नदीची नजाकत - ३

Submitted by भाऊ नमसकर on 15 May, 2011 - 12:31

मार्क ट्वेन हा प्रसिद्ध अमेरिकन लेखक त्याच्या कोवळ्या वयात मिसिसीपी नदीवर प्रवासी वाहतुक करणार्‍या बोटीचा पायलट होण्यासाठी तशाच एका बोटीवर उमेदवारी करत होता. तिथल्या अनुभवांवर आधारित "लाईफ ऑन मिसिसीपी" हे त्याचं गाजलेलं पुस्तक. त्यांत मिसिसीपीच्या पात्रात सतत होणारे बदल व रात्रीं सावल्या व प्रतिबिंब यांचा नदीत चालणारा खतरनाक, चकवा देणारा खेळ याचं अचूक वर्णन त्याने केलंय. महानद्यांत अग्रेसर असलेल्या मिसिसीपीची तुलना परकर्‍या पोरींसारख्या अवखळ, उनाड असलेल्या कोकणातील नद्यांशी करायला मी - कोकणवेडा असलो तरीही - कोकणातला वेडा नक्कीच नाही ! पण नदी कितीही मोठी वा लहान असो, जगातल्या कुठल्याही खंडातली असो, मिसिसीपीत आढळतात तशा कांही उपजत खोडी त्या नदीतही दिसणं अपेक्षित असतंच. कोकणातल्या नद्याही त्याला अपवाद नाहीत.

हरेक पावसाळ्यानंतर नदीच्या एका कांठावरची माडांची एखादी रांगच गायब झालेली असणं व समोरच्या कांठाला गाळाच्या सुपिक जमीनीचे दोन-तीन नवीनच 'कुणगे' जोडलेले दिसणं हे कोकणात नवीन नाही; तसंच, पाण्याच्या खोलीमुळे आदल्या वर्षीं होडी चालवायची बांबूची लांब काठीही जिथं नदीच्या तळाला टेकत नव्हती तिथं आतां वाळूचा पट्टा पाण्याबाहेर येऊन डोकावणं किंवा जिथं कमरेएवढ्या पाण्यात सर्रास तिसर्‍या /मुळ्ये काढताना बायका दिसत, तिथं खोल पाण्याचा "डोह" [ मालवणीत याला "कोंड" म्हणतात] झालेला पहाणंही आश्चर्यकारक नसतं. नदीच्या पात्रावर फक्त आपलाच सार्वभौम अधिकार आहे, हे जगजाहीर करण्याचा प्रत्येक नदीचा जणूं तो एक हट्टच असतो. आणि, माणसाने 'धरण' नावाचा बडगा उगारेपर्यंत तरी नदी तो हट्ट मनसोक्त पुरवून घेतच असते. आतां तर राजकारण्यानी कोकणात धरणं होऊंच शकत नाहीत अशी एवढी बोंब करून ठेवलीय कीं इथल्या नद्याना तोही धाक राहिला नसावा !

कर्लीच्या या हट्टीपणाला मात्र एक कांहीशी दुर्मिळ अशी लोभस झालर पण आहे. फार पूर्वी कर्ली नदी तारकर्लीच्या जवळपास अरबी समुद्रात विलीन व्हायची [ मोज-मापाचा, प्रमाणबद्धतेचा गंधही नसलेलं पण ढोबळ कल्पना देणार स्केच खाली दिलं आहे ]. मग तिच्या मुखाजवळच समुद्रात वाळूचं एक छोटसं बेट तयार होऊं लागलं. प्रथम कर्लीने बहुधा त्याकडे दुर्लक्षच केलं असावं. पण तें बेट जसं जसं बाळसं धरूं लागलं, तस तसा कर्लीला बहुतेक त्याचा लळाच लागला असावा. जमीनीनेही मग कांठावरून हळूच आपलं एक बोट पुढे करून त्या बेटाला आपलंसं करायला सुरवात केली. कर्लीच्या हे लक्षात येतांच वास्तविक आकांडतांडव करून तीने तें बोट झिडकारून टाकायचं व त्या बेटालाही तंबी द्यायची; पण तसं घडलं नाही ! उलट, कर्लीने स्वतःलाच मुरड घालून त्या बेटाला आंतल्या बाजून गोंजारत, त्या बेटाच्या दक्षिण टोंकाला वळसा घालून, भोगव्यानजीक स्वतःला समुद्रात झोकून दिलं. karli-devabaaga.JPG
एव्हाना त्या बेटावर नारळांची लागवड सुरू झालीच होती व तें जमीनीला जोडलं जातंय हे पाहिल्यावर तिथं स्थानिकानी वस्तीही करायला सुरवात केली. एका बाजूला निळाशार अथांग समुद्र व दुसर्‍याबाजूला कर्लीचं विस्तीर्ण पात्र अशा ह्या ४-५ किलोमीटर लांबीच्या चिंचोळ्या वाळूच्या पट्ट्यावर मग हां हां म्हणतां नारळाच्या बागेने नटलेलं एक हिरवंगार लेणं उभं राहिलं. कुणीतरी रसिकानं त्याला सार्थ असं नांवही दिलं - देवबाग !

