सळसळते तारुण्य गेले - ऋषी कपूर

Submitted by बेफ़िकीर on 30 April, 2020 - 01:01

एक सगळ्या जगालाच आवडणारे व्यक्तीमत्व असावे पण ते गेल्यावर अगदी व्यक्तीगत दु:ख व्हावे असे फार कमी वेळा घडते. कालच इरफान खान कमी वयात गेला आणि आज ऋषी कपूर ६८ व्या वर्षी! किशोर कुमार, आर डी हीपण अशीच व्यक्तीमत्वे!

मलईवर गुलाबाच्या पाकळ्या भुरभुराव्यात तसा चेहरा घेऊन बॉलीवूडमध्ये प्रवेशलेला ऋशी कपूर कायम दोन मर्यादांसह कार्यरत राहिला व तरीही अफाट यशस्वी ठरला. गोंडस चेहरा आणि गबदूल शरीरामुळे हाणामारी करू शकणे, प्रेक्षकांना सूड उगवल्याचे क्षणिक समाधान देऊ शकणे यापासून त्याला नेहमीच दूर राहावे लागले. दुसरे म्हणजे त्याच्या ऐन भरभराटीच्या काळात अमिताभ बच्चन हिंदी चित्रपटसृष्टीचा सर्वेसर्वा होता. त्याच्याबरोबर अनेक भूमिका केलेल्या ऋषी कपूरचे एकत्रित चित्रपटातील अस्तित्व तुलनेने कायम दुय्यमच राहिले. मात्र या समस्येवर ऋषी कपूरने सहज मात केली होती. त्याच्या एकट्याच्या वाटेला चित्रपटाचा नायक म्हणून आलेल्या भूमिकांचे त्याने सोने केले. भूमिकेला आवश्यक ते गांभीर्य त्याने नेहमीच देऊ केले. त्याचा आवाज, भावनिक गुंतवणूक सहज समजेल अशी संवादफेक, मुद्राभिनय आणि आपल्या (तथाकथित) मर्यादांनाच आपले बलस्थान बनवण्याचे कसब अफलातून होते. तथाकथित म्हणण्याचे कारण असे की असे गुलगुलीत शरीरयष्टी आणि तोंडावळा असलेले कैक स्टार्स आधीच्या जमान्यात होऊन गेले. त्यांनीही त्यावर बर्‍यापैकी मात केलेली होती.

राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, शशी कपूर, संजीव कुमार, विनोद खन्ना आणि अनेक चरित्र अभिनेते, अभिनेत्री यांच्या उपस्थितीत योग्य तेवढा भाव ऋषी कपूरने नेहमीच खाल्ला. अमर, अकबर, अ‍ॅन्थनी हे त्याचे सर्वात सुरेख उदाहरण म्हणावे लागेल. खणखणीत शरीरयष्टीचा इस्न्पेक्टर विनोद खन्ना आणि सुपरस्टार अमिताभ यांच्या उपस्थितीत अकबर उभा करून पडदा व्यापणे सोपे नव्हते.

राज ते रणबीर या पिढ्यांमधील एक प्रदीर्घ लांबीचा दुवा म्हणूनही ऋषी कपूर कायम आपले स्थान टिकवून राहील असेही वाटते. याचे कारण सत्तरच्या दशकापासून ते एकविसाव्या शतकापर्यंत कार्यरत राहणे हे विशेष महत्वाचे आहे. समाज, संस्कृती, मूल्ये, प्राधान्ये यात आमुलाग्र बदल होण्याची ही चाळीस, पन्नास वर्षे होती. बदलाचा वेग कधी नव्हे इतका वाढला होता. या वेगवान प्रवाहात टिकून राहणे आणि कायम आकर्षणाचा विषय ठरणे सोपे नव्हते. ऋषी कपूरने तर कारकीर्दीच्या शेवटी खलनायकी भूमिकाही केली.

ऋषी कपूरचे नृत्य व गाण्यांवर अभिनय करतानाचा मुद्राभिनय हे मन ताजेतवाने करणारे असत. दिवाना चित्रपटात लहानश्या दिव्या भारतीसमोर खूपच गबदूल दिसत असूनही त्याने हा प्रश्न रसिकमनात येऊ दिला नव्हता की हे दोघे एकमेकांना शोभतात तरी का!

