`आई ग...` अचानक दचकून ती सुंदर युवती माझ्यापासून जराशा दूर पण समोरच बसलेल्या तिच्या प्रियकराकडे धावली. त्या स्टुडीओच्या मोठ्या खोलीत ती युवती नुकतीच शिरली होती. आत शिरताच सवयीप्रमाणे ती डाव्या भिंतीकडे गेली जिथे मी बसलो होतो. तिला मी तिथे असेन याची अजिबात कल्पना नव्हती. अचानक मला बघून ती कमालीची घाबरली, दचकली, अन समोरच्या दिशेने धावली.
चार-पाच दिवस माझ्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. गेले कित्येक महिने दाढी व केस न कापल्यामुळे तेही खूप वाढले होते. अंगावरील कपडेही जागोजागी फाटलेले, लक्तरे झालेले होते. कशाबशा आवश्यक जागा झाकल्या जात होत्या. कोणीही घाबरेल असाच माझा अवतार होता. भुकेने मी आता खाली कोसळण्याच्या बेतात होतो; पण तशाही परिस्थितीत मी माझ्या जागेवर बसून होतो आणि समोर जराशा अंतरावर विख्यात चित्रकार श्री. हर्षवर्धन खरे माझं चित्र रेखाटत होते. एका आंतरराष्ट्रीय चित्र स्पर्धेसाठी `Extreme Poverty` या विषयासाठी खरे माझं चित्र काढून पाठवणार होते. आपणच या स्पर्धेत जिंकणार हा नेहमीप्रमाणे त्यांना विश्वास होताच.
माझ्या या अवताराचे त्यांनी काढलेले चित्र त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान देणार होते. हे चित्र पुढे लाखो रुपयांना विकले जाणार होते.
`Finished!` हर्षवर्धनच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले आणि मी माझ्या जागेवरून खाली कोसळलो.
`Extreme Poverty` या विषयावर चित्र काढण्यासाठी हर्षवर्धननं मॉडेलच्या शोधात संपूर्ण मुंबई पालथी घातली होती. असंख्य भिकाऱ्यांना त्यानं अगदी जवळून न्याहाळलं होतं. आपल्याला वाटतंय तेवढा हा शोध सोपा नाही हे लवकरच त्याच्या लक्षात आलं. असंख्य भिकारी पाहूनही त्याला अपेक्षित असलेली दयनीयता त्याला कुठल्याच भिकाऱ्याच्या चेहऱ्यावर सापडत नव्हती. बहुतेक भिकारी अगदी खाऊन-पिऊन सुखी असल्याचे त्याला जाणवत होते. दहा दिवस उन्हातान्हात भटकून निराश झालेल्या हर्षवर्धनला अचानक एका फ्लायओवरखाली त्याला हवा असलेला चेहरा मिळाला आणि त्याने आपली गरज त्या भिकाऱ्याला थोडक्यात समजून दिली आणि तो त्याला आपल्या स्टुडीओत घेऊन आला. आंतरराष्ट्रीय स्पर्धा, त्यातून मिळणारा पैसा, मानमरातब या गोष्टी अर्थातच त्यानं त्या भिकाऱ्याला सांगितल्या नव्हत्या. आपण एक चित्रकार आहोत, आपल्याला चित्र काढायचे आहे एवढाच तपशील त्यानं त्या भिकाऱ्याला सांगितला होता.
हर्षवर्धन त्या भिकाऱ्याला आपल्या स्टुडिओमध्ये घेऊन आला आणि त्यानं आपलं काम चालू केलं.
तो अतिशय दयनीय अवस्थेतला भिकारी म्हणजे मीच, हे तुम्ही; चाणाक्ष वाचकांनी ओळखलंच असेल. आणि तसं ते ओळखलं असेल तर ते साफ चुकीचं आहे... मी तो भिकारी नाही...
हर्षवर्धन त्या भिकाऱ्याला घेऊन आला आणि त्यानं आपलं चित्र रेखाटण्याचं काम चालू केलं. काम मोठं होतं. हर्षवर्धनच्या हातातील इतर कामांना सांभाळून त्याला ते करायचं होतं. स्पर्धेला चित्र पाठवण्यासाठी सहा-आठ महिने अवकाश होता, त्यामुळे हर्षवर्धननं त्या भिकाऱ्याला रोज ठराविक वेळेला ठराविक वेळेसाठी यायला सांगितलं.
हळूहळू चित्र पूर्णत्वाला येऊ लागलं होतं. काही दिवसांचंच, पण महत्त्वाचं काम राहिलं होतं आणि त्या दिवशी मी त्याच्या स्टुडीओत प्रवेश केला.
