बाबा बंगाली

Submitted by Theurbannomad on 27 April, 2020 - 17:33

काही माणसांशी आपली मैत्री का होते, कशी होते आणि अचानक ती का तुटते, याचं उत्तर ' योगायोग ' याशिवाय वेगळं काही मिळणं कठीण असतं. मुळात ती मैत्री होणंच एक मोठं आश्चर्य असू शकतं. कोणाशीही चटकन संवाद साधू शकणाऱ्या आणि चित्रविचित्र माणसांची सोबत आवडणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीवर मुद्दाम एखाद्या व्यक्तीपासून लांब राहायचा प्रयत्न करायची वेळ तशी अभावानेच आलेली आहे. तनजीब हुसेन नावाच्या नावाचा बांगलादेशी महाभाग माझ्या आयुष्यात असाच अपघाताने आला आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात अपघातांची मालिका सुरु होईल की काय, अशी भीती वाटून कधी नव्हे तो मी त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी जीवाचा चांगलाच आटापिटा करून घेतला.

सुरुवातीच्या काळात दुबईला एका खोलीत दोन ते तीन डोकी अशा पद्धतीचं राहणं नशिबात आलेलं होतं. अशा प्रकारे राहताना बरोबरीची व्यक्ती कोणत्या गावची , पार्श्वभूमीची आणि संस्कृतीची आहे, हे काही दिवसात हळू हळू उलगडत जाणाऱ्या ओळखीतून समजत जाई. आपल्याकडच्या चाळीत भाडेकरू मालकावर डाफरू शकतो, पण दुबईला मात्र स्वच्छता आणि वेळेवर भाडं या दोन गोष्टी सोडल्या तर इतर कोणत्याही गोष्टींवरच्या तक्रारीला भाव मिळत नसे. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर अचानक बरोबरीच्या एखाद्याच्या सामानाची बांधाबांध दिसली, की आता नवीन कोणीतरी येणार याची वर्दी मिळे. हा तनजीब असाच एका संध्याकाळी अचानक माझ्या राशीत आला आणि साडेसात महिने मांड ठोकून तिथेच राहिला. मी स्वतः जर दुसरी जागा शोधून निघालो नसतो, तर ही साडेसाती माझ्या आयुष्यात किती लांबली असती, याचा विचार करून आजही मला धास्तावल्यासारखं होतं.

हा माणूस बांग्लादेशच्या चित्तगॉन्ग शहराच्या कोणत्याशा मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला होता. अस्सल बंगाली वळणाची चेहेरेपट्टी, अव्वल वर्ण, तेलाने माखलेले दाट सरळसोट केस, पौगंडावस्थेत फुटलेली आणि तेव्हापासून तशीच राहिलेली पातळ मिशी, वेडेवाकडे दात, मशिदीचा भोंगा फिका पडेल असा सणसणीत आवाज आणि सतत ज्यात त्यात नाक खुपसायची घाणेरडी सवय असा हा प्राणी चक्क 'ग्राफिक्स डिझाइनर' होता. मला त्याने भेटल्या क्षणी बंगाली वळणाच्या इंग्रजीत " आई आम तोनजीब..बोर्लड्स बेश्ट ग्रॉफिक्श डिझायनोर " अशी ओळख करून दिली आणि हातात स्वतःच स्वतः 'डिझाईन' केलेलं कार्ड टेकवलं. त्यावर त्याचा स्वतःचा गॉगल घातलेला आणि अंगठा वर केलेला 'त्याच्या मते स्टायलिश' फोटो, बाजूला त्याचं नाव, इ-मेल असा मजकूर आणि त्या सगळ्याच्या खाली ' बेटर दॅन द बेस्ट' असं 'सुभाषित' होतं. त्या अक्ख्या कार्डाला ढगातून कडकडणाऱ्या विजांच्या चित्राची पार्श्वभूमी होती. माझ्या आयुष्यात असं व्हिसीटींग कार्ड मी कधीही बघितलेलं नसल्यामुळे माझी अवस्था चमत्कारिक झालेली होती. कशीबशी त्याच्या स्वागत समारंभातून सुटका करून घेऊन मी अंघोळीला पळालो आणि लगेच रूममधून मी काढता पाय घेतला. रात्री झोपायलाच परत जाऊ, अन्यथा हा अजून काय काय बघायची वेळ आणेल, असा विचार करून मी खरोखर थेट ११ वाजता आमच्या इमारतीत पाय ठेवला.

