La Flor del amor - Blossom of love (भाग ६)

Submitted by कविन on 23 July, 2020 - 22:42

भाग ५
____________________________________
भाग ६:-

त्यानंतरही आमच्या अधूनमधून भेटी होत राहिल्या. कधी आम्ही दोघेच तर कधी गृपबरोबर. दोघेच तसं फार कमी वेळा झालय म्हणा. ते सुद्धा नॅशनल पार्कमध्ये नेचर ट्रेल बद्दल वाचून इतरांना त्यात रस नाही म्हणून जाणं व्हायचं तितपतच. जाईही असायची गृप इव्हेंट्स असतील तेव्हा.

त्याचा कोअर गृप म्हणजे तरी काय ईन मीन पाच जण होती ती. त्यातही सावी आणि सुमीतची जोडी कॉलेजपासून स्टेडी होती. बाकी तिघे म्हणजे तो स्वतः, प्रिया आणि अमोघ. कानाला बंदूक लावून फेल्युअरच्या भितीची ऐशीतैशी म्हणत त्याला नर्सरी सुरु करायला ज्यांनी तयार केलं ती ही दोघं. गृपमधे जेव्हा पहिल्यांदा प्रणवने आम्हा दोघींची ओळख करुन दिली तेव्हा सगळ्यात आधी प्रियाने आमचं स्वागत केलं.
"Girls power वाढली. तूम बच के रहना मेरे बेस्टम् बेस्ट" असं आमच्या समोरच प्रणवला ऐकवत तिने आम्हाला सामिल करुन घेतलं.

पण दोन चार भेटीनंतर काही तरी खटकायला लागलं. नेमकं बोट ठेवून सांगता येत नव्हतं पण मुद्दाम, माझ्या आणि जाईच्या बाजूला बसल्यावर तिचे आणि प्रणवचे अकरावी बारावीचे कॉलेज बंक करण्याचे, बाईक ॲडव्हेंचरचे वगैरे किस्से सांगून तिची त्याच्या आयुष्यातली प्रायोरिटी हायलाईट करणं जरा जास्तच लक्षात येण्यासारखं होतं.

"ही नक्की प्रणवच्या प्रेमात आहे", मी जाईला एका अशाच गेट टुगेदर वरुन परत येताना म्हंटलं.

"हम्म्! असच वाटतय. पण त्याच्याकडून कधी सिग्नल जाताना दिसला नाही मला", जाईने आमच्या लिफ्टचं दार लावत मला त्यावर उत्तर देत ऐकवलं.

"त्याने नसतील दिले पण तिने चुकीचे अर्थ लावले असतील का त्याच्या बोलण्याचे?" मी तिची केस सोडवत होते की माझी स्वतःची हे ही ठरवता न येऊन मी बोलून गेले.

"हे तोच सांगू शकतो. आता पर्पल रंगाच गुलाब असच टिपी होतं की symbolism & all हे खरच तो सिरियसली घेतो याचा तुला विचार करायलाच हवा सायु", तिने म्हंटलं

तिच्यातली बहिण आणि वकील कायमच जागे असतात असे.

उलट सुलट विचार करुन डोक्याचा भूगा झाल्यावर मी उशी डोक्यावर दाबून झोपून गेले.

पुढचे एक दोन कार्यक्रम मग मी उगाचच टाळले, कधी नाशिकला जायचय सांगून तर कधी जय बरोबर क्लाएन्ट विझिट आहे हे कारण पुढे करुन.

फेसबुक आणि व्हॉट्स ॲप गृपवर त्या त्या इव्हेंट्सचे फोटो अपडेट मिळायचे. प्रत्येकवेळी प्रत्येक फोटोत प्रिया आणि अमोघ प्रणवच्या दोन्ही बाजूला दिसायचे. एखादा इव्हेंट मी नाही म्हणून त्यानेही कॅन्सल केला अस कळलं की नंतर तो इव्हेंटच कॅन्सल केल्याचा प्रियाचा मेसेज गृपवर दिसायचा.

