शाश्वत विकास म्हणजे काय? -भाग १

Submitted by जिज्ञासा on 26 June, 2020 - 05:27

गेले काही महिने एका गटाबरोबर पर्यावरण विषयाचा अभ्यास करते आहे त्यातून तयार झालेले काही विचार इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. यातील काही गोष्टी तुमच्या माहितीच्या असतील आणि काही नवीन असतील पण साकल्याने विचार केला तर आपल्यातल्या प्रत्येकाला यातून एक विचारांची नवीन दिशा सापडेल अशी मला आशा वाटते.

मी तीन छोट्या लेखात किंवा भागात हे विचार मांडणार आहे. काही विधानांसाठी माझ्याकडे लगेच विदा उपलब्ध नाहीये त्यामुळे याकडे लक्ष न देता त्यामागील विचाराकडे संदेशाकडे लक्ष द्यावे असे मी आत्ता पुरते म्हणेन. म्हणजे विदा उपलब्ध नाही असे नाही मात्र माझ्याकडे संदर्भ या क्षणी उपलब्ध नाही हे एवढेच कारण आहे. पुढेमागे मी लेखात त्यांची भर घालीन.

पहिल्या भागात दोन सर्वाधिक परिणाम करणारे प्रश्न आणि त्यांचे थोडक्यात स्वरूप.

दुसऱ्या भागात शाश्वत विकासाचं प्रारूप कसं असावं (आपल्याला काय मुक्काम गाठायचा आहे)?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐकू येणाऱ्या काही चांगल्या बातम्या पाहिल्या तर त्यात पर्यावरणाविषयीच्या बातम्या दिसतात. या जागतिक साथीनंतर भविष्यातले जग बदलेल असे बऱ्याच जणांना वाटते, मात्र पर्यावरणाचा विचार करताना ते बदल कसे असले तर हे आलेले संकट आपल्याला योग्य मार्गावर नेणारे ठरेल याबद्दल मला काही विचार मांडायचे आहेत.

तिसऱ्या भागात आपल्या जीवनशैलीत कोणते बदल करावे लागतील जेणेकरून आपण अधिक शाश्वत मार्गाने जीवन जगू शकू. यात मी Do’s and Don’ts ची यादी देण्याच्या ऐवजी काही प्रश्न सांगणार आहे. तुम्ही हे प्रश्न विचारलेत की तुम्हाला सगळ्यात चांगला पर्याय कोणता ते लक्षात येईल. अर्थात आपल्याला हे लक्षात येईलच की सर्वोत्तम पर्याय वापरणे सर्व वेळेस शक्य नसते. अशावेळी कमीत कमी हानी घडवणारा पर्याय वापरता येईल. It will be a trade-off but it will make you aware of the limitations of the option you choose.

भाग १: पृथ्वीची सद्यस्थिती

ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फार भयावह आहे. एका भांड्यातील पाण्याचे तपमान अत्यंत कमी गतीने वाढत असेल तर त्या भांड्यातील पाण्यात बसलेल्या बेडकाला त्याची जाणीव होण्यास खूप वेळ लागतो आणि अशी स्थिती येते की ते पाणी उकळू लागते आणि बेडूक वेळेत बाहेर न पडल्यामुळे मरण पावतो. आपण सध्या हळूहळू तापणाऱ्या भांड्यातल्या पाण्यातला बेडूक आहोत आणि लवकरच हालचाल केली नाही तर आपण बाहेर पडू शकणार नाही.
Frog.png

नक्की प्रॉब्लेम काय आहे? प्रदूषण, तपमानवाढ, अविघटनशील कचरा या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात पण हा प्रश्न हिमनगासारखा आहे. आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी या त्या हिमनगाचे एक टोक! खोलात जाऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हा प्रश्न दोन पातळ्यांवरचा आहे.
एक म्हणजे उपलब्ध नैसर्गिक स्रोतांची होणारी हानी (crossing of planetary boundaries) आणि दुसरा पैलू म्हणजे ऊर्जेची वाढलेली आवश्यकता (increasing energy needs).

१. पृथ्वीच्या क्षमतांवर येणारा ताण आणि निसर्गाच्या चक्रामध्ये झालेले फेरफार:

पृथ्वीवर बाहेरून फक्त सौरऊर्जा येते. बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या ग्रहावर रिसायकल होत असतात. माणसाने या सर्व चक्रांमध्ये ढवळाढवळ सुरू केली आहे याचा परिणाम जैवविविधता नष्ट होणे, प्रदूषण अशा गोष्टींमधून दिसून येतो.
जसं आपलं घर खर्चाचं एक बजेट असतं की महिन्याला अमुक रुपये खर्चाला आहेत वर्षाला अमुक रुपये आहे आणि याउपर खर्च आला तर मात्र कर्ज काढावे लागेल. त्याचप्रमाणे निसर्गाच्या प्रत्येक स्रोताची झालेली झीज भरून काढण्याची एक क्षमता असते. ती झीज भरून निघायला काही काळ लागतो. निसर्गाची चक्र पूर्ण व्हावी लागतात. त्याचा विचार करून पृथ्वीच्या खर्चाचे बजेट असतं - म्हणजे एका वर्षात आपल्या मानवजातीने किती रिसोर्सेस वापरले पाहिजेत असं. तर मी तुम्हाला पृथ्वीच्या खर्चाचं गणित सांगते. मग तुम्हीच ठरवा आपण किती खर्च करतो आहोत.
आपण आपलं 2019 सालचं बजेट जुलैमध्येच वापरून संपवलं. 29 जुलै 2019 हा हा आपला ओव्हर शूट डे होता आणि त्याच्या पुढचे पाच महिने जगाने जो खर्च केला तो आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी असलेले नैसर्गिक स्रोत वापरून केला. याचा अर्थ असा की ही जी आपली मौजमजा चालली आहे आपल्या नातवंडांच्या पतवंडाच्या तोंडचे अन्न पाणी काढून घेऊन चालली आहे. खऱ्या आयुष्यात कोणतेही सुज्ञ माणूस हे असे बजेट काढून जगणार नाही.

निसर्गचक्र कशी चालतात?

