एकटीच @ North-East India दिवस २६

Submitted by सुप्रिया राज जोशी on 6 May, 2020 - 04:11

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598
अनुक्रमाणिका ३ >https://www.maayboli.com/node/74455

3rd मार्च 2019

प्रिय रश्मी,

रात्री काही आसमिझ बायकर्स नागालँड ला आले. ज्या घरी मी रहात होते त्याच घरातल्या बैठकीच्या खोलीत मैफिल जमवून त्यांचे दारू-पाणी सुरु झाले. तासाभरापूर्वी तिथून मला का हाकलवले गेले होते, हे माझ्या लक्षात आले. पण नवीन पाहुण्यांच्या प्रवासाच्या गप्पा कानी पडत होत्या तसे मलाही रहावेना. एका क्षणी उठून मी सरळ बाहेर गेले आणि माझ्याही प्रवासातले अनुभव त्यांना सांगू लागले. त्या गोष्टी ते कौतुकाने ऐकत राहिले तसा हळूहळू माझा वाईट मूड चांगल्या मूडमध्ये बदलला. मी घरचे सारे नियम तोडून तिथेच गप्पा झोडत बसले.

आतून जेवणाचे बोलावणे आले. माझ्यासाठी बायकांनी व्हेजीटेरीअन डाळ, भाजी, भात असे अन्न शिजवले होते. ते पाहून इथेही मला काय हवं नको ते समजून घेणारं कोणीतरी आहे, असं वाटलं. या प्रदेशात खूपशा कोरड्या भातावर फक्त थोडेसेच तोंडीलावणे ओतून जेवायची पद्धत आहे. मी तशा प्रकारे माझे जेवण उरकत होते. त्या थोडक्या वेळात स्वयंपाक खोलीतील समस्त स्त्री वर्गाशी माझी मैत्री झाली. त्यांना हिंदी आणि मला नाग्मीज मुळीच कळत नसल्यामुळे संभाषणात खूप अडचण येत होती.

मधेच मला वाटले की गाणे गाऊन माझ्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते. मग मी “मोरनि बागामां बोले आधी रात मां” हे गाणे त्यांना म्हणून दाखवले. त्यातला एक शब्द कळत नव्हता तरी एकेकजण लक्ष देऊन ऐकत होती. मग एकजण तिच्या मनातील गाणे गुणगुणायला लागली. कोणी त्या गीताचे शब्द बोलायला लागली. एकीने टाळ्यांनी ताल धरला. मला जमेल तसे त्यांच्या जोडीने मी ही नाग्मिझ लोकगीत गाऊ लागले. शेकोटी भोवती उत्सवाचे वातावरण तयार झाले. कोणीतरी जाऊन मारी बिस्कीटचे खूप सारे पुडे विकत घेऊन आले. बिस्किटे खात, रांगडी लोकगीते गात आमची बायका-बायकांची मैफिल तासभर तरी रंगली होती. मी माझ्या खोलीत परतले आणि टोर्च बंद केला तसा मिट॒ट काळोख झाला. खोलीत एवढा अंधार असेल अशी मला कल्पनाही नव्हती. डोक्यावर ब्लँकेट ओढून मी स्वत:ला त्या अंधारापासून लपवून घेतले.

सकाळी उठल्या माझ्यासमोर दोन मोठी मजेदार आव्हाने आ वासून उभी होती. माझ्याजवळचे सारे कपडे वापरून चोळामोळा झाले होते. म्हणजे एक तर इथल्या थंडगार पाण्यात आज धोबीघाट थाटायला हवा आणि दुसरे संकट असे की पुन्हा त्या तोकड्या पडद्याआड जाऊन आंघोळ करायची. या दोन्ही गोष्टी करायला जीवावर आले होते तरी मनाची शक्ती एकवटून मी निघालेच.
घरापासून थोडं दूर तिथे गावात कपडे धुण्यासाठी सोय आहे. त्या वाटेवर बादलीभर कपडे घेऊन ठुमकत ठुमकत गेले. गावातल्या नळावर कपडे धुवायचे प्रकरण मला खूप फिल्मी वाटत होते. पण तिथे पोहीचून पाहिले तो काय? फिल्म मध्ये दाखवतात तशा बायका तिथे नव्हत्याच. घराघरातली लहान लहान मुले मात्र कपडे धुण्याचे काम सफाईने करत होती. थंडीने गारठायला होत असताना, हाताने विसेक कपडे घासून, पिळून माझा खर तर दम निघाला होता, पण चेहेऱ्यावरचे हसू काही मी हटू दिले नाही. त्या पोराबाळांसमोर मला माझी चांगली छाप पडून हवी होती.

