आपल्या बाल्कनी/टेरेसमध्ये कमी कपड्यात वावरणे कायद्याने गुन्हा होऊ शकतो का?

Submitted by Parichit on 11 May, 2020 - 04:52

थेट मुद्यावर येतो. आमच्या इथे प्रत्येक घराला स्वत:चा छोटासा टेरेस आहे. तो बेडरूम ला जोडलेला आहे. आज सकाळी सकाळी सोसायटीमधील एका स्वयंघोषित संस्कृती रक्षकाने प्रचंड डोके खाल्ले. विषय काय तर मी कमी कपडे घालून माझ्या घराच्या टेरेसमध्ये वावरतो यावर त्याचा आक्षेप होता. हा गृहस्थ आज सकाळी सकाळी बेल वाजवून भांडायला आलाय. बेल कुणी वाजवली म्हणून दार उघडले. बघतो तर दारात काळे थोबाड घेऊन हा उभा. याच्याविषयी आजवर मला कधीच चांगले वाटले नाही. लोकल नेता आहे. जिथे तिथे नाक खुपसायची सवय आहे. पोरं बाळगली आहेत आणि त्यांच्या जीवावर याची सांस्कृतिक दहशत चालते.

मला म्हणाला, "तुमच्या टेरेसमध्ये तुम्ही कसेही फिरत जाऊ नका. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या तक्रारी आल्यात. ते सांगायला आलोय"

मला आश्चर्य वाटले. म्हटले "मला कळले नाही कसल्या तक्रारी? मी तर कुणाला त्रास होईल असे काहीच केलेलं नाही"

तर तो ताड्कन म्हणाला "अवो सकाळी कसेही बसता आणि वावरत असता तुम्ही टेरेसवर. इथे फ्यामिली राहतात. आपल्याच आया बहिणी आहेत आजूबाजूला. शोभतं का तुम्हाला हे?"

मग मी पण तडकलो म्हणालो "अहो काय संबंध? माझा टेरेस आहे. लॉकडाऊन असल्याने मला घरीच जिम करावी लागते. मी टेरेसवर करतो. कुणाचा काय संबंध?"

"अहो मग तुम्ही तुमच्या घरात करा ना तुम्ही. टेरेस वर करायचे तर फुल कपडे घालून करा काय करायचे ते"

"टेरेस माझा आहे. तुम्ही सांगू नका मला मी तिथं कसले कपडे घालायचे ते"

मग त्याने भयंकर त्रस्त होऊन माझ्याकडे बघितले. "थांबा एक मिनिट" म्हणून कुणालातरी फोन लावला. फोनवर म्हणाला, "ये जरा रे इकडं. हे काय म्हणतात. बघ ये"

मग लक्षात आले हे प्रकरण वाढत चालले आहे. पण मी काही गुन्हा केला नव्हता म्हणून मी सुद्धा घाबरलो नाही. एव्हाना ती व्यक्ती ग्रीलच्या बाहेरच होती. मी सुद्धा दरवाजात उभाच राहिलो. म्हटले बघू काय होते. दोन तीन मिनटात त्याचा एक पाळीव सहकारी आला. अंगापिंडाने टोटल गुंड वाटेल असा. आल्या आल्या त्याने आपल्या नेत्याला विचारले,

"काय दादा काय झालं?"

मग 'दादा'ने सांगितले "आपली कालची चर्चा यांना सांगितली. प्रेमाने सांगितले टेरेसमध्ये नीट कपडे घाला. तर ऐकून न घेता माझ्याबरोबर वाद घालायला लागलेत"

त्याबरोबर माझे काही ऐकून न घेता हा सहकारी हाताचे बोट माझ्याकडे करून मला थेट दम द्यायच्या भाषेत बोलला,

"उद्यापासून टेरेसवर नीट वागायचं. मला सगळं कळतं... एकपण तक्रार आली नाही पाहिजे. एवढंच सांगयला आलोय" असे म्हणून आपल्या 'दादा' नेत्याला "चला ओ" असे म्हणून परत जाऊ लागला

आता मला ट्यूब पेटली. एकपण तक्रार म्हणजे एकच तक्रार याला आली असणार याच्याकडे. आणि ती सुद्धा कोणी केली असणार हे मला स्पष्ट अंदाज आला. इथे समोरच्या बिल्डिंगमध्ये त्याची 'कोणीतरी' राहते. त्या दोघांचे नक्की काय नाते आहे याची कुजबुज सोसायटीत अजूनही सुरु असते. तर मी टेरेसमध्ये व्यायाम करत असताना त्या बाईसाहेब काही वेळा त्यांच्या टेरेसमध्ये/खिडकीत मला दिसल्या होत्या. माझ्याकडे पाहत उभ्या होत्या. मी पाहून न पहिल्यासारखे केले होते. मी कशाला लक्ष देऊ कोण माझ्याकडे बघतंय तिकडे? पण आता मला कळले कि खरे दुखणे तिथेच आहे. तिने याला सांगितले असावे आणि ह्याला वाटले असेल मी तिला दिसावे म्हणून मुद्दाम टेरेसमध्ये कमी कपडे घालून व्यायाम करतोय.

