माझ्यामध्ये मॅच्युरिटी कशी आणू ?

Submitted by राधानिशा on 15 May, 2020 - 09:13

खरं तर घटना क्षुल्लक आहे पण डोक्यातून जात नाहीये पटकन . मला वाचनाची आवड लहानपणापासून आहे आणि गेल्या 12 - 14 वर्षात खरेदी केलेल्या पुस्तकांनी एक लहान कपाट भरलेलं आहे . मला माझी पुस्तकं शेअर करायला मनापासून आवडत नाही .. लोक हरवतात , नेलेल्यापैकी सगळी आणून देत नाहीत असे अनुभव आहेत . चांगली गोष्ट की सहसा कुणी आमच्या घरी पुस्तकांची मागणी घेऊन येत नाही .

4 दिवसांपूर्वी अगदी जवळच्या नात्यातील एक भाऊ आला आणि बास्केट भरून पुस्तकं घेऊन गेला . मुलांसाठी लायब्ररी सुरू करण्याचा उपक्रम सुरू करायचा आहे .

याबद्दल नेऊ का तुझी पुस्तकं वगैरे विचारलं सुद्धा नाही . तो पुस्तकं निवडत असताना मला वाटलं मला दाखवेल झाल्यानंतर आणि विचारेल यातली कुठली नेऊ , कधी नेऊ .. पण असं काहीही न करता तो डायरेक्ट भरून घेऊनच जाईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं ...

कोणीही दुसऱ्याची वस्तू " नेऊ का ? " म्हणून साधी विचारणाही न करता नेऊ शकेल हा अनुभव मला आतापर्यंतच्या आयुष्यात आलेला नव्हता , तो आता आला . .

मी तोंडाला कुलूप लावून बघत बसले , तोंड उघडून मला पुस्तकं द्यायची नाहीत असं स्पष्टपणे सांगू शकले नाही , ही माझी चूक आहे . मीच जबाबदार आहे .

तरीही संताप होतो आहे .

पुस्तकं मी परत परत वाचते , ती शोभेसाठी नाहीयेत . आणि वाचनालय चालवण्याचा उपक्रम करण्यात मला काडीचा रस नाहीये ... ज्यांना करायचा असेल त्यांनी तो पदरचे पैसे खर्च करून खुशाल करावा , दुसऱ्याने आयुष्यभर निवडून जमा केलेली पुस्तकं परस्पर घेऊन जाऊन नाही , असं मला वाटतं .

पुस्तकं आता गेल्यातच जमा आहेत ..

पुस्तकांसाठी तडफड होते आहे असंही नाही ... जरा नीट बोलून मागितली असती तर मी किंचित मनाविरुद्ध का होईना दिली असती ... थोडी थोडी करून .. पण माझ्या मताला काडीची किंमत न देता परस्पर माझी वस्तू उचलून नेल्यामुळे इगो दुखावला गेला आहे .

कौटुंबिक संबंध खूप जिव्हाळ्याचे आहेत .. क्षुल्लक घटनेमुळे मनात रक्ताच्या नात्याच्या व्यक्तीबद्दल तिरस्कार जन्मू पाहत आहे .. ह्याच माणसाने मागे आमच्या घरातील आजारपणाच्या वेळी धावपळ केलेली आहे , ब्लड दिलेलं आहे .. देव न करो परत वेळ आली तर मदतीला उभा असणार आहे , वगैरे सगळं समजतं आणि आपणच पराचा कावळा करत आहोत असं वाटतं ... कळत आहे पण वळत नाहीये ...

पुस्तकं कधीही परत विकत घेता येतील , जर ही पुस्तकं परत आली नाहीत तर सगळी परत विकत घेऊ पण नेलेली परत आणून दे , असं सांगून त्याला दुखावू नये असं माझ्या वडिलांनी सांगितलं ... मलाही ते पटतं , पुस्तकं महत्वाची नाहीतच पण अशा प्रकारे गृहीत धरल्याने अन्याय झाल्याचा फील आला आहे त्याचा त्रास होतो आहे .

माफ करणं ही गोष्ट माझ्यासाठी नॅचरली येत नाही .. स्वभावातले दोष समजतात पण दूर कसे करू समजत नाही . मी अधिक मॅच्युअर का नाहीये ....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ करा तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे -
तुम्ही कधी घराबाहेर राहिला आहात का ? हॉस्टेल किंवा कामानिमित्त एकटे बाहेर बऱ्याच काळासाठी?