निसर्गा कडे पाहिलं तर लक्षात येईल येईल की सगळ्या गोष्टी चक्राकार पद्धतीने चालतात म्हणजे पाण्याची वाफ होते वाफेचे ढग होतात आणि ढगांमधून पाऊस पडतो आणि पुन्हा पाणी जल स्वरूपातील येतं हे जलचक्र झालं तसंच प्रत्येक नैसर्गिक गोष्टीचा आहे. कार्बन ऑक्सिजन किंवा सल्फर आणि बरीच खनिजं नव्याने तयार होत नाहीत, त्यांचे फक्त स्वरूप बदलते.

सूर्याची ऊर्जा वापरून झाडे कार्बन डाय ऑक्साईडचं रूपांतर साखरेत करतात. ही झाडे प्राणी खातात आणि ऊर्जा वापरताना कर्ब वायू उत्सर्जित करतात. ही साधीसोपी कार्बन सायकल झाली. प्राणी भुकेपेक्षा अधिक खात नाहीत आणि बहुतेक प्राणी अथवा झाडे अनावश्यक साठवणूक देखील करत नाहीत. यामुळे निसर्गाचे चक्र चालू राहते.

कार्बन फार महत्त्वाचा आहे कारण पृथ्वीवरील जीवन हे कार्बन वर आधारित आहे म्हणजे आपले शरीर हे बहुतांश कार्बन ने बनलेले आहे या कार्बनचे चक्र बिघडणे म्हणजे पृथ्वीवरील जीवसृष्टीला धोका निर्माण होणे. आता हा धोका का निर्माण होतो? जेव्हा आपण खनिज तेलाचा वापर करतो तेव्हा हा कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो. पण हा अतिरिक्त कार्बन डाय-ऑक्साइड कुठेच रिसायकल होऊ शकत नाही. पृथ्वीच्या कार्बन डाय ऑक्साईड रिसायकल करण्याच्या क्षमतेच्या पलीकडे आपण कार्बन डाय ऑक्साईड निर्माण करतो आहोत. लाखो वर्षापूर्वी जीवाश्म जमिनीच्या आत गाडले गेले ते जाळून आज आपण पण ऊर्जा मिळवतो आहोत पण त्यातून निर्माण झालेला कार्बन हा जमिनीत परत कसा जाईल (carbon sequestration) याविषयी आपल्याकडे कोणतीही योजना नाही. माणसाच्या एकूण हालचालीमुळे इतर जीवसृष्टी देखील धोक्यात आली आहे आणि जीवसृष्टी जगणं हे माणसाच्या जगण्या इतकेच महत्त्वाचे आहे कारण जीवसृष्टी जगली नाही तर माणूस जगणार नाही.

या नैसर्गिक चक्राच्या विरुद्ध आपली सर्व जीवनशैली आहे. आपली अर्थव्यवस्था चक्राकार नाही. आपण सतत अधिकाचा (surplus) विचार करतो. अधिक उत्पादन अधिक विक्री अधिक नफा त्यातून अधिक उत्पादन. यात कोठे चक्राकार गती नाही. परंतु अनिर्बंध आणि सतत वाढ ही निसर्गाच्या विरुद्ध आहे. ही वाढ आपण सध्या नैसर्गिक स्रोत वापरून करतो आहोत पण या स्रोतांना मर्यादा आहेत (planetary boundaries) आणि आता त्या उघड होऊ लागल्या आहेत.

या अमर्यादित वाढीचे अजून एक कारण असे की आपल्याला या गोष्टी हे सर्व संसाधने फुकट वापरायला मिळतात. हवा, पाणी, धातू, जमीन या साऱ्या गोष्टी वापरण्याचे आपण निसर्गाला पैसे देत नाही. आपण पैसे देतो ते फक्त मनुष्यबळाचे, सरकारला कर वगैरे देतो. पण झाडाला, हवेला या कराच्या पैशांचा काय उपयोग? निसर्गाची परतफेड निसर्गाच्या भाषेत आपण करतच नाही आणि ही परतफेड न करणं आता अंगाशी येऊ लागला आहे.

या अर्थव्यवस्थेत भांडवल म्हणून फक्त पैसा किंवा मनुष्यबळ बघितले जाते पण आपण भांडवली खर्चामध्ये निसर्गाचे जे स्रोत वापरतो त्याची कोणतीच पर्यावरणीय किंमत लावत नाही. किंवा एखादी वस्तू वापरताना जर आपण हवा पाणी किंवा जमीन वगैरे वापरत असून तर त्याची वेगळी अशी किंमत आपण मोजत नाही. उदाहरणार्थ गाडी चालवताना जेव्हा पेट्रोल जळतो तेव्हा वापरला जाणारा ऑक्सिजन आपण फुकटच वापरतो. गाडीच्या उत्पादनासाठी जो कार्बन जाळला, जी खनिजं उपसली त्याची पर्यावरणीय किंमत जेव्हा आपण मोजायला लागू तेव्हा आपल्याला आपल्या कृतींची नीट जाणीव होईल.

माणसांची वाढती संख्या, तिला लागणारे अन्न पुरवण्यासाठी आणि त्या लोकसंख्येच्या दैनंदिन प्राथमिक व इतर वाढत्या गरजा पुरवण्यासाठी आपण पृथ्वीवरील बहुतेक भूभाग हडप केला आहे. याला इंग्रजीत human footprint अशी संज्ञा आहे. यात मानवी वस्त्या, माणसाने पाळलेली सर्व जनावरे (मासे, गुरे, डुकरे, कोंबडया, शेळ्या, बकऱ्या, मेंढरे, कुत्रे, मांजरी), या सर्व माणसांसाठी आणि त्यांच्या जनावरांसाठी जंगले तोडून चालवलेली शेती, त्यासाठी लागणारे पाणी, निवाऱ्याची सोय या सर्व गोष्टी माणसाच्या फूटप्रिंट मध्ये येतात. यातील मांसाहारासाठी आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठीची (दही, तूप, लोणी, चीज इत्यादी) पाळीव जनावरे हा प्रदूषणाचा मोठा स्रोत आहे. जगातली ७५% शेती ही माणसासाठी अन्न पिकवण्यासाठी होत नाही. या जनावरांचे अन्न तयार करण्यासाठी केली जाते. गायी म्हशी या मिथेन नावाचा एक वायू हवेत सोडतात. तपमान वाढीसाठी हा वायू कार्बन डाय ऑक्साईड पेक्षा २१ पट अधिक धोकादायक आहे.