रूममध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या कानात एखादा चिडलेला कुत्रा दातओठ खात जसा गुरगुरतो, तसा आवाज आला. पुढच्याच क्षणी त्या आवाजच रूपांतर त्याच कुत्र्याला कोणीतरी दगड मारल्यावर तो जसा विव्हळेल, तशा आवाजात झालं. रूममध्ये अंधार असल्यामुळे त्या आवाजाचा मागोवा घेत मी मोबाईलच्या प्रकाशात शोधाशोध केली, तेव्हा समजलं की या नव्या महाभागाच्या घोरण्याचा सूर लागलेला होता. मघाशी ऐकू आलेला पहिला आवाज आरोहाचा आणि नंतरचा अवरोहाचा होता. त्याच्या खाटेवर त्याचा देह एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत सांडलेला होता. अर्धं डोकं खाटेच्या कडेवरून बाहेर आलेलं होतं.एक हात खांद्याच्या आधाराने खातेबाहेर अधांतरी लटकलेला होता. बाजूच्या दुसऱ्या खाटेवर माझ्याबरोबरचा जुना भाडेकरू उशी डोक्यावरून घेऊन कसाबसा झोपला होता. या आवाजात आपल्याला झोप लागणं अशक्य आहे, हे माझ्या ध्यानात आलं आणि मी माझ्या एका मित्राकडे रात्रीच्या तशा अडनिड्या वेळी आगंतुकासारखा राहायला गेलो. रस्त्यात या माणसामुळे आता काय काय सोसावं लागणार आहे, या विचारांनी हवेत प्रचंड उष्मा असूनही माझ्या अंगावर काटा आला.

दुसऱ्या दिवशी शनिवार असल्यामुळे सकाळी मित्राकडेच चहा-नाश्ता करून मी परत आलो, तेव्हा रूमभर तनजीबच्या कपड्यांचे ढीग पडलेले दिसले. महाशय आपलं कपाट लावत होते. त्याच्या त्या कपड्यांमध्ये भडक रंगच तेवढे दिसत होते. दुसऱ्या दिवशी ऑफिसचा पहिला दिवस म्हणून त्याने त्याचे 'खास ठेवणीतले' कपडे बाजूला केले. लाल भडक शर्ट, काळा टाय, राखाडी पॅन्ट आणि तपकिरी बूट असा जामानिमा बाजूला करून त्याने बाकीचे कपडे एक एक करत कपाटात ठेवले. " माय बेश्ट ऑउटफिट्स..." अशी त्या 'कॉम्बिनेशन' ची ओळख त्याने मला करून दिली आणि मला त्याच्या ऑफिसच्या लोकांची काळजी वाटायला लागली.

थोड्या वेळाने त्यानेच माझ्याशी सलगी वाढवायचा प्रयत्न सुरु केला. बरोबरच ' रूम मेट ' अगोदरच सटकलेला होता, त्यामुळे मी एकटा त्याच्या कचाट्यात सापडलो होतो.

" मस्त जागा मिळाली. पाच मिनिटावर ऑफिस..."

" छान. कुठे आहे तुझं ऑफिस?"

" समोरच्या रस्त्याच्या त्या बाजूला. "

" अरे तिथे सगळ्या इमारती राहत्या इमारती आहेत....तिथे ऑफिस नाहीये.." मी माहिती पुरवली.

" अल हिलाल फोटो स्टुडिओ माहित्ये?"

" हो...का?"

" तेच माझं ऑफिस"

" म्हणजे?" आता मी पुरता गोंधळलो होतो.

