पद्मा आजींच्या गोष्टी ६ : भुताची गोष्ट

Submitted by पद्मा आजी on 24 February, 2016 - 14:49

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.
तुमच्या अभिप्रायांनी मला फार प्रोत्साहन मिळाले. सर्वांचे मनपुर्वक आभार.

विजय ने 'तेल गेले पण वर्ष मिळाले' च्या प्रतिसादात भुताच्या गोष्टीची मागणी केली आणि तश्या काही गोष्टी आठवल्या. त्यातली एक.

गोष्ट आहे जुनी. मी शाळेत होते तेव्हा. तिसरी केव्हा चौथीत असेल. मी आणि माझ्या बहिणी मिळून आम्ही शाळेत जायचो. आमची शाळा होती तशी दूरच. चालत चालत जायचो दररोज.

आमचा नेहेमीचा रस्ता जाई बाजार पेठेतून. फिरत फिरत. बऱ्याच वेळा आई आम्हाला काही काही विकत पण आणायला सांगायची शाळेतून येताना.

पण कधी कधी जास्त मैत्रिणी जमल्या कि आम्ही एका दुसऱ्या रस्त्याने घरी यायचो. त्या रस्त्याने यायचे म्हटले म्हणजे जास्त संख्या हवी आसे. नाही तर आमचा धीरच होत नसे.

रस्त्याच्या बाजूने अनेक मोठे बंगले होते. पण जवळ जवळ सगळेच पडीस आलेले. रिकामे पडलेले. बहुतेकांचे रंग उडालेले. काहींच्या कुंपणाच्या भिंती पडलेल्या. पण सगळीकडे मात्र मोठ्या मोठ्या झाडांचे व झुडुपांचे आक्रमण झालेले.

असे म्हणत कि तिथले काही बंगले पछाडलेले होते. आम्ही तशे बंगले आले कि रस्ता ओलांडयचो व कुतूहल मिश्रित भीतीने बघत बघत जायचो. काही वेळा काही बंगल्यातून काही आवाज यायचे पण काही तर अगदीच पडीक. अंधारलेले.

जास्त रहदारी नसायची तिथे. झाडांच्या सावल्यातून चालायला बरे वाटायचे. रिकाम्या मोठ्या रस्त्यावर ठिकरी किंवा लंगडी वगैरे खेळत आम्ही यायचो. आम्ही कधीकधी अजून एक खेळ खेळायचो -- कोण जास्त चांगली फुले जमवितो

एक होते मात्र. बंगल्यांमध्ये फुलांची अनेक झाडे. प्राजक्त, जाई, जुई, चाफा, चमेली अशी अनेक फुलं. आमच्यातली कोणीतरी मुलगी अचानक ओरडायची "चांगली फुले..." आणि खेळ सुरु व्हायचा.

मला तो दिवस अजूनही आठवितो. मला वाटते अनु ने सुरुवात केली. आणि आम्ही सगळ्या पळालो वेगवेगळ्या दिशेला. मी एका बंगल्या कडे गेले. कुंपणाचा दरवाजा तुटलेलाच होता. आत मध्ये शिरून कुंपणालगत मी काही चमेली गोळा केल्या. पण मला माहित होते चमेलीने मी काही जिंकणार नाही.

म्हणून मी इकडे तिकडे बघितले आणि माझे डोळे चकाकले. कुंपणाला पडलेल्या भगदाडातून मला कमळाची फुले दिसली. शेजारच्या बंगल्यात, एका छोट्या हौदात दोन सुरेख कमळाची फुले होती. अगदी बघत राहावी आशी.

पण तो बंगला तर झपाटलेला होता. आम्ही तर जवळ ही जायचो नाही त्याच्या. मग काय करावे? मला तर आता त्या फुलांचा मोह पडलेला.

मी थोडी पुढे सरकले भगदाडाजवळ. व डोकावून बघितले. कोणी नव्हते. तसे आम्ही आजपर्यंत कोणालाही त्या बंगल्यात बघितले नव्हते. सगळी कडे शांतता पसरलेली. झाडांच्या सावलीमुळे खाली तशी अंधारी. समोरचा हौद छोटा होता. त्याच्या वरच बंगल्याची खिडकी होती. तावदानातूनही कोणी दिसत नव्हते.

