फिश व इतर मांसाहारी पदार्थांचे सुके प्रकार कोणते व कुठे मिळतील?

Submitted by अश्विनीमामी on 26 May, 2020 - 21:45

लॉक डाउन काळात एक ज्ञान मिळाले आहे की घरी अन्न साठा पुरवणीचे पदार्थ वाळवणे हाताशी पाहिजे. कधी घरी बसायची ऑर्डर येइल व
दुकाने बंद होतील पत्ता लागत नाही. तर अश्यावेळी चविष्ट अन्न तयार करायला थोडी मदत हवीच. माशांचे सुके प्रकार, जसे सुकवलेले बोंबील, प्रॉन्स व इतर मासे कोणते ? हे प्रकार घरी असले की थोडी चटणी बनवली, भाजीत दोन चमचे टाकले तर नॉनव्हेज खायचा फील येतो.

तसेच पंजाबात चिकन मटण चे लोणचे मिळते, ते आप्ल्याकडे महारा श्ट्रात मिळते का? कुठे? प्रॉन लोणचे गोव्यात पाहिले आहे.

अंडी सुकवून काही करतात का? तसेच सॉसेज हॅम सारखे पर्यायही सांगा. तुम्ही जिथे राहता तिथे काय मिळते त्याची यादी लोकेशन सहीत द्या. म्हणजे तिथे राहणार्‍या मायबोलीकरांना त्याचा उपयोग होईल.

लहान मुले तरूण ह्यांच्या समोर चांगले अन्न कमी उपलब्ध पदार्थांत करून घालताना ह्या माहितीचा उपयोग व्हावा हीच सदिच्छा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठाण्यात सध्या सुकी मासळी म्हणजे सोडे, सुकट, जवळा, सुके बोंबिल उर्फ काड्या आणि कधीकधी खारं हे जागोजागी मिळतं.
लाॅकडाऊनच्या काळात ज्या रस्त्यांवर बऱ्यापैकी भाजीवाले, फळवाले बसायला लागलेयत, तिथे.
मला माहिती असलेल्या जागा म्हणजे प्रशांत काॅर्नर, पांचपाखाडी चा रस्ता, ठाणे महापालिकेचा कचराळी तलावाच्या बाजूचा रस्ता, प्रेमसागर हाॅस्पिटलच्या जवळ आणि वीर सावरकर पथ.
एरवीही स्टेडियम जवळचा मुख्य मासळी बाजार आणि फ्लाॅवर व्हॅली जवळचा नवीन मासळी बाजार इथेही एक एक कोळीण फक्त सुकी मासळी घेऊन कायम बसलेली असते.

चिकन, मटण आणि प्राॅन लोणचेही ठाण्यात मिळते.
अगदी सहज नाही, पण मिळते. जागा आठवून लिहितो.
आणि हॅम, साॅसेजेस, सलामी, कबाब, स्लाईस्ड फ्रोझन फिश हे सर्व पर्याय तर असंख्य ठिकाणी मिळतात. त्यांची यादी करायला गेलं तर खूप लांबलचक होईल. जे खाणारे असतात अशा सर्वांना ह्या जागा माहिती असतीलंच कारण हल्ली बऱ्याच ठिकाणी असलेल्या फ्रोझन चिकनच्या दुकानात ह्या सर्व गोष्टी मिळतात.
थँक्स टु गोदरेज चिकन, बारामती चिकन. ऑरगॅनिक हवं असेल तर झोराबियन चिकन, किंचित मागे पडलेलं वेंकीज, इत्यादी, इत्यादी..
तरीही काही उदाहरणं :
वीर सावरकर रोड वर तीन दुकानं आहेत. एक विश्वजित सोसायटीच्या समोर, एक बाजूला.. (दोन्ही गोदरेज), तिसरं 'जी. राज' हे महाराष्ट्र विद्यालयाच्या समोर (ख्रिश्चन बहुल एरियामुळे ह्याच्याकडे पोल्ट्री पिग, आणि पोर्क सलामी वगैरेही असतात) आणि तोच रस्ता सेंट जाॅन कडे जायला वळतो तिथे 'ठाणेरी' (बारामती आणि वेंकीज).
लाॅकडाऊन मुळे माॅल हा पर्याय दिला नाहीये.
येस, आत्ता आठवलं.. ठाणेरी आणि जी. राज नाॅनव्हेज लोणचीही ठेवतात. गोवा कारवारकडचे घरगुती ग्रामोद्योग असावेत अशा टाईपचं पॅकिंग असतं. मला तरी घ्यावेसे वाटलेले नाहीत.
त्यापेक्षा मातृदेवो भवः..

