फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बाकी फार काही माहीत नाही पण दीक्षित डाएटमुळे बायकोचे वजन ४ महिन्यात ९ किलो कमी झाले आहे आणि बऱ्याच दिवसानी भेटणाऱ्या सर्व मैत्रिणींनी तिचे कौतुक केले, हे मात्र मी स्वतः बघितले आहे.

खरे सर. उपाय भारी आहे पण मार खायची भीती वाटते : हाहा:
भागवत सर - Lol फिरकी घेतली ना गरीबाची

मी दुसर्‍या एका धाग्यावर समस्या विचारली होती. आता तो धागा कोणता हे लक्षात नाही.

मी अशक्त नाही. पण तब्येत किरकोळ असल्याने मला सतत टोमणे बसतात. कॉलेजच्या दिवसात किंवा नंतर ज्यांनी मला पाहिले आहे त्यांना मी आजारी आहे असे वाटते. मी कधीच शरीर कमावले नाही किंवा शरीर स्थूल नव्हते. पण सुदृढ नक्की म्हणता येईल.
नंतर धावपळ, काम यामुळे वजन कमी होत गेले. मला त्याचा त्रास होत नाही. उलट काही जण म्हणतात की असू दे, वय जाणवत नाही.
समजा जीम लावली तर मध्यंतरी शाहरुख खान जसा खूप आजारी किंवा वयस्क दिसत होता तसे तर नाही ना होणार?
बरं दिसायला हवंय पण दुष्परिणाम नकोत.
एव्हढ्या साठी वेगळा धागा नको म्हणून इथे विचारले.

थायरॉईड टीएसएच नाही चेक केलं.
थायरॉईडची साधारण लक्षणं नाहीत दिसत. वजन सातत्याने कमी होत नाही. मला त्याचा त्रास नाही. त्वचा रूक्ष आणि खडबडीत नाही. माझे केस गळत नाहीत. ते रूक्ष नाहीत. उलट अजूनही खूप वाढ आहे. यावरून तरी थायरॉईडची शक्यता वाटत नाही.

कॉलेजनंतर काही दिवस उतरलं वजन. पण नंतर नाही.

मला डायबिटीज बद्दल जास्त कही महित नहवत पर है आर्टिकल मला आज सापडला. दिक्सितांची डाइट हूँ वेगळी एप्रोच करून पण डायबिटीज कण्ट्रोल करू शक्ति हे वचन समाधान झाला. How I cured diabetes है आलेख वाचा अणि गाइड करा https://healthacharya.com/how-i-cured-diabetes/

जयेश केळकर यांनी लेखाची जी लिंक दिली आहे, त्या लेखाच्या शेवटी, लेखकाने त्याचे निष्कर्ष मांडले आहेत ते खाली देत आहे.
दोन जेवणाच्या मधे १६ तासांचे अंतर हा लेखकाचा मुख्य प्रयत्न आहे व त्याचे निष्कर्ष माडले आहेत. काहीवेळेस या नियमाला ते अपवाद करतात हेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे. मात्र ते अपवादच असतात. Happy
ज्याला या लेखातील माहितीची खरोखरच जरूरी आहे त्याचेकडून लिंक उघडायचा आळस होऊ नये म्हणून हा भाषांतराचा उद्योग करतोय.
Happy

@जयेश केळकर
_/\_

आता लेखकाच्या शब्दांत, त्यांनी जे इंग्रजीत लिहिले आहे, ते मराठीत भाषांतर करून लिहितो. अर्थात हा त्या लेखाचा शेवटचा पॅरा आहे.

"आणि मधुमेह बरा करण्यासाठीच्या माझ्या प्रयत्नांना मिळालेले फळ आता सांगतो.
मी माझा मधुमेह बरा करण्यात यशस्वी होतो आहे.
1- माझ्या ग्लूकोजची पातळी (जरी मी थेट दोन चमचे साखर खालो तरी) कधीही 120 च्या वर जात नाही. ( हे सुरवातीला सुमारे २५० होते. २२३.०८ असताना त्याचे २५० का केले? कुणास ठाऊक Happy )
2-माझा एचबीए1सी सुमारे 6 आहे. ( हे सुरवातीला ९.४ होते.)
३ मी एका दमात ६ कि.मी. चालत असलो तरी मला श्वास अपुरा पडतोय असे वाटत नाही. किंवा दम लागत नाही.
4- मी सक्रिय आहे.
५ माझ्या त्वचेवरील सुरकुत्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे मी माझ्या वयापेक्षा खूपच तरुण दिसतोय असं लोकं म्हणायला लागलेत.
(अनाहितांना आकर्षित्त करणारे वाक्य आहे हे. Happy )
६ मला सकारात्मक उर्जेने भरल्यासारखे वाटतंय व आपोआपच माझ्याकडून इतरांना मदत केली जात आहे. मी (नव्याने ?) सुतारकाम, प्लंबिंग, घरातील शेती शिकलो आणि आहार नियोजनात डिप्लोमादेखील मिळविला.
7- मी आता इतरांना विनामूल्य आहार योजना सुचवतो. जरी आपणास आपल्या स्वतःच्या आवडीनुसार आहार योजना बनवून पाहिजे असेल तर आपण ती माझ्याकडून विनामूल्य मिळवू शकता.
८ माझा सरासरी रक्तदाब २१०/११० असायचा तो आता 140/90 पर्यंत आलाय. कोणत्याही औषधोपचार न करता ही प्रगती छान आहे असं मला वाटतं. आणि हो, माझ्यावर विश्वास ठेवा मी ३-४ किमी चालल्यानंतर तो रक्तदाब चक्क कमी होतो!!!!!!
9 माझी कोलेस्टेरॉलची पातळी योग्य आहे.