डोन्ट बीट युअरसेल्फ. अगदी नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. कोणाचीही प्रतिक्रिया हीच होइल. जर तुम्ही म्हणाला असता "माझी पुस्तकं गेली जाउ देत ना. मी परत दुसरी विकत घेइन.", जर तुम्हाला पर्वाच नसती तर आतापर्यंत उत्क्रांत व्ह्यायच्या आधीच नामशेष झाला असता. प्रत्येक प्राणी हा सर्व्हायव्हल करता स्वार्थी असावा लागतो, त्याने चूकांतुन शिकावे हीच अपेक्ष असते. यापुढे तुम्हा नक्की शहाण्या व्हाल. विश्वास टाकण्याअगोदर व्यक्ती पारखून घ्याल. आणि त्यातच मॅच्युरिटी आली - हे १००% समजा.

मी हॉस्टेलवर किंवा बाहेर शेअरिंग मध्ये राहिलेले नाही . शेअरिंगची स्पेस किंवा वस्तू कशाहीबाबतीत सवय नाही अजिबात .

सामो , थँक्स ... या ठिकाणी विश्वासाचा प्रश्न नव्हता ... मी नुसती बोलले जरी असते तरी हे टळलं असतं .. कदाचित त्याला माझी नापसंती समजलीच नसावी , he isn't one of the perceptive people .. उलट त्याच्या सख्ख्या बहिणी , माझ्या कजिन्स खूप समजूतदार आहेत .. त्यांनी मागितली असती तर मी हसत हसत दिली असती ... माझा भाऊ थोडा insensitive आहे पहिल्यापासूनच .. दुसऱ्यांच्या वेगळ्या इच्छा असू शकतात हे समजण्याच्या बाबतीत ..

पुस्तकांच्या बाबतीत मी एक पाळतो ते म्हणजे" बाबारे घरी येवुन एकदा जेवुन जा पण पुस्तक नाही नेवु शकत तु.
आपली आवड आपली निवड म्हणुन घेतलेले पुस्तक मग त्यात पैसा, भावना, मेहनत, मन गुंतलेले असु शकते त्यामुळे नाहीच.

रिकाम्या लहान कपाटात काय ठेवणार? त्याने जे करायचं ते केलं, तुम्हीही योग्य तेच वागलात. आता रिकाम्या कपाटाची विवंचना मागे लागली तर तिरस्कारासाठी वेळ मिळणार नाही. नवी कुठली पुस्तके, कशी मागवणार, कधी वाचणार इ इ.

नाहीतर आई तिथे कपबशा वगैरे असलं काही ठेवून द्यायची मग तिचा पण राग... न संपणारं चक्र आहे हे..

मला वाचूनच खूप राग येतोय. पुस्तकं आपल्यासाठी एक अनमोल खजिना असतो. असा अचानक कोणी लुटून नेला तर किती वाईट वाटेल. अतिशयोक्ती वाटेल पण माझे पैसे हरवले तर चालतील पण पुस्तक गेले तर खूप त्रास होईल. पंधरा वर्षांपूर्वी वडिलांच्या बदलीमुळे शिफ्टींगच्या वेळी माझी पन्नास साठ पुस्तके गुजरात मध्ये राहिली. अजून आठवले की वाईट वाटतंय. आता तुम्ही काहीच करू शकत नाही. त्याच वेळी गोडीत सांगितलं असते तर ठीक होते. असो आता विचार करू नका. नवीन आणा.

नात्यात फॉर्मेलिटी ? मग आप्त स्वकीय शब्द फक्त डिक्शनरीमध्येच शोभेचा म्हणून राहील. उलट त्याचा प्रेमळ उदात्त हेतु समजल्यावर सर्व पुस्तकांची पारायणे झालेली असल्याने स्वानुभवाने कुठल्या कुठल्या वयोगटाला काय आवडेल अशी त्या पुस्तकांची प्रतवारी करून भावाला मार्गदर्शन केले असते आणि त्याने निवडलेल्या प्रत्येक पुस्तक मिळवण्यामागचे तुमचे श्रम सहज गप्पांच्या ओघात सांगितले असते तर त्याला तुमच्या पुस्तकात अडकलेला जीवाचा कळवळा न बोलता जाणवून देण्याची ती एक छान संधी होती.

विचार करा ती पुस्तके आता किती लहान मुले वाचतील . त्या चिमुकल्याना किती आनंद होईल .
घरात पडून राहिली असती . शेयरिंग इज केयरिंग .

