मी नॉटची फुलं आणि दुसऱ्या हातात होतं पर्पल लव्हेंडर रंगाच गुलाबाच फूलं.

तुला जे द्यायला आवडेल ते दे .. मी म्हंटलं.

मग हे घे म्हणत त्याने 'फरगेट मी नॉट' डाव्या हातात दिली आणि हे पण घे म्हणत उजव्या हातात पर्पल रंगाची गुलाबाची फुलं दिली.

चल आता निघू मी. फुलांचा वास घेत मी विचारलं

"बस काय! गिफ्ट मिळालं तर लगेच टाटा बाय बाय?", त्याने नॉट फेअर अशा अर्थी मान हलवत म्हंटलं

"लगेच?? येऊन दोन तास झालेत मला आता" माझ्या डिफेन्समधे घड्याळ समोर धरत मी ही उत्तर दिलं.

"म्हणजे अजून तासभर बाकी आहे", तो हसत म्हणाला

हे काय लॉजीक? या माझ्या प्रश्नावर त्याने, "सिनेमा तीन तासाचा असतो ." असं उत्तर दिलं

"बरं मग? हा काय सिनेमा आहे?" यावर "Just kidding. बस की पण. घाई काय आहे? तुला नवीन रोपं दाखवतो नर्सरीतली." हे ऐकवून झालं त्याचं

"बर चल ठिक आहे. " मी ही मान्य करत उठले.

मी हो म्हणताच त्याने बाईकची चावी खिशात टाकली. मोबाईल आणि पाऊच घेतलं. घराची चावी पण घेतली आणि आम्ही नर्सरीत जायला निघालो. आता मागच्या आवारात जायला इतकं सगळं कशाला लागणार होतं? पण जाऊदे, मी उगाच 'का? कशाला'चे फाटे न फोडता त्याच्यासोबत नर्सरीत गेले.

तिथे गेल्या गेल्या त्याने माझ्या हातातली फुलं कोमेजू नयेत म्हणून काचेच्या प्लांटर्समधे पाण्यात ठेवून माळीदादांकडे दिली आणि निघताना द्यायची आठवण करुन मला नर्सरी फिरुन दाखवायला सुरुवात केली.

पुढचा पूर्ण अर्धा पाऊण तास तो जे दाखवेल ते मी बघत होते आणि मी जे विचारेन ते तो सांगत होता. आवडीचा विषय असला की माणूस किती पॅशनेटली बोलतो छोट्या छोट्या गोष्टींविषयी याचा पुन:प्रत्यय येत होता. गार्डनबद्दल बाबाही असच बोलू शकतो कितीही वेळ.

आमच्या गप्पा पार दापोली कृषीविद्यापिठात शिकत असतानाच्या आठवणींपासून ते कोणत्या झाडाला कशाप्रकारची माती लागते, पाणी, ऊन कमी जास्त लागतं इथपर्यंत सुरु होत्या.

मधे मधे मला जे नवीन दिसेल त्याच्याबद्दल प्रश्न विचारणं सुरु होतं माझं. म्हणजे अगदी सिडलिंग्ज ट्रेचा वापर कसा होतो?, रुटींग हार्मोन्स म्हणजे काय? त्याचा वापर कधी? कसा? करायचा पर्यंत सगळच.
अगदी त्यात जास्वंदीला लागणाऱ्या मिलीबग्जना कसे घालवायचे, बारक्या गोगलगायी कशा घालवायच्या,मुंग्या का येतात झाडावर आणि झाडं शॉकमधे जातात म्हणजे काय इथपर्यंत माझ्या अगदी बावळटतल्या बावळट शंकांचाही समावेश होता आणि तो तितक्याच शांतपणे त्याला माहिती असेल ते सांगत होता, जे माहिती नाही त्याबद्दलही सहजपणे तसं मान्यही करत होता. So like baba माझ्या मनाने नोंद घेतली. आता मला खात्री पटली इतकं बोललाय हा पहिल्याच भेटीत तरी दरवेळी नव्याने जाणून घेण्यासारखं अजून बरच काही सापडतच जाईल मला.

