माझ्यामध्ये मॅच्युरिटी कशी आणू ?

Submitted by राधानिशा on 15 May, 2020 - 09:13

खरं तर घटना क्षुल्लक आहे पण डोक्यातून जात नाहीये पटकन . मला वाचनाची आवड लहानपणापासून आहे आणि गेल्या 12 - 14 वर्षात खरेदी केलेल्या पुस्तकांनी एक लहान कपाट भरलेलं आहे . मला माझी पुस्तकं शेअर करायला मनापासून आवडत नाही .. लोक हरवतात , नेलेल्यापैकी सगळी आणून देत नाहीत असे अनुभव आहेत . चांगली गोष्ट की सहसा कुणी आमच्या घरी पुस्तकांची मागणी घेऊन येत नाही .

4 दिवसांपूर्वी अगदी जवळच्या नात्यातील एक भाऊ आला आणि बास्केट भरून पुस्तकं घेऊन गेला . मुलांसाठी लायब्ररी सुरू करण्याचा उपक्रम सुरू करायचा आहे .

याबद्दल नेऊ का तुझी पुस्तकं वगैरे विचारलं सुद्धा नाही . तो पुस्तकं निवडत असताना मला वाटलं मला दाखवेल झाल्यानंतर आणि विचारेल यातली कुठली नेऊ , कधी नेऊ .. पण असं काहीही न करता तो डायरेक्ट भरून घेऊनच जाईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं ...

कोणीही दुसऱ्याची वस्तू " नेऊ का ? " म्हणून साधी विचारणाही न करता नेऊ शकेल हा अनुभव मला आतापर्यंतच्या आयुष्यात आलेला नव्हता , तो आता आला . .

मी तोंडाला कुलूप लावून बघत बसले , तोंड उघडून मला पुस्तकं द्यायची नाहीत असं स्पष्टपणे सांगू शकले नाही , ही माझी चूक आहे . मीच जबाबदार आहे .

तरीही संताप होतो आहे .

पुस्तकं मी परत परत वाचते , ती शोभेसाठी नाहीयेत . आणि वाचनालय चालवण्याचा उपक्रम करण्यात मला काडीचा रस नाहीये ... ज्यांना करायचा असेल त्यांनी तो पदरचे पैसे खर्च करून खुशाल करावा , दुसऱ्याने आयुष्यभर निवडून जमा केलेली पुस्तकं परस्पर घेऊन जाऊन नाही , असं मला वाटतं .

पुस्तकं आता गेल्यातच जमा आहेत ..

पुस्तकांसाठी तडफड होते आहे असंही नाही ... जरा नीट बोलून मागितली असती तर मी किंचित मनाविरुद्ध का होईना दिली असती ... थोडी थोडी करून .. पण माझ्या मताला काडीची किंमत न देता परस्पर माझी वस्तू उचलून नेल्यामुळे इगो दुखावला गेला आहे .

कौटुंबिक संबंध खूप जिव्हाळ्याचे आहेत .. क्षुल्लक घटनेमुळे मनात रक्ताच्या नात्याच्या व्यक्तीबद्दल तिरस्कार जन्मू पाहत आहे .. ह्याच माणसाने मागे आमच्या घरातील आजारपणाच्या वेळी धावपळ केलेली आहे , ब्लड दिलेलं आहे .. देव न करो परत वेळ आली तर मदतीला उभा असणार आहे , वगैरे सगळं समजतं आणि आपणच पराचा कावळा करत आहोत असं वाटतं ... कळत आहे पण वळत नाहीये ...

पुस्तकं कधीही परत विकत घेता येतील , जर ही पुस्तकं परत आली नाहीत तर सगळी परत विकत घेऊ पण नेलेली परत आणून दे , असं सांगून त्याला दुखावू नये असं माझ्या वडिलांनी सांगितलं ... मलाही ते पटतं , पुस्तकं महत्वाची नाहीतच पण अशा प्रकारे गृहीत धरल्याने अन्याय झाल्याचा फील आला आहे त्याचा त्रास होतो आहे .