राज कपूरने भारतीय संस्कृती व त्यातील मूल्यांना पडद्यावर महत्व दिले. शम्मीने वेडेपणा करून एका पिढीला वेड लावले. शशी कपूरने मर्यादांमध्ये राहून आलेल्या भूमिकांचे शक्य तितके चीज केले. रणधीर कपूर व राजीव कपूर तसे मागे मागेच राहिल्यासारहे वाटले. पुढच्या पिढीला त्या त्या काळाला सोभेलसा अभिनय करणे व वावर ठेवणे आवश्यक झाले. करिष्मा, करीना आणि रणबीर यांनी कपूर घराण्याचा दबदबा निश्चितच कायम ठेवला. मात्र ऋषी कपूरने प्रदीर्घ काळ हिंदी चित्रपट रसिकाचे मन ताजेतवाने आणि तरुण ठेवले. हे ऋषी कपूरचे फार मोठे योगदान म्हणावे लागेल.

जेव्हा सुपरडूपर हिट चित्रपट देणार्‍या अभिनेत्यावर दुनिया जान कुर्बान करत असते तेव्हा अभिनेत्यांची एक फळी एकापाठोपाठ एक गुणी चित्रपट देऊन मोठेच योगदान देत असते. ऋषी कपूर अश्या फळीचा प्रतिनिधी होता असे म्हणावे लागेल. सतत त्रस्त चेहरा न करता, फारशी हाणामारी न करता, सतत सुडाग्नीने पेटलेले नसूनही एक सशक्त कथानक मांडता येते हे दाखवून देणार्‍या ऋषी कपूरला.....

..... साश्रू नयनांनी शेवटचा निरोप!

=====

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सतत त्रस्त चेहरा न करता, फारशी हाणामारी न करता, सतत सुडाग्नीने पेटलेले नसूनही एक सशक्त कथानक मांडता येते हे दाखवून देणार्‍या ऋषी कपूरला.....
उत्तम सारांश .

दामिनी मध्ये छान काम होते त्यांचे मात्र लोकांना सनी लक्षात राहिला. तीच गोष्ट दिवाना ची . शाहरुख समोर झाकला गेला . एक कसलेला अभिनेता गेला - श्रद्धांजली .

सतत त्रस्त चेहरा न करता, फारशी हाणामारी न करता, सतत सुडाग्नीने पेटलेले नसूनही एक सशक्त कथानक मांडता येते हे दाखवून देणार्‍या ऋषी कपूरला....+१११११
त्याचं जाणंही चटका लावून गेलं.मिस यु ऋषी

ऋषी कपूरची दुसरी इनिंग जास्त चांगली होती. त्यातील भूमिकांमधे प्रचंड विविधता होती. ह्याच्याकडे बघून वाटते की अभिनय हा अनुवांशिक गुण आहे (बाकी काही लोकांकडे बघून वाटते की नाही!).
त्याच्या अभिनयाबद्द्ल लिहिलेच आहे. त्याच्या मुलाखतीदेखील पहाण्या आणि ऐकण्यासारख्या. एक प्रांजळ माणूस. स्वतःच्या चुकादेखील कबूल करतो. कुठलेसे अवॉर्ड मिळावे म्हणून कुणाला तरी तरूणपणी १०००० रु. लाच दिली होती!
त्याचे एखादे गाणे गाण्याचे दृष्य असेल तर तो आपल्या (बेसूर) आवाजात तो ते गाणे म्हणायचा. आजूबाजूच्या नट्या आणि नट वैतागायचे. पण तोंडाकडे पाहून वाटले पाहिजे की हा माणूस गातोय. चेहर्याच्या, गळ्याच्या योग्य हालचाली झाल्या पाहिजेत. म्हणून त्याने ती पद्धत सोडली नाही.

काहींना कदाचित जुन्या वळणाचे वाटेल पण मी माझ्या वडिलांशी जसे अंतर, आदर ठेवून वागायचो तसेच माझ्या मुलानेही वागावे अशी अपेक्षा. म्हणजे (असली तर) हातातली सिगरेट विझवणे. काही विषयांवर वडिलांशी न बोलणे इ.

राज कपूर आणि त्याची बायको जवळपास वेगळे व्हायला निघाले होते त्यावेळच्या आठवणी.

ऋषी कपूरने सर्वात पहिल्यांदा श्री ४२० मधे एक छोटे काम केले होते. प्यार हुआ इकरार हुआ गाण्यात शेवटी तीन मुले रेनकोट घालून चालत असतात त्यातला सगळ्यात धाकटा तो होता. तेव्हाही पाऊस पडताना दाखवल्यामुळे त्याला डोळे उघडे ठेवता येत नव्हते. मग नरगिसने चॉकलेटची लालूच दाखवून त्याच्याकडून नीट काम करून घेतले. ती त्याची पहिली कमाई!