"ठीक आहे ठीक आहे. मला कळतं काय माझ्या टेरेसवर कसं वागायचं. तुम्ही सांगू नका. मी कुणाला माझ्या टेरेसमध्ये बघायला सांगितलं नाही", मी वर्मावर बोट ठेवले आणि म्हणालो "कुणाची तक्रार असेल तर खुशाल कायद्यानुसार काय असेल ते करा"

असे म्हटल्यावर तो लगेच मागे वळला. म्हणाला,

"ओ... ओ... कायद्याची भाषा शिकू नका आम्हाला. कळलं ना? कायद्याने गेलो तर लय महागात पडंल तुम्हाला. मर्यादेत राहा. कळले का? जास्तीचे शहाणपण नको आहे आपल्याला..."

"हां... ठीक आहे ठीक आहे... या आता" मी म्हणालो.

"ठीक आहे म्हणजे? माज करायचा नाही. नीट ऐकायचं. सोसायटीत तक्रारी आल्यात तुमच्या विरोधात. फोटो काढून ठेवलेत तुमचे. पोलीस स्टेशनला तुमच्या विरोधात जाऊ शकतो. तुम्हाला म्याटर वाढवायचं आहे का तेवढं सांगा"

"माज मी नाही करत. धमकी कुणाला देता? जा पोलिसांत जायचे तर. टेरेस माझा आहे मी कायपण करीन" मी हिम्मत एकवटून बोललो. खरे म्हणजे आतून घाबरलो होतो. कारण कोणी फोटो काढले असतील याची मी कल्पना पण केली नव्हती. हा खरेच गुन्हा आहे का हे सुद्धा माहित नव्हते.

मग तो निर्वाणीच्या सुरात बोलला, "ओ... तुम्हाला माहित नसलं तर एकच शेवटचं सांगतो, टेरेस तुमच्या मालकीचा नसतो. टेरेसवर अर्धा अधिकार सोसायटीचा असतो. कायद्याने टेरेस बंद करता येत नाही. म्हणून तिथं जे काय करायचं ते मर्यादेत राहून करायचं. नाहीतर दोनशे चौऱ्याण्णव लागून तुरुंगात जाल तेंव्हा कळेल. मला जास्त बोलय लावू नका. माझे सगळे पत्ते मी अजून खोललेले नाहीत..."

"हां... बर ठीक आहे" मी पुटपुटलो

अशा रीतीने इशारावजा धमकी देऊन ते दोघे निघून गेले. काहीही गुन्हा नसताना मला हे सगळे सहन करावे लागले. मी जरा घाबरलो. इंटरनेट वर शोधून बघितले. दोनशे चौऱ्याण्णव सार्वजनिक जागेसाठी आहे पण ते आपल्या टेरेसवर कसे लागू होऊ शकेल हे कळेना. धुंडाळून धुंडाळून थकलो कुठेच काही क्ल्यू भेटला नाही. अखेर याने आपल्या आयटमला कुणी इम्प्रेस करू नये म्हणून मला पोकळ धमकी दिली असावी या निष्कर्षाप्रत मी आलो. पण थोडी काळजी आहेच अजूनही.

कल्पनाही केली नव्हती असे गंभीर आरोप जर तुमच्यावर एखाद्याने केले तर काय अवस्था होईल? सकाळपासून फार मनस्ताप झालाय म्हणून सल्ला हवा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बनियान आणि अंडरपॅन्ट घालता ना? घालत असाल तर कसली भीती. तुमच्या ठिकाणी मी असतो तर त्या भाईसोबत चेन्नई एक्सप्रेस स्टाईल मारामारी केली असती. घरी येऊन धमकी देतो म्हणजे काय.

