La Flor del amor - Blossom of love (भाग ४)

Submitted by कविन on 22 July, 2020 - 01:12

भाग ३
_____________________________________________
भाग ४:-

व्हॉट्स ॲप चॅट विंडो बंद केल्यावर पहिले विचार आला की आज रात्री झोप लागेल का? बहुतेक नाहीच. पण त्याही आधी विचार आला उद्या जाईला न सांगता न नेता जाणं मॅनेज कस करायच? हे थोडं चॅलेंजींग होतं खरं. आजवर कधीच नव्हतं करावं लागलं असं.

पण करलेंगे मॅनेज .. मी स्वत:शीच कबूल केलं आणि जाईला कॉलबॅक केला. तिची तोफ थांबवायला 'सॉरी सॉरी सॉरीचा' आधीच जप सुरु केला आणि नेहमीप्रमाणे तो वर्कही झाला. जाई जगात भारी बहिण आहे. नंबर एक. मी तिला ऐकवलं. त्यावर मला फक्तं,"नो बटरींग. आधी कुठे पोहोचल्येस सांग?" असं उत्तर मिळालं.

तिला म्हंटल जस्ट गेटपाशीच थांब मी पोहोचेनच आता दोन मिनिटात. तरी तिची तोफ सुरुच - ये लवकर हात दुखले सगळं पकडून ब्ला ब्ला ब्ला...

मग म्हंटलं, "फोन कट कर आता आलीच माझी कार गेटपाशी."

उतरल्या उतरल्या जाईटलीला एक झप्पी दिली. तिच्या हातातला बुके घेतला, एक बॅगपण माझ्या ताब्यात घेतली.
लग्गेच मॅडमने फोनमध्ये फ्रंट कॅमेरा सुरु करत केस ठिकठाक केले. तिच्यामते आता अवतार जाण्यालायक झाला. मगआम्ही रुहीच्या विंगकडे एकत्र निघालो.

आम्हाला बघून रुही प्रेडीक्ट केल्याप्रमाणे जोरात किंचाळली. इतकी जोरात की तिच्या घरच्या मंडळींनी हातातली कामं थांबवून आमच्या दिशेने बघितलं. तिची आई गेल्यावर्षी चार दिवसांच्या आजाराच निमित्त होऊन गेली म्हणून आणि बाबांनाही आता फारसा प्रवास झेपत नाही म्हणून तिच्या माहेरच्या अशा आम्ही दोघी मैत्रिणीच होतो आज. त्यामुळे तिचा आनंद उतू जाणं स्वाभाविक होतं.
तिच्या गप्पांमधून आम्हालाही आजुबाजूची बरीच नवीन माहिती मिळत होती. विकेंडला भेट देऊन यायच्या जवळच्या ठिकाणांचीही यादी आता तयार झाली होती. बाहेर अंधार गडद व्हायला लागला तसं आम्ही गप्पा आवरत्या घेऊन निघायला हवं आता अस तिला म्हणालो. तिच्याशी गप्पा मारुन आणि पंचपक्वान्न जेवून आमचं पोट आणि तिचं मन तुडुंब भरल्यावर मग जड मनाने तिने आम्हाला निघायची परवानगी दिली. 

ओला कार करुन आम्ही परत घरी निघालो तेव्हा पापण्यांनी बंड पुकारुन झोपायला लावलं. मला वाटलं होतं इतक्या घडामोडी झाल्या आज तर झोप येणारच नाही. पण मेंदूने सिग्नल दिला आणि मी बसल्याजागी पेंगुळले. जाई मात्र जागी असावी. सोसायटीच्या गेटमधे शिरल्यावर तिनेच मला उठवलं. घरी येऊन जेमतेम हातपाय धुवून कपडे बदलले आणि दोघीही बेडवर अक्षरशः पसरलो.

सकाळी मात्र लवकर जाग आली मला. बाहेर कोकीळ गात होता. त्याच्या प्रियेला हाक मारुन बोलवत होता. खिडकीपाशी लावलेल्या विन्डचाईमचा हलका नादही कानाला स्पर्श करुन जात होता. एकंदर 'मूड बना दिया' ऐसा मौसम था |

आमच्या दोघींसाठी चहा ठेवून मी ऑमलेट ब्रेड करायला घेतलं तोपर्यंत जाईपण उठली. दोघींनी मिळून घर आवरुन एकत्र ब्रेकफास्ट केला आणि आळसावून पेपर वाचत बसलो उषा मावशींची वाट बघत.

