बोन्साय

Submitted by Theurbannomad on 9 March, 2020 - 02:04

शारीरिक उंची हा विषय बऱ्याच लोकांचा अतिशय जिव्हाळ्याचा असतो. आपण उंच, सुदृढ आणि बांधेसूद असावं अशी कोणत्याही स्त्री अथवा पुरुषाची मनापासूनची इच्छा असते. मध्यम किंवा कमी उंचीच्या व्यक्तींना उंच व्यक्तींची काही वेळा असूया पण वाटत असते. पण काही व्यक्ती शारीरिक उंचीच्या पलीकडे जाऊन आपल्या कर्तृत्वाची अशी काही उंची गाठतात की त्या कर्तृत्वाच्या उंचीपुढे मग भले भले लोक खुजे वाटायला लागतात.

साडे तीन फूट उंचीच्या पण अशाच आपल्या कर्तृत्वाने आभाळाला हात पोचलेल्या माझ्या एका अतिशय आवडत्या व्यक्तीबद्दल आज मला लिहायचं आहे. एका ना नफा ना तोटा या धर्तीवर चालवल्या जाणाऱ्या आणि लहान मुलांना चांगलं आयुष्य देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या एका संस्थेसाठी एकदा काम करण्याचा योग्य आला, तिथे माझी ' झैनाब' शी ओळख झाली. ती स्वतः इराणच्या उत्तरेकडच्या अर्दबिल नावाच्या एका तुलनेने अपरिचित गावात जन्माला आलेली मुलगी. थेट सफाविद घराण्याशी संबंध असलेली. १९७० च्या दशकातल्या इराणच्या राज्यक्रांतीच्या वेळी निर्वासित होऊन आधी अझरबैजान, मग तुर्कस्तान आणि शेवटी युरोपमधल्या सायप्रस या छोट्याशा बेटवजा देशात तिचं कुटुंब स्थायिक झालं. तिचा जन्म सायप्रसमध्येच झालेला असल्यामुळे कुटुंबाची झालेली ससेहोलपट तिने बघितली नव्हती, परंतु आई-वडिलांकडून अनेकदा ते सगळं ऐकल्यामुळे तिला आपल्या घरच्या परिस्थितीची अतिशय चांगली जाणीव होती. तिच्याकडूनच ऐकल्याप्रमाणे या धावपळीत तिची आई एकदा गर्भावस्थेच्या चौथ्या महिन्यात पोटावर पडली आणि दोन-तीन दिवस योग्य ते उपचार न मिळाल्यामुळे झैनाबमध्ये शारीरिक व्यंग आलं. इतका सगळं असूनही सतत हसतमुख, आनंदी आणि मोकळेपणाने सगळ्यांशी मिळून मिसळून रहात असल्यामुळे सगळ्यांसाठी तिचं आजूबाजूला असणं कधीही त्रासदायक ठरलं नाही.

कुठून कुठून जमा केलेले अन्नाचे डबे, शिक्षणाचं साहित्य, कपडे, सॅनिटरी नॅपकिन असा काय काय त्या भाड्याने घेतलेल्या तंबूवजा जागेत रोज यायचं. माझ्यासारखे स्वयंसेवक त्याचं नीट वर्गीकरण करून तारखेप्रमाणे ते ते साहित्य ठरवलेल्या कपाटांमध्ये ठेवायचे. त्या प्रत्येक गोष्टीची नोंद करून दिवसाच्या शेवटी त्या त्या वस्तू बंदरावरच्या जहाजात न्यायला येणाऱ्या गाडीत व्यवस्थित ठेवणे हे काम झैनाबकडे सोपवलेलं होतं. त्या संस्थेची ती पूर्णवेळ कार्यकर्ती होती, आणि अनेक वर्ष तिथे काम केल्यामुळे ती सगळ्यांना चांगलंच ओळखत होती. म्हणून असेल कदाचित, पण तिला मस्करीत कोणीही कधीही काहीही बोलायचं आणि ती सुद्धा गोड हसून आपल्या बाजूने मस्करीची परतफेड करायची.