आम्ही एकटेच जास्तं भटकत नसलो तरी आमची सकाळ दुपार संध्याकाळ डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनसारखी फोन आणि मेसेंजरवर गप्पा मारण्यात जातच होती.

तेव्हा वाटायचं एकदा विचारुन टाकवं मेसेजमधेच "प्रिया तुझी गर्लफ्रेंड आहे का?" म्हणून. प्रत्यक्ष बोलता येत नाही ते मेसेजवर लिहून टाकता येतच धाडकन याचा अनुभव होताच गाठीशी. पण तरी नाही हिंमत झाली. अप्रिय उत्तर ऐकायला मिळालं तर? त्यापेक्षा नकोच ते. कळायचं असेल तेव्हा कळेल म्हणत दिलं सोडून काळावर.

"सायु, बाबाने गोकर्णाच्या बिया पाठवल्यात आपल्या बागेतल्या." एका नाशिक ट्रिपहून परत आल्यावर जाई म्हणाली. ती आजकाल महिन्या दोन महिन्यात एका विकेंडला नाशिकला नवरदेव शोध डेट वर जायची.

"पण आपल्या कडची माती तर संपलेय जाई", मी बाल्कनीत ठेवलेल्या गार्डन टूल बास्केटमधे बघत सांगितलं.

"आज जाऊया का नर्सरीत?" तिने असं विचारल्यावर मी टुण्णकन उडी मारुन तयार झाले.

सलग तीन कार्यक्रम टाळले होते मी. त्यावर ग्रंपी स्मायली आणि not fair असे बरेच मेसेज येऊन गेले होते यावेळी. सरप्राईझ देऊन त्याच्या ग्रंपी फेसला हॅप्पी स्मायलीत बदलेन असा विचार करुन मी लगेच तयार झाले.

"सायु मॅडम जरा अतीच उतू जाताय हा, नोटीस करतेय मी" जाईने मला बरोब्बर कॉर्नर केलं होतं

"तुझा पर्पल कुर्ता घालतेय हा मी जाई", मी तिच्याकडे दुर्लक्ष करत म्हंटलं.

"काय एकच लकी कुर्ता आहे अस वाटतय का तुला?" तिच्या या वाक्यावर मी होय्यच म्हणत वेडावून दाखवत तयार व्हायला आत गेले.

पण तिथे गेलो तर ऐन मे महिन्यातल्या दुपार इतकं वातावरण तापलेलं जाणवलं. ऑफीसच्या दारा बाहेरही वादावादीचे आवाज येत होते. प्रत्येक शब्द स्पष्ट कळत नव्हता ते वरती घरी बोलत असावेत म्हणून. पण मधेच त्याचा 'इनफ इज इनफ' डायलॉग ऐकू आला आणि पाठोपाठ एका मुलीचा 'You are so wrong, I will prove it' डायलॉग कानावर पडला. आवाजावरुन बहुतेक ही प्रिया असावी असं वाटलं. बहुतेक आता ते खाली ऑफीसपाशी पोहोचले असावेत.

बेल वाजवायला वर केलेला हात तसाच थांबवून मी जाईला हळूच म्हंटलं, "रॉंग टायमिंग, काही तरी अनप्लेजंट एपिसोड असावा."

आम्ही गुपचूप परत जायच्या बेताने एक पायरी खाली उतरलो तितक्यात दार उघडल गेलं आणि आमच्या समोरुन रागारागाने प्रिया बाहेर पडली. आमच्याकडे लक्ष गेल तिचं, पण इतक्या आग ओकणाऱ्या नजरेने तिने आमच्याकडे बघितलं की मी काही न बोलता गप्प बसले. तिच्या मागोमाग प्रणवही बाहेर आला , पण आम्हाला बघून एकदम थबकला.

आम्ही त्याला "सॉरी चुकीच्या वेळी आलो" म्हणत मागे फिरणार होतो पण त्याने आम्हाला थांबायचा आग्रह केला आणि आलोच म्हणत तो प्रियाशी बोलायला गेटपाशी गेला. आम्ही उगाच अस्वस्थ होत आत बसलो.

