झाशीची राणी आणि शाबासकी

Submitted by मोहना on 23 October, 2019 - 07:32

"या आपल्या झाशीच्या राणी." जाधवसरांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या म्हणून सगळ्या वर्गानेही वाजवल्या. गुरु सांगतील ती पूर्वदिशा त्यामुळे टाळ्या का वाजवतोय ते कळलं नाही तरी आम्ही टाळ्या वाजवत राहिलो. सरांनी खूण करून मला बोलावलं. अतीव आनंदाने मी उभी राहिले. बाकड्यामधून बाहेर आले. बाकड्यांच्या मधल्या अरुंद गल्लीतून वाट काढत किल्ला लढवल्याच्याच आवेशात सरांजवळ पोचले. मागचा फळा म्हणजे किल्ला असल्याचा भास मला होत होता. त्यापुढे उभं राहून ’मेरी झॉंसी नही दूंगी’ अशी घोषणा केली की आठवत नाही कारण पुढच्या क्षणाला झाशीची राणी ढळाढळा अश्रुपात करत, बाकड्यांमधून सैरावैरा धावत, खालीमान घालून लाकडी आसनात शिरली. जाधवसरांनी गुरुजीपणाचा किल्ला असा काही लढवला की झाशीच्या राणीचं पानिपत झालं. सरांनी आपला वाक्बाण सोडला.
"या आपल्या झाशीच्या राणी. चाचणी परीक्षेला ४ ते ७ धड्यांचा अभ्यास करायचा होता पण यांना ९ व्या धड्यातली झाशीची राणी आवडली आठवली आणि ती उत्तरपत्रिकेत आली. शाबास! त्यांच्या या अतुलनीय पराक्रमासाठी मी भोपळा देऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे." मुलांनी पुन्हा जोरदार टाळ्या वाजवल्या. या वेळेस प्रत्येकाला आपण टाळी का वाजवतोय ते ठाऊक होतं. आणि प्रत्येकजण तो आनंद लुटत होतं. मी सोडून. अचानक हाती आलेल्या भोपळ्याचं आणि झाशीची राणी या पदवीचं काय करावं ते कळेना.

पूर्वीपासून माझं एक होतं. उत्तर चुकीचं लिहिलं तरी चालेल, जागा मोकळी सोडायची नाही. शिकवणच तशी होती. काही म्हणता काही फुकट घालवायचं नाही. जन्मापासून हेच ऐकत आल्यावर काय बिशाद काही फुकट घालवण्याची, त्यामुळे उत्तराची जागा फुकट घालवणं अशक्यप्राय. प्रश्नपत्रिकेतपण असायचंच ना, ’मोकळ्या जागा भरा.’ विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं. नुकतीच ओळख झालेली झाशीची राणी अंगात भिनलेली. ती मला इतकी भावली होती हे सरांना समजावं इतक्या निरपेक्ष हेतूने मी तिच्याबद्दल लिहून ’मोकळी जागा’ भरली. विद्यार्थी परीक्षेला नसलेले धडेही आधीच वाचतात, नुसते वाचून थांबत नाहीत, काय वाचलंय ते लक्षात ठेवतात, मोकळ्या जागा त्याने भरून टाकतात या सगळ्याचं खरंतर सरांनी कौतुक करायला हवं होतं की नाही?

त्यादिवसापासून मी अख्ख्या शाळेची ’झाशीची राणी’ झाले. कुणीही, कधीही मला त्या नावाने हाक मारायचं. झाशीच्या राणीसारखाच पराक्रम खर्‍याअर्थी गाजवणं आता भाग होतं. कार्यक्षेत्र वेगळी असली म्हणून काय झालं.
"जाधवसरांना इतिहासात १०० पैकी १०० गुण मिळवून दाखवले तरच नावाची झाशीची राणी." अशी घोषणा आधी मी मनातल्यामनात केली. गुण मिळवण्यासाठी अभ्यास करावा लागतो हा मोठा अडथळा त्यात होता. पण आता गत्यंतर नव्हतं. येताजाता कुणी ’झाशीची राणी’ म्हणून चिडवलं की झेंडा हातात धरल्यासारखं उभं राहून घोषणा द्यायला लागले. शाळेतली ती घोषणा लहानश्या गावात लवकरच पसरली, घरीही पोचली. आईने एकदा आठवण करून दिली.
"झाशीच्या राणी अभ्यासाला बसून इतिहास कधी घडवणार?" मी परीक्षा लढवायला घेतली. परीक्षा लढवायचीच तर अंतिम ध्येय वार्षिक परीक्षा हे नक्की केलं. येता - जाता इतिहास उगाळला आणि अखेर परीक्षा ’सर’ केली. इतिहास या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले.