देवबागचा जन्म केवळ दीड-दोनशे वर्षांपुर्वीचा असावा असं एका जाणकार 'हायड्रोग्राफर' मित्रानं मला सांगितलं. कर्लीने जणूं वचनबद्ध असल्यासारखं देवबागला अभयदानच दिलंय; कर्लीला कितीही मोठा पूर आला तरीही देवबागच्या कांठचा बांध ओलांडून ती देवबागेत शिरत नाही असं तिथले रहिवासी सांगतात. [ फक्त, सुनामीच्या वेळीं बाहेरून खाडीत आलेल्या पाण्याच्या फुगवट्याने ही लक्ष्मण रेषा किंचितशी ओलांडली गेली होती, असंही कळलं ]. नारळाच्या बागेबरोबर तिथं इतरही झाडं तुरळकपणे मूळ धरून आहेत. होडीचं लाकूड कुजूं नये म्हणून त्याला 'उंडेल'चं [ किंवा 'उंडल'चं ]तेल लावतात असं मागच्या लेखावरच्या प्रतिसादात कुणीतरी म्हटलं होतं; त्या'उंडेला'चीं झाडंही इथं पहायला मिळतात. पण उल्लेखनीय म्हणजे इथल्या शेवग्याच्या शेंगा; खार्‍या हवेवर व वाळूत वाढलेल्या इथल्या शेवग्याच्या झाडांच्या शेंगाना एक आगळाच स्वाद असतो. [ एकदां फळबागांचा दादामाणूस समजल्या जाणार्‍या रत्नागिरीच्या एका भल्या माणसाने ट्रकभर देवबागच्या शेवग्याच्या शेंगा मिळवून देशील का, असं मला विचारलं होतं; मिठात मुरवून , डबाबंद करून त्याना त्या शेंगा अमेरिकेत निर्यात करायच्या होत्या; तिथल्या कांही 'एनआरआय'नी तसा आग्रह धरला होता व ही संपूर्ण कंन्झाईनमेंट विकली जाण्याची हमी पण दिली होती, असं त्यानी मला सांगितलं होतं ]. आता तर स्थानिकानी तिथं छान फुलझाडंही लावलीत व देवबागनंही त्याना आपलंसं करून घेतलंय. अर्थात, मासेमारी, व आतां जोडीला पर्यटन, हाच देवबागचा प्रमुख उद्योग म्हणावा लागेल.

कर्लीच्या आयुष्यात आता मात्र एक नवीनच घोळ होऊं घातलाय; भोगव्यानजीक देवबागच्या दक्षिण टोकालाही [ मोंबार] कर्लीच्या मुखानजीकच वाळूचा एक पट्टा तयार होतोय. सध्या समुद्र पक्ष्यांच्या मुक्कामामुळे त्या पट्ट्याला मोहक रूपही दिलंय. पण ह्या वाळूच्या पट्ट्याने उद्या जर कर्लीची अगदीच मुस्कटदाबी झाली तर मात्र नाईलाजाने कर्लीला पुन्हा तारकर्लीजवळची समुद्राला मिळण्याची आपली मूळ वाट धरणं अपरिहार्य होईल. तसं झालंच, तर देवबागचं अस्तित्व जरी धोक्यात नाही आलं तरीही त्याचं विलोभनीय आगळेपण मात्र हरवून जाईलच ! अर्थात असा बदल घडायला साधारणपणे कित्येक तपं जावी लागतात. आणि कुणी सांगावं, कर्लीनं ज्यांच्यासाठी हा नजारा निर्माण केला त्या देवांच्याही कांही खास योजना असतीलच ना या 'देवबागे'साठी !!

आत्ताच कुणीतरी मला ई-मेल केलेले कर्ली नदी/खाडीचे कांही फोटोही इथं पोस्ट करतोय - फोटोग्राफीचे नमुने म्हणून नाही तर तुम्हाला माझ्या लिखाणामुळे होईल त्यापेक्षा कर्लीची अधिक चांगली ओळख व्हावी म्हणून !

भोगव्याच्या डोंगरावरून दिसणारं दृश्य -
bhog-dev88.JPG

कर्ली खाडीच्या वेगवेगळ्या टप्प्यावरचा नजारा -
karleexxx.JPGkarlee111.JPGkarlee2.JPG

पर्यटकांसाठी कर्लीत दिसूं लागलेल्या खास यांत्रिक होड्या -

tourisnqqq.JPG

कांठावरची व पात्रातली उलथापालथ करण्याच्या हट्टाबरोबरच नदीची आणखी एक खासियत असते व ती म्हणजे रात्री बहुढंगी रुपं धारण करून मिरवायची तीची हौस. असंच एक पिठूळ चांदण्यातलां तिचं हे मला भावणारं रूप -
najaakat3.JPG
शिवाय, तांडवनृत्याचा जणूं सराव करत असल्यासारखा तिचा पावसाळ्यातला रौद्र रूपातला आक्रमक पवित्रा हीही तिची एक भयप्रद ओळख. पण या सर्वांविषयी सविस्तरपणे पुढे कधी तरी.

