एवोकॅडो सँडविच , तिरंगी पचडी , अजिलिओ ए ओलिओ.

Submitted by अस्मिता. on 14 June, 2020 - 17:01

एवोकॅडो सँडविच , तिरंगी पचडी , अजिलिओ ए ओलिओ.

हे तिन्ही पदार्थ वेगवेगळे आहेत पण मी एकाच धाग्यात लिहिले आहेत.

एवोकॅडो सँडविच

साहित्य .. १ पिकलेले एवोकॅडो , २ हिरव्या मिरच्या, १ लिंबू, वाटीभर चिरलेली कोथिंबीर , २ लसणाच्या पाकळ्या, चमचाभर मध /साखर , थोडे मीठ, १ टमाटा, अर्धा कांदा (साधारण अर्धी वाटीभर चिरून) , मीठ चवीनुसार / अर्धा चमचा, चीज स्लाइस, बटर.

20200611_190118.jpg
*

20200611_191037.jpg
*
20200611_191031.jpg
*
20200611_191326.jpg
*

20200611_191705.jpg
*
20200611_191759.jpg
*
20200611_192556.jpg
*

कृती... एवोकॅडो साल व बी काढून मिक्सर मध्ये घाला. त्यात लिंबू पिळून, चमचाभर मध/साखर , मीठ व हिरव्या मिरच्या (फोटो मध्ये नाहीत पण टाकल्यात ) आणि लसूण घालून व्यवस्थित फिरवून एकजीव करून घ्या.
आता या स्टेपला ही रेसिपी डीपची झाली आहे. पण डीपने पोट नाही भरत म्हणून सँडविच करू Happy !
या मिश्रणात आता बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटा, कोथिंबीर घालून हलवून घ्या. मीठ कमी वाटत असेल तर तेही टाकून घ्या. हे झाले स्प्रेड तयार. आता दोन ब्रेड मध्ये लावून हवे असल्यास चीज स्लाइस वर ठेऊन बटर वर नीट भाजून घ्यावे.

माहितीचा स्रोत...भाची देवकी Happy .

********************************************************

तिरंगी पचडी

हा एक कोशिंबीरीचाच प्रकार आहे. पण मी वाफवून घेतली आहे. मूळ रेसीपीत (हमखास पाकसिद्धी) शिमला मिरची व टोमॅटो होते पण मी नाही घातले. शिवाय कांदा घातला जो नाही घातला तरी चालते.

साहित्य... मोठे मोठे किसलेले गाजर, रेड cabbage मला जांभळा वाटतो हा, थोडा चिरलेला कांदा , मीठ , मिरपूड , थोडे तूप , फोडणी पुरते जिरे, लिंबाचा रस, किंचित साखर.

माझ्याकडे तयार पाकिटे होती म्हणून फार झटपट झाले.

20200611_122914.jpg

कृती...थोड्या तूपावर जिरे घालून कोबी व गाजर कीस वाफवून घ्या. अजिबात जास्त शिजू द्यायचा नाही. मीठ व थोडी साखर आणि चमचाभर मिरपूड घालून वाफवून घ्या.
माझा फार निबर होता, कोवळा असेल तर ही स्टेप गाळली तरी चालेल. नंतर बोल मध्ये घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून लिंबू पिळून गरम गरम खायला घ्या. सकाळी केलेले संध्याकाळी चांगले लागत नाही. पुन्हा गरम करू नये. लिंबू भरपूर चांगले लागते.. भाजी ऐवजी चांगले लागते.

20200611_122805.jpg

माहितीचा स्रोत हमखास पाकसिद्धी , चूकुन तीन तीन order केले गेलेले कोलस्ला/coleslaw पाकीटे संपवण्यासाठी केलेली धडपड .

*******************************************************

अजिलिओ ए ओलिओ
साहित्य.. स्पघेटी पास्ता अर्धा पुडा, दोन टेबलस्पून लसणाचे बारीक तुकडे, एक टेबलस्पून चीली फ्लेक्स, तीन टेबलस्पून ओलीव्ह ओईल (no substitute for olive oil please), थोडे किसलेले मोझ्झोरेला किंवा पार्मेजान चीज, थोडी कोथिंबीर, मीठ चवीनुसार.

