शुष्क काष्ठे ने आण्या पत्र

Submitted by धनश्री- on 7 May, 2020 - 17:45

समीधाने, संध्याकाळचा वरण-भाताचा कुकर लावुन, देवापुढे उदबत्ती लावली. बाल्कनीतील जाईला पाणी घालून, साठीला आलेली, समीधा जरा खुर्चीवरती विसावली. घरात,शिजलेल्या भाताचा सुगंध, घमघमाट सुटला होता. आज मानसी तिच्या मुलीला घेउन म्हणजे समीधाच्या नातीला घेउन, भेटायला येणार होती. मानसी, समीधाला भेटायला वरचेवर येत असे. त्या दोघी यायच्या आत,तेवढी काही स्तोत्रे म्हणावीत म्हणुन, समीधा जरा विसावली होती. दत्तबावनी वाचता वाचता ती एका ओळीपाशी येउन थांबली, -
"शुष्क काष्ठने आण्या पत्र| थयो केम उदासीन अत्र|
जर्जर वंध्या केरा स्वप्न| कर्या सफळ ते सुतना कृत्स्न्||
स्वत:शीच हसता हसता, तिचे मन भूतकाळात गेले.

"माझ्या अपेक्षा जगाकडून शून्य आहेत पण तुझ्याकडून नक्कीच आहेत. लग्न का करतो माणूस, एक सहचर मिळावा, साथीदार मिळावा जो की इक्वल फुटिंगवर असेल. आपल्या सुखदु:खात सामील होइलच पण वेळ पडल्यास आपले दोषही दाखवेल." - सुमीत
"अरे पण माझा स्वभाव अतिशय संथ आहे, आय गो विथ द फ्लो. मला प्रवाहाविरुद्ध ऊर फुटेस्तोवर धावायला अज्जिबात आवडत नाही." - समीधा
.
हेच आणि हेच कारण ठरलं त्यांच्या विभक्त होण्याचं. लग्न झाले तेव्हाही समीधाला सोशल सायन्स मधली पदवी घेउन, लहान मुलांकरता काहीतरी करायचे होते. याउलट सुमीत ने इरेला पडून तिच्याकडून संगणकाचा डिप्लोमा करुन घेतला. ज्यायोगे परदेशी जाण्याचे मार्ग खुले होतील. समीधाला विरोध करता आला नाही. उर्जा घालवण्याचा तिचा स्वभाव नव्हता. अगदी स्वत:च्या दूरगामी भल्याकरताही ती भांडण तंटा करणाऱ्यातली नव्हती. पण हळूहळू त्यांच्या विवाहाची कथा अरब-उंटाची कथा बनत गेली. प्रत्येक वेळी सुमीतने आधी मनधरणी मग कटकट व शेवटी धमकीवजा सूचना करायची मग ते व्यायाम असो, खाण्यापीण्यावरील बंधने असो, की अभ्यास असो, करीयर असो, मुलेबाळे असो. समीधाला मोकळेपणाने श्वास काही घेता येत नव्हता. व्यक्ती परफेक्शनिस्ट असली ना की जोडीदाराची जी परवड होते ती तिची झाली. तिचे लहान लहान आनंद हिरावले जात होते. मग ते साय-साखर खाणे असो ..... नको फार फॅटी,
की कलिंगड खाणे असो .......... फार साखर,
फिरायला जाउ या का ........... नको आधी १ तास व्यायाम कर,
जरा साखर झोप घेउ दे का .... नको सकाळी लवकर ऊठणे आरोग्याला उत्तम.
पुस्तके वाचू का ........ नको टेक्निकल , अभ्यासाची पुस्तके वाच, हवी तितकी विकत घेउन देतो तुला,
मूल हवे ............ नको सेटल होउ यात.
दुसरे मूल हवे ............. नको अजुन जबाबदारी नको.