हो , आनंद व्हायला हवा होता असं मलाही वाटतं ... पण मी फार स्वार्थी व्यक्ती आहे . इतकी पुस्तकं वाचूनही मी कोरडी पाषाण राहिले आहे , उदार पणा आलेला नाही .. मुलं किंवा आणखी लोक वाचतील म्हणून आनंद व्हायला हवा .... रागामुळे आनंद निर्माण होत नाहीये .

रागामुळे आनंद निर्माण होत नाहीये .

नवीन Submitted by radhanisha on 15 May, 2020 - 19:20
Radhanisha .. tula je vatat te samju shkte bt ikde na lokana khup shikvaychi savay lagliy.. I feel tu srv pratisad manavr gheu nko.. kahi lok parat yetat navin nav ghevun Ani suru hotat.. ignore them.

हो सर्वात आधी या भांडकुदळ बाईंचा प्रतिसाद इग्नोर करा . त्यांना सवय आहे दर धाग्यावर जाऊन भांडणे काढायची .

राग जाईल तुमचा radhanisha . आणि एक दिवस तुम्हाला खरेच खूप छान वाटेल . भावाला फोटो पाठवायला सांगा वाचनालयात मुले तुमची पुस्तके वाचत असतानाचा .

मला वाटते तुम्हाला पुस्तकांवरील प्रेम व भिडस्तपणा, अचानक भावाने केलेली कृती या सगळ्या गोष्टींचा मनस्ताप होतो आहे. तुम्ही जर भावाला त्याबद्दल काही बोललात तर संबंध दुरावण्याची भीती वाटते आहे आणि न बोलून कोंडमारा होत आहे. समजू शकते तुमचे अस्वस्थ होणे.
पण स्पष्टपणे वेळीच न बोलल्याने यावर उपाय मिळणे कठीण आहे. तरीही जर तुमचा तो भाऊ थोडा मोकळ्या स्वभावाचा असेल तर जरूर त्याला न दुखावता आपले म्हणणे सांगून पहा. तसं नसेल तर मात्र तो चॅप्टर बंदच करून टाका.
काही वेळा नकळतपणे असे वागलेले असू शकते.

<<याबद्दल नेऊ का तुझी पुस्तकं वगैरे विचारलं सुद्धा नाही . तो पुस्तकं निवडत असताना मला वाटलं मला दाखवेल झाल्यानंतर आणि विचारेल यातली कुठली नेऊ , कधी नेऊ .. पण असं काहीही न करता तो डायरेक्ट भरून घेऊनच जाईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं …>>

मला वाटतं तुम्ही ऑल्रेडी मॅच्युअर्ड पणे वागल्या आहात. पण भावाला मॅच्युअर व्हायची गरज आहे. एकदा स्पष्ट बोला.

तुम्ही दिलेल्या बाकीच्या डिटेल्सवरून एकंदरीत तो भला माणूस वाटतो.

बरेचदा होते काय, पुस्तकप्रेमी माणसाच्या भावना पुस्तकात कश्या गुंतल्या असतात ते कित्येकांना कळत नाहीत. त्याच्यादृष्टीने कदाचित एकदा वाचून झालेले पुस्तक आता तुमच्याघरी धूळ खात रद्दी बनून पडलेय जसे की कालचे वर्तमानपत्र, ईतकीच त्यांची किंमत असेल. असा विचार असणे काही गुन्हा नाहीये हे पुस्तकप्रेमीच्या चष्म्यातून न पाहता तटस्थ म्हणून पाहिले तर लक्षात येईल. त्यामुळे भावाच्या घरातली त्याने वापरून झालेली त्याच्या कामाची नसलेली गोष्ट न्यायला कश्याला परवानगीची फॉर्मेलिटी हवी असा विचार त्याने केला असावा.

त्याला विचारा की सुट्टीतला ऊपक्रम असेल तर पुस्तके परत आणून देणार आहेस का, नसल्यास त्यात माझ्या काही आवडीची आहेत ती मी पुन्हा विकत घेतो.
जर तुम्ही विचारताना कसलाही रागलोभ मनात न ठेवता साधेपणाने वरील चौकशी केली तर त्याला काही वाईट वाटणार नाही आणि तो तुमचेही काही नुकसान होणार नाही हे बघेल.