माफ करणं ही गोष्ट माझ्यासाठी नॅचरली येत नाही .. स्वभावातले दोष समजतात पण दूर कसे करू समजत नाही . मी अधिक मॅच्युअर का नाहीये ....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राधा निशा..खूप relate करू शकतो तुमच्या प्रसंगाशी...मी.देखील बाहेर, हॉस्टेल वर राहिलो नाही कधी त्यामुळे असेल...पण खरं सांगू तुमच्या इतका प्रामाणिकपणे आपल्या भावना नसतो मांडू शकलो मी... त्याबद्दल अभिनंदन

अश्या परिस्थितीत स्वतःला समजवायचा की आपल्याकडे त्याचं काही उधार होतं, ते तो विनाव्याज घेऊन गेला...कदाचित आपण पास्ट मध्ये अजाणतेपणी त्याच्याकडून काही घेतल आणि तोदेखील त्याच्या अजाणतेपणी घेऊन गेला अस समजावा स्वतःला... It really works

हीच ती Maturity

अमा, काय चिरकालीन सत्य सोप्या शब्दात लिहिलेत! तुमचे प्रतिसाद नेहमीच नवीन काही देऊन जातात.
राधानिशा, तू तुझा प्रश्न ओळखला आहेस हे महत्वाचे. या निमित्ताने तुला तुझ्या प्रायोरिटीज काय आहेत हे कळले आणि तू त्या योग्य रितीने मांडल्या आहेस. या दोन्ही साठी तुझं कौतुक!
तू अजून कमावती नाहीस असे लिहिले आहेस तेव्हा तुझे वय लक्षात घेता तुझ्यात समजूतदारपणा नाही हे ठीक आहे! मी दहावी ते कॉलेज या वयात कदाचित अशीच चिडचिड केली असती. पण त्याच जोडीला तुला तुझ्या भावाने वेळप्रसंगी केलेली मदत देखील आठवली हे महत्वाचे आहे.
मी स्वतः एक पुस्तकप्रेमी आहे. आणि मी माझी पुस्तकं सहज देऊ शकत नाही आजही. पण जर प्रायोरिटीज ठरवण्याची वेळ आली तर वस्तू पेक्षा माणूस महत्वाचा असतो हे मला आता माहीत आहे. वस्तू परत मिळते. माणूस परत मिळत नाही.
तुझा भाऊ कदाचित फारसा पुस्तकप्रेमी नसेल पण चांगला माणूस आहे असं वाटतं. तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत केली, आज लहान मुलांना पुस्तकं वाचायला मिळावी म्हणून प्रयत्न करतो आहे. हे खूप चांगलं आहे.
एक वयाने मोठी व्यक्ती म्हणून मी एवढंच सांगेन. पुस्तकांच्या पलीकडे एक मोठं खरंखुरं जग आहे. त्यातली माणसं पण वाचता आली पाहिजेत. माणसंच कशाला, प्राणी पक्षी, झाडं सगळ्यांकडे पुस्तकांपेक्षा अद्भुत कहाण्या आहेत.. फक्त आपल्याला डोळे कान उघडे ठेवून पाहता ऐकता आलं पाहिजे. Try to go beyond books!
पोथी पढ पढ जगमुआ पंडित भया न कोई, ढाई अक्षर प्रेम के पढे सो पंडित होई!
When you will start reading the book of life, you will be more mature automatically! एक चांगला माणूस बनण्याची प्रक्रिया निरंतर चालू असते. तू जशी जशी वयाने, अनुभवाने मोठी होशील आणि माणसं वाचायला शिकशील तशी आपोआप mature होशील!
शेवटी एक माझं आवडतं सुभाषीत
पुस्तकस्था तु या विद्या, परहस्तगतं धनम्|
कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या, न तद् धनम्||
अर्थ - पुस्तकातले ज्ञान आणि दुसऱ्याच्या हाती असलेले धन या दोन्ही गोष्टी कामाच्या वेळी उपयोगी येत नाहीत!
पुस्तकाची फक्त physical प्रत बाळगण्यात आणि त्यातील सार आत्मसात करण्यात फरक आहे. The latter will stay with you forever! तुला खूप सार्‍या शुभेच्छा!

माझे पुस्तकावर प्रेम आहे. संभाळून वापरतो... पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना सहज पणे मिळावे म्हणून प्रयत्न करतो... त्या वाचकाने ते पुस्तक (त्याचे वाचून झाल्यावर) पुढे ढकलावे असे अपेक्षित आहे.

तुम्हाला तुमचे पुस्तक परत मिळावे असे वाटत असेल तर... विकत घेतल्यावर नाव लिहा... "पुस्तक वाचन झाल्यानंतर... कृपया परत करा ". पुस्तकांचा मोठा फाफटपसारा असेल तर कोण कोण पुस्तक च वाचण्यासाठी नेत असेल तर एका कागदावर त्याची नोंद ठेवा.