" अरे आर्किटेक्ट आहेस आणि तरीही अक्षर असं ?" मी एकेका खोक्यावर खोक्यातल्या वस्तूंची नोंद करताना भरभर लिहीत होतो, त्यामुळे माझं अक्षर अतिशय गचाळ उमटत होतं." भरभर लिहितोय, नाहीतर चांगलं आहे अक्षर माझं..." " मग नीट लिही ना...वाचता आलं कि झालं असं का लिहितोस?" तितक्यात मागून एक जण आला आणि " झैनाब अशाने स्वयंसेवक पळून जातील हे...का त्याला त्रास देते आहेस?" असं काहीसं म्हणाला. छान हसून झैनाबाने मला " नाही ना जाणार?" असं प्रश्न केला. मी नकारार्थी मान हलवल्यावर पुन्हा ती हसली आणि बाजूच्या एकाकडे त्याचं काम कसं चाललंय ते बघायला गेली. अख्ख्या जागेमध्ये तिचा वावर म्हणजे त्या उकाड्यात थंड वाऱ्याची झुळूक आल्यासारखा सुखद होता. काम झाल्यावर सगळ्यांनी एकत्र चहा-कॉफी घ्यायची तिथे प्रथा होती, तेव्हा मी मुद्दाम तिला गाठून तिच्याशी बोलायचं ठरवलं.

" झैनाब, मला तुझ्याबद्दल थोडं सांग ना...कुतूहल आहे म्हणून विचारतोय. गैरसमज नको..."

" अरे गैरसमज काय? आणि माझं शरीर बघून कोणताही पुरुष माझ्याशी लगट करायचा प्रयत्न नाही करत...नुसता चेहरा सुंदर असून काय उपयोग? हो ना?" हसत हसत तिने असं काही बोलून दाखवलं की मला उत्तर द्यायला काही सुचलं नाही.

" मी नेहेमी सांगते...माझ्या घरी सगळे जण चांगले आहेत, पापभीरू आहेत आणि प्रेमळ आहेत, म्हणून मी जिवंत आहे. शारीरिक व्यंग असलेली मुलगी माझ्या देशात एक तर डोक्यावरच ओझं समजतात किंवा जन्मल्या जन्मल्या तिला संपवतात....मी मात्र जन्मापासून माझ्या घरातल्यांची सगळ्यात लाडकी आहे. इराणी आहे, त्यामुळे चेहरा सुंदर आहे, वर्ण गोरापान आहे...माझ्या वडलांना अनेक लोक बोलतात ना कि काश.....तुमच्या मुलींमध्ये व्यंग नसतं...पण माझे अब्बा त्यांना काय सांगतात माहित्ये? "

" काय?"

" व्यंग तिच्या शरीरात नाही, बघणाऱ्याच्या डोळ्यात आहे. माझी मुलगी लाखात एक आहे...हिरा आहे हिरा तो माझा..." आणि ती खळखळून हसली. कदाचित आयुष्याकडे आणि एकंदरीतच सगळ्या गोष्टींकडे जबरदस्त आशावादी आणि स्वच्छ नजरेने बघायचं बाळकडू तिला घरूनच मिळालेलं असल्यामुळे तिला स्वतःच्या व्यंगाबद्दल इतका मोकळेपणाने बोलतात नाहीही वाटत नव्हतं.

" तुला माहित आहे उंची कमी असल्याचा पण एक फायदा असतो..."

"काय?"

" जमिनीच्या जास्त जवळ राहतो मेंदू...उगीच आकाशात उडत नाही गर्विष्ठ होऊन..." आणि पुन्हा ती खळखळून हसली.