नर्सरी ओलांडून आम्ही बंगल्याच्या दुसऱ्या बाजूला आलो तिथे कोपऱ्यात वडाच झाड होतं आणि चक्क त्याला गावाकडे असतो तसा पार बांधला होता फक्त तो अर्धगोलाकार होता. त्यावर टेकून बसलो तेव्हा पाय दुखत असल्याची जाणिव झाली. मी काहीतरी विचारायला तोंड उघडलं तर म्हणे enough about me. आयुष्यात इतकं सलग स्वत:बद्दल पहिल्यांदाच बोललोय मी आणि ते ही पहिल्या भेटीत. प्रिया आणि अमोघला कळलं तर विश्वास नाही बसणार त्यांचा. असो आता माझं पुराण पुरे. तू तुझ्याबद्दल सांग.

मग डॅड- आजी -आजोबा- बाबा- मा- जाई आमची बाग- बेडरुमच्या खिडकीतून गंधाळणारी रातराणी आणि मधुमालती, रुही ते अगदी जयपर्यंत चपरचपर करुन तोंड दुखल्यावर नर्सरी स्टाफकरताच्या पॅन्ट्रीमधून एक कटिंग चहा मागवून प्यायलो आणि मग मात्र मी, "आता नको हा थांबवू मला" म्हणत जायला उठलेच.

"मी सोडतो तुला" बाईकची चावी खिशातून काढत तो म्हणाला

"नाही अरे मी जाईन", मी म्हणाले

"मग मला पत्ता कसा कळणार न विचारता?", त्याने डोळा मारत म्हंटलं

शेवटी मी माघार घेत तयार झाले. मनातून मलाही तेच हव होतं खरतर.

सोसायटीच्या गेटपाशी आल्यावर त्याला घरी ये म्हंटलं तर, "नको आज नको परत कधीतरी येईन" म्हणत तो जायला निघाला.

"Thank you. आजचा दिवस लक्षात राहील. आणि ही फुलही लक्षात रहातील", मी म्हंटलं.

"मग आता मला काय देणार तू रिटर्न गिफ्ट म्हणून?" त्याने हातातली किचेन फिरवत खट्याळपणे विचारलं

"ह्म्म! तुला काय देणार? ठिक आहे, हे घे" म्हणत मी मला दिलेल्या दोन्ही प्रकारच्या फुलांमधली अर्धी फुलं त्याला दिली.

"हे काय माझच गिफ्ट मला?", त्याने विचारलं

"छे! तुझ कसं?,आता ते माझं आहे ना. मी शेअर करतेय तुझ्यासोबत. परत नाही करत आहे." मी लग्गेच ऐकवलं

"मी तुला दिली कारण ती तुझ्यासाठी आहेत. They are meant for you even as per its meanings. You know, right?" त्याने विचारलं

"आणि मी तुझ्यासोबत शेअर करतेय कारण मलाही असच वाटतय की ही तुझ्यासाठी आहेत. They are meant for you too" मी परतफेड करत म्हंटलं

"ओह! सिरियसली?" माझ्या मागोमाग लिफ्टपाशी येत माझा हात हातात घेत माझ्या डोळ्यात बघत त्याने विचारलं

"As serious as you", मी उत्तर दिलं आणि पटकन हात सोडवून लिफ्टमधे शिरुन बाय म्हणत दार लावून घेतलं

"this is not so fair. पुढल्या भेटीत व्याजासकट गिफ्ट घेईन" असा व्हॉट्स ॲप मेसेज करुन त्यापुढे त्याने विंक स्मायली टाकली

जीभ बाहेर काढून वेडावून दाखवणारी स्मायली मी उत्तर म्हणून पाठवली.

घराच्या दारातच जाईने घड्याळाकडे बोट करत भुवई उंचावली.

थोडावेळ जाऊन येते म्हणत इतका का वेळ लागला म्हणत जाईने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.