"याबद्दल आपण नंतर बोलू, ते ही तो बोलला तर. नाहीतर हे आपण बघितलच नाही समजू" जाईने म्हंटलं. त्यावर मी ही मानेनेच होकार दिला.

दोन मिनिटात तो परत आला. आल्या आल्या त्याने आमच्या समोर तमाशा झाल्या बद्दल सॉरी म्हंटलं. थोडी ऑकवर्ड सुच्युएशन होती खरी ती.

"तुम्ही बसा. बी कंफोर्टेबल. काही विशेष नाहीये काळजीच. थोडे गैरसमज बस, होतील सॉर्ट आऊट." म्हणत त्याने त्याबद्दल बोलायचं टाळलं आणि आम्हीही मुद्दाम काही विचारलं नाही.

कॉफी की हॉट चॉकलेट? त्याने विचारलं

"काहीही चालेल" आम्ही उत्तर दिलं.

मग हॉट चॉकलेट करतो. माझा मूड ठिक नसला की आई तेच करायची.

ती भेट हॉट चॉकलेटवर झटपट आवरती घेऊन आम्ही घरी आलो.

यावेळी जाईला शंका आली की ते रिलेशनशिपमधे असावेत. पण यावेळी मला असं वाटत नव्हतं. आमच्यासमोर तरी त्याने तिला कधी वेगळी वागणूक दिली नव्हती. कधी स्पेशल अटेन्शन दिलं नव्हतं. पण ती त्याच्याबाबतीत एक वेगळा हक्क गाजवायची हे ही लक्षात आलं होतं.

खरतर कमी वेळात आमची जास्त घट्ट मैत्री झालेय आणि तो आम्हाला सगळ्या कार्यक्रमात सामिल करतो याबद्दल तिला थोडा राग होता.

आधीसारखच मग मी काहीतरी कारण पुढे करत त्यांच्या गृप इव्हेंटमधे जाण्याचं टाळायचा प्रयत्न करायला लागले पण दरवेळी प्रणव आमच्या डोक्यावर बसून आमच्या सगळ्या कारणांकरता सोल्युशन काढून यायला भाग पाडायचा.

अस असलं तरी आमची ओळख फक्तं 'चांगली मैत्रिण' हीच होती. त्याने किंवा मी प्रपोज वगैरे केलं नव्हतं एकमेकांना. मला तो आवडत होताच पण तो पुढे जाण्यासाठी कितपत सिरियस आहे हे मला नीट कळलेलं नव्हतं.

त्यादिवशी आम्ही केळवा बीचवर जायचं ठरवलं होतं. सगळेच जाणार होतो. पण ऑफीसमधे अर्जंट काम आल्यामुळे जाईचं येण आयत्यावेळी कॅन्सल झालं. मी ही नाही येत कळवून टाकणार होते पण जाईनेच आग्रह करुन मला प्लॅन कॅन्सल न करता जायला तयार केलं.

जाताना प्रणवने मला पिकअप केलं आणि आम्ही ऑटोने एकत्र गेलो. "बाईक सर्व्हिसिंगला दिली नसती तर बाईकवरुन गेलो असतो", ऑटोत बसल्याबसल्या तो म्हणाला.

"आज तुला या बीचवरची माझी सगळ्यात आवडती जागा दाखवतो. पुढल्यावेळी बाईकने जाऊ",त्यानेच पुढे ऐकवलं.

"कसला विचार करत्येस?" माझा काहीच प्रतिसाद नाही हे बघून त्याने दंडाला हलवून विचारलं.

"काही नाही रे. बाबाचा फोन होता काल. इथलं ऑफीस कॉंट्रॅक्ट संपत आलय. बहुतेक रिन्यु होईलही पण बाबा म्हणत होता झाला असेल अनुभव घेऊन बाहेर रहायचा तर या आता घरी परत"

"मग? तू काय ठरवलयस?" त्याने विचारलं

"अजून काहीच नाही." मी म्हंटलं

"मुंबई आवडली नाही तुला? इथे सेटल व्हायचा विचार नाही केलास कधी? हे विचारताना माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ तर तोच वाटत होता.

