उलट्या पायांची म्हातारी - भाग एक

Submitted by निरंजन कुलकर्णी on 17 May, 2020 - 14:22

ए विनू चल की लवकर. कवापासून थांबलोय!” सनीने पाचव्यांदा हाक दिली तसा विनू धावतच आला. “खरच जायचं का आपन? मला लय भ्या वाटतंय रे.” विनू घाबऱ्या नजरेने सनी आणि नंदूकडे पाहत म्हणाला. हे ऐकून सनी आणि नंदू मोठ्याने हसले. “तरी तुला म्हनत हुतो नको घ्यायला याला. लय भित्र हाय हे.” सनी नंदूकडे पाहून बोलला. आपल्याला “भित्रा” बोललेलं विनूला आवडलं नाही. तो आवेशात येऊन म्हणाला, “मला भित्रा म्हंता व्हय. मी कुनाच्या बापाला बी भीत नाय. चला….” असे म्हणून तो एखाद्या योध्याच्या आवेशात पुढे आला.

तिघांनीही आपापल्या सायकलीवर टांग मारली व ते नदीच्या दिशेने निघाले. रस्ता तसा मोकळाच होता. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या उंच झाडांच्या पानांच्या सळसळीचा आवाज सोडला तर सगळीकडे चिडीचूप शांतता होती. जोराचा वारा सुटला होता व आकाशात दाटलेले काळे कुट्ट ढग जणू आता पाऊस कोसळणार असल्याची पूर्वसूचनाच देत होते. सूर्य मावळतीला आला होता मात्र आकाशात साचलेल्या चिवट ढगांमुळे त्याचा कुठे मागमूसही नव्हता. तिघेही आपापली सायकल वेगात दामटत होते. नेहमीप्रमाणेच सनी सर्वात पुढे होता, त्याच्या मागे नंदू व सर्वात शेवटी विनू होता. अजून बरच अंतर बाकी होतं.

विनू पूर्ण जोर देऊन सायकलचे पॅडल फिरवत होता. पण त्याचे अशक्त पाय आता दुखू लागले होते. अचानक त्याच्या सायकल समोरून एक साप सळसळत गेला तसा विनूचा तोल जाऊन तो खाली कोसळला. “धप्प…” आवाज ऐकून सनी आणि नंदूने सायकल थांबवली व मागे वळून पाहिले. विनूला खाली पडलेला पाहून ते मागे आले व विनूला हात देऊन उभा केला. विनूला गुडघ्याला थोडं खरचटलं होतं पण फारसं लागलं नव्हतं. “कसा काय पडला रे तू?” नंदूने विनूला विचारलं. समोरून साप गेल्याचं विनूने सांगितलं. अजूनही त्याच्या मनातील भीती तसूभरही कमी झाली नव्हती. सापाला पाहून तर तो अजूनच घाबरला होता. इथूनच मागे फिरावं असा विचारही त्याच्या मनात येऊन गेला पण ते आपल्याला पुन्हा भित्रा म्हणून चिडवतील हे लक्षात येताच तो सायकलवर स्वार झाला.

सनी, नंदू आणि विनू हे तिघेही अगदी लंगोटीयार होते. ते गावातल्या शाळेत सहावीच्या वर्गात शिकत होते. त्या तिघांच्यात विनू सर्वात हुशार होता. नंदू आणि सनी मात्र वर्गातील सर्वात उनाड मुलांपैकी होते. तरीदेखील त्या तिघांची अतिशय घट्ट मैत्री होती. नंदू आणि सनीला विनूला चिडवायला फार आवडायचं. विनूचा स्वभावच इतका गंभीर होता की कोणी चेष्टा केली तरी त्याला समजायचं नाही. पण सनी आणि नंदू सोडले तर विनूला इतर कोणी फारसे मित्र नव्हते. त्यांचं चिडवणही आता त्याला सवयीचं झालं होतं. तो त्या दोघांना अभ्यासात मदतही करायचा. तर असे हे जीवस्च कंठस्च मित्र रविवारी गावभर भटकायचे. त्यांनी त्यांच्या लाडक्या बळवंत मास्तरांकडून उलट्या पायांच्या म्हातारीबद्दल ऐकलं होतं. गावाबाहेर नदीकाठी एका रिकाम्या जुनाट बंगल्यात तिचा आत्मा भटकतो असं मास्तरांनी त्यांना सांगितलं होतं. तुमच्यात हिम्मत असेल तरच तिथे जा असही मास्तरांनी त्यांना सांगितलं होतं. हे ऐकताच सनीने रविवारी तिथे जायचं ठरवलं. सुरुवातीला नंदू आणि विनू त्याच्या सोबत यायला तयार नव्हते. पण शेवटी सनीच्या आग्रहामुळे म्हणा किंवा हट्टामुळे ते दोघेही त्याच्या सोबत यायला तयार झाले.

