ओसाडगावचा पाटील

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 03:37

जगाच्या पाठीवर आज अनेक देशांतून राजे-राजवाडे नामशेष झालेले असले, तरी लोकांच्या मनात आपल्या जुन्या राजांबद्दलचा आदर आणि भीतीयुक्त दरारा कायम आहे। अनेक देशात आज सुद्धा असे नामधारी राहिलेले राजे आपल्या जुन्या वैभवाच्या स्मृती उगाळत आणि स्वतःच्या कुळाचा राजेशाही इतिहास जोंबाळत आयुष्य जगायची धडपड करताना दिसतात। आरशासमोर उभा राहिल्यावर स्वतःच्या डोक्यावर अदृश्य मुकुट बघायची आणि साध्या लाकडी खुर्चीवर बसतांना २४ कॅरेट सोन्याच्या सिंहासनावर बसायच्या ऐटीत बूड टेकवायची सवय जरी पिढ्यानपिढ्या चालत आलेली असली, तरी वस्तुस्थितीत दोन वेळच्या जेवणाची ददात असलेली ही राजे मंडळी अनेकांच्या थट्टेचा विषय झालेली असतात। ' सत्यकाम अगस्त्या मार्तादिराजा ' असं भारदस्त आणि संस्कृत वळणाचा नाव असलेला आणि माझ्या ऑफिस मध्ये माझ्याच बरोबर काम करत असलेला हा एके काळच्या राजाचा वारसदार मला अगदी अपघातानेच भेटला आणि माझा जवळचा मित्र झाला।

इंडोनेशिया या आशिया मधल्या एका भल्या थोरल्या देशाचा हा नागरिक, पण आडनावात 'राजा' असल्यामुळे म्हंटलं तर स्वतःच्या छोट्याशा राज्याचा हा सम्राट। साधारण सम्राट म्हंटलं तर डोळ्यासमोर येणारी भारदस्त आकृती मात्र इथे नावाला सुद्धा नव्हती। टोकदार वस्तूने नाकपुड्यांची भोकं कोरून काढावीत असं नाक, वर्षानुवर्ष अखंड धूम्रपान करून कायमचे पिवळे करून घेतलेले आणि खो-खो खेळायला बसल्यासारखे मागे-पुढे असलेले दात, पिचके डोळे, वयामुळे पांढरे झालेले पण अट्टाहासाने काळे करून घेतलेले केस, सव्वापाच फुटाच्या आतबाहेरची उंची आणि राजघराण्याची खूण म्हणून गोंदवून घेतलेलं हातावरचं गरुडाच्या आकाराचं चिन्ह अश्या अवतारातला हा माणूस एखाद्या साम्राज्याचा राजा असू शकतो यावर स्वप्नातही विश्वास बसणं शक्य नव्हतं। पूर्वीचे राजे आपापली तैलचित्र खास राजेशाही थाटात उत्तमोत्तम चित्रकारांकडून काढून घेत हे मला माहित होतं, पण या राजाचं तैलचित्र व्यंगचित्र म्हणून सहज खपेल असं काहीसं मला सतत वाटत राहायचं।

हा माणूस वयाच्या पन्नाशीत होता, पण महिन्यातून एकदा केस काळे केले की हा दहा वर्ष तरुण वाटायला लागायचा। दक्षिण-पूर्व देशांमधल्या लोकांच्या सदा तुकतुकीत राहू शकणाऱ्या त्वचेमुळे एरवी हा पन्नाशीत वाटलाही नसता, पण त्या सतत रंग बदलत असलेल्या केसांमुळे हा माणूस पहिल्या दोन आठवड्यात पन्नाशीतून चाळीशीत आणि पुढील दोन आठवड्यात चाळीशीतून पन्नाशीत प्रवास करताना दिसायचा। इंडोनेशियन वळणाच्या काहीश्या बोबड्या शब्दोचारांमुळे कधी कधी वाक्यं इंग्रजीसारख्या वाटण्याऱ्या पण अगम्य भाषेत बोलून जायचा आणि समोरच्याला तश्याच गोंधळलेल्या अवस्थेत ' you got it ? ' असं प्रश्न विचारून गार करायचा।