"मला सगळीच शहरं आवडतात रे. कुठेही नेऊन सोडा." यावर "मग रहा की इथेच. माझ्या ऑनलाईन नर्सरीच कामही होत आलय पूर्ण. मग आपण भरपूर नेचर ट्रेल्स करु एकत्र" असा पर्याय समोरुन आला.

मी काहीच बोलत नाही बघून त्यानेच विचारलं, "घरुन प्रेशर आहे का परत येण्याचं?"

"नाही रे. जे काही आहे ते इथे माझ्या बुद्धीच आणि मनाचं प्रेशर आहे. मनाला वाटतय इथे राहून पहावं पण बुद्धी 'प्रॅक्टिकल हो' असं सुचवतेय. आज ना उद्या जाई तिथेच सेटल होणार आहे. इथे एकटीने रहाण्याइतकी काही मी इथल्या जॉबच्या प्रेमात नाहीये. जॉब हे कारण पुरेसं नाहीये माझ्यासाठी" माझं बोलून होईपर्यंत आम्ही तिथे पोहोचलो देखील. त्यामुळे त्याचा यावरचा प्रतिसाद कळेपर्यंत सुमीत आणि सावीने आम्हाला गराडा घातला होता. ते बाईकवरुन एकत्रच आले होते आणि आमच्या जस्ट आधी तिथे पोहोचले होते.

प्रिया आणि अमोघ पण बाईकने येणार होते बहुतेक. ते आल्यावर त्यांच्या बाईक एकत्र पार्क करुन आम्ही समुद्रकिनाऱ्यावर जायला निघालो. सावी आणि सुमीत त्यांच्या त्यांच्या जगातच वावरत होते. म्हणजे होते आमच्यासोबतच पण तरीही त्यांच्या स्वत:च्याच जगात मश्गुल होते.

मला एका बाजूने प्रिया आणि दुसऱ्या बाजूने अमोघने अगदी जखडून टाकल होतं. अमोघच्या दुसऱ्या बाजूला प्रणव होता.

अर्थात अशी तक्रार करायला आम्ही दोघे काही एक्सक्ल्युजीव रोमॅन्टिक डेट वर नव्हतो आलो आणि मुळात आमचं नातं नक्की कोणत्या पायरीवर आहे सध्या, हे मलाही अजून १००% कळल नव्हतं.

प्रिया त्याला जवळजवळ ओढतच पाण्यात घेऊन गेली. आमच्या चालण्याच्या वेगात बरीच तफावत होती. अमोघ माझ्या स्पिडला मॅचकरत सोबत चालत होता.

प्रणवने दोन तीन वेळा तिला थांबवलही होतं. आमच्यासोबत रहाण्यासाठी तो धडपडत होता पण त्यादिवशी तिने आल्यापासूनच त्याला सतत गुंतवून ठेवलं होतं काही ना काही कारण काढून.

इथे अमोघ मला त्याच्या नवीन प्रोजेक्ट्सबद्दल माहिती देत कंपनी देत होता. तो ज्या फर्ममध्ये काम करतो तिथले को पार्टनर्स पर्सनल लाईफमधेही लाईफ पार्टनर्स असल्यामुळे त्यांच्यातल्या प्रोफेशनल अंडरस्टॅन्डिंगचे किस्से तो सांगत होता. त्यांच्याकडून इन्स्पायर होऊन पुढे कधीतरी त्यालाही असेच होम प्रॉडक्शन सुरु करायचे आहे वगैरे वगैरे अजून बरंच तपशिलात तो सांगत होता.

अमोघ आणि मी एकाच फिल्डमधले असल्यामुळे त्याच्या गप्पांनी मी बोअर होत नव्हते तरीही मला त्यावेळी त्या गप्पा गुंतवूनही ठेवत नव्हत्या आणि आमच्या गप्पा सुरु असतानाही एक नजर हळूच त्या दोघांचा वेध घेत होती.

