नरभक्षकाच्या मागावर ! - अंतिम भाग

Submitted by रश्मिनतेज on 26 April, 2020 - 14:51

भाग ४ - अंतिम
-----------------------------------------------------------------------------------
Temple BW.jpgसुळेकुंटा देऊळ

बाजूच्या विहिरीतून ओढलेल्या पाण्याने बनवलेला गरम गरम चहा घेऊनआणि थोडंसं खाऊन झाल्यावर आमच्या जीवात जीव आला आणि त्यानंतर अवाढव्य पिंपळापाशी जाऊन मी त्या वृद्ध पुजाऱ्याच्या अवशेषांचे निरीक्षण केले. दिवसभरात गिधाडांनी आणि रात्रीतून तरसा -कोल्ह्यानी चांगलाच ताव मारला होता आणि साफसूफ केलेल्या हाडांशिवाय काहीही उरलं नव्हतं. ते दृश्य बघून माझ्या मनात विचार आला ज्या वृद्ध माणसाने आपली उणीपुरी चाळीस वर्षं देवळाच्या सेवेत घालवली, जो दररोज सकाळी जे मी पाहिलं तेच दृश्य बघत जागा झाला, ज्याने रात्री तेच सांबर,भेकर आणि हत्तीचे आवाज ऐकले जे मी त्या रात्री ऐकले होते आणि आता तो एक हाडांचा सापळा बनून जुनाट पिंपळाच्या मुळाशी पडला होता.
पुढील तासभर आम्ही पावलांचे ठसे आणि दिसलाच तर त्या मारेकऱ्याला शोधायला म्हणून भटकलो, आम्हाला काही जुन्यापुराण्या खुणा दिसल्या देखील, पण त्या ह्याच वाघिणीच्या आहेत हे मी ठामपणे सांगू शकलो नसतो.

सकाळी ९ वाजेच्या सुमाराला आम्ही २३ मैल दूर असणाऱ्या गुंडलम कडे मजल दरमजल करत निघालो आणि ५ वाजेच्या नंतर पोहोचलो. इथे अशामध्येच गेलेल्या बळींची चौकशी करताना, एका गुराख्याकडून मला शेवटी एकदाची पक्की खबर मिळाली. माझ्या ह्या आधीच्या फेरीमध्ये मी ज्या पाणलोटाशेजारी माझं पहिलं आमिष बांधलं होतं , त्या ठिकाणी तो गुरे चरायला जात असे. असेच एकदा गुरे चारून आपल्या दोस्ताबरोबर बोलत निघाले असता, निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी म्हणून तो दोस्त रस्त्यापलीकडे असलेल्या झुडपामागे गेला. तिथे तो उकिडवा बसणार तेवढ्यात झुडपाच्या पुढे फक्त एक कान असलेलं वाघाचं सैतानी डोकं वर आलेलं त्याला दिसलं आणि त्यामागे होतं पट्टेरी धूड ! दोस्त भीतीने किंचाळण्याच्या आत त्याच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर धारदार नखं रुतली आणि पुढच्या क्षणाला वाघाने त्याच्या बळीसह रानात पोबारा केला होता.
मला ज्याची इतके दिवस भिती वाटत होती पण जे ऐकायची तयारी होती ती माहिती आता समोर आली होती. आता हे नक्की झालं होतं की, नरभक्षक इतर कोणी नसून माझी जुनी शत्रू असलेली वाघिणच आहे जिने तिच्या पूर्वीच्या क्षेत्राकडे परत एकदा मोर्चा वळवला आहे आणि जिच्या कैक पटीने वाढलेल्या हिंसक धूर्तपणाला मी स्वतःच जबाबदार आहे.