कृती...पास्ता पाकीटावरील सुचनेनुसार अल डान्टे उकडून घ्या. स्पघेटीच हवा. पेन्ने, बो टाय प्रयोग करू शकता. मी नाही कधी केले.
एका कढईत थोडी गरम झाल्यावर olive oil टाका. नंतर लसूण परतून (सतत हलवणे व आच मिडीयम लो ठेवणे ) घ्या . अर्धवट परतला की चिली फ्लेक्स घालून हलवत रहा. तेलाचा रंग किंचित बदलेल. साधारण लसूण कुरकुरीत झाला की उकडून ठेवलेला पास्ता मधील मोठी अर्धी वाटी पाणी/स्टार्च बाजूला ठेवून बाकीचा पास्ता गाळून घेऊन या तेलावर टाका. अगदी दोन मिनिटे यावर तेल उलटसुलट toss करून सगळीकडे हे तेल व्यवस्थित लागले पाहिजे हे बघा. कोथिंबीर टाका. एक दोन मिनिटात आच बंद करा. ताटात वाढून वरून थोडे चीज भुरभुरावे. खायला तयार.
( मी चुकून चांSगले परतले त्यामुळे रंग गडद आला पण चव छानच लागली.)

20200614_124742.jpg
*

20200614_125812.jpg
*
20200614_130524.jpg
*
20200614_131021.jpg
*
20200614_131323.jpg
*
20200614_131430.jpg

*
माहितीचा स्रोत भाची देवकी. रणवीर ब्रारचा विडीओ सुद्धा आहे ...हा pop झाला होता ती बरीला (Barilla) spaghetti ची दीर्घ जाहिरात होती. हा नंतर दिसला.
यात इतके कमी इनग्रेडियंट आहेत की बदल न करताच छान लागेल. पण केला तर मला सांगा व फोटो जोडा. Happy धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेव्हा आपण स्पघेटी toss करू तेव्हा हे बाजूला ठेवलेले (लागेल तसे हळूहळू) स्टार्च चे पाणी टाका.

हे सांगायचे विसरले आता संपादन करता येत नाहीये.

मस्त दिसतंय सगळंच.
पण पास्त्यात बेसील न घालता कोथिंबीर घालायची हे पटलं नाही अजिबातच.

मूळ रेसीपीत नाहीये हो बेझील (देवकीच्या) , त्यात पार्सली आहे आणि आम्हाला घरी आहे त्या सामानात करायचे होते.
पण तुम्ही तसेही करू शकता ..धन्यवाद सायो Happy .
धन्यवाद मामी.

छान रंगीत दिसतायत सर्व रेसिपी
मला अव्होकाडो एकदा वापरून बघायचंय डीप किंवा आणि कश्याला.
पण एकंदर पाककला उत्साह आणि भारतातले अव्होकाडो रेट बघून 'फिर कभी' होतं
ही सँडविच रेसीपी छान आहे.
हे काहीतरी ए काहीतरी डिश च्या नावाचा अर्थ काय आहे?स्पॅनिश नाव आहे का?मला एकदम गुलाम इ आझम वगैरे आठवले.

पहिली आणि दुसरी रेसिपी आवडली आणि नेहमी बनवली जाते.

अँव्हकॅडोच्या स्प्रेडला ग्वाकामोले म्हणतात, टेस्टी असतंच पण अतिशय न्यूट्रिशिअस फळ आहे. मला स्मूदी खाण्यापेक्षा ग्वाकामोले जास्त आवडतं. पोळीवर स्प्रेड करून रोल केला की मस्त सोपं आणि हेल्दी जेवण होतं.
'ग्रीन टोकरी' (भारतात की फक्त पुण्यातला ब्रँड ?) च्या ग्वाकामोलेचं खूप कौतुक ऐकलं आहे पण घरी आपण स्वस्तात आणि हवं तसं बनवू शकतो. प्रवासात न्यायला ग्रीन टोकरीची बॉटल बरी पडत असेल.