प्रत्येक प्रत्येक प्रत्येक गोष्ट त्याच्या मनासारखी.
.
अरे आहे काय!! दुसऱ्यालाही मनासारखं ल्याव, खावं जगावंसं वाटतं, याचा या माणसाला गंधही नाही? जिकडेतिकडे याची ताबेदारी. स्वत: परफेक्शनिस्ट तर आहेच पण इतरांकडूनही त्याच अपेक्षा. भारंभार अपेक्षा. फक्त अपेक्षा. समीधा अपेक्षांच्या भाराखाली दबून गेली. ना तिच्यात बंड करण्याइतकी आक्रमकता होती ना हा अन्याय सहन होत होता. ती आजारी पडू लागली. वरचेवर तिचे व सुमीतचे खटके उडू लागले. जेव्हा कधी भांडण होइ, तेव्हा धुमसत असलेली , कोंडलेली वाफ इतक्या आवेगाने बाहेर पडात असे की आपण इतके कुरुप होउ शकतो याचे तिलाच आश्चर्य वाटे. तोंडावर तर हिंमतच नव्हती, मनात तरी नवऱ्याला शिव्या शाप कुठे देता येतात? शाप लागून त्याची फरफट झाली तर आपली तिप्पट फरफट होणार हे आपण जाणुन असतो. 'नवरा म्हणजे शंकराच्या पिंडीवरील विंचू. ठेचता येत नाही की सहन होत नाही.' सारी उर्जा सामान्य आनंद मिळावण्यातच खर्ची होत होती. तिने पुढे जावे याकरता, सुमीत, जितका तिच्यामागे लागे, तितकी ती आडमुठेपणा करे. सगळं कसं कडू झालेलं होतं, रसहीन शुष्क .... चिपाड. विवाहाला खरच अर्थ राहीला नव्हता. समाजापुढे मिरवण्याचे एक नाते पण त्यात ना रसरशीतपणा, ना ओढ, ना आनंद. फक्त एकतर्फी अपेक्षा, व एकतर्फी विरोध. एका बाबतीत मात्र साम्य होतचं तो म्हणजे हट्ट. त्याचा तिला पुढे ढकलण्याचा, तिचा आहे तिथेच रहाण्याचा. दोघांचा हट्ट, आडमुठेपणा, मैत्रिणींना सांगीतलं तर त्या म्हणायच्या "अगं तो तुझ्या भल्याकरताच सांगतो ना?" मैत्रिणींनाही तिचे दु:ख कळू नये याचा तिला मनस्वी त्रास होइ.
.
सुमीत करीअरच्या क्षेत्रात मात्र वेगाने प्रगती करत होता. नवीन नवीन परीक्षा देत नवी पदे मिळवत, नोकरीची शिडी चढत होता. जेव्हा घरात सुख नसते तेव्हा संपूर्ण उर्जा बाहेर व्यतीत करावी लागल्याने, दिन दुगनी रात चौगुनी त्याची प्रगती भरधाव होत होती. मानसिकदृष्ट्या खचलेली, समीधा,कुठेतरी बौद्धिक दृष्ट्याही मागे मागे पडत जात होती आणि तिलाही हे कळत होते. पण वळत नव्हते. दोन दिशांना दोन प्रवासी चालत असतील तर अंतर वाढतच जाणार. आणि मग एक दिवस असाही उगवला, सकाळी सुमीतने , समीधावरती त्या बातमीचा बॉम्ब फोडला. "माझ्या ऑफिसातील एका स्त्रीवर माझे प्रेम आहे. मला घटस्फोट हवा आहे. आणि तसाही आपल्या संबंधांना औपचारीकतेपलीकडे काही अर्थ नाही हे तुलाही पटतय बरोबर?"
.
समीधा जरी संसाराची फरफट जाणुन होती, तरी, हे अनपेक्षितच होते. विशेषत: वयाच्या ५० व्या वर्षी. जरी दोघांचे आपापले, भक्कम ४०१ के होते, नोकरी होती, घर दोघांच्या नावावरती होते, एकच मुलगी, मानसी तीही आता कॉलेजमध्ये दूर हॉस्टेलवर रहात होती, पण तरी ही .... हा धक्काच होता. कारण हा सेट अप तिने स्वीकारला होता, आता या निष्प्राण विवाहाची तिला सवयच होउन गेलेली होती. जर सुटवंगच व्हायचे तर निदान तरुणपणी तरी व्हायचे. उलट आता जेव्हा म्हातारपण जवळ येणार, तेव्हा आधार लागेल, कोणाची तरी मदत लागेल.
.
'आलिया भोगासी असावे सादर.' मग मात्र तिने धीर केला, सुमीतच्या हट्टासाठी नाही तर आता स्वत:साठी सर्व सर्व करायची संधी होती. मग ते करीयरमध्ये आता होइल तितके, पुढे जाणे असो की स्वत:ची अवांतर वाचनाची, कवितांची एक लायब्ररी सेट करणे असो. ती स्वत:करता, स्वत:च्या टर्मसवरती जगणार होती.
"शुष्क काष्ठने आण्या पत्र|थयो केम उदासीन अत्र|
जर्जर वंध्या केरा स्वप्न| कर्या सफळ ते सुतना कृत्स्न्||