थोड्यावेळाने ती दोघं एकाजागी थांबलेली दिसली आणि एका सेकंदानंतर ती त्याच्या मिठीत होती. तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं आणि त्याने दोन्ही हातांनी तिचे खांदे धरले होते. त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता त्यामुळे नक्की काय सीन आहे कळत नव्हतं.

"नक्की काय सिन आहे? हो म्हणाला की काय प्रणव तिला?", अमोघने मला विचारलं

मी एकदा त्यांच्याकडे आणि एकदा अमोघकडे अविश्वासाने बघितलं.

त्यावर हसत म्हणे, आम्ही त्याला कायमच प्रियावरुन चिडवत आलोय. सगळ्यांना माहिती आहे प्रियाला तो आवडतो पण पठ्ठ्या चुकूनही मैत्रीची रेष ओलांडायला तयार नाही. कायम "आमच्यात तसं काही नाही याच्या पलीकडे काही गाडी जात नाही."

मी काय प्रतिसाद द्यावा न सुचून नुसतच बघत राहीले.

"काय झालं? तुमच्यात काही आहे का तसं?", त्याने माझ्याकडे बघत विचारलं

"नाही", मी नजर समोर प्रणववर ठेवत उत्तर दिलं

"Good. त्यालाही विचारलं होतं पण पटकन 'नाही' उत्तर मिळालं नव्हतं"

मी चमकून त्याच्याकडे बघितलं त्यावर,
"आणि 'हो' पण मिळालं नव्हतं." अस पुढे त्याने ऐकवलं

मी त्याच्याकडे बघणं टाळत, उगाचच या खांद्यावरुन बॅग त्या खांद्यावर घेत फार काही रिॲक्टच नाही केलं.

तेव्हढ्यात प्रणवने हाका मारुन आम्हाला त्याच्यापर्यंत लवकर यायला सांगितलं.

तिथे पोहोचल्यावर कळलं प्रियाला चक्कर येत होती.
मी सॅकमधून पाण्याची बॉटल काढून तिच्या तोंडावर पाणी मारलं, बॅगेत ठेवलेली लिमलेटची गोळी दिली. थोडं बरं वाटतय म्हणाली पण तिला आधाराशिवाय उभही राहवत नव्हतं.

आपण परत जाऊया. माझ्या वाक्याला अमोघ आणि प्रणवनेही दुजोरा दिला. बाईकवरुन तिला सोडणं तर शक्य नव्हतं. ऑटोने आम्ही तिला आधी घरी सोडून मग परत ऑटो करुन घरी जाणं खरतर योग्य होतं. कसंबसं रिक्षास्टॅन्ड पर्यंत आधार देऊन रिक्षात बसवलं तर ती बसवत नाहीये म्हणत मान मागे टाकून अर्ध्याहून जास्त जागा अडवत झोपलीच तिथे. बाजूला जेमतेम एक जण बसेल अशी जागा शिल्लक राहिली.

प्रणवने "आता काय करुया?" म्हणत माझ्याकडे बघितलं. अमोघनेच मग मला घरी सोडायची तयारी दाखवली. अशा तऱ्हेने जाताना एकत्र गेलो तरी येताना मात्र आम्ही वेगवेगळे घरी निघालो.

"तुम्ही दोघं रिलेशनशिपमधे नक्की नाही ना?", अमोघने सिग्नलला गाडी थांबली तेव्हा परत एकदा विचारलं.

"नाही." मी परत एका शब्दाचं उत्तर दिलं.

"Good. मला तुला लंच डेटला इन्व्हाईट करायला आवडेल मग. अर्थात तुला काही प्रॉब्लेम नसेल तर." त्याने ट्रॅफीक सिग्नलवरची नजरही न हलवता म्हंटलं.

मी अवाक. काय बोलतोय हा नक्की?