नदीची नजाकत - http://www.maayboli.com/node/25588
नदीची नजाकत - २ http://www.maayboli.com/node/25655

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भाऊ, हि नदी अशीच वाहती राहो. तारकर्ली मला तूमच्या लेखनातूनच बघायला मिळाली.
तूमचे शेवटचे जे रेखाटन आहे, अगदी तसेच दृष्य, गोव्यात प्रवेश केल्यावर म्हणजे म्हापश्याच्या आसपास डाव्या बाजूला दिसते. त्या जागेचा फोटो डोक्यात अगदी पक्का आहे.
कोकणात धरणे का होऊ देत नाहीत याचे कारण कळतच नाही. खरे तर त्याने कुणाचे पाणी अडणार नाही. नाहितरी ते सगळे समुद्रालाच तर मिळते. निदान काही मोठी सरोवरे तरी निर्माण व्हावी. कणकवली जवळ एक आहे. (ओझर असेच नाव आहे बहुदा) धरणाचे म्हणाल, तर गोव्यात आहेत हि धरणे. तिलारी रखड्त रखडत का होईना, पुरे झालेच. हणजुणे तर आधीपासूनच होते. (चोर्ला घाटातून या धरणाच्या जलाशयाचे विलोभनीय दर्शन होत राहते.)

आणि हा एक फोटो, राजापूरचाच. देवबागेची आठवण नक्की करुन देईल.

आणि भाऊ, गुगल अर्थ वर तूम्ही रेखाट्ल्यासारखीच दिसतेय देवबाग. ते मधले बेट म्हणजे सर्जेकोट ना ? श्री पांडुरंग पाटील, श्री सुशील भोवर यांची घरं पण दिसताहेत.

खुपच मस्त Happy
पांढरा शुभ्र तारकर्ली बिच तो याच नदीजवळचा का? एकदा लहानपणी बघितला होता असे आठवते. फार सुंदर होता.

<< कोकणात धरणे का होऊ देत नाहीत याचे कारण कळतच नाही >> दिनेशदा, कोकणातल्या सछिद्र जांभ्याच्या दगडांमुळे धरणाने अडवलेलं पाणी झिरपून जातं, असं अधिकृतपणे दिलेलं कारण मी ऐकलंय. रायगडमधील धरणानी हा दावा फोल ठरवलाय. यावर खूपसं खूपणारं लिहीण्यासारखं आहे पण तो विषयच वेगळा आहे.
<< ते मधले बेट म्हणजे सर्जेकोट ना ? >> 'गुगल अर्थ' नदीतलं जे बेट दाखवतं त्याचं नांव नाही माहित मला. पण 'सर्जेकोट' हा मालवणजवळचा समुद्रातला एक खडकाळ भागही आहे, असं वाटतं. राजापूरच्या नदीचा फोटो खासच ! माझ्याही संग्रहातले कर्लीवरचं जीवन चित्रित करणारे आणखी फोटोही इथं टाकायचा विचार आहे.
<< पांढरा शुभ्र तारकर्ली बिच तो याच नदीजवळचा का >> होय, सावली. खरं तर मालवणपासून देवबागच्या टोंकापर्यंतचा समुद्रकिनारा हा ८-१० किलोमीटरचा शुभ्र वाळूचा बीचच आहे.
गिरीशजी, तुम्ही पण ! सर्वांस धन्यवाद.

_/\_

खुपच छान आहे ति जागा. आम्हि गेलो होतो त्या नविन वाळुच्या बेटावर, छोट्या बोटितून खाडीतून प्रवास करत. अविस्मरणिय अनुभव. (नंतर भिती वाटली होती.).... Happy

कर्ली नदीची जवळून ओळख करून देणारी माझ्या संग्रहातील कांही प्र.चि. मुद्दाम पोस्ट करत आहे [ प्र. चिं.च्या 'गरीब' क्वालिटीबद्दल क्षमा मागून] -

१] डौलदार डोलकांठीची होडकीं कर्लीत फारशी दिसत नसलीं, तरी अशीं कामचलाऊ शीडं सर्रास दिसतात -
02.jpg

२] कर्ली समुद्राला मिळते त्या देवबागच्या दक्षिण टोंकाला तयार होत असलेला शुभ्र वाळूचा पट्टा -
01.jpg

३] तारकर्लीच्या आंतल्याबाजूस कोरजाई येथें नदीच्या मधोमध तयार झालेलं वाळूचं बेट -

03.jpg

४] वालावलीच्या मंगळवारच्या आठवडा बाजारासाठी 'हाउसफुल' तरीतून जाणारे गांवकरी -
04.jpg

५] कर्ली गांवच्या तरीवरची वर्दळ [ पैलतीरी 'देवबाग' ] -

05.jpg

तिनही लेख वाचुन काढले अधाशासारखे...

नदी उभी राहिली नजरेसमोर..:) अतिशय सुंदर लिहिलेय

भाऊ,
छान फोटो आणि माहिती !
तारकर्लीच्या एंजॉय केलेल्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या,त्यातल्या पाण्यात असुन देखील अंगावर काटा आणलेल्यासकट !
Happy