Planetary boundaries
Planetary boundaries.png२. ऊर्जेचा प्रश्न

पृथीवरील सर्व ऊर्जेचा स्रोत हा सूर्य आहे. ऊर्जा प्रत्येक कामासाठी ऊर्जा लागते.
फिजिक्समध्ये एंट्रॉपी नावाची संज्ञा आहे. त्याप्रमाणे एखादे काम करताना जी उर्जा लागते त्याच्याच बरोबरीने काही ऊर्जा ही वाया जात असते. तिला एंट्रॉपी असे म्हणतात. या एंट्रॉपीचा विचार केला तर उर्जेच्या स्रोतांचे दोन प्रकार सांगता येतील. एक ज्याच्यात एंट्रॉपी जास्ती आहे आणि दुसरी ज्याच्यात एंट्रॉपी कमी आहे. उदाहरण द्यायचं झालं तर सौर ऊर्जा ही अधिक एंट्रॉपी असलेली उर्जा आहे आणि पेट्रोल हे कमी एंट्रॉपी असलेलं इंधन आहे. म्हणजेच जेव्हा आपण सौरउर्जा वापरतो तेव्हा त्यातली बरीचशी उर्जा ही निरुपयोगी असते.

आता याचा पर्यावरणाच्या प्रश्नांची काय संबंध तर आपले हे जे पर्यावरणाचे सध्याचे प्रश्न आहेत ते खरं तर बरेचसे उर्जेचे प्रश्न आहेत. म्हणजे गाडी चालवायला जी उर्जा लागते ती आपण खनिज तेल वापरून मिळवतो आणि त्यातून कार्बन डाय-ऑक्साइड निर्माण होतो. वीज निर्मितीसाठी आपण कोळसा जाळतो त्यातूनही कार्बन डाय-ऑक्साइड निर्माण होतो आपल्या प्रत्येक कृतीसाठी आपण या ना त्या प्रकारे कमी एंट्रॉपी असणारे स्रोत वापरतो आहोत. ज्यातील बरेचसे स्रोत हे हवेचे प्रदूषण करतात. जगात clean energy/green energy या शब्दांचा बोलबाला आहे. दुसरा शब्द म्हणजे renewable energy. सौर उर्जा, वायू उर्जा, जलविद्युत उर्जा हे उर्जेचे अपारंपरिक स्रोत आहेत आणि हे वापरले तर निसर्गाची हानी होत नाही. प्रदूषण होत नाही. मात्र यातील बरेचसे खरे नाही. या सर्व ऊर्जेच्या स्रोतांमुळे देखील प्रदूषण होते आणि यातील योग्य प्रकारे आणि प्रमाणात वापरले तर आणि तरच जल विद्युत आणि सौर उर्जा (सोलर panel मधून मिळणारी नाही)हे दोन स्रोत त्यातल्या त्यात बरे आहेत.

माणसाच्या वाढत्या भौतिक हव्यासापायी आपण उर्जेच्या अति वापराकडे झुकतो आहोत. शाश्वत विकासाची पहिली पायरी ही माणसाची संसाधनांची आणि उर्जेची एकूण गरज कमी करणे हीच आहे. पण मग आपण जगायचे तरी कसे? नव्या शाश्वत जगाचे चित्र कसे असले पाहिजे? हे आपण पुढच्या भागात पाहू!

काही पुरक युट्युब व्हिडीओज च्या लिंक्स
१. माणसाचा फूटप्रिंट म्हणजे काय? - https://www.youtube.com/watch?v=g_aguo7V0Q4
२. Earth overshoot day विषयी माहिती - https://www.youtube.com/watch?v=jgbY79Opn34&t=1s
३. Clean energy/green energy या फसव्या दिशाभूल करणाऱ्या ट्रेंड चा फोलपणा दाखवणारी डॉक्युमेंटरी - Planet of the humans - https://www.youtube.com/watch?v=Zk11vI-7czE&t=4201s
४. Electric car मुळे carbon footprint खरोखरच कमी होतो का? - https://www.youtube.com/watch?v=tikyHEvswUI&t=320s
5. उर्जेचा प्रश्न अतिशय सोप्या भाषेत मांडणारे एक उत्तम पुस्तक - The third curve - Mansoor Khan http://mansoorkhan.net/ हे पुस्तक या साईटवर निशुल्क उपलब्ध आहे.
6. मांसाहार आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे होणारे प्रदूषण - https://www.youtube.com/watch?v=hFwx7W-lx5w

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेच दिवस ही छोटीशी लेखमालिका मायबोलीवर आणावी असे मनात होते पण कामामुळे सवड मिळत नव्हती. सध्या जरा निवांतपणा आहे त्यामुळे हे लेख मायबोलीवर आणत आहे.
काही चुका/त्रुटी असतील तर लक्षात आणून द्यालच!

वाचतोय. काही प्रश्न पडले.
१ निसर्गाकडून जे घेतलं त्याची परतफेड करणं शक्य आहे का? ही संकल्पना फक्त पाण्याच्या (भूजल) बाबतीत ऐकली आहे. अन्य संसाधनाच्या बाबतीत ते मर्यादित आहेत, असंच ऐकलंय.
ऊर्जेच्या स्रोतांबद्दल बोललं जातं पण बाकीच्या संसाधनांचं काय ? उदा : वेगवेगळे धातू.
२. जगातली ७५% शेती ही माणसासाठी अन्न पिकवण्यासाठी होत नाही. - ही माहिती माझ्यासाठी पूर्णपणे नवीन आहे.

-

टायपो - माझ्याकडे लगेच तिला उपलब्ध नाहीये - विदा
त्याप्रमाणे एखादे काम करताना जी ऊर्जा लागते त्याच्याच बरोबर येणे बरोबरीने
स्रोत हे कुठे स्त्रोत असे आले आहे.

भरत, धन्यवाद! चुका दुरुस्त केल्या आहेत.
निसर्गाकडून जे घेतलं त्याची परतफेड करणं शक्य आहे का? >> परतफेड अशा अर्थाने म्हटलं आहे की त्या खनिजाची सायकल पूर्ण झाली पाहिजे आणि माणसाचा वापर पूर्ण झाला की त्या खनिजाचे रुपांतर एखाद्या विषारी पदार्थामध्ये होता कामा नये. उदा. धातूंमध्ये Lead मुळे होणारे प्रदूषण भयानक आहे. Lead असलेला कचरा पाण्यात जाता कामा नये. जर त्याची जमिनीत योग्य जागी योग्य रुपात विल्हेवाट लावता आली तर ते निसर्गाला परत दिल्यासारखे आहे. दुसरं उदाहरण नायट्रोजन चं - ते तर दिलेल्या planetary boundaries मध्ये दिसतंच आहे. खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीत निरुपयोगी नायट्रोजनचे प्रमाण वाढले आहे. पाण्यात ही खते गेल्यामुळे eutrophication होऊन अनेक जल परिसंस्था नष्ट झाल्या आहेत. आपण निसर्गाच्या चक्रांचा आदर राखला पाहिजे तरच त्यांचा समतोल टिकून राहील.

