' आमच्या काळात' असं नव्हतं

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 03:33

' आमच्या काळात' असं नव्हतं हे चाळीशी यायच्या आत बोलावं लागेल असं मला कधीही वाटलं नव्हतं , पण माझ्या मुलीला शाळेत घातल्यावर त्या शाळेचे जे जे अनुभव मला येत होते ,ते वारंवार अशा पद्धतीची तुलना करायला मला भाग पाडत होते. जग अतिशय वेगाने बदलत आहे , याचं हे एक उत्तम उदाहरण होऊ शकेल. आमच्या वेळी धीम्या वेगाने प्रगती होत असल्यामुळे आमच्या शाळा ८-१० वर्षांनी एकदा रंगरंगोटी होऊन कात टाकायच्या. पण आता तर शाळांमध्ये २-३ वर्षातच पुनर्जन्म झाल्याइतका बदल जाणवायला लागतो, ही प्रगती खरोखर थक्क करणारी आहे.

' आमच्या काळी ' नसलेले अनेक उपक्रम ' extraa curricular' च्या नावाखाली आता शाळांमध्ये चोरपावलांनी आलेले आहेत. त्यातल्याच एका उपक्रमाला - annual fun fair - ला जायचा योग्य आला. ' आमच्या काळी ' गावात भरणारी जत्रा आता शाळाशाळांमध्ये भरते , हा साक्षात्कार तेव्हा मला झाला. जत्रेत ' मौत का कुआ ', आरशांचा महाल , आकाशपाळणा अशा अनेक गमतीजमती मी लहानपणी अनुभवल्या होत्या. अगदी माकड आणि अस्वल अश्या अगदी विरुद्ध टोकाच्या प्राण्यांच्या एकत्र कसरती करणारे मदारी आणि दरवेशीसुद्धा बघितले होते. त्यामुळे शाळेत आपल्या मुलांच्या व्यतिरिक्त नवे कोणते प्राणी बघायला मिळणार आणि शिक्षकांपैकी कोण काय कसरती करून दाखवणार हे बघायची माझी उत्सुकता जत्रेचा दिवस येईस्तोवर अधीरतेच्या वेशीपर्यंत पोचलेली होती.

अखेरीस तो दिवस आला. संध्याकाळी ही नवी जत्रा बघायला जायचं म्हणून तिशीतला मी माझ्या ६-७ वर्षाच्या मुलीपेक्षाही जास्त आनंदी झालो होतो. मुलीने कपडे कोणते घालायचे इथपासून शाळेतल्या कोणत्या ' teacher ' ला कसं ' greet ' करायचा याच्या इतक्या सूचना मला दिल्या की तिला तिच्या आई आणि आईच्या माहेरून पाजल्या गेलेल्या बाळगुटीचे वळसे माझ्या मातोश्रींच्या बाळगुटीपेक्षा अंमळ जास्तच पडले आहेत याची मला खात्री पटली. मी वागण्यात चूक केली तर माझी मुलगी मला ओळख दाखवेल की नाही अशी शंका सुद्धा मला येऊन गेली आणि शेवटी त्या मायलेकींच्या सगळ्या फर्मानांना मी शिरोधार्य मानलं.

शाळेच्या मोकळ्या मैदानावर हि जत्रा भरलेली होती. प्रवेशद्वारावर एका दणकट आफ्रिकन शिपायाने आमचे ID chard बघून आम्हाला आत सोडलं आणि दात विचकत हसून " enjoy " असा म्हंटलं. त्या हसण्यामध्ये आनंदापेक्षा " भोगा आपल्या कर्माची फळं " हा भाव मला जास्त वाटला आणि मी मनोमन रामरक्षा म्हणायला सुरुवात केली.