"मी जे आहे ते स्पष्ट बोलतो. आणि हे गेल्यावेळीच विचारणार होतो खरतर पण तेव्हा तुम्हा दोघांचं आपापसात काही नाही ना हे विचारुन घेतलं नव्हतं." त्याने त्याचा मुद्दा क्लिअर करत म्हंटलं.

त्याच्या म्हणण्यानुसार आम्ही दोघे आर्किटेक्ट आहोत. दोघे उत्तम कंपनीत आहोत. पुढेमागे स्वतःची फर्म सुरु करायची तर दोघांना मिळून करता येऊ शकेल. आणि घरच्यांचा विचार केला तर जात धर्म पंथाबाबतच्या घरच्यांच्या अपेक्षेतही फिट बसू. त्यामुळे एक 'कांदेपोहे डेट' करायला काहीच हरकत नाही.

मी काय प्रतिक्रिया द्यावी न कळून गप्प होते. त्यानेच पुढे संभाषण रेटलं शेवटी.

"हे बघ, घरात लग्नासाठी नाव नोंदणी करायचं प्रेशर आहे. बाकी सेटल आहे तर माझीही तयारी आहे आता. फक्तं मला एका अर्ध्यातासाच्या भेटीत पक्क होणारं अरेंज मॅरेज करायच नाहीये आणि प्रेम विवाह करायला प्रेमाबिमात ना मी कोणाच्या पडलोय ना कोणी माझ्या."

"मग हे डेट वगैरे काय असच उगाच?" मी वैतागून म्हंटलं

"उगाच नाही, अरेंज मॅरेजची कंपॅटिबिलिटी बघायला मैत्री म्हणू हव तर. 'एक्सटेंडेड कांदेपोहे विदाऊट बॅगेज.' म्हणजे याचा रिझल्ट लागलाच पाहिजे पॉझिटिव्ह असा काही विचार न करता पुढे आयुष्य काढायला काही कॉमन जुळणारं निघतय का? हे दोघांना बघता यावं म्हणून डेट हा पर्याय." त्याने सांगितलं

मुद्दे तर बिनतोड होते त्याचे. अपेक्षाही एकदम क्रिस्टल क्लिअर होत्या.
"I am impressed. इतक स्ट्रेट बोलणारा जाईनंतर माझ्या पहण्यातला तूच." मी म्हंटलं त्यावर त्याने "Thanks for the compliment" म्हणत "मग डेटला होकार समजू का?" असं स्पष्टच विचारलं

"सॉरी, पण सिरियसली सध्या मला या सगळ्यात पडायचच नाहीये. माझा नाती आपसूक घडण्यावर विश्वास आहे मग ते मैत्रीचं नातं असो की प्रेमाचं. हे ठरवून डेटवर जाणं वगैरे चूक नाही पण not my type. Sorry वाईट नको वाटून घेऊस." बाईकवरुन उतरताना त्याच्या हातावर हात ठेवून मी म्हंटलं.

"Not at all. मलाही आपसूक जुळलेली नाती आवडतातच, फक्त ते माझ्याबाबतीत वर्क नाही झालय अजून म्हणून एकदम अनोळखी मुलीशी गाठ बांधण्यापेक्षा मला हा ठरवून डेटवर जाण्याचा पर्याय बरा वाटतो." त्यानेही परत तितक्याच स्पष्टपणे कबूल केलं.

"Now you sound like Jaee", मी हसत म्हंटलं

"Oh! Is it? then I should ask her for date", त्यानेही हसत पलट जवाब दिला.

"Bye. Good night", त्याने बाईक स्टार्ट करत म्हंटलं.

"Yes same to you and thanks for the ride" मी ही त्याला बाय करत ऐकवलं.

जाई घरी वाटच बघत होती. नेहमीच्या सवयीने बॅग रिकामी करुन वस्तू जागेवर न जाता बॅग होती तशी कोपऱ्यात ढकलून दिलेली बघूनच जाईला शंका आली काहीतरी बिनसलय याची.