जगातली ७५% शेती ही माणसासाठी अन्न पिकवण्यासाठी होत नाही. - थोडं स्पष्टीकरण असं की थेट माणसाच्या पोटात जाणारे अन्न पिकवण्यासाठी २५% शेतजमीन वापरली जाते. उरलेली जमीन ही बहुतांशी जनावरांना चारा/अन्न मिळावे म्हणून जी शेती होते त्या करता वापरली जाते.
Livestock is the world’s largest user of land resources, with pasture and arable land dedicated to the production of feed representing almost 80% of the total agricultural land. One-third of global arable land is used to grow feed, while 26% of the Earth’s ice-free terrestrial surface is used for grazing.
>> https://www.globalagriculture.org/report-topics/meat-and-animal-feed.htm...'s%20largest,surface%20is%20used%20for%20grazing.

https://www.globalagriculture.org/report-topics/meat-and-animal-feed.htm...'s%20largest,surface%
असे शास्त्रीय अभ्यास ठराविक दिशेने च का जातात.
प्राण्यांची संख्या वाढण्या ऐवजी आता कमी झाली आहे .
किती तरी प्राण्याच्या जाती नष्ट झाल्या आहेत.
पृथ्वी वर आता असलेले प्राणी आणि पूर्वी असलेल्या प्राणी ह्यांच्या संख्येत प्रचंड तफावत आहे.
त्या मुळे पर्यावरण दूषित करण्यास प्राणी जबाबदार आहेत हा विचार काहीसा विचित्र वाटत आहे.
समुद्रातील वनस्पती ह्या जास्त मिथेन निर्मिती करतात अस पण मी वाचलं आहे.
पाहिले मिथेन चा पर्यावरण साठी उपयोग काय आहे ह्याची माहिती असलेला दुवा किंवा माहिती असेल तर ध्या.
एक बाजू पूर्ण झाकून सोयीची बाजू उघड करण्यास संशोधक सुद्धा कमी नाहीत.

Hemant 33> Methane कोणते प्राणी सोडतात आणि कोणते प्राणी नष्ट होत आहेत याचा अभ्यास करा प्लीज.

उत्तम लेख आहे. मैत्रीण वर वाचला होता.
शाश्वत विकासासाठी काही सुटसुटीत सुत्रे काढता येतील का जी सामान्य माणसे उपयोगात आणू शकतात.
National Geographic वाचून धसकी बसते दर वेळेस पण आपण आता एक individual म्हणून काय करू शकतो.
प्रत्येक विडिओ पहाणे व लिंक वाचणे (मला तरी) अशक्य आहे आणि त्यामुळे सुत्रे काढावी असे वाटते. शिवाय यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्या थेट नियंत्रणात नाहीत.
It is impossible to teach or aware everyone on this because some people are still in denial. मी तर एकदा लोकांच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या कचऱ्यातून काढून रिसायकल मध्ये टाकल्या त्यांच्या समोरच...They didn't care though !! समोरच रिसायकल बिन असले तरी लोक करत नाहीत जीव तळमळतो. अवांतराबद्दल क्षमस्व.
धन्यवाद.

स्तुत्य उपक्रम ! ही ( खरेतर कुठलीही वैज्ञानिक / शास्त्रीय) माहिती मराठी मधे सहज मिळत नाही..
तुम्ही ऊर्जा स्रोतां बद्दल लिहिले आहे ..
"या सर्व ऊर्जेच्या स्रोतांमुळे देखील प्रदूषण होते आणि यातील योग्य प्रकारे आणि प्रमाणात वापरले तर आणि तरच जल विद्युत आणि सौर उर्जा (सोलर panel मधून मिळणारी नाही)हे दोन स्रोत त्यातल्या त्यात बरे आहेत.".
या दोन्ही सोर्सेस ची भरपूर लिमिटेशन्स आहेत. जल विद्युत काही च ठिकाणी मिळू शकते.आणि सौर तापिय ( थर्मल) ऊर्जा प्रत्यक्ष वापरात आणणे अत्यंत अवघड आणि खर्चिक आहे.
अजून दोन मुद्दे:
१. ऊर्जेच्या गरजा तीन मुख्य भागांमध्ये विभागल्या आहेत - cooking, transportation & electricity. त्यामुळे स्रोत ही असे च लागतील जे या तिन्ही प्रकारची ऊर्जा पुरवू शकतील.
२. अर्ध्याहून जास्त विश्वात, वरील तिन्ही प्रकारच्या ऊर्जा सहज उपलब्ध करणे हीच समस्या आहे ( energy access). या परिस्थितीत लोकांना शाश्वत विकास, ऊर्जा स्रोत बदल ( जे शॉर्ट टर्म मध्ये खर्चिक आणि imconvinient असू शकतात) ह्या सगळ्या संकल्पना कश्या समजतील / महत्वाच्या वाटतील ?

कोणते प्राणी सोडतात आणि कोणते प्राणी नष्ट होत आहेत याचा अभ्यास करा प्लीज.

रवंथ करणारे प्राणी .
त्या मध्ये
गायी,म्हैस,शेळी,जिराफ,हरीण,असे किती तरी प्राणी येतात.
इंडस्ट्री मध्ये क्रांती झाल्या पासून ग्रीन हाऊस गॅसेस चे प्रमाण प्रचंड वाढले आहे .
फक्त माणूस हा प्राणी आणि त्याची इंडस्ट्री ग्रीन हाऊस gas निर्मिती स जबाबदार आहे.
रवंथ करणाऱ्या प्राण्यांची संख्या फार नाही फक्त 200 वर्षा पूर्वी चा विचार केला तरी आता पेक्षा खूप प्रचंड होती सर्व लयाला गेले तुलना केली तर 10% प्राणी पण शिल्लक राहिले नसतील.
त्या मुळे मिथेन निर्मितीत प्राणी जबाबदार आहेत हे अमान्य.