सायप्रसमध्ये तिने समाजसेवा विषय घेऊन M.phil. केलं होतं. आपल्या कुटुंबाच्या कष्टांची जाणीव असल्यामुळे तिने अभ्यासात कधीही हयगय केली नव्हती. शिक्षणानंतर पाच वर्ष सायप्रस मध्येच ती काम करत असलेल्या संस्थेत लहान मुलांच्या समुपदेशनाचं काम इतर कामाबरोबर तिने हाती घेतलं आणि तिथून एक एक पाऊल पुढे टाकत मग या संस्थेची ती पूर्णवेळ सदस्य झाली. अनाथ मुलांसाठी आफ्रिकेच्या अनेक देशांमधल्या निर्वासितांच्या शाळेत ती स्वखुशीने शिकवायला जायला लागली. तिथे सुद्धा आपल्या उपजत स्वभावाला अनुसरून कधी पोलियो निर्मूलनाच्या मोहिमेत सहभागी हो, कधी त्या मुलांसाठी कपडे आणि पादत्राणं जमा कर अशी अनेक विधायक कामं ती करत राहिली. आज वयाच्या तिशीमध्येच ती आपल्या संस्थेच्या उच्चपदावर पोचली होती आणि इतकं सगळं असूनही तिच्या वागण्या-बोलण्यात या सगळ्यातून नकळत येणाऱ्या गर्वाचा लवलेशही नव्हता.

" मी धर्म मानायचे आधी...पण आता तेही सोडून दिलं. माणुसकी हे एकाच धर्म खरा. मी आमच्या घरच्यांप्रमाणे केस झाकणं, पूर्ण हात आणि पाय झाकले जातील असे कपडे घालणं हे सगळं नाही पाळत. पण माझे घरचे इतके चांगले आहेत, की माझ्या स्वातंत्र्याच्या आड ते कधीही नाही आले. त्यांनी मला एकाच गोष्ट करण्यापासून नेहेमी रोखलं...काय सांग?"

" वाईट सवयी?"

" दारू सिगारेट नाही...अमली पदार्थ. त्या एका गोष्टीला मात्र त्यांनी मला शपथेवर कधीही स्पर्श न करण्याचं वचन घेतलं. अर्थात मी ते मोडलं तरी ते मला टाकणार नाहीत, पण मी स्वतः अशा नशेच्या आहारी गेलेल्या कोवळ्या मुलांना त्या सवतीच्या कचाट्यातून सोडवलंय , म्हणून कधीच त्या दिशेला जाणार नाही.एक क्षण असतो तो. मजा म्हणून किंवा इतरांचं बघून त्या बाजूनं एक पाऊल ठेवलं ना, कि पुढे मग नशा आपल्याला ओढत घेऊन जाते. आफ्रिकेत भूक, गरिबी आणि शोषण विसरायला लावून एका आभासी जगात जायला मिळतं म्हणून लहान लहान पोरं नशेच्या आहारी जातात. त्याउलट पाश्चात्य देशांमध्ये श्रीमंती असूनही सुख नसल्यामुळे नशेचा आधार हवाहवासा वाटतो. कसं आहे बघ...दोघेही आभासी सुखाच्या मागेच जाणारे...एक उघडे नागडे आणि एक महागडे कपडे घालून मिरवणारे...पण नशेच्या समोर दोघेही समान ! बघितलाय का असा साम्यवाद कुठे?"

या छोट्याशा मुलीकडे असलेला अनुभवाचा खजिना जेव्हा ती रिता करत असे, तेव्हा तिला आलेले अनुभव ऐकून अक्षरशः मंत्रमुग्ध व्हायला होतं असे. तिने अर्ध जग पालथं घातलं होतं आणि त्या जगातल्या सगळ्यात दुर्लक्षित, झिडकारलेल्या आणि समाजाने ' उकिरडा' म्हणून टाकून दिलेल्या लोकांबरोबर तिने दिवस काढले होते. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटून प्रयत्न केले होते आणि त्यासाठी प्रतिष्ठित समाजातल्या अनेकांशी तिने दोन हात केले होते. ती आपल्या काही वकील मित्रांच्या मदतीने ती अशा लोकांचे खटले चालवून त्यांना न्याय मिळवून द्यायला त्यांची मदतसुद्धा करत असे आणि रात्रीबेरात्री धमक्यांचे फोन येऊनही तिने कधीही कोणताही खटला अर्धवट सोडत नसे. त्या छोट्याशा देहात असलेली जिगरबाज लढवय्यी भल्या भल्यांना पुरून उरत असे.