धन्यवाद निरू. लोकेशन व दुकानां ची यादी एव्ढ्या साठी म्हटलं की अडल्या नडल्याला मदत होईल. माबोकर जग भर पसरले आहेत त्यामुळे सर्व टीमचा विचार केला आहे. आमच्या इथे इस्टला गव्हाण पाड्यात मिळून जाईल. झोराबिअन चे पदार्थ मागवते मी.

आयटीसी व टाटा फॅब स्टा चे टीव्ही मील्स पण आहेत. मेथी चिकन, चिकन पास्ता व नूडल्स.

अमा, लिशीयस नाही बघीतलत का ? सुके प्रकार मिळतात का माहीत नाही पण चिकन, फिश, कोल्ड कट वगैरे घरपोहोच मिळतात. ऑनलाईन ऑर्डर. शिवाय त्यांचे स्प्रेड्सही मस्त आहेत.

लिशीअस आहे माझ्याकडे अ‍ॅप. वापरते पण. ते सुकट जवळा वगिअरे माहीत नाही नक्की काय प्रकार असतो ते. बिग बस्केट वर पण पूर्वी टिन्ड मासे वगिअरे मिळत असे.

सोडे = सुकवलेली मोठी को लंबी
करंदी = सु.छोटी को.
जवळा= सु.बारीक को.

यातले सोडे घेताना खात्रीच्या माणसाकडून घ्या.कारण मुशीचे (शार्क मासा)नकाळी सोडे पण असतात.

सुके ओले कुठल्याही प्रकारची मांसमच्छी लॉकडाऊनमुळे कमतरता झालीय असे वाटत नाही. उलट हल्ली फ्रोजन देखील कुठल्याही सुपरमार्केटमध्ये मिळते. आमच्याकडे घेत नाहीत ते कधी पण चांगलेच असावे. ऑनलाईनही सर्विसही बरेच आहेत. आम्ही वापरली नाही कधी कारण मटण चिकन ओळखीचा घरपोच देतो आणि मासे आमच्याकडे बघितल्याशिवाय घेणारच नाहीत.

सोडे भाज्यांमध्ये टाकून मजा येते हे मात्र १०० टक्के खरेय. यात सर्वात पहिला नंबर वांग्याच्या भाजीचा.
मध्यंतरी मला शिमलामिर्चीची कुळदाचे पीठ + जवळा टाकून केलेल्या भाजीचाही चस्का लागलेला.

अमा,
लॉकडाउनमधलं नाही माहित, पण अलिबागजवळ पोयनाड म्हणुन गाव आहे तिथे दर सोमवारी सुक्या मासळीचा बाजार भरतो. चांगले व खात्रीलायक मिळतात. तुमच्या ओळखीत तिकडे कोणी असेल किंवा स्वतः जावु शकत असाल तर उत्तम.
मुंबईहुन जाणार असाल तर भाउचा धक्का ते मांडवा ते अलिबाग ते पोयनाड नी परत. साधारण ५/६ तासात करता येवु शकेल.

जेम्स बाँड लॉक डाउन उठवल्यावर हे नक्की करता येइल मी होलसेल मध्ये घेउन रिटेल मध्ये विकू पण शकेन. पोयनाड इथे बाजा रात काय काय मिळते? हेच मला नक्की माहीत नाही. जागु ताई ंनी मस्त सांगितले असते. सध्या त्या दिसत नाहीत. ट्रॅडिशनल मी नावाचे श्रिलंकन चॅनेल आहे त्यावर ती बाई ह्यात त्यात करंदी घालत असते किंवा इतर बारके फिशेस. इतके वर्श कधी वेळ पडली नाही. माझे कुत्रे माम्जरे पण फिशेस आव्डीने चघळत बसतात. त्यांना बघुनच मन तृप्त होते. साधी फिश करी असली तर एक मोठा बोल भात पण पुरेसा होतो एका जेवायला.