चिन्मय_१, तुम्ही अतिशय महत्त्वाचे दोन मुद्दे मांडले आहेत. प्रत्येक उर्जास्रोताचे फायदे तोटे आहेतच त्यामुळे आपण जो उर्जा स्रोत वापरायचा निर्णय घेऊ तो एक trade off च असणार आहे. लेखात म्हटल्याप्रमाणे It will be a trade-off but it will make you aware of the limitations of the option you choose.

दुसरा मुद्दा देखिल महत्त्वाचा आहे. जेव्हा भारतासारख्या देशात जिथे अजून सर्वत्र वीज पोचलेली नाही, पाणी उपलब्ध नाही अशा ठिकाणी काय पर्याय निवडला पाहिजे?
या प्रश्नाचे उत्तर sustainable developmental goals मध्ये आहे. यातील एक उद्दिष्ट सर्वांसाठी वाजवी दरात स्वच्छ (कमी प्रदूषण करणारी) उर्जा उपलब्ध करून देणे हे आहे. So we should follow these goals designed by the UN in this regard.

यातील सर्वांसाठी अखंड वीज हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर स्वस्त. आणि मग स्वच्छ.
हे याच क्रमाने विकसित देशांत झालं आहे. तो क्रम विकसनशील देशांनी अचानक उलटा करावा कारणं काळाची गरज, ग्लोबल वॉर्मिग इ. अशी अपेक्षा करणं मला तरी योग्य वाटत नाही.
१०० वर्षांनंतर पृथ्वीवर मानवजात टिकावी म्हणून आज लोड शेडींग मध्ये कोणी जगा हे कोणाला सांगणे क्रूर आहे.

अमितव, १०० वर्षे इतकी दूरची गोष्ट राहिली नाही. ही आजची गोष्ट आहे. If you are really concerned then you need to have serious conversations with the citizens of the developed countries to give up some luxuries so that the poor people from the third world countries can have a better, more equitable life. विकसित देशांनी रिसोर्सेसची उधळपट्टी करून विकास साधला आहे म्हणून अविकसित देशांनी तीच गोष्ट करावी आणि अशावेळी जेव्हा पर्यावरण बदलाचे सर्वाधिक भयंकर फटके हे त्याच अविकसित देशातल्या गरीबांना ऑलरेडी बसत आहेत. सिरीया स्थलांतरितांच्या प्रश्नामागे तिथे पडलेला महाभयानक दुष्काळ देखील कारणीभूत आहे. जेव्हा समुद्र पातळी वाढून किनाऱ्यालगतचे प्रदेश पाण्याखाली जातील तेव्हा बांगलादेश सारख्या देशातल्या लाखो लोकांना विस्थापित व्हायची वेळ येईल. जेव्हा अतिवृष्टी किंवा अंफान आणि निसर्ग सारख्या नैसर्गिक आपत्तींची संख्या आणि तीव्रता हवामानबदलामुळे वाढेल तेव्हा भारताच्या प्रचंड लोकसंख्येला अन्नसुरक्षा पुरवायला विकसित देश पुढे येतीलच याची काय खात्री? What you are offering is a bad piece of advice. If we start accounting for the real environmental costs of the traditional energy options then clean energy might suddenly become a much cheaper option.
We as a developing nation may have to start with some trade offs but blindly following the current model of development is not at all the best way forward.

स्थिती एवढी खराब आहे की वेळ निघून गेल्या नंतर माणसाच्या हातात काहीच राहणार नाही.
झाले ले परिणाम परत मागच्या दिशेनी फिरवता येणार नाहीत.
ही भीती आहे.
लोक मुलांसाठी पैसे ,संपत्ती जमा करतात त्यांच्या सुखासाठी.
पण त्या पेक्षा अतिशय महत्वाचे पाणी आणि दूषित करतात ज्या शिवाय माणूस 2 मिनिट पण जगू शकत नाही.
त्या मुळे 100 वर्षानंतर काय होईल ह्याची काळजी मी कशाला करू मला सर्व सुख मिळालीच पाहिजेत हा विचार अपरिपक्व,आणि अत्यंत स्वार्थी आहे.
त्या मुळेच जे जबाबदार लोक सत्ते वर आहेत त्यांनी विनंत्या ,लोकशिक्षण ह्याच्या भानगडीत न पडता सरळ जबरदस्ती नी बदल घडवून आणले पाहिजेत.
गंभीर स्थिती येण्यास 100 वर्ष लागतील हे कोणी सांगितले .
दोन वर्ष जरी पावूस पडला नाही तरी मानव जात पृथ्वी वरून नष्ट होईल.
सागर चे पाणी वापरू ही पोकळ घोषणा आहे ते खऱ्या आयुष्यात घडत नाही .
अन्न आणि पाण्या वाचून जीव सोडतील लोक.
वीज,गाड्या,आणि आरामाची साधन काहीच मिळणार नाही.

फक्त corona mule सर्वांचा आवाज बंद झाला होता .
तसा पण तो अतिशय सौम्य व्हायरस होता पण जिवाच्या भीती नी गाळण उडाली होती.
तुमचे सायन्स पण मदतीला येवू शकले नाही.
तीन ते चार महिने सर्व ऐश करण्याचे मार्ग बंद होते काय केले लोकांनी .
का नाही बाहेर पडले हक्क साठी.
जीवाची भीती ही मोठी भीती होती .
कायदे तसे असेच मोडले जातात.
त्या पेक्षा भयंकर व्हायरस आल ज्याचा हवेतून प्रसार होवू शकतो.
काय करेल माणूस .
काहीच करू शकणार नाही.
पावूस दोन वर्ष नाही पडला तर अन्न आणि पाणी दोन्ही मिळणार नाही.
काय करेल माणूस .
काहीच करू शकणार नाही.
नैसर्गिक संकट येतात तेव्हा विकसित आणि अविकसित सर्व एकाच पातळीवर असतात .
आणि माणूस एक सामान्य जीव असतो .
लिव्हर आणि किडनी खराब झाल्या शिवाय दारुडा सुधारत नाही त्या प्रमाणे जो पर्यंत चटके बसणार नाहीत प्रदूषण आणि बदलेल्या हवामानाचे तो पर्यंत माणूस सुधारणार नाही.
तो दिवस जास्त लांब नाही थोडी च वर्ष राहिलेत .