दत्तप्रभूंच्या कृपेने जर शुष्क काष्ठाला पालवी फुटाली, वांझ गाय दुभती झाली, साठीची नि:संतान स्त्री गर्भार झाली ...... तर , माझं ५० शी त, नवं आयुष्य का नाही सुरु होणार. का नाही माझ्या स्वप्नांना नवचैतन्य मिळणार? आणि अशा निर्धारानेच तिने एका नवीन आयुष्याची सुरुवात केली होती. एकटीची वाट! तिच्या टर्मसवरती. तिचे आयुष्य - तिचे नियम. तिच्या चूका, तिचे क्रेडीट. आता यात कोणीही भागीदार नको की कोणी ठेकेदार नको. उरलेलं आयुष्य फक्त मोकळा श्वास घेत काढायचे.
.
दाराची बेल वाजली आणि समीधा वयाला न शोभेलशा चपळपणे, नातीचे व मुलीचे स्वागत करायला उठली. दोघी आल्या की भूक भूक करतील हे तिला माहीत होते. बाल्कनीतल्या जाळीवरुन जाईचा सुगंध घेउन, मंद वारा घरात येत होता. जाईची वेल बहरली होती, फुलापानांनी लगडली होती. सारं घर त्या चैतन्याने, सुगंधाने न्हाउन निघलं होतं. उतारवयात का होइना, फासे अचूक पडले होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समिधा साठी विन विन आहे. तसेही नवऱ्याबरोबर राहण्यात पॉईंट नाही... त्याच्याशिवाय राहणे म्हणजे तिला स्वातंत्र्य आहे... तिने आभार मानले पाहिजेत नवऱ्याचे सेपरेशन प्रोपोस केल्याबद्धल.... तिने कधीच नसते केले....तिचे भविष्य सुखाचे असेल आता...
शुभेच्छा !!!!

>>>>ती कमावती आणि स्वत:च्या पायावर उभी होती की त्याच्यावर अवलंबुन होती?>>>> ४०१ के दोघांचा आहे. कमावतीच होती. विवाहांमध्ये, आर्थिक स्वातंत्र्य हा नेसेसरी बट नॉट सफिशिअंट घटक असतो.

>>>> तिने आभार मानले पाहिजेत नवऱ्याचे सेपरेशन प्रोपोस केल्याबद्धल.... तिने कधीच नसते केले....तिचे भविष्य सुखाचे असेल आता...>>>> Happy परफेक्ट!!

आवडली कथा. शेवट सुखांत आहे. तो वाचून बरं वाटलं. नाही तर आयुष्यभर घुसमट झाली आणि शेवटीही सुख नाही अशी चुटपूट लागली असती.

>>>मात्र एखादीच अशी नशिबवान असते. बर्याच जणींना आयुष्यभर फरफटावे लागते.>>> सत्य!
________
सर्व वाचकांचे आभार.

