शरीर..!

Submitted by पाचपाटील on 15 June, 2020 - 12:54

ह्याचं शरीर ह्याला पुरेपूर ओळखून आहे.
फार जुनी सोबत आहे..!

ह्याचं शरीर चालतं, बसतं, लोळतं, कधी बासरीसारखं झंकारतं..
ह्याच्या इच्छा शरीर विनातक्रार झेलत, ह्याच्यापाठोपाठ पळतं...तेव्हा हा कृतज्ञ नसतो शरीराबद्दल..
पण तेच आजारलं की मलूल होऊन पडून राहतं, तेव्हा मात्र ह्याला दगाफटका झाल्यासारखं वाटतं.

ह्याचं शरीर थरथरतं.
पिकल्या पानांबरोबर हल्लकफूल गिरक्या घेतं.
पाचोळा तुडवतानाचा आवाज ऐकत ऊर्जावान होतं.
कधी वेल्हाळ गाण्याबरोबर आपोआप डुलायला लागतं..

शरीर घारींबरोबर आकाश तोलतं.
कधी सुनसान हायवेवर, सुसाट बाईकवर, वारा कापत
भिंगरी होतं.
पावसात भिजून लगदा होतं.
रखरखत्या ऊन्हाळ्यात पाणी धरून ठेवतं..

'खालच्यांपुढं' फणा काढतं.. लाकडासारखं ताठ, रूक्ष होतं..!
'वरच्यांपुढं' आज्ञाधारक, मऊ मऊ, लवचिक होतं..!

कधी सभ्य, हसरे मुखवटे घालून सामाजिक होतं..
कधी असामाजिक होतं आणि स्वत:ला कोसत कोसत
कोषात जातं..

फार दाबून ठेवलं की शरीर इशारे देतं,
कधीमधी स्प्रिंगसारखं उसळी मारून विद्रोह करतं..

जेवतं, जुगतं, लाडावतं, अनोळखी भीतीनं पिटपिटतं, खूप खूप थकून झोपी जातं..

पण कधी कधी ह्या सगळ्यापलीकडं दैवी, मुक्त झेप घेतं..

कधी हाच विषारी झालेला असतो,
स्वत:लाच सहन होण्यापलीकडे जातो आणि म्हणतो की
तुझ्यामुळंच सगळं होतंय, तुझ्यापासून सुटका झाल्याशिवाय हे थांबणार नाही..
थांब, आता तुलाच भिरकावून देतो एखाद्या कड्यावरून..

मग शरीर मुळापासून हादरतं..

पण मग शहाणं होत सांगतं,
सोडायचं तर आहेच कधी ना कधी एकमेकांना..

पण पूर्ण ओतप्रोत भरल्यावर आपोआप, 'सहज सोडणं' घडेल तर बरं...
मग कदाचित थांबेलही सगळं 'कायमचं' तुला हवंय तसं..

पण अशी ओढाताण करून सोडवशील तर कदाचित पुन्हा सगळं पहिल्यापासून सुरू होईल...
तेव्हा तुझ्यात उतरलेली ही अवसादी राळ थोडी निवळू दे..
मग आहोतच आपण..!

आणि मी तुझ्यावर काय काय आनंद उधळून दिलेत हे मीच सांगायला हवं, असं नाही..!

मग पुन्हा ह्याला शरीराबद्दल, अगदी गाभ्यातून, जिव्हाळ्याचे झरे फुटायला लागतात..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Hmmm.. खरंच शरीर कायम सुचना देत असत.. त्या सुचना बुद्धी/मन ऐकायच्या मनस्थितीत असाव लागत.. काहीजण टोकाचा विचार करतात. तर काहीजण एक संधी शरीराला देतात..

+१. Happy