मी सल्ला देत नाहीये. रादर सल्ला देणं मला क्रूर वाटतं असं लिहिलंय. आणि मी स्वार्थी तर आहेच आहे.
मी विकसित देशांत रहातो आणि समृद्धीची सगळी फळं चाखतोय. विकसनशील देशांनी पुढच्यास ठेच मागचा शहाणा अप्रोच घ्यावा का काय करावं हे मी कदापि सांगणार नाही. तू मला वाटतं भारतात आहेस, सो तू ते म्हणणं जास्त योग्य आणि परिणामकारक असेल.
जसे ब्लॅक लाईव्ह आंदोलनात जाळपोळ व्हावी का होऊ नये, पुतळे काढावे का काढू नये यातही मी प्रिव्हलेज पोझिशन मध्ये असल्याने काही बोलणे समायोचित नाही तसंच.

अमितव, तू कुठे राहतोस यावर तुझं म्हणणं चूक की बरोबर हे ठरत नाही. मी भारतात आहे म्हणून मला वाटते तेच योग्य असेही नाही.
आज भारत प्रचंड प्रमाणात परकीय चलन क्रूड अॉईल आणि कोळसा आयात करण्यात खर्च करतो. जर स्थानिक पातळीवर पर्यायी इंधनाचे स्रोत तयार करण्यावर भर दिला तर यात भारताचा आर्थिक फायदा आहेच शिवाय कार्बन फूटप्रिंट देखील कमी होईल. यात क्रूरपणा मला तरी दिसत नाही. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या तर्काने मला हा मार्ग शहाणपणाचा वाटतो.
पॅरीस कराराकडे पाठ फिरवणं हा क्रूरपणा आहे जो अमेरिकेने दाखवला आहे. पण अमेरिका स्वार्थी देश आहे आणि स्वार्थी असणं हे चांगलं आहे असंही मानणारा देश आहे.
Also, what you think as some distant future is actually a reality of today. The Covid-19 pandemic is an indirect consequence of the human activity (interference with the nature). The only difference is that being in a developed country like the US, you may never face the grave consequences of climate change and may never need to worry about it first hand. Whereas people in India are already facing the consequences of actions of the nations like USA and may be subject to worse situations sooner or later. It is just unfortunate but the world has never been a fair place so that's that.
कोण कुठे राहतो यामुळे जरी सत्य बदलत नसलं तरी त्यामुळे निर्माण होणाऱ्या परीणामांना सामोरे जावे लागेल की नाही हे मात्र निश्चित ठरणार आहे. त्यामुळे तुझ्या point of view ने जे क्रूर वाटते ते दुसऱ्याला कदाचित शहाणपणाचे वाटेल.

"Tragedy of commons" occurs when we place the individual well-being above the well-being of the community. This often destroys the well-being of everybody. It's explained very well in the following video. Do watch.
https://youtu.be/CxC161GvMPc

वाचतेय.
सध्या तरी स्वतः कडून वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर होता होईल तो नैसर्गिक स्रोतांची काटकसर, पुनर्वापर, संवर्धन आणि पुढच्या पिढीच्या मनावर या सगळ्याचे महत्व बिंबवण्याचा प्रयत्न इतकेच करू शकते आहे.

मुंबई मध्ये राहणाऱ्या दुसऱ्या राज्यातील लोकांना आरे मधले जंगल नष्ट होण्याचे काहीच सुतक नसते,वायू प्रदूषण,गर्दी,फूट पथ आदवणे, खाड्या बुजवून इमारती झोपड्या निर्माण करणे त्यांना वर्जं नाही पण महाराष्ट्र मधील लोकांना ते पटत नाही कारण ते त्यांचे शहर आहे.
परप्रांतीय कोकणचा हेतू फक्त पैसे कमविणे हेच आहे..
त्याच न्यायाने विकसित देशातील मूळ लोकांना त्यांच्या देशाची काळजी आहे ते पर्यावरण ला नक्कीच महत्व देतात .
अविकसित देशातून तिथे स्थायिक झालेल्या लोकांना तेथील प्रश्ना शी काही देणेघेणे नसते त्यांना जास्तीत जास्त पैसा आणि त्या देशांनी कष्टांनी निर्माण केलेली सू व्यवस्था ह्याचा लाभ मिळावा हाच हेतू असतो.
त्या विकसित देशातील मूळ नागरिक काय विचार करतात हे महत्त्वाचे.

जिज्ञासा, EIA Draft notification वाचलं का? त्याबद्दल लिहाल का?

भरत, मी draft वाचलेला नाही पण त्याविषयी लेख, व्हिडिओ आदी मध्ये चाललेली चर्चा वाचते/ऐकते आहे. फारच पर्यावरण विघातक तरतूदी आहेत. सुदैवाने लोक सजग आहेत. I really hope this doesn't go through.

जिज्ञासा.. आजच तुझी ही ३ भागात लिहीलेली लेखमाला वाचली. विचार एकदम सुसुत्र व छान मांडले आहेत. विषयाचा आवाकाही फार मोठा आहे.

मी काही या विषयातला तज्ञ नाही.

तुझ्या या लेखामधे पॅरीस करार व इतर बर्‍याच गोष्टींबद्दल अमेरिकेचा संदर्भ आला होता.. त्याबाबत.

तुला माहीत असेलच.. अमेरिका एक भांडवलशाही देश आहे व ज्या ३ तत्वांवर या देशाची संहीता निर्माण झालेली आहे ती ३ तत्वे म्हणजे.. लाइफ, लिबर्टी अँड पर्स्युट ऑफ हॅपीनेस...

जर तु भांडवलशाही व पर्स्युट ऑफ हॅपीनेस या २ गोष्टी एकत्रीत बघीतल्या तर त्या त्यांच्या सो कॉल्ड “ गॉड गिव्हन राइट्स“ च्या नावाखाली पर्यावरणाचा खुन झाला तरी अमेरिकेला फरक पडणार नाही अशी सध्या अमेरिकेत परिस्थिती आहे.