"माझ्या अपेक्षा जगाकडून शून्य आहेत पण तुझ्याकडून नक्कीच आहेत. लग्न का करतो माणूस, एक सहचर मिळावा, साथीदार मिळावा जो की इक्वल फुटिंगवर असेल. आपल्या सुखदु:खात सामील होइलच पण वेळ पडल्यास आपले दोषही दाखवेल." - सुमीत
"अरे पण माझा स्वभाव अतिशय संथ आहे, आय गो विथ द फ्लो. मला प्रवाहाविरुद्ध ऊर फुटेस्तोवर धावायला अज्जिबात आवडत नाही." - समीधा>>>

हे दोघांनाही लग्नाच्या आधीच क्लीअर करून का नाही घेता आले? दोघांनाही आपापल्या आवडीचे सहकारी निवडता आले असते, दोन्ही आयुष्ये सुंदर झाली असती.

अन्याय व घुसमट दोघांचीही झालीय यात. पण निदान यातल्या पुरुषाने मार्ग तरी शोधून काढला, नाहीतर मरेपर्यंत दोघेही असेच राहिले असते. यातल्या स्त्रीने तीच अपेक्षा ठेवली होती.

पुरुषाने मार्ग शोधुन काढलाय पण अन्यायही त्यानेच केलाय. अवास्तव आणी अति अति अतिरेकी अपेक्षा, ऑब्सेशन विथ परफेक्शनिझम. अशा व्यक्ती बरोबर कोणीच राहू शकणार नाही. नायिका मनाने दुबळी आहे, निदान आक्रमक, आग्रही नाही, तिच्यात धडाडी नाही म्हणुन ती राहीलीये.

हो, पण असे लोक असतात आणि त्यांच्या त्या गरजा असतात. त्या गरजांच्या विरुद्ध गरजा असलेल्या लोकांबरोबर जोडी जमवून त्रास दोघांनाही. त्याला तशीच पर्फेक्टनिस्ट जोडीदार मिळाली असती तर कदाचित परफेक्शनिस्टबरोबर राहायचा त्रास कळला असता त्याला.

कसलेही समर्थन नाही, फक्त व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. त्यामुळे मी ना असल्या पुरुषाचा निषेध करतेय न त्या बाईला.
आपल्या प्रकृतीच्या व्यक्तीबरोबर राहिले तर दोघेही नॉर्मल जगू शकतात.

पुरुषाने मार्ग शोधुन काढलाय पण अन्यायही त्यानेच केलाय.>>>

दोन्ही बाजूने पाहता येईल. दोघांनीही आपापल्या अपेक्षा सांगितल्यावर (ज्यात मध्यममार्ग दिसतंच नाही) , कोणीतरी एकाने त्याने किंवा तिने स्वतःला मुरड घातली असती तर तो अन्यायच झाला असता. असा अन्याय सहन करत आयुष्य ओढणे हा दुहेरी अन्याय झाला असता. तिचा स्वभाव जसे होलपतट जाऊ तसे जाण्याचा असल्यामुळे या कथेत नवरा अन्याय करणारा ठरला. उलट परिस्थिती असती तर कथा वेगळी घडली असती. नवऱ्याने संधी मिळताच ह्या अन्यायातून बाहेर पडायचे ठरवले. बायकोला तर तेही नको होते, अन्याय होतोच आहे तर होउदे, ओढूया आयुष्य तसेच, पन्नाशीतच आयुष्य संपल्याची भावना तिच्या मनात आहे. दोघेही आपापल्या भूमिकांना चिकटून राहिले व एकमेकांवर अन्याय केला. दोघेही पीडित आहेत.

सामो, माझी टिप्पणी केवळ कथेवर आहे. कृपया व्यक्तिशः घेऊ नका व राग मानू नका.

"शुष्क काष्ठने आण्या पत्र|थयो केम उदासीन अत्र|

>>> खूप सुंदर सामो... दत्तबावनी मी पण वाचते. पण असा अर्थ कधीच उलगडला नव्हता.. Happy

