गुरुवर्य सदाशिव निंबाळकरसरांबद्दल, योगदिनाच्या निमित्ताने...

Submitted by अतुल ठाकुर on 21 June, 2020 - 03:08

nimbalkarsir.jpg

योगदिनाच्या आजच्या दिवशी काय आणि एरवी योगाचा सराव करताना काय मला जर कुणाबद्दल कृतज्ञता व्यक्त कराविशी वाटेल तर ती व्यक्ती म्हणजे माझे योगातील गुरु सदाशिव निंबाळकरसर. वर्ष जसजशी उलटत आहेत तसतसे त्यांच्या शिकवणूकीचे महत्त्व जास्त जाणवते आहे. त्यांच्याकडे शिकत असताना हिरवट वयात होतो. लाथ मारीन तेथे पाणी काढीन असा कैफ असण्याचे ते वय होते. गडकरी म्हणतात तसे मत आणि मिशा एकदमच फुटल्या होत्या. त्यावेळी सरांचे विचार नेमस्त वाटत. पण आज त्या विचारांमध्ये जे वज्र लपले होते ते दिसू लागले आहे. आज योगदिन साजरा केला जातो. असंख्य ठिकाणी योगाची दुकाने निघाली आहेत. योगामध्ये नाना तर्‍हेच्या गोष्टींची सरमिसळ करून त्याची चविष्ट आणि चटकदार भेळ बनवून ग्राहकांसमोर (होय ग्राहकच!) ठेवली जात आहे. अशावेळी निंबाळकरसरांना हे पुढचे आधी दिसले होते की काय ठावूक नाही पण त्यांनी मात्र पारंपरिक आसन प्राणायामांची कास कधिही सोडली नाही. उलट त्यांनी या पारंपरिक आसनांमधील आसने निवडून त्याचे अभ्यासक्रम केले आणि योगाभ्यासाला एक अतिशय रेखीव असे स्वरुप दिले. या अभ्यासक्रमांच्या विशिष्ट आखणीमुळे निंबाळकरसरांनी माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना कायमचे ऋणाईत करून ठेवले आहे.

त्यांच्याकडे शिकताना मी गद्धेपंचविशीत होतो. मार्शलआर्टसमधील "ब्लॅक बेल्ट" हाताशी होता. शरीर लवचिक होते. आणि त्याहीपेक्षा जास्त जीभ लवचिक होती. त्यावेळी तोंडून निघणार्‍या गोष्टी किती बिनडोक होत्या हे आज लक्षात येते. आम्हा मित्रमंडळींमध्ये चर्चा चालत. योगाबद्दल नवनवीन प्लान्स रचले जात. त्यापैकी एकही प्रत्यक्षात आला नाही. ज्यांनी काही सुरु केलं तेथिल गोष्टी पाहून भ्रमनिरास झाला. त्यानंतर पारंपरिक योगाशिवायही योगाशी संबंधित अशा काही गोष्टी शिकलो. मार्शल आर्टसमध्ये काही गोष्टींचे शिक्षण घेतले. शिकलेल्या या कलांचे महत्त्व आपल्या जागी होतेच. पण माणुस कितीही गोष्टी शिकला तरी नीट निरिक्षण केल्यावर त्याची खरी ओढ कुठे आहे हे त्याच्या लक्षात येते. अनुभवाने हे आतून लक्षात आले की आपला मूळ पिंड हा योगाच्या विद्यार्थ्याचा आहे. आणि माझी ही घडण निंबाळकरसरांनी शिकवलेल्या योगामुळे झाली आहे अशी माझी नम्र समजूत आहे. त्यांनी बोलणे, त्यांचे चालणे, त्यांचे योग शिकवणे, त्यांचे आसनांवरील भाष्य, त्यांनी आखलेले अभ्यासक्रम, या सार्‍यांचा कूठेतरी मनावर खोल आणि कायमस्वरुपी परिणाम झालेला आहे.