एकीकडे जाईला न नेण्याच काय कारण सांगावं विचार मनात सुरु होते. आजपर्यंत कधीच तिच्याशी खोटं बोलले नव्हते. सगळे कार्यक्रम एकत्र मिळूनच केले होते. काय करावं कळत नव्हतं. तेव्हढ्यात जाईचा फोन वाजला. मोहनाचा होता. तिला कुठेतरी शॉपिंगला जायचं होतं. ती जाईला चल म्हणून गळ घालत होती आणि जाई मला चलायचा आग्रह करत होती. 

मी सोबत आले तर ऑटोने जाव लागेल आणि तुम्ही दोघीच गेलात तर मोहनाच्या टू व्हिलरवरुन जाऊन याल. तसही काल ऑफीस आणि रुहीच घर यामुळे मी आज आराम करणार आहे तुम्ही या जाऊन. मी लगेच संधीचा लाभ घेत माझी कारणं पुढे केली. आश्चर्य म्हणजे माझं बोलणं तिला पहिल्याफटक्यात पटलं. मोहनाला तसं कळवून ती गेली अंघोळीला आणि मी उषा मावशींना दार उघडायला. 

"आज जास्त पोळ्या नका करु मावशी" त्यांना चहा देत मी म्हंटलं. जाई माझ्या आधी बाहेर पडणार म्हंटल्यावर मावशी गेल्यावर मला निघावं लागणार होतं.
उशीर व्हायला नको म्हणून मी जाई बाहेर पडल्या पडल्या लगेच आवरायला घेतलं. आरशापुढे उभ राहून चार ड्रेस लावून बघितले पण एकही आवडेना. शेवटी लाईट पर्पल रंगाचा कुर्ता आणि क्रिम रंगाची जेगिंग्ज फायनल केली. वॅनिला & चॉकलेट असा डबल लेअर लिप बाम लावला स्टोल घेतला आणि तयार झाले.

मावशींच्या पाठोपाठ खाली उतरले आणि रिक्षा करुन गार्डनियात गेले. गेटच्या कडीवर हात ठेवून एक सेकंद थांबले, आत जायची धाकधूक थांबवायला. नेमकं तेव्हाच त्याने बाल्कनीतून पाहिलं आणि हाक मारुन उजवीकडे एंट्रन्स असल्याच सांगितल. नर्सरीत त्याचा स्टाफ काम करताना लांबूनच दिसला. मी उजवीकडे वळून दारापाशी येईपर्यंत तोच दार उघडून समोर आला. 

'Welcome home' म्हणत त्याने दाराकडे बोट केलं. आम्ही आत आलो. त्याने मला संकोच वाटू नये म्हणून दार उघडच ठेवलं आणि मला बसायला सांगून तो आत गेला. मी सोफ्याच्या कॉर्नरवर जस्ट टेकल्यासारखं करुन हॉल बघत होते तेव्हढ्यात तो ट्रेमधे दोघांसाठी कॉफी आणि कुकीज घेऊन आला. 

"मी ब्रेकफास्ट करुन आलेय" माझ्या या वाक्याला खोडून काढत कुकीजची डिश माझ्या हातात देत तो म्हणे, "पण मी थांबलो होतो ना तू येणार म्हणून"

त्याच्या वाक्याचा गिल्ट येऊन मी पटकन डिश हातात घेतली.

"Be comfortable", कॉफीचा कप माझ्या हातात देत तो म्हणाला.

कॉफी मस्त. परफेक्ट मला आवडते तशी आहे स्लाईटली बीटरकडे झुकणारी. मी एक घोट घेऊन त्याच्या कॉफीला दाद देत म्हंटल. 

हसून थॅंक्स म्हणत त्याने मला बाजूच्या स्टडीरुममधे ठेवलेले इकेबाना बघायला नेलं. तो त्यांना बेसिक म्हणत असला तरी माझ्यासाठी ते वॉव! भारी होते.

"आलोच एका मिनिटात", म्हणत तो गायब झाला आणि पुढल्या क्षणी माझ्यासमोर पर्पल रंगाच गुलाबाच फूल धरत म्हणाला "हे तुला भेट, माझ्याकडून."

"हे कशाबद्दल उगाच?" अस विचारल्यावर म्हणे, "काही नाही, सहजच, ड्रेसला मॅचिंग आहे तुझ्या म्हणून दिलय.

"ह्हो का! पण पर्पल स्पेशल असतं, अस यल्लो आणि पिंक सारख उधळायच नसत कुणावरही" मी पण लगेच खळ्ळ् खट्याक करुनच टाकलं

माझ्या बरोबर समोर येत तो म्हणे,  "म्हणूनच आजपर्यंत नव्हत दिलं कुणालाही"

त्याचं वाक्य, त्याचे डोळे, थोडा मिश्किल थोडा गहिरा भाव ... परत माझ्या हार्मोन्सचा झोका वर.
हा अस वागेल तर कठीण आहे संयमाने घेणं. दोघेही नुसतेच बघत राहीलो. श्वास ऐकू येत होता एकमेकांचा, फक्त कोणाचा संयम आधी तुटतो याचा खेळ सुरु होता नजरेत.