जिथे जाईल तिथे मी अशाच नोंदी वाचल्या होत्या कुठल्याच गायी - म्हशींना ह्या श्वापदाने मारलं नव्हतं, त्यामुळे मी मागल्या वेळेप्रमाणे जिवंत आमिषं बांधून ठेवण्यात वेळ वाया घालवला नाही. मला कळून चुकलं होतं की ह्या प्रतिस्पर्ध्याला मात देण्यासाठी मला तिच्याशी समोरासमोर दोन हात करण्याशिवाय पर्याय नाहीये !!
पुढचे दोन दिवस मी मारेकरी दिसेल ह्या आशेत भवतालचं जंगल धुंडाळून काढलं पण प्रत्येक वेळेस मनात भीती होती की कुठल्याही क्षणी माझ्यावर मागून हल्ला होईल. मला पायांचे ठसे बऱ्याच प्रमाणात आढळून आले, विशेषतः गुंडलम नदीच्या मऊ वाळूत जवळागिरीच्या वाघिणीचे ओळखीचे ठसे दिसून येत होते. त्याने माझ्या विचारांना पुष्टीच मिळाली होती की माझ्या पाच एक महिन्यांपूर्वी चुकलेल्या नेमामुळे पुढे कित्तेक बळी जायला मी जबाबदार होतो.

तिसऱ्या दिवशीच्या माध्यान्ही, काही माणसांचा चमू चिंताक्रांत होऊन आला. जवळागिरीपासून तीस मैल तुडवत ते मला नवीन बळीची खबर करायला आले होते . आदल्याच दुपारी, जवळागिरी वन विश्रामगृहाच्या पहारेकऱ्याला , विश्रामगृहापासून शंभर यार्डाच्या आतच ठार करून अर्धवट खाण्यात आलं होतं.
एका ठिकाणी नरबळी घेतल्यानंतर एका दिवसापेक्षा अधिक काळ तिथे न थांबणारी असा लौकिक प्राप्त झालेली वाघीण तिचा रोख परत सुळेकुंटा आणि गुंडलम कडे वळवणार अशी आशा मनात बाळगून मी लगेच माझ्या माणसांसोबत निघालो. जवळागिरीहून आत्ता आलेले लोकही आमच्यासोबत यायला तयार झाले. ते खरं तर जवळागिरीहून जवळ जवळ पळतच ३० मैल लांब गुंडलम ला आले होते पण माघारी परतण्याऐवजी त्यांनी आमच्यासोबत २५ मैल सुळेकुंटा ला येणं, कदाचित माझ्या हातात असलेल्या रायफलच्या भरवशावर सुरक्षित समजलं.

जवळागिरी वन विश्रामगृह
Foresthouse BW.jpg
दिवस मावळत असताच आम्ही पुन्हा सुळेकुंटा च्या त्या देवळापाशी येऊन पोहोचलो. त्यातच अंधारी रात्र असल्याने आम्ही परत शेकोटी पेटवायची तयारी देवळाच्या आवारातच सुरु केली . आता आमची संख्या मी धरून १२ जणांची झाली होती, जरी त्यामुळे आम्हाला आधीपेक्षा सुरक्षित वाटत होते तरी मला वैयक्तिकदृष्ट्या ते गैरसोयीचे होते.