हा प्राणी त्या फोटो स्टुडिओ मध्ये 'फोटोशॉप आर्टिस्ट' म्हणून लागलेला होता. त्या दुकानालाच तो 'ऑफिस' म्हणत होता आणि स्वतःला तिथला ' सिनिअर ग्राफिक्स एक्स्पर्ट '. हे म्हणजे हलवायाच्या दुकानात लाडू वळायला ठेवलेल्या मदतनिसाने स्वतःला थेट 'मिशेलिन स्टार शेफ' म्हणण्यापैकी होतं.

" तुझं काम काय आहे म्हणजे?" मी तशाच विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत प्रश्न केला.

" लग्नाचे अल्बम, जुन्या कृष्णधवल फोटोंना रंगीत करणं, चहाच्या कापांवर, कपड्यांवर किंवा काचेच्या तुकड्यांवर फोटो प्रिंट करणं..." त्याने माझ्यासमोर तो करणार असलेली वीस-पंचवीस कामं आपण अनेक कंपन्या चालवणारे उद्योगपती असल्याच्या थाटात मला सांगितली. त्या उत्साहात त्याने मला त्याचा 'पोर्टफोलिओ' दाखवायला मला त्याच्या बाजूला ओढलं. माझ्या मांडीवर त्याने एक भला थोरला ग्रंथ ठेवला. त्या अचाट ग्रंथाच्या मुखपृष्ठावर तोच त्याचा 'स्टायलिश' फोटो ( वर केलेल्या अंगठ्यासकट ) आणि तेच सुभाषित होतं. पाठीमागे कडकडणाऱ्या विजेच्या जागी ( बहुधा तीच वीज पडून निष्पर्ण झालेल्या ) झाडाचा फोटो होता. त्या झाडाच्या फांद्यांवर पानं नसली तरी फुलं होती...आणि त्या प्रत्येक फुलात त्याला माहित असलेल्या सॉफ्टवेअरची नावं, त्याचे ' वर्क स्किल्स ' असा काय काय अचाट मजकूर भरलेला होता. मागे उगवणारा सूर्य होता. त्या सगळ्या जामानिम्यात तो सूर्यदेखील डोंगरामागे आपला तोंड लपवतोय असा भास होत होता. मी थक्क झालो आणि त्याच्याकडे बघायला लागलो.

" आय एम भेरी क्रिएटीव्ह...सी. पिपोल इन माय कॉलेज से आय हाब गॉड गिफ्ट ऑफ इमॅजिनशॉन..." त्याच्या या वाक्याला मात्र मी मनातल्या मनात दुजोरा दिला. त्या ग्रंथाच्या पहिल्या पानावर बंगाली आणि इंग्रजीत त्याने ' आई वडिलांना समर्पित' असं लिहिलेलं होतं. दुसऱ्या पानावर त्याचे ग्राफिक्स या विषयावरचे मौलिक विचार होते. नमनाला घडाभर तेल ओतून शेवटी त्याने तिसरं पानं उलगडलं आणि त्याच्या त्या 'सर्जनशील' कलाकृतींचं दालन माझ्यासमोर उघडलं गेलं.

" हे दोघे कोण आहेत माहित्ये?"

" कोण?"

" माझे आजी आणि आजोबा. हा बघ, त्यांचा मूळ फोटो. कृष्णधवल आहे ना? आणि हा बघ...मी रंगीत केला. ते खुश झाले बघून. " त्याने अभिमानाने सांगितलं. त्याने त्याच्या आजी-आजोबांना इतकं गोरंपान केलं होतं आणि त्यांच्या सुरकुत्या अशा काही नाहीशा केल्या होत्या की त्या दोन फोटोंमधल्या आजी-आजोबांनी जर खरंच एकमेकांकडे बघितलं असतं तर त्यांनांच आपली ओळख पटली नसती. आजोबांच्या तोंडातले निखळलेले दोन दात सुद्धा त्याने त्या रंगीत केलेल्या फोटोमध्ये चिकटवले होते. थोडक्यात काय, तर आपल्या अचाट कलाकारीने त्याने रताळ्याचा बटाटा करून ठेवलेला होता.

