सळसळते तारुण्य गेले - ऋषी कपूर

Submitted by बेफ़िकीर on 30 April, 2020 - 01:01

एक सगळ्या जगालाच आवडणारे व्यक्तीमत्व असावे पण ते गेल्यावर अगदी व्यक्तीगत दु:ख व्हावे असे फार कमी वेळा घडते. कालच इरफान खान कमी वयात गेला आणि आज ऋषी कपूर ६८ व्या वर्षी! किशोर कुमार, आर डी हीपण अशीच व्यक्तीमत्वे!

मलईवर गुलाबाच्या पाकळ्या भुरभुराव्यात तसा चेहरा घेऊन बॉलीवूडमध्ये प्रवेशलेला ऋशी कपूर कायम दोन मर्यादांसह कार्यरत राहिला व तरीही अफाट यशस्वी ठरला. गोंडस चेहरा आणि गबदूल शरीरामुळे हाणामारी करू शकणे, प्रेक्षकांना सूड उगवल्याचे क्षणिक समाधान देऊ शकणे यापासून त्याला नेहमीच दूर राहावे लागले. दुसरे म्हणजे त्याच्या ऐन भरभराटीच्या काळात अमिताभ बच्चन हिंदी चित्रपटसृष्टीचा सर्वेसर्वा होता. त्याच्याबरोबर अनेक भूमिका केलेल्या ऋषी कपूरचे एकत्रित चित्रपटातील अस्तित्व तुलनेने कायम दुय्यमच राहिले. मात्र या समस्येवर ऋषी कपूरने सहज मात केली होती. त्याच्या एकट्याच्या वाटेला चित्रपटाचा नायक म्हणून आलेल्या भूमिकांचे त्याने सोने केले. भूमिकेला आवश्यक ते गांभीर्य त्याने नेहमीच देऊ केले. त्याचा आवाज, भावनिक गुंतवणूक सहज समजेल अशी संवादफेक, मुद्राभिनय आणि आपल्या (तथाकथित) मर्यादांनाच आपले बलस्थान बनवण्याचे कसब अफलातून होते. तथाकथित म्हणण्याचे कारण असे की असे गुलगुलीत शरीरयष्टी आणि तोंडावळा असलेले कैक स्टार्स आधीच्या जमान्यात होऊन गेले. त्यांनीही त्यावर बर्‍यापैकी मात केलेली होती.

राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, शशी कपूर, संजीव कुमार, विनोद खन्ना आणि अनेक चरित्र अभिनेते, अभिनेत्री यांच्या उपस्थितीत योग्य तेवढा भाव ऋषी कपूरने नेहमीच खाल्ला. अमर, अकबर, अ‍ॅन्थनी हे त्याचे सर्वात सुरेख उदाहरण म्हणावे लागेल. खणखणीत शरीरयष्टीचा इस्न्पेक्टर विनोद खन्ना आणि सुपरस्टार अमिताभ यांच्या उपस्थितीत अकबर उभा करून पडदा व्यापणे सोपे नव्हते.

राज ते रणबीर या पिढ्यांमधील एक प्रदीर्घ लांबीचा दुवा म्हणूनही ऋषी कपूर कायम आपले स्थान टिकवून राहील असेही वाटते. याचे कारण सत्तरच्या दशकापासून ते एकविसाव्या शतकापर्यंत कार्यरत राहणे हे विशेष महत्वाचे आहे. समाज, संस्कृती, मूल्ये, प्राधान्ये यात आमुलाग्र बदल होण्याची ही चाळीस, पन्नास वर्षे होती. बदलाचा वेग कधी नव्हे इतका वाढला होता. या वेगवान प्रवाहात टिकून राहणे आणि कायम आकर्षणाचा विषय ठरणे सोपे नव्हते. ऋषी कपूरने तर कारकीर्दीच्या शेवटी खलनायकी भूमिकाही केली.