अंतर्वस्त्रातला पुरुष बघून महिलांना ऑकवर्ड वाटू शकते.
मी घरी उघडाच असतो. पण घरी कोणी बायका आल्या कि शर्ट टिशर्ट चढवतो. अगदीच आत्या मावशी ज्या मला आईसारख्या आहेत त्यांच्यासमोर उघडे चालते. बाकी बायकांसमोर नाही.
अर्थात खाली शॉर्ट असतेच. पण ती सुद्धा नसेल आणि अंतरवस्त्रच असेल तर ते आणखी कसेसेच वाटू शकते कोणत्याही महिलेला.

एक तंतोतंत सिमिलर जुना किस्सा आठवला.
मित्रासोबत कॉलेजातील मैत्रीणीच्या घरी गेलेलो. ती मला आवडायची. बेल वाजवली आणि दरवाजा उघडायची दारात ऊभे राहिलो. ईतक्यात एक ईस्त्रीवाला आला आणि त्याने शेजारच्या दरवाज्याची बेल वाजवली. आतून एक तिशीचा उघडबंब मिशीवाला पुरुष फ्क्त अंडरवेअरवर दरवाज्यात आला आणि तिथेच ईस्त्रीवाल्याशी गप्पा मारत बसला. म्हणजे शेजारचे पाजारचे कोणीही त्याला तश्या अवस्थेत सहज बघू शकतील. माझ्या मैत्रीणीलाही तो तसा दिसत असेल या विचाराने मला खरेच राग आला. सोबतचा मित्रही हरामखोर त्यावरून मला पुढचे कित्येक दिवस चिडव्त होता. त्याला आम्ही जॅंगो असे नावही दिलेले.

तर काय चूक काय वाईट काय कायदा काय नाही हे तुमचे तुम्ही ठरवा. पण एखाद्या महिलेने यावर आक्षेप घेणे किंवा तिच्या प्रियकराला / नवरयाला हे खटकणे यात काही गैर नसून स्वाभाविक आहे असे मला वाटते.

त्या आयटमने केस केलि तर महागात पडु शकते, २९४ नाहि तर ५०९, आणि बरेच असतिल, सजा नाही झाली तरि मानसिक त्रास भरपुर होउ शकतो.
मी कायदेतज्ञ नाही. Wink

व्यायाम करतानाचा एक फोटो टाका मग सांगू हे आक्षेपार्ह वाटतं का नाही ते Happy
>>>

हा जेन्युईनली चांगला पॉईण्ट आहे.

जर धागाकर्त्यांना ईथे तेवढ्या कपड्यात फोटो टाकाय्ला संकोच वाटला तर त्यांचे त्यांनाच ऊत्तर मिळेल.


जर धागाकर्त्यांना ईथे तेवढ्या कपड्यात फोटो टाकाय्ला संकोच वाटला तर त्यांचे त्यांनाच ऊत्तर मिळेल.
>>>
राईट!
जर धागाकर्त्याला ओळख न देण्याची इच्छा असेल तर चेहरा ब्लर करून फोटो टाकता येईल.

व्यायाम करतानाचा एक फोटो टाका मग सांगू हे आक्षेपार्ह वाटतं का नाही ते Happy
Submitted by आशुचँप on 11 May, 2020 - 16:38
>>>>
असा प्रश्नाच्या मुळावर घाला घालू नये. Happy

तुम्ही जे कपडे घालून टेरेसमध्ये जाता, तसेच कपडे समोरच्या टेरेसमधील पुरुष घालून आला तर तुमची बायको / बहीण / तरुण मुलगी याना कम्फर्टेबल वाटेल
का, असं त्यांना एकदा विचारा. त्या हो म्हणतात की नाही, यातच तुम्हाला उत्तर मिळून जाईल.

तुमचे धागे कधीच का जेन्यूईन नसतात? मी वाचलेल्या तुमच्या सगळ्याच धाग्यातील तुमचे विचार सगळीकडे असे तिरपागडे असतात. की उगीच controversial विषय निवडून धमाल उडवून द्यायला आवडते?

हा माबोवर विचारण्याचा प्रश्न तरी होता का? उगीचच !

परिचित तुम्हाला मुद्दा कळलाच नाही.....
शरीर कमावलेले असेल, प्रमाणबद्ध असेल तर संकोच वाटत नाही.... अजून व्यायाम वाढवा... बॉडी शेप मध्ये आणा... तक्रार बंद होऊन जाईल...

लक्षात ठेवा... सलमान ने कपडे काढले तर कोणत्याही स्त्री ला अन कम्फर्टेबल वाटत नाही... तेच नवाज ने किंवा आलोक नाथ ने काढले तर नको नको वाटते...