पुढच्या काही पानांवर त्याने त्याच्या वस्तीतल्या कोण्या बापुडवाण्या मुजीबचा कोण्या ढालगज नुसरतशी झालेला विवाहसोहळा फोटोरूपात 'अविस्मरणीय' केला होता. दुष्काळात पिचलेल्या माणसासारखा वाटणारा तो तोळामासा नवरदेव आणि बाजूला बसलेली त्याची ती गुबगुबीत नववधू मुळातच बघायला प्रचंड विजोड वाटत होते. त्यात या कलाकार मनुष्याने त्यांचे अशा काही कोनांमधून फोटो घेतले होते, की एक एक फोटो नमुनेदार झाला होता. गुलाबाच्या फुलाच्या मध्ये प्रगट केलेले दोघांचे दात काढून ( खरं तर विचकून ) हसणारे चेहरे, चंद्राच्या फोटोवर 'फोटोशॉप' च्या करामतीने चिकटवलेला त्या दोघांचा पाठीला पाठ लावून बसलेल्या अवस्थेतला फोटो असे काय काय प्रकार मी याची देही याची डोळा बघितले. पुढे त्याने एका फोटोमध्ये नवाबाच्या वेशात सिंहासनावर बसलेला हा काटकुळा पिचपिचीत नवरदेव, बाजूला भरगच्च दागिन्यात आणि चकचकीत कपड्यात कोंबून भरलेली त्याची ती दणकट नववधू आणि सिंहासनाच्या पायथ्याशी एक पट्टेरी वाघ असं ' कम्पोसिशन' केलेलं मला दाखवलं आणि माझ्या संयमाचा बांध फुटला.

" अरे काय हे? एक तर हे दोघे असे...आणि तुझी ही कलाकुसर........"

" आहे ना? मी सांगतो ना तुला..." त्याच्याशी बोलताना माझं वाक्य पूर्ण कधीच होत नसे. बहुतेक तितका संयम कोणी त्याला शिकवला नव्हता. " माझ्या 'आर्ट' मुळे लग्नाचा अल्बम किही छान झालाय.. नाहीतर नुसत्या फोटोत ही जोडी किती विचित्र वाटली असती ना?" मला पुढचं वाक्य सुचेना. स्वतःच्या प्रेमात आंधळा झालेला हा माणूस कोणाचं काही ऐकायच्या पलीकडे गेलेला होता.

पुढे चहाच्या कपावर छापलेली लहान मुलांची तोंडं, टी-शर्टवर छापलेलं सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर उडी मारून पंजा मारायला सरसावलेल्या कुत्र्याचं चित्रं, लाकडाच्या तबकडीवर छापलेला लाजऱ्या मुलीचा चेहरा असे काय काय भयंकर प्रकार त्याने मला उत्साहाने दाखवले आणि माझ्या २-३ तासांचा चुथडा केला. त्याच्या या कलाकृती नक्की त्या स्टुडिओच्या मालकाने बघितल्या आहेत कि नाही, असा मला प्रश्न पडला. एक तर तो मालक आंधळा असावा किंवा तो स्वतः सुद्धा याच प्राण्याच्या जातीचा असावा अशी माझी पक्की खात्री पटली.