भारतातले अव्होकाडो रेट बघून 'फिर कभी' होतं >>>> अनु, एवढं काही महाग नाही मी आठवड्याला दोन आणते. एक दिवस एका फळाची दोन कप स्मूदी आणि एक दिवस दुसऱ्या फळाचं ग्वाकामोले दोन जणांना पुरतं. मी फळं,ड्रायफ्रुटस आणि exotic भाज्यावर होणाऱ्या खर्चावरून कटकट केली होती पण नवऱ्याने एका वाक्यात सांगितलेलं पटलं की ' आता महिन्याला 2-3 हजार या गोष्टींवर घालायचे, की पन्नाशी नन्तर दर सहा महिन्यांनी हॉस्पिटलसाठी 2-3 लाख घालवायचे हे तू ठरव'.
मला समजत की प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात, पण मी घरातल्या आणि नातेवाईक वृद्धांसाठी इतकी हॉस्पिटल्स पाहिली आहेत की मला ते टाळण्यासाठी आता हेल्थ इन्व्हेस्टमेंट करायला आवडेल

अगदीच राहावलं नाही म्हणून लिहिते आहारातून हेल्थ मिळते यासाठी अव्हाकाडो खायचा असेल तर खा पण मग एक "शंभर मैल डाएट" म्हणून एक कनेस्प्ट आहे ती पण पहा. अर्थात मी इथे सजेस्ट केलं म्हणजे मी तो प्रकार फॉलो वगैरे करते असा माझा अजिबातच दावा नाही आहे. Lol

Light 1 एक मोठा दिवा देते. हवा त्यांनी घ्या (किंवा शेयर करा Wink )

अनु, आहारासाठी आपल्या भागात जे पिकतं ते खावं हा पण एक कनेस्प्ट आहे. पण तुला अव्हाकाडो कसा असतो यासाठी खायचा असेल तर त्यासाठी तू एखादवेळेस नक्कीच ट्राय करू शकशील आणि नसेल तर जिथे पिकतं तिथे जाशील तेव्हा ट्राय कर हाकानाका. मला नक्की माहित नाही पण गोवा/कर्नाटक बाजूला अव्हाकाडो होतात असं एकदा एक रेस्तॉ.वाला म्हणाला होता. तू चेक कर. शुभेच्छा.

वेका, 100 Miles वाचलं नाही पण चाळलं होतं. Concept कळली आहे आणि मायकेल पॉलनच do not eat the food which your great grandmother will not recognise as food हे वाक्य पण खूप वेळा चर्चेत आलं आहे. खरं तर वाद घातले आहेत.
पण मग हा नियम पाळताना आपण लक्षात घेतलं आहे का की आजीच्या काळात 100 मैल अन्नपदार्थ पोचवायला वेळ किती लागायचा? वाहतूक सुविधा होत्या का? कोल्ड स्टोरेज नसायचंच. त्यामुळे स्वाभाविकच कोकणातील आजीला विदर्भातील आणि कोल्हापूरच्या आजीला कोकणातील पदार्थ माहीत नसणार. मग ते पुढच्या पिढीने खायचे नाहीत का? माझ्या आजीच्या मश्रुम (तिच्या भाषेत आळंबीने) नागपूरच्या मामी आजीला धक्का बसला होता. ती त्याला कुत्र्याची छत्री म्हणायची तर कोकणातली आजी पावसाळ्यात एक छोटी भिंत (की कट्टा) सारवून तिथे आळंबी उगवायची. आणि पावसाळ्यात एकदा ती सगळ्यांनी खायचीच असा तिचा नियम होता म्हणे.
चीज आणि ग्वाकामोले तर अशक्यच. पण जर आता विमान वाहतुक उपलब्ध असेल आणि पदार्थ ताजा हातात पडत असेल तर त्याचा आहारात समावेश का करू नये? होईल की शरीराला नवीन भाज्या आणि फळांची सवय. आणि हो मग माझ्या नातवंडाना मेक्सिकन आणि जॅपनीज पदार्थ खाता येतील कारण त्यांच्या आजीला ते माहीत होते आणि ती ते खातही होती Wink