थोडं पुढे जाताच त्यांना समोरून एक कार येताना दिसली. ती कार जवळ येताच सनीने ओळखलं. ती बळवंत मास्तरांची कार होती. सनी, नंदू आणि विनूला पाहताच बळवंत मास्तरांनी कार थांबवली व विचारलं, “कुठे चाललाय रे पोरांनो सांजच्याला?” तसा सनी म्हणाला, “मास्तर तुमीच सांगितलं व्हतं ना त्या उलट्या पायांच्या म्हातारीबद्दल, तीलाच बघाया चाललोय.” “जावा जावा अन तिचे पाय उलटे आहेत की सरळ हे मला नंतर सांगा.” बळवंत मास्तर हसत म्हणाले व तिथून निघाले. बळवंत मास्तर हे मुलांना मास्तर कमी आणि मित्रच जास्त वाटायचे. ते कधीच मुलांवर ओरडायचे नाहीत. या अर्धवट वयातल्या मुलांना ओरडून, मारून काही उपयोग होणार नाही जरा त्यांच्या भाषेत सांगितलं की त्यांना समजतं असं बळवंत मास्तरांचं मत होतं. त्यामुळे ते सर्वच विद्यार्थ्यांचे लाडके मास्तर होते. शेवटच्या बेंचवर बसणाऱ्या उनाड मुलांसाठी तर ते एखाद्या हिरोपेक्षा कमी नव्हते. त्यांचा तो स्टायलिश गॉगल, मानेवरती रुळणारे लांब केस, लाल रंगाची चकचकीत कार सर्व काही एखाद्या हीरोसारखं होतं. ते शाळेत इंग्रजी विषय शिकवायचे. इंग्लिश तर असे फाडफाड बोलायचे की समोरचा पाहत रहायचा. शिकवता शिकवता मध्येच एखाद्या इंग्लिश मुव्हीतला डॉयलॉग बोलून दाखवायचे तोही अगदी त्या मुव्हीतल्या हिरोसारखा जसाच्या तसा. त्यांचं बोलणं, चालणं, वागणं शाळेतल्या इतर शिक्षकांना अजिबात आवडायचं नाही. आगरकर सरांनी तर मुख्याध्यापकांकडे तशी तक्रार देखील केली होती. अशा छंदी फंदी शिक्षकामुळे मुलं बिघडतील, या अर्धवट वयातल्या मुलांवर नको त्या गोष्टींचा लगेच परिणाम होतो असं आगरकर सरांचं म्हणणं होतं. मुख्याध्यापकांनाही ते पटत होतं पण बळवंत मास्तर शिकवायला आल्यापासून शाळेतल्या मुलांचं इंग्रजी सुधारलंय हेही ते नाकारू शकत नव्हते. या एकाच कारणामुळे बळवंत मास्तर अजूनही शाळेत टिकून होते. बळवंत मास्तरांचं वय पस्तिशीच्या आसपास होतं मात्र अजूनही त्यांनी लग्न केलं नव्हतं. त्यांच्याबद्दल गावात अनेक गोष्टी बोलल्या जायच्या. तर असं हे गावातलं बहुरंगी व्यक्तिमत्व होतं.