आत शिरताच माझी नजर त्या भिका-याकडे गेली आणि मी शहारलो. इतकी दयनीय अवस्था झालेली व्यक्ती मी याआधी कधीच पाहिली नव्हती. खरंतर मी फारशी गरिबीच पाहिली नव्हती. एका गर्भश्रीमंत घराण्यात जन्मलेला मी हर्षवर्धनचा मित्र होतो. आमचे विविध ठिकाणी अनेक आलिशान बंगले आहेत आणि त्यातील बहुतेक बंगल्यांमध्ये हर्षवर्धननं रेखाटलेली पेंटिंग्स लटकलेली आहेत.
मी आत शिरलो आणि त्या भिकाऱ्याला पाहून शहारलो. समोरच थोड्या दूर बसलेल्या हर्षवर्धनजवळ मी गेलो आणि त्याला विचारलं, `हे काय नवीन?`
हर्षवर्धननं अगदी हळू आवाजात `ते काय नवीन होतं?` ते मला सांगितलं.
त्यावेळी मला अधिकचा तपशील कळला तो असा- हर्षवर्धननं त्या भिकाऱ्याला रोजचे पन्नास रुपये या बोलीवर तेथे बोलावलं होतं. मी गर्भश्रीमंत असलो तरी मनाने खूपच हळवा होतो. ज्या काढलेल्या चित्रावर हर्षवर्धन लाखो रुपये कमावणार होता, ते चित्र ज्या व्यक्तीचं आहे त्याला तो फक्त काहीशे रुपये देणार होता. हर्षवर्धन खूपच प्रसिद्ध चित्रकार होता. तोही माझ्याइतकाच श्रीमंत होता. तो यापेक्षा कितीतरी अधिक पैसे त्या भिकाऱ्याला देऊ शकला असता.
माझी नजर परत त्या भिकाऱ्याकडे गेली. खरंच अतिशय दयनीय अवस्थेत तो तिथे बसला होता. गेले कित्येक दिवसच काय, कित्येक महिने त्याच्या पोटात पोटभर अन्न गेलेले नाही हे कोणी लहान मुलगाही सांगू शकला असता. रिकामं असल्यानं अगदी खपाटीला गेलेलं पोट, बाहेर लटकत असल्यासारखे त्याचे डोळे, हातापायांच्या झालेल्या काड्या, वाढलेले केस, वाढलेली नखे, प्रचंड मळलेले कपडे अशा अवस्थेतलं त्याचं रूप पाहून मी जितका निराशेत गेलो तितकाच त्याच्या बाबतीतला हर्षवर्धनचा अलिप्तपणा पाहून मनोमन संतापलोही. अर्थात आत्ता हर्षवर्धनला काही बोलणे शक्यच नव्हते. तो त्याच्या कामात होता. शिवाय त्या भिकाऱ्यासमोर मी हर्षवर्धनला काही बोलणे योग्यही नव्हते. मी काही क्षण तसाच परंतु त्या भिकाऱ्याकडे पाठ करून बसून राहिलो. मी तिथून उठणार तोच हर्षवर्धनला मोबाईलवर कोणाचातरी फोन आला. `रेंज प्रॉब्लेम` म्हणून, `तू बस जरा इथे. मी आलोच,` असं म्हणून तो त्या खोलीबाहेर पडला. आता त्या खोलीत फक्त मी आणि तो भिकारी असे दोघेच उरलो होतो.
मला तिथे बसणे असह्य झाले होते. मी तसाच दरवाजापाशी जाऊ लागलो. आत येताना डाव्या बाजूला म्हणजेच बाहेर पडताना दरवाजाच्या उजव्या बाजूला तो भिकारी बसला होता. त्याची इतकी दयनीय अवस्था होती की माझ्या तेथील अस्तित्वाची दखल घेण्याएवढीही ताकद त्याच्यात नव्हती. त्यामुळे तो पूर्वी एवढ्याच अलिप्तपणे कोरड्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत होता. काही वेळापूर्वी हर्षवर्धन त्याचे चित्र काढताना त्याचे जसे डोळे होते, जसा चेहरा होता, हर्षवर्धन तेथून बाहेर गेल्यावर त्याच्यात काडीचाही बदल झालेला नव्हता.