तुमच्या वडीलांनी योग्य सांगितले आहे... काही निवडक व्यक्ती, आप्त ( क्वचित अनोळखी माणसांना) यांना पुस्तकापेक्षा जास्त महत्व देणार.

कॉलेजमध्ये असताना घरी अचानक पाहुणे आले. त्यांची मुलगी माझ्या वयाची होती आणि माझ्यापेक्षा दुप्पट वाचणारी होती. पहिल्यांदा घरी आली होती म्हणून आईनं मी नवीन आणलेली कोरी पुस्तकं तिला भेट म्हणून दिली. (मी ती आधी लायब्ररीमध्ये वाचली होती). त्यानंतर मी घरात जो गोंधळ घातला, नंतर कोणी माझ्या पुस्तकांना हात नाही लावला. आता १२-१३ वर्षाने मी पण आपसूक माझी पुस्तकं लोकांना भेट देते. भेट द्यायला घरात गठ्ठा आणून ठेवते. ज्या लोकांनी मला पुस्तकं भेट दिली आहेत, त्यांच्याशी एक वेगळं जवळचं नातं वाटतं.
(तरीपण कुणी न विचारता उचलून नेली तर आवडणार नाही, पण त्यांच्या उपक्रमात सहभागी व्हा, लहान मुलांना पुस्तकं वाचायला लावणं हे खूप सुंदर आहे आजच्या जगात.)

Submitted by iloba on 28 May, 2020 - 10:4 >> तुमचा प्रतिसाद आवडला.

ज्यावेळी तुम्हाला आपली पुस्तके इतरांशी शेअर करावी वाटतील त्यावेळी तुम्ही मॅच्यूर व्हाल.
तुम्हाला भरपुर पुस्तके वाचावयास मिळोत हि सदिच्छा.

एकांच्या विपूतून आलेल्या प्रतिसादावर Surfing करता करता आज हा धागा वाचला गेलाय...
मला तर पहिल्या २-३ lines मध्ये माझी मामी लिहीतीय की काय याचाच भास झाला... आणि जरा घाबरलो देखील...
मी चार वर्षांपूर्वी पुण्यात मामाकडे खूप दिवस राहिलो होतो... मोठ्ठी सुट्टी होती...
मामीकडे खूप पुस्तके आहेत. मी तिथे देखील सुट्टित माणिकबागेच्या Seed Infotech मध्ये course करता करता मामीची बरीच पुस्तके सुट्टित वाचून काढली... मग परत यायच्या काही दिवस आधी मामा मामी ने घर आवरायला काढले होते कारण गुढीपाडवा होता.
मी देखील त्यांना मदत करत होतो... आणि त्याच कामात अजून काही पुस्तके सापडली. मी मामीला विचारले की "मामी ही पुस्तके घेऊन जाऊ का"

मामी:- "हो! पण परत आणून दे"

त्यांसोबत माझ्या मामाने देखील मला काही English Speaking ची पुस्तके दिली होती... मी ती सर्व पुस्तके घेऊन आलो.

आणि मागच्या lockdown च्या time ला जेव्हा आज्जी इकडे आलेली होती... मामाने सांगीतले होते की English Speaking ची पुस्तके पाठवून दे... मग सापडली तेवढी त्या तीन चार दिवसांत शोधून आज्जी बरोबर lockdown उठल्या उठल्या पाठवून दिली... पण मामी ची दोन पुस्तके

१) सुरेश भटांचे - रंग माझा वेगळा
२) जयंत नारळीकर यांचे 'प्रेषित'

ही पुस्तके माझ्याकडेच राहून गेली... किम्बहूना मामी ने मामाच्या पुस्तकांच्या सोबत मागीतली नव्हती म्हणून अजूनही अजूनही माझ्याचकडे आहेत.
पण तुमचा हा धागा वाचून जाणवतंय की मी खरच खूप मोठी चूक केलीय.
आता जो कुणी पुण्याहून सोलापुरात आजोळचा पहिला नातेवाईक येईल त्या सोबत मामीची ही दोन पुस्तके मी पाठवणार म्हणजे पाठवणारच आहे!!!
कितीही जवळची आणि रकताची नाती असली तरी काही गोष्टी या आपण आपल्याला हव्या तश्या पद्धतीने वापरू नये
आणि त्या गोष्टी त्यांच्या च आहेत याची सम्पूर्ण जाण ठेवावी हे मी शिकलो .... अगदी मनापासून आपला ऋणी आहे राधानिशा!!

Pages