पुरुषवादी लोक चिडू नये म्हणून सांगतो हे दुसऱ्या बाजूने देखील सत्य आहे... तुमच्या समोर टेरेस वर एखादी पॉट सुटलेली....हात पाय जाडे असणारी स्त्री कमी कपड्यात येत असेल... किती त्रासदायक आहे ते... तेच एखादी ऍथलेटिक बॉडी असणारी स्त्री असेल तुम्हाला डिसकंफर्ट जाणवणार नाही....

म्हणून म्हणतो डायट आणि व्यायाम करा परिचित....

> व्यायाम करतानाचा एक फोटो टाका मग सांगू हे आक्षेपार्ह वाटतं का नाही ते

>>> मी धाग्यातच लिहिले आहे कि कोणी फोटो काढले असतील याची मी कल्पना पण केली नव्हती. याचाच अर्थ ते फोटो सार्वजनिक ठिकाणी जाने मला अभिप्रेत नाही आणि नाहीच. कारण टेरेस माझा आहे आणि तिथे मी कशा अवस्थेत वागावे हा पूर्ण माझा प्रश्न आहे. ती सार्वजनिक जागा नाही. आणि प्रश्न असा आहे कि तिथे सार्वजनिक जागेचे नियम लागू पडतात का? अहो हाच तर मुद्दा आहे ना. मी टेरेसमध्ये व्यायाम करतानाचे फोटो इथे टाकायला सांगून... व्हाट आर यू ट्राइंग टू प्रुव? म्हणजे मला नाही कळले. भले मी पूर्ण कपडे घातले असोत किंवा नसोत. टेरेस हि सार्वजनिक जागा नाही असा माझा मुद्दा आहे तर तो मनुष्य मला सार्वजनिक जागेचे कलम लाऊ पाहत होता/पाहतोय.

> तुम्ही जे कपडे घालून टेरेसमध्ये जाता, तसेच कपडे समोरच्या टेरेसमधील पुरुष घालून आला तर तुमची बायको / बहीण / तरुण मुलगी याना कम्फर्टेबल वाटेल का, असं त्यांना एकदा विचारा.

>>> अहो माझ्या घरातल्या लोकांनी इतरांच्या घरात/बाल्कनीत/खिडकीत डोकावून का बघावे? चूक कोणाची? उद्या कोणी म्हणेल अंघोळ करताना खिडकीतून पहिले आक्षेपार्ह वाटले. अरे कोणी सांगितले बघायला?

माझे धागे आणि समस्या कधीच खोट्या नसतात आणि हे मी यापूर्वी पण सांगितले आहेच.

एवढा काँमनसेँस तर सगळ्यांना असतोच की घरात किंवा बाल्कनीत असतांना कुनासमोर किती व कोणत्या प्रकारचे कपडे घालावे. एवढ्या साध्या गोष्टी बद्दल जर कुणा व्याक्तिला किंवा माबोवर प्रश्न विचारावा लागत असेल तर धन्य आहात.

As simple as that
1. जिथे व्यायाम होतो ती टेरेस एका आड बाजूला असल्यास, तेथे सहसा आवर्जून पाहिल्याशिवाय लक्ष जात नसल्यास असा व्यायाम केलेला चालेल
2. जर ही टेरेस अनेक बाल्कनी मधून पाहील्यास दिसते, लोकांचा एकमेव बाल्कनी व्ह्यू या दृश्याने खराब होतो, त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येते, एकतर व्यायाम करणाऱ्या तुम्हाला पहा किंवा खिडक्या बाल्कनी बंद करून तितका वेळ आत कोंडून राहा असे दोनच पर्याय उरल्यास तुमचे व्यायाम करणे अयोग्य
3. खरोखर प्रामाणिक समस्याच असेल तर थोडी लांब पॅन्ट/स्पोर्ट वेअर बनियान किंवा तुमच्या बाल्कनी रेलिंगावर चादर टाकणे असे काही करता येईल.

परीचित मान्य
धागा सार्वजनिक जागा आहे आणि टेरेस तुमचे खाजगी
तुम्ही धाग्यावर नका टाकू फोटो
डीपीला लावा. ती तुमची खाजगी जागा आहे.

> कुनासमोर किती व कोणत्या प्रकारचे कपडे घालावे. एवढ्या साध्या गोष्टी बद्दल जर कुणा व्याक्तिला किंवा माबोवर प्रश्न विचारावा लागत असेल तर धन्य आहात.