आता आंघोळच काय ती राहिली. आधी अंगणात फिरून मी ती टारगट मुलं कुठे दिसतायत का ते पाहिलं. ती कुठेच दिसली नाहीत तसी मी पटकन पडद्यापलीकडे सटकले. तरीही कपडे उतरवायला काही माझा धीर होईना. शेवटी अंगावर कपडे ठेऊनच कसेबसे अंग धुवून घेतले आणि तुफान वेगाने ओले कपडे उतरवून सुके कपडे अंगावर चढवले.

इथे सकाळचा चहा नाश्ता हा प्रकार नसतो. दुपारचे जेवण सकाळीच उरकून घ्यायचे असते आणि चहा दिवसभरात कधीही कितीही पिता येतो. आज रविवार होता. मी भरपेट भात जेऊन घेतला आणि घरातल्या बायकांबरोबर चर्च मध्ये प्रार्थनेला गेले. पण तिथे काय चालले होते त्यातले एक अवाक्षर मला कळेना. तासाभराने बसल्या बसल्या मला डुलक्या येऊ लागल्या. मी गुपचूप उठून बाहेर पडले. काल ज्याच्याबरोबर शिकारीला गेले होते तो तरूण मला चर्चच्या आजही दिसला. तो बंदूक खांद्यावर टाकूनच निघाला होता. रविवारी इथे शिकार करत नाहीत, पण मित्राकडे टाईमपास करायला जात आहे, असे त्याने मला सांगितले. एखाद्या मित्राकडे टाईमपाससाठी जात असतानाही बंदूक बरोबर घेऊन जातात, हे मी प्रथमच पाहिले.

57203968_10156992894157778_809534922216701952_n.jpg

मी चालत चालत इंडो-म्यानमार बोर्डरवर निघाले. गावातल्या मुख्य रस्त्याला सोडून वाट डोंगरातून वर जाऊ लागली तशा लोकांच्या नजरा मला न्याहाळत आहेत हे मला कळू लागले. इथल्या जमातीला अजूनही पर्यटकांची तितकीशी सवय झालेली नाही. हेच ते कोन्याक वॉरीअर्स ज्यांचा गाढ विश्वास होता की आपली आंग संस्कृती आणि परंपरा जपायची तर संपर्कात येऊ पहाणाऱ्या प्रत्येक परकीय जमातीला जीवानिशी मारून समूळ नष्ट केले पाहिजे.

१९६० मध्ये कायदा होईपर्यंत (नि त्यानंतरही) या जमातीत हेडहंटिंग हा रिवाज चालूच राहिला. आपल्या संकृतीचे रक्षण या पलीकडे पुरुषत्व, शौर्य अशा गुणांचेही ते प्रतिक होते. शिकारीतील साहसाचे प्रतिक म्हणून सर्वात पहिला टाटू कपाळावर गोंदला जातो. शौर्यगाथा जशी वाढत जाते तसे गालावर, मग मानेवर, मग छातीवर! पराक्रमाची गाथा जशी वाढेल तसे शरीराचे एकेक अवयव टाटूच्या नक्षीने कोरत जायचे. जेणेकरून हेडहंटिंग करून कमावलेला गौरव शरीरावर आजन्म मिरवता येईल.