>>>सामो, माझी टिप्पणी केवळ कथेवर आहे. कृपया व्यक्तिशः घेऊ नका व राग मानू नका.>>> नाही साधना राग नाहीच अजिबात. खरं तर मोकळेपणे मत मांडल्याबद्दल आपलेच आभार.
>>>असा अन्याय सहन करत आयुष्य ओढणे हा दुहेरी अन्याय झाला असता.>>>हे बरोबर आहे.
>>>>पन्नाशीतच आयुष्य संपल्याची भावना तिच्या मनात आहे.>>> करेक्ट जे आयुष्य सुरुच होउ शकले नाही. ते संपल्यासारखे वाटते तिला. माझ्या मते ती फार पराभूत मानसिकतेची ( अ लुझर) आहे. तिने जराही हातपाय मारलेले नाहीत. फक्त तो सांगतो ते नीरस मनाने करत राहीलेली आहे. हा एक प्रकारचा नायकावरचा अन्यायच आहे. Nothing can jolt her out of comfort zone. खेकडा जसा नांगी तुटो पण चावा सोडत नाही, आपला कंफर्ट झोन तिने अजिबात सोडलेला नाहीये. नवर्‍यालाच ड्रास्टिक निर्णय घ्यावा लागलेला आहे. आणि असे म्हणजे नायिकेसारखे, लोक खरच असतात.
______________
>>>>>>हे दोघांनाही लग्नाच्या आधीच क्लीअर करून का नाही घेता आले? दोघांनाही आपापल्या आवडीचे सहकारी निवडता आले असते, दोन्ही आयुष्ये सुंदर झाली असती.>>>> कदाचित!!
.
तरुणपणीच विभक्त झाले असते तर खूपसा वेअर & टेअर टळला असता. २ आयुष्ये सावरली असती.
__________
>>>>>ओहो नायकच खलनायक आहे तर Wink>>>> हाहाहा
_________
>>>>>>>>>>>दत्तबावनी मी पण वाचते. पण असा अर्थ कधीच उलगडला नव्हता.. >>> धन्यवाद नौटंकी.

@Cuty - तुमची एक सुंदर कथा आठवली मला. नायिका आत्मविश्वास गमावून बसलेली असते. पुढे बाळामुळे/ करता ती गेलेला विश्वास मिळवत जाते.

कथेचा अजुन एक पैलू जो की लेटंट (निद्रीस्त/सुप्त) राहीलेला आहे तो म्हणजे - सकृतदर्शनी नायिका तिच्या नवर्‍याच्या हो ला हो करते आहे, त्याच्या मर्जीप्रमाणे डिफाइन होत गेलेली आहे हे सर्व वाटते न वाटाते तोच हे लक्षात येते की ती दुतोंडी आयुष्य जगते. वरवर तो म्हणेल तसं पण आतल्या आत फक्त विरोध आणि हट्ट, विरोधच. हा सगळा त्रागा, हट्ट इन्टर्नलाइझ झाल्याने, तब्येतीची वाटच लागलेली आहे..

धन्यवाद सामोजी. आणि वर जो निद्रिस्त पैलू सांगितला आहे तो असा सहजसहजी बायकांच्या अगदी जवळच्या व्यक्तींनादेखील लक्षात येत नाही.

>>समीधाला मोकळेपणाने श्वास काही घेता येत नव्हता. व्यक्ती परफेक्शनिस्ट असली ना की जोडीदाराची जी परवड होते ती तिची झाली. तिचे लहान लहान आनंद हिरावले जात होते. मग ते साय-साखर खाणे असो ..... नको फार फॅटी,
की कलिंगड खाणे असो .......... फार साखर,
फिरायला जाउ या का ........... नको आधी १ तास व्यायाम कर,

हो प्रत्येक दिवशी तू हेच्च कर किंवा करु नको या बारीकसारीक आज्ञा पाळणे म्हणजे छोटी खुशियों का त्यागच आहे. पण कथेवरुन असे वाटते की निमूट्पणे हे सर्व ऐकतेय. तिने यावर शांतपणे प्रत्येक सूचनेच्या वेळेस चर्चा केली आहे का?
कलिंगडात साखर = वाईट = न खाणे हे ठाम मत/सूचना त्याने काय बेसिस वर केली आहे? डॉ/डाएटिशियने संगितले की कुठे वाचले?
आधी करण्याऐवजी फिरायला जाऊन आल्यानंतर समजा व्यायाम केला तर नेमके काय नुकसान होऊ शकते?
वाचन - अभ्यासाचीच पुस्तके वाचली पाहिजेत, बाकी नाहीत हे पुन्हा काय काय बेसिस वर केलेली सूचना आहे? बाकी साहित्य वाचून कोणत्या प्रकारे नुकसान होणार आहे किंवा कुणाचे नुकसान झाले असल्यास पाहण्यात आहे का? काही डेटा आहे का? Wink