सनी, नंदू आणि विनू एकदाचे नदीकिनाऱ्यावर पोहोचले. इतका वेळ सायकल चालवून तिघेही घामाघूम झाले होते. सूर्य आता पूर्ण मावळला होता. हवेतील दमटपणा अजूनच वाढला होता. तिघांनीही नदीच्या पाण्यात हात, पाय धुतले व चालतच तिघे बंगल्याच्या दिशेने निघाले. बंगला पूर्णपणे झाड-वेलींनी वेढला होता. आजूबाजूला साधं खोपटं देखील दिसत नव्हतं. नजर जाईल तिकडे चारी बाजूनी हिरवीगार झाडी दिसत होती. आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं. रातकिड्यांचा एकसुरी आवाज तेवढा येत होता बाकी सगळ काही शांत होतं. समोरचा बंगला पाहून तर तिघेही पाहतच राहिले. एवढी भव्य वास्तू ते पहिल्यांदाच पाहात होते. “कुनाचा असल रे हा बंगला?” विनूने चष्म्याच्या कडांवरून पाहत विचारलं. “काय म्हाइत? पन ज्येचा कोनाचा असल तो लय मोठा मानुस असनार.” सनी म्हणाला. यावर चंदूने पुढचा प्रश्न विचारला, “ती म्हातारी हितं खरच असल कारे?” “तेच तर बघाया आपन आलोय.” सनी म्हणाला. “चला रे.” असं म्हणून सनी बंगल्याच्या मुख्य दरवाजातून आत गेला. थोडा पुढे गेल्यावर त्याने मागे वळून पाहिले. नंदू आणि विनू अजूनही तिथेच दरवाजापाशी उभे होते, हे पाहून सनी म्हणाला, “चला की तिथं कशापायी थांबलाय.” “म्हातारी खरच असल तर आत?” नंदू भीतभितच म्हणाला. “अर ती काय खाती व्हय तुमाला, अन नंदू या विनुच मी येकवेळ समजू शकतो. त्यो भित्राचाय. तू पण भ्यायलायस होयरे.” सनी हसत म्हणाला. हे ऐकून चिडलेला विनू “मी काय कुनाच्या बापालाबी भीत नाय.” असं म्हणून तावातावाने पुढे गेला. नंदूदेखील नाईलाजाने पुढे गेला. आता तिघेही बंगल्याच्या पायऱ्या चढून मुख्य दरवाजासमोर उभे होते. दरवाजा अर्धवट उघडा होता. सनीने दरवाजाच्या फटीतून डोकावून पाहिले. खोलीत एक मंद कंदील अडकवला होता. त्या कंदिलाचा काय तो तेवढाच उजेड खोलीत होता. एका बाजूला खाट होती. समोर जुनाट सोफा होता. सोफ्याच्या बाजूला एक आराम खुर्ची होती. पण दार अर्धवट उघडं असल्यामुळे ती खुर्ची स्पष्ट दिसत नव्हती. अंगात होतं नव्हतं ते सगळं धाडस एकवटून सनीने दरवाजा आत ढकलला तसा गंजलेल्या बिजागिरांचा कर्रर्रर्रर्रर्र…..आवाज झाला. सनीच्या पोटात भीतीने गोळा आला. तो एकेक पाऊल हळुवारपणे टाकत खोलीत आला. त्याच्या पाठोपाठ नंदू आणि विनूनेही खोलीत प्रवेश केला. दोघांनी एकमेकांचा हात घट्ट पकडला होता. सनीने सोफ्याच्या बाजूच्या आरामखुर्चीकडे पाहिलं. खुर्चीवर एक वृध्द स्त्री बसली होती. तिचे डोळे मिटले होते. चेहेऱ्यावरच्या सुरकुत्या कंदिलाच्या मंद उजेडात अजूनच भयाण दिसत होत्या. तिच्या अंगावर पांघरूण होतं. पण त्यामुळे तिचे पाय काही दिसत नव्हते.

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ.के.
पुढचा भाग येऊ द्या लवकर.

यावर चंदूने पुढचा प्रश्न विचारला, “ती म्हातारी हितं खरच असल कारे?”>>> ईथे नंदूने पाहिजे ना?

सरुवात चांगलीये!! Happy

डेंजर
वाट बघतोय पुढच्या भागांची.