आणि दुरून विंडचाईम वाजल्यासारखा हलकेच मंजूळ नाद ऐकू आला आणि त्या आवाजाने काहीतरी स्पेल टाकल्यासारख झालं. दोघांचाही संयम सुटला आणि थरथरत्या ओठांचा स्पर्श झाला. अंगावर शहारा आला आणि त्याची मिठी अजूनच घट्ट झाली. तो कानात कुजबूजला "purely sharry baby orchid"

मला कळलं होतं तो काय म्हणतोय ते. Sharry baby orchid flowers have a wonderful intoxicating vanilla-chocolate scent

मी डोळे मिटून घेतले. पायातली शक्ती गेलीच होती. त्याच्यावर पूर्ण भार सोडून मी उभी होते. 

You are so beautiful,like a pure flower. तो कुजबुजला.

मी त्याच्या मिठीत स्वत:ला लपवलं 

Te amor तो म्हणाला आणि त्याचवेळी मीही म्हणाले I should go

"थांब ना थोडावेळ" माझ्या ओठांना त्याच्या ओठांनी बंद करत तो म्हणाला.
हॉट चिप्स … त्याचा किस हॉट चिप्ससारखा लागला. मी परत किस करुन खात्री करायला गेले तोपर्यंत तो परत मागे जाऊन हात हातात घेऊन जायलाच हव का विचारत होता. मी काहीतरी उत्तराची जुळवाजुळव करत होते तितक्यात माझ्या फोनवर .. 'ओ रे मनवा तू तो बावरा है.. तू ही जाने तू क्या सोचता है' ची रिंगटोन वाजली.

ही रिंगटोन तर मी स्पेशली फक्तं अलार्मसाठी सेट केली होती. खाडकन जाग आली, डोळे उघडून समोर बघितलं तर हातात हॉट चिप्सचं पाकीट घेऊन जाई माझी मजा बघत होती. हातातला चिप्सचा तुकडा नाचवत म्हणे, "तू जेव्हा जेव्हा आss करुन झोपतेस तेव्हा तेव्हा जाम धमाल येते तुला भरवायला"  

मी उशी तिच्या अंगावर फेकून ओंजळीत चेहरा लपवला. माझं मलाच फार हसू येत होतं आणि फार लाजही वाटत होती. माझं हसणं जर जाईने नोटीस केलं तर माझं काही खरं नाही हे जाणून मी तडक बाथरुम गाठलं. शॉवरच गार पाणी मानेवरुन पाठीच्या कण्यावर आणि तिथून खाली येताना एक हवासा शहारा जाणवला, स्वप्नातल्या स्पर्शाची आठवण करुन देणारा.

बाहेरून दार ठोठवून जाईने हैराण केल्यावर मी आंघोळ आटोपती घेऊन आवरुन बाहेर आले. उषामावशी बटाट्याचे पराठे करत होत्या. अरे हो! आज त्यांना ब्रेकफास्ट आणि लंच दोन्हीसाठी कॉमन पराठेच करा म्हंटलं होत काल. संध्याकाळच आमच आम्ही मॅनेज करणार होतो.
जाईची आंघोळ आटपेपर्यंत मी तिघींचा चहा गरम केला. उषा मावशींच्या हातात एक कप देऊन त्यांनाही खाऊन घ्यायची आठवण केली. जाई आल्यावर तिच्या हातात डिश देत मी म्हंटल, "नर्सरीत जायचय आपल्याला, त्याने इकेबाना केलय ते बघायला बोलावलय." 

"इकेबाना? ते काय असतं?" तिने एक भुवई उंचावत विचारलं पण मला उत्तर देण्याची संधीही न देता हातातल्या डिशसकटच सोफ्यावर ऐरावण मैरावण पसरत मलाच ऐकवलं, "सायु यार मला आज कुठेही जायची इच्छा नाहीये. इथेच अशीच लोळत आरामात पुस्तक वाचून संपवणार आहे मी आज. होम सलोनची अपॉइंटमेंट घेतलेय दुपारची. तोपर्यंत मी पुस्तक आणि ही पिलो बास, इथून हलणार नाहीये आज मी. तुला जायचं तर ये जाऊन तू. कालच जाऊन आलेय मी. तेव्हा काय ते दाखवायचं होत ना. एक रविवार मिळतो यार. मी नाही येणार."