यावेळी मात्र आमची रात्र शांतपणे सरणार नव्हती. रात्रीचा पहिला प्रहर सुरु होताच सांबर आणि भेकर अस्वस्थ झाले होते आणि ८:३० च्या सुमारास आम्हाला वाघाचे आवाज आमच्यापासून अंदाजे अर्धा मैलभर अंतरावरून ऐकू येऊ लागले. बऱ्याच जवळून तासभर हे आवाज चालू होते आणि मग मला जाणवले की वाघीण जोडीदाराला बोलावण्यासाठी साद घालत आहे. शेकोटी निश्चितपणे वाघिणीच्या दृष्टीस पडली होती आणि मनुष्याची जाणीव तिला झाली होती. अर्थातच शिकार मिळवण्यासाठी म्हणून तिने देवळाला दोनदा प्रदक्षिणा मारली होती. तिची मीलनोत्सुक साद आणि शिकारीच्या अपेक्षेत असलेली गुरगुर ह्या दोन्हींचा मिलाफ झाला होता.
या सगळ्यामुळे मला एक कल्पना चमकली , की जर दिवस उगवेपर्यंत वाघिणीला मी आमच्या आसपास ठेवण्यात यशस्वी झालो तर माझा हेतू सिद्ध होऊ शकेल. मग मी दोनदा नर वाघाचा प्रतिसाद देणारा आवाज काढला आणि लगेचच मला माजावर असलेल्या मादीचं जोरदार प्रत्युत्तर मिळालं. खरोखरच ती देवळाच्या आवाराच्या अगदी काठापर्यंत येऊन इतक्या जोरात ओरडली की त्या आवाजाने आमच्या अंगाला कंप सुटला. तरीदेखील, मी काळजी घेत होतो की वाघीण अगदीच जवळपास असताना आवाज काढायचे नाहीत नाहीतर तिचा संशय बळावला असता. त्याचवेळी मी माझ्या माणसांना जोरजोरात गप्पा मारायला सांगितले आणि आधीच जळत असलेल्या शेकोटीत जास्तीचा जाळ न करायला सांगितले, या दोन्ही सूचना नि:संशयपणे स्वागतार्ह नव्हत्या . पण अशा तऱ्हेने, मीलनाची उत्सुकता आणि भूक या कात्रीत सापडलेल्या वाघिणीला मी दिवस उगवेपर्यंत आसपास ठेवू शकण्याच्या यशस्वी झालो असतो.

पहाट फुटण्याच्या थोडंसं आधी वाघिणीने एकदा साद दिली, माझ्या युक्तीवर माझीच पाठ थोपटून घेतली आणि दिवस उजाडताच जवळागिरीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर जिथे फक्त पाव मैल अंतरावर मोठं चिंचेचं झाड आहे, ज्याखाली वर्षभरापूर्वी दुर्दैवी मुलाचा बळी गेला होता त्या दिशेला धाव घेतली. मी मानसिकरीत्या आधीच त्या झाडाची बसण्याची एक योग्य जागा म्हणून नोंद करून ठेवली होती, ज्याला विशेष तयारीची गरज नव्हती.
झाडाशी सुरक्षितपणे पोहोचून बारा फुटांवर चढत, फांद्यांच्या बेचक्यात जाऊन बसलो, ही जागा बऱ्यापैकी सुरक्षित होती आणि रस्त्याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित दिसत होत्या. मग शिरा ताणून मी नर वाघाचा आवाज काढला. उत्तरादाखल केवळ शांतता होती आणि मला वाटू लागलं की शेवटी कंटाळून पहाटे वाघीण निघून गेली असावी . एक नवीन चिंतेने माझ्या मनाला ग्रासलं, वाघीण कदाचित, आदल्या रात्रीच हेरून ठेवलेल्या माणसाची देवळाबाहेर यायची वाट पाहत थांबलेली असावी.
तरी निघण्यापूर्वी मी माझ्या सहकाऱ्यांना निकराने बजावून ठेवलं होतं की कुठल्याही परिस्थिती मध्ये देवळाबाहेर पडायचं नाही. पण मला वाटत होतं की त्यापैकी कुणी अतिउत्साहीपणा करत माझी सूचना मोडली असेल.. एकतर निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी किंवा अगदीच जवळ असणाऱ्या विहिरीतून पाणी शेंदण्यासाठी..
मी दुसऱ्यांदा आवाज काढला, तरीही उत्तर नाही. थोडा वेळ जाऊ देऊन मी परत गळ्याच्या शिरा तुटेपर्यंत ताणून आवाज दिला. यावेळी मात्र मला यश आलं, कदाचित माझा आवाज बाजूचं जंगल चिरत वाघिणीपर्यंत पोहोचला आणि ते ओळखून तिने लगेच मला प्रतिसाद दिला, देवळाच्या दिशेकडून !!

माझा कयास खरा ठरला होता आणि ती चलाख वाघीण तिची शिकार मिळवायला देवळापाशी गेली होती !