मीरा.., मला वाटतं की त्या त्या प्रदेशात पिकणाऱ्या फळे आणि भाज्या सोडून इतर काही कधीच खाऊ नये असं नाही पण विदेशी फळे आणि भाज्या उगवण्यासाठी आणि ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारा कार्बन फूटप्रिंट खूप जास्त असतो. कधी तरी मिळणारी भाजी वेगळी आणि सातत्याने खाल्ले जाणारे पदार्थ वेगळे. आपला आहार जर शक्य तितका प्रादेशिक आणि ऋतूमानानुसार असेल तर ते आरोग्याला आणि पर्यावरणाला चांगलं असतं.
The pollution you create by the transport of these exotic veggies may ultimately offset the health benefits of their consumption!

बघतेच एकदा.
ग्रीन टोकरी पुण्यातला ब्रँड आहे.आयटीबी(सध्या टीएटो) च्या आधीच्या जर्मन मालकाने स्वतःला खायला फ्रेश सलाड पाहिजेत म्हणून चालू केलेला प्रकल्प.आता वेगळी माणसे बघतात.त्यांच्या फार्म टूर असतात रविवारी.
बाकी रिजनल, नॉन रिजनल, परदेशी, स्वदेशी सगळे जे आवडेल ते खाते.
ते एक नारिंगी मोठ्या टोमॅटो सारखं दिसणारं पर्सेमोन(असंच काही नाव आहे) फळ खूप आवडतं.ते पुण्यात चांगलं मिळालं तर खाते.
देशी फळं कैरी पेरू केळी इत्यादी चा रतीब चालू असतोच.

तिन्ही पाकृ मस्त!
कोकणात गावाला आमच्याकडे अव्होकाडोचं झाड लावलं होतं. (आजी अवकड म्हणायची ) बाबांना कुणीतरी दिलं होतं. पण त्याला कधी फळं आलीच नाहीत Lol त्यात काही मेल-फीमेल असतं की काय ?

वावे, येतं की कोकणात अवकडो. लोणी फळ असं माझी आजी म्हणायची.
भारतीय ओरीजीनचे असते की बाजारात. कलमाचे लावावे. आणि भरपूर आम्ल असलेल्या जमिनीत धरतात. मेल-फेमेल असतं एकाच झाडावर , गावठी भाषेत प्रेम असलं की फळ धरतं.
आपल्याला, परागीभवन करावे लागते जर आपोआप नाहीन्झाले तर.. खुप मूडी पिक आहे.

अच्छा झंपी, आमच्या झाडाचं प्रेम कमी पडलं असेल Wink
मीरा, तुझ्या आजीचं वाचून सुनीताबाईंची धामापूरची आजी आठवली Happy

ते आलिओ ए ओलिओ आहे. जी सायलेंट. मी बनवते नेहमी. आणि बरोबर लेमन बटर सॉस छान लागतो. व झोराबिअन ची पेपर सॉसेजेस घालायची परतून. पुण्यातील प्रभात रो ड वर ल प्लसीर म्हणून रेस्टॉरेंट आहे तिथे ही स्पागेती आलिओ ए ओलिओ मस्त मिळते.

नवीन Submitted by जिज्ञासा on 15 June, 2020 - 11:58. >>>. आभारी आहे. हे कारण जास्त लॉजिकल वाटलं आणि पटलं आहे. Exotic भाज्या हल्ली सगळीकडेच पिकतात. पण विशिष्ट फळं घेताना हात आखडता घेईन.

ग्रीन टोकरी पुण्यातला ब्रँड आहे. >>> अनु, माझी सोसायटी लहान आहे पण बिझिनेस मात्र दणदणीत आहे, त्यामुळे ग्रीन टोकरीची गाडी सोसायटीमध्ये येते. हवा असेल तर या नंबरवर विचारून बघ, आणून देताहेत का. 9021154388. ग्वाकामोले शिवाय mixed salad bag पण try कर असं सुचवेन.