सर्वात महत्वाचे.- ईथल्या प्रतिसादांच्या प्रभावाखाली भावाला तोडून बोलू नका. ईथे सल्ले देणारयांच्या डोळ्यासमोर आपण परीस्थितीचे जे वर्णन केले आहे त्याला अनुसरून जे चित्र उभे राहते त्यानुसार सल्ले मिळतील. ते चित्र चुकीचे असल्यास चुकीचा सल्ला.

अवांतर - लॉकडाऊन काळात मध्येच कुठे हा ऊपक्रम काढलाय? काळजी कशी घेणार?

थँक यू सर्वांना ... मी समजूतदार होण्याचा प्रयत्न करत आहे .. काही दिवसात राग विसरेन बहुतेक .. आता आहे ती धक्क्याची प्रतिक्रिया आहे , ती निवळेल हळूहळू ... पुस्तकं परत घेता येतील विकत .... ध्यानीमनी नसताना पर्सनल स्पेस , मालमत्तेचं व्हायोलेशन झाल्याचा फील आल्याने खरा मनस्ताप झाला .... सगळं घर माझंच असलं तरी टेबल खुर्ची फर्निचर हे माझं एकटीचं आहे असं मी म्हणू शकत नाही .. माझी एकटीची अशी फक्त माझी पुस्तकंच ना .... मी लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या स्पेसवर , जीव जडलेल्या वस्तूंवर अतिक्रमण करत नाही , तर तेही तेवढी काळजी घेतील अशी माफक अपेक्षा होती ... वस्तूंच्या अटॅचमेंट्स मधून मुक्त होण्याची गरज आहे

ऋन्मेष - हो , असंही असू शकतं कदाचित ... हा पॉइंट ऑफ व्ह्यू मला ध्यानात आला नव्हता ...

परत मिळणार का विचारलं होतं नेतानाच , मिळणार असं सांगितलं आहे .. पण ती शक्यता मला जवळपास शून्य वाटत आहे . जास्त खोदून विचारलेलं आवडणार नाही बहुतेक ...

अवांतर - काय घोळ घालत आहेत देव जाणे .

जास्त खोदून विचारलेलं आवडणार नाही बहुतेक ...
अवांतर - काय घोळ घालत आहेत देव जाणे .
>>>

मग हा काय घोळ घालत आहात लॉकडाऊनकाळात हिच ती खोदून विचारायची संधी आहे समजा Happy

माबोवरील सर्वात समजूतदार मनुष्यच या समस्येसाठी योग्य होता. त्याने समजूत घातली आणि तुम्हालाही ते पटले. आता इतर सर्वांचे दडपण गेले. चालू द्या.

>>>>त्याला विचारा की सुट्टीतला ऊपक्रम असेल तर पुस्तके परत आणून देणार आहेस का, नसल्यास त्यात माझ्या काही आवडीची आहेत ती मी पुन्हा विकत घेतो.>>>> सॉलिड्ड्ड!! उत्तम आय क्यु चे लक्षण.

ऋन्मेष +1
लगेच तुमची पर्सनल स्पेस रिस्पेक्ट केली गेली नाही वगैरे इतका कॉम्प्लेक्स विचार करून त्रास करून घेण्याइतका विषय मोठा आहे का याचा विचार पुन्हा एकदा करून पाहू शकता.

कदाचित एकदा वाचून झालेले पुस्तक आता तुमच्याघरी धूळ खात रद्दी बनून पडलेय जसे की कालचे वर्तमानपत्र, ईतकीच त्यांची किंमत असेल+11111111ऋन्मेष
माझ्या मुलाने चुकून माझं एक पुस्तक वॉशिंग मशीन मध्ये कपड्यात टाकलं होतं,कपडे वाळत घालताना माझ्या लक्षात आलं पण तेव्हा त्या पुस्तकाची अवस्था बघून मी एकदम रडायला लागले आणि नवऱ्याला वाटलं माझं एखादं नवकोरं पुस्तक होत ते,जेव्हा त्याला समजलं ते जून होतं आणि 4 वेला वाचून पण झालं होतं तेव्हा त्याच्या डोळ्यात हिला वेड बीड लागलं आहे का असाच प्रश्न सहज दिसत होता,
सांगण्याचा मुद्दा हा की आपला जीव किती अडकला आहे त्या पुस्तकात ते वाचनाशी संबंध नसणाऱ्या माणसाला नाही समजू शकत,so तुमच्या भावाची फारशी चूक नाही,त्याला वाटलं असणार वाचून झालेलीच पुस्तकं आहेत so उलट माझेच आभार मानायला हवेत हिने ,ह्यांची रद्दी मी नेली म्हणून

वेगळ्या धाग्याचा विषय आहे पण घराबाहेर न पडलेले लोक लवकर मॅच्युअर होत नाहीत. यु आर नॉट अलोन.... तुमच्यासारखे भरपूर आहेत...