माझीही श्रद्धांजली. वाटले नव्हते की हा इतक्या लगेच जाईल.

दामिनी मध्ये छान काम होते त्यांचे मात्र लोकांना सनी लक्षात राहिला. तीच गोष्ट दिवाना ची . शाहरुख समोर झाकला गेला . एक कसलेला अभिनेता गेला - श्रद्धांजली .
>>> ही कोणती पद्धत आहे प्रशंसा करण्याची???

सोचेंगे तुम्हे प्यार करे कि नहीं हे माझ अत्यंत आव्डत गाण. पण त्याच तेरी उम्मीद तेरा इंतजार ह्यातले त्याचे स्वेटर आणि तो आणि गाणे . कितीहीवेळा बघितले तरी अजुन कंटाळा आला नाही.

>> कितीहीवेळा बघितले तरी अजुन कंटाळा आला नाही.<< +१
तसाच काहिसा जोश, आणि इंट्रिकसी "डफलीवाले..." या गाण्यांत दिसली, आणि खुप भावली. कारण त्याआधी सगळे डफलीवर नुसत्या टिचक्या मारुन निभावुन न्यायचे...

प्रतिसादात आलेल्या उल्लेखानुसार त्याचा अकबर इलाहाबादि ते रौफ लाला पर्यंतचा प्रवास नि:संदेह उल्लेखनीय. नियतीने तो प्रवास रोखला हे आपलं सर्वार्थाने दुर्भाग्य. भावपूर्ण श्रद्धांजली...

जमाने को दिखाना है मधली कव्वाली, हम किसी से कमी नही मधली आणि अमर अकबर अँथनी मधली कव्वाली, कव्वाली सादर करावी तर ऋषी कपूरने, ह्यापैकी जमाने को दिखाना है मधली एवढी फेमस नाही झाली जितक्या बाकीच्या दोन कव्वाल्या फेमस आहेत पण मला हि पण तितकीच आवडते.
परी हो आसमानी तुम, मगर तुमको तो पाना है,
मुहोब्बत कैसे करते है। जमाने को दिखाना है।
ह्या पिक्चर ची सगळीच गाणी खुप प्रेक्षणीय आहेत ऋषी कपूर मुळे.
होगा तुमसे प्यारा कौन, किंवा पुछो ना यार क्या हुवा.

काल ऐकलेलं एक निरीक्षण: ऋषीच्या निधनामुळे चांदणी (१९८९) चित्रपटातले तीनही प्रमुख कलाकार आता काळाच्या पडद्याआड गेलेत

सतत त्रस्त चेहरा न करता, फारशी हाणामारी न करता, सतत सुडाग्नीने पेटलेले नसूनही एक सशक्त कथानक मांडता येते हे दाखवून देणार्‍या ऋषी कपूरला..>>+१
सोचेंगे तुम्हे प्यार करे कि नहीं हे माझ अत्यंत आव्डत गाण. पण त्याच तेरी उम्मीद तेरा इंतजार ह्यातले त्याचे स्वेटर आणि तो आणि गाणे . कितीहीवेळा बघितले तरी अजुन कंटाळा आला नाही.>>+१

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!

एक सगळ्या जगालाच आवडणारे व्यक्तीमत्व असावे पण ते गेल्यावर अगदी व्यक्तीगत दु:ख व्हावे असे फार कमी वेळा घडते >> +१

गेल्या एक दोन दिवसांत त्याचे तरूणपणीचे फोटो पाहिले की हा माणूस म्हातारा होउन कधीतरी जाईल वगैरे पटतच नाही. आता त्याची लास्टिंग इमेज ही हम किसीसे कम नहीं, कर्ज, कभी कभी वालीच राहील बहुधा.

"अकबर" ते "औरंगजेब"! सॉलिड रेंज.

खरंय अगदी जवळंचं कोणीतरी जावं असं दु:ख वाटतंय.
व्हॉअ‍ॅ पवर त्यांची शेवटची विडीओ क्लिप फिरतेय दवाखान्यातली. कोण हे अस मुर्खासारखं रेकॉर्डींग करतं.