मीरा, तुझ्या आजीचं वाचून सुनीताबाईंची धामापूरची आजी आठवली Happy >>>> का बरं? मला संदर्भ माहीत नाही.

मीरा, 'आहे मनोहर तरी' या पुस्तकात सुनीता देशपांडे यांनी त्यांच्या धामापूरच्या आजीबद्दल खूप जिव्हाळ्याने लिहिलं आहे. तिच्या अनेक खास गोष्टींंपैकी एक म्हणजे तीही अशीच एक छोटी भिंत पावसाळ्यात शेणाने सारवून त्यावर अळंब्या उगवायची. छोट्या छोट्या अळंब्या उगवलेली ती भिंत फार सुंदर दिसायची. सुनीतीबाईंनी याही पुढे जाऊन असं लिहिलं आहे की खानोलकर ( कवी आरती प्रभू ) कोकणातलेच जवळपासचे. त्यांच्या नजरेला ती सुंदर छत्र्या ल्यायलेली भिंत पडली असती तर ती कदाचित मराठी साहित्यात (कवितेच्या रूपाने) अमर झाली असती.

अस्मिता, सॉरी तुमच्या पाककृतीच्या धाग्यावर हे अगदीच अवांतर लिहीत आहे. पण आहे मनोहर तरी सोडून दुसऱ्या कुठेच मी असं भिंतीवर अळंब्या उगवण्याचं वर्णन वाचलं नव्हतं त्यामुळे राहवलं नाही.

आमच्या इथे पण येते ग्रीन टोकरी डिलिव्हरी. शिवाय स्टार मार्केट, औंध चे डेली निड्स (dav समोर) तिथे भरपूर ग्रीन टोकरी प्रॉडक्ट मिळतात.)आता लॉक डाऊन मध्ये त्यांचे यावेळी चे मेल आलेय त्यात वादळामुळे काही क्रॉप चे नुकसान झाल्याचे लिहिलंय.
नंतर घेऊ.

धन्यवाद अनु,
नाव इटालियन आहे.
धन्यवाद मीरा , मीही स्मुदी करते क्वचित.
धन्यवाद वेका.
धन्यवाद जिज्ञासा. आमच्या साठी हे लोकल आहे बहुतेक. दोन आठवड्यातून एकदा आणतो बदल म्हणून .
धन्यवाद वावे.
धन्यवाद जाई.
धन्यवाद झंपी. अगदी सार्थ नाव आहे लोणी फळ. गर अगदी स्निग्ध असतो.
धन्यवाद अमा. नावाबद्दल मलाही शंका होतीच. दरवेळेस म्हणताना गडबड होते.
Black cat sorry!
धन्यवाद अंजूताई.
धन्यवाद धनुडी.
वावे..आहे मनोहर तरी मागच्या भारत भेटीत मिळाले नाही होते यादीत. Happy
अनु..स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर नक्कीच करून बघ.

वावे, मी 'आहे मनोहर तरी' अनेको वर्षांपूर्वी (कदाचित 20+) वाचलं आहे. हा अळंबी उगवण्याचा संदर्भ आठवत नाही किंवा तेव्हा लहान असताना दुर्लक्षला असेल. हे पुस्तक परत वाचायचं हे कित्येक वर्षे ठरवते आहे, पण राहून जात होतं. आता मात्र उत्सुकता वाढली आहे, लवकर वाचेन. माझ्या बाबाला मश्रुम आवडत नाहीत, एकदा पिझ्झावरचे मश्रुम काढून टाकताना बाबाने सांगितलेली ही आजीची गोष्ट आहे. (मी आजी पहिली नाही Sad )

मस्त रेसिपी!