इतकेच नव्हे .. सध्या तरी अमेरिकेत एक फार मोट्ठा वर्ग असा आहे की त्यांनी वैज्ञानीक द्रुष्टीकोनाकडे नुसता काणाडोळाच नाही.. तर त्यांनी त्यांच्या डोळ्यावर संपुर्ण झापडच लावली आहे! अमेरिकेत ५० लाख कोव्हिड-१९ केसेस... अँड काउंटींग... याचे कारण तेच आहे.. बिचारा डॉक्टर फाउची .. त्याचा घसा बसेस पर्यंत.. ओरडुन ओरडुन सांगतो आहे की काय काळजी घ्यायला पाहीजे.. पण नाही.. इथे मास्क घालायला सांगीतले तर राग येउन ही लोक खिशातुन बंदुका काढत आहेत.. आम्हाला मास्क घालायला भाग पाडणारे तुम्ही कोण? तसे करायला सांगुन तुम्ही आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत आहात... माइंड युअर ओन बिझीनेस.. असे ही लोक अ‍ॅर्ग्यु करतात!

तर अश्या लोकांना तु त्यांच्या वागणुकीने व त्यांच्या चंगळवादाने पर्यावरण धोक्यात येउ शकते/आले आहे हे काय कप्पाळ सांगणार?

याच अमेरिकेने ५० वर्षापुर्वी... विज्ञानाचा उपयोग करुन चंद्रावर माणुस पाठवुन परत आणला होता यावर विश्वास बसु शकणार नाही अशी परिस्थिती आज अमेरिकेत आहे.

अग तुला खोट वाटेल... अमेरिकेच्या काही काही मिड्वेस्ट राज्यात( ज्याला बायबल बेल्ट म्हणतात).. आजच्या युगात.. डार्विन व त्याचा उत्क्रांतवाद खोटा आहे असे म्हणुन शाळेत शिकवतच नाहीत..

बोल तु यांना त्यांची जिवनशैली व त्यामुळे होणार्‍या पर्यावरणाचा विध्वंस.. कसा समजवणार? ... Sad

याच अमेरिकेने..१०० वर्षांपुर्वी ... नॅशनल पार्क ही आयडिया जगाला दिली होती..( प्रिझरव्हेशन ऑफ नॅचरल वंडरलँड... नॅचरल ब्युअटी अँड नेचर फॉर फ्युचर जनरेशन्स) व जॉन म्युअर सारखी माणसे इथे जन्माला आली व ज्याने सिएरा क्लब सारखे क्लब इथे स्थापन केले..( ज्याचे उद्दिष्ट...टु एक्स्प्लोअर, एंजॉय अँड प्रोटेक्ट द वाइल्ड प्लेसेस ऑफ द अर्थ, टु प्रॅक्टीस अँड प्रमोट द रिस्पॉन्सिबल युज ऑफ द अर्थ्स इकोसिस्टिम्स अँड रिसोर्सेस, टु एज्युकेट अँड एनलिस्ट ह्युमॅनीटी टु प्रोटेक्ट अँड रिस्टोअर द क्वालिटी ऑफ द नॅचरल अँड ह्युमन एन्व्हिरॉन्मेंट...अँड टु युज ऑल लॉफुल मिन्स.. टु कॅरी आउट दिज ऑब्जेक्टिव्ह्स.)

किती लॉफ्टी गोल्स!

पण आता परिस्थिती एकदम वेगळी आहे... Sad

कधी मला असे वाटते की अमेरिका एखाद्या स्खिझोफ्रेनिक व्यक्तीसारखी आहे... २ परस्परविरोधी तत्वप्रणाली या देशात एकाच वेळेला.. राबत असतात. ( व्हिएतनाम युद्ध हे एक प्राइम उदाहरण आहे... त्यावेळेला सुद्धा युद्ध चालु असताना १९६८-६९ पासुन ते ..ते १९७५ ला युद्ध संपेसपर्यंत.... अमेरिकेत ...युद्धविरोधी आंदोलने रोज होत होती)

मुकुंद, धन्यवाद!
तुम्ही जे अमेरिकेविषयी लिहिले आहे त्याच्याशी मी सहमत आहे. आजचा आपला विकास ज्या कल्पनांवर आधारित आहे त्यांत निसर्ग हा एक घटक म्हणून धरलाच जात नाही. उदा. GDP. That's why we are crossing planetary boundaries for many natural resources.
जी upward mobility आज भारतासारख्या विकसनशील देशात बघायला मिळते ती बहुतांशी निसर्गापासून दूर नेणारी आहे. None of this is sustainable. आपल्या सर्वांच्या हे जितक्या लवकर लक्षात येईल तितके आपण होणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करू शकू. We are no longer in the zone of avoiding the catastrophe. All we can do is mitigate the damages. The longer we wait to respond the harder it will be to control the damage.

प्लॅनेट ऑफ ह्युमन्स.. मी ही डॉक्युमेंटरी गेल्या महिन्यातच बघीतली होती. त्यामधे ऊघडकीस आणलेले मुद्दे जर खरे असतील तर कठीण आहे.

त्या डॉक्युमेंटरी मधले बरेचसे संदर्भ ८-१० वर्षे जुने वाटतात. त्या डॉक्युमेंटरी बाबत तुझे काय मत आहे?

पण या पर्यावरण रक्षण चळवळीमधे काही शेडी कॅरॅक्टर्स घुसली आहेत हे मात्र नक्की.. त्यामुळे लोकांना संभ्रम पडला आहे की कोणावर विश्वास ठेवायचा?

मी अजुन एक डॉक्युमेंटरी बघीतली होती... त्यात तर रिसायकलिंग चे पितळ उघडे केले होते. आपल्याला वाटते की आपण रिसायकलिंग करुन आपला खारीचा वाटा निभावत आहोत.. पण वस्तुस्थिती मात्र तशी नाही... तो नुसता आभास आहे की आपण पर्यावरणासाठी काहीतरी करत आहोत.

https://www.youtube.com/watch?v=-dk3NOEgX7o&feature=share

ही त्या डॉक्युमेंटरीची लिंक.... नक्की बघ...

अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅल गोर.. यांनी ग्लोबल वॉर्मिंग वर एक डॉक्युमेंटरी( इनकव्हिनिअंट टृथ नावाची) बनवली होती — १५ वर्षापुर्वी... आणी त्यांनी स्वतःला ग्लोबल वॉर्मिंग चळवळीचे व ग्रीन मुव्हमेंटचे स्वयंघोषीत पुढारी घोषीत केले होते. पण वरील प्लॅनेट ऑफ ह्युमन्स मधे त्यांच्यावरही ठपका ठेवला आहे की त्यांनी ग्रीन मुव्हमेंट कॉर्पोरेट अमेरिकेला विकुन टाकुन आपली तुंबडी भरुन घेतली आहे.