घराबाहेर राहणारे लोक लवकर/उशिरा समंजस होतात हा एक गैरसमज आहे. घराबाहेर दुसऱ्याशी वाईट वागणारे मॅच्युअर झाले असते तर तसे वागले नसते.

धन्यवाद सगळ्यांनाच ... बोलून मन मोकळं केल्यावर फार हलकं वाटलं .. जज न करता समजुन घेऊन प्रतिसाद दिलेत त्यामुळे एकटं पडल्याची , आपल्याला समजून घेणारं कोणीच नसल्याची भावना बरीचशी कमी झाली .... Happy

बिरबलाच्या गोष्टीमध्ये एक कोडं होतं ना की तीन प्रश्न विचारले तरी एकच उत्तर दयायचे. भाकरी का जळली? घोडा का अडला? इ इ आणि उत्तर एकच ' न फिरवल्यामुळे' तसे मायबोलीवरचे *तीन वेगळे धागे आहेत, पण उत्तर एकच ' वेळच्यावेळी मनातलं न बोलल्यामुळे समस्या निर्माण झाल्या' आणि स्वतःच्या मानसिक कमकुवतपणा म्हणा किंवा भिडस्तपणामूळे मनस्ताप झाला. इतका प्रचंड त्रास होणारा विषय होता तर संयमित भाषेत वेळीच सांगायला हवं होतं.

ह्याच माणसाने मागे आमच्या घरातील आजारपणाच्या वेळी धावपळ केलेली आहे , ब्लड दिलेलं आहे .. देव न करो परत वेळ आली तर मदतीला उभा असणार आहे >>>> तेव्हा याने विचारून परवानगी घेऊन मदत केली का? तो गृहीत धरतो उगीच पुढाकार घेऊन न सांगताच धावपळ करतो असे वाटले का? त्याने हक्काने मदत केली आणि त्याच हक्काने पुस्तके घेतली. कदाचित हा माणूस अगदीच निर्मळ मनाचा असू शकतो. त्यांच्या मनात देणं घेणं याबाबतीत परकेपणा नसेलच. त्यांना तुम्ही तुमचं कुटुंब कदाचित या सगळ्या फॉर्मलिटीजच्या पलीकडे जाऊन जवळ वाटत असेल, पण तुम्हाला नाही. मग मनस्ताप करण्याऐवजी सांगून टाकलेलं बरं. नातं तुटणार नाही यासाठी फक्त टोन आणि भाषा याची काळजी घेतली की झालं.

* 1. कथा - सासरची मंडळी भेदभाव करतात. लग्न झालं तरी सामावून घेतले नाही, तुम्ही आम्ही असा फरक करतात अशा अर्थाची लेटेस्ट कथा वाचली होती. लेखिका आठवत नाही
2. वेलांटीची कथा
3. हे राधाचं मनोगत

तुझी प्रतिक्रिया साहजिक आहे गं.ज्याला पुस्तकं जीव की प्राण असतो त्याला ती कोणालाही द्यायला विशेष आवडत नाहीत.
पुस्तकं परत देणं ही अगदी विसरण्या सारखी बाब असते ज्यांना ती महत्वाची नसते.
पुस्तक किती दुर्मिळ आहे यावरही आपली रीएक्शन अवलंबून.जर किंडल वर सोपेपणी परत मिळत असेल तर हल्ली जाऊदे म्हणता येतं.माझी मैत्रीण फाईव्ह पॉईंट समवन 2 वर्षापूर्वी उचलून घेऊन गेली आहे.अर्थात तिची एकंदर वाचनाची गती बघता तिने ते अजूनही पूर्ण वाचले नसेल.ते गेल्याचं फार काही वाटलं नाही.
एका मायबोलीकरांनी अमेरिकेतून 'एनीथिंग कॅन हॅपन' हे जुनं दुर्मिळ पुस्तक घेऊन नातेवाईकांकडून पाठवलं.नातेवाईकांनीही भरपूर त्रास घेतला कुरियर करायला. आता याची परतफेड मी भारतातलं दुर्मीळ पुस्तक पाठवून कशी करणार,कधी करणार ,हा सुदामा प्रश्न आहे ☺️☺️ वेळ येईल तेव्हा पाहू.पण परतफेड करण्याची इच्छा आहे.
भावाने इतकं केलं असेल तर मन मोठं करून पुस्तकं विसरावीच लागतील.मिळाली परत तर बोनस.नाहीतर इबुक्स घेऊन टाक.