काही मिनिटांनी मी पुन्हा चौथ्या वेळेस ओरडलो आणि वाघिणीने परत प्रत्युत्तर दिलं. तिची वाट बघत असणाऱ्या जोडीदाराच्या शोधात माझ्या दिशेने येत असणारी वाघीण बघून मी प्रचंड आनंदी झालो होतो.
मी अजून दोनदा आवाज दिला, माझ्या शेवटच्या आवाजाला फक्त शंभर यार्डांवरून उत्तर मिळालं. माझी रायफल सज्ज करून, येणाऱ्या रस्त्याकडे एकवार बघून, पंचवीस यार्ड अंतरावर असलेल्या एका जागेवर माझी नजर रोवली. वाघिणीला मधले अंतर कापायला अंदाजे तीस सेकंदापेक्षा कमीच वेळ लागणार होता. मी मोजायला सुरुवात केली आणि जसा मी सत्ताविसाव्या सेकंदाला मोजलं, तशी दमदार पावलं टाकत तिच्या जोडीदाराच्या शोधात येणारी वाघीण मला पूर्णपणे दिसली होती. उंचावर बसल्यामुळे, मला तिचा एक तुटलेला कान स्पष्टपणे दिसून येत होता. मी जाणून होतो की प्रचंड कष्टाच्या प्रयत्नानंतर सावज एकदाचं माझ्या टप्प्यात आलं होतं. या वेळी काहीही चूक होऊन चालणार नव्हती. तिची चाल थांबावी म्हणून मी बारीक आवाज काढला. ती अचानक थांबली आणि तिने आश्चर्याने वर पाहिलं. पुढच्याच सेकंदात ०. ४०५ बुलेट तिच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी छेदून गेली आणि पुढच्या बाजूला कोलमडत ती खाली कोसळली आणि जरा वेळ मातीत तडफडत राहिली. माझा दुसरा निशाणा कवटीच्या मध्यभागी लागला, खरंतर ह्या दुसऱ्या प्रहाराची काहीच गरज नव्हती ज्यामुळे मस्तकाचं चांगलंच नुकसान झालं आणि पेंढा भरणाऱ्याचं काम उगाच वाढलं.

जवळागिरीच्या भीतिदायक नरभक्षकाचा अगदी साधाच पण लज्जास्पद आणि तिच्या कारकिर्दीला न शोभेलसा अंत झाला होता. जरी ती वाघीण एक थंड डोक्याची, क्रूर आणि चलाख अशी मारेकरी होती तरी तिचा अंत करण्यात मी वापरलेल्या अतिशय अखिलाडू युक्तीचा माझ्या विवेकबुद्धीला प्रचंड त्रास होत होता.

अजून पुढे सांगण्यासारखं फारसं नाहीये. माझे इतर ११ साथीदार मरून पडलेल्या वाघिणीकडे बघून आनंदाने उत्तेजित झाले होते. लगेचच एका झाडाचं खोड तोडून, त्याला वाघिणीचे पाय मजबूत वेलींनी बांधून, त्या ओझ्याने वाकलेले आम्ही ७ मैल लांब जवळागिरीकडे जायला निघालो. नरभक्षकाच्या अस्तित्वामुळे आम्ही गावात पोहोचेपर्यंत आम्हाला एकसुद्धा माणूस रस्त्यात भेटला नाही. मग सगळीकडे पसरली आणि जनता गोळा झाली. मी लोकांना एक तासभर त्यांच्या एकेकाळच्या शत्रूला न्याहाळण्याची संधी दिली आणि तोवर काही अंतरावरच्या झाडाखाली बसून गरम चहा घेतला , थोडंसं खाऊन निवांतपैकी तंबाखू भरून पाईप ओढत बसलो. मग गावातल्या काही उत्साही मंडळींनी माझ्या दोन आसनी स्टूडबेकर च्या मागच्या सीटवर ते धूड ठेवण्यात मदत केली. शेवटी एकदाची मी माझ्या चुकीवर यशस्वीपणे मात केली होती आणि पुष्कळ लोकांच्या मृत्यूचा सूड घेतला होता, ह्या विचाराने सुखावत मी घरचा रस्ता पकडला.

नरभक्षकाचा वावर असलेल्या प्रदेशाचे रेखाचित्र
Map.PNG

* रेखाचित्रासाठी सानझरी ह्यांचे आभार !