ऋषी कपूरचे नृत्य व गाण्यांवर अभिनय करतानाचा मुद्राभिनय हे मन ताजेतवाने करणारे असत. दिवाना चित्रपटात लहानश्या दिव्या भारतीसमोर खूपच गबदूल दिसत असूनही त्याने हा प्रश्न रसिकमनात येऊ दिला नव्हता की हे दोघे एकमेकांना शोभतात तरी का!

राज कपूरने भारतीय संस्कृती व त्यातील मूल्यांना पडद्यावर महत्व दिले. शम्मीने वेडेपणा करून एका पिढीला वेड लावले. शशी कपूरने मर्यादांमध्ये राहून आलेल्या भूमिकांचे शक्य तितके चीज केले. रणधीर कपूर व राजीव कपूर तसे मागे मागेच राहिल्यासारहे वाटले. पुढच्या पिढीला त्या त्या काळाला सोभेलसा अभिनय करणे व वावर ठेवणे आवश्यक झाले. करिष्मा, करीना आणि रणबीर यांनी कपूर घराण्याचा दबदबा निश्चितच कायम ठेवला. मात्र ऋषी कपूरने प्रदीर्घ काळ हिंदी चित्रपट रसिकाचे मन ताजेतवाने आणि तरुण ठेवले. हे ऋषी कपूरचे फार मोठे योगदान म्हणावे लागेल.

जेव्हा सुपरडूपर हिट चित्रपट देणार्‍या अभिनेत्यावर दुनिया जान कुर्बान करत असते तेव्हा अभिनेत्यांची एक फळी एकापाठोपाठ एक गुणी चित्रपट देऊन मोठेच योगदान देत असते. ऋषी कपूर अश्या फळीचा प्रतिनिधी होता असे म्हणावे लागेल. सतत त्रस्त चेहरा न करता, फारशी हाणामारी न करता, सतत सुडाग्नीने पेटलेले नसूनही एक सशक्त कथानक मांडता येते हे दाखवून देणार्‍या ऋषी कपूरला.....

..... साश्रू नयनांनी शेवटचा निरोप!

=====

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋषी कपूरने प्रदीर्घ काळ हिंदी चित्रपट रसिकाचे मन ताजेतवाने आणि तरुण ठेवले. >>> अगदी अगदी. सुरेख श्रद्धांजली.

हां ऋषी, हमने तुमसे प्यार किया!

खरं आहे!

अनेक चरित्र अभिनेते, अभिनेत्री यांच्या उपस्थितीत योग्य तेवढा भाव ऋषी कपूरने नेहमीच खाल्ला. अमर, अकबर, अ‍ॅन्थनी हे त्याचे सर्वात सुरेख उदाहरण म्हणावे लागेल. >>

अगदी!
त्याच्या दुसऱ्या खेळीतले औरंगजेब आणि कपूर अँड सन्स हेही भारी होते.

व्यक्तिशः मला तरी ऋषी कपूरचा अभिनय सर्वाधिक आवडला तो राउफ लाला म्हणून अग्निपथ मधला, आणि दाऊद म्हणून D day मधला. राउफ लालाची तर किळस वाटावी इतका जबरदस्त अभिनय केलाय या माणसाने.. शिवाय दामिनीमधला हतबल नवरा, मजेदार अकबर या विशेष भूमिका.. श्रद्धांजली

मस्त लिहिलांय बेफि.
खूप गोड क्युट हिरो गेला.
दिवाना, सागर, अग्निपथ, आणि नमस्ते लंडन मधला हैराण बाप.