शेवटची ओळ वाचली नव्हती. मायबोलीवर असे(च) प्रश्न विचारणा-यांची संख्या खूप आहे. कशाला दुखवा म्हणून जे वाटतं ते लिहीणार नव्हतो. ब-याच धाग्यांमधे ते फेक प्रोफाईल्सने काढलेले असतात. अशा वेळी त्या प्रोफाईलचा उद्देश खराच प्रश्न विचारणे हा आहे की खडा टाकून गंमत पाहणे आहे हे ही समजत नाही. पण अशाच एका धाग्यावर एका प्रतिसादाने डोळे उघडले. त्यात त्या महिलेने म्हटले होते की मी लेखक खरा कि खोटा, समस्या खरी कि खोटी , नेज्युईन की फालतू हे बघत नाही. मी खरी आणि जेन्युईन मानूनच प्रतिसाद देते. न जाणो कुणी गरजू प्रतिसाद वाचत असेल तर त्याला धागा काढायचीही गरज लागणार नाही. दृष्टीकोण अत्यंत महत्वाचा वाटला.

माणूस समाजात राहणारा प्राणी आहे. समाजात राहण्याची कला शाळेत शिकवत नाहीत ना ती पुस्तके वाचून येते. ती येते माणसांशी व्यवहार करून. माणसे वाचणे हे सर्वात महत्वाचे. केवळ पुस्तके वाचून. सोशल मीडीयात पांढ-याचे काळे करून माणसे समजत नाहीत. आज चाळीशीत गेलेल्यांनी सोशल मीडीया येण्याच्या आधी ब-यापैकी माणसं वाचून ठेवली आहेत. आताच्या पिढीत बहुतेकांना ते सुख नाही.

प्रत्येकाच्या आवडीनिवडी असतात. त्या जोपासाव्यात. पण समाजात वावरताना लवचिकता महत्वाची. आपले राग, लोभ, आवड, निवड संपूर्ण समाजावर बंधनकारक करता येत नाही. अ‍ॅडजस्टमेण्ट्स फार महत्वाच्या असतात. गिव्ह अ‍ॅण्ड टेक महत्वाचे असतेत. एकतर्फी काहीच असत नाही.

आपल्याला मदत करणारा त्याचा वेळ, पैसा, श्रम, बुद्धी आपल्यात इव्न्हेस्ट करत असतो. भावनिक गुंतवणूक करत असतो. त्याचे मोल होऊ.. शकत नाही. केवळ पुस्तके न घेता गेला म्हणून केलेली धूसफूस ही एकलकोंड्या किंवा माणूसघाण्या वृत्तीचे निदर्शक आहे. आपण वाट्टेल तेव्हां मदत घ्यायची, तेव्हां त्याला नि़क्षून सांगायचे नाही की आमचे आम्ही पाहू म्हणून. आणि जर त्याच हक्काने वाचून झालेली पुस्तके नेली तर धुसफुसत रहायचे हे समाजात एकीने राहण्याचे लक्षण नाही. कुठे अ‍ॅडजस्टमेंट करायची हे वळत नसेल तर संबंध तोडलेले चांगले. जगाला फाट्यावर मारून राहा. कुणी तुमच्याकडे येणार नाही.

आपल्याला कामाला येणा-याच्या प्रती कृतज्ञता असणेही महत्वाचे असते.

मी माझच एक तत्व नेहेमी पाळतो. अ‍ॅक्ट. नेव्हर रिअ‍ॅक्ट.
म्हणजे, तुमचा भाऊ पुस्तक घेउन गेला ना, जाउ दे. तो तस चुकिच वागला (तुमच्या दृष्टीने चुकिच) म्हणून तुम्ही तसच चुकिच वागू नका. (तुमच्या दृष्टीने चुकिच). तुम्हाला योग्य वाटेल तसच वागा. आणि तस वागलात तर पश्चात्ताप कशाला करून घेताय. तुम्हाला वाटल म्हणून तुम्ही सोडून दिल, काही बोलला नाहीत. झाल तर मग.

Pages