समाप्त

स्वगत :

ही लेखमाला लिहिताना मला प्रचंड मजा आली. माझ्या केनेथ अँडरसन च्या साहित्य वाचनाची सुरुवात ज्या कथेने झाली तीच ही कथा ! कदाचित ह्या कथेपासूनच मला केनेथच्या पुस्तकांचं वेड लागलं तीच कथा अनुवादित करण्याचे मी ठरवले. स्वतः लेखकाच्या नजरेतून (जरी अनुवादक असलो तरी देखील ) प्रचंड थरार जाणवत होता आणि म्हणूनच ती संगती न तोडता दररोज एक भाग न चुकता टाकण्याचे ठरवले. काही ठिकाणी इतका ताण असह्य झाला की मूळ इंग्रजी कथा परत पुढे वाचत राहिलो ! केनेथ अँडरसनची लेखन शैली इतकी प्रभावी आहे की त्या तपशीलवार आणि रसाळ वर्णनात गुंगून जायला होतं . खरं सांगायचं झालं तर त्या क्लासिक इंग्रजी वाचनाचा इतका मजा येऊ लागतो की भारावून जायला झालं आणि अनुवादाची मर्यादा लक्षात येते. तरी मला आशा आहे की वाचकांना ही कथा जरूर आवडली असेल.

सर्व वाचकांचे आणि प्रतिसाद कर्त्यांचे मन:पूर्वक आभार ! कृष्णधवल छायाचित्रांची जोड देण्याची सूचना मित्राने केली होती आणि त्यामुळे भाग २ नंतर निश्चितपणे या कथेची खुमारी वाढली, शेवटच्या भागातील रेखाचित्र काढण्याची विनंती सानझरी ह्यांनी स्वीकारली आणि मूळ पुस्तकातील नकाशाबरहुकूम अगदी हुबेहूब इथे ती छबी वठली आहे, त्यांचेही खूप खूप आभार !
इतर सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अप्रतिम कथा आणि अतिशय खिळवून ठेवणारी अनुवाद शैली. समर्पक चित्रे आणि नकाशामुळे एक वाचक म्हणून इथे वावरण्यापेक्षा एक प्रेक्षक बनून चित्त थरारक वातावरण अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

मॅन इटर मुळे घडलेले लॉक डाऊनचे अजुन किस्से वाचायला आवडेल.

फारच उत्तम जमलाय अनुभव. मूळ पुस्तकातली ही कथा आठवते आहे (घरी ते पुस्तक आहे). अँडरसन अतिशय रोचकपणे लिहीली आहे. पण तुम्हीही कथेला उत्तम न्याय दिला आहे.
छायाचित्रे टाकण्याची आयडीया आवडली. रंगीत छायाचित्रे कृष्णधवल करून वापरली आहेत का? छायाचित्रे कशी शोधलीत ते वाचायला आवडेल.

अजून कथांचे अनुवाद वाचायला नक्कीच आवडतील.

भारी जमलाय
हे फोटो कुठे मिळाले?
सुलेंकता चे देऊळ मला वाचल्यावर डोळ्यासमोर उभे राहिलेले त्यापेक्षा अगदीच बारके निघाले
थोडा अपेक्षाभंगच झाला

मस्त आहे कथा. छान जमलाय अनुवाद. अजून अनुवादित कथा वाचायला आवडतील नक्की. किंवा कुणाकडे pdf असेल केनेथ च्या पुस्तकाची तर नक्कीच वाचेन.

अजून अनुवादित कथा वाचायला आवडतील नक्की. >>>

मागे मिपावर स्पार्टाकस या आयडीने केनेथ अंडरसनच्या शिकारकथांचा अनुवाद लिहिला होता.
https://www.misalpav.com/node/27625
(इतर website ची लिन्क इथे देणे नियमात बसत नसल्यास कृपया प्रतिसाद उडवावा)

भुताळी जहाजासंबधीसुद्धा बहुतेक स्पार्टाकस ह्यांचे लेखन आहे इकडे तेसुद्धा भाग छान आहेत सर्वच