आजच्या पिढीने ख्रिस्चनीटी स्वीकारली तशी ती प्रथा मागे पडली. पण मला अस वाटत की आक्रमकता इथल्या रक्तात भिनली असावी. नाहीतर अगदी पाच, सात, दहा वर्षाची रस्त्यावरची मुलं मला पहाता क्षणी दगड घेऊन मला मारायला माझ्या पाठी लागली नसती. जेव्हा ती दुरूनच छोटे छोटे दगड मला फेकून मारत होती तेव्हा मला तो पोरखेळ वाटला. पण आरडाओरड आणि दगडफेक करत ती गँग माझ्या पाठी धावू लागली, तेव्हा तिथे दुर्लक्ष करून चालणार नाही असं मला वाटलं. तो क्षण टिपून घेण्यासाठी माझा कॅमेरा सुरु करून मी वळले, त्याक्षणी ती गँग बिथरली. मी तेव्हा जे काही पाहिलं ते माझ्या कल्पनेच्या पलीकडचं होत. एक थोडा मोठा मुलगा जोर लावून मोठाच धोंडा उचलू पहात होता. त्याच्या नादाने, माझ्यावरच्या रागाने इतर मुलेही मोठमोठे दगड शोधू लागली. एकीकडे मला त्यांचा धडधड, संताप कळत होता आणि दुसरीकडे हसू येत होते. मी जशी त्यांच्यावर कॅमेरा रोखून दोनचार पावले त्यांच्या दिशेने चालले तसे मात्र ते जास्त घाबरले. त्यांच्या भाषेत काहीतरी ओरडत पळू लागले. त्या संधीचा फायदा घेणे हे सर्वात जास्त सुरक्षित आणि सोयीस्कर होते. या छोट्या वोरीअर्स बरोबर मैत्री करण्याची अनावर इच्छा असूनही मला त्यांच्याकडे पाठ करून पुढे निघावे लागले.

वाटेवर मला एक मुलगा दिसला. त्याचे घर कुठे होते ते मला माहित नाही पण कालही मी याला रस्त्यावर भटकताना पाहिले होते. त्याने कित्येक दिवसात आंघोळ केलेली दिसत नव्हती. लोकं वेडसर ठरवतील अशा हालचाली तो करायचा. मी डोंगरातून एकटीच वाट काढत चालले होते त्या वाटेवर माझा वाटाड्या बनून तो माझ्या पुढे पुढे चालू लागला.

इंडिया-म्यानमार बोर्डर पोस्ट वरून निसर्गरम्य डोंगरात वसलेल्या लहान लहान वस्तींचे फार सुंदर दृश्य दिसते. सूर्य जरी डोक्यावर आला होता तरी मस्त वारा सुटला होती. तो आणि मी हवा खात इथेच खूप वेळ बसून राहिलो. तो त्याचीच भाषाही धड बोलू शकत नव्हता पण आम्ही एकमेकांशी संवाद साधयला उत्सुक होतो. आमची एकमेकांशी मैत्री जमली.
56848152_10156992894317778_3568696001352957952_n.jpg

थोड्याच वेळात कालचे बायकर्स इथे येऊन पोहोचले. या मुलाची सोबत घेऊन मी इथवर चालत आले याचे त्यांना कोण आश्चर्य वाटले. आम्हाला दोघांनाही त्यांनी बाईकवरून परत गावात जायला लिफ्ट ऑफर केली. अचानक बाईक राईड मिळाली त्याची आम्हाला खूप गंमत वाटत होती. आपापल्या बाईकवरून एक दुसऱ्याला हाका देत आम्ही खिदळत होतो.

दुपारी मला भूक लागली असेल असे वाटून बायकांनी मॅगी, बिस्किटे आणून दिले. ते खाऊन एक झोप काढण्यासाठी निघतच होते तेवढ्यात एक वयस्कर हेडहंटर पारंपारिक टोपी चढवून घराच्याच दिशेने येताना दिसला. इथल्या पारंपारिक पोशाखाबद्दल बोलायचे झाले तर उत्सवाच्या दिवशी कपडे, टोपी, दागिने अशी भरभक्कम सजावट अंगावर चढवायची प्रथा असली तरी इतर दिवशी शक्यतो कोन्याक पुरुष आणि बायका, दोघेही नग्न वावरायचे. पण तो काळही सरला. लोन्ग्वा ला भेट देणाऱ्या प्रवाशांकडचे काय आवडते आणि प्रवाशांना काय आवडते, त्यानुसार लज्जा, फेशन आणि उदरनिर्वाह यांच्या पायी मूळ परंपरा मात्र लयाला गेली. आमच्या घरी येणाऱ्या अंगात कोट, खाली अर्धी चड्डी आणि गळ्यात पारंपारिक माळ घातली होती. वयानुसार थकून गेलेला आमचा पाहुणा हातातला भाला उंच करीत “हल्ला बोल” च्या आविर्भावात आरडा ओरडा करीत झपझप चालत येत होता. लोन्ग्वाच्या हेडहंटरचे ते हायब्रीड रूप खोलवर विचार करता अस्वस्थ करणारे आहे. पण त्या क्षणी त्याला पाहून मला खूप गंमत वाटली. मग घरच्या बायकांना विनवणी करून मी ही नाग्मिझ स्त्री सारखा पोशाख चढवला. माझा अवतार बघून सारी मुले सुद्धा माझ्याबरोबर मस्ती मजा धुमाकूळ करत होती. आम्ही खूप फोटो काढले.