"मला वाटलं होतं आज हवेत नाचतच बाईसाहेब घरी येतील. बघावं तर मुर्झा हुवा गुलाब. काय झालं?" जाईने समोर बसत विचारलं आणि अंघोळीला नंतर जाईन आधी तुझ्याकडे बघतेच आता म्हणत खनपटीला बसून सगळं सांगायलाही लावलं मला.

अथपासून इतीपर्यंत सगळ ऐकवल्यानंतर मला म्हणे प्रिया प्रणवच्या प्रेमातही आहे आणि पझेसिव्हही आहे. आता त्याला काय वाटतं हे कळणं महत्वाचे आहे. अमोघ बद्दल तिचं मत पडलं डेटवर जायला तशी हरकत नाही जर प्रणवबद्दल खात्रीने सांगता येत नसेल तर. या जाईच आणि माझ्या बुद्धीचं कायम एकमत होतं पण मनाला कायम वेगळ्याच गोष्टीचं आकर्षण वाटतं. मन आणि बुद्धीच्या भांडणात सुवर्णमध्य काढायचं काम मग फारच कठीण होऊन बसतं.

क्रमशः
___________________

भाग ७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्विस्ट छान आहे, पण मला प्रणव चा नंबर मिळवून त्याला जागं करावसं वाटतंय! हे काहीतरी भलतंच होइल.
Happy पण एक मन म्हणतंय कि नाही होणार तसं आपले हिरो हिरॉइनच एकमेकांना "पटणार".

छान झालाय हा भाग.
काहीही ट्विस्ट आणलास तरी प्रणव च मस्त आहे हां Wink

धनुडी, जाऊ दे ना हळूहळू...घाई नका करु.. मुरु दे जरा प्रेम, थोडा विरह, वाद, मग रंगत येईल Happy>>> नाही गं बायो, मी कधीच कुणाला घाई करत नाही आणि मला कविन च्या गोष्टी त ढवळाढवळ पण नाही करायचीये. मस्त चाललीये तिची गोष्ट. ती तशीच चालू राहू दे. Happy

तथास्तु Happy

धन्यवाद निल्सन, मामी, विनिता, धनुडी, चिन्मयी, सामी Happy

प्रणव साठी आता वाईट वाटतंय. बिच्चार्याची प्रेम आणि मैत्री मध्ये हालत खराब होईल. Happy>> खरय. बघुया आता कशाला प्रायोरिटी देतो तो.

धनुडी, जाऊ दे ना हळूहळू...घाई नका करु.. मुरु दे जरा प्रेम, थोडा विरह, वाद, मग रंगत येईल Happy>> Happy बघुया काय करतात दोघे.

ट्विस्ट छान आहे, पण मला प्रणव चा नंबर मिळवून त्याला जागं करावसं वाटतंय! हे काहीतरी भलतंच होइल.
Happy पण एक मन म्हणतंय कि नाही होणार तसं आपले हिरो हिरॉइनच एकमेकांना "पटणार".> Happy आता फार जास्त भाग नाही उरलेत. त्यामुळे फार थोडी कळ सोसायची आहे धनुडी, काय होणार ते कळायला. पण जे होते ते भल्यासाठीच असं म्हणतात Wink

मस्तच चाललं आहे. ट्विस्ट छान आहे, पण ताणू नका. (इथे स्मायली आहे) आपले हीरो हिरवीण क्यूट आहेत. उनको बिछडने मत देना.. ( इथे पण स्मायली)

स्मायली दिली की मोबाईल एरर देतो. समजून घ्या.

खूपच छान
फक्त नंतर बदल नका करू,नक्की काय बदल केला ते समजत नाही पटकन

धन्यवाद मनिमौऊ Happy

@आदू - हा बदल केला आहे --्---

"मला वाटलं होतं आज हवेत नाचतच बाईसाहेब घरी येतील. बघाव तर मुर्झा हुवा गुलाब. काय झालं?" जाईने समोर बसत विचारलं आणि अंघोळीला नंतर जाईन आधी तुझ्याकडे बघतेच आता म्हणत खनपटीला बसून सगळं सांगायलाही लावलं मला.