लॉक डाउन मध्ये अश्या शिट्ट्या वाजल्यात ना. मी आधी अगदी पाव आतपाव भाजी, अर्धा किलो तांदूळ असे घरात ठेवत असे. स्विगी वर भरोसा होता पण आता ह्या बाबतीत आत्म निर्भर होण्या शिवाय पर्याय नाही. हे उमजले आहे.

@ अमा, चौल, रेवदंड्याला दांड्यावर (म्हणजे जिथे मासेमारीच्या बोटी धक्क्यावर {दांड्यावर} लागतात तिथे आणि अशा प्रत्येक ठिकाणी; मग ते हर्णे असू दे किंवा इतर, तिथे ही वाळवणं चालतात). मुरुडचे सोडेही सुप्रसिद्ध आहेत.
जो माल विकला जात नाही तो वाळवणाला जातो.
काही फोटो आहेत तिथले जुने.
इथे दिले तर चालेल का..?

"सुका बाजार"

मे महिन्याच्या सुट्टीत, पार्ल्याच्या आजोळहून पुण्याला घरी परतताना "माले, पोरींच्यासाठी जाताना सुका बाजार घेऊन जा बरं का, गंगू कोळणीने चांगले मोठे वाटे लावले आहेत" ही आजीची ऑर्डर म्हणजे पावसाळ्यात येणाऱ्या पर्वणीची नांदीच!

हा शब्द व हे पदार्थ म्हणजे पुणेरी लोकांकडून वाळीत टाकले जाण्याची गॅरंटी. परंतु त्याची किंचितही पर्वा न करता आमची आई पदर खोचून , एका हातात मोठीशी पिशवी व एका हातात (भविष्यातील ट्रेनिंग म्हणून) अस्मादिक कोळणीकडे प्रयाण करत असे. सुका बाजार या विचित्र नावाच्या गोष्टींच्या खरेदीकरिता किती चोखंदळ व चलाख असावे लागते ते समजण्याकरिता सीकेपी जातीत जन्माला येण्याचे भाग्य असावे लागते.

पहिला मान अर्थातच "सोडयांचा". अंगाने भरलेली, रसरशीत कोळंबी जेव्हा वाळवली जाऊन "mature" होते तेव्हा तिची आज्जी होते. तेव्हा तिला "सोडे" म्हणतात. मुलाबाळांच्या चेहेऱ्यावरुन खरखरीत, सुरकुतलेला हात फिरवणारी, बटव्यातून आवडेल तेच नेमके काढून देणारी, घरात कुठेही मिसळून जाणारी पण तरीही वेगळी ओळख असणारी! धोधो पावसाच्या दिवशी "खायच्या" वारी ट्रॅफिक जॅम व लोकल बंद असल्यामुळे सुट्टी मिळाली आणि छोटीशी पार्टी करायचा मूड असला तर हक्काचा मेनू "सोड्याची खिचडी"च. बरोबर सोलकढी असेल तर इंद्राला सुद्धा invite करायला काहीच हरकत नाही.

एखाद्या कल्पक गृहिणीला भुक्कड कोबी, फ्लॉवरच्या भाजीला पण सोनेरी किनार द्यायची असेल तर ती सोडे भाजून ,वाटून लावेल.
पहिल्या पावसात लाजत, मुरकत येणाऱ्या शेवळाच्या भाजीचे लग्न लावायला नवरा म्हणून "या गो दांड्यावरचा" भारदस्त "सोडा"च हवा. भरपूर कांदा, खोबरे,चिंच घालून केलेले सोड्याचे लिप्ते म्हणजे आजकाल पंच-तारांकित पदार्थ झाला आहे. एकवेळ काजूची उसळ परवडेल पण सोड्याचे लिप्ते परवडणे महा कठीण.

सुकटीचा महिमा काय वर्णावा..हा जरा वेळकाढू प्रकार. हिचे डोके,काटेरी पाय काढून साफ करण्यासाठी योगसाधना आवश्यक असते. थोडी पाण्यात टाकून भिजू दिल्याशिवाय ही बधत नाही. मग सुकटीचं कालवण करा,लिप्ते करा किंवा कच्चा कांदा, कोथिंबीर घालून कोशिंबीर..तुमची विकेट गेल्याशिवाय राहणार नाही.