56877101_10156992894747778_6356758220366675968_n.jpg57045408_10156992894912778_5860885781979070464_n.jpg

त्या खुशीत बोलीवूडची गाणी लावून मी नाचू लागले तेव्हा पोरे हसायला लागली. पण आंघोळ करताना पाहून खिदळत होती त्यापुढे मला याची काहीच लाज वाटली नाही. मग चिमणी पोरे माझ्याबरोबर नाचूही लागली. दुपारभर आम्ही धांगडधिंगा केला. रुटीन दिवसाचा उत्सव झाला.

कुटूंबाचे धुतलेले कपडे वाळत घालायला एक दोरी घराबाहेर दोरी टांगली होती. आधीचे कपडे उतरवले गेले तसे धुतलेले कपडे वाळत घालायला माझा नंबर लागला तोवर दुपार टळत आली होती. संध्याकाळी पाच वाजता इथे सूर्य मावळायला सुरवात होते. तो नजारा या घरातून सुंदर दिसतो. मी एका खुर्चीवर शांत बसून ते न्याहाळत होते की ढग भरून आले नि पावसाला सुरवात झाली. धुतलेल्या कपड्यांचे जे प्रदर्शन नुकतेच दोरीवर मांडून ठेवले होते ते आटपे आटपे पर्यंत सारे कपडे आणि मी सुद्धा पार भिजून गेले. माझी पुरती वाट लागली. अगदी शेकोटी जवळ बसूनही अंगातली हुडहुडी कमी होईना.

माझ्या होस्ट ने मला सुचवले की थोडी चिलीम ओढ म्हणजे अंगातील थंडी कमी होईल. तरी ती स्वयंपाकघरातली मुळीच हिंदी न कळणारी घरची मुख्य स्त्री मला सांगत होती, “मन माय ... मन माय”. त्याचा आर्थ “हे चांगले नाहीये” पण मी थोडे झुरके घेतलेच. तर जादू झाल्यागत माझी थंडी पळून गेली. त्या उबेची मला नितांत गरज वाटली म्हणून तिचा सल्ला फार मनावर घ्यावा असे वाटले नाही. जंगली माणसांच्यात रहायचे तर एखादा दिवस त्यांच्याच सारखे राहिले तर बिघडले कुठे? स्वत:चे असे समाधान करून पुढचे तासन तास बैठकीच्या खोलीत शेकोटी भोवती बसून त्यांच्यातलीच एक असल्यासारखी आफीम ओढत राहिले. पुढे पुढे मी किती अति करतेय मलाच धड कळत नव्हते. पण हे खरे की जरी बाहेर गारठून टाकणारी थंडी पडली होती तरी मला मात्र मुळीच थंडी वाजत नव्हती.

56623229_10156992896167778_2172491060721221632_n.jpg

रश्मी, एक ना एक पत्र तुला लिहायचे हे ठरवलेच होते. आपली ओळख झांल्यापासून मी जो काहीही उपक्रम हाती घेतला त्यात तुझी बिनशर्त संपूर्ण मदत असते. आणि वेळोवेळी माझ्या कामाचे कौतुक करून मला उत्तेजन देण्यासाठीही तूच पुढे असतेस. नुकताच एक रेडीओप्रोग्राम बनवताना तू मला सांगितलेस की, “तू ज्याला हात लावशील त्याचे सोने केले नाहीस असे कधी तरी झाले आहे का?” आणि बिलकूल आत्मविश्वास वाटत नव्हता अशा परिस्थितीही आपण तो कार्यक्रमही यशस्वी केला. फार जवळची नसलीस तरी तू माझी फार मोलाची मैत्रीण आहेस.