वाह सुंदर आहे कथा, होप ही पूर्ण कराल. काहीजण अर्धवट सोडतात किंवा खूप उशिराने भाग टाकतात. पण तुम्ही रोज एक भाग टाकताय ते आवडले अन वाचायला घेतली. बऱ्याच दिवसांनी हलकी फुलकी छान कथा वाचायला मिळतेय☺️

फक्त एक जरासे खटकले, म्हणजे ते तितके महत्वाचे नाही तरी. प्रभादेवी ते केळवे, रिक्षा ? इतक्या लांब जायला ओला उबेर समजू शकते. पण मग म्हटले कदाचित कथेची गरज असावी ती अन तसेही त्याने फरक पडत नाही. तरी वाटले म्हणून लिहिले. कथेत दोष काढायचा बिलकुल हेतू नाही कारण खूप गोड आहे कथा☺️

धन्यवाद व्ब Happy

प्रभादेवी नव्हे वसई ते केळवे रिक्षाने गेले आहेत दोघे. वसई ते केळवे बीच बाईक/ कार/ऑटोने जाणे कॉमन आहे.

प्रभादेवीला फक्त तिचं ऑफीस आहे. रहायला ती जास्पर अपार्टमेंट सुयोग नगर वसई वेस्टला आहे.

म्हणजे ते तितके महत्वाचे नाही तरी. प्रभादेवी ते केळवे, रिक्षा ?>>> आणि अशी चूक असती कथेत तर नक्कीच लक्षात आणून देण्या इतकी ती महत्वाची असती. Happy

दुसऱ्या की तिसऱ्या भागात मी आधी ड्रिमगर्ल सिनेमातले गाणे ती ऐकत असते लिहील होतं आधी पण नंतर विचार करताना लक्षात आलं गाण्याच्या बोलामुळे मी ते निवडलं होतं तरी ते time frame च्या दृष्टीने मिसफीट होईल. कारण ड्रिमगर्ल सिनेमा सप्टेंबर २०१९ मधे रिलीज झाला. कथेच्या सुरवातीला ते गाणं घेतलं तर त्यांच्यातली कथा फुलायला पुढचा जो काळ ठरवेन तो लिमिटेड होईल कारण मार्च पासून लॉकडाऊन सुरु आहे आपल्याकडे. अर्थात कपोलकल्पित कथा असली तरी मला हे सगळे संदर्भ जमतील तितके खरे लागतात. म्हणून मी गाणे बदलून यंदा कर्तव्य आहे या जुन्या सिनेमातले गाणे तिथे टाकले. त्यामुळे टाईम फ्रेम २०१५ + ते पुढचा कमीत कमी एक वर्षाचा काळ मिळवायला मी फ्री झाले. त्याहून जास्त काळ गेला गृहीत धरलं (नोकरीच कॉंट्रॅक्ट २ वर्ष वगैरे) तरी चालून जाण्याइतका बफर पिरिएड मला मिळाला.

अर्थात कोण इतके तपशिल वाचतो / लक्षात घेतो इतकं काय बघायची गरज असं ज्यांना वाटतं त्यांच्या मताचा आदर ठेवूनही ते मला माझ्याकरता अत्यंत आवश्यक + गरजेच + महत्त्वाचे वाटते त्यामुळे मी तसा विचार करते.

पुन्हा एकदा धन्यवाद तुमच्या शंकेमुळे हे मांडले गेले त्याबद्दल

@विनिता, बघायला हवे जाऊन एकदा Lol

नाहीतर आत्तापर्यंत एकतर नाशिक किंवा गार्डेनिया फ्लोरेसमधे मुक्काम हलवला असावा तिने Lol

ओहह, वसई ला राहते का ती, माझे हे मिस झाले, वसई ते केळवे रिक्षा ठिके☺️

एरव्ही मी सांगत नाही असे काही खटकले तर पण ही कथा आवडली म्हणून

Pages