जसजसे दिवस जायला लागले तसतसा या प्राण्याचा उपद्रव वाढायला लागला. सकाळी गजराऐवजी मोहोरीच्या तेलात चरचरत विसावलेल्या माशाचा उग्र वास मला जागं करायला लागला. त्याच्या कपड्यांचे इंद्रधनुष्याला लाजवणारे भडक रंग रोज रोज बघून माझ्या चष्म्याचा नंबर वाढला. त्याच्या घोरण्याची सवय आता मला इतकी झाली होती, की एकदा मित्राकडे राहायला गेल्यावर मला तिथल्या शांततेमुळे झोप लागली नाही. माझी जेवण करायची भांडी तो बिनदिक्कतपणे वापरत असल्यामुळे कधी नव्हे तो मला स्वयंपाकघरातल्या कपाटातल्या माझ्या खणासाठी कुलूप आणावं लागलं. फ्रिजला तशी सोय नसल्यामुळे कधी मी आणलेलं दूध स्वतःच्या चहाला वापर, मी आणलेल्या लोणच्याच्या बाटल्या रिकाम्या कर, आईस्क्रीमचा फन्ना उडव असे त्याचे उद्योग माझ्या नियंत्रणापलीकडे गेले होते. त्याला जाब विचारल्यावर " यू आर माई बिग ब्रॉदोर..डोन्ट गेट अँग्री.." अशी त्याची ठरलेली उत्तरं असायची. कोडगेपणाच्या सगळ्या मर्यादा तो बांग्लादेशच्या विमानतळावर विसरून आलेला होता. एकेक प्रश्नावर अर्धा अर्धा तास डोकं खायच्या त्याच्या सवयीमुळे मला त्याला जाब विचारायची सुद्धा भीती बसली होती. अंघोळीच्या साबणापासून ते केस विंचरायच्या कंगव्यापर्यंत सगळं न विसरता माझ्या कपाटात कडीकुलुपात ठेवून मला बाहेर पडावं लागे. त्याची दहशत इतकी होती, की बूट-चपला ठेवायला मला स्वखर्चाने स्वतंत्र कपाट आणावं लागलं. हे सगळं दिसत असूनही जराही लाज न वाटून घेता हा माणूस दात काढून फिदीफिदी हसत माझ्याशी बोलायला यायचा.

ते घर ज्यांचं होतं, त्यांना मी अनेक वेळा तक्रार केली. तिथे सुद्धा नवा भाडेकरू आण आणि मग बोल, अशी प्रेमळ तंबी मिळाल्यामुळे माझा नाईलाज झाला. शेवटी घरमालकाच्या घरच्या सगळ्यांचे फोटो फुकट काढून देऊन या तनजीबने माझ्यावर चांगलीच कुरघोडी केली. खोलीतल्या तिसऱ्याने दोन महिन्यात गाशा गुंडाळला आणि माझ्या कुंडलीतील हा शनी अजून प्रबळ झाला. रिकाम्या झालेल्या जागेवर जो कोणी नवा मनुष्य जागा बघायला यायचा, त्याला हा काहीतरी पढवून मार्गी लावायचा. ती जागा कधी नव्हे तो तीन-चार महिने रिकामीच राहिली. हळू हळू तनजीबने त्या खाटेवर अनधिकृत अधिक्रमण केलं आणि त्या खाटेचा उपयोग कपड्यांना इस्त्री करणे, पुस्तकं रचून ठेवणे अशा गोष्टींसाठी व्हायला लागला. तशात एक महिन्यासाठी त्याने आपल्या मामेभावाला दुबई दाखवायला आणलं. त्याने बांग्लादेशहून माझ्यासाठी आणलेली अस्सल बंगाली मिठाई आणि तनजीबच्या घोरण्यावरचं औषध इतक्या दोन गोष्टी सोडल्या, तर या वंगबंधूने माझ्या वैतागात भरच घातली.

त्याला दुबईमध्ये एका महिन्याच्या वास्तव्यात नोकरी शोधायची असल्यामुळे तो सतत माझ्यामागे मदतीसाठी भुणभुण करायला लागला. माझ्या कुवतीप्रमाणे त्याला मी मदत केलीही, पण नंतर नंतर ते असह्य व्हायला लागलं. तो तिशीच्या आसपासच्या वयाचा असूनही त्याचं लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळे फावल्या वेळात हे दोघे बंधू आपापल्या भावी सहचारिणीचा शोध घ्यायला बांग्लादेशच्या विवाहसंस्थेच्या वेबसाईट धुंडाळत बसायचे. हा कार्यक्रम कधी कधी रात्री उशिरापर्यंत चालायचा आणि सकाळी चक्क एका कागदावर किरणसामानाची यादी लिहावी तसे आवडलेल्या मुलींचे नाव-पत्ते लिहिलेले दिसायचे. हे दोघे इतके पोचलेले होते, की एकाने एखाद्या मुलीला विचारल्यावर जर त्या मुलीकडून नकार आला, तर दुसरा त्याचं मुलीला स्वतःसाठी विचारायचा. शेवटी त्यांच्याहून वस्ताद असलेल्या एका मुलीने दोघांनाही एकाच वेळी होकार दिल्यावर त्यांचे चाळे काहीसे मर्यादेत आले.