>>> कोणासमोर कुठे कसे कपडे घालावेत असा प्रश्न नाही. त्याबाबत माझे स्पष्ट मत आहे. टेरेस माझा आहे मी तिथे कसे कपडे घालावे हा पूर्ण माझा अधिकार आहे. इथे प्रश्न असा आहे कि त्या व्यक्तीने धमकी दिल्यानुसार त्याने खरेच पोलीस केस केली तर कायद्याचे कलम लागू पडेल का? पोलीस हि केस दाखल करून घेतील का?

आमच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर राहणारा बाल्कनीत उघडाबंब उभा असतो ते फार कसेसेच वाटते. बाल्कनीत उभा राहून दारू पितो आणि सिगारेटी फुंकून थोटकं खाली इमारतीतच टाकतो. अध्यक्ष तोच आहे. एकूण गुंड प्रवृत्तीचा आहे म्हणून कोणी नादी लागत नाही. अशी माणसं सोसायटीत राहण्याच्या लायकीची नसतात. आलिया भोगासी...

आताच या धाग्यामुळे लक्षात आले.
मी उन्हाळ्यात रोज उघडा असणे हे कॉमन आहे माझ्यासाठी
पण सध्या वर्क फ्रॉम होमची जागा हॉलच्या खिडकीला लागूनच आहे. आणि खिडकीकडेच तोंड करून बसतो. खिडकी पुर्ण भिंतभर आहे. आणि हवेसाठी पडदेही पुर्ण उघडतो. थोडक्यात अगदी बाल्कनीत नसलो तरी कोणी मुद्दाम आमच्या खिडकीवर नजर रोखली तर मी समोरून उघडा आणि शॉर्टवर बसलेलो दिसू श्कतोच.

कधी आलीच कोणाची तक्रार तर मलाही तयार राहायला हवे.

पण च्रप्स म्हणतात ते खरे मानले तर माझी तक्रार येण्याची शक्यता नेगलिजिबल आहे.

हॅरेसमेंट चे गुन्हे, त्यातून सुटणं आणि नंतरची कुप्रसिद्धी हे सर्व पाहता तुमच्या मोकळेपणाची किंमत म्हणून वर्थ नाही.
तुम्ही स्वतःच्या तंद्रीत व्यायाम करत असलात तरी उद्या कोणी 'असभ्य वर्तन/खाणाखुणा' वाली तक्रार करु शकतं.

> शरीर कमावलेले असेल, प्रमाणबद्ध असेल तर संकोच वाटत नाही.... अजून व्यायाम वाढवा... बॉडी शेप मध्ये आणा... तक्रार बंद होऊन जाईल...

>>> बॉडी शेप मध्ये आहे म्हणूनच तक्रार आली आहे ना सर Happy नाहीतर त्याने आपल्या आयटम ला सांगितले असते ना त्या ढेरपोट्या कडे कशाला बघतेस वगैरे वगैरे म्हणून दुर्लक्ष करायला लावले असते. पण नाही. समस्या तिला नाही. याला आहे. त्याला असुरक्षितपणाची भावना आली असणार म्हणून तर धमकी द्यायला आला होता.

मायबोलीचा डीपी सर्वाना दिसतो त्याला खाजगी म्हणता येणार नाही Happy
नवीन Submitted by Parichit on 11 May, 2020 - 18:37

>>>>>

एक्झॅक्टली सर हाच तर मुद्दा आहे
जरी तुमचे टेरेस खाजगी असले तरी ते आजूबाजूच्या सर्वांना दिसणारेच असते.

आता साधा विचार करा. ईथे कोणीही तुमचे परीचित नाही तरीही तुम्हाला ज्या फोटोस्वरुपातील अंगप्र्दर्शनाचा संकोच वाटतोय ते तिथे तुम्ही परिचितांम्ध्ये प्र्त्यक्षात कराल तर त्यांनाही संकोच वटेलच ना..

बॉडी शेप मध्ये आहे म्हणूनच तक्रार आली आहे ना सर
>>> समझदार को इशारा काफी है... लोहा गरम है... मार दो हथौडा ... हिम्मत ची किंमत...

डीपी ची तुलना खाजगी जागेशी? हम्म्म्म.... नाहीच पटली तुलना. मायबोलीवर तर विचारपूस सुद्धा खाजगी नाही. खाजगी जागेशी तुलना करता येईल असे मायबोलीवर तरी काहीच नाही. हो, संपर्क सुविधा आहे. कोणाला मी संपर्क मधून मेसेज पाठवला तर तो सार्वजनिक म्हणता येणार नाही.

Pages