माझ्याशी या वल्ली चा संबंध आमच्या एका विशेष प्रोजेक्टमुळे आला। Baharain नावाच्या आखातातल्या एका चिमुकल्या देशात एका मोठ्या क्लायंटने ७५ बंगल्यांच्या मोठ्या टाउनशिपचा आराखडा करायला आमच्या ऑफिसची निवड केली आणि हा राजा माणूस दुबईला यायच्या आधी १५ वर्ष Baharain ला राहून काम करून आलेला असल्यामुळे त्याची प्रोजेक्ट लीड म्हणून निवड झाली। त्या प्रोजेक्टच्या Architectural design साठी मला निवडलं गेलं आणि पुढचे ६ महिने या राजा माणसाबरोबर काम करायला मिळणार म्हणून मी मनातल्या मनात सुखावलो। मुळात अशा चित्रविचित्र माणसांबद्दल मला आधीपासूनच आकर्षण असल्यामुळे आणि इतरांकडून त्याच्या विक्षिप्तपणाचे अनेक किस्से ऐकलेले असल्यामुळे मला हे काम म्हणजे प्रोजेक्टच्या व्यतिरिक्त या राजा माणसाबद्दल आणि त्याच्या देशाबद्दल थोडाफार जाणून घ्यायची सुवर्णसंधी वाटली.अपेक्षेनुसार अगदी पहिल्याच दिवशी मला या राजा माणसाने खिशात टाकलं.

क्लायंटच्या ऑफिस मध्ये पहिल्याच मीटिंगसाठी आम्ही एकत्र गेलो आणि जाताना स्वतःसाठी एक आणि माझ्यासाठी एक कॉफी घेऊन स्वारी माझ्याशी गप्पा मारायला लागली। त्याच्या मते टीमच्या सर्वांशी 'वेव्हलेंग्थ' जुळवण्याचा साधन म्हणजे कॉफी,मद्य किंवा सिगारेट। मी मद्यपान किंवा धूम्रपान करत नाही हे त्याने आधीच सगळ्यांशी बोलून माहित करून घेतला होतं आणि कॉफीमध्ये मी भारतीय पद्धतीची दूध घातलेली कॉफी पितो ही माहिती घेऊन त्याने तशीच कॉफीने आणली होती। राजाच्या राज्याचे भग्नावशेष उरले असले तरी शेवटी राजा हा राजाच असतो, असं कुठेतरी वाचलेलं आठवलं आणि त्याचीच प्रचिती येत असल्याची खूणगाठ मी मनात बांधली।

वरकरणी अजागळ आणि एखाद्या प्रहसनांत शारीरिक विनोदासाठी ज्यांची आपोआप निवड होऊ शकते अशा वाटणाऱ्या या माणसाची काम करायची पद्धत मात्र अतिशय काटेकोर आणि नीटनेटकी होती। प्रोजेक्ट च्या प्रत्येक मुद्द्यांवर स्वतः काढलेली टिपणं, टीम च्या प्रत्येकाला नेमून दिलेली कामं आणि प्रत्येकाला स्वतःचे मुद्धे कोणाचीही भीडभाड ना ठेवता मांडायची दिलेली मुभा या सगळ्यामुळे पहिल्या एका आठवड्यातच या माणसाला ऑफिस मध्ये मान का आहे हे मला कळायला लागलं। हा मनुष्य मुद्दा पटवून द्यायला शांतपणे तासंतास वाद घालू शकायचा आणि समोरच्याचा मुद्दा पटला तर एका क्षणात तो मान्य करून पुढे कामाला लागायचा।

एके दिवशी काम करता करता अचानक राजेसाहेबांना pipe प्यायची हुक्की अली आणि त्याने मला स्वतःबरोबर बाहेर 'केवळ धूम्रपान करणाऱ्या लोकांसाठी खास राखीव' असलेल्या बिल्डिंगच्या त्या खास बाल्कनी मध्ये नेलं। बाहेर गेल्यावर खिशातला रुमाल काढून हातात धरला आणि अचानक मला एका विशिष्ट जागी उभा करून दुसर्या एका जागी राजे उभे राहिले। नक्की या सगळ्यांचा अर्थ काय, असं विचारल्यावर मिळालेल्या उत्तराने मी कोलमडायचा बाकी होतो।

' हवेची दिशा बघत होतो। तुम्ही हवेच्या विरुद्ध दिशेला आहात। मी तोंडातून सोडलेला धूर तुमच्या जवळ येणार नाही कारण हवा तुमच्या बाजूने नाहीये। तुम्ही सुरक्षित आहात।' या राजाच्या राज्यात पूर्वी बहुधा वातकुक्कुटाच्या जागी हुक्का आणि विड्या पिणारे लोक उभे करत असावेत। राजा पुढे बोलत होता ' हा pipe माझ्या आजोबांनी आणि नंतर माझ्या वडिलांनी वापरलाय, त्यानंतर सगळ्यात मोठा मुलगा म्हणून माझ्या हातात दिला। pipe लाकूड हाताने कोरून बनवलेला आहे आणि त्यावर आमचा राजचिंन्ह असलेल्या गरुडाची आकृती सुद्धा आहे' कोरणाऱ्या कारागिराने नेमका तो गरुड असा कोरला होतं कि चोचीकडे तंबाखू भरायची जागा आणि शेपटीकडे नळकांडं आलेला होतं। त्यामुळे हा राजा pipe ओढताना सतत त्या बिचाऱ्या गरुडाची शेपूट त्याच्या तोंडात दाबतोय कि काय असं वाटायचं आणि १००-१५० वर्ष जुना तो गरुड अधिकच केविलवाणा वाटत रहायचा।