त्या मैदानात मधोमध एक मोठं 'stage ' होतं. आजूबाजूने अनेक टपरीवजा ठेले ' food stall' , ' gift stall ' , ' art stall ' च्या गोंडस वाटणाऱ्या नावात गुंडाळून उभे केलेले होते. तिथे अर्थातच वडापाव , सामोसे , ढोकळा , चाट अश्या पाट्या असलेल्या ठेल्यांसमोर मातब्बर गुजराथी मंडळी जमलेली होती.नवर्याचे खांदे म्हणजे जणू काही शरीरावर ठोकलेल्या लाकडी खुंट्या आहेत अश्या पद्धतीने आपापल्या बॅगा, पर्स, पिशव्या आणि स्वतःच्या दोन पायांवर चालू न शकण्याच्या वयातली आपली पुत्रसंपदा इतका सगळं तिथे टांगून त्या समुदायातल्या बायका एक एक ठेला रिकामा करत होत्या आणि मधूनच त्या अंगमेहेनतीची मजुरी म्हणून आगेवरची एक पुरी किंवा अर्धा ढोकळा त्या बिचार्या नवर्याच्या तोंडात लाडाने भरवत होत्या. त्यातसुद्धा इतर मैत्रिणींशी बोलण्यात गुंग असल्यामुळे घास असलेला हात तेव्हढा वर जात होतं आणि नवरे आपापल्या बायकांचा हात ओळखून स्वतः तो घास गोड मानून भक्षण करत होते.

आपलं पुढे काय होणार याची चिन्ह मला दिसली आणि मी हळूच तिथून काढता पाय घेतला. माझ्या मुलीच्या वर्गातल्या तिच्या ' friends ' ने मला गराडा घालून ' hi uncle, how are you ' वगैरे ' चांगल्या वर्तणुकीच्या तासाला ' शाळेत शिकवलेले संस्कार पाजळून दाखवले आणि त्या उत्तर न ऐकताच पळाल्या. बहुतेक उत्तर ऐकायचा कसं हा धडा पुढच्या वर्षी शिकवणार असेल शाळा, असा विचार करून मी त्या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं. नक्की त्यांचा घोळका कुठे गेलाय याचा माग काढत काढत मी एका कोपऱ्याकडे पोचलो आणि समोर जे काही मला दिसलं ,ते बघून खरोखर डोळे भरून आले !

अनेक वर्गशिक्षिका मिळून तिथे चक्क आपल्या या विद्यार्थिनींच्या हातावर मेंदी काढत होत्या. कोणाच्या केसांमध्ये रंगीबेरंगी मणी ओवून छान वेणी घालून देत होत्या. एकीने तर चक्क माझ्या मुलीला मांडीवर बसवून गालगुच्चI घेतला आणि ही ' scheme' फी भरणाऱ्या पालकांना का लागू होत नाही याची मला खंत वाटून गेली.

त्या शिक्षिका ' आमच्या काळी ' आम्ही ज्यांना 'मॅडम' किंवा ' बाई ' म्हणायचो , तशा प्रकारातल्या वाटतच नव्हत्या. ' आमच्या काळी ' शाळेत मुलींना तेल लावून घट्ट वेणी बांधणं आणि मुलांना बारीक केस कापून ते नीट विंचरण असे नियम होते. एकदा केस वाढलेले दिसल्यामुळे आमच्या एका स्वतःच्या डोईवरचं छप्पर कधीच उडालेल्या आणि शिक्षक अशी उपाधी मिरवणाऱ्या यमदूताने त्या मुलाचे केस स्वतः कात्रीने कापल्याचाही मला आठवण आली आणि समोरचं हे दृश्य बघून मला ' उगीच इतक्या आधी जन्माला आलो ' अशी रास्त खंत वाटून गेली.

आम्हा पालकांचे मोर्चे आमच्या मुली जातील तिथे आपोआप वळत होते. मुली तर काय, पायाला भिंगरी लावल्यासारख्या सैरावैरा उधळल्या होत्या. शेवटी अश्याच एका जागी एकत्र येऊन त्या ' miss miss how are you ? ' असं काहीतरी ओरडल्या आणि आमच्या कुलदीपिकेने आम्हाला तिच्या त्या वर्गशिक्षिकेची ओळख करून द्यायला जवळ बोलावलं . समोर पुठ्ठयांचं एक घर , त्यावर ' come and click ' असं लिहिलेली पाटी आणि या सगळ्यांच्या आत एक जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेतून आणलेला हाडांचा सापळा वाटावा अशी एक विशीतली मुलगी म्हणजे माझ्या मुलीची वर्गशिक्षिका आहे हे बघून मला नवल वाटलं.

