ही बागही माझी नाही हा बहरही माझा नाही

Submitted by अ'निरु'द्ध on 28 May, 2020 - 07:03

ही बागही माझी नाही हा बहरही माझा नाही

हा चैत्र कधीचा आला अजुनि वसंत आला नाही
ही बागही माझी नाही वा हा बहरही माझा नाही...

ती सावज होती माझे पण ती हसुनी कोवळे पाही
मी पारधी आता नाही अन् हा बाणही माझा नाही...

अलवार स्पर्श तव होता रोमांच तरारे अंगी
माझे ह्रदयही माझे नाही अन् मी ही माझा नाही...

पलिकडल्या तीरावरती माझे सौख्य थांबले होते
पण ही नौका माझी नाही अन् नावाडी माझा नाही...

होकार दिलास न मजला वा नकार दिला नाही
उपेक्षा जगू देत नाही प्रतिक्षा मरु देत नाही...

तू होतीस जेव्हा माझी अवघे विश्वची होते माझे
आता तू ही माझी नाहीस चंद्र-सूर्यही माझे नाही...

प्रेमात दगलबाजीच्या सर्वस्व हरवले मी ही
तू उरली माझी नाही वा तव स्मृतीही माझ्या नाही...

झिरमिळत्या हळव्या स्मृती मी लिहित गेलो काही
त्यातील दुःखही माझे नाही वा विलाप माझा नाही...

मी ठोकरले दुनियेला अनिरुद्ध प्रवासासाठी
हे घर ही माझे नाही कुठली सराई माझी नाही...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

Va

"होकार दिलास न मजला वा नकार दिला नाही
उपेक्षा जगू देत नाही प्रतीक्षा मरू देत नाही "
हे शब्द फार आवडले.