सोडे, सुकटीचा लिंबू-टिंबू अवतार म्हणजे सुका जवळा. हा प्रकार ओंजळीने घेण्याचा आहे, सोड्यांसारखा मोजून,मापून नव्हे. बचकभर ,कढईभर वगैरे. जवळ्याला दोन,तीन वेळा पाण्यातून काढल्याशिवाय हा शुद्ध होत नाही. एकदा का वाळू निघून गेली व पांढरा शुभ्र झाला की याला नुसते लाल तिखट,मीठ घालून तव्यावर परता किंवा बारीक चिरलेला कांदा, बेसन घालून भजी तळा. कुठल्याही प्रकाराने जवळा हा आपल्याला "जवळ"चाच..

आता नंबर लागतो तो "काड्यांचा". बिगर सीकेपी कुटुंबात याचा अर्थ समजणं महाकठीण. काड्या म्हणजे सुके बोंबील. हो, आपण एखाद्या चिरकूट, लुकड्याचे वर्णन करताना वापरतो तोच शब्द. माधुरी दीक्षितचा "सैलाब" चित्रपटातील डान्स बघताना जो , तिच्या मागे सुकवले जाणारे बोंबील(सुद्धा!) नोटीस करतो तोच "जेनेटिक" सीकेपी असे संशोधन जाहीर करायला काहीच हरकत नाही..
साध्यासोवळ्या मुगाच्या खिचडीच्या ताटाला बहार आणेल तो भाजलेला सुका बोंबील.कडू मेथीच्या भाजीला चव येते ती लसणाच्या फोडणीत चार काड्या परतल्यावर, हो ना? आयत्यावेळी "मी नाही खाणार ही भाजी" असं म्हटल्यावर , हमखास हाताशी येणारी सासुरवाशीण म्हणजे काड्या. सुकलेली पण कामी येणारी!

सुके बांगडे व त्याचं भुजणं ही सारस्वतांची खासियत.आमच्या मल्याळी नर्सने प्रेमाने खाऊ घातलेली,सुक्या बांगड्याची मीन मोईली पण जिभेवर आहे.

हे सर्व प्रकार म्हणजे नासिकासुख व जिव्हासुख. पण दातांनी चावून,जिभेवर मासा विरघळण्याचा परमानंद देणारा प्रकार म्हणजे सुरमाईचे ,घोळीचे किंवा रावसाचे "खारे". याचा दीड, दोन इंच भाग जास्ती मिळवण्यासाठी साधारणपणे अर्धा तास घासाघीस करावी लागते. पुरुषांनी कोळणीचे ( आणि स्वतःचे ) वय बघून तिच्या सौंदर्याची तारीफ करायला सुद्धा हरकत नाही,कोयत्यापासून लांब राहिले म्हणजे झाले!खाऱ्याची technology पाचशे वर्षांपूर्वी पोर्तुगीजांनी दिली असे म्हणतात. देव(मासा) त्यांचे भले करो.
भर पावसाळ्यात,"जब मिलते है चार यार" असा योग असेल तर थोडे भिजवलेले खाऱ्याचे तुकडे बेसन लावून,तळून पुढे आले तर स्वर्गसुखच..
"ओल्या (पेग भरलेल्या ग्लासची स्मायली) बरोबर सुके जळते" म्हणतात ते असे!

जिज्ञासूंनी सुके खाडे, सुका शार्क,कर्ली पण try करायला हरकत नाही. गोवा,अलिबाग, रोहा अशा ठिकाणी वारंवार भेट दिल्यास या विषयामध्ये PhD करता येते!
तर मंडळी,असा हा आपला सुका बाजार, नुसत्या वासाने जीभ ओली करणारा व खाल्ल्यावर ब्रम्हानंदी टाळी लावायला भाग पाडणारा ! भरपूर प्रोटीन्स देणारा आणि या वैतागवाण्या लॉक डाउन मध्ये कामी येणारा..

(एक व्हाॅट्सॲपिय फाॅरवर्ड..)

मी होलसेल मध्ये घेउन रिटेल मध्ये विकू पण शकेन. पोयनाड इथे बाजा रात काय काय मिळते?

