डॉ. अनिल अवचटांचं मला आवडलेलं पुस्तक - ' स्वतःविषयी'

Submitted by प्राचीन on 24 February, 2020 - 02:50

अनिल अवचट यांचे मला आवडलेले पुस्तक - स्वतःविषयी
कधीकधी फारसं सजवलेलं नसलं तरी त्याच्या प्राकृतिक स्वरूपातही आवडतं असं आपलं एखाद्या शिल्पाबाबत होतं, नाही का? डॉक्टर अनिल अवचटांचं 'स्वतःविषयी' हे आत्मकथनपर पुस्तक वाचल्यावर मलाही असंच वाटलं.. नव्हे, हे पुस्तक All time favorite यादीत असल्याने, असं नेहमीच वाटतं.
'स्वतःविषयी 'वाचण्यापूर्वी अवचटांचं अमेरिका पुस्तक वाचलं होतं आणि आवडलं होतं. मग कुतूहल म्हणून हे पुस्तक वाचायला घेतलं. आधी ओतूर हे नाव भाजीवाल्याकडून ऐकलं होतं. छान मळे वगैरे आहेत इ.
मग अवचटांचं बालपण ओतूरमध्ये गेलं हे कळल्यावर हे आपल्या ओळखीचं गाव म्हणून गंमत वाटली. हा 'अवच्या' ओतूर सोडून शहरात येतो. पुढे त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाची वाटचाल अगदी सरळ सहज भाषेत मांडलेली आहे. तिथे रुळणं, काही वेळा टारगट गर्दीमधील एक चेहरा बनून इतरांच्या खोड्या काढणं, मतलब साधायला शिकणं इ. आणि हॉस्टेलचं आयुष्य, जे मला पूर्ण अनोळखी आहे, त्याचे किस्से... विशेष लक्षात राहिला तो दहीवडा Happy Happy
डिलिव्हरीज च्या जर्नलमध्ये पेशंट्च्या जागी वर्गातल्या मुलीची नावे लिहिणे, उच्चभ्रू मुलांमध्ये फिट होण्यासाठी नाना उपद्व्याप करून आपण बिघडलो, हे कबूल करणे, इ. मध्ये प्रामाणिकपणा जाणवतो. तो मानभावीपणा नाही वाटत.
मेडिकलचा अभ्यास नि त्याची आणि आपली फारशी गट्टी नसल्याचंही अवचट अगदी मोकळेपणाने लिहितात. धार्मिकतेसंबंधी विचार, नाना पेठ ते बिहारपर्यंत केलेली सामाजिक कामे, अपत्यसंगोपनाची जगावेगळी रीत, रुग्णाकडे बघण्याची भूमिका, इ.
त्या दरम्यान अवतीर्ण झालेली, पुस्तकाची व त्यांचीही नायिका सुनंदा तर मला आवडूनच गेली. तिचं वेगळेपण हे अवचटांच्या मनस्वी कलंदर गाभ्याला सामावून घेऊन मिरवतं. वैवाहिक जीवनात, मुलींच्या संगोपनातदेखील ही जोडी सहजता व उत्स्फूर्तता जपताना दिसतात.
यातील काही वाक्ये अगदी आवडली नि पटली - " माणसाने कधीतरी जरा वाहवत जायला लागतं, तरच जग कळतं.”; “तुच्छ्ता ग्रुप”, “आपलं व्यक्तिमत्त्व बायको स्वतः च्या साच्यात बसवून खलास करणार म्हणून बंड करून उठायचो”; “चेकचा चेहरा” ; कोणत्याही मतभिन्नतेनंतर ‘तुझंही बरोबरच आहे’असं म्हणणं, इ...
अवचटांच्या व्यक्तिमत्त्वाचा घाट किती आगळा आहे, याची बरीचशी जाणीव किंवा चुणूक या पुस्तकात मिळते. ह्यात त्यांच्या कौटुंबिक व सामाजिक जाणिवा, खुलं मन यांचं तपशीलाने वर्णन तर आहेच परंतु तत्कालीन शिक्षणव्यवस्थेचीही कल्पना येते.
अर्थात सगळेच इथे लिहिले तर पुस्तक वाचण्याचा आनंद- जो खरंच घ्यायला हरकत नाही, तो हिरावला जाईल. नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, स्वतःविषयी असं नाव असलं तरी त्यात दर्प आढळला नाही, उलट मला तरी लेखकामधील प्रामाणिक व साधा माणूस वाचता आला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
माझंही आवडतं पुस्तक. आणि त्यातले कित्येक धडे मला प्रत्यक्ष आयुष्यातही मोलाचे आणि अनुकरणीय वाटलेले आहेत. विशेषतः 'संगोपन' मधले. मुलांच्या भाषेविषयीचे, शाळेविषयीचे आणि एकूणच वाढीबद्दलचे.