>> सतत त्रस्त चेहरा न करता, फारशी हाणामारी न करता, सतत सुडाग्नीने पेटलेले नसूनही

अगदी अगदी. आपल्याच मनातले शब्द मांडलेत असे वाटले वाचताना. एकीकडे राज कपूर नंतर ती परंपरा पुढे राखण्याच्या रसिकांच्या अपेक्षा आणि दुसरीकडे अमिताभचा झंझावात (ज्यात राजेश/विनोद खन्ना सारखे अनेक भक्कम वृक्ष उन्मळून पडले) अशा स्थितीत ऋषी मस्तपैकी तग धरून राहिला. आपला स्वत:चा प्रेक्षकवर्ग त्याने बनवला. देमार ढिशुम ढिशुम करणाऱ्या हिरोंच्या काळात ऋषी असली हाणामारी नको वाटणाऱ्या युवकांचे पडद्यावर प्रतिनिधित्व करत राहिला. ते छान जमून गेले त्याला. श्रीदेवी सोबतचा चांदणी असो किंवा झेबा सोबतचा हिना किंवा अन्य कोणताही चित्रपट. प्रेमभंग, कौटुंबिक समस्या, अजून कसल्या कसल्या व्यक्तिगत समस्या हाणामारी न करता पडद्यावर सोडवणारा ऋषी पाहताना वेगळेच कौतुक वाटायचे. अनेक प्रेक्षक स्वत:ला त्या व्यक्तिरेखेशी रिलेट करायचे. अमिताभची भूमिका पाहताना खात्री असायची कि हा त्या भूमिकेचे सगळे प्रॉब्लेमस शेवटी सोल्व्ह करणार. पण ऋषीचे तसे नव्हते. काळजीच वाटायची. मार खातोय का काय असे वाटायचं Happy पण नाही. हाणामारी न करताही सगळे गुते सोडवून शेवटी सहीसलामत हिरोईन सोबत गाणे म्हणत नाचायला रिकामा Happy

गेला बिचारा............ Sad

Rishi Kapoor यांना श्रध्दांजली!
---
"वाईन शॉप" 'किमान एक तासासाठी तरी उघडे करा' हि महाराष्ट्र सरकारकडे केलेली त्यांची इच्छा, शेवटी अपूर्ण राहीली.

हिंदी चित्रपटसृष्टीच्या चाहत्यांसाठी दुसरा मोठा धक्का आहे हा! तुमचा समयोचित लेख आवडला. देव ऋषी कपूर यांच्या आत्म्यास शांती देवो __/\__

ॠषी कपुर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांची/दिग्दर्शकाची मुले चित्रपटात येणे आता नवीन नाही. पण याची सुरवात झाली ती कपुर कुटुंबापासून असे म्हणणे वावगे ठरू नये. पृथ्वीराज कपुरांचा वारसा त्यांच्या तीन मुलांनी समर्थपणे पुढे चालवला. नंतर राज कपुर आणि शशी कपुरांच्या मुलांनी सुध्दा चित्रपटात पदार्पण केले. पण यात कलाकार म्हणून यश मिळाले ते ॠषी कपुर यांना. बाॅबी चित्रपटामधून वयाच्या अठराव्या वर्षी नायक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास उत्तरोउत्तर बहरत गेला. अनेक यशस्वी दिग्दर्शक/कलाकारांसोबत त्यांनी काम केले. राज कपुर यांचा मुलगा म्हणून नाही तर एक चांगला कलाकार म्हणून त्यांना हे यश मिळाले. गोंडस चेहरा आणि सहजसुंदर अभिनय याच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले. त्यांच्या मुलगा रणबीर कपुर आज चित्रपट सृष्टीत स्वतःची ओळख बनवून आहे. जी एकवेळ त्यांनी सुध्दा बनवली होती. राज कपुरचा मुलगा म्हणून आलेला आज रणबीर कपुरचा बाप म्हणून जरी आहे तरी तो ॠषी कपुर म्हणूनच ओळखला जाईल यातच त्याचे यश सामावले आहे.
आज तो या जगात नाही पण त्याच्या चाहत्यांच्या ह्रदयात नेहमीच असेल.