या राजाला थोडा बोलता करण्यासाठी मी मुद्दाम त्याला त्याच्या राजेशाही खानदानाविषयी विचारलं। आपण ज्या देशात आहोत, तिथल्या राजापेक्षा तुम्ही कित्येक वर्ष जुने राजे आहात आणि म्हणून तुमच्याबद्दल आपोआप आदर वाटतो असं मधाचा बोट लावल्यावर श्रीमंतांची कळी खुलली। पुढचा अर्धा तास मग या राजाच्या कुळाबद्दल, कुळाचाराबद्दल आणि कुलदीपकांबद्दल मला भरभरून माहिती मिळाली।

हा मनुष्य इंडोनेशियाच्या जावा नावाच्या बेटांच्या समूहातल्या एका छोट्याश्या बेटाचा राजा होता। त्याच्या म्हणण्यानुसार इंडोनेशियाच्या मूळच्या रहिवाशांच्या राज्यांपैकी एक असलेलं त्याचा राज्य होता। त्याच्या राज्याला आणि कुळाला १००० हुन जास्त वर्षांचा इतिहास होता, परंतु तीर्थरुपांनी दारू आणि जुगारात आपला राज्य हरल्यावर आणि पारंपरिक जमिनीची पुढच्या अनेक कुलदीपकांनी यथेच्छ वाटणी करून त्यातून मिळालेले तुकडे सुद्धा आपापले शौक पूर्ण करण्यात फुंकून टाकल्यावर या कुटुंबाचा होत्याच नव्हतं झालं। आपल्या भावंडांची हि 'प्रगती' बघून शेवटी या राजाने स्वतःच्या एकाच बायकोला आणि तिच्याचपासून झालेल्या ३ मुलांना थेट समुद्रापार न्यायचं ठरवलं आणि १९९५ साली सहकुटुंब Baharain ला बस्तान बसवला। एका राजाच्या कुळात जन्मलेला आणि भावी राजा असलेल्या या माणसाने अक्षरशः शून्यातून पुन्हा एक नवी सुरुवात केली।

' तुमच्या देशात आणि राज्यात तुम्ही सगळ्यांशी संपर्क ठेवून आहात कि त्या नंतर तुम्ही परत गेलाच नाहीत? ' माझा प्रश्न थेट असला तरी या माणसाला मी तो नक्कीच मोकळेपणाने विचारू शकत होतो।

' पाच वर्ष मी कुठे आहे हे कोणालाही माहित नव्हतं। एकदा सगळं स्थिरस्थावर झाल्यावर मी पुन्हा एकदा माझ्या गावी गेलो। भावंडांना भेटलो, त्यातल्या त्यात कमी बिघडलेल्या आणि थोडीफार अक्कल शाबूत असलेल्यांना पुन्हा रुळावर आणायचा प्रयत्न केला। मुळात माझ्या वडिलांना ४ बायका आणि २१ मुलं असल्यामुळे आपापसातले हेवेदावे मिटवणं कोणालाही शक्य नव्हतं। तीर्थरूप एका दिवशी सकाळी उठत नाहीत असं दिसल्यावर कळलं की या जगातलं त्यांचं अवतारकार्य संपलेलं आहे। आमच्या गावात राजाला देवाचा दर्जा आहे। आज सुद्धा मी गावी गेलो कि लोक आदराने गुडघ्यावर बसून डोकं झुकवून आदर दाखवतात, पण मला या सगळ्याचा आता तिटकारा आलेला आहे। राजा कर्तृत्वाने असेल तर ठीक, नाहीतर केवळ परंपरागत चालत आलेल्या गोष्टी पाळण्यात एक प्रकारची गुलामगिरीचं दिसते मला '

हे सगळं ऐकताना मला स्तिमित झाल्यासारखा वाटत होता।एखाद्या जुन्या काळच्या गोष्टीत वाचलेली किंवा ऐकलेली आख्यायिका डोळ्यांसमोर प्रत्यक्षात घडताना दिसत होती आणि अजून या माणसाकडून भरभरून ऐकायला कान आसुसले होते।

' मी माझ्या तिन्ही मुलांना राजेशाहीच्या स्पर्श होऊ दिला नाही। आज सुद्धा त्यांना सर्वसामान्य माणसांप्रमाणे घरी वागवलं जात। आम्ही नोकर किंवा आया कधीही घरी आणली नाही। कळायला लागल्यापासून माझ्या मुलांना मी स्वतःची कामं स्वतः करायला लावली आहेत आणि वेळप्रसंगी शिस्त लागावी म्हणून मार सुद्धा दिला आहे। मी त्यांना penkak silat सुद्धा शिकवलंय।'

