बंध

Submitted by ध्येयवेडा on 22 June, 2020 - 08:53

दार वाजलं म्हणून काकूनं दार उघडलं. समोर सत्तर पंच्याहत्तर वय असणारी एक व्यक्ती उभी होती.
"ओळखलंस का मालती काकू? " तो हसून म्हणाला.
कापऱ्या हातानं काकूनं चष्मा लावला. पाठीचा कणा वाकल्यामुळे तिला त्याच्या उंच देहाकडे नीट बघतासुद्धा येत नव्हतं. तिनी नकारार्थी मान हालवली.
"काकू, मी शरद.. शरद सगरे, साताऱ्यात होतो तुमच्याकडे तीन वर्ष.. आता तरी आठवतंय का काही? "
काकूच्या डोक्यातल्या आठवणींची धावपळ सुरू झाली.
'शरद सगरे' हे नाव आज खूप वर्षांनी कानावर पडलं होतं. फक्त नाव नव्हे तर साक्षात ती व्यक्ती समोर उभी होती.
इतक्या वर्षात घडलेल्या अनेक गोष्टी बाजूला करून काकूच्या डोक्यात शरदच्या आठवणी वर यायला लागल्या.

"ज्योती अग अशी का करतीयेस? काय होतंय तुला.. झपाटलं की काय तुला कोणी.. शरद.. शरद.. अरे हे बघ ना ज्योती कसं करतीये.. बघ ना डोळे पांढरे करतीये..... "
काकूची किंकाळी कानावर पडताच शरद हातातलं पुस्तक टाकून धावत खाली आला. ज्योती वेड लागल्यासारखं करत होती. काकूला मारत होती.. डोळे फिरवत होती.. वेडी वाकडी तोंडं करत होती.. काही क्षण काय सुरू आहे ते शरदलासुद्धा कळेना. त्यानं पटकन भैय्याला मदतीला बोलावलं. रिक्षा बोलावली आणि ज्योतीला घेऊन ते थेट हॉस्पिटल मध्ये निघाले.
ज्योतीला स्ट्रेचरवर झोपवून एका खोलीत नेण्यात आलं. तिला चार सेवकांनी घट्ट धरून ठेवलं होतं. दार बंद झालं तरी तिचा आरडा ओरडा आणि किंकाळ्या बाहेरपर्यंत ऐकू येत होत्या.
काकूच्या शेजारी बसून शरद तिचे हुंदके झेलत होता. तिच्या डोक्यावरून हात फिरवत "सगळं नीट होईल, देव सगळं नीट करेल" असा आधार देत होता. नानांना कळवण्यासाठी भैय्या हॉस्पिटलच्या बाहेर पडला होता.
काही वेळानं आतून येणारा ज्योतीचा आवाज शांत झाला. बहुदा डॉक्टरांनी तिला झोपेचं इंजेक्शन दिलं असावं.
डॉक्टर बाहेर आले.
"त्यांच्या आताच्या स्थितीवरून असं दिसतंय की त्यांच्या डोक्यामध्ये ताप गेला आहे.. परिस्थिती गंभीर आहे. मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता आहे.. तातडीनं काही अद्ययावत चाचण्या आणि उपचार करावे लागतील, जे आपल्या इथे होऊ शकत नाही... आजच्या आज त्यांना पुण्यात ससूनला हालवावं लागेल किंवा जमत असेल तर तिकडच्याच एखाद्या चांगल्या खासगी रुग्णालयात.. "
"ससून ठीक आहे.. मी बघतो कसं करायचं ते " शरदने लगेच हालचाली करायला सुरुवात केली.

काही वेळात नाना हॉस्पिटलामध्ये पोचले. शरदने घडलेलं सगळं नानांना सांगितलं. दोघांनी ज्योतीला पुण्यात हालवण्याची खटपट सुरू केली.
काकूला अजूनही भानावर नव्हती.
ज्योतीवर ससूनमध्ये उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी अठ्ठेचाळीस तासांची मुदत दिली. सर्व नातेवाइकांना तार पाठवून, शक्य असेल तिथे फोन करून बोलावून घेतलं गेलं.
देवाच्या कृपेने तिसऱ्या दिवशी ज्योतीने उपचाराला सकारात्मक प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. तिनी डोळे उघडले. आई नानांना तिनी ओळखलं. सर्वांना हायसं वाटलं.