काही पट्कन आठवणारी गाणी:

https://youtu.be/jmeMg-gm1Us?t=30

https://youtu.be/eS29KERO_d4?t=51

https://youtu.be/uXwmiddQ8DI?t=129

https://www.youtube.com/watch?v=qzRv3cLUzoI

https://www.youtube.com/watch?v=17LL_iqlHE8

https://www.youtube.com/watch?v=nvBnA8RXdeQ

हा सगळा काळ आता इतिहासजमा झालाय

त्याच्या गुलजार ( हो दुसरा शब्दच नाही त्यासाठी. काही गाण्यात तर तो नायिकेपेक्षा सुंदर दिसतो.) व्यक्तिमत्वामुळे त्याच्या अभिनय-प्रतिभेकडे काहीसे दुर्लक्ष होते. पण अमिताभच्या झंजावातापुढे टिकुन राहणे स्वतःचे नाणे खणखणीत असल्याशिवाय शक्य नव्हते. त्याला कारकीर्दिच्या पुर्वार्धात वैविध्यपुर्ण भुमिका मिळाल्या नसतिल कदाचित पण त्यात त्याचा अभिनय मात्र शंभर नंबरी होता. उदा. प्रेमरोग
उत्तरार्ध (अग्नीपथ, औरंगझेब) तर लाजवाब.
पित्याचा अभिनयाचा वारसा त्याने समर्थपणे पेलला आणि पुढेही नेला.

...श्रद्धांजली....

चाॅकलेट हिरो ते खलनायक सर्व भुमिकांना योग्य न्याय देणारा कलाकार हरपला. ॠषी कपुर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

माझे एक आवडते गाणं.
https://youtu.be/AJnf4jaga88

अमिताभ हा सचिन तेंडुलकर असेल तर ऋषी कपूर सौरव गांगुली होता..
जसा सचिन सर्वोत्तम असला तरी गांगुलीच्या नजाकतदार फलंदाजीचा आपला एक फॅन क्लब होता. तसेच ऋषी कपूरचाही होता..
आणि आता तर त्याने सेकंड इनिंगही मस्त सुरु केली होती.. श्या अजून हवा होता यार... दोन दिवस दोन कलाकार.. कमालीचे पोटेंशिअल असलेले.. अजून देण्यासारखे बरेच असलेले.. आणि सर्वात महत्वाचे दोन चांगली माणसे गेली Sad

नुकताच त्याचा मुल्क चित्रपट पाहिलेला... कोणी पाहिला मसेल तर त्याच्यासाठी नक्की बघा. चित्रपट त्याचाच आहे.

"मलईवर गुलाबाच्या पाकळ्या भुरभुराव्यात तसा चेहरा "
अगदी समर्पक वर्णन. लेख खूपच आवडला. गुलछबू अशी प्रतिमा निर्माण झाली असली तरी त्याचे पदन्यास अगदी उतारवयापर्यंत चपळ आणि आकर्षक होते. तरुणपणी खेल खेल में मधले प्रत्येक गीत त्याने गाजवले होते. यह वादा रहा हा थोडा दुर्लक्षित चित्रपट ; पण निव्वळ त्याच्या उपस्थितीमुळे स्मरणात राहिला. काळाच्या एका प्रदीर्घ कालखंडात तो वावरला. वयानुरूप भूमिका करीत आपला ठसा उमटवत राहिला. तीन पिढ्यांना जोडणारा सेतू आज कोसळला आहे. जुन्याशी नाळ जोडून असलेल्या आमच्यासारख्या लोकांच्या मनातल्या आठवणींचा एक कोनाडा लिंपला गेला.

खूप सुरेख श्रद्धांजली!
खरंच अजून खरं वाटत नाहीए, एका मागे एक असे हे दोघे आपल्याला सोडून गेले.
आपण कधीही न भेटता न ओळखता ह्या मंडळींनी आपली आयुष्यं इतकी व्यापून टाकणं, आपल्या अभिनय आणि व्यक्तिमत्वाने भारून टाकणं, आणि ह्या सगळ्या पलीकडे एक व्यक्ती म्हणून किती गोड असणं कदाचित या सगळ्यामुळेच त्यांचं जाणं हे आपल्या जवळच् कोणी गेल्या सारखं वाटतंय! --^--