' एकदा तीन गुंड माझ्या गाडीसमोर आले. माझी गाडी खास माझ्या शरीराच्या रचनेप्रमाणे तयार करून घेतलेली आहे. मी गाडीत बसले तोच ते धावून येत असताना दिसले. मी सुद्धा तशीच गाडी सुरु केली आणि त्या तिघांच्या अंगावर घातली. एकदम गाडी अंगावर आल्यामुळे ते बावचळले असावे, कारण जसे धावत आले तसेच उडी मारून बाजूला झाले. दुसऱ्या दिवशी कोर्टात ज्याचा खटला मी चालवत होते तो जिंकला...बाहेर आलो तसा एक माणूस एकदम पुढे येऊन गुढघ्यावर बसून रडायला लागला. कोण होता माहित्ये?"

" कोण?"

" अरे आदल्या रात्री मारायला आलेल्यांपैकी एक...त्याला पत्ताच नाही कि त्याच्याच सक्ख्या भावाचा खटला माझा वकील मित्र चालवतोय...तोही खुनाचा खोटा आरोप असलेला खटला." तिचा ते नेहेमीच खळखळून हसणं या वेळी मात्र मला सुन्न करून गेलं.

त्या साडेतीन फुटाच्या उंचीच्या व्यक्तिमत्वाचे असंख्य पैलू मला त्या ३-४ दिवसात अनुभवता आले. तिने स्वतःसाठी खास तयार करून घेतलेल्या असंख्य गोष्टी मला तिने दाखवल्या. गाडीपासून गादीपर्यंत एकूण एक गोष्ट तिला खास तयार करूनच घ्यावी लागे, पण त्यातसुद्धा तिने आपल्या मनाने अनेक गोष्टी वेगळ्या पद्धतीने केल्या होत्या. तिचे कपडे सुद्धा खास शिवावे लागत. " एक मैत्रीण आहे जी शिवणकाम करते...नाहीतर आतल्या कपड्यांची पंचाईत होते...काय सांगू तुला?" हे ती हसत हसत बोलली तरी मला त्यात जराही चावटपणा जाणवला नाही, उलट तिच्या संयमित मोकळेपणाचं मनापासून कौतुक वाटलं. आयुष्य खर्या अर्थाने ती जगत होती आणि तिच्या नुसत्या असण्याने आजूबाजूच्यांना आयुष्य किती रसरशीतपणे जगता येऊ शकतं याचे धडे मिळत होते.

शेवटी दोघेही आपापल्या वाटेला जायचा दिवस आला. मी थोडा हळवा होऊनही झैनाब स्थितप्रज्ञ होती. प्रत्येक स्वयंसेवकाला स्वतः धन्यवाद देत ती शेवटी माझ्याकडे आली. मी तिच्यासमोर गुढघ्यावर बसलो आणि तिच्याशी हस्तांदोलन करताना बळे बळे हसायचा प्रयत्न केला. " रडलास तर भयंकर दिसशील...त्यापेक्षा हे चार दिवस आयुष्यभर लक्षात ठेव आणि चांगलं काम करत राहा...कधी मदत लागली तर झैनाब अलिबादी नावाच्या व्यक्तीला सोडून कोणालाही त्रास दे..." ती तिच्या त्या खास शैलीत खळखळून हसली आणि तिने मला घट्ट मिठी मारली. त्या मिठीतली मैत्रीची सकारात्मक ऊर्जा आणि निर्मळता कशाच्याही मोबदल्यात विकत मिळणारी नव्हती...ती ऊर्जा स्वयंभू होती आणि म्हणूनच बावनकशी सोन्यासारखी लक्ख उजळून निघत होती.

मोठ्या झाडांना जपानमध्ये 'बोन्साय' पद्धतीने छोट्या आकारात रूपांतरित करून त्यांना घरात ठेवतात, कारण त्यांच्या असण्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. विधात्याने झैनाबच्या रूपात कदाचित तशाच एका बोन्सायला आपल्यासारख्या माणसांमध्ये पाठवलं असेल, कुणास ठाऊक!

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्यंग तिच्या शरीरात नाही, बघणाऱ्याच्या डोळ्यात आहे. माझी मुलगी लाखात एक आहे...हिरा आहे हिरा तो माझा..."
>>> क्या बात

धन्यवाद !
माझ्या ब्लॉग्सना भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना ब्लॉग वाचण्याची माझ्यातर्फे विनंती करा.

https://humansinthecrowd.blogspot.com/
https://demonsinthecrowd.blogspot.com/