"ओके पण आधी ते डिशमधलं संपवून हात तर धुवून ये", मी तिच्या डिशकडे बघत म्हंटलं. बाईसाहेबांनी तिचा पराठापण माझ्याकडून ॲल्युमिनियम फॉईलमधे गुंडाळून घेतला होता फ्रॅंकीसारखा, हात खरकटे न करता खाता यावं म्हणून. म्हणजे आज खरोखरीचा आळस अंगात शिरला होता तिच्या.

आता माझ्या वाक्यावर ती पुढे काही बोलतेय का वाट न बघताच मीच मनातला आनंद लपवत ऐकवलं, "मग मी येते जाऊन थोड्यावेळात."

ती पुस्तकातून डोकंही वर न करता, ॲल्युमिनियम फॉईलमधे गुंडाळलेला पराठा हात खरकटे न करता खात फक्तं मानेनेच हो म्हणाली.

"जाई तुझा पर्पल कुर्ता मी घेतेय हा आज. क्रिम जेगिंग्जवर जाणारा तोच एक आहे सध्या." मी बेडरुममधे जाताजाता सांगितलं

"ज्जा ग काहीपण कर, मला नको त्रास देऊस" तिने वैतागून ऐकवलं.

मग फार काही न बोलता मी आवरायला पळाले.

लिपस्टिक लायनर वगैरे लावून गेले असते तर नक्कीच लक्षं गेलं असतं तिचं, अगदी पुस्तक वाचतानाही आणि मग प्रश्नसंच घेऊनच बसली असती ती म्हणून त्यावर काट मारुन वॅनिला लिप बाम लावला फक्त आणि निघाले मी. 

त्याच्या गेटच्या कडीला हात लावला तेव्हा धडधड माझी मला ऐकू येण्याइतकी वाढली होती. त्याने हाक मारुन लक्ष वेधलं माझं. तो बाल्कनीतच उभा होता. "इथे उजव्या बाजूला एंट्रन्स आहे", त्याने हाताने दिशा दाखवली. त्याचा स्टाफ नर्सरीत काम करताना दिसत होता. मी तिकडे न जाता उजवीकडे वळून दारापाशी पोहोचेपर्यंत तो दार उघडून स्वागताला आला होता.

क्रमशः

भाग ५

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चुकून दोनदा आला प्रतिसाद. मला ते फुलं देण्याचे अर्थ पण खुप आवडले. प्रत्येक फुलांचं जे काही खास म्हणणं असतं हे पहिल्यांदाच समजतय.

मला ते फुलं देण्याचे अर्थ पण खुप आवडले. प्रत्येक फुलांचं जे काही खास म्हणणं असतं हे पहिल्यांदाच समजतय.>> +१११

गोग्गोड चालू आहे

बर्‍याच दिवसांनी लिहिलस.. Happy
आत्ता सगळे भाग सलग वाचले. एकंदरीत सध्या सगळीकडे येत असलेल्या उदास बातम्या आणि चर्चांपुढे बाग, फुलं, झाडं ह्या "डोमेन" मधली ही कथा वाचायला छान वाटलं.

धन्यवाद पराग Happy

एकंदरीत सध्या सगळीकडे येत असलेल्या उदास बातम्या आणि चर्चांपुढे बाग, फुलं, झाडं ह्या "डोमेन" मधली ही कथा वाचायला छान वाटलं.>>> हे लिहायलाही याच नोटवर सुरु केलं होतं. स्वतःही अनुभवत असलेल्या निगेटिव्हिटीला फाईट करायला मला वेगळ्या मूडचं लिहून काढायचं होत. आणि क्रमशः हा प्रकारही एकदा हाताळून पहायचा होता.

अग कसलं गोड लिहिते आहेस. फुलांचे रेफरन्सेस अजून गोडवा अ‍ॅड करत आहेत.
शेवटचा भाग आल्याशिवाय वाचणार न्हवते पण तू पूर्ण करशील याची खात्री आहे. Wink
आज सकाळी ऑफिस चे काम सुरु करण्याआधी सगळे भाग वाचुन काढले मस्त फ्रेश फ्रेश वाटलं.

अग कसलं गोड लिहिते आहेस. फुलांचे रेफरन्सेस अजून गोडवा अ‍ॅड करत आहेत.>> धन्यवाद सामी Happy

शेवटचा भाग आल्याशिवाय वाचणार न्हवते पण तू पूर्ण करशील याची खात्री आहे.>> हो हो. रोज एक भाग पोस्ट करणार आहे मी.

Hot chips! Lol
फुलं, रंग, वास त्यांचा अर्थ.. भारी!

कुठल्यातरी भागात एक रिप्लाय होता की नंतर काय बदल केला कळत नाही. त्याकरता जस्ट नोंदवते - एखाद दोन स्पॅनिश शब्द टाकायचे राहील्याची चुटपूट लागली होती. तेच फक्तं ॲड केले आहेत.