गाणे चुकीचे निवडले
जणू आता इथे मरायलाच आलास , असेच म्हटल्यासारखे वाटले,
डफलीवाले , कव्वाली वगैरे तरी म्हणायचे

>>>कोण हे अस मुर्खासारखं रेकॉर्डींग करतं.>>>
@अंजली मी क्लिप पाहीली नाही पण खरे आहे असे दारुण (असेल तर) उगाच बभ्रा करु नये.

>> व्हॉअ‍ॅ पवर त्यांची शेवटची विडीओ क्लिप फिरतेय दवाखान्यातली. कोण हे अस मुर्खासारखं रेकॉर्डींग करतं.
>> नवीन Submitted by अंजली_१२ on 1 May, 2020 - 22:37
>>
>> त्यात मुर्खासारखे काय आहे?
>> नवीन Submitted by च्रप्स on 1 May, 2020 - 22:57

दोन क्लिप आहेत. मी दोन्ही पाहिल्या आहेत. एक गाण्याची आहे त्यात ऋषी कपूरनी शेवटी संदेश खूप चांगला दिला आहे. हि क्लिप चांगली आहे.
पण दुसरी क्लिप आहे ती कोणीतरी चोरून रेकॉर्डिंग केली आहे. त्यात ऋषी कपूर नीट दिसत नाहीत. पण श्वासांचे जोरजोरात आवाज येत आहेत. "कपूर यांची शेवटची रात्र" या मेसेजने हि क्लिप फिरत होती. तो प्रकार नक्कीच मूर्खपणा आहे.

अगदी अगदी
त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय आणि त्याचे रेकॉर्डिंग वायरल झालेय

ती एक श्वास घेताना त्रास होणारी आणि अंत्यविधी हॉस्पिटल मध्येच करणारा रणबीर कपूरची सुद्धा दिसली. मला वाटली, बरीच गाणी वगैरे असतील कारण, आधीच्या क्लीप मध्ये गाणी गाणारा दाखव्ली होती एका डॉक्टर आणि ती बहुधा जुनीवाली आहे कारण, त्या गाणार्‍या डॉक्टरने स्वेटर घातलाय.
ह्या दुसर्‍या दोन इतक्या दुखः वाटणार्‍या आहेत, पटकन बंद केल्या. हॉस्पिटलने परवानगी कशी दिली कर्मचार्‍यांना आयसीयु मध्ये फोन वापरायला? काहीच कारवाई घेतली नाही?
लोकं कसला बाजार मांडतील काय सांगता य्ते नाही. मिडिया, युट्युबर्स सगळे भावनाहिन वाटतात कधी कधी.
क्लीप घेणारे हि मुर्ख आणि फॉरवर्ड पाठवणारे सुद्धा. कोणाला ना काय मजा य्तेते असे करण्यात देवाला ठावूक.

तूनळीवर तर कुठले कुठले तुकडे जोडून काहीही विडिओ बनवलेत शेवटच्या विधीचे. नीतू आणि ऋषीचा नयूयॉर्क मधला एक विडिओ छान आहे. तो उपचार घेऊन बरा झाला त्यानंतरचा असेल कदाचित.

हेच म्हणत होतो

हॉस्पिटल मध्ये सेलेब्रिटी आहे म्हणून एकेकेजण व्हिडिओ , फोटो घेत बसला तर अवघड होईल
त्याची इच्छा असेल तर सगळ्या टीम बरोबर किंवा चार पाँच लोकांचे ग्रुप करून एक दोन फोटो , तेहि तो बरा झाल्यावर कढ़ावेत

लोकं कसला बाजार मांडतील काय सांगता य्ते नाही. मिडिया, युट्युबर्स सगळे भावनाहिन वाटतात कधी कधी.
क्लीप घेणारे हि मुर्ख आणि फॉरवर्ड पाठवणारे सुद्धा. कोणाला ना काय मजा य्तेते असे करण्यात देवाला ठावूक.>>> +++१११११ मनातलं लिहीलस

>>>>>>>>>>>>>>>>>>पण दुसरी क्लिप आहे ती कोणीतरी चोरून रेकॉर्डिंग केली आहे. त्यात ऋषी कपूर नीट दिसत नाहीत. पण श्वासांचे जोरजोरात आवाज येत आहेत. "कपूर यांची शेवटची रात्र" या मेसेजने हि क्लिप फिरत होती. तो प्रकार नक्कीच मूर्खपणा आहे.

हो तीच म्हणत होते. सेलेब्रीटि असला तरी हा पा मु (आता मरतानाचे पण म्हणायला पाहिजे) चे विडीओ बनवू नये ही जाणीव कधी येणार ?

Pages