आजही माझा योगाचा सराव मनाजोगा होत नाही. माझ्यातल्या अपूर्णतेची मला जाणीव आहे. पण सरांनी शिकवलेल्या मार्गाने गेल्यास यश नक्की मिळेल याची खात्री देखिल आहे. योगावर असलेला हा दृढ विश्वास ही मला सरांनी दिलेली देणगी आहे. योगाचा सराव स्वतः करताना मला इतर गोष्टींची भेसळ कराविशी वाटत नाही. आणि जर योग शिकवण्याची वेळ आली तर सरांनी सुचवलेल्या मार्गापेक्षा वेगळी वाट धरावी असेही वाटत नाही. एकतत्वाभ्यासाचे सरांनी सांगितलेले महत्त्व आज पटते आणि ते त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले हे ही लक्षात येते. सर एकदा म्हणाले होते "ऐसी बात बोलीये कोई न बोले झूठ, ऐसी जगह बैठीये कोई न बोले ऊठ". हे वाक्य तर मला पातंजलीच्या योगसूत्राइतकेच महत्त्वाचे वाटते. सरांच्या स्वभावातील सौम्यपणा हा त्यांच्या योगमार्गातसुद्धा उतरला होता. त्यामुळे त्यांचा मार्ग हा मला नेमस्त असा मध्यममार्ग वाटतो जो अगदी सर्वसामान्यांना सहजपणे आचरता येईल. सरांनी आखलेला अभ्यासक्रम हा नव्वदी उलटलेल्यांनाही सहजपणे करता येईल असाच आहे. याचे कारण त्यातील सौम्यपणा आहे हे मला त्यावेळी नीट ध्यानात आले नव्हते.

सरांसमोर योगाभ्यास म्हटले की बहुधा सर्वसामान्य, तळागाळातील माणुसच असावा. त्यामुळे सरांच्या संस्थेच्या अखत्यारीत असलेले जे वर्ग मी त्यावेळी पाहिले तेथिल वातावरणही शांत आणि सौम्यच असायचे. अंगावर येणारी तथाकथित अध्यात्मिकता तेथे नसायची. सरांच्या या मध्यम मार्गामुळे माझ्यासारख्यांचा आक्रस्ताळेपणाला लगाम बसला. आणि त्याबद्दल मला आज फार कृतज्ञ वाटतं. सरांबद्दल फार काही लिहिण्याची माझी योग्यता नाही. त्यांच्या एका छोट्या विद्यार्थ्याने व्यक्त केलेली ही कृतज्ञता आहे. आज योगदिनाच्या निमित्ताने सरांच्या पायावर डोके ठेवून पुढील अभ्यासासाठी त्यांचे आशीर्वाद मागतो आणि पुन्हा सराव नियमित करण्याचा प्रयत्न करीन असा निश्चय मनाशी करतो.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन पोस्टमध्ये किमान एक आठवड्याचं अंतर ठेवायचं असा आता एक माझ्यापुरता नियम मी मायबोलीच्या बाबत केला आहे. काल परवाच "One Flew Over the Cuckoo's Nest - समाजशास्त्रीय दृष्टीकोणातून" हा लेख टाकला आणि आज लगेच हा. नियम मोडल्याबद्दल सर्वांचीच क्षमा मागाविशी वाटते. पण आज योग दिन असल्याने त्यानिमित्ताने लिहिलेले आजच टाकणे इष्ट होते. पुन्हा या बाबत सर्वांचीच क्षमा मागतो.

अतुलजी खुप छान केलेत आज गुरुजींबद्दल लिहुन. मी पण त्यांचीच विद्यार्थीनी. तुमच्या लेखात माझ्या मनातील भावना व्यक्त झाल्या सारखे वाटले. निंबाळकर गुरूजीं पुढे नेहमीच नतमस्तक---^^^--. धन्यवाद

योग म्हणजे गुरुकडून प्राणायाम वगैरे काही शिकून करतात ते आणि योगासने वेगळी आहेत का?
कारण की शाळेत असताना अम्हाला योगासने होती. ती मला सर्व येत. पण तेव्हा अनुलोम, विलोम, प्राणायाम नसे. वज्रासन, पद्मासन, भुजंगासन, मयुरासन वगैरे.

छान लिहिलंय.

त्यावेळी तोंडून निघणार्‍या गोष्टी किती बिनडोक होत्या हे आज लक्षात येते.>> १००% सहमत, आणि हे आपलंच आपल्याला समजणे म्हणजे आपण नक्की योग्य मार्गावर आहोत. I fully agree and myself feel the same.

पद्मश्री योगाचार्य श्री. सदाशिव निंबाळकर सरांना वंदन. मी योविनीचा विद्यार्थी आहे. गोरेगाव येथील केंद्रात योगाभ्यास शिकलो. आमच्या केंद्राच्या तपपूर्ती निमित्ताने निंबाळकर सर आले होते. त्यांच्यासमोर आसने सादर करण्याची संधी मिळाली होती. बद्धपद्मासन केलेले पाहुन त्यांनी दिलेली शाबासकीची थाप हा अमूल्य ठेवा आहे माझ्यासाठी.