पण तरी माझी काही हिम्मत होत नव्हती. मी फुलं काढायला गेले आणि पाण्यातून कोणी माझा हात ओढला तर?

पण कमळांचे काय? रिकाम्या बंगल्यात ती तर वाया जाणार. शिवाय मला जिंकूनही फार दिवस झाले होते. कमळाची फुले तर मला शाळेतही दाखवायलाही नेता आली असती.

झाले. मी ठरविले हिम्मत करायची. म्हणून मी गेले पुढे.

मी भगदाडातून शिरले. एक पाऊल. दोन पाऊल. कुंपणाची भिंत ओलांडून मी त्या बंगल्यात पाय टाकला. छाती तर धपापून फुटायवर आलेली. भीतीने पाय जणू दगडाचे झालेले. पण कमळांचा मोह खेचत होता मला.

मी हळूहळू सरकले. हौदापाशी पोहोचले. पाणी काळसर होते. तळ दिसत नव्हता. तेव्हाच माझे मन चुकचुकले. परत फिरून पळायची फार उर्मी झाली. पण तिला द्ब्टुन मी पाय खेचले.

हौदापाशी मी हळूच गुढगा टेकविला आणि परत शोधक नजरेने सर्वत्र बघितले. शरीराला पाण्यापासून शक्य तेवढे दूर ठेवून मी उजवा हात लांबविला. आणि जवळच्या कमळाच्या देठाला पकडले.

एक सेकंद मी थांबले. आणि देठ मुडपून मी फुलं तोडले. कमळाची पाने पाण्यात डुबकण्याचा आवाज झाला. मी परत सगळीकडे बघण्यासाठी मान उंचावली. अन...

माझ्या पोटात खड्डा पडला. माझे पूर्ण हृदय तोडांतून बाहेर पडते कि काय अशी मी किंचाळले.

समोरच्या खिडकीच्या तावदानातून एक जखः म्हातारी माझ्या कडे रोखून बघत होती. पांढरे पिंजारलेले केस, रागीट डोळे. ती जणू माझ्या अंगाला भेदून पुढे बघत होती.

मी जी उठले. तो तोल जाऊन पाठीमागे पडले. त्याने तर माझ्या भीतीत भर पडली. म्हातारी! ती जवळ येऊन पोहोचली कि काय. देवा! राम! राम! राम! माझ्या सर्वांगांना मुंग्या आल्या सारखे. माझा श्वास तर केव्हाच थांबलेला. मी जोर जोरात ओरडायला लागले आणि उठण्या चा पर्यंत केला. पण भीतीने कसला तोल सावरतोय?

मी झोलकांडत कशी बशी भगदाडाकडे पळाले. आणि ओरडत रस्त्यावर आले. माझ्या मैत्रिणीनी माझे ओरडणे ऐकले होते. माझा अवतार -- घामाने डबडबलेली, हातपाय खरचटलेली -- बघून त्याही ज्या भीतीने पळत सुटल्या त्या अगदी थेट घरापर्यंत. प्रत्येक जन रामरक्षा म्हणीत आणि मागे वळून न बघता.

रस्ता तर सोडूनच द्या, नंतर जवळपास अनेक दिवस, आमच्या पैकी कोणीही मागे वळून बघायचे टाळत होते.

तेव्हा आमची अशी समजूत होती कि जर भूत पाठीमागून येत असेल तर वळून बघायचे नाही. नाहीतर भूत-प्रेताला तुमचा चेहरा लक्षात राहतो.

गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या म्हातारी बद्दल संपूर्ण प्रसंगात फक्त ३ ओळीत लिहिलं आहे. बाकी सगळं वाचकांवर सोडून दिलंय. तरी अपेक्षित परिणाम साधला गेला.....
आवडली. याला म्हणतात भूतकथा Happy

धम्माल

Mast gosht aahe whats app var share keli tar chalel ka

Khup chan vatavaran nirmiti keli aahe ki vachatana pudhe kay honar ashi utsukata sarkhi vadhat rahili.
Aaji ashach gosthi lihit raha.

मस्तं. छान लिहीले.
मजा आली वाचताना पण तुम्हाला त्या वेळी किती भीती वाटली असेल.
ते काहीही असेल, तुमच्यासाठी तो भूताचा अनुभव म्हणूनच राहील.