मी दारापाशी आलो. हर्षवर्धन आत येताच मी तेथून बाहेर पडणार होतो. दारापाशी उभं असतानाच मी परत एकदा त्या भिकाऱ्याकडे नजर टाकली. अचानक माझा हात माझ्या खिशात गेला. नुकताच मी बँकेत जाऊन आलो होतो. दोन हजाराच्या नव्याकोऱ्या नोटांची एक गड्डी माझ्या खिशात होती. एकाला रोख पेमेंट द्यायचे होते म्हणून तेवढीच रक्कम माझ्या खिशात होते. एरवी माझे सर्व खर्च, पेमेंट मी onlineच करत होतो. त्या भिकाऱ्याची ती दयनीय अवस्था पाहून मी इतका इमोशनल झालो होतो की माझा खिशात गेलेला हात खिशातील ती दोन हजाराची अख्खी गड्डी बाहेर घेऊन आला आणि ती गड्डी मी जशीच्या तशी त्या भिकाऱ्याच्या हातात जवळजवळ फेकलीच. क्षणभर काय झालं ते जसं मला कळलं नाही तसंच ते त्या भिकाऱ्यालाही कळलं नाही. माझ्यातही आता हर्षवर्धन आत येण्याएवढा थांबण्याचा पेशन्स नव्हता. मी त्याची वाट न बघताच तेथून बाहेर पडलो. हर्षवर्धन त्याच्या स्टुडिओच्या दुसऱ्या गेटजवळ उभा असलेला मला दिसला. मी वेगळ्याच गेटमधून बाहेर पडलो.
गाडीत बसलो. शोफरला गाडी माझ्या बंगल्याकडे घ्यायला सांगितलं. काही क्षणात मी भानावर आलो आणि आपण त्या भिकाऱ्याला मोठे दान दिल्याचे माझ्या लक्षात आले आणि माझी मन:स्थिती मघापेक्षा खूपच सुधारली. मला खूप बरं वाटू लागलं. आता त्या भिकाऱ्याला पुढचे अनेक दिवस पोटभर खायला मिळेल या भावनेने मला चांगलं वाटलं. आपल्याकडून एक सत्कृत्य घडल्याची मला जाणीव झाली. माझ्यासाठी दोन लाख ही रक्कम तशी किरकोळ होती पण त्या भिकाऱ्यासाठी ती खूप मोठी होती.
मुंबईचं ट्रॅफिक आणि एकूण अंतर यामुळे माझ्या बंगल्यापर्यंत पोहोचायला मला दोन तास लागले. मी घरी पोचतो न पोचतो तोच माझ्या मोबाईलवर हर्षवर्धनचा कॉल आला.
`अरे कौशल कुठे आहेस तू? अचानक का निघून गेलास? आणि आरे... तो भिकारी कुठे गेलाय? माझं बोलणं होऊन मी आत आलो तर तुही गायब आणि तो भिकारीही गायब! माझं काम अगदी काही दिवसांचंच राहिलं होतं. मी त्या भिकाऱ्याच्या नेहमीच्या राहण्याच्या फ्लायओव्हरखाली गेलो तर तिथेही नाहीये तो. काय करावं तेच कळत नाहीये. अचानक कसा गेला तो निघून? गेले कित्येक दिवस तर अगदी नियमित येतो. माझं काम झालं, पन्नास रुपये त्याच्या हातावर टेकवले की मगच तो जातो. आज अचानक असं काय झालं? मला तर खूपच टेन्शन आलंय. कुठे गेलाय अचानक काहीच कळत नाही. माझं हे चित्र आता पूर्ण कसं होणार? दोन-तीन दिवसात तो मिळाला नाही तर मला पुन्हा नवीन भिकारी शोधायला लागणार. पुन्हा पहिल्यापासून काम चालू करावे लागणार. अजबच झालंय आज हे!` हर्षवर्धन एकटा बोलत होता, असंख्य प्रश्न विचारत होता. माझ्याकडे उत्तर होतं, पण मी त्याला सांगू शकत नव्हतो...
दोन-चार दिवस गेले. माझं अपराधी मन मला खात होतं. मी हर्षवर्धनच्या स्टुडिओत गेलो. पाहिलं तर तो अतिशय निराश मन:स्थितीत त्याच्या केबिनमध्ये बसून होता. `Extreme Poverty`च्या स्पर्धेत पाठवावयाचं ते चित्र अर्धवट स्वरूपात समोर पडून होतं पण त्याचं `मॉडेल` पळून गेलं होतं.
`असं अचानक काय झालं असेल रे कौशल की तो हरामखोर भिकारी अचानक पळून गेला असेल? तो सापडण्यापूर्वी मी किती दिवस मला पाहिजे तसा भिकारी शोधत होतो. प्रचंड शोधानंतर मला हवं तसं मॉडेल मिळालं होतं. आता परत नवीन मॉडेलचा शोध घेण्याची ताकद आणि वेळ माझ्यात नाही रे... तुला काय वाटतं, इतक्या दिवसांनंतर अचानक तो निघून का गेला असावा?` हर्षवर्धननं मला विचारलं.