कसं आहे की ती जो पर्यंत "बोलत" नाही, शांतपणे, मुद्देसूद चर्चा करत नाही (भांडण नव्हे!) तोपर्यंत यात सुधार होणार नाही. तो जर पर्फेक्शनिस्ट, अभ्यासू असेल तर अशा चर्चेला तो तयार होईलही कदाचित आणि त्याची मतंही बदलू शकतात.
कारण शेवटी ती ऐकतेय ना (काउंटर स्टेटमेंट टू प्रूव्ह द पॉईंट करत नाहीये हे कळल्यामुळे) त्यामुळे जोडीदाराचा डॉमिनेट करण्याचा स्वभाव अजूनच फावला आहे असं वाटतं. शी मस्ट स्पीक!

ही गोष्ट आवडली आणि मला स्वतःचाच जरा राग आला. गोष्टीतही आपण नायिकेला "नाही बाई सापडला आत्मविश्वास, पण भेटला पन्नाशीत जेफ बेझोस छाप कुणी आणि झाले त्याची गर्लफ्रेंड. मी होते त्याच्या अगदी विरूद्ध पण जशी होते तशी त्याने स्वीकारले, .. आय वेंट विथ दि फ्लो.. आणि झाले बाई सुखी!" अशी मोकळीक का देत नाही? Wink Happy करण जोहर ते सामो सगळे नायिकेला बदलण्याच्या मागे Wink राहू द्या तिला जशी आहे तशी ...... का आवडतात असले बदल?

वर्षा+१.
पन्नाशीत नवी सुरुवात ही कल्पना ठीक आहे.
पण त्यासाठी तयार केलेलं background पटलं नाही.
कलिंगड खाऊ की नको यासाठी नवऱ्याच्या आज्ञेत असलेली, कसलीच धडाडी नसलेली बाई नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर अशी वागेल हे convincing वाटलं नाही.

@वर्षा - ती दुबळी असेल मठ्ठ तर नसेल. केला असेल प्रयत्न तिनी. झगडुन थकुन माघार घेतलीही असेल. इतकी जेव्हा कटु झालय वैवहीक जीवन ती म्हणतेय, ते काही एकतर्फी प्रयत्न न केल्याने कटु नसेल. There is an apt word called 'Resign' - accept that something undesirable cannot be avoided.

>>>>>कलिंगड खाऊ की नको यासाठी नवऱ्याच्या आज्ञेत असलेली, कसलीच धडाडी नसलेली बाई नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर अशी वागेल हे convincing वाटलं नाही.>>>> हाहाहा हा विचारही चिंतन करण्याजोगा आहे. शी मस्ट बी अ लुझर. नो विन-विन. हेच खरं.

च्रप्स, कथेत विन-विन आहे परंतु भरत म्हणतात तशी त्या वळणाने कथा गेली तर, त्या स्त्रीची म्हणजे समीधाची नंतरही आयुष्य उपभोगायची हिंमत होणार नाही. तेव्हा ना तिला कौटुंबिक आधार राहील, ना ती आयुष्य एन्जॉय करु शकेल तेव्हा विन-विन तर नसेलच उलट शी वुड बीऊ अ लुझर.

पहील्यांदा जरी कथा पूर्णपणे नवर्‍यावरती ठपका ठेवणारी लिहीलेली होती तरी साधना, भरत, वर्षा, हर्पेनही यांनी दुसरा पैलू दाखवला त्याबद्दल आभार आणि तो म्हणजे नवर्‍यावरती झालेला अन्याय, फक्त तिचेच नाही तर त्याचेही होरपळणे. आणि त्या अनुषंगाने विचार करता, समीधा 'असेल माझा हरी तर ......' कॅटेगरीतली वाटू लागते. तिच्या कंफर्ट झोनचा आणि सोयिस्कर मवाळपणाचा तिरस्कार येउ लागतो वरती हे न जाणता तिचा ठपका सुमीतवरती ठेवणं, इज अ‍ॅन आय ओपनर. फक्त एकावर ठपका ठेवणं हे तद्दन चूकीचे आहे.