अमा,
तिथे बोंबील, निरल्या, वाकट्या, माकुल, करंदी, अंबाडी, जवळा, सोडे, कोलीम, खाडे इ.(जितके आठवले तितके...याहुनही अधिक मिळते) सुके तसेच काही मासे खारवलेले जे आपण अर्धवट ओले आहेत असेही म्हणु शकतो.
तुम्ही खरच विकायचं ठरव असाल तर पोयनाड सोबत चौल नी मांडव्याजवळ बोडणी आहे तिथे ही फिरा नवी व्हरायटी, क्वालीटी नी भावातही फरकही मिळु शकेल.
ह्या बाजारात लोकल कातकरी लोकांनी आणलेली वेगवेगळ्या प्रकारची गावठी भाजीही मिळते ती पण छान असते आणी स्वस्त सुद्धा.

Thanks niru and James bond. Very helpful recipes .please share all photos. Recipe pan liha. Me Karin baghen.

(एक व्हाॅट्सॲपिय फाॅरवर्ड..)
Submitted by निरु on 27 May, 2020 - 12:01

- लेख भारीच हो... मला माझ कोकणातल अर्धमुर्ध बालपण आठवल.
आजी भाताच्या गोणीच्या गोणी देऊन त्या बदल्यात घरी आलेल्या कोळनीकडुन सुकी मासळी विकत घ्यायची. त्याची पद्धतशीर साफसफाई होई, मग कडकडीत उन्हात सुकवुन, वाळवुन सगळ्यानचे छोटे-छोटे वाटे पॅक करुन मुंबई, पुण्याच्या लेकराना सुपुर्द करायची. खास पावसाळ्याची तयारी... केवढी ती मेहनत, पण तिला याची आवड मोठी.

आता मात्र अंधेरी फिश मार्केट, किवा तेही शक्य नाही तर www.licious.in जिंदाबाद.

सगळ्या सुक्याचा नंबर एकचा ठाणे जिल्ह्यातला बाजार फक्त पडघा येथे रविवारी दोनपर्यंत असतो. मे महिन्यातले रविवार शेवटचे असतात. मग पावसाळा सुरू होतो.
कोकणाकडे शोधायला अजिबात जाऊ नका.
----------
या वर्षीचा उठला.

सुके बांगडे मुंबईत कुठे मिळतील?
क्ष वर्षांपूर्वी आजीच्या माहेरावरून खडखडीत वाळलेले सुके बांगडे यायचे.पांढरे आणि कडक असायचे.पण त्यावेळी बांगडा आवडत नसल्याने फारसा खाल्ला नाही.मध्यंतरच्या काळात कोकण फेस्टिवल्मधून एकीने आणून दिले होते.मीही कोकणातून आण्ले होते.पण गॅसवर ठेवले की खाली रस गळायचा आणि घाण वास यायचा.मग बाकीचे बांगडे कागदात घट्ट बांधून प्लास्टिकच्या पिशवीत घातले आणि फ्रीझमधे तळाशी ठेवून दिले.जवळजवळ वर्ष झाले असेल. बांगडे अजून सुके झाले .तरीही माझे मन ते करायला होईना.आईला दिले तिने उन्हात वाळवले आणि खाल्ले.
हल्ली मला खावेसे वाटू लागलेय.बांगड्याची कोशिंबीर उर्फ किस्मूर!

@ देवकी, किसमूर म्हणजे माझ्यामते जवळ्याची कोशिंबिर..
सुक्या बांगड्याची नव्हे. तळकोकण आणि गोव्यामधला हा शब्द..

मी यातलं काहीच खात नाही पण वर्णनं वाचायला आवडली. विशेषतः निरु यांची व्हाॅट्सॲपिय फाॅरवर्डेड पोस्ट.
यावरून आठवण झाली जयवंत दळवी यांच्या 'दादरचे दिवस' अशा काही तरी नावाच्या लेखाची. त्यात एका अशाच सुक्या माशांच्या कोशिंबिरीचं वर्णन होतं. त्याचा ढीग करून आत पोकळी करून त्यात निखारा ठेवून खरपूस वास आणण्याची कृती होती.