कविन, विनिता झक्कास, कुमार १, अदीजो, जाई, मी नताशा, हर्पेन - सगळ्यांना धन्यवाद.
हर्पेन, मलाही अजून लिहावंसं वाटलं होतं पण जरा वेळ लागेल म्हणून जेवढं जमलं तेवढं लिहण्याची घाई. :स्मित :

मुलगी शाळेत जायचा कंटाळा येतो म्हणाली तर यांनी तिला नको जाऊ असं सांगितलं आणि ती खरेच काही दिवस गेली नाही, मग स्वतःहुन जायला लागली, हे सगळं वाचून अचंबित झाले होते की असेही आई वडील असतात का. बरीच वर्ष झाली वाचून तरी काही गोष्टी ठळक आठवतात, त्यातल्या त्यात संगोपन.
एक धडाही होता आम्हाला कुत्र्याचं पिल्लू असलेला पण तेव्हा अनिल अवचट कोण हे माहित नव्हतं आणि कोणतीही गोष्ट धडा म्हणून आली की त्यातली गंमत त्यावेळी कळत नाहीच.

छान

छान लिहिलंय. हे पुस्तक वाचल्याला आता बरीच वर्षे झाली. परत वाचायला हवं एकदा.>>> या वाक्याला ममं

हेच नाही त्यांची बाकी पुस्तके वाचूनही काळ लोटल्याने तपशीलवार काही लिहायला जमणार नाही हे मला पक्क माहिती आहे.

पण प्रत्येक पुस्तक वाचताना तयार झालेली एक प्रतिमा काहीशी अशी होती

काही मुले खोडकर असतात पण त्यांच्या खोड्या निष्पाप असतात. त्या कोणाचे नुकसान व्हावे या हेतूने केलेल्या नसतात. अवचटांमधे हे निष्पाप खोडकर मूल आहे.
आणि त्यासोबतच आहे एक संवेदनशील मन, एक टिपकागदी मन जे दु:ख वेदना प्रेम सद्भावना टिपत असते. ज्याला नीयम म्हणूनही खरतर कठोर व्हायला कधी आवडणार नाही.

मुक्तांगणचा प्रवास लिहीताना जिथे स्वत:विषयी लिहीण भाग आहे असे भाग लिहीताना ते थोडे संकोची भासतात. मुक्तांगणला मिळालेल्या प्रेमाबद्दल, सहभाग आणि मदतीबद्दल बोलताना मात्र एकदम खुलून येतात. ते ज्यांना गुरु मानतात मुक्तांगणच्या निर्मितीतला, ते आनंद नाडकर्णी हे माझ्यासाठीही कायम हिरो कॅरेक्टर असल्याने मुक्तांगणचा हा भाग आणि त्यांची एकमेकांशी असलेली मैत्री हे बाकी तपशील विसरले तरी लक्षात राहीलय.

सृष्टीत गोष्टी लेकीला ती लहान असताना वाचून दाखवायचे मी. त्यातल्या गोष्टी लक्षात नाहीत पण शैली लक्षात आहे. आणि नकळत त्या शैलीचा प्रभाव पडून लेकीसाठी एक bed time story त्या शैलीत लिहीली गेली होती हे आठवतय. हा प्रभाव नकळत होता. कॉपी करण्याकरता नव्हता. चांगलं कि वाईट आहे हे, हे मी अजूनही नाही ठरवू शकलेय.

कधी ते थोडे बाळबोध वाटले कधी ते थोडे अती संवेदनशील. पण तरी ते अप्रमाणिक कधीच वाटले नाहीत. जे काही होतं ते एकदम दिलसे होतं. कायमच ते स्वत:शी प्रामाणिक वाटले.

परत एकदा खजिना उघडून बसायला हवे वाचत. इतक्या वर्षांनी हे जे वाटले होते ते तसेच कायम आहे कि माझ्या चष्म्याचा नंबर आता बदलला आहे बघायला हवे.

अनिल अवचटांचं आप्त वाचलंय . तेव्हाच त्यांचं स्वतः विषयी वाचायचं असं ठरवलंय.
पण अजून वाचले नाही.
आता वाचेन.
अनिल अवचट एक लेखक म्हणून आवडतातच. त्यांचं मुक्तांगण मधलं कार्य तर फारच मोठं आहे.
ह्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

प्राचीन
छान लिहिलं आहे, पुस्तकही मस्त आहे