आज आठवडा झाला. ज्योती बरी झाली खरी, पण पूर्णतः नाही. त्या आजारपणाचा तिच्या मेंदूवर परिणाम झाला.
ती एखाद्या लहान मुलासारखं वागत होती. बालिश वागत होती. हट्ट करत होती, लाडात येत होती.. आधीची ज्योती आणि आताची ज्योती.. प्रचंड तफावत होती. तिचं ते लहान मुलासारखं वागणं सर्वांनाच खूप विचित्र वाटत होतं. नाना आणि काकू ज्योतीला आयुष्यभर सांभाळायची मनाशी तयारी करत होते.
आणि शरद ... तो एकदम सुन्न झाला होता. त्याचं काळीज क्षणाक्षणाला भरडून निघत होतं.
काही दिवस उलटून गेले. ज्योतीला घरी आणलं. ती घरात रुळली. सर्वांना तिच्यामधल्या बदलाची सवय झाली. शरद तिच्याशी खूप गप्पा मारायचा. खूप मजा आणि जमतील तसे लाड करायचा. मग वरच्या खोलीत जाऊन मनातल्या मनात कुढत बसायचा. देवाला दोष देत बसायचा. असं का झालं? ह्याचं कारण शोधायचा प्रयत्न करायचा. हाती काहीच लागायचं नाही. मग अश्रूंना वाट मोकळी करून द्यायचा.
कित्येक दिवस हे चालू होतं.

एक दिवस त्यानं ठरवलं.
"नाना... काकू.. येत्या सोमवारी मी निघतोय पुण्याला.. तिकडे जाऊन सैनिक भरतीची परीक्षा असते त्याला नाव देतोय माझं. आता इथून पुढे तिकडेच राहीन मित्राबरोबर. जमेल तशी सातारला चक्कर मारेनच "
"शरद अरे सांगतोयस काय? असं अचानक निघालास?? आम्हाला थोड्याआधी कल्पना द्यायचीस.. आणि पदवी परीक्षा झाली का तुझी? मध्येच सैनिक भरती कुठून आली? "
"एक पेपर राहिलाय माझा. बघू ऑक्टोबर मध्ये देऊन जाईन.... थोडा अभ्यास कमी पडला ह्या वेळेस त्यामुळे राहिला.. " शरद हसत म्हणाला आणि त्यानंतर त्यानं जमेल तसं विषयांतर केलं.
नाना आणि काकू दोघांना मनातून धक्का बसला होता.. खरंतर त्याच्या शिक्षणाच्या काळजीपेक्षा त्यांना शरद आपल्याबरोबर नसणार ह्याच गोष्टीची खंत वाटत होती.
गेल्या अडीच- तीन वर्षात त्यांना शरदच्या आपल्या आजूबाजूला असण्याची सवय झाली होती. त्याचा एक आधार वाटायचा. शरद त्यांच्यासाठी अगदी मुलासारखा होता. त्यानं दोघांना खूप लळा लावला. काकू आणि नानांनी सुद्धा तितकंच प्रेम केलं त्याच्यावर.

आता तो ही चालला.
सोमवारी सकाळी शरद ट्रंका आणि त्याहून हजारपट जड अंत:करण घेऊन खाली उतरला. नानांना आणि काकूला नमस्कार केला. ज्योती शेजारीच हसत उभी होती. पुण्यावरून मला खाऊ आण असं त्याला म्हणत होती. शरदचे डोळे पाणावले होते. त्यानं लवकरात लवकर तिथून काढता पाय घेतला.
रिक्शातून निघताना त्याची नजर फक्त ज्योतीवर खिळली होती.

काही दिवसांनी काकू वरच्या खोलीत आवारावर करत होती. तिची नजर दारामागे चिकटवलेल्या एका कागदाकडे गेली. ते वेळापत्रक होतं. शरदच्या पदवी परीक्षेचं ! काकूनं त्यावरून नजर घातली. शेवटच्या पेपरच्या तारखेनं तिचं लक्ष वेधून घेतलं. ह्याच दिवशी ज्योतीला हॉस्पिटल मध्ये आणि तिकडून पुण्याला हालवण्यात आलेलं. शरद संपूर्ण दिवस आपल्यासोबत होता. त्या नादात त्यानं त्याचा शेवटचा पेपर दिलाच नाही...
काकूच्या मनाला ही गोष्ट समजली आणि तिचे डोळे क्षणार्धात पाणावले. पापण्या घट्ट मिटल्या गेल्या. पापण्यांचा बांध तोडून डोळ्यातल्या पाण्यानं वाट शोधली.
काकूंच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडला.. "शरद..... "

काकू भानावर अली.
किती मोठा झालास रे.. मोठा काय... म्हातारा झालायस..
तेव्हा गेलास तो आलाच नाहीस परत.. इतक्या वर्षांनी ह्या म्हातारीची आठवण आली होय रे....
ये आत ये.. बैस.. "

पलीकडेच बसलेली ज्योती कुतूहलानं त्याच्याकडे बघत होती. ह्या व्यक्तीला कुठेतरी पाहिलं आहे आणि ह्याचा आवाज ऐकला आहे इतकंच तिला कळत होतं.
तिच्या नजरेत बघून शरदनं पिशवीतून आंबा बर्फीचा बॉक्स काढून ज्योतीला दिला आणि तिच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आनंदात तो हरवून गेला....

-समाप्त
(मनोगत वर पूर्वप्रकाशित)

Group content visibility: 
Use group defaults

आवडली कथा, मी काहीतरी मिरॅकल इमॅजीन करत होते. पण खऱ्या आयुष्यात अशी मिरॅकल नाही होत नं. खुप छान, कमी शब्दात खुप काही.