"या आपल्या झाशीच्या राणी." जाधवसरांनी पुन्हा एकदा जोरजोरात टाळ्या वाजवल्या म्हणून सगळ्या वर्गानेही वाजवल्या. या वेळेस प्रत्येकाला टाळ्या वाजवण्याचं कारण ठाऊक होतं. फलकावण्याची आवश्यकता नव्हती. सरांच्या जवळ जाऊन उभी राहिले.वसरांनी कौतुकाने पाठीवर शाबासकीची थाप मारली. ही थाप आज इतक्या वर्षानंतरही मला जशीच्यातशी आठवते आणि त्याची आठवण करून द्यायला कुणी ना कुणी असतंच. म्हणजे होतं असं, दर काहीवर्षांनी मला कुणीतरी भेटतं ते हमखास विचारतं,
"तू जाधवसरांची विद्यार्थिनी होतीस ना?" माझी त्या व्यक्तीशी ओळखही नसते पण मला ताबडतोब कळतं.
"हो. मी त्यांची झाशीची राणी." मी हसून सांगते.
"तुझ्या जिद्दीचं फार कौतुक करतात सर." बोलणार्‍याच्या स्वरातूनच मला कळतं की सरांना माझं किती कौतुक होतं. फक्त जाधवसरांनाच नाही सगळ्याच सरांना. या प्रसंगानंतर दोन वर्षांनी माझ्या दुसर्‍या शिक्षकांनी वर्गात शिरायच्या आधीच खिंडीत गाठल्यासारखं दारात अडवलं होतं.
"तुझ्याबद्दल मी पैज मारली आहे."
"ओ?" एवढाच उद्गगार निघाला माझ्या तोंडून.
"हे बघ, ११ वीत तास चुकवायचे, बंडखोरपणा करायचा, शिक्षकांविरुद्ध भाषणं ठोकायची हे सगळं समजू शकतो मी. शिक्षकांना तू हुशार आहेस हे ठाऊक आहे पण अभ्यासात लक्ष घातलं तर. १२ वीत काय दिवे लावणार असा प्रश्न पडलाय त्यांना. तू काही घोषणा करायच्याआधी मीच करून टाकली आहे. तेव्हा लागा अभ्यासाला आणि मिळवा गुण चांगले. तुझ्यामुळे मी पैज हरलो तर फार वाईट वाटेल मला." सरांनी दरवाजा अडवल्यामुळे मी त्यांच्या बाजूने अंग वाकडंतिकडं करत वर्गात जाऊन बसले. सगळ्या शिक्षकांनी ’कट’ केला आहे हे दिसतच होतं. पुन्हा एकदा परीक्षा ’सर’ करणं आलं हे दिसतंच होतं. वैतागत सरांनी पैज हरायला नको म्हणून पुन्हा अभ्यासाला लागले.

दुसरी शाबासकी मिळवायची होती पण पहिल्या शाबासकीने ’इतिहास’ घडवला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

.

भारीच !
अशी जिद्द हवी आणि असे गुरुजीही Happy

पूर्वी असे अपमान किती सहज करायचे नाही शिक्षक? आपल्याला पण काही वाटायचं नाही. तुम्ही त्यामुळे हतोत्साहित झाला नाही म्हणून बरं! बाकी चुकीच्या धड्यांचा अभ्यास केला म्हणून शून्य मार्क हे काही पटलं नाही! ज्या व्यक्तीला पुढच्या परीक्षेत पैकीच्या पैकी मिळतात.

राजसी, तो ’भोपळा’ एकूणच बेकार सोडवलेल्या उत्तरपत्रिकेला होता. चाचणी परीक्षा होती आणि दु:खात सुख इतकंच की सगळ्यांचेच तीन तेरा वाजले होते. आता विचार केला की वाटतं एखादा नाउमेद होणारा विद्यार्थी असता तर निराश होऊन शाळाच सोडून देता. असे प्रकार होतात तेव्हा दोन टोकाचे परिणाम होऊ शकतात. अर्थात हे त्यावेळेला नव्हतं लक्षात आलं. सुदैवाने माझं ’भलं’ झालं पण तेच ’उलटं’ झालं असतं तर असा विचार येतोच.

राजसी, तो ’भोपळा’ एकूणच बेकार सोडवलेल्या उत्तरपत्रिकेला होता. चाचणी परीक्षा होती आणि दु:खात सुख इतकंच की सगळ्यांचेच तीन तेरा वाजले होते. आता विचार केला की वाटतं एखादा नाउमेद होणारा विद्यार्थी असता तर निराश होऊन शाळाच सोडून देता. असे प्रकार होतात तेव्हा दोन टोकाचे परिणाम होऊ शकतात. अर्थात हे त्यावेळेला नव्हतं लक्षात आलं. सुदैवाने माझं ’भलं’ झालं पण तेच ’उलटं’ झालं असतं तर असा विचार येतोच.

हे दोन दोनदा का जातंय? delete पण करता येत नाही.

काय पण सर आहेत... लहान मुलांमध्ये न्यूनगंड येऊ शकतो असले शिक्षक असतील तर...

रच्याकने हे भयानक आहे - सरांनी दरवाजा अडवल्यामुळे मी त्यांच्या बाजूने अंग वाकडंतिकडं करत वर्गात जाऊन बसले.

छान लिहिलंय...

सर्वांसमोर अपमान करणारे गुरुजन होते तसेच शाबासकी देणारेही तेच होते हे वाचून अशा गुरूंबद्दल आदर वाटला.

बाकी आताच्या व तेव्हाच्या जगात किती भयंकर फरक आहे हे जाणवून खिन्न वाटले. तेव्हाचे गुरुजी पाठीवर शाबासकी देत, दरवाजा अडवून उभे राहताना 12वीतील तरुणीचा दरवाजा आपण अडवलाय हे भान नसून आपल्या विद्यार्थिनीचा दरवाजा अडवलाय इतकेच डोक्यात असे. आजच्या पिढीला मात्र हे भयानक वाटतेय.... कोणी इथे गुरुजींचा निषेध करणारे निघाले नाही म्हणजे मिळवले.. Happy Happy

आजच्या काळात शिक्षकांनी जरा कुठे वेडेवाकडे बोलले तर मुलांचे आईवडिलच झाशीचे राणीराजा होऊन मुख्यध्यापकांच्या केबिनची खिंड अडवतात. खरेतर पूर्वी मुले सहनशील होती. आताची अजिबात ऐकून घेत नाहीत.चूक असो किंवा नसो! याऊलट काही ईतकी हळवी असतात की, शिक्षकांनाच भीती वाटते आता हा/ही काय करतो म्हणून. आजच्या काळात मुलांना रागावतानाही खूप विचार करावा लागतो शिक्षकांना.