शाळा आपल्याकडच्या शिक्षिकांना दिवसभर उपाशी ठेवते की काय, अशी शंका मला येऊन गेली. माणसं हाडामांसाची असतात हे मी ऐकून होतो, इथे मांस हा प्रकार गायब होता। रंगीबेरंगी केस, रंगीबेरंगी नखं आणि तसेच रंगीबेरंगी कपडे घातलेली आणि लाल रंगाच्या चादरीवर बसलेली ती class teacher दिवाळीत गेरूने सारवलेल्या जमिनीवर काढलेल्या रांगोळीसारखी वाटत होती. आमच्या मुलामुलींना तिच्याबरोबर फोटो घ्यायचे होते आणि अर्थात ती कामगिरी जन्मदात्यांच्या हातातल्या mobile ची असल्यामुळे आम्ही 'बाप' माणसं मुकाट्याने त्या कामगिरीवर रुजू झालो. एव्हाना आमच्याही अंगावर थोड्याशा ' खुंट्या ' उगवलेल्या होत्याच ! शेवटी कुठेतरी बसून छान गप्पा माराव्या असं विचार करून आम्ही 'बाप' माणसं बाजूला तयार केलेल्या श्रीलंका देशाचं चित्र असलेल्या तंबूवजा निवाऱ्यापाशी गेलो.

त्या तंबूमध्ये श्रीलंकेचा देखावा म्हणून काही बुद्धाची चित्र, काही श्रीलंका देशातल्या वेगवेगळ्या जागांचे देखावे आणि चार कोपऱ्यात चार हत्तींची चित्रं असा थाट होता. बहुतेक शाळेचं 'बजेट' संपलं असावं , कारण हत्तींना पुरेल इतका पुट्ठा शाळेने पुरवला नव्हता. त्यामुळे जरा वारा आला की ते हत्ती फडफडताना दिसत होते. त्यात एका हत्तीच्या शेपटीचा भाग फाटल्यामुळे तो शेपटी कापलेल्या डॉबरमॅन कुत्र्यासारखा वाटत होता. मुळात हे सगळं करायचा शाळेचा अट्टाहास का, असं प्रश्न पावलोपावली मला पाडत होता आणि आमच्या वेळी हे सगळं नसलं तरी 'असं' नव्हतं हे आता मनोमन पटायला लागलं होतं.

पहिली ते चवथीच्या शिक्षिकांनी नंतर स्टेजवर नृत्याचा कार्यक्रम सादर केला. त्या ८-१० शिक्षकांच्या वजनामुळे स्टेज पडेल कि काय, अशी भीती वाटत होती पण शाळेने स्टेज तयार करताना बहुदा बजेट चांगलं ठेवला होतं. काही मुलांनी इथून तिथे उड्या मारून आणि शरीराचे अवयव वाकडे तिकडे करून दाखवले. त्या प्रकाराला ' robotic style hip hop ' डान्स म्हणतात अशी नवी माहिती कळली आणि मी लहान असताना जत्रेत बघितलेल्या माकडांच्या कसरतींचा हा या आधुनिक जत्रेतील अवतार मला गमतीशीर वाटला.

३-४ तासांनी मनसोक्त धुडगूस घालून, स्टॉलवरचे पाचपट महाग पदार्थ खाऊन आणि वर एक आईसक्रीम चेपून मुली खरोखर दमल्या आणि परतीचे वेध लागले. शाळेचे मुख्याध्यापक आणि पहिली ते चवथीच्या उपमुख्याध्यापिका आल्यावर आमचे नमस्कार चमत्कार झाले. मुख्याध्यापक अगदी आईने तयारी करून दिल्यासारखे छान टापटीप आणि उपमुख्याध्यापिका इंद्रधनुष्यातले सगळे रंग कपड्यांवर आणि केसांवर मिरवणाऱ्या ! हे सगळे कमालीचे विसंवादी लोक दीड-दोन हजार मुलं असलेली शाळा कसे सांभाळतात याचं मला खरोखर नवल वाटलं आणि आमची मुलं आमच्यापेक्षा कित्येक पटींनी बिनधास्त आणि स्वतंत्र विचारांची का आहेत, या कोड्याचंही उत्तर मिळालं.

त्या दिवशी नव्या जगातल्या या नव्या जत्रेची मजा मीसुद्धा मनमुराद लुटली आणि शेवटी त्या शिक्षकांबरोबर हसत खेळत मजामस्करीही करून घेतली. 'आमच्या काळी ' खरोखर हे नव्हतं , हेच खरं!

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users