त्यामुळे ही डॉक्युमेंटरी जर खरे सांगत असेल तर ती डॉक्युमेंटरी ग्रीन मुव्हमेंट/ क्लायमेट प्रोटेक्शन मुव्हमेंटला नक्कीच हानीकारक ठरु शकते.

त्या डॉक्युमेंटरीत ग्रीन मुव्हमेंट मधे काय चुकीचे आहे हेच फक्त अधोरेखीत केले आहे.. पण खर नक्की काय केले पाहीजे याबद्दल ही डॉक्युमेंटरी काहीच सांगत नाही.

अणु उर्जेबद्दल...एच बी ओ .. ने तयार केलेली... “ चेर्नोबिल“ ही ५ भागाची अप्रतिम डॉक्युमेंटरी... जमल तर जरुर बघ... तुला अणु उर्जेबद्दल उत्तर त्यात सापडेल.

उत्तम प्रकारे तुम्ही हे मांडलं आहे. फार छान. समविचारी लोकांनी जनजागरण सुरू केलं तर भविष्य नक्कीच आशादायी असेल.

ज्या गतीनं विनाशाकडं जात आहोत ते पाहिलं की अज्ञानात सुख आहे हे पटतं आणि ज्या लोकांना या विषयाचं गांभीर्य नाही, त्यांचा हेवा वाटतो.
याच्याशी निगडीत मला काही सांगावं वाटतंय.

वर्तमानपत्रात बहुधा मागच्या वर्षी वाचलेली एक बातमी आठवते. गुडगावला दिवाळीचा १०० टन कचरा निघाला. हा कागदाचा कचरा. विषारी वायूचा हिशोब वेगळा. WHO ची २०१६ ची आकडेवारी सांगते की जगात १५ वर्षाच्या आतली ६ लाख मुलं वायूप्रदूषणामुळं मरण पावली. आता या वायुप्रदूषणाला औद्योगिक प्रदूषण जास्त कारणीभूत म्हणा.

आता यात आपण काय करणार? मी एकटा काय करणार?

आमच्या घरात गेल्या २०-२५ वर्षांपासून फटाके वापरत नाहीत. नातेवाईकांना, मित्रांनाही तशी विनंती करतो. ते चेष्टा करतात. करोत. "दिवाळी हिंदूंचा सण आहे. प्रदूषण काय दिवाळीच्या फटाक्यांनीच होतं का? ३१ डिसेंबरला काय कमी करतात? ते कसं चालतं?"
आता प्रदूषणाचाही लोक धर्म विचारू लागलेत हे अजबच. मी कथा पुराणांचे, फटाक्याच्या इतिहासाचे दाखले देत नाही. माझं म्हणणं इतकंच की ‘माझी चूक होते आहे हे मला कळालं म्हणून मी थांबलो.’ मला आत्मिक समाधान आहे की गेल्या २०-२५ वर्षात एखाद्या पोराचा जीव वाचवण्याइतकं प्रदूषण मी कमी केलं असेल.

दस-याला आपटा, शमी, कांचन जे काही ‘तसं’ दिसणारं झाड असेल ते ओरबाडून, तोडून लोक आणतात विकायला. विकलं ते विकलं, बाकी तिथंच सोडून जातात. दुस-या दिवशी नगरपालिकेचे ट्रकचे ट्रक भरतात मग. या दिवशी आपट्याची झाडं पहा. दुर्दशा.
जालावरच्या माहितीनुसार २,२०० रूपयांचा ऑक्सीजन एका माणसाला रोज लागतो. त्याची मी परतफेड कशी करणार? मी माझ्यापुरता ऑक्सीजन तयार करायला झाड लावीन म्हटलं तर आता माणसाला उभं राहायला जागा नाही शहरात, फ्लॅटमध्ये राहून झाड लावायचं कुठं? मग किमान आपण झाडाच्या एकाही पानाचं पाप घेऊ नये आणि आपल्यासाठी दुस-यालाही धनी बनवू नये. आम्ही ‘सोन्याऐवजी’ साखरेचा हलवा, गूळ, मिठाई, असं काहीतरी देतो.

सा-या इमारती उंच आहेत आजकाल. माणसांना वेळ नाही. आयुष्य मोठ्या धावपळीचं आहे. जिना उतरायला चढायला वेळ नाही. लिफ्टला पर्याय नाही. शक्य असेल तेंव्हा मी जिना वापरतो. साधारणपणे १०-१२ मजले आपण चढू शकतो सहज. किंवा जितकं झेपेल तितकं. समजा तितका वेळ नाही. मग वर जाताना लिफ्ट. पण उतरायला तर जिना वापरायला हरकत नाही. वेळापत्रक अगदी मिनीट काट्यावर असेल तर वेगळी गोष्ट. पण मी शक्यतो लिफ्टचा वापर टाळतो. वीज वाचते. जो व्यायाम होतो तो आपला बोनस. सहकारी हसतात. हसोत.

गाडीच्या डिकीत कापडी पिशवी असते. त्यामुळं दुकानातून कॅरी बॅग घ्यावी लागत नाही. सगळे नेहमीचे दुकानदार आता ओळखतात, ‘नो कॅरी बॅग’ वाला माणूस म्हणून. मला अभिमान वाटतो.

“मी एकट्यानं करून काय होणार आहे?” हा विचार घातक आहे.

शासनाचं सध्याचं धोरण बघितलं तर पर्यावरणाच्या आधी औद्योगिक आणि तांत्रिक विकास ही प्राथमिकता आहे. भवितव्य आताच वर्तवणं कठीण आहे. चैनीचं आयुष्य की निरोगी आयुष्य हे दोन पर्याय आपल्यापुढं आहेत.

शेवटी एक जालावर मिळालेली गोष्ट.

पृथ्वीचं वय ४६० कोटी वर्षं आहे.
आपण घटकाभर असं समजू की पृथ्वीचं वय ४६ वर्षं
माणूस तयार होऊन ४ तास झाले.
१ मिनीटापूर्वीच औद्योगिक क्रांती झाली.
या एकाच मिनीटात जगातलं अर्ध जंगल नष्ट झालं.
पुढं काय???

असो. नकळत कोणी दुखावलं असेल तर माफ करा. असा काही हेतू नाही. पण मूळ धागा माहितीपूर्ण आणि वाचनीय आहे. जिव्हाळ्याचा विषय आहे. माझं हे चिरगुट मी त्याला मध्येच बांधलं. पण धागा वाचल्यावर राहवलं नाही.

Pages