दोघं भावांनी एकदा दुबईच्या रंगील्या रात्रीची मौजसुद्धा करून घेतली. अनुभव कसा होता याबद्दल ते एकमेकांबरोबर निर्लज्जपणे बोलत असताना मी वैतागलो.

" शादी करने का सोच रहे थे न? अब ये क्या? "

" घोर मे स्कूटर रोहेगा...और इधर ष्टेपनी...उसमे क्या..." त्याच्या भावाने जराही आढेवेढे न घेता फिदीफिदी हसत उत्तरं दिलं आणि हे यांचे खानदानी कुळाचार असावे, अशी शंका माझ्या मनाला चाटून गेली. एका बाजूला नोकरीची किती गरज आहे, याबद्दल दोन दिवसांपूर्वी गयावया करणारा हा तनजीबचा भाऊ अचानक मूळ रूपात आल्याचं बघून मला एका अर्थाने बरं वाटलं. आता त्याच्यासाठी काही करायची मला गरज नव्हती.

मला दुसऱ्या जागेची आता नितांत गरज वाटायला लागली. त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केल्यावर अर्थात तनजिबला खबर कळलीच. मी जाऊ नये म्हणून त्याने माझं 'मन वळवायचा' प्रयत्न सुरु केला. अर्थात त्यामागे आपुलकी वगैरे काही नसून दर महिन्याला माझ्या सामानातून त्याने स्वतःची चालवलेली चंगळ थांबेल अशी भीती होती, हे न कळण्याइतका मी दुधखुळा नव्हतो. तितक्यापुरतं त्याने चक्क मला स्वतःहून किराणा जिन्नस सुद्धा आणून दिलं आणि 'भावाकडून पैसे कोण घेतो...' असं मधाचं बोट लावून माझा विचार बदलतोय का याचा कानोसा घेतला. आजवर मी बघितलेल्या आणि अनुभवलेल्या माणसांमधला हा सगळ्यात धूर्त आणि कावेबाज माणूस आहे, या माझ्या समजुतीला बळकटी येण्याखेरीज त्याच्या त्या वागण्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही.

शेवटी माझ्याच ऑफिसच्या एका मित्राच्या घरी मी राहायला जायचा बेत पक्का केला आणि त्याप्रमाणे माझ्या राहत्या घराच्या घरमालकाला कळवलं. पुढच्या तीन आठवड्यात तनजीबने तो स्वतः माझ्याबरोबर नव्या जागी राहायला येऊ शकतो का, इथपासून माझ्या ऑफिसमध्ये 'ग्राफिक्स स्पेशालिस्ट' ची नोकरी त्याला मिळू शकते का इथपर्यंत माझ्याकडून त्याला जे जे काही अपेक्षित होतं ते ते चाचपून बघितलं. दिवाळी सुरु झालेली असल्यामुळे चक्क मला मिठाईचा डबा आणून दिला. मुद्दाम मोठेपणा दाखवायला पिशवीत त्या मिठाईच्या खरेदीचं बिल त्याने तसंच ठेवलं होतं. शेवटी माझा निघण्याचा दिवस आला आणि सामान खाली आणून मी टॅक्सी थांबवली.

