देवबाग - संगम

Submitted by तुषार विष्णू खांबल on 2 June, 2020 - 07:47

देवबाग- संगम

कोंकण म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती हिरवीगार झाडी, आंब्यांच्या बागा, फणस-नारळ इत्यादी झाडे, लांब लांब नद्या आणि जवळच पसरलेला अथांग अरबी समुद्र... चाकरमानी किंवा कोंकण फिरून आलेल्या कोणाला विचारलं की कोंकणात बघण्यासारखे काय आहे तर ठरविक उत्तरे मिळतील. जसे कुणकेश्वर मंदिर, आंगणेवाडी, तारकर्ली बीच, गणपतीपुळे इत्यादी...
याच कोंकणात अशी किती तरी अनेक ठिकाणे आहेत ज्यांचा इतिहास खूप जुना आणि रंजक आहे (जसे मी ‘श्री देव रामेश्वर-आचरा मालवण याबद्दल सांगितलं). परंतु माहिती अभावी हि स्थळे दुर्लक्षित राहिली आहेत. याच पंक्तीत एक नाव आवर्जून सांगावस वाटते ते म्हणजे मालवण तालुक्यातील देवबाग या गावाचे. आपल्या नावाला खऱ्या अर्थाने सार्थ ठरविणारे हे गाव; जणू देवानेच तयार केलेली बाग वाटावे इतके सुंदर.
मालवण एस.टी. डेपोमधून तारकर्ली-देवबागसाठी विशेष गाड्या सोडण्यात आलेल्या आहे. या गाडीतून सर्वात शेवटच्या स्टॉपवर म्हणजेच देवबागला उतरायचे. काही अंतर चालून गेल्यावर आपल्याला पाहायला मिळतो तो एक नैसर्गिक चमत्कार म्हणजेच देवबाग-संगम. भारतात खूप कमी ठिकाणी पाहायला मिळत असेल असे नयनरम्य दृश्य...
देवबाग स्टॉपवर उतरून पुढे चालत जाताना रंगबेरंगी बोटी लागलेल्या दिसतात. थोडं पुढे गेलात की आपण एखाद्या बेटावर पोहचलो आहोत असे वाटते. समोर भला मोठ्ठा डोंगर, त्यावर नारळी पोफळीची झाडे, हिरव्या वनराईत डोकावणारी टेन्ट-हाऊस. डाव्या हाताला शांतपणे वाहणारी कारली नदी, आणि उजव्या बाजूला अथांग पसरलेला उसळत्या लाटांचा निळाशार अरबी समुद्र आणि साक्षात आपल्या डोळ्यांसमोर घडणारा त्यांचा अनोखा संगम. सफेद मऊमऊ वाळूवरून चालताना छोटे छोटे खेकडे देखील दृष्टीस पडतात.
तारकर्ली प्रमाणेच या ठिकाणी देखील आपल्याला स्कुबा डायविंग, डॉल्फिन दर्शन, रॉक गार्डन, गोल्डन रॉक, त्सुनामी आयलंड, भोगवे बीच, निवती बीच या गोष्टीचा आनंद घेता येऊ शकतो. स्थानिक गावकऱ्यांनी छोटे छोटे हॉटेल्स उघडून पर्यटकांची राहण्याची आणि खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केली आहे. ‘अतिथी देवो भव:’ हि कोकणाची परंपरा आजही गावकऱ्यांनी जपून ठेवली आहे.
आता पुढल्या सुट्टीत मालवण फिरायचा बेत केलात तर या संगमला नक्की भेट देऊन या.
विशेष सूचना: आपल्या कुठल्याही गैरवर्तणुकीमुळे तिथले वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. (सदर सूचना दारू पिऊन बॉटल कुठेही टाकणार्यांसाठी आहे)

तुषार खांबल

Group content visibility: 
Use group defaults