लोणी फळ असं माझी आजी म्हणायची. >> इंटरेस्तिंग! चिपळूणला मी कधी खाल्लं नाही. बेंगलोरला ह्याला इंग्रजीत 'बटर फ्रुट' आणि कन्नडात 'बेण्णे हण्णू' (=लोणी फळ) म्हणतात. तिथे अनेक ठिकाणी बटर फ्रुट मिल्कशेक मिळतो. मला खूप आवडतो. ज्यांनी आधी हे फळ, फळ म्हणून न खाता सालसा वगैरे प्रकारात खाल्लं आहे, त्यांना मिल्कशेक ही संकल्पना आवडत नाही. ज्यांनी हे कधीच खाल्लं नाही, त्यांना आधी त्याची (नुसत्या गराची) चव आवडत नाही, कारण त्यात गोडवा नसतो. पण जे सुरुवातीलाच बटर फ्रुट मिल्कशेक पितात त्यांना तो आवडतो असं माझं निरीक्षण आहे. एकच प्रॉब्लेम म्हणजे त्यात खूप साखर लागते. मी घरी करतो. बाकी सालसा तर उत्तमच. शिवाय ब्रेडला नुसतं अ‍ॅव्होकॅडो स्प्रेड करून त्यावर मीठ आणि मिरपूड टाकून खाल्लं तरी मला आवडतं.

मला सुनीताबाईंच्या पुस्तकातील धामापुर आठवतंय पण अळंबी आठवत नाहीये.

मला मश्रुम्स आवडत नाहीत, लहानपणी बाहेर इथे तिथे भिंतीवर आपोआप उगवायचे पावसाळ्यात, त्याला आम्ही कुत्र्याच्या छत्र्या म्हणायचो, त्यामुळे तेच नांव डोक्यात आणि मला चव पण नाही आवडत.

बेंगलोरला ह्याला इंग्रजीत 'बटर फ्रुट' आणि कन्नडात 'बेण्णे हण्णू' (=लोणी फळ) म्हणतात. तिथे अनेक ठिकाणी बटर फ्रुट मिल्कशेक मिळतो. मला खूप आवडतो. ज्यांनी आधी हे फळ, फळ म्हणून न खाता सालसा वगैरे प्रकारात खाल्लं आहे, त्यांना मिल्कशेक ही संकल्पना आवडत नाही >>>>
धन्यवाद हरचंद पालव. नवीन माहिती कळली. हे फळ खूप स्निग्ध आहे त्यामुळे नाव समर्पक . मला मिल्कशेक सुद्धा आवडतो.
अन्जूताई , मलाही मशरूम अजिबात आवडत नाही. एकदा दोनदा खाल्ले पण त्याला अंगची चव नाही असे वाटले शिवाय पोत / टेक्स्शर पण आवडले नाही. कुत्र्याची छत्री बाबत मम. अन्नच वाटत नाही हे !

अ‍ॅव्होकॅडो मिल्कशेक मी असा करते.
२ ग्लास मिल्कशेक साठी
साहित्य: १ पिकलेले अ‍ॅव्होकॅडो , ४ चहाचे चमचे साखर किंवा मध , चिमूटभर वेलची पावडर , २ कप दूध .
कृती: अ‍ॅव्होकॅडोचा गर/ बी काढून वरील सर्व साहित्यासोबत मिक्सर मधून फिरवून घेणे.

*********
सध्या आहेत पण कच्चे आहेत. बाहेर ठेवलेत पिकायला पिकले की करून फोटो टाकते.
*********
१ ग्लास हवे असेल तर अर्धा वापरून अर्धा दुसरीकडे वापरावा. गर लिंबू पिळून ठेवला तर थोडा वेळ चांगला राहतो नाही तर काळा पडतो. पण लिंबू पिळलेला मिल्कशेक साठी वापरता येत नाही. मिल्कशेक लगेचच प्यावा. रंग सुरेख पिस्त्यासारखा येतो.
धन्यवाद सर्व प्रतिक्रियांंबद्दल.

मी अँव्हकॅडो स्मूदी / मिल्कशेक करताना त्यात अँपल सुद्धा टाकते कारण अँव्हकॅडो नुसतं बऱ्यापैकी गुंईगुंई असतं. अँपलने टेक्स्चर बदलतं आणि मध कमी लागतं. शिवाय अँव्हकॅडो हाय कॅलरी फळ असल्यामुळे ते एक अख्ख पोटात जाण्यापेक्षा अर्ध अँपल आणि अर्ध अँव्हकॅडो असं मिळून पोटभर ब्रेकफास्ट होतो.

Pages