मधुमेह बरा करण्याच्या प्रक्रियेत मला एक आयता बोनस मिळालाय. माझे वजन आता 81 किलो आहे. डाएट सुरू करायच्या आधी ते 110 किलो होते.

ही एक (८ वर्षांची) दीर्घ कथा आहे. त्यामुळे लिहिण्याच्या ओघात मी बरेच तपशील सांगायचे विसरलो असेन. परंतु, आपल्याकडे काही प्रश्न असल्यास मला विचारण्यास लाजू नका.

सर्वांना फुकटात उपलब्ध असलेल्या पुस्तकातून कोणीही कोणतीही माहिती जशी आरामात मिळवू शकतो, (आणि त्या बदल्यात ते पुस्तक काहीही मागत नाही की तक्रार करत नाही. (म्हणजे गुगलच की हो Happy ) अगदी त्याप्रमाणे मला जी काही माहिती आहे, मला जे काही अनुभव आले आहेत, प्रत्येक गोष्ट मी कशी अंमलात आणली ते सर्व संगतवार मी सांगायला तयार आहे."

(अवांतरः पण त्यांना प्रश्न कसा विचारायचा? ते मात्र मला कळलेले नाही. कारण लेखकाचा इमेल पत्ता मिळालेला नाही. कॉमेंटस मधे लिहिल्यावर उत्तर मिळत असावे असे वाटते. कारण, कॉमेंटस करताना आपला इमेल विचारला जातो. आपला इमेल पत्ता अप्रकाशीत राहील असं सांगितलं जातंय खरं
असो.

एक सूचना : भाषांतरांत चूक झालेली असल्यास मूळ इंग्रजी लेख हा आधारभूत मानावा. Happy

गौतम गुहा यांचा हा लेख ५ भागात आहे.
लिंक बद्दल कुतूहल निर्माण होण्यासाठी पहिल्या भागाचे संक्षिप्त भाषांतर करत आहे. लेखक सैन्यात असून सद्या कर्नल या हुद्यावर काम करत आहेत.

माझी गोष्ट डिसेंबर २०१५ मध्ये त्रिवेंद्रम मिलिटरी हॉस्पिटलमध्ये सुरुवात झाली. मला मधुमेहाचा प्रकार 2 असल्याचे निदान झाले होते. रक्तातील साखर ४१५ आणि एचबीए1सी ९.७ असल्याचं निदान झालं होतं. वयाच्या 45 व्या वर्षी मला याची अपेक्षा नव्हती. माझ्या आहारातून साखर काढून टाकली गेली आणि मला नियमित व्यायाम करण्यास सांगितले गेले… !!! नियमीत व्यायाम, पोट रिकामे न ठेवणे व नियमीत औषधे घेणे हा माझ्या नित्य जीवनाचा भाग बनला. मी तर त्या व्यतिरिक्त प्राणायामालाही सुरवात केली होती!!!

रक्तातील साखरेच्या पातळीनुसार औषधांत चढउतार व्हायची व वजन कमी करण्यासाठी डॉक्टर मला ‘अधिक व्यायाम’ करायला सांगायचे. पण माझे वजन वाढतच चालले होते. २०१६ सालात असंच काहीतरी चालू होतं. तरीही डिसेंबर २०१६ ला वजनाने जवळपास १०० री गाठली.

मग मात्र मी एक जीम लावली. १५ किमी चालायला लागलो. एकदा तर अर्ध मॅरेथाॅनमधेही भाग घेतला. वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदीक औषधेही घेऊन पाहिली. पण कशाचाही कायम स्वरूपी फायदा झाला नाही. डिसेंबर २०१७ ला माझे वजन १०७ किलो झाले होते.

मला आता समजले की दिवसेंदिवस मी अधिक वजनदार होत आहे. शरीर लवचिकता गमावत आहे. अ‍ॅसिडीटी, उच्च बीपी आणि पंचनसंस्थेसंबंधी समस्या मला त्रास देत आहेत. माझी गुडघेदुखी आणि पाठीच्या खालच्या बाजूस दुखणे हे सगळे याचेच परिणाम आहेत.

पहिल्या भागानंतर भाग २,३,४ मधे त्यांनी केलेले प्रयत्न आहेत.

भाग ५ हा अंतीम आहे. त्यात ते म्हणतात.
जुलैच्या १८ च्या शेवटी माझी पोस्टिंग त्रिवेंद्रमहून पाटण्याला झाली.
मार्च २०१९ ला माझ्या वैद्यकीय आरोग्याचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी, वर्गीकरण वैद्यकीय मंडळाचा हॉस्पिटल (एमएच), दानापूर (पाटणा) च्या डॉक्टरांशी भेट घेतली. दानापूरच्या डॉक्टरांनी प्रथम मी काही औषधे घेतो का? त्याची चौकशी केली.
पहिल्या चाचणी अहवालात एचबीए1सी 5.5 पाहिल्यावर मला पुन्हा माझी रक्त चाचणी देण्यास सांगण्यात आले… !!!
Happy

ईसीजी, थायरॉईड आणि अगदी डोळयातील पडदा समाविष्ट करण्यासाठी कसून तपासणी केल्यावर मात्र डॉक्टरांनी माझ्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि ते म्हणाले की माझ्या वैद्यकीय केसशीटमधून “मेटाबोलिक सिंड्रोम” हा शब्द काढून टाकायला त्यांना खूप आनंद होतोय. त्यांना त्यासंबंधातली कोणतीही लक्षणे माझ्यांत दिसली नाहीत!!!!

त्यांनी या भागात अजून बरेच काही लिहिले आहे. ज्यांना कुतूहल असेल ते लिंक उघडून वाचतीलच म्हणा. Happy

Pages