`हर्षु... मला माफ कर.` मी हर्षवर्धनला म्हणालो. हर्षवर्धनच्या चेहऱ्यावर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उमटलं. मी त्याला घडलेलं सारं सांगितलं. ते ऐकल्यावर हर्षवर्धनचा संताप प्रचंड उफाळून आला. त्यानं मला प्रचंड फायर करायला सुरुवात केली. माझ्याकडे बोलायला काही नव्हतंच. मी गप्प बसून राहिलो होतो. शक्य असतं तर हर्षुनं माझा खूनच केला असता इतका तो संतापला होता. `मला खरंच माफ कर,` असं म्हणून हर्षुचे पाय धरावे असं मला वाटू लागलं. पण जसं त्याला माझा खून करणं शक्य नव्हतं तसंच मला त्याचे पाय पकडण शक्य नव्हतं.
`ठरलं तर...` अचानक हर्षु मला म्हणाला.
`आता तुलाच झालेल्या प्रकाराची शिक्षा भोगावी लागेल.` तो पुढे म्हणाला.
आता माझ्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. तरी मी त्याला म्हणालो, `मित्रा, तू सांगशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे.`
आणि पुढे त्यानं जी शिक्षा मला भोगायला सांगितली ती मला भोगावीच लागली. पुढचे काही महिने मी त्याच्याच घरी मुक्कामाला आलो. दाढी करणे, केस कापणे या गोष्टींना मला फाटा द्यावा लागला. मला माझा आहार निम्म्याहूनही कमी करावा लागला. तिन्ही त्रिकाळ चरणाऱ्या माझ्यासारख्याला याचा किती त्रास झाला असेल हे शब्दात व्यक्त करणे अवघड! माझं वजन कमालीचं कमी झालं. हर्षुला अपेक्षित एवढं ते कमी झाल्यावर पुढील पाच-सहा दिवस त्यानं अन्नाचा एक कणही पोटात न टाकण्याची मला पुढची शिक्षा सुनावली.
हर्षवर्धनला अपेक्षित आकृती माझ्या स्वरूपात साकारल्यानंतर हर्षुनं माझ्या त्या झालेल्या भयानक रूपाला रेखाटायला सुरुवात केली. यावेळी मात्र त्यानं आपला संपूर्ण वेळ या कामाला वाहून घेऊन ते माझं चित्र लवकर पूर्ण केलं आणि सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यानं `finished` असे उद्गार काढल्यावर इतक्या दिवसांच्या भयानक उपासमारीने कृश झालेला मी खाली कोसळलो.
सध्या एका पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये एका आलिशान खोलीमध्ये अतिविख्यात डॉक्टरांची टीम माझ्या प्रकृतीवर २४ तास लक्ष ठेवून माझी ट्रीटमेंट करत आहे आणि बेडवर पडल्या पडल्या माझ्या `Extreme Poverty`ला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिला नंबर मिळवून देण्याची मी देवाला प्रार्थना करत आहे...
***
छान संकल्पना
छान संकल्पना
छान आहे.
छान आहे.
जबरदस्त
जबरदस्त
छान कथा !
छान कथा !
हसाव कि रडाव?? एकिकडे अतिशय
हसाव कि रडाव?? एकिकडे अतिशय गरीबी आणि दुसरीकडे अतिशय श्रीमंती... मस्त झालीय कथा
आवडली..
आवडली..
छान!
छान!
छान आहे. Oscar wilde याची
कथा छान रंगवली आहे.
चु. भू. द्या. घ्या. बहुतेक Oscar wilde याची अशाच धर्तीवर the model millionaire ही अत्यंत सुंदर कथा आहे.
ओह! ती कथा वाचावयास मिळू शकेल
आपण म्हणालात ती कथा The Model Millionaire गुगल वरून शोधून वाचली. मी `मॉडेल` कथा लिहिल्याला बराच काळ झाला आहे. मात्र ही इंग्रजी कथा आत्ता वाचल्यावर, त्या वेळी मी ही इंग्रजी कथा निश्चित वाचली किंवा ऐकली असणार, व त्यावरच मला सुचलेल्या कल्पनेवर माझी कथा साकार झालेली असणार यात शंकाच नाही. धन्यवाद!
हृदयस्पर्शी
हृदयस्पर्शी