तिचा तोफखाना थोपवून कपडे बदलायला जाईपर्यंत तिची सलोन ॲट होमवाली घरी आली आणि मी तात्पुरती तिच्या इंटरोगेशनमधून सुटले.

संध्याकाळी मात्र तिने हातात कॉफीचा कप देत ठिय्याच मांडला. तिला सगळा अहवाल दिल्यानंतर मग कुठे ती शांत झाली. नशीब मी काही तपशील गाळले त्यातले. जे सांगितल त्यावरूनही तिने मला go slow चा सल्ला दिला. "मुलगा आहे चांगला पण आज फक्तं चांगली बाजू दिसलेय आणि मुख्य म्हणजे समान आवडी कळल्यात. डिफरन्स अजून हायलाईट व्हायचेत सायु, म्हणून फार हाय जाऊ नका आत्तापासूनच." ती कळकळीने सांगत होती ते ऐकताना माझाही चेहरा गंभीर झाला,

माझा सिरियस चेहरा बघून मग परत टपली मारत तिच म्हणाली.. "ओय्य लडकी डेट वर जा मजा करा थोडं भांडा ऐश करा खूप पुढचा विचार नकाच करु आत्तापासून."

"वकील बहिण असल्याचा फायदा .. धाडकन जमिनीवर आणून ठेवतात त्या" मी तिला मिठी मारत म्हंटल.

"Good for you" तिने पाठीवर थोपटत म्हंटलं

क्रमशः

_________________________________

भाग ६

Group content visibility: 
Public - accessible to all site users

lovely

खूप मस्त, रिलॅक्स्ड कथा सुरू आहे.>>>हो, आणि डोळ्यासमोर घडतेय असंही वाटतय. बारीक सारीक तपशील वाचायला आवडताएत.

मस्त चालू आहे कथा कविन. गार्डनिंग, फुले हा बॅकड्रॉप खूप आवडलाय. ती नर्सरी, वडाचा पार डोळ्यांसमोर आलं अगदी आणि पर्पल गुलाब तर .... वॉव

कविन, सुंदर हळुवार, सुगंधी कथा. सगळे भाग वाचले, हलके फुलके फुलांच्या सोबतीने फुलणारं सुगंधी प्रेम. फुलांच्या अर्थाचं ज्ञान तर नवे आणि मस्तं. बाहेर इतकं stress ani tensionची स्थिती असताना खरंच असं वाचायला बरं वाटतंय. कथेत का होईना काही positive होतंय. पुढील लेखनासाठी आपणांस शुभेच्छा.

धन्यवाद मेघना, सामो, शब्दसखी, माऊमैया, स्वाती, आशिका, सामी, धनुडी, प्रि तम, ऊर्मिला, मामी, अवल, नानबा, सहेली आणि प्रितीविराज Happy

आहाहा! किती सुंदर, तरल कथा आहे. खूपच आवडली आहे. पुभा प्र.
इंग्रजी नावामुळे याआधी वाचली नव्हती पण काल रात्री झोप लागत नव्हती म्हणून सहजच वाचायला घेतली आणि रात्री २:३० वाजता अधाशासारखे सगळे भाग वाचून काढले.
ते म्हणतात ना कव्हर वरून पुस्तक जज करू नये ते खरचं आहे. इतक्या सुंदर कथेला मी माझ्या बावळटपणा मुळे मुकले असते.
हल्ली मला लव स्टोरी एव्हढ्या आवडत नाहीत पण कविन तुम्ही इतक्या सुंदररित्या ही कथा गुंफली आहे की पुन्हा प्रेमाची अनुभुती येतेय.
फुलांच्या तपशीलवार माहितीसाठी धन्यवाद आणि त्यामुळेच कथेचे नावही समर्पक.
नवीन भागासाठी जास्त वाट पाहायला लावू नका.

खूप छान लिहिलंय.
प्रत्येक भागावर घेतलेली मेहनत जाणवतेय.
आजूबाजूचा परिसर छान उभा केला आहेस.