हा काय प्रकार आहे, हे मला समजला नाही। त्यानेच पुढे खुलासा केला, कि हा त्यांचा पारंपारिक युद्धासाठी आणि लढाईसाठी वापरला जाणारा आपल्या केरळ मधल्या कालारीपायट्टू सारखा प्रकार आहे। वरकरणी बावळट वाटणाऱ्या या माणसाने मनात आणलं तर एखाद्या पहिलवानाला हा सहज भिडू शकतो, हे ऐकून मी थोडासा चकित झालो। माझा हात हातात घेऊन त्याने नुसत्या पकडीचे दोन-तीन प्रकार दाखवल्यावर या कृश शरीरात काय ताकद आहे आणि याही वयात हे शरीर किती टणक आहे हे मला यथेचछ समजलं।

एके दिवशी त्याने मला स्वतःच्या घरी जेवायला बोलावलं। माझ्यासाठी शुद्ध शाकाहारी पद्धतीचा जेवण त्याच्या सहचारिणीने प्रेमाने केलं होतं, परंतु त्या जेवणाच्या एका घासात माझ्यासारखा देशस्थ ब्राम्हण अक्खा वर्ष पुरवेल इतकी मिरची होती। जहाल तिखट आणि मसालेदार अश्या चवी एकाच वेळी जेवणात लागत असलेल्या आणि तसं अघोरी जेवण रोज दोन वेळा सहज रिचवत असलेल्या त्या कुटुंबाला बघून मी त्यांना मनोमन सलाम ठोकला। शेवटी साधा उकडलेला भात आणि कापलेली काकडी- टोमॅटो ईतकंच मी खाऊ शकतोय, हे बघून त्याच्या घरच्या सगळ्यांना अतिशय वाईट वाटलं। एकाच टेबलावर बेचव निरामिष जेवणारा मी आणि बैलाच्या शेपटीच्या सूप पासून ते तिखटाचा गोळा भरलेल्या माश्याच्या आमटीपर्यंत एकूण एक सामिष पदार्थ चवीने खाणारे हे इंडोनेशियन कुटुंब गुण्यागोविंदाने जेवले आणि माझी त्या दिव्यातून सुटका झाली। हे कुटुंब दगडापासून खिळ्यांपर्यंत काहीही खाऊन पचवू शकेल असं उगीच मला वाटून गेला।

एके दिवशी आमच्या क्लायंट कडच्या एका तद्दन कामचुकार आणि स्वतःला वाजवीपेक्षा जास्तच श्रेष्ठ समजणार्या एका महाभागाचा आम्हाला थोड्या उद्धट शब्दात लिहिलेला ई-मेल आला। आम्ही सगळे क्लायंटच्या ऑफिस मध्ये तडक मीटिंग साठी गेलो आणि तासभर दोन्ही बाजूने एकमेकांवर यथेच्छ आरोप आणि प्रत्यारोप झाले। प्रकरण थोडासा तापतंय, हे बघून आत्तापर्यंत शांत बसलेला हा राजा ताडकन उभा राहिला आणि त्याने सगळ्यांना स्पष्ट शब्दात बोलायला सुरुवात केली -

" कोणी काय केलाय यापेक्षा या प्रोजेक्टच फारसं नुकसान झालेला नाही हे महत्वाचा आहे। आपण सगळे प्रोजेक्ट साठी काम करतोय, आणि कोणी client ची व्यक्ती आहे म्हणून किंवा कोणी consultant ची व्यक्ती आहे म्हणून ती दुसऱ्यापेक्षा जास्त योग्य आणि श्रेष्ठ ठरत नाही। यापुढे कोणीही पातळी सोडून बोलला आणि वागला, तर ती व्यक्ती या प्रोजेक्टला लायक नाही असं समजलं जाईल।'

त्या दिवशी त्या मीटिंग रूम मधून सगळे जण हसत खेळात आणि झालं गेलं विसरून जायची भाषा करत बाहेत पडलं आणि खर्या अर्थाने मला एक राजा प्रत्यक्षात अनुभवता आला। वेताची छडी जितकी बारीक, तितका त्याचा मार जास्त लागतो म्हणतात। इथे ती छडी रेशमाच्या कापडाने गुंडाळलेली होती। मार मिळत होता, पण वळ उमटत नव्हता, आणि ती किमया करणाऱ्या या विलक्षण राजाचं राज्य जरी गेलं असला तरी राजेपण शाबूत होतं आणि आपल्या राज्यापासून हजारो मैल लांब तो आपल्या प्रजेची तशीच काळजी घेत होता।

जन्माने आणि कर्मानेही हा राजा राजासारखाच होता....त्यासाठी त्याला कोणत्या राज्याचा मोताद व्हायची गरज नव्हती, हेच खरं!

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults