भुताच्या गोष्टी: फौंटेनच्या पुलावरचे भूत

Submitted by Dr Raju Kasambe on 25 March, 2020 - 11:52

फौंटेनच्या पुलावरचे भूत

साधारण पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. आपल्या गोष्टीचे हीरो आहेत रमेश आणि सुरेश. अर्थात ही काल्पनिक नावे आहेत. पण रमेश आणि सुरेश खास मित्र. म्हणजे अगदी घट्ट. दोघेही ड्रायव्हर. दोघांनाही ‘लाईफ’ मध्ये ड्रायव्हर व्हायची स्वप्नं पडत. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे स्वप्नं प्रत्यक्षात उतरवली सुद्धा.

तर दोघेही बोरिवलीच्या एका मोठ्या कॉल सेंटरला ड्रायव्हर म्हणून नोकरीला होते. तुम्हाला माहीत असेलच की कॉल सेंटर दिवसरात्र म्हणजे 24 तास सुरू असतात. कर्मचार्‍यांना रात्री बेरात्री घरून न्यायला आणि परत ड्रॉप करायला कंपनीच्या गाड्या असतात. म्हणजे नोकरीच्या पॅकेज मध्ये हे सुद्धा एक आकर्षण असते.

तर अचानक काय झाले की ह्या कंपनीचे कुणीही ड्रायव्हर मध्यरात्री बारा वाजता सुटणार्‍या कर्मचार्‍यांना बोरिवली ते वसई – विरार ड्रॉप – पिकअप करायला तयार होईनासे झाले. खरे तर जेवढे जास्त अंतर कार चालविणार तेवढी ड्रायव्हरची जास्त कमाई होत असे. तरी सुद्धा सगळे ड्रायव्हर इतर बाजूंचे ड्रॉप मागून घेत. त्यासाठी कॉल सेंटरच्या मॅनेजरला सुद्धा ते मॅनेज करीत.

पण केवळ रमेश आणि सुरेश मात्र ह्या लांबच्या ड्रॉपच्या फेर्‍या मुद्दाम मागून घेत. त्याचे कारण की दोघेही ‘हिम्मतवान’ होते आणि ते भूतांना घाबरत नसत! म्हणजे?

म्हणजे असे की रात्री-बेरात्री ह्या हायवेला फौंटेनच्या पुलावर ड्रायव्हर लोकांना भूत दिसायला लागले होते. विशेषतः रमेश आणि सुरेश ह्यांना ते हमखास दिसायचे. ती दोघेच ऑफिसला ह्या भूताच्या गोष्टी रंगवून सांगत. हे भूत म्हणजे रात्री बाईकवरून पूल पार करणार्‍या एका तरुणाचे होते. त्याला एखाद्या मोठ्या वाहनाने उडवले असावे. हेल्मेट घालून असून सुद्धा बिचार्‍याचा मृत्यू झाला असावा. त्यामुळे त्याचे भूत सुद्धा हेल्मेट घालून भटकत असणार. अशी ती गोष्ट होती.

सर्वजण जरी ह्या भूताला घाबरत होते तरी ऑफिसमधला फारूक ड्रायव्हर नाही! त्याने एकदा रमेश सुरेश जोडीला भूत दाखविण्यासाठी चॅलेंज केले. फारूक नेहेमी स्वतःच्या ‘डेरिंग’च्या फुशारक्या इतर ड्रायव्हर मित्रांजवळ मारीत असे.
रमेश सुरेशनी त्याला काही दिवस झुलवले.

‘तेरेको दिखाता हूँ. लेकीन तू अमावस की रात मेरे साथ चलना गाडीमे. वसईकी ट्रीप मांग लेते है’. इति रमेश.

शेवटी अमावस्येच्या रात्री रमेशने फारूकला भूत दाखविण्यासाठी सोबत घेतले. रात्रीचे साडे बारा झाले असतील. रमेश मुद्दाम गाडी साईडने चालवीत होता. पूलाच्या कडेने भूत उभे होते. सांगितल्याप्रमाणे त्याने हेल्मेट घातलेले होते.

रमेश फारूकला म्हणाला
‘तेरेकू बात करने का है क्या मयत हुये आदमी से?’

त्याने भूताजवळ गाडी थांबविली. भूत हळूहळू जवळ आले. त्याचे डोळे लालबुंद आणि तारवटलेले होते. जणू त्यात रक्त साकळले होते. हेल्मेटमधून जेवढी दाढीमिशी दिसत होती ती अस्ताव्यस्त होती. चेहरा अगदी निर्विकार होता.

‘किधर रहता है?’ इति फरूक.

भूताने फक्त पूलाच्या कोपर्‍याकडे डोके फिरविले.

‘कभी से?’

त्याने हात वर केला (‘अच्छा, काफी दिन पहेले!’ इति फारूक स्वतः).

‘हेल्मेट नही था क्या?’

त्याने होकारार्थी मान हलविली.

‘फिर भी. अरे बुरा हूवा’.

फारूकने रमेशला हाताने इशारा करताच रमेशने गाडी पळविली. फारूक नक्कीच डेरिंगबाज होता ह्यावर रमेशला विश्वास बसला. कर्मचार्‍यांना वसईला ड्रॉप करून येईपर्यन्त रात्रीचे तीन वाजून गेले होते. परत येताना रमेशनी पूलाच्या त्या स्पॉटजवळ आल्यावर गाडीचा वेग कमी केला.
‘फारूक जरा ढूंडना अपने ‘दोस्त’ को!’

रात्रीच्या ट्रक आणि इतर वाहनांच्या हेडलाइट्सच्या प्रकाशात फारूक डोळे फाडून पलिकडची बाजू पिंजत होता. भूत कुठेच त्याला दिसले नाही.
आता रमेशला दुसरेच टेंशन होते. आता हा फारूक पण रात्रीच्या वसई विरार लांबच्या फेर्‍या घेईल आणि आपल्याला त्या मिळणार नाहीत असे रमेशला वाटायला लागले.

पण घडले उलटेच. फारूक डेरिंगबाज असला तरी त्याचा भूतावर ‘फुल टू’ विश्वास होता. त्याने ऑफिसला रमेश-सुरेश पेक्षा अधिक उत्साहाने भूताच्या भेटीचे किस्से सांगायला सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की रमेश सुरेश सोडून कुणीही आता वसई विरार ड्रॉपच्या फेर्‍या घेईनासे झाले. सगळ्यांनी जास्तच धसका घेतला.

त्यानंतर रमेश आणि सुरेश फौंटेन वरून जाताना येताना कार रिकामी असेल तर आठवणीने आधीच दोन वडा पाव विकत घ्यायचे. (पिकअप ड्रॉपचे कर्मचारी गाडीत असतील आणि भूत दिसले तर मात्र गाडी जोरात पळवून त्यांना भूताची केवळ झलक दाखवायचे.) भूताजवळ गाडी थांबवायचे नाहीतर यू-टर्न घेऊन जायचे आणि त्याला बोलवायचे.

हेल्मेट घातलेले भूत तसेच असायचे. लालबुंद, तारवटलेले डोळे, निर्विकार चेहेरा.

‘काही खातोस का?’

भूत हात पुढे करायचे. रमेश त्याच्या हातावर दोन वडापाव ठेवत असे.

‘जा, आरामात बसून खा. हेल्मेट काढून ठेवशील.’

‘जी’ इति भूत.

पूलाच्या शेवटच्या टोकाला त्याने एक काळया प्लॅस्टिक शीटचे शेड तयार केले होते. त्यामध्ये घुसून किंवा बाहेरच ते भूत फतकल मारून बसत असे. मग हेल्मेट काढून वडा पाव खात असे.

‘खाऊन झोप आता. खूप उशीर झाला. उद्या भेटू’. रमेश ओरडून बोलायचा.
रमेश भूताला हात दाखवून बाय करी. कधीकधी मूड असला तर भूत पण हात वर करून रमेश ‘साहेबांना’ बाय करीत असे.

आता रमेश - सुरेशच्या लांबच्या ड्रॉप - पिकअपच्या ट्रीप पक्क्या झाल्या होत्या. खात्रीच्या मिळकतीत त्यांनी भूताला भागीदार केले होते. अनेक दिवसांपासून हा वेडसर माणूस त्यांना इथे असाच हेलमेट घालून भटकताना दिसायचा. कुठल्या प्रश्नाचे तो सुसंगत उत्तर देत नसे. त्याच्या वर्तणूकीचा काही दिवस अभ्यास करून रमेश आणि सुरेशने ऑफिस मध्ये भुताची अफवा पसरविली होती. हळूहळू त्यांना यश मिळाले. फारूकने शेवटचे प्रमाणपत्र दिले.

रमेश गालातच हसला. स्वतःच्या हुशारीवर खुश होऊन गाडी स्टार्ट केली आणि बोरिवलीकडे पिटाळली. ऑफिसला जाऊन आजही भूत दिसल्याचे सर्वांना सांगायचे होते. नेहमीप्रमाणेच.

डॉ. राजू कसंबे
मुंबई

(एका कॉल सेंटरवर काम करणार्‍या मित्राने सांगितलेल्या सत्य घटनेवर आधारित). (कोरोना व्हायरस मुळे रिकामपणात लिहून काढली).

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे.
सुमसान पुलावर भूत असणे फार कॉमन आहे मुंबईत..
आमच्या ईथली पोरं खूप कथा सांगायचे. मी काही वेळा ट्राय मारले पण दिसले नाही कधी. मग मी सुद्धा नकली स्टोरया बनवून पसरवू लागलो. तेवढेच मनोरंजन

गोष्ट आवडली.

फक्त भूत कुणी तिसरेच असेल हे डोक्यात नाही आले. एक दिवस सुरेश भूत बनत असेल व 1 दिवस रमेश असे वाटले होते.

मुद्दाम सस्पेन्स निर्माण केलेला नाही. जशी ऐकली तशी लिहिली. मी काय मोठा लेखक बिखक नाहीये. बस लिहितो.
सर्वांना धन्यवाद.

धन्यवाद डॉक्टर. म्हणूनच मी वर असे लिहिले होते. एक वाचक म्हणून मला लवकर न उलगडणारा सस्पेन्स, जो उकलण्यासाठी भरपूर डोकं खाजवावं लागेल अशा रहस्यकथा वाचायला आवडतात.

मी तूप वाढणार असेल तर अन्नछत्रात जेवते. बरं जाऊदे. तुमच्या पिताश्रींना काय तोशिस पडते मी अन्नक्षेत्रात जेवेन किंवा नाही यानं.

Chhan