>>ती दुबळी असेल मठ्ठ तर नसेल. केला असेल प्रयत्न तिनी. झगडुन थकुन माघार घेतलीही असेल.

ह्म्म ओके, तिने आपल्या परीने प्रयत्न केले असतील तर ओके पण "ना तिच्यात बंड करण्याइतकी आक्रमकता होती ना हा अन्याय सहन होत होता. " हे वाचून मला असं वाटलं की तिने निमूटपणे सर्व ऐकले.

>दोघेही आपापल्या भूमिकांना चिकटून राहिले व एकमेकांवर अन्याय केला. दोघेही पीडित आहेत.< ह्या प्रतिक्रियेशी सहमत.

... पण तरीही कथा आवडली. कारण समीधाला इतक्या वर्षांनंतर का होईना स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगता येणार आहे. 'काहीच करू नये,' असंही कुणाचं तरी जीवनध्येय असतं की.

छानच कथा. शीर्षक पण मस्त जमले आहे. आता शास्त्रातील शोधांमुळे ह्याती ल बर्‍याच गोष्टी शक्य आहेत. वंध्येला पुत्र वगैरे.

की ती दुतोंडी आयुष्य जगते. वरवर तो म्हणेल तसं पण आतल्या आत फक्त विरोध आणि हट्ट, विरोधच. हा सगळा त्रागा, हट्ट इन्टर्नलाइझ झाल्याने, तब्येतीची वाटच लागलेली आहे..>> ह्याला प्रीफरन्स फॉल्सिफिकेशन म्हणतात. म्हणजे कुठे ही फिट होण्यासाठी व्यक्ती आपले खरे प्रेफरन्सेस लपवून गृपला पटतील असे स्वतःचे प्रेफरन्सेस आहेत असे सांगते. ह्यामुळे स्वतःच्या दाबून ठेवलेल्या आव्डी व्यक्त होता येत नाहीत व तब्येत त्रास देउ लागते.

https://en.wikipedia.org/wiki/Preference_falsification

अश्या रिलेशन शिप मध्ये अडकलेल्या स्र्रीला नुसते वाट्ते की नवरा किंवा डॉमिनंट पर्सन परफेक्षनिस्ट आहे. पण तसे प्रत्यक्षात नसते. परफ क्षनिस्ट हा ही एक मानसिक आजारच आहे. फ्ले क्झिबल असणे इतरांना, त्यांच्या वेगळ्या चॉइसेसना समजून घेणे, किंवा समजले नाही तरी
तो त्यांचे स्वातंत्र्य म्हणून अ‍ॅक्सेप्ट करणे हा मनाचा मोठे पणा. पण मेजॉरिटी पुरुषांची घडण तशी नसते. बायको हे आपल्या हातातले खेळ णे तिला हवे तसे मोल्ड करा, अश्या प्रकारचे काही बॉसेस पण असतात. अश्या रिलेशन शिप मध्ये अडकलेल्या स्त्रियांची सेक्शुआलिटी पण दाबून ठेवली जाते. तिला व्यक्तच होउ दिले जात नाही व हेच नॉर्मल आहे हे ठसवले जाते.

हे होत असेल तर लव्कर ओळखून विभक्त होणे चांगले.

पन्नाशी चे दशक खरेच गोल्डन डिकेड प्रोवायडेड आधी च्या जीवनात मनासारखे जगता आले पाहिजे. आर्थिक शारिरिक व वैचारिक स्वातंत्र्य हे बायकांसाठी एक चॉइस नसावे. तो त्यांचा हक्क आहे.

सामो जी. वरून वाचणार्‍या महिलांसाठी इतके लिहीले आहे. अवांतर असल्यास माफी असावी.

Pages