निरु, ती वॉट्सअ‍ॅप पोस्ट वाचून देशातले दिवस आठवले. वर्षभराचा सुका बाजार ठरलेल्या कोळणीकडून घेणे, तो नीट उन्हं दाखवून भरुन ठेवणे , माहेरवाशिणींना नीट पॅक करुन देणे वगैरे उस्तवार घराघरातून चाले. किसमूर सुका बांगडा, सुका जवळा या दोन्हीची करतात.

यातलं काहीही खात नाही पण वाचायला आवडेल आणि नव्या कृतीही मिळतील इथे - मुग्धा कर्णिक यांचा ब्लॉग - सुकटायन

यांच्याच अजूनही बर्‍याच रेस्प्या फेबुवर आहेत. #thecookingwitchmugdhak (द कुकिंग विच मुग्धा के) या टॅग नी सर्चा.

ह्ये बगा लोकसत्तातील बातमी.
सुकी मासळी पण महागली आहे.

कल्याण : पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने अनेक जण सुक्या मासळीचे डबे भरून ठेवतात. मात्र यंदा करोना साथीने सर्वदूर थमान घातल्याने ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरांत ठरावीक भागांत मिळणारी सुकी मासळी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे घाऊक व्यापाऱ्यांनी वसई, विरार, नालासोपारा, नायगाव, पालघर, बोईसर भागांतून सुकी मासळीची आयात सुरू केली असून हे मासेही चढय़ा दराने विकले जात आहेत.

विरार, नालासोपारा, अर्नाळा, नायगाव भागांतील खारी मासळी चवदार असल्याने रहिवासी ती खरेदी करतात. करोना साथीचा संसर्ग होणार नाही अशा पद्धतीने घाऊक व्यापारी घरातून हे विक्री व्यवहार करत आहेत, असे डोंबिवलीतील बारक्या म्हात्रे यांनी सांगितले. दरवर्षी आम्ही मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात विरार भागात जाऊन सुकी मासळी घेऊन कल्याण, डोंबिवली भागांत विक्रीसाठी आणतो. या वेळी करोनाचा संसर्ग वाढल्याने मासेमारीवर परिणाम झाला आहे. विरार, नालासोपारा, वसई पट्टय़ात यंदा सुकी मासळीचे अधिक प्रमाणात उत्पादन झालेले नाही. राज्याच्या विविध भागांतून येथे मासळी व्यापारी खरेदीसाठी येतात. त्यांनी पावसाळ्यासाठी उपलब्ध घाऊक माल उचलला. सुका मासळीचा पुरेसा साठा नाही आणि मागणी अधिक असल्याने विरार, नालासोपारा घाऊक बाजारात सुक्या मासळीचा तुटवडा जाणवत आहे, असे खरेदीदारांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवलीत घाऊक व्यापाऱ्यांकडून सुकी मासळी खरेदी करून काही रहिवासी आपल्या भागात विक्री करत आहेत, असे जगदीश म्हात्रे यांनी सांगितले.

दर वधारले

सुक्या मासळीच्या पेटीचे (क्रेट) दर मासळीच्या स्तराप्रमाणे दीड हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. हीच मासळी स्थानिक बाजारात किरकोळ पद्धतीने विकताना चढे दर लावूनच विकावी लागते. जो ग्राहक यापूर्वी पाच किलोपासून २५ किलोपर्यंत मासळी भरून ठेवायचा तो या वेळी पाच ते १५ किलोच्या आसपास आला आहे. चढय़ा दरामुळे ग्राहकानेही सुकी मासळी खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे, असे कृष्णा पाटील यांनी सांगितले. सुकी मासळी पेटी (क्रेट) किंवा टब (घमेले) यांच्या माध्यमातून विकली जाते. या व्यवहाराला टप्पा म्हटले जाते.

सुकी मासळी दर (टप्पा)

सुके बोंबिल ८०० रुपये (अर्धा किलो)

मांदिली ५०० रुपये

ढोमेली ६०० रुपये

मध्यम पापलेट ३६०० रुपये (३५० पापलेट)

मोठे पापलेट १८०० रुपये (दोन तुकडे)

करंदी मासा ६०० रुपये

दांड मासा ४०० रुपये
https://www.loksatta.com/thane-news/dried-fish-prices-rise-in-domestic-m...
ही लिंक