निघताना इच्छा नसूनही तनजीबला निरोपाचे दोन शब्द बोलणं भाग होतं. माझ्या बॅग टॅक्सीमध्ये ठेवायच्या कामात तो गुंतला होता. शेवटी नमस्कार चमत्कार झाल्यावर अनिच्छेने का होईना, पण लोकलाजेखातर 'अधून मधून फोन करत जा' सारखी निरोपाची वाक्यं मी बोललो. मनात मात्र ' माझा नंबर आजच्या आज मी बदलणार आहे आणि या इमारतीच्या आजूबाजूला आयुष्यभर फिरकणार नाही आहे..' अशा भावनांनी दाटी केली होती. त्याने चक्क त्याच्या स्टुडिओमधून चोरलेल्या छोट्याशा फ्रेममध्ये तिथूनच फुकटात प्रिंट करून लावलेला माझा फोटो मला दिला.

" हा कुठून मिळाला तुला?"

" तुझ्या नकळत माझ्या मोबाईलवरून मी काढला त्या दिवशी.... फोटोशॉपमध्ये तुला बघ मस्त सूट चढवलाय आणि तुझी दाढी पण गुळगुळीत केलीय.." त्याने अस्सल कोडगेपणाने उत्तरं दिलं.

" छान...धन्यवाद..." काही बोलणं भाग होतं.

" लग्नाला यायचं माझ्या घरी...तुझ्या भाभीला आवडेल तू आला तर.." अजून त्याची ' शोधाशोध ' सुरु आहे, हे मला माहित होतं. कहर म्हणजे हे त्यालाही माहित होतं आणि तरीही बिनधास्त वाट्टेल ते बोलायची त्याची ती खोड आहे तशीच होती. " तुला इथे ष्टेपनी हवी असेल तरी सांग...मी घेऊन जाईन" या वाक्याबरोबर तनजीब कौटुंबिक पातळीवरून थेट चंगळवादावर उतरल्यावर आता लवकर निघालं पाहिजे हे मला जाणवलं.

त्यानंतर नशिबाने या महाभागाचं दर्शन काही झालं नाही. मुद्दाम त्याला भेटणं शक्यच नव्हतं आणि नशीब बलवत्तर म्हणून अपघातानेही तो मला भेटला नाही. चार-पाच वर्षांनी त्याच्या त्या फोटो स्टुडिओसमोरून जाताना सहज डोकावून बघितलं तेव्हा कळलं की दोन -अडीच वर्षांपूर्वी हा बंगाली वाघोबा आपल्या सुंदरबनात परत गेला. जाताना त्या स्टुडिओच्या मालकाकडून पैसे उसने घेऊन गेला तो परत आलाच नाही. जुन्या घराच्या मालकाला सहज फोन केल्यावर समजलं की त्यालाही फुकट फोटो काढून देऊन मधाचं बोट लावत लावत त्याचं दोन महिन्याचं भाडं न देता साहेबांनी पोबारा केला होता.

भुतंखेतं उतरवणारे किंवा कोणत्याही आजाराची जालीम दवा देणारे बाबा बंगाली गोड बोलून थापा मारत समोरच्याचा खिसा रिकामा करतात. त्यांच्याच जमातीतील हा बाबा अजून कोणाकोणाला फसवून गेला आहे, हे कळायला मार्ग नव्हता. योग्य वेळी त्याच्यापासून सुटका केली म्हणून मी देवाचे मनातल्या मनात आभार मानले. कदाचित अशा बाबांपेक्षा देवावर श्रद्धा असल्यामुळे मला त्याने तशी बुद्धी दिली असावी, दुसरं काय !

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, छान लेख. खूप आवडला.
सगळ्यांना कलंदर, मनस्वी, उमद्या स्वभावाची परिपूर्ण माणसे भेटत असताना कोणालातरी सर्वसामान्य मातीचे पाय असणारी व्यक्ती भेटते आणि त्यावर व्यक्तिचित्रण लिहिले जाते हे वाचून हायसे वाटले

धन्यवाद !
माझ्या ब्लॉग्सना भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना ब्लॉग वाचण्याची माझ्यातर्फे विनंती करा.

https://humansinthecrowd.blogspot.com/
https://demonsinthecrowd.blogspot.com/