एक सगळ्या जगालाच आवडणारे व्यक्तीमत्व असावे पण ते गेल्यावर अगदी व्यक्तीगत दु:ख व्हावे असे फार कमी वेळा घडते. कालच इरफान खान कमी वयात गेला आणि आज ऋषी कपूर ६८ व्या वर्षी! ~~ +१११
काल आणि आजचा दिवस ..खरच खूप वाईट वाटले!!
अग्निपथ आणि कपूर अँड सन्स मधला अभिनय तर कमालच होता..
RIP Chintuji .. you will be missed. Sad

मी काल काही तरी गोड बनवणार होती तेवढ्यात इरफान खान यांच्या बद्दल कळालं आणि आज ऋषी सर बद्दल दोघेही खूप आवडते होते त्यामुळे थोडे दिवस तरी यातून बाहेर पडायला नाही होणार..

समर्पक लेख आहे. ऋषी कपूर हा मी माझ्या शाळकरी वयात हाताच्या अंतरावरून प्रत्यक्ष पाहिलेला हिरो. फिल्म सिटी मध्ये त्याचं शूटिंग चालू होतं तेव्हा. अजुनही तळपत्या उन्हात लालेलाल झालेला त्याचा गोरापान लोभस चेहरा आठवतो.... मी त्याची फॅन होते त्यामुळे त्या दिवसानंतर कितीतरी दिवस अगदीच छान हवेत तरंगत असायचे की आपण आवडत्या हिरोला एवढ्या जवळून प्रत्यक्ष पाहिलं..

त्यांचा कर्ज मधला मॉंटी आणि अग्निपथ (नवा) मधला रौफ लाला दोन्ही आवडत्या भूमिका ..!
रौफ लाला जबरी होता, अंगावर काटा यायचा त्यांची बेदरकार नजर पाहून...
श्रद्धांजली !

लेख आवडला. ऋषी कपूर सगळ्या भुमिकेत आवडायचा. ओम शांती ओम गाणे डोळ्यासमोर आले.
श्रद्धांंजली .
काय चाललयं हे काल इरफान आज ऋषी Sad .
धन्यवाद बेफिकीर.

>>>>त्याच्या गुलजार ( हो दुसरा शब्दच नाही त्यासाठी. काही गाण्यात तर तो नायिकेपेक्षा सुंदर दिसतो.) व्यक्तिमत्वामुळे>>>> परफेक्ट्ट्ट!! हाच शब्द योग्य आहे.
_____
ऋषीचा बॉबी व मेरा नाम जोकर मधील अभिनय फार आवडला मला. बॉबीत तर काय कोवळा व देखणा दिसतो तो.

>>>>त्याच्या गुलजार ( हो दुसरा शब्दच नाही त्यासाठी. काही गाण्यात तर तो नायिकेपेक्षा सुंदर दिसतो.) व्यक्तिमत्वामुळे>>>> परफेक्ट्ट्ट!! हाच शब्द योग्य आहे.
_____
ऋषीचा बॉबी व मेरा नाम जोकर मधील अभिनय फार आवडला मला. बॉबीत तर काय कोवळा व देखणा दिसतो तो.
_______________________
@माने - सुंदर गाणं दिलत.
डोळ्यात पाणी आले.
_____________
>>>>>>>त्यांचा कर्ज मधला मॉंटी>>>> येस्स!
_________________
>>>>>>ऋषी कपूरने प्रदीर्घ काळ हिंदी चित्रपट रसिकाचे मन ताजेतवाने आणि तरुण ठेवले. >>>>>>> अगदी तंतोतंत खरे आहे.
__________
>>>>प्रेमरोग>>>>> वाह!!! खरच की!

श्रध्दांजली लेखाला छान म्हणण, बर दिसत नाही. तरीहि धन्यवाद, आपल्या सामाजिक कार्याचा आवाका माहिती आहे तरीही आपले लेखन मायबोली वर हवेच. सगळी कडेच आगाऊ टोल धाडी आल्यात.

मला तो सर्वात दामिनी मध्ये आवडला होता. सुरुवातीस बायको की कुटुंबिय या द्विधा मनस्थितीत असणे आणि नंतर ठामपणे बायकोला साथ देणे लक्षात राहण्यासारखे.

Pages