आज रात्री उशिरापर्यंत जी काय नशा केली की त्याचा दिंडोरा पिटण्यासारखे असे काही नाही. गौरवाच्या क्षणी कोणालाही पत्र लिहिता येते. परिस्थिती नेमकी उलट असते, स्वत:चे मन स्वत:ला खात असते, तेव्हा फक्त मोजक्या लोकांची आठवण होते, त्यापैकी तू एक आहेस. म्हणून तुला पत्र लिहायला घेतले.

तुझी मैत्रीण
सुप्रिया
56706191_10156992897517778_1773867994858913792_n_0.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना भारीच अनुभव आहे.
एकदा पुढचा भाग लिहिला की मी सुटले. लेखमाला सुरु केल्यापासून त्याच भागाची सर्वात जास्त भीती वाटते. नुसती आठवण आली तरी वाटते. आणि इथे तर लोक काय म्हणतील ही आणखी एक भीती आहे. तरी, नाही म्हटल तरी मी आता वाचकांना पहिल्यासारखी घाबरत नाही म्हणा.
पण पुढचा भाग नक्की वाचा.

> गौरवाच्या क्षणी कोणालाही पत्र लिहिता येते. परिस्थिती नेमकी उलट असते, स्वत:चे मन स्वत:ला खात असते, तेव्हा फक्त मोजक्या लोकांची आठवण होते, त्यापैकी तू एक आहेस. म्हणून तुला पत्र लिहायला घेतले.
वॉव !
लेखमाला मस्त चालू आहे. वाचतोय. आणि तुमच्या जिगरीला मनापासून दाद !

मी पण वाचते आहे. तुमच्या धाडसाचे कौतुक वाटते खरंच. ऑनेस्टली खूपदा असेही वाटते की अरे ही बाई वेडी आहे का? घाबरत कशी नाही कुणावरही विश्वास टाकायला!! पण कुठेतरी तुमची पॅशन मनात पोहोचतेय आणि समजतेय तसे हेवा पण वाटतो तुमचा Happy

लॉकडाऊनच्या निमित्ताने एक अप्रतिम लेखमाला सलग वाचायला मिळाली. तुमची लेखनशैली देखील भारी आहे.
---
धन्यवाद!

इथे तर लोक काय म्हणतील ही आणखी एक भीती आहे.>>>

बिनधास्त लिहा. लोक काहीतरी म्हणणारच...त्याचे किती मनावर घ्यायचे.

साधना , मोलाचा सल्ला आहे. मैत्रेयी, खर आहे तुझ.
एका वर्षापूर्वी प्रत्यक्ष लिहिलेल्या पत्रातले आता एकच पत्र शिल्लक आहे. पुढचे आठवून आठवून लिहायचे. त्रिनेत्र, शैलजा, अजय, समीर प्रतिक्रिया वाचल्यावर पुढचे भागही भरभर लिहून टाकावे असा उत्साह वाटतोय.

सुप्रिया नक्की लिहा. तुम्ही सध्याच्या काळात जर घरी राहू शकत असाल तर वेळ मिळेल तसं लिहा.
मैत्रेयी म्हणतेय तसंच होतं वाचताना. पुन्हा तेच लिहित नाही. तुमच्या धाडसाचं कौतुक, राग, हेवा, आनंद, भीती असं वेगवेगळ्या भागात वेगवेगळं वाटून झालंय. माझी एक मैत्रीण अशी एकटीने फिरायची. दुर्दैवाने कॅन्सरने काही वर्षांपूर्वी अचानक (कारण डिटेक्ट अचानक झाला आणि शेवटची स्टेज) गेली. तुमची सिरीज वाचताना तिला हे वाचायला द्यायला आवडलं असतं असं नेहमी वाटतं. आणि वाईट वाटतं. Sad सॉरी अगदीच राहावलं नाही म्हणून लिहिलं हवं तर नंतर थोड्या वेळाने डिलिट करते. अवांतर नको.